बुधवार, मे 7, 2025
Home Blog Page 1189

‘दिलखुलास’ कार्यक्रमात मंत्रिमंडळ निर्णयांची माहिती

मुंबई, दि. 16 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची माहिती देण्यात आली आहे. राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर सोमवार दि.  19 जून, 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत हा ‘दिलखुलास’ कार्यक्रम प्रसारित होईल.

0000

 

 

मुंबई उपनगर जिल्ह्यातील शिष्यवृत्ती, फ्री-शिप योजनेंतर्गत प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑफलाईन अर्ज करावेत – सहायक आयुक्त प्रसाद खैरनार

मुंबई दि. १६ : मुंबई उपनगर जिल्ह्यातील सन २०१८-१९ ते सन २०२१-२२ या वर्षात ज्या इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती/फ्रिशीप योजनेअंतर्गत अर्ज केले होते, त्यांचे या योजनेंतर्गत प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑफलाईन अर्ज आपल्या संबंधित महाविद्यालयास दि.२० जून २०२३ पर्यंत  सादर करावे, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त प्रसाद खैरनार  यांनी केले आहे.

महाडिबीटी प्रणालीवर अर्ज नोंदणी करताना येणाऱ्या विविध अडचणींमुळे (महाविद्यालय बदल, शिक्षणात खंड इ), अर्ज ऑटो रिजेक्ट होणे या कारणामुळे अनेक पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला नाही. तरी या विद्यार्थ्यांनी वेळेत ऑफलाईन अर्ज महाविद्यालयात जमा करावयाचे असून ते अर्ज मुंबई उपनगर अधिनस्त सर्व महाविद्यालयांनी दि.२२ जून २०२३ पर्यंत  सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर, चेंबूर, मुंबई-४०००७१ कार्यालयाकडे करावयाचे आहेत, असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण  प्रसाद खैरनार यांनी कळविले आहे.

000

शैलजा पाटील/विसंअ/

शिवतीर्थाला धक्का न लावता लोकनेते बाळासाहेब देसाई या नावाने नव्याने आयलँड तयार करणार- पालकमंत्री

सातारा, दि.16-शिवतीर्थाला कोणत्याही प्रकारचा धक्का न लावता पूर्वीच्या परंतु आत्ता काढून टाकण्यात आलेल्या आयलँडच्या ठिकाणी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नावे नव्याने आयलँड तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

पोवईनाका परिसरात लोकनेते बाळासाहेब देसाई आयलँड सुशोभीकरण करण्याबाबत आढावा बैठक नियोजन भवन,जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी,मुख्य कार्यकारी अधिकारी  ज्ञानेश्वर   खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख,नगरपालिका मुख्याधिकारी अभिजीत बापट तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

युनायटेड वेस्टर्न बँकेचे पूर्वी एक आयलँड होते हे आयलँड ग्रेड सेपरेटच्या कामांमध्ये काढून टाकण्यात आले आहे. त्याठिकाणी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नावाने आयलँड तयार करण्यात येणार आहे. यामध्ये बगीचा यासह  अत्याधुनिक पद्धतीचा वापर करून आयलँड तयार करण्यात येणार आहे. याबाबत राजघराण्याची काय शंका असल्यास त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली जाईल असेही पालकमंत्री श्री देसाई यांनी सांगितले.

प्रौढ मूकबधिर प्रशिक्षणार्थींसाठी सन २०२३-२४ या वर्षाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरु

मुंबई, दि. १६ : शासकीय प्रौढ मूकबधीर प्रशिक्षणकेंद्र उल्हासनगर-५, जि. ठाणे या संस्थेत सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाकरीता प्रौढ मूकबधिर प्रशिक्षणार्थींना प्रवेश देण्यात येणार आहेत. इच्छुकांनी २० जुलै २०२३ पर्यंत अर्ज  करावेत, असे आवाहन अधीक्षक शासकीय प्रौढ मूकबधिर प्रशिक्षण केंद्र उल्हासनगर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे अंतर्गत असलेल्या शासकीय प्रौढ मूकबधिर प्रशिक्षणकेंद्र उल्हासनगर-५, जि. ठाणे या संस्थेत १६ ते ४५ वर्ष या वयोगटातील, इयत्ता ६ वी (वरिष्ठ) उत्तीर्ण, कोणताही गंभीर आजार नसलेले व जिल्हा शल्य चिकित्सक यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र, किमान ४० टक्के कर्णबधीर असलेल्या मुलांना औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या धर्तीवर सुतारकाम, जोडारी, तारतंत्री यासंबंधी एक वर्षीय प्रशिक्षण विभागांमध्ये देण्यात येते.

