मंगळवार, मे 6, 2025
Home Blog Page 1190

सरळसेवा भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातच मिळणार रहिवासी दाखला – मंत्री डॉ. विजयकुमार गावित

मुंबई दि. १६ : अनुसूचित क्षेत्रातील अधिसूचित १७ संवर्गातील सरळसेवेची पदे स्थानिक आदिवासींमधून भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सरळसेवेच्या पद भरतीसाठी अर्ज करणाऱ्या अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) रहिवासी दाखला हा संबंधित  एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात  विहित मुदतीत उपलब्ध होणार असल्याचे, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले.

मंत्री डॉ. गावित म्हणाले, मा. राज्यपाल  यांच्या दि.२९.०८.२०१९ च्या अधिसूचनेनुसार अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) १७ संवर्गातील सरळसेवेची पदे भरण्याची  मान्यता मिळाली आहे. राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील ज्या गावांमध्ये आदिवासींची लोकसंख्या ५० टक्के पेक्षा अधिक आहे, अशा सर्व गावांमध्ये १७ संवर्गातील सरळसेवेची १०० टक्के पदे स्थानिक आदिवासींमधून भरण्याचा निर्णय झालेला आहे. सरळसेवेच्या पद भरतीसाठी अर्ज  करणाऱ्या उमेदवारांना  प्रकल्प कार्यालयात रहिवासी दाखला मिळणार आहे. याबाबतचे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या  संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

0000

शैलजा पाटील/विसंअ/

राष्ट्रीय आमदार संमेलनात नाविन्यपूर्ण माहितीच्या प्रदर्शनाचे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई, दि. १६ : देशातील विधानपरिषदांचे सभापती आणि विधानसभांचे अध्यक्ष, लोकप्रतिनिधी यांच्या राष्ट्रीय आमदार संमेलनात आयोजित नाविन्यपूर्ण माहितीच्या प्रदर्शनाचे उद्घाटन लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते करण्यात आले.

एमआयटीच्यावतीने जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, वांद्रे येथे आयोजित पहिल्या राष्ट्रीय आमदार संमेलन प्रदर्शन कार्यक्रमाला विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण व संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, पद्मविभूषण तथा जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, पद्मश्री अनिल गुप्ता, एमआयटीचे विश्वनाथ कराड आदी मान्यवर उपस्थिती होते.

संमेलनात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सामाजिक नाविन्यपूर्ण प्रदर्शनात सर्वोत्कृष्ट काम केलेल्या देशभरातील ७५ मंत्री, आमदारांच्या कामाची माहिती, उत्कृष्ट ७५ स्टार्टअप, जगभरातील लोकशाही देशांची माहिती आणि भारतीय छात्र संसद याबाबतची माहिती देण्यात आली. या प्रदर्शनाची पाहणी मान्यवरांनी केली.

माती आणि पाण्याच्या उपक्रमाचे श्री. बिर्ला यांच्याकडून कौतुक

देशभरातून विविध मान्यवरांनी आणलेल्या माती आणि पाणी यांची पाहणी मान्यवरांनी केली. देशातील ५० आमदारांनी युथ पार्लमेंट स्थापन करणार असल्याचे यावेळी सांगितले. या उपक्रमाचे लोकसभा अध्यक्ष श्री. बिर्ला यांनी कौतुक केले. १५ जून ते १७ जून या कालावधीत आयोजित या संमेलनात अनेक मान्यवर आपले विचार मांडणार आहेत. यात राज्यातील विकासकामांबद्दल चर्चा, अनुभव, कल्पना आणि विविध योजना या विषयांवर विचारमंथन होणार आहेत. तसेच महत्त्वाच्या विषयांवर परिसंवाद होणार आहेत.

000

काशीबाई थोरात/विसंअ/

गुन्हेगारांवर कायद्याची वचक निर्माण करा- पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

           सांगली दि. 16 (जि.मा.का.) :-  गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले आहेतपोलीस दलाने याबाबत अधिक दक्षता  घेतली पाहिजे. जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवून गुन्हेगारांवर कायद्याची वचक निर्माण कराअशा सूचना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिल्या.

        पोलीस मुख्यालयातील सभागृहात पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेलीसांगली शहर उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधवविटा व तासगाव उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मा कदमइस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाणजत उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल साळुंखेपोलीस निरीक्षक सतीश शिंदेसतीश कदम उपस्थित होते.

