सोमवार, जुलै 7, 2025
Home Blog Page 122

पूरपरिस्थितीत जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवा- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

पुणे, दि. १४: हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता लक्षात घेता सर्व विभागांनी पूरपरिस्थितीत जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी आणि आपत्तीपूर्व सूक्ष्म नियोजनावर भर द्यावा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित मान्सूनपूर्व तयारी विभागस्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अपर आयुक्त महेश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, तसेच विभागातील सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

डॉ. पुलकुंडवार म्हणाले, जिल्हास्तरावर महसूल, पोलीस, जलसंपदा, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था, आरोग्य विभाग आदींनी समन्वयासाठी बैठक घ्यावी. औषधे आणि रास्तभाव दुकानातील अन्नधान्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहील याची दक्षता घ्यावी. पूरस्थितीत नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करावी. पाऊस अधिक झाल्यास दळणवळण आणि वाहतूक सुविधा कार्यरत राहतील याची दक्षता घ्यावी. पावसाळ्यात २४ तास यंत्रणा कार्यरत ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले.

विभागीय आयुक्त म्हणाले, यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज असल्याने जलसंपदा विभागाने सीडॅक प्रतिमान उपयोगात आणून पूरस्थितीची माहिती देण्याचे नियोजन करावे. आवश्यक उपाययोजनांसाठी हवामान विभागाशी संपर्क ठेवावा. जलसंपदा विभागाने पुणे विभागात असणाऱ्या नद्यांवरील पुलावर धोका पातळी चिन्हांकित करावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने इमारती आणि पुलांची तपासणी करावी. पूरस्थितीत नागरिकांचे स्थलांतर करण्यासाठी निवारा केंद्रांचे नियोजन करावे. आवश्यक तेथे जिल्हाधिकारी आणि जलसंपदा विभागाने आंतरराज्य बैठका तातडीने घ्याव्यात. जलसंपदा विभागाने पूर परिस्थितीचा नेहमी सामना करणाऱ्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांसोबत समन्वय बैठक घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

मागील वर्षीच्या कामगिरीसाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफला धन्यवाद देऊन डॉ. पुलकुंडवार म्हणाले, एनडीआरएफने पुण्यासाठी २ पथके कायमस्वरूपी ठेवावीत आणि एक पथक राखीव असावे. तर कोल्हापूर, सांगली व सातारा या तीन जिल्ह्यात प्रत्येकी एक पथक असावे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पूर परिस्थितीत वाहतूक वळविण्याबाबत नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

विशेष पोलीस महानिरीक्षक फुलारी यांनी विभागातील नियोजनाविषयी माहिती दिली. पूरस्थितीची पूर्व कल्पना देण्यासाठी जलसंपदा विभागाने सीडॅक आणि हवामान विभागाशी समन्वय ठेवण्याच्या सूचना पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिल्या.

बैठकीला आरोग्य, पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, एनडीआरएफ, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पोलीस व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.0000

 

येत्या वर्षभरात बाराशे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणार -सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

पुणे, दि. १४ : येत्या ३६५ दिवसात महाराष्ट्राची कला संस्कृती, नाट्य संस्कृती लोककला, लोकसंगीत, महान विभूतींना अभिवादन आदींचे १ हजार २०० कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्य विभागाने घेतला आहे, असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य विभागामार्फत सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक सभागृहात आयोजित ‘जयतु शंभू’ या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री ॲड. शेलार बोलत होते. यावेळी आमदार विजय शिवतारे, ॲड. राहुल कुल, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे उपस्थित होते.

हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती प्रथमच राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित करण्यात येत असल्याचे सांगून मंत्री ॲड. शेलार म्हणाले, त्यानिमित्ताने हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यापुढे दरवर्षी छत्रपती संभाजी महाराजांना सलामी म्हणून असा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम सांस्कृतिक कार्य विभागाकडून आयोजित केला जाईल.

