सोमवार, जुलै 7, 2025
Home Blog Page 124

जागतिक मागणीनुसार रोजगारक्षम मनुष्यबळ तयार करण्यासाठी कौशल्य विभागाचे नवे ‘पीपीपी’ धोरण

  • महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) धोरणात्मक भागीदार असणार
  • ‘आयटीआय’ला जागतिक दर्जाच्या केंद्रात रूपांतरित करणाऱ्या धोरणाला शासनाची मंजुरी

मुंबई, दि. १३: महाराष्ट्रातील औद्योगिक प्रशिक्षण (आयटीआय) संस्थांना जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण संस्थांमध्ये रूपांतरित करून उद्योगांच्या गरजेनुसार अत्याधुनिक प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याच्या उद्देशाने कौशल्य, रोजगार आणि नाविन्यता विभागाने तयार केलेल्या सार्वजनिक-खासगी भागीदारी अर्थात पीपीपी धोरणाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या धोरणामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रशिक्षण, संस्थेतील पायाभूत सुविधा, जागतिक दर्जाच्या कंपन्यांमध्ये थेट उमेदवारी प्रशिक्षण आणि कंपन्यांच्या भागीदारीमुळे प्रशिक्षणार्थींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणाऱ्या रोजगाराच्या जागतिक संधी उपलब्ध होणार आहेत. धोरणामार्फत काळानुरूप, नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम शिकवले जातील आणि २ लाख आयटीआय विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल असे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंत्रालयात वार्ताहर कक्षात पत्रकारांशी संवाद साधतांना सांगितले. यावेळी अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा उपस्थित होत्या.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) ह्या राज्याच्या व्यवसायिक शिक्षण प्रणालीचा अविभाज्य भाग राहिल्या आहेत. या संस्थांना आता खऱ्या अर्थाने जागतिक औद्योगिक प्रशिक्षणाचे केंद्र बनवून महाराष्ट्रात कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी सार्वजनिक खासगी भागीदारी अर्थात पीपीपी धोरणाची गरज असल्याचे कौशल्य, रोजगार आणि नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंत्रिमंडळ  बैठकींनंतर स्पष्ट केले.

महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासासाठी ‘आयटीआय’ने कुशल मनुष्यबळ तयार करण्यात आतापर्यंत मोठे योगदान दिले आहे. मात्र आता जागतिक उद्योगांच्या गरजेनुसार अत्याधुनिक प्रशिक्षित उमेदवारांची नितांत गरज भासू  लागली आहे.

असे असेल ‘पीपीपी’ धोरण

अग्रगण्य कॉर्पोरेट्स, औद्योगिक संघटना, परोपकारी व्यक्तीना अभ्यासक्रम विकसित करण्यासाठी, अत्याधुनिक जागतिक प्रशिक्षण सुविधा प्रदान करण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. तसेच उद्योगांना कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) द्वारे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सहभाग वाढवला  जाईल.

  1. १० वर्षे (किमान १० कोटी रुपये) आणि २० वर्षे (किमान २० कोटी रुपये )
  2. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) धोरणात्मक भागीदार (स्ट्रॅटेजिक पार्टनर) म्हणून काम करणार आहे.
  3. ग्रामीण भागात गरज पडल्यास निविदा काढून वायबिलिटी गॅप फंड (व्हीजीएफ) प्रणालीचा पर्याय म्हणून वापर करता येईल.
  4. ‘आयटीआय’ला त्यांचे स्थान, मूल्यांकन आणि संभाव्यतेच्या आधारे तीन याद्यांमध्ये विभागले जाईल.
  5. ‘आयटीआय’च्या जागेची आणि इमारतीची मालकी सरकारकडे राहील
  6. ‘आयटीआय’बाबत सरकारची धोरणे कायम राहतील.
  7. शिक्षक-कर्मचाऱ्यांसह कर्मचारी कायम राहतील. तथापि, अतिरिक्त अभ्यासक्रमासाठी अतिरिक्त कर्मचारी भागीदार उद्योगाद्वारे नियुक्त केले जाऊ शकतात.
  8. नवीन भागीदारांना उपकरणे, साहित्य खरेदी आणि नूतनीकरण / बांधकामास परवानगी दिली जाईल. सरकारी निविदा प्रक्रियेचे पालन न करता खुल्या बाजारातून ते हे करू शकतात.
  9. प्रत्येक ‘आयटीआय’मध्ये एक पर्यवेक्षण समिती (आयएमसी) असेल जिथे नवीन येणारा भागीदार अध्यक्ष असेल तर सचिव आयटीआयचे प्राचार्य / उपप्राचार्य किंवा सरकारने नियुक्त केलेली व्यक्ती असेल.
  10. यासंदर्भात कोणताही वाद मिटविण्यासाठी राज्यस्तरीय संचालन समिती असेल.
  11. ‘आयटीआय’मध्ये भागीदार उद्योगाकडून शिक्षण किंवा रोजगार संबंधित कार्यक्रम वगळता इतर कोणत्याही उपक्रमांना परवानगी दिली जाणार नाही.

* उद्योग कॉर्पोरेट यांच्या सामाजिक जबाबदारी (CSR) अंतर्गत कर सूट, पायाभूत सुविधा, बांधकाम, प्रशिक्षक आणि निदेशक यांचे प्रशिक्षण इत्यादी मध्ये गुंतवणूक करू शकतील.