            पालकमंत्री डॉ. खाडे यांनी सांगितलेगुन्हेगारीकरण रोखण्यासाठी पोलिसांनी व्यापक मोहीम हाती घ्यावी.  गुन्हेगारांवर कायद्याची वचक निर्माण झाली पाहिजे यासाठी  कोणताही मुलाहिजा न ठेवता कडक कारवाई करण्यात यावी. नशेखोर लोकांवर कारवाई केल्यास गुन्हेगारीचे प्रमाण कमी होईल असेही त्यांनी सांगितले.

            अवैध धंदे बंद झाल्यास गुन्हेगारीला आळा बसू शकेल, असे सांगून पालकमंत्री डॉ. खाडे यांनी सांगितले,  गुन्हे का घडतात याचीही उकल होणे गरजेचे आहे. जिल्ह्यात मागील काही दिवसापासून खुनाचे प्रमाण वाढले आहे ही चिंतेची बाब आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन जनतेला असुरक्षितता वाटू नये यासाठी पोलीस दलाने अधिक जागरूक राहणे आवश्यक आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये शांतता कमिटी स्थापन करण्यात यावी, अशा सूचनाही पालकमंत्री डॉ. खाडे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या.

            पोलीस अधीक्षक डॉ. तेली यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थे संदर्भात पालकमंत्र्यांना माहिती दिली. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबरोबरच व गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस दलामार्फत व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहेअसे त्यांनी सांगितले.

कोणतेही गाव पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही यासाठी दक्षता घ्या- पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

        सांगली, दि. 16, (जि. मा. का.) : सद्यस्थितीत पाऊस लांबला आहे. अलनिनोचे संकट आले तर जुलै अखेर पुरेल एवढा पिण्याच्या पाण्याचा साठा कोयना धरणात ठेवण्यात आला आहे. माणसे आणि जनावरे यांच्या पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात आल्याने टप्प्याटप्प्याने उपसा बंदी करणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत शेतीला पाण्याचा पुरवठा करणे अवघड असून जनतेने पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.

        ताकारीटेंभूम्हैसाळआरफळ  या योजनांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुखनिवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह पाटीलउपजिल्हाधिकारी विजया पांगारकरपाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकरम्हैसाळ २ उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता  सचिन पवार, टेंभू उपसा सिंचन १ चे कार्यकारी अभियंता अभिनंदन हरूगडे, ताकारी उपसा सिंचन योजनेचे राजन डवरी, टेंभू उपसा सिंचन योजना २ चे उपविभागीय अभियंता सुशील गायकवाड व ताकारी, म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे उप विभागीय अभियंता अमित डवरी, एमएसईबीचे श्री. पेठकर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

        पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, जूनचा मध्यावधी संपला तरी पाऊस झालेला नाही. आणखी काही दिवस पाऊस लांबल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे माणसे आणि जनावरे यांना पिण्याचे पाणी कमी पडणार नाही व पिण्याच्या पाण्यापासून एकही गाव वंचित राहणार नाही याची दक्षता घेऊन यंत्रणांनी आवश्यक नियोजन करावेअसे निर्देश पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले. या बैठकीत त्यांनी टेंभूताकारीम्हैसाळआरफळ या योजनांचा आढावा घेतला. कोयना धरणात 11.74 टीएमसी तर वारणा धरणात 11.28 टीएमसी पाणीसाठा आहे. कोयनेतून सध्या 1050 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. टेंभू योजनेचे 9 पंप सुरू असून 12 टीएमसी पाणी उचलले गेले आहे. तर ताकारी योजनेतून 4.85 टीएमसी पाणी उचलले आहे. म्हैसाळ योजनेतून  7.20 टीएमसी पाणी उचलले आहे. तर नदीवरील उपसा 21 टीएमसी  असा एकूण 45 टीएमसी पाण्याचा उपसा झालेला आहे.

कोयनेतून 1050 क्युसेक्स पाणी सोडणे सुरू असले तरी  नदीतील डोह भरल्याशिवाय पाणी पुढे प्रवाहीत होत नाही त्यामुळे नदीपात्रात पाणी अत्यंत अत्यल्प आहे. पिण्यासाठी पाणी राखीव ठेवणे सद्यस्थितीत आवश्यकच असल्याने उपसा बंदी लागू करण्यात आल्याची माहिती या बैठकीत जलसंपदा अधिकाऱ्यांनी दिली. म्हैसाळ योजनेतील रखडलेले पाईपलाईनचे काम तातडीने मार्गी लावा त्यासाठीचा आवश्यक ड्रोन सर्व्हेमोजणी करून घ्या. भूसंपादनासाठी नोटीसा बजावाकागदोपत्री प्रक्रिया त्वरीत पूर्ण करून घ्याअसे निर्देशही पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले.