छत्रपती संभाजी महाराज हे सर्वांचे प्रेरणादायी होते. आदर्श पुत्र, आदर्श राजा, आदर्श योद्धा, पराक्रमी नेतृत्व कसे असावे याचा आदर्श छत्रपती संभाजी महाराज होते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेले स्वराज्य जतन करण्याचे काम त्यांनी केले. त्यांनी मृत्यू पत्करला पण धर्म सोडला नाही म्हणून त्यांना धर्मरक्षक म्हटले जाते. राज्यकारभार, न्यायनिवाडा, शत्रूशी झुंज यांचे आदर्श उदाहरण छत्रपती संभाजी महाराज असून त्यांचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे. ते संस्कृत, हिंदीचे भाषा प्रभू होते, असेही ते म्हणाले.

राज्यशासनाने यावर्षी पहिल्या वर्षीचा छत्रपती संभाजी महाराज प्रेरणागीत पुरस्कार घोषित केला. तो क्रांतिवीर वि. दा. सावरकर यांच्या ‘अनादी मी, अनंत मी’ या गीताला दिला. पॅरिसला मार्सेलीस येथून हा पहिला पुरस्कार जाहीर केला. यावर्षी अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेव्या जयंतीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संत ज्ञानेश्वरांच्या ७५० व्या जन्मोत्सवानिमित्त कार्यक्रम सुरू करण्यात येत असून एक कार्यक्रम संत सोपानदेव यांच्या समाधी ठिकाणी आयोजित करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

आमदार विजय शिवतारे म्हणाले, शंभूराजांचा जन्म पुरंदर येथे झाल्यामुळे येथे त्यांची शासकीय जयंती साजरी व्हावी अशी मागणी दोन वर्षापूर्वी तत्कालीन पालकमंत्री यांच्याकडे केली होती. त्यानुसार त्यांनी तत्काळ मान्यता आणि तरतूद केली असे सांगून श्री. शिवतारे यांनी पुरंदर तालुक्याचे ऐतिहासिक महत्त्व सांगितले.

आमदार राहुल कुल म्हणाले, संपूर्ण देशभरात ज्या ज्या वेळी क्रांती झाली त्यामध्ये पुणे आणि परिसराचा मोठा वाटा आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा इतिहास या जिल्ह्यामध्ये घडला. त्यामुळे हा वारसा जतन करण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करत आहे.

या सांस्कृतिक कार्यक्रमात ढोल पथक, मर्दानी खेळ, वासुदेव, गोंधळी असे शंभरहून अधिक लोक कलाकारांनी आपली कला सादर केली. प्रामुख्याने स्नेहलता तावडे, तेजा देवकर, ऋतुराज फडके हे कलाकार यात सहभागी झाले. निवेदन प्रसिद्ध अभिनेत्री समीरा गुजर यांनी केले. नृत्यदिग्दर्शन राकेश शिर्के यांनी केले.

००००

राजधानीत छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

नवी दिल्ली, दि. १४ :  छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सदन येथे त्यांना अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

महाराष्ट्र परिचय केंद्रातही अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात देखील छत्रपती संभाजी महाराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माहिती अधिकारी अंजु निमसरकर यांच्यासह उपस्थित कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

०००

अमरज्योत कौर अरोरा

सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी महाराष्ट्राचे ‘भूषण’…

मुंबई, दि. १४: भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आज शपथ घेतली हे महाराष्ट्रासाठी ‘भूषण’आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आपल्या वडिलांकडून सामाजिक कार्याचा वसा घेतलेले न्या. भूषण गवई सर्वोच्च न्यायालयातील अनेक घटनात्मक खंडपीठांचा भाग होते. ज्याद्वारे अनेक चांगले ऐतिहासिक निकाल त्यांनी दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून  न्या. गवई यांनी ‘महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ’ नागपुरात स्थापन व्हावे, यासाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे. विविध न्यायालयांमधील पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठीही त्यांचे विशेष योगदान आहे.

न्यायालयीन सेवेत आपल्या दीर्घ आणि निष्कलंक कार्यकाळात त्यांनी विविध उच्च पदांवर काम करताना न्याय, नीतिमत्ता आणि पारदर्शकतेचे भान राखले आहे.