प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क वगळता निवास, भोजन व शैक्षणिक साहित्य विनामूल्य पुरविण्यात येते.

प्रवेश अर्जाचे वाटप कामकाजाचे दिवशी शासकीय सुट्ट्या वगळून कार्यालयीन वेळेत शासकीय प्रौढ मूकबधिर प्रशिक्षण केंद्र, शांती भवन, निजधाम आश्रम समोर, तहसिल कार्यालयाजवळ, गांधीरोड ५. उल्हासनगर, जि. ठाणे या कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत. टपालाने अर्ज मागवावयाचे असल्यास वरील पत्त्यावर रु.१०/- चे पोस्टाचे तिकीट लावलेले व स्वतःचा संपूर्ण पत्ता असलेला (पिनकोडसह) लिफाफा पाठवावा. अर्ज व्यक्तिशः किंवा टपालाद्वारे दिले जातील. असे  अधीक्षक शासकीय प्रौढ मूकबधिर प्रशिक्षण केंद्र उल्हासनगर- ५ यांनी कळविले आहे. (संपर्कासाठी भ्रमणध्वनी क्रमांक- ९२८४९३७८१३, ९०२१४०३९३८, ८६०००११४८९)

०००००

शैलजा पाटील/विसंअ/

विविध विकास कामांचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला आढावा

सातारा दि. 16. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सातारा लोकल बोर्ड इमारतीचे प्रस्तावित नूतनीकरण, भूस्खलनग्रस्त गावांचे पूनर्वसनासाठी जमिनी ताब्यात घेणे व एमएमआरडीए कडून घराचे मॉडेल तयार करणे, वन जमिनींना सौर कुंपण प्रस्ताव शासनास पाठवणे आदी विषयांचा आढावा घेतला.

या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी श्री. देसाई म्हणाले, भूस्ख्लन, पुरामुळे बाधित झालेल्या नऊ गावातील 614 कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे.  त्यांच्या घरांच्या कामाचा शुभारंभ सप्टेंबर 2023 मध्ये  घेण्यात येणार आहे. तसेच वन विभागाच्या हद्दी जवळील शेतमालांचे वन्य प्राण्यांकडून नुकसान होत आहे. हे नुकसान थांबविण्यासाठी सौर कुंपणाच्या प्रस्तावाला शासनाकडून मान्यता देण्यात येईल.

जिल्हा परिषदेमधील जुन्या लोकल बोर्डाची इमारतीची डागडुजी करून पूर्वी जशी इमारत होती तशीच जुन्या इमारतीचे सौंदर्य व्यवस्थित जतन करण्यात येणार आहे. त्यामध्ये लोकल बोर्डाचे पहिले अध्यक्ष ते शेवटचे अध्यक्ष यांचे छायाचित्रे व कार्यकाल, इतिहास या इमारतीमध्ये लावावे, अशा सूचनाही पालकमंत्री श्री देसाई यांनी  दिल्या.

देशाला आत्मनिर्भर बनविण्यात वालचंद हिराचंद यांचे योगदान मोठे – राज्यपाल रमेश बैस

मुंबई, दि. 16 : स्वयंचलित वाहन निर्मिती, विमान निर्मिती, जहाज निर्मिती यांसह अनेक पायाभूत क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे उद्योगपती वालचंद हिराचंद यांनी पृथ्वी, जल, आकाश अशा तिन्ही लोकात भारताचा झेंडा रोवला. देश पारतंत्र्यात असताना प्रतिकूल परिस्थितीत उद्योगविश्व निर्माण करणाऱ्या हिराचंद यांचे योगदान सुवर्णाक्षरांनी लिहावे इतके मोठे असल्याचे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

वालचंद हिराचंद यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चरच्या वतीने राजभवन येथे ५० व्या  वालचंद स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला प्रामुख्याने उपस्थित होते.