            नदीकाठच्या गावांना पिण्याचे पाणी कमी पडणार नाही, जेथे तलावातून पाणी पुरवठा होतो तेथे यंत्रणांनी संबंधित गावांमध्ये बैठका घेवून पाण्याची स्थिती लोकांना समजावून सांगावी आणि तलाव कोरडे पडू नयेत यासाठी तातडीने लोकांना विश्वासात घेवून पाण्याचे नियोजन करावे, असे निर्देश यावेळी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले. यावेळी त्यांनी आवश्यकता भासल्यास टँकरची तजवीज करा, त्यासाठी आराखडे तयार करा.  गावनिहाय पाण्याचा उपलब्धतेचा अहवाल तयार करा पण कोणत्याही स्थितीत पिण्याच्या पाण्याची  कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्याअसे सांगितले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लातूर पोलीस दलाला १५ चारचाकी वाहने सुपूर्द

लातूर, दि. १६ (जिमाका) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अत्याधुनिक १५ चारचाकी वाहने लातूर पोलीस दलाला सुपूर्द करण्यात आली. जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त सुमारे १ कोटी २४ लाख रुपये निधीतून ही वाहने खरेदी करण्यात आली आहेत.

विविध कार्यक्रमांसाठी तुळजापूरकडे रवाना होण्यासाठी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे लातूर विमानतळावर आगमन झाले होते. यावेळी त्यांच्या हस्ते पोलीस दलाच्या वाहनांना हिरवी झेंडी दाखविण्यात आली.

आमदार प्रवीण दरेकर, आमदार रमेश कराड, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, महापालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यावेळी उपस्थित होते.

लातूर पोलीस दलाच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेली १५ चारचाकी वाहनांमुळे ‘डायल ११२’ अंतर्गत पूल प्राप्त तक्रारीची दखल घेवून  गुन्ह्याच्या ठिकाणी तातडीने पोहचण्यास उपयोग होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यास मदत होणार आहे.

00000

जनहिताची जपणूक करत लोकशाही अधिक बळकट करावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

   मुंबईदि. 16 :- जनहिताची जपणूक करण्याची राज्यघटनेने दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडत भारतीय लोकशाही अधिक बळकट करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

एमआयटीच्यावतीने जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरवांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे देशातील विधानसभा आणि विधानपरिषदेचे लोकप्रतिनिधी यांचे राष्ट्रीय विधायक संमेलन भारत 2023 चे आयोजन करण्यात आले. यावेळी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्लाविधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेविधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकरउच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीललोकसभेचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील चाकूरकरसुमित्रा महाजनमीरा कुमारशास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकरपद्मश्री अनिल गुप्ता, ‘एमआयटीचे विश्वनाथ कराडदेशातील विधानमंडळांचे पीठासन अधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

 उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेआपल्या भारतीय संस्कृतीला हजारो वर्षांची समृद्ध परंपरा आहे. लोकशाहीची मूल्ये भारतीयांच्या मनात घट्टपणे रुजली आहेत. भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी आणि सर्वात भक्कम अशी लोकशाही पद्धती मानली जाते. ही आपणा सर्वांसाठीच अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. लोककल्याणकारी राज्यासाठी आवश्यक असलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलेली राज्यघटना ही जगातील सर्वोत्तम राज्यघटना आहे. या अमृत काळात भारताची लोकशाही अधिक मजबूत होत आहे. देश सर्वार्थाने विकसित होत आहे. संसदीय लोकशाहीत विविध विचारधारा असू शकतातमार्ग वेगळे असू शकतात मात्र आपल्या सगळ्यांचे अंतिम उद्दिष्ट मात्र एकच आहे. ते म्हणजे भारतीय लोकशाही मजबूत करणेसमृद्ध करणे. आपल्याकडे उभारण्यात आलेल्या यंत्रणा आणि व्यवस्था अतिशय उत्तम आणि पारदर्शक आहेत. सर्व व्यवस्थांच्या भूमिका आणि मर्यादा अगदी सुस्पष्ट आहेत. एवढ्या मोठ्या खंडप्राय देशात निवडणूका अतिशय निर्भयनिष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने होतात. समाजातील तळागाळातील लोकांच्या इच्छा-आकांक्षा विधिमंडळात प्रतिबिंबित होत असतात. कोणत्याही सरकारला विधानमंडळात विधेयक मांडल्याशिवाय कोणताही खर्च करता येत नाहीही आपणास लोकशाहीने दिलेली अमूल्य भेटच आहे. आपण सर्वजण जनतेला उत्तरदायी आहोत ही भावना आपण नेहमी जपली पाहिजे.