त्यांच्या कारकीर्दीत भारतीय न्यायव्यवस्था अधिक सुदृढ आणि लोकाभिमुख होईल, असा मला विश्वास असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

०००

 

वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील नळ जोडणीची कामे तातडीने पूर्ण करावीत – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, दि 14 : वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रालगतच्या ग्रामीण भागातील समाविष्ट गावांसाठी जलजीवन मिशन योजनेंतर्गत प्रलंबित असलेल्या कामांकरिता मुंबई महानगर विकास प्राधिकरण (एमएमआरडीए), जिल्हा परिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महानगरपालिका यांची एकत्र बैठक घेऊन नळ जोडणीची (टॅपिंगचे) कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

मंत्रालयात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रालगतच्या ग्रामीण भागातील समाविष्ट गावासाठी जलजीवन मिशन योजनेंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेविषयी आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार स्नेहा-दुबे पंडित, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, वसई-विरार महानगरपालिकाचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, अभियान संचालक सुषमा सातपुते, कार्यकारी अभियंता सुरेंद्र ठाकरे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता अजय मुळे, अजय सिंह उपस्थित होते.

वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील कामांच्या गुणवत्तेबाबत स्वतंत्र यंत्रणेमार्फत तपासणी संबंधित अधिकाऱ्यांनी करून घ्यावी. वसई-विरार महानगरपालिका पाणीपुरवठा योजनेची कामे ऑक्टोबर महिन्यापर्यंत पूर्ण करावीत. तसेच वितरण व्यवस्थेची सर्व प्रलंबित कामे पूर्ण करून पाणी जोडणीसाठी टॅपिंगचे काम पूर्ण करुन सर्वांना पाणी उपलब्ध होईल यादृष्टीने कार्यवाही करावी, असे निर्देश मंत्री श्री. पाटील यांनी दिले. अर्नाळा व १६ गावे, तिल्हेर व १२ गावे, अर्नाळा किल्ला व ७ गावे या योजनेंतर्गत प्रलंबित असलेली कामे पूर्ण करण्याच्या सूचनाही  मंत्री श्री. पाटील यांनी दिल्या.

 

००००

प्रविण भुरके/स.सं

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई, दि.14: छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

पुरंदर किल्ल्यावरील छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे संवर्धन व पुनर्बांधणीसाठी प्रयत्न करू – सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार

पुणे, दि. १४ : पुरंदर किल्ल्यावरील माची आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झालेल्या वाड्यांच्या भिंतीची पुनर्बांधणी, संवर्धन आणि जतनाच्या अनुषंगाने लष्कराशी चर्चा करून सकारात्मक प्रयत्न करू, अशी ग्वाही राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली.

किल्ले पुरंदर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार आणि मराठी भाषा व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यावेळी मंत्री ॲड. शेलार बोलत होते. कार्यक्रमास आमदार विजय शिवतारे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल (निवृत्त) स. दै. हंगे, पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वाहणे, तहसीलदार विक्रम राजपूत, गटविकास अधिकारी पंकज शेळके, पुरंदर प्रतिष्ठानचे प्रशांत पाटणे आदी उपस्थित होते.

मंत्री ॲड. शेलार म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव आणि पराक्रम महाराष्ट्रासोबतच संपूर्ण भारताला परिचयाचा आहे. संभाजी महाराज प्रचंड पराक्रमी, बुद्धिमान आणि संवेदनशील होते. बालपणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत मोहिमा, लढाया, स्वाऱ्यांवर गेल्यामुळे त्यांना पराक्रमाचे बाळकडू मिळाले. त्यांच्या शौर्यात प्रचंड ताकद असल्यामुळे त्यांनी बलाढ्य आणि क्रूर अशा औरंगजेबाशी लढताना त्याला ९ वर्षे सळो की पळो केले.

छत्रपती संभाजी महाराज हे बुद्धिमान, संस्कृतचे गाढे अभ्यासक होते. त्यांनी संस्कृतमध्ये लिखाण केले. त्यांना इंग्रजीचे ज्ञान होते आणि हिंदीमध्येही त्यांनी ग्रंथरचना केली. धर्मरक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी रयतेवर वात्सल्य, प्रेम केले. त्याच मार्गावर राज्य शासन वाटचाल करत आहे, असेही ॲड. शेलार म्हणाले.

कसबा, रत्नागिरी येथे छत्रपती संभाजी महाराजांचे जागतिक दर्जाचे स्मारक उभारणार -मंत्री उदय सामंत

छत्रपती संभाजी महाराजांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील कसबा या गावात संभाजी महाराजांचे जागतिक दर्जाचे स्मारक राज्य शासनाच्यावतीने उभारण्यात येईल, अशी घोषणा उद्योगमंत्री श्री. सामंत यांनी केली.