  1. उद्योगांसह गुंतवणुकीद्वारे इमारत दुरुस्ती, अत्याधुनिक प्रयोगशाळा, स्मार्ट वर्ग खोल्या, आणि डिजिटल शिक्षण सुविधा उभारण्यात येतील. पहिल्या टप्प्यात राज्यातील किमान २५ औद्योगिक प्रशिक्षण संस्था निवडण्यात येतील, त्यानंतर प्रायोगिक उपक्रमांचा आढावा घेऊन १०० प्रशिक्षण संस्था पीपीपी धोरणात समाविष्ट केल्या जातील.
  2. औ. प्र. संस्था उद्योग भागीदारांसह संयुक्त प्रमाणपत्र प्रशिक्षण कार्यक्रम राबवतील. हे अभ्यासक्रम राष्ट्रीय व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण परिषद (NCVET), महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ (MSBSVET) व रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी यांच्याशी संलग्न असतील. अभ्यासक्रमात प्रशिक्षण नोंदणीकृत प्रशिक्षणार्थी आणि बाह्य उमेदवारांनाही प्रशिक्षण देण्यात येईल. शासनातील अंतर्गत नियमानुसार प्रशिक्षणार्थीना प्रतिपूर्ती देण्यात येईल. तर बाह्य उमेदवारांना हे प्रशिक्षण शुल्क भरावे लागेल.

बदलते अभ्यासक्रम

  1. पीपीपी धोरणामुळे विद्यार्थ्यांना जागतिक औद्योगिक प्रशिक्षणाची संधी
  2. AI, सायबर सुरक्षा, ए लर्निंग प्लॅटफॉर्म, ऑडीटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, आय ओ टी आणि रोबोटिक्स आणि हरित ऊर्जा सारख्या जागतिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेता येईल
  3. विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात प्रभावी असलेल्या उद्योग समूहांचा समावेश असल्याने सेंटर ऑफ एक्सलन्स संकल्पना राबवण्यात येईल. पुणे आणि छत्रपती संभाजी नगरमध्ये ऑटोमोबाईल कंपन्या अधिक असल्याने तिथे सेंटर ऑफ एक्सलन्स सेंटर विकसित केले जाऊ शकते. त्यामुळे तिथल्या प्रकल्पांच्या गरजेनुसार प्रशिक्षणार्थींना रोजगाराची संधी उपलब्ध होईल.
  4. प्रात्यक्षिक ज्ञानावर अधिक भर, उद्योगांच्या अनुषंगाने आवश्यक कुशल मनुष्यबळ तयार होण्यास मदत

प्रशिक्षणार्थीना स्टार्ट अप्ससाठी मार्गदर्शन, कार्यक्षेत्र आणि निधी साहाय्य प्रदान करणारे कॅम्पस आणि विविध रोजगार मेळाव्यांचे आयोजन त्यात थेट कंपन्यांचा सहभाग

  1. महिलांचा सहभाग वाढवण्यावर भर, कंपन्यांकडून महिलांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातील.
  2. औद्योगिक प्रशिक्षण संस्था (Industry aligned) उद्योग संरेखित मॉडेल अन्वये कार्यरत राहील आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या दृष्टीने मनुष्यबळ पुरवण्यास अधिक सामर्थ्यशील होईल.
  3. प्रशिक्षणार्थींना रोजगाराची संधी निर्माण करण्यासाठी पीपीपी तत्वावर चालवण्यात येत असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतच जॉब प्लेसमेंट सेल स्थापन करण्यात येईल.

सार्वजनिक -खासगी भागीदारीवर (PPP) शासनाचे संपूर्ण नियंत्रण

  1. प्रत्येक भागीदारी केलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेवर व्यवस्थापन समितीचे लक्ष राहील
  2. उद्योग भागीदारांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला प्रदान केलेली उपकरणे आणि सेवांवर त्यांचा कोणताही मालकी हक्क राहणार नाही. यावर शासनाचा हक्क राहील.
  3. खासगी उद्योग संस्थांनी निर्माण केलेल्या पायाभूत सुविधा शासनाच्याच अधीन असतील. त्याठिकाणी उद्योग संस्था खासगी कार्यालय स्थापित करू शकत नाहीत.
  4. उद्योग भागीदारीचा परिणामाने संबंधित संस्थेचे नाव बदलले जाऊ शकत नाही. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या परवानगीने परिसरातील काही ठिकाणी उद्योगाचे नाव प्रदर्शित करण्याची परवानगी देण्यात येईल .
  5. उद्योग भांडवली खर्च (CAPEX) आणि परिचालन खर्च (OPEX) दोन्हीमध्ये उद्योग समूहांचा खर्च
  6. राज्य सुकाणू समिती उद्योग भागीदारांना प्रशिक्षण संस्थेच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणींचे निराकरण करेल.
  7. भागीदाराने कोणत्याही वेळी शासकीय अधिनियम, नियम तसेच करारात नमूद अटी व शर्तीचा भंग केल्यास, कामगिरी समाधानकारक नसल्यास, त्यांचे कार्य शासकीय प्रशिक्षण संस्थेच्या हिताच्या विरुद्ध आढळून आल्यास करार रद्द करण्याबाबत राज्य सुकाणू समिती निर्णय घेईल.

महाराष्ट्रातील सार्वजनिक-खासगी (पीपीपी ) भागीदारी धोरणाद्वारे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची उन्नती करणे.  उद्योगाच्या मागणीनुसार सुसंगत कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी भागीदारी धोरण हे एक ऐतिहासिक पाऊल आहे. या धोरणामुळे महाराष्ट्रात जागतिक दर्जाचे कौशल्य केंद्रे स्थापन करण्याचे उद्दिष्ट दृष्टीपथात आहे. त्याचबरोबर रोजगारक्षमता वाढवण्यासोबतच राज्याच्या आर्थिक वृद्धीस देखील यामुळे योगदान मिळणार असून हे आदर्श उदाहरण ठरणार आहे. ‘पीपीपी’ तत्वावर महाराष्ट्रात प्रगत औद्योगिक केंद्रांची उभारणी झाल्यास कुशल मनुष्यबळाचे महाराष्ट्र हे जागतिक स्तरावरील आदर्श मॉडेल म्हणून नावारूपाला येऊ शकेल.

