गुरूवार, मे 8, 2025
Home Blog Page 12

नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर उद्या मुंबईत मेगा ब्लॉक नाही

मुंबई, दि. ०३: राष्ट्रीय परीक्षा एजन्सी, नवी दिल्ली यांच्यामार्फत रविवार, ४ मे २०२५ रोजी National Eligibility cum Entrance Test (UG) – 2025 ही परीक्षा आयोजित केली आहे. यासाठी मोठ्या संख्येने परीक्षार्थी मुंबईच्या बाहेरील आहेत आणि त्यांना त्यांच्या परीक्षा केंद्रावर विनाअडथळा पोहचण्यासाठी जिल्हा प्रशासन, मुंबई शहर यांनी रेल्वे प्रशासनास रविवार ४ रोजी कोणताही मेगा ब्लॉक ठेऊ नये असे कळविले होते. त्यानुषंगाने, रेल्वे प्रशासनाने ४ रोजी सेंट्रल, हार्बर व वेस्टर्न रेल्वे या तीन मार्गांवर कोणताही मेगा ब्लॉक नसल्याचे कळविलेले असून सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे कळविण्यात आले आहे.

नीट परीक्षेकरिता बसलेल्या विद्यार्थ्यांनी https://cr.indianrailways.gov.in/  या लिंकवरून रेल्वेचे वेळापत्रक पाहावे, असे निवासी उपजिल्हाधिकारी मुंबई शहर यांनी कळविले आहे.

०००

‘जगभरातील रसिकांच्या हृदयाला स्पर्श करणाऱ्या कथा’ यावर विशेष चर्चासत्र

  • वेव्हज – 2025 मध्ये कथाकथनाच्या भविष्याबाबत जागतिक संवादाला चालना
  • प्रसारण, चित्रपट आणि साहित्य यांचा मिलाफ

मुंबई, दि. ०३ : पहिल्यांदाच आयोजित करण्‍यात आलेल्या वेव्हज्‌ २०२५ शिखर परिषदेत  “जगभरातील रसिकांच्या हृदयाला स्पर्श करणाऱ्या कथा” या विषयावर आधारित सत्र पार पडले. नॅशनल जिओग्राफिक सोसायटी संस्थेतील मुख्य कथाकथनकार केटलिन यार्नाल, वॉल्ट डिस्ने कंपनीचे ईव्हीपी तसेच कॉर्पोरेट विकास विभाग प्रमुख जस्टीन वॉरब्रूक, अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ कंपनीत आंतरराष्ट्रीय विभागाच्या उपाध्यक्ष केली डे, बीबीसी स्टुडीओजच्या आशिया विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि महाव्यवस्थापक फिल हार्डमन, प्रख्यात दिग्दर्शक राजकुमार हिरानी, लेखक आणि राजनीती तज्ज्ञ अनिश त्रिपाठी यांनी यात सहभाग घेतला.

विविध प्रसारण मंच आणि प्रसारण क्षेत्रातील कंपन्या ते चित्रपट आणि साहित्य जगतातील वक्त्यांनी गुंतवून टाकणाऱ्या कथा कशा पद्धतीने सीमापार प्रवास करुन संस्कृतीला आकार देतात आणि जगभरातील लोकांना एकमेकांशी जोडतात याबाबत भाष्‍य करण्यात आले.

या कार्यक्रमातील चर्चेने जागतिक कथाकथन क्षेत्राला चालना देणाऱ्या धोरणात्मक, सर्जनशील आणि भावनिक शक्तींवर आणि या शक्तींचा दृष्टीकोन, संस्कृती तसेच सामाजिक बदलांवर किती मोठा प्रभाव पडतो हे सांगण्यावर अधिक भर दिला.

जगभरातील प्रेक्षकांना मोहित करण्यासाठी विज्ञान, शोध तसेच दृश्य कथाकथन यांची वीण असलेल्या सशक्त कथा निर्माण करण्यासाठीची धोरणात्मक दृष्टी केटलिन यार्नाल (नॅशनल जिओग्राफिक) यांच्याकडे आहे. उपरोल्लेखित चर्चेदरम्यान त्यांनी कथाकथन क्षेत्राची सत्यता तसेच उत्कृष्टता यांचे महत्त्व सांगण्यावर अधिक भर दिला. तसेच त्यांनी प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने आपलासा वाटेल अशा आशयाच्या निर्मितीत असलेली आव्हाने आणि संधी अशा दोन्हींवर त्यांनी यावेळी अधिक भर दिला.

जस्टिन वारब्रुक (वॉल्ट डिस्ने) यांनी भारतीय बाजारपेठेला सर्वोच्च प्राधान्य दिले असून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेली आणि वेगाने वाढणारी माध्यम आणि मनोरंजन बाजारपेठ असल्याचे म्हटले आहे. त्यांनी डिस्नेच्या भारतीय कंपन्यांबरोबरच्या सहकार्याबद्दलही सांगितले, आणि ही भागीदारी परस्परांच्या संस्कृतीला जोडण्यासाठी आणि कथाकथनाच्या माध्यमातून जागतिक प्रेक्षकांना एकमेकांच्या जवळ आणण्यासाठी कशी सहाय्य करत आहे, यावर भर दिला.

केली डे (अमेझॉन प्राइम व्हिडिओ) यांनी जागतिक विस्तार आणि आशय सामग्री विषयक धोरण, विविध खंडांमधील प्रेक्षकांपर्यंत वैविध्यपूर्ण आणि स्थानिक पातळीवर गुंफलेल्या कथा आणण्याचे काम कसे करते, यावर आपले विचार मांडले. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोणत्या कथा आर्थिकदृष्ट्या यशस्वी होतील, हे व्यासपीठ ठरवते.  सशक्त कथाकथन, स्थानिक प्रेक्षकांचा कल ओळखणे आणि योग्य स्वरूप आणि शैली निवडणे यात यशाचे गमक असल्याचे त्यांनी सांगितले.