विधिमंडळात सर्व पक्षांनी विधेयकावर सांगोपांग चर्चा केलीच पाहिजे. त्यानंतरच सर्वाच्या विचारानेएकमताने जनहिताचे कायदे तयार केले पाहिजेत. राष्ट्रीय विधायक संमेलन या उपक्रमाच्या माध्यमातून भारतीय लोकशाही अधिक बळकट होण्यासंदर्भात सखोल विचारमंथन होईलअसेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर म्हणालेदेशातील विधानमंडळांच्या पीठासीन अधिकाऱ्यांसाठी आयोजित हे संमेलन अतिशय उपयुक्त ठरेल. संसदीय लोकशाही परंपरा अधिक समृद्ध करण्याची उज्वल परंपरा याव्दारे कायम राहील. भारतीय लोकशाही बळकट करण्यात सर्वच देशवासीयांचे अमूल्य योगदान असून विश्वस्त भावनेतूनच ही परंपरा पुढे नेण्याची गरज असल्याचे अॅड. नार्वेकर यांनी सांगितले.

लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन म्हणाल्या, ‘वसुधैव कुटुंबकम्‘ ही आपली संस्कृती आहे. ती आपण जपली पाहिजे. आपल्याला राजमाता जिजाऊ आणि अहिल्याबाई यांचा वारसा लाभला आहे. लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदारसंघातील प्रश्नांचा सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे. तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून सगळ्यांना सोबत घेऊनच जनहिताची कामे केली पाहिजेत. समाजाला योग्य मार्गावर पुढे नेणारा म्हणजे नेता. महिला कुटुंबाचा सर्वार्थाने विकास करतात. समतोल साधण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणांमुळे महिला राजकारणात अधिक यशस्वी होऊ शकतात. विविध राज्यांतील चांगल्या प्रथा-परंपरांचे अनुसरणआदानप्रदान आपण करणे गरजेचे आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणाच्या प्रयत्नांत आपण सर्वांनी मिळून योगदान दिले पाहिजेअसेही श्रीमती महाजन यांनी सांगितले.

भारतभरातून विधिमंडळ सदस्यांनी आणलेल्या जलकुंभाची आणि मृत्तिकाघटाची पाहणी मान्यवरांनी केली. लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रतिकात्मक स्वरूपात सर्व मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीच्या घंटेचा निनाद यावेळी करण्यात आला‌.

या संमेलनात देशभरातील सुमारे दोन हजार मंत्री,आमदार सहभागी झाले आहेत.

—–000——-

केशव करंदीकर/विसंअ/

 

 

पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते जिल्हा पोलीस दलासाठीच्या नवीन १० वाहनांचे लोकार्पण

बीड, दि. १६ :- राज्याचे सहकार व इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते जिल्हा पोलीस दलास १० नवीन चारचाकी वाहनांचे आज लोकार्पण करण्यात आले.

बीड पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पालकमंत्री श्री सावे यांच्या उपस्थितीत या वाहनांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे , जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, प्रशिक्षणार्थी  सहाय्यक जिल्हाधिकारी आदित्य जीवने , जिल्हा नियोजन अधिकारी डॉ. सुधाकर चिंचाने, पोलीस उपअधीक्षक संतोष वाळके यासह  राजेंद्र मस्के, सलीम जहांगीर, देविदास नागरगोजे , शासकीय अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री श्री. सावे यांना नवीन वाहनांच्या ताफ्याने संचालनाद्वारे मानवंदना दिली. तसेच त्यांच्या हस्ते नवीन वाहनांना हिरवा झेंडा दाखविण्यात आला. सदर 10 वाहनांसाठी जिल्हा नियोजन समितीतून 90 लक्ष रुपये निधी  उपलब्ध करून देण्यात आले असून जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था राखताना पोलीस विभागाला सक्षम करण्यासाठी नवीन वाहनांच्या माध्यमातून बळकट केले जात आहे. कार्यक्रमानंतर पालकमंत्री अतुल सावे यांनी जिल्हाधिकारी श्रीमती मुधोळ मुंडे व जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. ठाकूर यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार  व इतर अधिकारी, पदाधिकारी व पत्रकारांशी संवाद साधला.