०००

संध्या गरवारे/विसंअ/

 

 

आश्रमशाळांमधील शिक्षकांना वेतनश्रेणी देण्याबाबत शासन सकारात्मक – मंत्री संजय शिरसाट

मुंबई, दि. १३: राज्यातील शाहू, फुले, आंबेडकर निवासी व अनिवासी आश्रमशाळांना नियमानुसार अनुदान देण्याची कार्यवाही सुरू आहे. या शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना नियमित वेतनश्रेणी देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असल्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.

मंत्री शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली निवासी, अनिवासी आश्रमशाळांच्या अनुदानाबाबत मंत्रालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीस आमदार विक्रम काळे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, समाज कल्याण आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अविनाश काळे उपस्थित होते.

मंत्री शिरसाट म्हणाले की, केंद्र सरकारच्या धर्तीवर शाहू, फुले, आंबेडकर निवासी, अनिवासी शाळा योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत १६५ आश्रमशाळांना तपासणीच्या अधीन राहून सन २०१९-२० या वर्षापासून २० टक्क्यांप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आश्रमशाळांना वि.जा.भ.ज. आश्रमशाळेच्या धर्तीवर मानधन देण्यासाठी लागणारा खर्च तसेच नियमित वेतनश्रेणीसाठी लागणारा खर्च यासंदर्भातील तुलनात्मक आकडेवारीचे वस्तुस्थितीचे अवलोकन करून याबाबत प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश मंत्री शिरसाट यांनी यावेळी संबंधितांना दिले. संबंधित आश्रमशाळांना आवश्यक आर्थिक साहाय्य देण्यासह त्यातील कर्मचाऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

०००

शैलजा पाटील/विसंअ/

 

 

औद्योगिक सहकारी संस्थांना अर्थसहाय्य योजनेंतर्गत स्वहिस्सा खर्चास परवानगी – मंत्री संजय शिरसाट

मुंबई, दि. १३: अनुसूचित जातीच्या युवकांना स्वयंरोजगारासाठी सक्षम करण्याच्या हेतूने सहकारी संस्थांना दिल्या जात असलेल्या अर्थसहाय्य योजनेंतर्गत संस्थांना पाच टक्के स्वहिस्सा उभारावा लागतो, तर उर्वरित निधी शासकीय आणि वित्तीय संस्थांकडून प्राप्त होतो. स्वहिस्साच्या अधिक कार्यक्षम वापरासाठी अटींमध्ये शिथिलता आणून संस्थांना स्वहिस्सा खर्च करण्यास परवानगी देण्यात येईल असे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.

मंत्री शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली अनुसूचित जातीच्या सहकारी संस्थांना अर्थसहाय्य योजनेंतर्गत संस्थेचा स्वहिस्सा आणि वित्तीय संस्थेच्या कर्जाबाबत मंत्रालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीस सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, समाज कल्याण आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था महासंघाचे अध्यक्ष शहाजी कांबळे उपस्थित होते.

मंत्री शिरसाट म्हणाले की, उद्योगधंद्याच्या माध्यमातून राज्यातील अनुसूचित जातीच्या घटकांचा विकास करण्यासाठी मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थांना अर्थसहाय्य करण्याची योजना सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांना सहकाराच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणणे, उद्योजकता निर्माण करणे आणि आर्थिक सशक्तीकरण करणे हा आहे. विविध औद्योगिक व उत्पादनक्षम सहकारी संस्थांना या योजनेचा लाभ मिळत असून, अल्पभांडवल असलेल्या संस्थांना देखील व्यवसाय उभारणीसाठी संधी निर्माण झाली आहे.

मात्र, काही संस्था कर्ज मिळवण्यात अपयशी ठरत आहेत आणि प्रकल्प सुरू करत नाहीत. त्यामुळे शासनाचे अर्थसहाय्यही परत केले जात नाही. अशा परिस्थितीत योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि निधीचा योग्य उपयोग होणे आवश्यक असल्याचे मंत्री शिरसाट यांनी यावेळी सांगितले.

०००

शैलजा पाटील/विसंअ/

पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या आता समुपदेशनाने

मुंबई, दि. १३: मोठ्या प्रमाणात असलेली रिक्त पदे व बदली पात्र कर्मचाऱ्यांची मर्यादित संख्या यामुळे राज्याच्या सर्व भागात मनुष्यबळाचा समतोल साधला जावा व बदल्यांची प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडावी यासाठी पशुसंवर्धन विभागातील पशुधन विकास अधिकारी व सहाय्यक आयुक्त या संवर्गातील बदल्या समुपदेशनाने करण्याचा ऐतिहासिक निर्णय पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतला आहे.

समुपदेशनाने बदल्यांची कार्यवाही १५ व १६ मे २०२५ रोजी आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे. या प्रक्रियेदरम्यान सुमारे ६५० अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. पशुसंवर्धन विभाग व दुग्धव्यवसाय विभागाची पुनर्रचना केल्यानंतर काही नवीन पदे निर्माण करण्यात आली आहेत. त्यामुळे एकत्रित पशुसंवर्धन विभागांतर्गत रिक्त पदांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे तीन हजार पेक्षा जास्त पदांचे मागणीपत्र सादर करण्यात आले असून नजि‍कच्या काळात ही पदे भरली जाणे अभिप्रेत आहेत.