छत्रपती संभाजी महाराजांवरील ‘छावा’ चित्रपट दीड महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला. तसेच महाराष्ट्रातील संभाजी महाराजांचा सर्वात उंच पुतळा रत्नागिरीत असल्याचे पहायला मिळेल. आता कसबा येथे सर्वांना अभिमान वाटेल असे स्मारक उभारण्यात येईल, असे ते म्हणाले.

आमदार विजय शिवतारे यांनी पुरंदर तालुक्याला प्रचंड ऐतिहासिक वारसा असल्याचे सांगून पुरंदर किल्ल्याचा विकास आराखडा व्हावा अशी मागणी केली.

प्रारंभी मंत्री श्री. सामंत आणि ॲड. शेलार यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी महाराजांचा महती सांगणारा पाळणा गायला.

यावेळी मंत्री ॲड. शेलार यांच्या हस्ते पुरंदर प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे प्रदान करण्यात आले.

०००००

सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी महाराष्ट्राचे ‘भूषण’

मुंबई दि १४ : भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आज शपथ घेतली हे महाराष्ट्रासाठी ‘भूषण’ आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आपल्या वडिलांकडून सामाजिक कार्याचा वसा घेतलेले न्या. भूषण गवई सर्वोच्च न्यायालयातील अनेक घटनात्मक खंडपीठांचा भाग होते. ज्याद्वारे अनेक चांगले ऐतिहासिक निकाल त्यांनी दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून  न्या. गवई यांनी “महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ” नागपुरात स्थापन व्हावे यासाठी महत्त्वाचे योगदान दिले होते. विविध न्यायालयांमधील पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठीही त्यांचे विशेष योगदान आहे.

न्यायालयीन सेवेत आपल्या दीर्घ आणि निष्कलंक कार्यकाळात त्यांनी विविध उच्च पदांवर काम करताना न्याय, नीतिमत्ता आणि पारदर्शकतेचे भान राखले आहे. त्यांच्या कारकीर्दीत भारतीय न्यायव्यवस्था अधिक सुदृढ, विश्वासार्ह आणि लोकाभिमुख होईल, असा मला विश्वास आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

0000

राज्यातील सर्व देवस्थान जमिनींच्या खरेदी विक्री व्यवहारांची नोंदणी थांबवावी – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि.14 : राज्यात देवस्थान इनाम जमिनी मोठ्या प्रमाणावर आहेत. या देवस्थान जमीनींचे खरेदी विक्री व्यवहार केले जात आहेत. देवस्थान जमिनीबाबत राज्य सरकार धोरण ठरवित आहे. तोपर्यंत या जमिनींची दस्त नोंदणी करणे थांबविण्यात यावी, असे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. त्याबरोबरच कोल्हापूर शहर आणि उपनगरे नक्शा योजनेमध्ये बसवून सर्व्हे करण्यात यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मंत्रालयात पश्चिम महाराष्ट्र देवस्थानच्या जमीनीबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी महसूलमंत्री श्री.बावनकुळे बोलत होते. यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, आमदार अमल महाडिक तर दूरदृश्य प्रणालीद्वारे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे उपस्थित होते.

मंत्री बावनकुळे म्हणाले, देवस्थान इनाम मिळकतीच्या अनुषंगाने शासन स्तरावर धोरण ठरविण्याची कार्यवाही सुरु आहे. त्यामुळे सक्षम प्राधिकाऱ्याच्या परवानगी खेरीज किंवा न्यायालयाचे आदेश असतील त्याशिवाय राज्यातील सर्व देवस्थानच्या खरेदी आणि विक्रीच्या व्यवहारांची नोंदणी केली जाऊ नये. जर व्यवहार झाले तर त्यास दुय्यम निबंधक यांना जबाबदार धरण्यात येईल.