आपण शाळेत असताना ‘मेड इन जर्मनी’च्या वस्तूंचा बोलबाला होता; पेनाची निब सुद्धा जर्मनीची असायची. कालांतराने ‘मेड इन जपान’चा काळ आला व अलीकडे ‘मेड इन चायना’चे दिवस आले. परंतु एकविसावे शतक ‘मेड इन इंडिया’चे असेल असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला.  आज भारत आत्म-निर्भर देश होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे, त्याचे मोठे श्रेय वालचंद हिराचंद यांचेकडे जाते, असे राज्यपालांनी सांगितले.

वालचंद हिराचंद यांनी जहाज वाहतूक क्षेत्राला संजीवनी दिली. त्यांनी सुरु केलेल्या  महाराष्ट्र चेंबरने उद्योग व वाणिज्य या शिवाय कृषिक्षेत्राला महत्व दिले असे सांगून चेंबरने फलोत्पादन, फुलशेती, भरडधान्य शेती यांसह सेंद्रिय शेतीला चालना द्यावी असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

 

वालचंद हिराचंद यांचे जीवन प्रेरणादायी : ओम बिरला 

भारत ही संत, शूरवीर योद्धे आणि समाज सुधारकांची जशी भूमी आहे, तशीच ती महान उद्योजकांची देखील भूमी आहे. वालचंद हिराचंद यांनी बिकट परिस्थितीत उद्योग उभारणीसह नवीनता व संशोधनाचे काम केले. उद्योग विकासाची दूरदृष्टी असलेल्या वालचंद हिराचंद यांचे जीवन प्रेरणादायी असल्याचे उद्गार ओम बिरला यांनी याप्रसंगी काढले.

आज देश स्वातंत्र्याच्या अमृतकाळातून प्रवास करीत असताना भारत प्रत्येक क्षेत्रात नवीनता व संशोधन करीत आहे. कोविड लसीकरण मात्रा जगाला उपलब्ध करुन भारताने जगाला वाचवण्याचे काम केले आहे. तंत्रज्ञान व जागतिक हवामान बदल आदी क्षेत्रांमध्ये देखील भारत जगाला दिशा देण्याचे काम करीत असल्याचे सांगून सामूहिक प्रयत्न केल्यास विकसित भारताचे स्वप्न साकार होईल, असे ओम बिरला यांनी यावेळी सांगितले.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते वालचंद हिराचंद यांच्या कुटुंबातील ज्येष्ठ उद्योगपती अजित गुलाबचंद, अरविंद दोशी, वालचंदनगर वसाहतीचे प्रमुख चिराग दोशी, पद्मश्री  शरयू दोशी व पल्लवी झा यांचा सत्कार करण्यात आला.

चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी प्रास्ताविक केले तर माजी अध्यक्ष अरविंद दोशी यांनी आभार प्रदर्शन केले.

कार्यक्रमाला चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष अनिल कुमार लोढा, विविध देशांचे वाणिज्यदूत तसेच निमंत्रित सदस्य उपस्थित होते.

००००

Governor, Lok Sabha Speaker pay tributes to Walchand Hirachand

Maharashtra Governor Ramesh Bais and Lok Sabha Speaker Om Birla paid rich tributes to industrialist Walchand Hirachand at the 50th ‘Walchand Memorial Lecture’ at Raj Bhavan, Mumbai on Fri (16 Jun).

The Walchand Memorial Lecture on the theme of ‘Atma Nirbhar Bharat’ was organised by the Maharashtra Chamber of Commerce, Industry and Agriculture. The Chamber was founded by Walchand Hirachand in the year 1927.

The Governor felicitated members of the Walchand family including Chairman of Hindustan Construction Ltd. Ajit Gulabchand, former President of MACCAI Arvind Doshi, Chirag Doshi, Sarayu Doshi and Pallavi Jha.