फिल हार्डमन (बीबीसी स्टुडिओ, आशिया) आशियाई प्रेक्षकांसाठी तयार केलेल्या निवडक ब्रिटिश सामग्रीच्या वितरणाचे प्रमुख आहेत. त्यांनी बीबीसीच्या शिक्षण आणि माहिती देण्याच्या मुख्य मिशनवर भर दिला. त्या ध्येयाला अनुसरून अर्थपूर्ण कथांचा शोध घेऊन त्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यावर भर असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक्‍ राजकुमार हिरानी म्हणाले की, कथाकथन हे स्वाभाविकपणे व्यक्तीनिष्ठ असते, त्याचा प्रतिध्वनी व्यक्तीनुरूप वेगळा असतो.  कृत्रिम बुद्धीमत्तेबद्दल आपण आशावादी असून, सर्जनशीलता आणि कथाकथन शैलीत भर घालणारे हे एक मौल्यवान  साधन असल्याचे ते म्हणाले.

०००

भारतासाठी परंपरा आणि तंत्रज्ञानाचा मिलाफ असलेल्या नव्या कथांची निर्मिती करण्याची हीच वेळ – किरण मझुमदार शॉ

  • किरण मझुमदार शॉ यांनी वेव्हज‌्मध्ये मांडला भारताच्या सृजनशील भवितव्याचा आलेख
  • स्टार्ट अप्सनी चित्रपटांच्या पलीकडचा विचार करण्याचे आवाहन

मुंबई, दि. ०३ : सृजनशील आशय निर्मिती क्षेत्रात कार्यरत असलेल्या भारतीय स्टार्टअप्सनी चित्रपटांच्या पलीकडे विचार करत जागतिक स्तरावर प्रभाव टाकणारे ब्रँड्स, परिसंस्था आणि बौद्धिक संपदा निर्माण केली पाहिजे, असे प्रतिपादन जागतिक व्यवसायातील अग्रणी आणि बायोकॉनच्या संस्थापक किरण मझुमदार शॉ यांनी  केले आहे. त्या  मुंबईत जियो वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित पहिल्या जागतिक दृक-श्राव्य मनोरंजन शिखर परिषदेच्या (वेव्हज) दुसऱ्या दिवशीच्या संवाद सत्रात बोलत होत्या.

“भारताचे नवोन्मेष पुनरुत्थान: जागतिक स्तरावरील पहिल्या स्टार्टअप्सचे पुढील दशक” या विषयावर फोर्ब्स एडिटर ॲट लार्ज मनीत आहुजा यांच्यासोबत चर्चेची सुरुवात करताना मझुमदार शॉ यांनी भारतीय कथांमधील जागतिक क्षमतेविषयी सांगितले. रामायणाचा संदर्भ देत त्या म्हणाल्या, “परंपरा आणि तंत्रज्ञानाचा मिलाफ असलेल्या नव्या कथांची निर्मिती करण्याची ही वेळ आहे. ज्याप्रकारे जॉर्ज लुकास यांनी ‘स्टार वॉर्स’साठी भारतीय अजरामर महाकाव्यांपासून प्रेरणा घेतली, त्याप्रकारे आपणही आपल्या सांस्कृतिक वारशाचे रुपांतर जागतिक फ्रँचायझीमध्ये करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो.”

भारताच्या लोकसंख्याशास्त्रीय आणि डिजिटल सामर्थ्याविषयी बोलताना त्या म्हणाल्या, “अब्जावधी स्मार्टफोन आणि तंत्रज्ञान-सजग जनरेशन झेड सह, भारत जागतिक नवोन्मेषासाठी सज्ज आहे. पण कोणत्याही ब्लॉकबस्टर म्हणजेच अतिशय गाजलेल्या सिनेमा किंवा विषयाप्रमाणे यशाची सुरुवात  एका कल्पनेने आणि अथक लक्ष्यकेंद्री पद्धतीने एका लहान स्तरावर होते.” हे सांगताना त्यांनी गॅरेजमध्ये बायोकॉन सुरू करून जागतिक बायोटेक पॉवरहाऊसमध्ये रूपांतरित करण्याच्या स्वतःच्या प्रवासाची तुलना केली.

भारताच्या सृजनशील अर्थव्यवस्थेविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, या क्षेत्रातील लोकांनी प्रचंड क्षमता असलेल्या ऑरेंज अर्थव्यवस्थेच्या वृद्धीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आज माध्यम आणि मनोरंजन क्षेत्र जीडीपीमध्ये 20 अब्ज डॉलर्सचे योगदान देते. आपण 2047 पर्यंत 100 अब्ज डॉलर्स आणि सरतेशेवटी 1 ट्रिलियन डॉलर्सच्या ऑरेंज अर्थव्यवस्थेचे लक्ष्य ठेवले पाहिजे, जे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नाशी सुसंगत असेल,” असे शॉ म्हणाल्या.