जेव्हा राज्याचे आदिवासी विकास मंत्रीच आपल्या विभागाची “अनाहुत” परीक्षा घेतात..!

नंदुरबार,दि. १६ (जिमाका): मुंबई मंत्रालयातील आपल्या दालनातून राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित हे आपल्याच विभागाने सुरू केलेला टोल फ्री हेल्पलाईन नंबर स्वतःच डायल करतात. आपण कोण बोलतोय हे न सांगता शबरी घरकुल योजनेबाबत माहितीची विचारणा करत योजनेची माहिती मिळेल का ? असे बोलून हेल्पलाईनवरील आपल्याच एका कर्मचाऱ्याची परीक्षा घेतात. फोन येताच समोरूनच अत्यंत नम्रपणे आणि विनयशील स्वरात आपण कोण, कुठून बोलत आहात, असे विचारून ठक्कर बाप्पा घरकुल योजनेची सविस्तरपणे माहिती दिली जाते आणि माहिती देणारी ती महिला कर्मचारी मंत्र्यांनी अनपेक्षितपणे घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण होते.

आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी स्वतः मंत्रालयातून नंबर डायल केला आणि शबरी घरकुल योजनेची माहिती देता येईल का अशी विचारणा केली ? पलीकडून एक महिला कर्मचारी नम्र आणि आश्वासक स्वरात त्यांना पत्ता व इतर माहिती विचारते. अर्थातच आदिवासी मंत्री आपले नाव न सांगता, एका स्वीय सहाय्यकाचे नाव आणि पत्ता सांगतात. योजनेची सारी माहिती समोरुन तात्काळ दिली जाते. मंत्री डॉ. गावित यांनीच काही दिवसापूर्वी या हेल्पलाईनचे उद्घाटन नाशिक येथे कार्यक्रमात केले होते. पण तो क्रमांक खरोखरचं कसा चालतो याची माहिती त्यांना प्रत्यक्ष घ्यायची होती.

कॉल सेंटरचे फोन हे ग्राहकांची परीक्षा घेणारे असतात. आधी मराठी हवे की इंग्रजी हवे यासाठी एक नंबर डायल करा, नंतर कोणत्या विषयाची माहिती हवी त्यासाठी विविध नंबर डायल करा आणि अशा प्रकारे पंधरा वीस मिनिटे गेल्या नंतर योग्य माहिती ग्राहकांपर्यंत पोचते. पण इथे प्रत्यक्षात योग्य माहिती देणारी ऑपरेटर महिला कर्मचारी माहिती द्यायला सुरुवात करते. आपण कोणाशी बोलत आहोत याची पुसटशीही कल्पना हेल्पलॉईनवर माहिती देणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्याला नव्हती. हा अनुभव म्हणजे मंत्री डॉ. गावीत तसेच मंत्री दालनात बसलेल्या अधिकाऱ्यांना, अभ्यागतांना सुखद धक्का असतो.

18002670007 हा आदिवासी विकास विभागाच्या हेल्पलाईनचा नंबर नव्याने सुरू केला आहे. या हेल्पलाइनचा कंट्रोल रूम नाशिक आदिवासी विकास आयुक्तालय, नाशिक येथे राहणार आहे. आदिवासी विभागाच्या योजना आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कोणत्या कागदपत्रांची पूर्तता करायची आहे याची सविस्तर माहिती या क्रमांकावर मिळते.