पारदर्शक कारभार ; पसंतीनुसार बदल्या

पशुसंवर्धन विभागातील मोठ्या प्रमाणात असलेली रिक्त पदे व बदली पात्र कर्मचाऱ्यांची मर्यादित संख्या यामुळे राज्याच्या सर्व भागात मनुष्यबळाचा समतोल साधला जावा, यासाठी पशुधन विकास अधिकारी व सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन या संवर्गातील प्राधान्याने भरावयाची पदे निश्चित करण्यात आली आहेत. या पदांवर बदलीने पदस्थापना करण्यासाठी बदलीपात्र अधिकाऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी बदली देण्यासाठी समुपदेशनाची कार्यपद्धती अवलंबण्यात येणार आहे. त्याद्वारे बदलीपात्र अधिकाऱ्यांना प्राधान्यक्रम व जेष्ठतेनुसार उपलब्ध पदांमधून त्यांच्या पसंतीचे ठिकाण निवडण्याची संधी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे.

समुपदेशनाने बदलीची कार्यपद्धती पार पाडताना ती पारदर्शकपणे पार पाडली जाईल, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून यामध्ये बदलीसाठी निर्धारित करण्यात आलेली पदे, दिव्यांग, गंभीर आजार असलेले कर्मचारी, असक्षम पाल्य, विधवा किंवा परित्यक्ता असलेल्या महिला, पती-पत्नी एकत्रिकरण अशी वर्गवारी करण्यात आली आहे. बदलीपात्र अधिकाऱ्यांची वर्गवारीनिहाय जेष्ठता यादी व बदलीसाठी उपलब्ध पदे यांची यादी विभागाच्या पशुसंवर्धन संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली असून त्याची लिंक सर्व संबंधित अधिकाऱ्यांनाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सदर वर्गवारीतील जेष्ठ अधिकाऱ्यांस बदलीचे ठिकाण निवडण्यासाठी प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे.

०००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/

मंत्रिमंडळ निर्णय

रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसाठी फिरते पथक योजना; समाज व शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणार

रस्त्यावर राहणाऱ्या मुलांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’ ही सर्वंकष योजना राज्यात नियमित स्वरूपात राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निर्णयामुळे राज्यातील रस्त्यावर राहणाऱ्या हजारो बालकांना शिक्षण, आरोग्य, संरक्षण आणि नवजीवनाची संधी मिळणार असून ही योजना बालहक्कांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.

राज्यातील २९ महानगरपालिकेत प्रत्येकी एक व मुंबई महानगरपालिकेमध्ये पुर्व व पश्चिम उपनगरांसाठी प्रत्येकी एक अशी एकूण ३१ फिरती पथके सुरू करण्यात येणार असून, आगामी काळात याची व्याप्ती राज्यात वाढविण्यात येणार आहे.

या योजनेचा उद्देश रस्त्यावर राहणाऱ्या, एकल, अनाथ व दुर्लक्षित बालकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, त्यांना शिक्षणाची गोडी लावणे, वैद्यकीय सेवा पुरवणे आणि त्यांच्या सर्वांगीण पुनर्वसनासाठी आवश्यक त्या शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे आहे.

सुरुवातीला मिशन वात्सल्य अंतर्गत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक अशा सहा जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर ही योजना सुरू करण्यात आली होती. याला मिळालेला सकारात्मक प्रतिसाद लक्षात घेऊन ही योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली.

या योजनेंतर्गत निवडण्यात आलेल्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून विशेषतः बाल स्नेही बस/व्हॅनद्वारे ही सेवा दिली जाणार आहे. या व्हॅनमध्ये समुपदेशक, शिक्षक, महिला कर्मचारी, वाहनचालक व काळजीवाहक अशी चार जणांचे पथक असणार असून बसमध्ये जीपीएस ट्रॅकिंग व सीसीटीव्ही कॅमेरा देखील असणार आहे. मुलांचे सामाजिक अन्वेषण अहवाल तयार करून त्यानुसार त्यांच्या गरजांनुसार वैयक्तिक पुनर्वसन आराखडा तयार केला जाईल.

मुलांना वयाप्रमाणे अंगणवाडीत, शाळांमध्ये प्रवेश मिळवून देणे, त्यांच्या आरोग्याची तपासणी करून लसीकरण, पोषण आहार, औषधोपचार, स्वच्छतेच्या सवयी आणि व्यसनमुक्तीसाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. त्याचबरोबर त्यांना विविध कला व शिक्षणावरील उपक्रमांत गुंतवले जाणार आहे.

या योजनेंतर्गत दरमहा किमान २० टक्के मुलांना शाळेत प्रवेश मिळवून देणे बंधनकारक आहे. योजनेंतर्गत संस्थांना त्रैमासिक निधी वितरित केला जाणार आहे आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांकडून नियमित आढावा घेतला जाणार आहे.

०००

नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पबाधित होम स्वीट होमअंतर्गत घरांना एक हजार रुपये मुद्रांक शुल्क

नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्यांना ‘होम स्वीट होम’ अंतर्गत मौजा पुनापूर येथे वाटप केलेल्या घरांच्या भाडेपट्टा दस्त नोंदणीसाठी एक हजार रुपये मुद्रांक शुल्क आकारण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

स्मार्ट सिटी प्रोजेक्टमुळे बाधित झालेल्यांना २८ घरांचे वाटप करण्यात आले आहे. या घरांसाठी दस्त नोंदणी करताना सुमारे ४० ते ४५ हजार रुपये मुद्रांक शुल्क द्यावे लागणार होते. वस्तुतः प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांसाठी एक हजार रुपयांचे मुद्रांक शुल्क आकारण्यात आले होते. याच धर्तीवर स्मार्ट सिटी प्रोजेक्ट अंतर्गत ज्यांची घरे प्रकल्पासाठी घेतली गेली त्यांना घरांच्या नोंदणीसाठी मुद्रांक शुल्कात सवलत देण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार ‘होम स्वीट होम’ योजनेंतर्गत मौजा पुनापूर येथील अत्यल्प उत्पन्न गटासाठी बांधण्यात आलेल्या २८ घरांच्या भाडेपट्टयांच्या दस्तांना एक हजार रुपयांचे मुद्रांक शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला.

०००

बांधकाम क्षेत्रात एम-सॅंडचा वापर अनिवार्य करण्याचे धोरण निश्चित

नैसर्गिक वाळूच्या अती उत्खननामुळे निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय संकटांना आळा बसावा, तसेच बांधकाम क्षेत्राला पर्यायी व टिकाऊ साधन उपलब्ध व्हावे, यासाठी राज्यात कृत्रिम वाळू (एम-सॅंड) चा उत्पादन व वापर धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या धोरणानुसार सार्वजनिक बांधकामांमध्ये या कृत्रिम वाळूचा वापर वाढावा यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे.

वाळूच्या उत्पादनासाठी स्वामित्वधन म्हणून प्रतिब्रास ६०० रुपये आकारण्यात येते, त्याऐवजी प्रतिब्रास २०० रुपये इतक्या सवलतीच्या दराने स्वामित्वधन (रॉयल्टी) आकारण्यास बैठकीत मंजूरी देण्यात आली.

क्वॉरी वेस्ट व डोंगर उत्खननातून मिळणाऱ्या दगडांपासून क्रशरच्या साहाय्याने तयार होणारी ही कृत्रिम वाळू नैसर्गिक वाळूला पर्याय ठरू शकते,  या धोरणानुसार, जिल्हा प्रशासन व वन विभागाच्या परवानगीनंतर एम-सॅंड युनिट्स उभारण्यास परवानगी देण्यात येणार असून, पर्यावरणीय नियमांचे पालन आवश्यक राहील.

राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय व सार्वजनिक संस्थांनी आपल्या बांधकाम प्रकल्पांमध्ये एम-सॅंडचा प्राधान्याने वापर करावा, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत. याशिवाय, भारतीय मानक ब्युरोच्या (IS 383:2016) निकषानुसार गुणवत्ताधारित एम-सॅंडचाच वापर करण्यात यावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे. कृत्रिम वाळू (एम-सँड) धोरणास मंजुरी – प्रत्येक जिल्ह्यात ५० व्यक्ती/ संस्थांना एम-सँड युनिट स्थापन करण्यासाठी उद्योगविभाग सवलती देणार आहे. तसेच एम-सँड तयार करणाऱ्या युनिटला प्रतिब्रास २०० रुपये इतकी सवलत देण्यात येणार आहे.

एम-सॅंड युनिट्समुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी वाढतील, तसेच नैसर्गिक वाळूवरील अवलंबित्व कमी होऊन पर्यावरण रक्षणास हातभार लागेल, असा शासनाचा विश्वास आहे. यासाठी जिल्हास्तरीय समित्या स्थापन करण्यात येणार असून, धोरणाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र निरीक्षण यंत्रणा तयार केली जाणार आहे.

राज्यातील बांधकाम क्षेत्रात या निर्णयामुळे मोठा बदल होण्याची शक्यता आहे. शासनाच्या या पावलामुळे पर्यावरण रक्षण, टिकाऊ विकास आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

एम सँड गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देण्यात येणार असून औद्योगिक प्रोत्साहन अनुदान, व्याज सवलत, विद्युत शुल्कातून सूट, मुद्रांक शुल्क माफी आणि वीजदरात अनुदान दिले जाणार आहे.

०००

शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी दूर करणारा खुल्लर समितीचा अहवाल स्वीकृत

शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या वेतनातील त्रूटी दूर करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मुकेश खुल्लर समितीचा वेतनत्रुटी व अन्य शिफारशींबाबतचा अहवाल आज मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