कोल्हापूर शहर उपनगरे नक्शा योजनेत

कोल्हापूर शहराचा झपाट्याने विकास होत वाढीव गावठाणाचा सर्व्हे करुन प्रॉपर्टी कार्ड मिळावे अशी मागणीही यावेळी बैठकीत करण्यात आली होती. त्याबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्ह्यातील शंभर गावांचा समावेश सर्व्हे नक्शा या प्रणालीमध्ये करुन पायलट प्रकल्प तयार करावा अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या

0000

श्रीमती मोहिनी राणे/स.सं

नागपूरमधील विविध आरोग्य सेवेचा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आढावा घेतला

मुंबई, दि.१४ : नागपूर शहर विस्तारत असून त्याठिकाणी आरोग्याच्या सेवा योग्य पद्धतीने होणे अपेक्षित आहे. कामठी येथे ५० खाटांचे रुग्णालय आहे ते १०० खाटांचे करण्यात यावे. त्याच्या बांधकामासाठी ५ एकर जागेची आवश्यकता आहे, पंरतू ६ एकर जागा उपलब्ध करुन देण्यात येईल, असे आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

मंत्रालयात महसूलमंत्र्यांच्या दालनात नागपूर जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाचे विविध विषय, राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी, कर्मचारी समायोजन कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी मंत्री श्री.बावनकुळे बोलत होते. यावेळी बैठकीला सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तर दूरदृश्यप्रणालीद्वारे नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, नागपूर जिल्ह्यामध्ये बांधण्यात आलेल्या जिल्हा रुग्णालयासाठी पदांची आवश्यकता होती. याबाबतचा प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तर आहार, सुरक्षा, वस्त्रधुलाई आणि स्वच्छता सेवा कंत्राटी पद्धतीने राबविण्याबाबतच्या प्रस्तावासही मंजूरी देण्यात आली आहे. नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी पदमान्यता, नवीन शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच जुन्या दवाखान्यांचे श्रेणीवर्धन करणे याबाबतचाही आढावा घेण्यात आला.

प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान, मोहपा, मोवाड या रुग्णालयांचे श्रेणीवर्धन करुन ग्रामीण रुग्णालयामध्ये रुपांतर करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. उमरेड येथील ट्रामा केअर युनिटचा पदनिर्मिती प्रस्ताव, जिल्हा रुग्णालयास मंजूर ३५ कोटीचा निधी वितरीत करणे आणि डागा रुग्णालयास २० कोटीची आवश्यकता होती. त्यापैकी १३ कोटी रुपये मिळाले असून उर्वरित ७ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. हा निधीही वितरीत करण्यात यावा अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

कुही येथे ५० खाटांचे रुग्णालय

ग्रामीण रुग्णालय कुही येथे सध्या ३० खाटांचे रुग्णालय असून त्याचे श्रेणीवर्धन करुन ते ५० खाटांचे करण्यात यावे. त्यासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असेही यावेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

0000

श्रीमती मोहिनी राणे/स.सं

 

 

ताज्या बातम्या

विधानसभा प्रश्नोत्तरे

0
पीएमजीपी इमारतींच्या पुनर्विकासाबाबत एक महिन्याच्या आत बैठक - मंत्री शंभूराज देसाई मुंबई, दि. ७: पीएमजीपी (प्रधानमंत्री गृह प्रकल्प) योजनेतील इमारतींच्या पुनर्विकासाबाबत येत्या एक महिन्याच्या आत...

विधानपरिषद प्रश्नोत्तरे

0
बांधकामापूर्वी रक्कम अदा केल्याप्रकरणी शाखा अभियंता आणि  कार्यकारी अभियंत्याचे निलंबन - ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे मुंबई, दि. ७ : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मौजे लासूर येथील...

पंढरपूरची वारी जगातील अद्भुत परंपरा – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

0
मुंबई, दि.७ :  राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आषाढी एकादशी निमित्त चेंबूर येथील श्री शृंगेरी शंकर मठ शारदा मंदिराला भेट देऊन मंदिरातर्फे रविवारी (दि. 6...

आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत जेईई – सीईटीची कोचिंग

0
चंद्रपूर, दि. 6 : ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाखाणण्याजोगी असते. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे किंवा संधी उपलब्ध न झाल्यामुळे असे विद्यार्थी स्पर्धेच्या युगात मागे...

पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्याकडून आदिवासी विकास विभागाचा आढावा

0
चंद्रपूर, दि. 6 : पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी शनिवारी, जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाचा आढावा घेतला. तसेच राज्य शासनाने सुरू केलेल्या 100 दिवस प्रशासकीय...