सृजनशील निर्माते आणि स्टार्ट अप्सचे सक्षमीकरण

भारताच्या सृजनशील क्षमतेविषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना शॉ यांनी एआर (AR), व्हीआर (VR) आणि  इमर्सिव्ह अनुभवांचे  एकत्रीकरण हे महत्त्वाचे आघाडीचे क्षेत्र असल्याचे सांगितले. “पुढचे युनिकॉर्न केवळ ॲप्स नसतील  तर ज्यांना बौद्धिक संपदा , तंत्रज्ञान आणि इमर्सिव्ह  कथाकथनाचे आकलन होते, असे सृजनशील  निर्माते असतील ” असे त्यांनी नमूद केले. ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याचे उदाहरण देत त्या म्हणाल्या, की भारतीय सृजनशीलतेला केवळ समुदायाला भावनिक साद घालण्याच्या पलीकडे जावे लागेल. ते जागतिक स्तरावर प्रासंगिक असले पाहिजे .प्रत्येक महान कल्पना लहान स्तरावर सुरू होते. तुम्ही तिला किती दूर घेऊन जाता हे महत्त्वाचे आहे. अपयश हा या वाटचालीचाच एक भाग असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

०००

 

‘एआय’च्या वापरामुळे नवउद्योगाला उज्ज्वल भविष्य

मुंबई, दि. ०३ : भारतात स्टार्टअप्सची संख्या झपाट्याने वाढत आहे. प्रामुख्याने आयटी, फिनटेक, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात नव्या संधी निर्माण होत आहेत. राज्य शासनाकडून स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून विविध योजनांमुळे तरुण उद्योजकांना मोठा आधार मिळत असल्याने नवउद्योजकांना उद्योगात उज्ज्वल भवितव्य आहे. आधुनिकतेचा स्वीकार करून ‘एआय’चा (कृत्रिम बुद्धिमत्ता) वापर स्वीकारावा लागणार असल्याचा सूर ‘भारतीय उद्योजकतेचे भवितव्य-एक दृष्टिक्षेप’ चर्चासत्रातून उमटला.

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटर येथे जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषदेमध्ये ‘भारतीय उद्योजकतेचे भवितव्य-एक दृष्टिक्षेप’ चर्चासत्र पार पडले. चर्चासत्रात ‘बोट’ लाइफस्टाइलचे सहसंस्थापक अमन गुप्ता, शादी डॉट.कॉमचे अनुपम मित्तल यांनी भाग घेतला, उद्योजक श्री. खुराणा यांनी मुलाखत घेतली.

गुप्ता म्हणाले की, सध्या कोणताही छोटा मोठा व्यवसाय करा, त्यामध्ये ‘एआय’चा वापर हा राहणार आहे, यामुळे गुंतवणूकदारांनी अशा उद्योगात पैसे गुंतवायला हवेत. आपल्या व्यवसायामध्ये गुंतवणूकदारांसाठी काही समस्या असतात, मात्र व्यवसाय आणि पैसा मिळवण्यासाठी गुंतवणूकदार हवेतच. पूर्वी शासकीय नोकरीला प्राधान्य होते, मात्र सध्या स्टार्टअपला प्राधान्य आहे. सुरुवातीला स्टार्टअपमध्ये काही आव्हानांना सामोरे जावे लागेल. मात्र कधीतरी आपल्याला नफा मिळणार असल्याने कष्ट करण्याच्या मानसिकतेवर भर द्यायला हवा.

उद्योजक बनू लागले सेलिब्रिटी – गुप्ता

हिंदी आणि मराठी चित्रपटातील अभिनेते, अभिनेत्री यांना आपण पूर्वी सेलिब्रिटी समजत होतो. सध्या स्टार्टअप आणि उद्योजकांचे युग आहे. उद्योजक हे नव्या पिढीचे सेलिब्रेटी बनत असल्याचे गुप्ता यांनी सांगितले. सध्या व्यवसायामध्ये महिलांचा वाढता सहभाग हा भारताच्या उद्योजकतेच्या विकासात सकारात्मक पाऊल आहे. सर्व क्षेत्रात महिला पुढे येत असून त्यांचा सहभाग वाढत आहे. महिला उद्योजकांसाठी विविध प्रशिक्षण व निधी शासकीय योजनातून मिळत आहे. मन, बुद्धी आणि वेळ दिला तर आपल्याला  कोणत्याही क्षेत्रांमध्ये यश नक्की मिळते, असेही गुप्ता यांनी सांगितले.

‘एआय’मुळे रोजगार जाण्याची भीती नाही – मित्तल

मोबाईल आणि सोशल मीडिया वापरासह सर्व क्षेत्रामध्ये ‘एआय’चा वापर होणार आहे. ‘एआय’ वापराने रोजगार जाण्याची भीती नाही, मात्र त्याचा सकारात्मक पद्धतीने स्वीकार करून आपल्या व्यवसायात वापर करायला हवा. विकसित भारताच्या जीडीपीमध्ये नवउद्योजकांचा खूप मोठा वाटा असेल, असे शादी डॉट कॉमचे श्री. मित्तल यांनी सांगितले.

चॅट जीपीटी, गो टू चाही वापर वाढत आहे. कोणत्याही टेक्स्टबाबत सर्व उपलब्ध माहिती मिळते. ॲप बनवायला सोपे असल्याने यामध्येही रोजगाराच्या भरपूर संधी आहेत. चांगली जागा/क्षेत्र (Area) निवडा. चांगल्या कल्पनांची अंमलबजावणी करण्याची क्षमता असेल तर चांगले उद्योजक बनाल. काहीतरी बदल घडवण्यासाठी किंवा समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याच्या उद्देशाने उद्योगाची सुरुवात करा, महिलांनी उद्योग करण्यासाठी पुढाकार घेऊन पुढे यायला हवे, असेही मित्तल यांनी यावेळी सांगितले.

०००

धोंडिराम अर्जुन/ससं/

डिजिटल माध्यमांसाठी नाविन्यता आणि सातत्य आवश्यक – डॉली सिंग

मुंबई, दि. ०३ : स्पर्धात्मक डिजिटल युगात स्वतःचे वेगळेपण जपण्यासाठी चांगली संहिता, विषयांची प्रभावी मांडणी, व्हिज्युअलचा योग्य वापर याबरोबरच नाविन्यता आणि सातत्य असणे आवश्यक असते, असे मत सोशल मीडिया इन्फ्लुएंसर व कंटेंट क्रिएटर डॉली सिंग यांनी व्यक्त केले.

बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड सेंटर येथे जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषदेत “Connecting Creators, Connecting Countries” या चर्चासत्रात त्या बोलत होत्या. यावेळी देश-विदेशातील नामवंत सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि लोकप्रिय कंटेंट क्रिएटर सहभागी झाले होते.

डिजिटल माध्यमात आपली ओळख निर्माण करण्यासाठी करण्यासाठी प्रेक्षकांशी संवाद साधणे आणि त्यांच्या प्रतिसादाला उत्तर देणे तेवढेच महत्त्वाचे आहे. यामध्ये नाविन्यता आणि नियमित  दर्जेदार मजकूर अपलोड  करणे गरजेचे असते,असे सिंग यांनी यावेळी सांगितले.

सोशल मीडियावरील पोस्टसाठी आवश्यक व्हिडिओ, मजकूर,विषय मांडण्याची पद्धत, संपादनाची शैली आणि सादरीकरणाची पद्धत हे सर्व घटक वेगळेपण सिद्ध करतात. तसेच कोणतीही प्रसिद्धी करण्यापूर्वी सोशल मीडियावर शॉर्ट व्हिडिओ, टीझर किंवा ट्रेलर प्रसिद्ध करणे आवश्यक असते तरच त्या इव्हेंटबाबत उत्सुकता निर्माण होते आणि प्रेक्षक जोडले जातात असे सांगून डॉली सिंग यांनी स्वतःच्या अनुभवातून कंटेंट निर्मितीच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला.

०००

काशीबाई थोरात/विसंअ/

 

डिजिटल पत्रकारिता : वर्गणी, गुणवत्ता आणि विशिष्ट वाचकवर्गावर केंद्रीत

मुंबई, दि. ०३ : डिजिटल पत्रकारितेचा भविष्यातील मार्ग हा वर्गणी, गुणवत्ता आणि विशिष्ट वाचकवर्गावर केंद्रित असणार आहे. जाहिरातीतून टिकाव धरण्याचा पारंपरिक मार्ग आता पुरेसा राहिलेला नाही. विश्वासार्हता, पारदर्शकता आणि आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी माध्यम संस्थांना आता नव्या रणनीतीची गरज आहे, असे मत वरिष्ठ पत्रकार आणि संपादकांनी परिसंवादात व्यक्त केले.

जिओ वर्ल्ड सेंटर येथील जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद, २०२५ मध्ये ‘इव्होल्यूशन ऑफ डिजिटल न्यूज : स्टेइंग रिलीव्हेंट इन द एज ऑफ इन्फॉर्मेशन ओवरलोड’ या विषयावर परिसंवाद झाला. यावेळी बिझनेस टुडेचे संपादक सिद्धार्थ झराबी यांच्या सूत्रसंचालन केले. या चर्चेत मनीकंट्रोलचे कार्यकारी संपादक नलिन मेहता, द इंडियन एक्सप्रेस डिजिटलचे सीईओ संजय सिंधवानी, आरटी इंडियाचे कार्यकारी संपादक अशोक बजरिया यांनी सहभाग घेतला.

झराबी यांनी सांगितले की, डिजिटल युगात वितरणाची साखळी आता केवळ काही मोजक्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या हातात आहे, त्यामुळे कधी कधी त्या विशिष्ट ग्राहकांपर्यंत पोहोचतात, त्यांचे डेटा आणि अल्गोरिदम त्यांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे पारंपरिक माध्यम संस्थांची भूमिका आणि त्यांचे अस्तित्व याबाबत बदलणाऱ्या संदर्भात विचार करण्याची गरज भासू शकते. डिजिटल माध्यमांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात क्रांती केली असली, तरी या बदलासोबत अनेक गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत.

सिंधवानी यांनी सांगितले की, डिजिटल युगात बातमी पोहोचवणाऱ्या पारंपरिक यंत्रणा मागे पडल्या आहेत. पूर्वी माध्यम संस्थांकडे कंटेंटपासून वितरणापर्यंत सर्व नियंत्रण होते. पण आता सर्च इंजिन्स, सोशल मीडिया आणि ‘एआय’ या तंत्रज्ञान कंपन्यांकडे ग्राहकांचे लक्ष आहे, त्यांच्याकडे डेटा आहे, आणि त्यांचे अल्गोरिदम्स निर्णायक ठरत आहेत.

मेहता यांनी सांगितले की, आजचे युग हे ‘न्यूज’ची व्याख्या पुन्हा लिहित आहे. पूर्वी संपादक ठरवत असत की जनतेने काय वाचावे. पण आजचा डिजिटल वापरकर्ता आपल्या गरजांनुसार कंटेंट शोधतो. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने बनवलेली बातमी आता अप्रासंगिक ठरू शकते. आता पत्रकारांना ग्राहक शोधावा लागतो. ‘जर्नालिझम बाय डिफॉल्ट’ चं युग संपलंय,” असे त्यांनी स्पष्ट केले. बातमी ही आता एकटी उभी राहत नाही. तिच्याभोवती सखोल माहिती आणि विश्लेषण हवे असते, असे बजरिया यांनी सांगितले.

वापरकर्त्यांकडे आज इतकी माहिती आहे की कोणती बातमी खरी, अचूक आणि विश्वासार्ह याबाबत आव्हानात्मक परिस्थिती येवू शकते. सर्वच गोष्टी ‘फॉरवर्ड’ स्वरूपात फिरत आहेत. माहितीचा अतिप्रवाह आहे. डिजिटल माध्यमांवर प्रचंड माहिती उपलब्ध आहे. ‘एआय’मुळे बातमी संकलनाचे स्वरूप बदलत चालले आहे. अनेक पूर्वनियोजित, डेटा-आधारित गोष्टी ‘एआय’ करू शकतो. पण दृष्टीकोन, मुलाखती, विश्लेषण हे मानवी मन आणि बुद्धीचेच काम आहे. त्यामुळे पत्रकारांनी आता अधिक कौशल्य विकसित करणे गरजेचे आहे, असे सूर चर्चेत उमटला.

०००

गजानन पाटील/ससं/

 

जळगावातील शासकीय आरोग्यसेवा हायटेक; संपूर्ण सुविधा असलेले राज्यातील पहिले केंद्र– पालकमंत्री गुलाबराव पाटील

मानवी अवयव प्रत्यारोपण वगळता सर्व शस्त्रक्रिया होणारे रुग्णालय; राज्यातील पहिले मेडिकल हब जळगावमध्ये– जलसंपदामंत्री गिरीश महाजन

जळगाव, दि. ०३ (जिमाका): जळगावमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात विविध उपचारांसाठी जिल्हा वार्षिक नियोजनाच्या निधीतून अत्याधुनिक यंत्रसामग्री घेतली असून, आज अद्ययावत एमआरआय मशीनचे लोकार्पण झाल्यामुळे एवढ्या सुविधा असलेले हे राज्यातील पहिले केंद्र ठरले, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

या वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात मानवी अवयव प्रत्यारोपण वगळता सर्व शस्त्रक्रिया होतील, असे सांगून राज्यातील पहिले मेडिकल हब जळगावमध्ये साकारले जात असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला.

केंद्र व राज्य शासनाच्या ईडब्ल्यूएस योजनेंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अत्याधुनिक थ्री टी एमआरआय मशीन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते, तर जलसंपदा मंत्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली कार्यान्वित करण्यात आले.

यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार राजू भोळे, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. अजय चंदनवाले, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी, अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून शेकडो नवजात बालकांना जीवनदान देणारी मिल्क बँक, मुतखड्यांसारख्या वेदनादायक आजारांवर मात करणारी लेझर मशीन यांसह अनेक अद्ययावत साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. आज एमआरआय मशीन कार्यान्वित झाले असून, लवकरच सीटी स्कॅन मशीनही बसवण्यात येईल. अशी सर्व सुविधा असलेले हे शासकीय रुग्णालय राज्यातील पहिलेच आहे, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

तर वैद्यकीय महाविद्यालय, दंत महाविद्यालय, आयुर्वेदिक महाविद्यालय, होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालय असे सर्व समाविष्ट असलेले देशातील पहिले मेडिकल हब जळगावमध्ये साकारले जात आहे, अशी माहिती जलसंपदामंत्री महाजन यांनी दिली.

मंत्र्यांकडून एमआरआय मशीनची पाहणी

हे मशीन कसे कार्य करते, त्यातील नव्या तंत्रज्ञानाचे स्वरूप काय आहे, दररोज किती रुग्ण तपासले जातील, यासारखी माहिती मंत्री पाटील व मंत्री महाजन यांनी जाणून घेतली.

थ्री टी एमआरआय मशीनची वैशिष्ट्ये

ही यंत्रणा मॅग्नेटिक रेसोनन्स इमेजिंग (MRI) तंत्रज्ञानावर आधारित असून ती शरीरातील अंतर्गत अवयवांची अति सुस्पष्ट प्रतिमा निर्माण करते. मेंदू, मज्जासंस्था, हृदय, सांधे, कर्करोग निदान, पचनसंस्था आणि प्रजननसंस्थेतील तपासण्यांसाठी ही यंत्रणा उपयुक्त ठरते. किरणोत्सर्ग न होत असल्याने ही चाचणी सुरक्षित आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांनी दिली.

रुग्णांनी घ्यावयाची काळजी :

एमआरआय करताना धातुरहित कॉटनचे कपडे परिधान करावेत. कोणतीही धातूची वस्तू अंगावर न ठेवावी. पूर्वीच्या सर्व तपासणी अहवालांची फाईल सोबत आणावी. पेसमेकर, कॉक्लीअर इम्प्लांट, धातूचे इम्प्लांट असलेल्या रुग्णांनी डॉक्टरांचे लिखित प्रमाणपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. ही तपासणी पूर्वनियोजित वेळेनुसार होणार असून, शासन निर्धारित शुल्क आकारले जाईल.

आजपासून ही सेवा कार्यान्वित झाल्यामुळे जळगाव व परिसरातील नागरिकांनी याचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहनही डॉ. गिरीष ठाकूर यांनी केले आहे.

०००

जागतिक माध्यम संवाद २०२५ : सदस्य राष्ट्रांद्वारे वेव्हज जाहीरनाम्याचा स्वीकार

‘एआय’च्या युगात सर्जनशीलतेला प्रोत्साहन देताना परंपरा आणि वारशाला अभिव्यक्ती देण्यासाठी दर्शवली सहमती

पक्षपात कमी करत, सामग्रीचे लोकशाहीकरण करून आणि नीतिमत्तेला प्राधान्य देताना उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या जबाबदार वापराद्वारे डिजिटल दरी भरून काढण्याचा वेव्हज जाहीरनाम्याचा प्रयत्न

वेव्हज जाहीरनामा लोकांना एकत्र करण्यासाठी, सामायिक सांस्कृतिक पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी, जागतिक स्तरावर परस्परसंबंधित बाजारपेठांमध्ये नावीन्यपूर्णता आणि लवचिकता वाढवण्यासाठी माध्यम आणि मनोरंजनाच्या सामर्थ्यास देतो दुजोरा

संबंधित कौशल्य विकासाद्वारे सर्जनशील सहकार्याच्या युगासाठी तरुण प्रतिभावंत तयार करणे महत्त्वाचे आहे : परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर

सह-निर्मिती करार, संयुक्त निधी आणि संकल्पनांच्या द्रुतगती मार्गावर सर्जनशीलतेचा जागतिक पुलाचा विस्तार करण्यासाठी जाहीरनाम्यावर भर द्या : केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव

मुंबई, २ :-“सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी परस्परांच्या सांस्कृतिक संवेदनशीलता जाणून जागतिक सहकार्य हाच प्रगतीचा मार्ग आहे.” सध्या सुरू असलेल्या जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेदरम्यान (वेव्हज २०२५) मुंबईत झालेल्या जागतिक माध्यम संवादाच्या अनेक निष्कर्षांपैकी हा एक निष्कर्ष होता. डिजिटल दरी कमी करण्याच्या मार्गावर आपण सर्वजण वाटचाल करत असताना देशांमध्ये सर्जनशील जागा वाढवणे ही आपल्या सामूहिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे, याची अनुभूती संवादात सहभागी झालेल्या राष्ट्रांनी घेतली. वाढत्या जागतिकीकरण झालेल्या माध्यम वातावरणात जागतिक शांतता आणि सौहार्द वाढविण्यासाठी सरकारांच्या भूमिकेवर हा संवाद केंद्रित होता, ज्याची सांगता सदस्य राष्ट्रांनी वेव्हज जाहीरनामा स्वीकारून झाली.

जगभरातील संस्कृतींचे चित्रण करणारे चित्रपट लोकांमधील जिव्हाळा वाढवण्याची प्रचंड क्षमता बाळगतात या भावनेला जागतिक माध्यम संवादाने प्रतिध्वनीत केले आणि सहभागी राष्ट्रांनी या संदर्भात भारतीय चित्रपटांच्या भूमिकेची प्रशंसा केली. कथाकथनाचे एक मनोरंजक स्वरूप म्हणून, चित्रपट परस्परांशी सहयोग करण्यासाठी बलशाली ठरतात. कथाकथनाच्या कलेत तंत्रज्ञानाचा संगम मनोरंजन जगाला पुन्हा परिभाषित करत असताना, सर्जकांच्या अर्थव्यवस्थेत बलशाली म्हणून वैयक्तिक कथा देखील वेगाने उदयास येत आहेत. काही सदस्य राष्ट्रांनी “जबाबदार पत्रकारितेला” प्रोत्साहन देण्याच्या गरजेबद्दल चिंता व्यक्त केली. वेव्हज च्या मंचावर परस्पर सहकार्याने यावर तोडगा निघेल असे त्यांना वाटले.
वेव्हज २०२५ ला जागतिक समुदायाचे सूक्ष्म जग म्हणून संबोधित करताना, भारत सरकारचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर म्हणाले की, ही शिखर परिषद माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठी भविष्यातील रूपरेषा ठरवण्यासाठी सर्जक, धोरणकर्ते, अभिनेते, लेखक, निर्माते आणि पडद्यावरील कलाकारांना एका समान मंचावर एकत्र आणते.

जागतिक माध्यम संवाद, २०२५ मधील आपल्या भाषणादरम्यान डॉ. जयशंकर यांनी विचाराधीन असलेल्या व्यापक रूपरेषांवर प्रकाश टाकला. त्यांनी नमूद केले की जागतिक व्यवस्था, ज्याला एक मजबूत सांस्कृतिक आयाम आहे, आज परिवर्तनाच्या टप्प्यावर आहे. “आपल्या परंपरा, वारसा, कल्पना, पद्धती आणि सृजनशीलतेला आवाज देणे आवश्यक आहे”, असे ते म्हणाले.

परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले की तंत्रज्ञान आणि परंपरा यांनी हातात हात घालून चालले पाहिजे, कारण तंत्रज्ञान आपल्या विशाल वारशाबद्दलची जागरूकता आणि त्याबद्दलच्या जाणीवेची सघनता वाढवू शकते, विशेषतः तरुण पिढ्यांसाठी. “संबंधित कौशल्य विकासाद्वारे तरुण प्रतिभेला सर्जनशील सहकार्याच्या युगासाठी सज्ज करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विकसित भारत उभारण्याच्या दृष्टीने झेप घेण्यासाठी नवोन्मेष ही गुरुकिल्ली आहे”, असे त्यांनी अधोरेखित केले.

डॉ. जयशंकर म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उदयोन्मुख युगात शक्यता या कल्पनेच्याही पलीकडे आहेत, तरीही पक्षपात कमी करून, सामग्रीचे लोकशाहीकरण करून तसेच त्याच्या नीतिमत्तेला प्राधान्य देऊन उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा जबाबदार वापर करण्याची आवश्यकता आहे. “जागतिक कार्यस्थळ आणि जागतिक कार्यबलासाठी मानसिकता, चौकट, धोरणे आणि पद्धतींमध्ये बदल आवश्यक आहेत”, अशा शब्दांत त्यांनी जागतिक माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासमोरील प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करताना वेव्हजवर विश्वास असल्याचा पुनरुच्चार‌ केला.

आपल्या स्वागतपर भाषणात संवादाचा सूर निश्चित करत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात सांगितले की संस्कृती सर्जनशीलतेला प्रेरणा देते, जी सीमा ओलांडून लोकांना जोडते. त्यांनी सांगितले की, तंत्रज्ञानामुळे आपल्या कथाकथनाच्या पद्धतीत बदल होत असल्याने सामग्री निर्मिती आणि वापरही वेगाने बदलत आहेत. आपण अशा वळणावर आहोत जिथे आपल्याला स्थानिक सामग्री निर्मितीला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे.
७७ देशांमधील प्रतिनिधींचे स्वप्ननगरी मुंबईत स्वागत करताना वैष्णव यांनी सहकार्याच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर दिला. सामायिक यशासाठी आपण सर्वांनी सह निर्मिती विषयक करार, संयुक्त निधी आणि घोषणापत्र यांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे असून त्यामुळे डिजिटल तंत्रज्ञानातील तफावत दूर होईल, बंधुभाव, जागतिक शांतता आणि सौहार्द्र वाढीस लागेल असे ते म्हणाले. अशाप्रकारे आपल्याला सर्जनशीलतेचा वैश्विक सेतू नवकल्पनांच्या महामार्गापर्यंत विस्ताराला पाहिजे, असे वैष्णव यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चासत्रात, मंत्रीस्तरीय वरिष्ठ प्रतिनिधींनी आपली मते मांडली. वेव्हज परिषदेच्या पहिल्या हंगामात क्रिएट इन इंडिया चॅलेंज उपक्रमाअंतर्गत झालेल्या ३२ स्पर्धांमधून जगभरातील ७०० अव्वल आशयकर्ते जगासमोर आले आहेत, अशी माहिती भारताने सहभागी देशांना दिली. तसेच पुढील हंगामापासून हे चॅलेंज २५ जागतिक भाषांमध्ये घेतले जाईल ज्यामुळे जगभरातील विविध भाषांमधील सर्जनशील प्रतिभा ओळखता येईल, यामुळे त्यांना वेव्हजच्या मंचावर त्यांच्या सर्जनशील आशयाचे सादरीकरण करता येईल, असेही भारताने सांगितले.

या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या इतर मान्यवरांमध्ये भारत सरकारचे माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन, माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू आणि भारत सरकारचे इतर वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश होता.
0000
सागरकुमार कांबळे/ससं/

नवी मुंबईतील ‘एज्युकेशन सिटी’मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठांच्या माध्यमातून शिक्षण मिळेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २ – विकसित भारताच्या उभारणीसाठी आखण्यात आलेल्या नवीन शैक्षणिक धोरणामुळे भारताचे दरवाजे जगासाठी खुले झाले आहेत. नवी मुंबईत आकाराला येत असलेल्या ‘एज्यूकेशन सिटी’ मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची विद्यापीठे येतील आणि परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वप्न येथेच पूर्ण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वेव्हज् २०२५ परिषदेमध्ये आठ हजार कोटी रुपयांचे विविध सामंजस्य करार करण्यात आले. यापैकी सिडको आणि युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान १५०० कोटी रुपयांचा करार करण्यात आला. यावेळी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, उद्योग विभागाचे सचिव डॉ.अन्बलगन, सिडकोचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलारासू, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह आदी उपस्थित होते.

परदेशी विद्यापीठांना भारतात आणून जागतिक दर्जाचे शिक्षण केंद्र उभारण्याच्या उद्देशाने वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) २०२५ मध्ये सिडकोच्या इंटरनॅशनल एज्युसिटी प्रोजेक्टची घोषणा करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर वेव्हज परिषदेत हा करार करण्यात आला. हे विद्यापीठ नवी मुंबई येथे सिडकोमार्फत उभारण्यात येणाऱ्या ‘एज्युसिटी’ प्रकल्पामध्ये आपले कॅंपस उभारून जागतिक दर्जाचे शैक्षणिक केंद्र निर्माण करणार आहे. यासाठी युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या वतीने १५०० कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

या करारावर सिडकोच्या वतीने अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल आणि युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या वतीने कुलगुरू डॉ. डायने स्मिथ-गॅंडर यांनी स्वाक्षरी केली.

युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाला राज्य शासनाच्या वतीने आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी आश्वस्त केले.
00000
बी.सी.झंवर/विसंअ/

अखिल भारतीय सिनेमा दंतकथा नाही; चित्रपट उद्योगातील दिग्गजांचा भारतीय चित्रपटातील एकतेवर भर

  • कोविडनंतर चित्रपट पाहण्यातील बदलते कल अनुपम खेर यांनी केले अधोरेखित
  • ज्यावेळी आपली परस्पर सामायिक संस्कृती, गाणी, कथा, माती याचा आदर करता, त्यावेळी तो चित्रपट बनतो ‘भारतीय’: खुशबू सुंदर

मुंबई, दि. ०२ : मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर इथे सुरू असलेल्या सुरू असलेल्या  जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेत (WAVES 2025)  आज अखिल भारतीय चित्रपट : दंतकथा  आथवा चालना असलेले वास्तव (Pan-Indian Cinema: Myth or Momentum) या विषयावर निमंत्रितांचे प्रेरणादायी चर्चासत्र झाले. नमन रामचंद्रन यांनी या सत्राचे सूत्रसंचालक म्हणून भूमिका पार पाडली. यासोबतच  नागार्जुन, अनुपम खेर,  कार्ती  आणि  खुशबू सुंदर  असे  भारतीय चित्रपट उद्योग क्षेत्रातील चार मान्यवर  या चर्चासत्रात सहभागी झाले.  या सर्वांनी उपस्थितांना गुंतवून  ठेवणारा संवाद साधला.