आदिवासी विकास मंत्री डॉ विजय गावित म्हणाले की, या विभागाची सर्व कामे मागे पडली होती. गेल्या वर्षभरात आम्ही मोठ्या प्रमाणात कामाला सुरुवात केली असून सध्या ‘शासन आपल्या दारी’ मोहिमेच्या  माध्यमातून विविध योजनांचा लाभ थेट लाभार्थांपर्यंत पोहचवला जात आहे. पुढच्या दोन वर्षात एकही आदिवासी पक्क्या घराशिवाय राहू नये यासाठी आमचा प्रयत्न राहील. येणाऱ्या अर्थसंकल्पात या कामासाठी किमान दीड हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचा मानसही मंत्री डॉ. गावित यांनी जिल्हा माहिती कार्यालयाशी बोलताना व्यक्त केला. डॉ. गावित म्हणाले की, केंद्र सरकारच्या विविध योजनांमध्ये आदिवासीच्या घरकुलांसाठी तरतूद केली जाते. महाराष्ट्रात अशा प्रकारे सात लाख आदिवासी केंद्र सरकारच्या घरकूल योजनेत समाविष्ट झाले आहेत. पण त्या व्यतिरिक्त गावोगावी अनेक आदिवासी घरकुलापासून वंचित आहेत. त्यांची वेगळी योजना आम्ही करतो आहोत. त्यासाठी सर्व तालुक्यांत माहिती जमा केली असून दोन लाख २५ हजार अशा आदिवासी लाभार्थ्यांना घरकूल देण्याची शबरी घरकूल योजना आम्ही धडाक्याने राबवत आहोत, असे ते म्हणाले. एकट्या नंदुरबार जिल्ह्यात नुकताच ५ हजार ४९८ लाभार्थ्यांना शबरी घरकुल योजनेचा लाभ दिला आहे. येणाऱ्या काळात राज्यात  ९७ हजार लाभार्थी यांच्या घरांचा १२५ कोटी रुपयांचा कार्यक्रम आदिवासी विभागाने हाती घेतला असून त्या व्यतिरिक्त सव्वा दोन लाख घरे असतील, असेही मंत्री  डॉ. गावित यांनी स्पष्ट केले.

डोळ्यांवर नुकतीच शस्रक्रिया झालेली असतानाही मंत्री डॉ. गावित मंत्रालयात भेटीसाठी आलेल्या प्रत्येकाशी बोलून त्याचे गाऱ्हाणे, समस्या अत्यंत जिव्हाळ्याने विचारत, प्रसंगी थेट संबंधित अधिकाऱ्यांशी फोनद्वारे संवाद साधून त्यावर निर्देश व सूचना करत होते. दिवसभरातील बैठका, अभ्यागत आणि लोकप्रतिनिधींच्या मागण्या, निवेदनांवर चर्चा करून त्यावर तात्काळ प्रतिसाद देता-देता रात्रीचे ९:०० वाजतात, सर्वत्र शुकशुकाट झाल्यानंतरही  कुणी भेटीसाठी राहिले का ? याची शहानिशा करून मंत्री डॉ. गावित निवास्थानी परतले.

०००

 

 

तरुण आणि महिलांचे मतदार यादीत प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

उस्मानाबाद,दि.15(जिमाका):- महाराष्ट्र राज्याचे अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी, नायब तहसीलदार (निवडणूक) आणि बीएलओ यांची आढावा बैठक घेतली.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, प्रियंवदा म्हाडदळकर (भा.प्र.से.), अपर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी आणि सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार उपस्थित होते.

श्री.देशपांडे म्हणाले, मतदार नोंदणी करताना 18 ते 19 वयोगटातील तरुणांचा समावेश वाढविण्यासाठी तसेच महिला मतदारांची नोंदणी करण्यासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. 18 ते 19 वयोगटातील मतदारांच्या नोंदणीसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष कार्यक्रम घेऊन याबाबत जनजागृती करावी. तरुणांना मताधिकारांचे महत्व सांगावे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला नोंदणीसाठी लागणारा फॉर्म उपलब्ध करुन देण्यासाठी त्या महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राचार्य यांची मदत घ्यावी. स्वत: महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांसोबत चर्चा करावी.

देशाच्या विकासात महिलांचाही मोठा सहभाग असतो. मतदानाचा अधिकार वापरण्यासाठी त्यांच्याही नोंदणी शंभर टक्के व्हावी यासाठी वेगवेगळ्या महिला संघटना, बचत गट आणि प्रसिध्दी माध्यमांचा वापर करुन महिला मतदारांचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचनाही श्री.देशपांडे यांनी यावेळी केल्या.

‘शासन दिव्यांगांच्या दारी’! ; प्रत्येक जिल्ह्यात शिबिराचे आयोजन होणार

मुंबई दि. १५ : राज्यातील दिव्यांग बांधवांच्या अडचणी लक्षात घेता शासनाने ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात या निमित्ताने एक दिवसाच्या शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहेया अभियानामुळे एकाच ठिकाणी दिव्यांगांना विविध योजनांचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे. यासाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी  यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती असून त्यांच्या नियंत्रणाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद हे समितीचे सदस्य सचिव असतील.

शासनाने ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ हे अभियान सुरु केले असून आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे या अभियानाचे मुख्य मार्गदर्शक आहेत.

दिव्यांग बांधवांमध्ये विविध प्रवर्गातील दिव्यांग आहेत. त्यातील अनेक जण विभागीय स्तरावर तसेच शासकीय कार्यालयात जाऊन आपली तक्रार नोंदवू शकत नाहीत. त्यामुळे शासनानेच दिव्यांगांना आपल्या अडीअडचणी मांडण्यासाठी उपाययोजना केली आहेत्यांना विविध योजनांचा लाभ तसेच त्यांच्या विविध प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी शासनाने “दिव्यांग कल्याण मंत्रालय दिव्यांगांच्या दारी” हे अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील जवळपास २९ लाख लोकसंख्या असलेल्या दिव्यांग बांधवांना याचा फायदा होणार आहे. २०११ च्या जनगणनेनुसार राज्यात एकूण २९ लाख ६३ हजार ३९२  दिव्यांगांची संख्या असून त्यापैकी केवळ ९ लाख दिव्यांगांना वैश्विक ओळखपत्र प्राप्त झाले आहेउर्वरित दिव्यांग बांधवांना वैश्विक ओळखपत्र नसल्याने अनेक योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे या शिबिरात वैश्विक ओळखपत्र देण्याच्या कार्यक्रमाला गती मिळणार आहे.

त्याचबरोबर शेत जमिनी संबंधित कागदपत्रेजातीचे प्रमाणपत्र व अन्य आवश्यक प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी देखील या एक दिवसीय शिबिराची मदत मिळणार आहे. शासनाच्या विविध योजनातून तसेच सामाजिक संस्था यांच्या सीएसआर मधून उपलब्ध झालेली दिव्यांगांना लागणारी विविध उपकरणे देखील वाटप करण्यात येणार आहेत. या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरावर श्री. कडू यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती गठित करण्यात आली असून त्यांची मुख्य मार्गदर्शक म्हणून या अभियानाकरिता नियुक्ती केलेली आहे. या अभियानाची सुरुवात दि. ७ जून रोजी मुंबई येथून करण्यात आली असून उर्वरित जिल्ह्यात देखील मुख्य मार्गदर्शक यांच्या सूचनाप्रमाणे कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

मुंबईत एकाच दिवशी साडेतीन हजार दिव्यांगांना लाभ

दिव्यांग कल्याण विभागदिव्यांगांच्या दारी‘ उपक्रमाची मुंबई येथुन सुरूवात झाली आहे.

दि. ७ जून  रोजी मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यातील ३५०० दिव्यांग व्यक्तींनी या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवला. एकूण ६० विभागांचे स्टॅाल या उपक्रमामध्ये सहभागी होतेविविध ९० शासकीय सुविधांची/ योजनांची माहीती व अर्ज या स्टॅालवर उपलब्ध होतेअशी माहिती दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव अभय महाजन यांनी दिली.

****

शैलजा पाटील/विसंअ/

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ‘पाणीदार अहिल्यानगर’ पुस्तिकेचे प्रकाशन

0
अहिल्यानगर, दि. ६ : - चौंडी येथील मंत्रिपरिषद बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हा जलसंधारण अधिकारी निर्मित आणि जिल्हा माहिती कार्यालयाने संपादित केलेल्या...

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूत गिरणी’ व ‘मुख्यमंत्री ग्रामसडक योजनें’तर्गत ‘चौंडी ते निमगाव डाकू...

0
अहिल्यानगर, दि. ६ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूत गिरणी व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत चौंडी ते निमगाव डाकू रस्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुलींच्या नूतन वसतिगृहाचे उद्घाटन

0
अहिल्यानगर दि. ६ : पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील फाऊंडेशनचे वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पीटलच्या ‘सिंधू’ वसतीगृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रिमोटद्वारे कोनशीला अनावरण ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृहाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन

0
अहिल्यानगर, दि.६- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अहिल्यानगर येथील शासकीय विश्रामगृहाच्या नवीन  इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा मंत्री तथा...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवीन पोलीस वसाहतीचे भूमिपूजन

0
अहिल्यानगर, दि. ६ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय अहिल्यानगर येथे १०२ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या आणि पोलीसांसाठी ३२० नवीन निवासस्थाने...