President of the Chamber Lalit Gandhi, Senior Vice President Anil Kumar Lodha, Consul Generals of various countries and Members of the Chamber were present.

0000

 

 

सावित्रीदेवी फुले शासकीय वसतिगृहातील मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत

मुंबई, दि. 16 : सावित्रीदेवी फुले शासकीय वसतिगृहामध्ये घडलेल्या घटनेच्या तपासासाठी गठीत केलेल्या समितीच्या प्राथमिक अहवालानुसार या  वसतिगृहाच्या अधीक्षिकेचे निलंबन करण्यात येत आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

मंत्री श्री. पाटील यांनी आज मृत विद्यार्थीनीच्या कुटुंबियांची दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे भेट घेतली. त्यांचे सांत्वन करून न्याय देण्याचे आश्वासन यावेळी मंत्री श्री. पाटील यांनी दिले.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, “या घटनेची शासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. त्याच्या सखोल चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली असून समितीच्या प्राथमिक अहवालानुसार वसतिगृहाच्या अधीक्षिका यांचे निलंबन करण्यात येत आहे.

यावेळी मंत्री श्री. पाटील यांनी कुटुंबियांना तपासाची सविस्तर माहिती दिली. तसेच पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. कुटुंबीयांनी खचून जाऊ नये, त्यांना मदत व्हावी म्हणून त्यांच्या मुलाला कंत्राटी पद्धतीने तात्पुरती नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले. उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारितील सर्व शासकीय वसतिगृहांच्या सुरक्षेचा सखोल आढावा घेऊन महिला सुरक्षा रक्षक देण्यात येतील, असेही यावेळी त्यांनी सांगितले. रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर, मृत विद्यार्थीनीचे नातेवाईक यावेळी उपस्थित होते.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/

कौंडण्यपूर विकास आराखड्यातील कामांची विभागीय आयुक्तांकडून पाहणी

अमरावती, दि. 16 : तीर्थक्षेत्र कौंडण्यपूर विकास आराखड्यातील प्रलंबित कामे पूर्णत्वास जाण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज येथे दिले.

           श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथे भेट देऊन विभागीय आयुक्तांनी विकास आराखड्यांतर्गत विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी, तसेच आढावा आज घेतला. त्यांनी जिल्हाधिका-यांशीही चर्चा करून उर्वरित कामांना वेग देण्याचे निर्देश दिले. तहसीलदार वैभव फरताडे व कार्यान्वयन यंत्रणेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

               विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय म्हणाल्या की, कौंडण्यपूर विकास आराखड्यातील अनेक कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, मंदिर परिसरातील भक्त निवास, तसेच वाहनतळ, नदी घाट व इतर स्थापत्य कामे अद्यापही अपूर्ण आहेत. ही अपूर्ण कामे पूर्ण होण्यासाठी प्रभावी नियोजन आवश्यक आहे. त्यासाठी याबाबत आढावा बैठकही लवकरच घेतली जाईल. याबाबत विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिका-यांशी चर्चा करून कामे वेगाने पूर्ण होण्यासाठी पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले.

          कौंडण्यूपर येथील हे प्राचीन तीर्थस्थळ आहे. त्यामुळे येथील विकास आराखड्यातील कामे प्राधान्याने व कालमर्यादेत पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश डॉ. पाण्डेय यांनी संबंधित यंत्रणेला दिले.

शासन सोबत असल्याची निर्माण झाली भावना- आदिवासी ग्रामस्थ सुरज कदम यांची प्रतिक्रिया

नांदेड (जिमाका) दि. 16 :- नांदेड जिल्ह्यातील ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमानिमित्त तेलंगणाच्या काठावर असलेल्या किनवट पासून कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या देगलूर तालुक्यापर्यंत अनेक महसूल मंडळातील गावे शासन आपल्या दारी उपक्रमाची अनुभूती घेत आहेत. आज किनवट तालुक्यातील जलधारा मंडळातील सावरगाव येथे हा उपक्रम पार पडला. सर्व घरे आदिवासी असलेले हे सावरगाव आज तालुक्यातील शासकीय विभागाच्या प्रतिनिधींनी गजबजून गेले. “ज्या निष्ठेने लोककल्याणकारी भूमिका घेऊन शासन शेवटच्या टोकावर असलेल्या माणसाच्या भल्यासाठी योजना राबविते त्याची खरी प्रचिती शासन आपल्या दारी योजनेतून आली” अशी प्रतिक्रिया आदिवासी बांधव सुरज कदम यांनी दिली.