चित्रपटाची ताकद ही त्यातल्या भावनिक संदर्भांशी जोडलेली असते याचे स्मरण खुशबू सुंदर यांनी श्रोत्यांना करून दिले. भारतातील चित्रपट हे सर्व भारतीयांना आपलेसे वाटावेत,  अशा उद्देशानेच तयार केले जातात, त्यामुळेच बॉलीवूड आणि प्रादेशिक चित्रपट उद्योगक्षेत्रात कोणताही भेदभाव केला जाऊ नये,  ही  बाब त्यांनी ठामपणे अधोरेखित केली.  ज्‍यावेळी  तुम्ही आपल्या परस्पर सामायिक संस्कृती, आपली गाणी, आपल्या कथा, आपल्या मातीचा आदर करतात, त्यावेळी तो चित्रपट प्रादेशिक किंवा राष्ट्रीय न राहता ‘भारतीय’ चित्रपट बनतो. यातूनच सर्व गोष्टींचे मूळ एकाच ठिकाणी असल्याचीही जाणिव आपल्याला होते,  असे निरीक्षणही त्यांनी मांडले.

नागार्जुन यांनीही अशीच  भावना व्यक्त केली. त्यांनी आपल्या मनोगत आणि विचारांतून भारतातील चित्रपट निर्मितीच्या परंपरांना एकत्र जोडणाऱ्या समृद्ध सांस्कृतिक विविधतेचा गौरव केला. कथात्मक मांडणीच्या क्षेत्रातील कलाकारांना प्रेरणा देणाऱ्या असंख्य भाषा, चालीरीती आणि भूप्रदेशांबद्दलची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. आपल्या मूळ जे आहे, त्‍याचा  अभिमान बाळगल्याने सर्जनशीलतेला कुठेही मर्यादा येत नाहीत, तर त्याउलट यामुळे सर्जनशीलता अधिक मुक्त होत असते, याचे स्मरण त्यांनी उपस्थितांना करून दिले. हेच भारतीय चित्रपटांचे खरे सार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

अनुपम खेर यांनी कोविड-19  साथीमुळे सिनेमा पाहण्याच्या पद्धतीत झालेल्या बदलाबद्दल सांगितले. प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी वेगवेगळे स्रोत वापरू लागले, विविध प्रदेशांमधील नव्हे, तर केवळ भारतातील चित्रपट पाहण्याकडे प्रेक्षकांचा कल वाढल्याचे ते म्हणाले. आपल्या कलेच्या सादरीकरणात प्रामाणिकपणा असणे गरजेचे आहे यावर त्यांनी भर दिला. ‘तुम्ही एखाद्या पौराणिक कथेचे मोठ्या पडद्यावर प्रसारण करत असाल किंवा एखादे नाटक दाखवत असाल, तरी कथाकथनातील प्रामाणिकपणाची  कधीच तुम्ही  साथ सोडता कामा नाही. प्रेक्षकांना नाट्यमयता आवडते, तरीही कथाकथनातील सच्चेपणाला ते नेहमीच दाद देतात  आणि चित्रपटात हीच गोष्ट सर्वात प्रभावी ठरते,’ असे  ते म्हणाले.

याच मुद्द्यावर कार्ती म्हणाले की, प्रेक्षकांना ‘लार्जर दॅन लाईफ’ अनुभवाचे नेहमीच आकर्षण असते. प्रेक्षकांना आज वैविध्यपूर्ण आशय  सहज उपलब्ध असूनही, गाणी, नृत्याची जादू, आणि शौर्यगाथा पाहण्यासाठी ते आजही चित्रपटगृहात गर्दी करतात.

या चर्चासत्रात सहभागी झालेल्या वक्त्यांनी  ‘प्रादेशिक’ चित्रपटांच्या कल्पने पलीकडे जाऊन ‘भारतीय चित्रपट’ ही संकल्पना आत्मसात करण्याचे महत्त्व विषद केले. भावना आणि प्रामाणिकपणाचे महत्व अधोरेखित करून, भारतीय सिनेमाची खरी ताकद विभाजनात नसून, आपल्या मातीत रुजलेल्या एकतेत आहे, आणि हाच वेग भारतीय सिनेमाला पुढे घेऊन जाईल, असे अधोरेखित केले.

ताज्या बातम्या

मानसिक शांतता, आरोग्यवर्धनासाठी संगीत हे प्रभावी माध्यम – डॉ. संतोष बोराडे

0
मुंबई, दि. ८ : मानवाच्या मानसिक, भावनिक आणि शारीरिक आरोग्यावर संगीताचा सकारात्मक परिणाम होतो, हे आता संशोधनातून सिद्ध झाले आहे. संगीत हे केवळ मनोरंजनाचे...

संतुलित आहार आरोग्यासाठी अधिक उपयुक्त – अन्वेषा पात्रा

0
मुंबई, दि. ८ : रोजच्या जेवणात विविध पोषणमूल्यांचा समावेश असलेला आहार शरीराला ऊर्जा तर पुरवतोच, पण रोगप्रतिकारक शक्तीही वाढवतो. सुदृढ आरोग्यासाठी संतुलित आहार अत्यंत...

स्कूल बसमधून विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी नियमावलीत आवश्यक सुधारणा करणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

0
मुंबई, दि. ८ मे :- शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाला परिवहन विभागाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. स्कूल बसमधून शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुखावह...

‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेद्वारे जलसंधारण आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी महत्त्वाचे पाऊल

0
मुंबई, दि.८ : राज्यातील जलसंपत्तीचे शाश्वत व्यवस्थापन आणि शेतीला पोषण देणारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेतला ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ ही योजना  महाराष्ट्राच्या...

समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योजनेचा लाभ पोहोचविण्यासाठी शासन कटिबद्ध – केंद्रीय मंत्री डॉ.विरेंद्र कुमार

0
छत्रपती संभाजीनगर, दि.8, (विमाका) :- विमुक्त भटक्या जमाती, अर्ध भटक्या जमातीतील गरजू  कुटुंबाला  योजनांचा लाभ देण्यासाठी  केंद्र शासनाने डीएनटी (बीज) ही आर्थिक सक्षमीकरणासाठीची योजना...