केंद्राच्या सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी राज्य शासकीय व इतर कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ पासून लागू करण्यात आल्या. पण सुधारित वेतनश्रेणी लागू केल्यानंतर वेतननिश्चिती व सुधारित वेतनश्रेणी यांच्या अनुषंगाने काही त्रुटी आढळल्या होत्या. त्यावर राज्यातील शिक्षकांनी मुंबई, छत्रपती संभाजीनगर व नागपूर खंडपीठांमध्ये विविध याचिका दाखल केल्या होत्या. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शासनाने १६ मार्च २०२४ च्या शासन निर्णयाद्वारे मुकेश खुल्लर यांच्या अध्यक्षतेखाली वेतनत्रुटी समिती स्थापन केली होती. या समितीने विविध प्रशासकीय विभाग तसेच ५८ संघटनाशी चर्चा केली. समितीला प्राप्त तसेच वित्त विभागाकडे सादर निवेदनांचाही विचार केला. यात समितीने विविध संवर्गाचे प्रस्ताव तपासून ४४१ संवर्गांबाबत शिफारशी केल्या आहेत. या शिफारशींचा अहवाल ३१ डिसेंबर २०२४ रोजी शासनास सादर केला गेला. हा अहवाल व त्यातील शिफारशी आज मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारण्यात आल्या. अहवालात, समितीने वेतनस्तर मंजुरीबाबतचे विवरणपत्र जोडपत्र – १ म्हणून, तर जोडपत्र २ मध्ये वेतननिश्चिती, निवडश्रेणी व प्रशासकीय सुधारणांबाबत केलेल्या शिफारशी समाविष्ट आहेत. जोडपत्र – ३ मध्ये समितीने अमान्य केलेल्या प्रस्तावांचे विवरण सादर केले आहे. मुख्यतः बक्षी समितीच्या खंड – २ च्या अनुषंगाने काढलेल्या  १३ फेब्रवारी २०२३ च्या शासन निर्णयानुसार वेतनश्रेणीत वाढ करूनही वेतन निश्चिती करताना काही कर्मचाऱ्यांचे नवीन वेतन पूर्वीच्या वेतनापेक्षा कमी होत असल्याचे आढळले होते. नवीन वेतन श्रेणी लागू करून वेतन पूर्वीपेक्षा कमी होत असल्याचे आढळल्यास त्या वेतनश्रेणीत पुढील टप्प्यावर वेतन निश्चित करण्याची शिफारस समितीने केली आहे. जेणेकरून नवीन वेतन श्रेणीत पूर्वीपेक्षा कमी वेतन राहणार नाही. याशिवाय निवडश्रेणी वेतनस्तर लागू करण्याच्या २८ मार्च २०२३ च्या शासन निर्णयातील एकाकी पदासाठींची वेतनश्रेणी एस-२७ पेक्षा जास्तीची अट शिथील करण्याची शिफारस समितीने केली आहे. तसेच एकाच संवर्गात पण अन्य विभागात समान पदावर काम करणाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणी देण्यास समितीने शिफारस केली आहे. वेतनश्रेणी सुधारल्याने पदोन्नतीतील साखळीतील पदोन्नतीच्या पदाची वेतनश्रेणी कमी होत असल्यास, ती त्रुटी दूर करण्याचीही शिफारस समितीने केली आहे. या समितीने शिफारस केलेले वेतन १ जानेवारी २०१६ पासून काल्पनिकरित्या मंजूर केले जाईल व प्रत्यक्ष आर्थिक लाभ याबाबतचे शासन आदेश ज्या महिन्यात काढण्यात येतील, त्या महिन्यापासून लागू होतील. मात्र १ जानेवारी २०१६ ते शासन आदेश काढण्यात येणाऱ्या महिन्यापर्यंतची कोणतीही थकबाकी दिली जाणार नाही.

०००

सार्वजनिक खासगी भागीदारीव्दारे आयटीआयमध्ये आधुनिकीकरण

राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे (आयटीआय) सार्वजनिक खासगी भागीदारी व्दारे अद्ययावतीकरण करण्याचे धोरण राबविण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

या धोरणाचे औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रांमध्ये रुपांतरीत करण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रशिक्षण केंद्रातून उद्योगांच्या मागणीनुसार प्रशिक्षणार्थी घडवणे आणि त्यांची रोजगार क्षमता वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन धोरणात्मक भागीदार म्हणून काम करणार आहे. या धोरणानुसार औद्योगिक प्रशिक्षण संस्थांशी भागीदारी करता येणार आहे. औद्योगिक संघटना, उद्योग किंवा त्यांचे ट्रस्ट, राज्य किंवा केंद्र सरकारचे सार्वजनिक उपक्रम,  स्वयंसेवी संस्था भागीदारी करु शकतात.

भागीदारीसाठी कालावधी आणि रक्कम निश्चित करण्यात आली आहे. संस्था १० वर्षे दत्तक घेण्यासाठी किमान १० कोटी रुपये आणि २० वर्षांसाठी किमान २० कोटी रुपये निश्चित करण्यात आले आहेत.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे स्थान, मूल्यांकन आणि संभाव्यतेच्या आधारे तीन याद्यांमध्ये विभागले जाईल. आयटीआयच्या जागेची आणि इमारतीची मालकी शासनाकडे राहील

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेबाबत शासनाची धोरणे कायम राहतील. शिक्षक कर्मचाऱ्यांसह कर्मचारी कायम राहतील. तथापि, नवीन तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण आणि अभ्यासक्रम राबविण्यासाठी  अतिरिक्त कर्मचारी भागीदार उद्योगाद्वारे नियुक्त केले जाऊ शकतात. नवीन भागीदारांना उपकरणे, साहित्य खरेदी आणि नूतनीकरण / बांधकामास परवानगी दिली जाईल. सरकारी निविदा प्रक्रियेचे पालन न करता खुल्या बाजारातून नूतनीकरण आणि बांधकाम करू शकतात.

प्रत्येक औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये एक पर्यवेक्षण समिती (आयएमसी) नियुक्ती केली जाईल. या समितीत  नवीन येणारा भागीदार अध्यक्ष असेल तर  संस्थेचे प्राचार्य किंवा उपप्राचार्य किंवा शासनाने नियुक्त केलेली व्यक्ती सचिव असेल. यासंदर्भात कोणताही वाद मिटविण्यासाठी राज्यस्तरीय संचालन समिती नियुक्त केली जाईल. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत भागीदार उद्योगाकडून शिक्षण किंवा रोजगार संबंधित कार्यक्रम वगळता इतर कोणत्याही उपक्रम अथवा कामकाजासाठी परवानगी दिली जाणार नाही.

०००

राष्ट्रीय न्यायवैद्यक शास्त्र विद्यापीठाच्या उपकेंद्रास नागपूरमध्ये जमीन

राष्ट्रीय न्यायवैद्यक शास्त्र विदयापीठाच्या नागपूर येथील उपकेंद्रास मौजे चिंचोली (ता. कामठी, जि. नागपूर) येथील २० हेक्टर २३ आर जमीन देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत गुजरातमधील गांधीनगर येथील राष्ट्रीय न्यायवैद्यक शास्त्र विद्यापीठ हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे एकमेव विद्यापीठ आहे. या विद्यापीठाचे उपकेंद्र नागपूर मध्ये सुरू करण्यात येणार आहे. हे उपक्रेंद्र विश्वास सेल, पोलिस हेल्प सेंटर इमारत, परसोडी-सुभाषनगर, नागपूर येथील इमारतीत तात्पुरत्या स्वरुपात भाडेतत्वावर कार्यरत करण्यात येणार आहे. या उपकेंद्रासाठी २०२५-२८ साठी केंद्रीय गृह मंत्रालयाने १२० कोटी अनुदान मंजूर केले आहे. या उपकेंद्रासाठी कायमस्वरूपी प्रांगण उपलब्ध व्हावे यासाठी चिंचोली (ता.कामठी) येथील ही जमीन देण्यात येणार आहे. या उपकेंद्राचा फायदा न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, मुंबई व अधिपत्याखालील सर्व प्रादेशिक प्रयोगशाळा व लघु प्रयोगशाळांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांना होणार आहे. तसेच न्यायाधीश, पोलीस अधिकारी, कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी तसेच सरकारी अभियोक्ता यांना होणार आहे. यातून न्यायदान प्रक्रिया अधिक गतीमान होण्यासाठी मदत होणार आहे.

०००

 

राष्ट्रीय लोक न्यायालयात ७०४ कोटींची प्रकरणे निकाली

मुंबई, दि. १३ : नगर दिवाणी व सत्र न्यायालय, मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालय मुंबई, सहकारी अपिलीय न्यायालय, डीआरटी कुलाबा व मोटार अपघात दावा प्राधिकरण, मुंबई येथे राष्ट्रीय लोक न्यायालय १० मे रोजी पार पडले. या लोक न्यायालयात ७५ पॅनल नेमण्यात आले होते. ज्यामध्ये ९०२२ प्रलंबित प्रकरणे व ४२७४ दाखल पूर्व प्रकरणे अशी एकूण १३२९६ प्रकरणे निकाली काढण्यात आली. या सर्व निकाली प्रकरणाचे एकूण मूल्य ७०४ कोटी रुपये आहे.

राष्ट्रीय लोक न्यायालयाची सुरूवात नगर दिवाणी व सत्र न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम, मुंबई वकील संघाचे सचिव ॲड आसिफ नकवी, पक्षकार व विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी यांच्या हस्ते वृक्षाला जलार्पण करुन झाली. यावेळी विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांनी नुकतेच प्रकाशित केलेल्या मराठी गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे ५ मे ते ९ मे या काळात राबविलेल्या विशेष अभियानात मुंबई मुख्य न्याय दंडाधिकारी एम.आर.ए. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील सर्व न्यायदंडाधिकारी न्यायालयातील एकूण ४२०६ प्रलंबित खटले निकाली काढण्यात आली. लोकन्यायालय यशस्वी करण्याकरिता सर्व न्यायालयातील न्यायिक अधिकारी, मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव अनंत देशमुख व न्यायालयातील कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

०००

निलेश तायडे/विसंअ/

 

 

घनसावंगी मतदारसंघातील पाणी पुरवठा योजनांना गती द्या – मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, दि. १३ : जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील विविध पाणी पुरवठा योजनांची कामे नियोजनपूर्वक व कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

मंत्रालयातील दालनात घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील पाणी पुरवठा योजनांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी मंत्री पाटील बोलत होते. यावेळी आमदार हिकमत उधाण, पाणी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, अभियान संचालक प्रतिनिधी सुषमा सातपुते, मुख्य अभियंता प्रशांत भामरे यांच्यासह मतदारसंघातील पाणीपुरवठा संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले की, मराठवाड्यातील पाणी पुरवठ्याची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. येत्या पंधरवड्यात कामांची पाहणी करण्यात येईल. चुकीची माहिती देण्याऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणी पुरवठा कामांमध्ये काही कंत्राटदारांकडून होत असलेली दिरंगाई लक्षात घेता, अशा कंत्राटदारांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत.

सध्या प्रगतीपथावर असलेल्या कामांना अधिक गती देण्यात यावी, जेणेकरून नागरिकांना लवकरात लवकर लाभ मिळू शकेल. मतदारसंघातील पाणीपुरवठ्याच्या सर्व  योजनांमध्ये सौरऊर्जेचा वापर करण्याचे विचाराधीन असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

०००

राजू धोत्रे/विसंअ/

 

शिरोळ मतदारसंघातील पाणी पुरवठा योजनांना गती द्या – मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, दि. १३: कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ विधानसभा मतदारसंघातील विविध पाणीपुरवठा योजनांची कामे नियोजनपूर्वक व कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

मंत्रालयातील दालनात शिरोळ विधानसभा मतदारसंघातील पाणी पुरवठा योजनांच्या कामाविषयी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, अभियान संचालक प्रतिनिधी सुषमा सातपुते, मुख्य अभियंता प्रशांत भामरे यांच्यासह मतदारसंघातील पाणीपुरवठा योजनांसंबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले की, जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा कामांमध्ये काही कंत्राटदारांकडून होत असलेली दिरंगाई लक्षात घेता, अशा कंत्राटदारांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी. तसेच सध्या प्रगतीपथावरील कामांना अधिक गती देण्यात यावी, जेणेकरून नागरिकांना लवकरात लवकर लाभ मिळू शकेल. मतदारसंघातील पाणीपुरवठ्याच्या सर्व  योजनांमध्ये सौरऊर्जेचा वापर करण्याचे विचाराधीन असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

०००

राजू धोत्रे/विसंअ/

यशस्वी विद्यार्थ्यांनी भविष्यातही यशाची शिखरे पादाक्रांत करावीत – मंत्री दादाजी भुसे