किनवट तालुक्यात 9 मंडळे असून प्रत्येक भागात शासन आपल्या दारीचा विश्वासार्ह दुवा पोहचावा यासाठी आम्ही नियोजन केले आहे. यातील 5 मंडळाच्या ठिकाणी प्राथमिक स्तरावरील शासन आपल्या दारीचे उपक्रम पार पडले आहेत. यातून पात्र लाभार्थ्यांचीही निवड झाली आहे. या उपक्रमामुळे प्रशासनालाही एक दिशा मिळाली असून आदिवासी भागातील लाभधारकांच्या चेहऱ्यावरील समाधान हेच या अभिनव उपक्रमाचे मोठे यश असल्याची प्रतिक्रिया किनवट येथील सहाय्यक जिल्हाधिकारी नेहा भोसले यांनी दिली.

येथील ग्रामीण भागात पांदण रस्ते, शेतासाठी जाणारे रस्ते, जमीन विषयक फेरफार, निराधार योजना, पीएम किसान योजना याबाबत या भागातील लोकांना अधिक उत्सुकता आहे. याचबरोबर केंद्र शासनासह राज्य शासनाच्या योजना त्या-त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहचाव्यात यासाठी महसूल, कृषि विभाग, पंचायत समितीमधील संबंधित कर्मचारी तत्पर झाले आहेत.

रात्री दीडपर्यंत पालकमंत्र्यांनी घेतला जनतेच्या तक्रारींचा आढावा

यवतमाळ, दि १६ जिमाका:- नेरमध्ये झालेल्या जनता दरबारमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी रात्री दीड वाजेपर्यंत जनतेच्या तक्रारी ऐकून त्यांचे निराकरण केले. यावेळी आजंती गावातील पारधी समाजाच्या नागरिकांना घरकुलासाठी जागा देण्याचा प्रलंबित प्रश्न तत्काळ निकाली काढण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले.

या जनता दरबारमध्ये जुन्या ५३६ तक्रारी निकाली काढण्यात आल्या तर नव्याने ३१९ तक्रारी  प्राप्त झाल्या. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलिस अधिक्षक डॉ. पवन बनसोड,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वैशाली रसाळ, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी क्रांती काटोले, तहसिलदार शिवाजी मगर,  गटविकास अधिकारी राजीव शिंदे उपस्थित होते.

यावेळी जनतेशी संवाद साधताना पालकमंत्री म्हणाले, कि जनतेच्या आशिर्वादाने  तिनदा मंत्री म्हणुन काम करण्याची संधी मिळाली. पालकमंत्री म्हणुन समाधान शिबिराच्या माध्यमातुन जनतेच्या तक्रारी निकाली काढण्याचा प्रयत्न मी पूर्वीही केला होता. त्यावेळी वणी पासुन उमरखेड पर्यंत तक्रारी प्राप्त झाल्यात आणि प्रशासनाने त्या निकाली काढण्यात आल्या. अनेक प्रलंबित कामे मार्गी लावण्यात आली होती.

यावेळी सुद्धा जनता दरबारच्या माध्यामातुन नागरिकांकडून त्यांच्या तक्रारी मागवल्या होत्या. मात्र काही कारणास्तव ठरलेल्या  दिवशी जनता दरबार घेता आला नाही. दरम्यानच्या काळात प्रशासनाने प्राप्त  तक्रारी सोडवल्या. तरीही नागरिकांच्या तक्रारींचा आढावा घेऊन त्यांचे समाधान झाले की नाही याची विचारणा करणे जिल्ह्याचा पालक म्हणुन माझे काम आहे. नेर तालुक्यात ५३६ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या पैकी सर्व तक्रारी निकाली निघाल्यात. उपस्थित नागरिकांच्या काही  नवीन निवेदन, अडचण, तक्रार असेल तर करू शकतात. प्रशासन त्यावर लगेच कार्यवाही करून त्या निकाली काढतील असा मला विश्वास आहे.