मुंबई दि. १३ : दहावीची परीक्षा हा विद्यार्थ्यांची शैक्षणिक दिशा ठरविणारा महत्त्वाचा टप्पा असतो. या टप्प्यावर यश मिळविलेले विद्यार्थी कौतुकास पात्र आहेत, अशा शब्दात शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी परीक्षेत यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून विद्यार्थ्यांनी भविष्यातही यशाची शिखरे पादाक्रांत करावीत,अशा शुभेच्छा दिल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले. राज्यात एकूण ९४.१० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून परीक्षेतील सर्व उत्तीर्ण विद्यार्थी, त्यांचे पालक व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी अभिनंदन केले आहे. तर अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी नाउमेद न होता पुरवणी परीक्षेस प्रविष्ट होऊन यश संपादन करावे, असे आवाहन केले आहे.

उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या

दहावीच्या परीक्षेत नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५ लाख ५८ हजार ०२० नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख ४६ हजार ५७९ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून १४ लाख ५५ हजार ४३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालाची ही टक्केवारी ९४.१० अशी आहे.

दिव्यांग विद्यार्थ्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाण उल्लेखनीय

नऊ विभागीय मंडळांमधून एकूण ९,६७३ दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९,५८५ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यातील ८,८४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांच्या निकालाची टक्केवारी ९२.२७ अशी उल्लेखनीय आहे. या विद्यार्थ्यांचेही श्री. भुसे यांनी अभिनंदन केले आहे.

मुलींची आघाडी

सर्व विभागीय मंडळातून नियमित उत्तीर्ण मुलींची टक्केवारी ९६.१४ इतकी असून मुलांची टक्केवारी ९२.३१ इतकी आहे. मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा ३.८३ टक्क्यांनी जास्त आहे.

दहावीच्या एकूण २४ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तर २३ हजार ४८९ शाळांपैकी ७९२४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. नियमित विद्यार्थ्यांपैकी ४ लाख ८८ हजार ७४५ विद्यार्थी प्रविण्यासह प्रथम श्रेणीत तर ४ लाख ९७ हजार २७७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षणमंत्र्यांनी कौतुक केले आहे.

विभागीय मंडळनिहाय उत्तीर्ण विद्यार्थी

राज्यातील सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजेच ९८.८२ टक्के इतका असून नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे ९०.७८ टक्के इतका आहे. या व्यतिरिक्त पुणे विभागात ९४.८१, छत्रपती संभाजीनगर विभागात ९२.८२, मुंबई विभागात ९५.८४, कोल्हापूर विभागात ९६.८७, अमरावती विभागात ९२.९५, नाशिक विभागात ९३.०४ आणि लातूर विभागात ९२.७७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती मंडळामार्फत देण्यात आली आहे.

०००

बी.सी.झंवर/विसंअ/

 

दहावी परीक्षेच्या निकालात मुलींची वाढती टक्केवारी समाधानकारक – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १३: दहावीच्या परीक्षेत मुलींच्या यशाची वाढती टक्केवारी ही समाजातील सकारात्मक बदलाचे प्रतीक आहे. शिक्षणाच्या माध्यमातून मुली आत्मनिर्भर बनत असून, हे यश त्यांच्या परिश्रम आणि कुटुंबियांच्या पाठिंब्याला दिलेली पावती आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.

दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये राज्यातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

आपल्या संदेशात उपमुख्यमंत्री शिंदे म्हणतात की, दहावी हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या टप्प्यावर यश मिळवणे ही केवळ परीक्षेतील कामगिरी नसून त्यामागे विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांचा पाठिंबा आणि शिक्षकांचे मार्गदर्शन असते. या सर्वांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो.

अपेक्षित यश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना निराश होण्याचे कारण नाही. परीक्षा ही आयुष्याची अंतिम कसोटी नसते. अपयश ही यशाच्या दिशेने टाकलेली एक पायरी आहे. आत्मपरीक्षण करा, चुका शोधा आणि नव्या उत्साहाने पुढे या. यश नेहमीच तयारीची वाट पाहत असतं. स्वत:वर विश्वास ठेवा आणि पुन्हा प्रयत्न करा, असेही उपमुख्यमंत्री आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात.

०००

ताज्या बातम्या

आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत जेईई – सीईटीची कोचिंग

0
चंद्रपूर, दि. 6 : ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाखाणण्याजोगी असते. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे किंवा संधी उपलब्ध न झाल्यामुळे असे विद्यार्थी स्पर्धेच्या युगात मागे...

पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्याकडून आदिवासी विकास विभागाचा आढावा

0
चंद्रपूर, दि. 6 : पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी शनिवारी, जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाचा आढावा घेतला. तसेच राज्य शासनाने सुरू केलेल्या 100 दिवस प्रशासकीय...

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे प्रयाण

0
मुंबई, दि. ६ : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून विमानाने आज दुपारी २.०० वाजता कोची येथे प्रयाण झाले. यावेळी  अतिरिक्त मुख्य सचिव व...

महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…!

0
ज्ञानेश्वरांच्या ओव्यांपासून, शिवरायांच्या तलवारीपर्यंत, महात्मा फुल्यांच्या साहसापासून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनापर्यंत मुंबई, दि.  : - ‘महाराष्ट्राचा इतिहास गौरवशाली आहे. आणि ती एक जबाबदारी...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विद्यार्थ्यांच्या ‘एआय’ प्रकल्पांचे कौतुक

0
पंढरपूर दि. ६  : पंढरपूर येथील अरिहंत पब्लिक स्कूलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘टेक वारी’ या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच व्हिडिओ...