याठिकाणी अनेक विभागाचे प्रमुख हजर आहेत. जुन्या तक्रारींचा आढावा तुमचा प्रतिनिधी म्हणून मी घेणारच आहे, पण नवीन तक्रारी सुद्धा आपण दिल्या तर त्याचाही आढावा प्रशासन या ठिकाणी घेईल. आपले विकासाचे काम असेल वैयक्तिक काम असेल प्रशासनाकडून या सर्व गोष्टींची दखल घेऊन त्यावर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि सर्व विभागाच्या विभाग प्रमुखांना त्यांनी निर्देश दिलेत.

हे सर्वसामान्य जनतेचे राज्य आहे,सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून आज राज्य सरकार अनेक निर्णय घेत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे होणारे शेतीचे नुकसान भरपाई देण्यासाठी राज्यशासनाने क्रांतिकारी निर्णय घेतला. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम सरकारने केले आहे. शेतकऱ्यांना पीएम किसान च्या माध्यमातून  ६ हजार रुपये देण्यात येत होते त्यात राज्य शासनाने आपली योजना सुरू करून आता शेतकऱ्यांना दरमहा दोन हजार रुपये मिळतील म्हणजे वार्षिक १२ हजार रुपये शेतकऱ्यांच्या हातात पडणार आहेत.

सरकार आपलं आहे, आणि सरकार आपल्या दारी आहे. या शासनाचा प्रतिनिधी म्हणून मी स्वत: आणि प्रशासनाचे सर्व प्रमुख अधिकारी या ठिकाणी आले आहेत. आपल्या तक्रारी निकाली निघाल्या पाहिजेत ही भूमिका शासनाची आणि प्रशासनाची आहे, असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

या जनता दरबारमध्ये नविन ३१९ तक्रारी प्राप्त झाल्या. त्या १५ दिवसात निकाली काढण्याचे निर्देश पालकमंत्री श्री राठोड यांनी दिले. तसेच जुन्या ५३६ तक्रार दारांचे म्हणने ऐकुन घेऊन त्यांच्या तक्रारी निकाली निघाल्यात कि नाही, त्यांचे समाधान झाले की नाही याची खातरजामाही केली. यावेळी नागरिकांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

ताज्या बातम्या

राज्यात १६ ठिकाणी ‘मॉक सिक्युरिटी ड्रिल’चे आयोजन

0
मुंबई, दि. ६ : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानदरम्यान वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना बुधवारी दिनांक ७ मे रोजी...

शासकीय कामकाजात विश्वासार्हता आणि सुरक्षा वाढवण्यासाठी ‘ब्लॉकचेन प्रणाली’ प्रभावी – बेकर ह्यूज कंपनीचे तज्ज्ञ...

0
मुंबई, दि. ६ : आपले दैनंदिन जीवन अधिक सुरक्षित व पारदर्शक करण्यासाठी ब्लॉकचेनचा प्रभावी वापर करता येऊ शकतो. पारदर्शकतेसाठी व भ्रष्टाचारविरोधी उपाय म्हणून त्याचा...

छत्रपती शिवाजी महाराज यांचा देदिप्यमान इतिहास संग्रहालयाच्या माध्यमातून जनतेसमोर येणार

0
संग्रहालयाचे काम अंतिम टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन नवी दिल्ली, दि. 6 : छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल राष्ट्रीय समितीच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ‘पाणीदार अहिल्यानगर’ पुस्तिकेचे प्रकाशन

0
अहिल्यानगर, दि. ६ : - चौंडी येथील मंत्रिपरिषद बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हा जलसंधारण अधिकारी निर्मित आणि जिल्हा माहिती कार्यालयाने संपादित केलेल्या...

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूत गिरणी’ व ‘मुख्यमंत्री ग्रामसडक योजनें’तर्गत ‘चौंडी ते निमगाव डाकू...

0
अहिल्यानगर, दि. ६ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूत गिरणी व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत चौंडी ते निमगाव डाकू रस्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते...