मंगळवार, मे 6, 2025
Home Blog Page 1191

मुक्ता साळवे मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह येथे प्रवेश प्रक्रिया सुरु

मुंबई, दि. १५ : मुक्ता साळवे मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, मुलुंड (पश्चिम), मुंबई – ८० या वसतिगृहात सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरिता वसतिगृहात रिक्त असणाऱ्या जागेवर प्रवेश देणे सुरु आहे. गरजू विद्यार्थिनींनी कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत प्रवेशासाठी प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन वसतिगृहाच्या गृहपालांनी केले आहे.

प्रवेशित विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था, भोजन, रुपये ९०० मासिक निर्वाह भत्ता, स्टेशनरी रक्कम ग्रंथालय सुविधा, दैनंदिन वर्तमानपत्र इत्यादी सुविधा देण्यात येतील.

वसतिगृहात प्रवेशासाठी ११ वी व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनींना प्रवेश दिला जाईल, विद्यार्थिंनींना ५५ टक्के पेक्षा जास्त गुण असावेत, विद्यार्थिनी महाराष्ट्राची रहिवासी असावी असे पात्रतेचे निकष आहेत.

भांडूप पोलिस स्टेशन येथे महिला समुपदेशन केंद्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. 15 : महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारास प्रतिबंध करण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात भांडूप पोलिस स्टेशन येथे महिला समुपदेशन केंद्र सुरू करण्यासाठी स्वयंसेवी संस्थाकडून अर्ज मागविण्यात येत आहे. येत्या पंधरा दिवसात कार्यालयीन कामकाजाच्या दिवसात अर्ज करावे, असे आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हा महिला बालविकास अधिकारी  यांनी केले आहे.

त्यासाठी अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत :- अर्जदार संस्था मुंबई उपनगर जिल्ह्यातील (स्थानिक) तसेच महिला पदाधिकारी असल्यास प्रथम प्राधान्य असेल. संस्था नोंदणी अधिनियम १८६० व मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० अंतर्गत नोंदणी असणे आवश्यक आहे., संस्थेस किमान ३ वर्षांचा महिला समुपदेश क्षेत्रातील अनुभव आवश्यक जास्त अनुभव असल्यास प्राधान्य. समुपदेशनासाठी एमएसडब्ल्यू (MSW) उत्तीर्ण दोन समुपदेशक कर्मचारी यांची यादी व कागदपत्र जोडणे आवश्यक आहे. संस्थेची घटना व नियमावली आवश्यक ज्यामध्ये महिलांसाठी समुपदेशन केंद्र चालवणे हा उद्देश असावा, सनदी लेखापालांची स्वाक्षरी असलेला मागील तीन वर्षांचा अहवाल (ऑडिट रिपोर्ट ), संस्थेचे मागील तीन महिन्यांचे माहिना निहाय बँक स्टेटमेंट जोडावे., संस्थेचे कार्यरत पदाधिकारी यांचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक यादी जोडावी, संस्थेच्या कार्यकारी मंडळातील सदस्य एकमेकांचे नातेवाईक नाहीत तसेच कोणीही सदस्य शासकीय सेवेत नाहीत याबाबतचे हमीपत्र सोबत जोडावे., संस्थेने सार्वजनिक संपत्तीचा अपहार केलेला नाही याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र. आवश्यक, संस्थेच्या पदाधिकारी (अध्यक्ष व सचिव) यांचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे स्वाक्षरीचे विना दुराचार प्रमाणपत्र जोडावे., ज्या स्वयंसेवी संस्थांनी समुपदेशन केंद्रासाठी यापूर्वी प्रस्ताव सादर केले होते त्यांनीही पुन्हा नव्याने प्रस्ताव आवश्यक आहे. (सोबत आवश्यक ती कागदपत्रे पुरावा म्हणून जोडावेत.) असे मुंबई उपनगरचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बी. एच. नागरगोजे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

००००

संध्या गरवारे/विसंअ/

तूर, उडीद डाळींच्या किमतीवर सातत्याने लक्ष ठेवण्याचे, साठामर्यादा आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे केंद्राचे राज्यांना निर्देश

नवी दिल्ली, 15 : तूर आणि उडीद डाळींच्या किमतीवर सातत्याने लक्ष ठेवण्याचे, साठ्याच्या स्थितीची पडताळणी करण्याचे आणि साठामर्यादा आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे  निर्देश, ग्राहक व्यवहार विभागाच्या अतिरिक्त सचिव निधी खरे यांनी राज्यांना दिले.

तूर आणि उडीद डाळींचा साठा जाहीर करण्यासंदर्भात आणि राज्य सरकारांकडून साठा मर्यादेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी राज्यांचे अन्न आणि नागरी पुरवठा विभाग, केंद्रीय गोदाम महामंडळ (सीडब्लूसी) आणि राज्य गोदाम महामंडळ एसडब्लूसी) यांची श्रीमती खरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली.

ग्राहक व्यवहार विभागाने 2 जून 2023 रोजी साठेबाजी आणि काळा बाजार रोखण्यासाठी तसेच तूर आणि उडीद डाळीचे दर ग्राहकांना परवडतील असे ठेवण्यासाठी अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 लागू करत तूर आणि उडीद यांच्या साठ्यांवर मर्यादा घातली होती.

या आढावा बैठकीत, दोन्ही डाळींचे किरकोळ दर, डाळी साठवणूक करणाऱ्या विविध उद्योगांनी जाहीर केलेला साठा, केंद्रीय गोदाम महामंडळ आणि राज्य गोदाम महामंडळांकडील साठा तसेच तत्सम विषयांवर चर्चा करण्यात आली. बाजारातील साठवणूकदार उद्योगांनी बँकेकडे तारणाच्या स्वरुपात दाखवलेला साठा आणि पोर्टलवर जाहीर केलेला साठा यामधील तफावतीची पडताळणी करण्यासाठी राज्यांनी उचललेली पावले आणि साठा मर्यादेची अंमलबजावणी या मुद्यांवर देखील या बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच सीडब्लूसी आणि एसडब्लूसी यांना त्यांच्या गोदामांमध्ये असलेल्या तूर आणि उडीद डाळींच्या साठ्याचे तपशील सादर करण्यास सांगण्यात आले.

या डाळींच्या किमतीवर सातत्याने लक्ष ठेवण्याचे आणि साठवणूकदार उद्योगांच्या साठ्यांच्या स्थितीची पडताळणी करण्याचे आणि ज्यांनी साठा मर्यादा आदेशाचे उल्लंघन केले आहे त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश राज्य सरकारांना बैठकीत देण्यात आले.

मार्च 2023 रोजी विभागाने आयातदार, मिलर्स, साठवणूकदार, व्यापारी यांच्याकडे असलेल्या साठ्यावर राज्य सरकारांच्या समन्वयाने देखरेख ठेवण्यासाठी अतिरिक्त सचिव निधी खरे यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली होती. यासाठी, विभागाने महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमधील विविध ठिकाणांना भेट देण्यासाठी 12 वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली गेली आहे.

००००

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त क्र.104 / 15.6.2023

असेल परवानगी बांधकामाची, गरज नसेल बिनशेती परवान्याची!

जमीन एनए करण्याच्या प्रक्रियेत आणखी सुधारणा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. यासंबंधीचा शासन निर्णय महसूल आणि वन विभागानं 23 मे 2023 रोजी जारी केला आहे. त्यानुसार, बांधकाम परवानगी मिळालेल्या प्लॉटवर स्वतंत्ररित्या एनए (अकृषिक) परवानगीची आवश्यकता नसेल. या सुधारणेमुळे एनए परवानगीची प्रक्रिया अधिक सुलभ होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

पण, शासनाचा नवीन निर्णय काय आहे? यामुळे सध्याच्या प्रक्रियेत काय बदल होणार आहेत? मूळात एनए म्हणजे काय आणि जमीन एनए करणं का महत्त्वाचं आहे? गेल्या काही वर्षांत एनए प्रक्रियेत कोणते बदल झाले आहेत? याची माहिती आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

एनए म्हणजे काय? का करतात?

सर्वसाधारणपणे जमिनीचा वापर शेतीसाठी केला जातो. पण जमिनीचा वापर बिगरशेतीसाठी म्हणजे औद्योगिक, वाणिज्य किंवा निवासी कारणासाठी करायचा असेल तर त्यासाठी कायदेशीर परवानगी घ्यावी लागते. या प्रक्रियेला म्हणजे शेतीच्या जमिनीचं बिगरशेतीमध्ये रुपांतर करण्याच्या प्रक्रियेला एनए असं म्हणतात. यालाच नॉन ॲग्रीकल्चर किंवा अकृषिक असंही म्हणतात. या रुपांतरणाच्या प्रक्रियेसाठी ठराविक ‘रुपांतरण कर’ आकारला जातो. याशिवाय, महाराष्ट्रात तुकडेबंदी कायदा लागू आहे. त्यामुळे मग तुमच्या जिल्ह्यात तुकड्याचं जे प्रमाणभूत क्षेत्र आहे, त्यापेक्षा कमी क्षेत्राचा जमिनीचा तुकडा खरेदी-विक्री करता येत नाही. तो विकायचा असेल तर त्याचा एनए लेआऊट करूनच तो विकावा लागतो. त्यामुळे मग एनएच्या प्रक्रियेला महत्त्व आहे.

नवीन सुधारणा

महसूल विभागाच्या नवीन निर्णयानुसार, बांधकाम परवानगी प्राप्त भूखंडावर स्वतंत्ररित्या एनए (अकृषिक) परवानगीची आवश्यकता नसेल. याआधी एखाद्या प्लॉटवर बांधकाम करायचं असल्यास, बांधकाम परवानगीसाठी नागरिकांना दोन प्राधिकरणांकडे अर्ज करावा लागत असे. बांधकाम परवानगीसाठी नियोजन प्राधिकरणाकडे आणि एनए परवानगीसाठी महसूल विभागाकडे. यामध्ये सामान्य नागरिकांचा बराच वेळ आणि पैसा जात असे. आता मात्र नागरिकांना दोन वेगवेगळ्या विभागांकडे जाण्याची गरज नसणार आहे. आता इथून पुढे बांधकाम परवानगी देतानाच जमिनीच्या अकृषिक वापराची म्हणजेच एनएची सनद दिली जाणार आहे.
बांधकामाची परवानगी देण्यासाठी सरकारकडून ‘बांधकाम परवानगी व्यवस्थापन प्रणाली’चा (building plan management system) वापर केला जात आहे. आता याच प्रणालीअंतर्गत बांधकाम परवानगीसोबतच जमिनीच्या अकृषिक वापरासाठीची परवानगी ऑनलाईन पद्धतीनं एकत्रितपणे देण्यात येणार आहे, असं शासन निर्णयात नमूद केलं आहे.

वर्ग १ आणि वर्ग २ जमिनींनाही परवानगी

भोगवटादार वर्ग-1 पद्धतीमध्ये अशा जमिनी येतात, ज्यांचं हस्तांतरण करण्यावर शासनाचे निर्बंध नसतात, शेतकरीच या जमिनीचा मालक असतो. म्हणजे ही जमीन विक्री करणाऱ्याच्या स्वत:च्या मालकीची असून ती खरेदी करताना विशेष अडचण येत नाही, असा याचा अर्थ होतो. नवीन सुधारणेनुसार, भोगवटादार वर्ग-1 च्या जमिनींच्या बाबतीत building plan management system प्रणालीत गरज असेल तर रुपांतर कर वसूल केला जाईल आणि मग बांधकाम परवानगीसोबत अकृषिक वापराची सनद दिली जाईल.

भोगवटादार वर्ग-2 पद्धतीमधील जमिनींचं हस्तांतर करण्यावर शासनाचे निर्बंध आहेत. सरकारी अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय या जमिनींचं हस्तांतर होत नाही. यामध्ये देवस्थान इनाम जमिनी, भूमिहीन शेतकऱ्यांना वाटप केलेल्या जमिनी इ. जमिनींचा समावेश होतो. नवीन सुधारणेनुसार, भोगवटादार वर्ग 2 च्या बाबतीत, नजराणा आणि इतर शासकीय रकमांची देणी दिल्यास आणि तहसिलदारांनी परवानगी दिल्यास building plan management system प्रणालीअंतर्गत बांधकाम परवानगी दिली जाईल. या बांधकाम परवानगीसोबत अकृषिक वापराची सनद दिली जाईल.

याआधी झालेल्या सुधारणा

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 42 नुसार जमिनीच्या अकृषिक (एनए) वापरासाठी परवानगी देण्यात येते. कालांतराने या कायद्यात काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. या सुधारणा कलम 42 (अ), (ब), (क) आणि (ड) अशाप्रकारे ओळखल्या जातात. या सुधारणांमुळे जमिनीच्या अकृषिक (एनए) परवानगीच्या कार्यपद्धतीत बदल झाला आहे. या संदर्भातला शासन निर्णय महसूल आणि वन विभागानं 13 एप्रिल 2022 रोजी जारी केला होता. त्यात नमूद केलयं की, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 42 (ब) या सुधारणेनुसार, जर तुम्ही राहत असलेल्या क्षेत्रामध्ये अंतिम विकास आराखडा प्रसिद्ध झाला असेल, तर अशा क्षेत्रातील जमीन एनए करण्यासाठी स्वतंत्र परवानगीची गरज असणार नाही.

कलम 42 (क) या सुधारणेनुसार, तुम्ही राहत असलेल्या क्षेत्रासाठी प्रारूप प्रादेशिक योजना तयार करण्यात आली असेल आणि ती मान्य करण्यात आली असेल, तर या क्षेत्रातील जमिनींचा वापर अकृषिक कारणांसाठी केला जाऊ शकेल. तर, कोणत्याही गावाच्या हद्दीपासून ज्यांची जमीन 200 मीटरच्या आत आहे, अशा शेतमालकांना एनए परवानगीची आवश्यकता असणार नाही, अशी सुधारणा कलम 42 (ड)मध्ये करण्यात आली आहे. पण, आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ती म्हणजे या तिन्ही सुधारणांनुसार संबंधित क्षेत्रात एनए परवानगी गरजेची नसली तरी जमिनीचा अकृषिक कारणांसाठी वापर करायचा असल्यास प्रशासनाकडून तसा दाखला घेणं गरजेचं आहे. त्यासाठी तहसील कार्यालयात रितसर अर्ज करून, त्यासाठीचं रुपांतरण कर भरून तहसीलदारांकडून कायदेशीर सनद घेणं गरजेचं आहे.

  • रणजितसिंह राजपूत,
    जिल्हा माहिती अधिकारी, नंदुरबार

राज्यातील नाट्यगृहांची स्थिती सुधारण्यासाठी मध्यवर्ती यंत्रणा उभी करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १४:- महाराष्ट्र ही नाट्यपंढरी आहे. मराठी रंगभूमी  महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. राज्यातील नाट्यगृहांची स्थिती सुधारावी, एकाच छताखाली व्यवस्था व्हावी, यासाठी मध्यवर्ती अशी यंत्रणा तयार केली जाईल. त्यासाठी सनदी अधिकाऱ्याची नियुक्ती तसेच निधीची व्यवस्था केली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.

अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या गोविंद देवल बल्लाळ पुरस्कारांचे वितरण तसेच नूतनीकरण झालेल्या यशंवतराव चव्हाण नाट्य संकुलाच्या लोकार्पण समारंभात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमास उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार राहुल शेवाळे, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, परिषदेचे कार्यकारिणी सदस्य अजित भुरे, शशी प्रभू, सतिश लटके, नरेश गडेकर, गिरीष गांधी, भाऊसाहेब भोईर, विजय चौगुले आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नूतनीकरण झालेल्या नाट्य संकुलाच्या विस्तारीकरण आणि आधुनिकीकरणासाठी १० कोटी रुपये देण्यात येतील, असे जाहीर केले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, मराठी रंगभूमी महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. रंगभूमीनं आपल्याला अनेक हरहुन्नरी कलावंत दिले आहेत. या सर्वांनीच महाराष्ट्राची, मराठी रसिकांची आपल्या कलेच्या माध्यमातून मोठी सेवा केली आहे.

रसिकांनीही आपल्या रंगभूमी परंपरेवर, नाट्य चळवळीवर भरभरून प्रेम केलं आहे. मराठी रंगभूमी आणि मराठी रसिक जन, चोखंदळ नाट्यप्रेमी हे महाराष्ट्राचं संचित आहे. मराठी संस्कृतीचं वैभव आहे. मराठी मातीनं कला क्षेत्रासाठी खूप मोठं योगदान दिलं आहे. या मातीत अन्य प्रांतातील, अन्य भाषांतील कला प्रकार-नाट्य प्रवाह रुजले, वाढले. त्यांनाही मराठी रसिकांनी आपलेसे केले आहे. जगभरात जिथे जातो तिथे आपण पाहतो, की सगळ्यांना सामावून घेणारा असा आपला महाराष्ट्र आहे. हे आपले ऐश्वर्य आहे. विष्णुदास भावे ते आचार्य अत्रे अशा मांदियाळीने अनेक बदलांत, स्थित्यंतरात मराठी रंगभूमीची परंपरा समृद्ध केली आहे. आपल्या नाट्यकर्मींनीही या क्षेत्रावर भरभरून प्रेम केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

महाराष्ट्र आणि मराठी संस्कृतीची ओळख जनमानसात रुजावी यासाठी “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” गीताला महाराष्ट्र राज्यगीताचा दर्जा दिला आहे. गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये चांगल्या सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयही सुरु व्हावे यासाठी आपण प्राधान्य दिल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, राज्याचा सर्वांगीण विकास हा आमचा प्रयत्न आहे. आपली मुंबई बदलते आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे. मुंबई आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीतही कलावंतांचे योगदान मोठे आहे. कला क्षेत्रातदेखील मोठ्या संख्येने पडद्याच्या मागे राहून अनेक जण काम करत असतात. या क्षेत्राची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे या क्षेत्रातील अडचणींवर मार्ग काढण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील असतो. यापुढेही नाट्यगृहांची स्थिती सुधारावी यासाठी आपण करत असलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना प्रतिसाद म्हणून जे-जे करता येईल, ते प्रयत्न केले जातील, असेही ते म्हणाले.

आगामी शंभराव्या नाट्य संमेलनाचे आयोजनदेखील तितकेच भव्य-दिव्य व्हावे. त्यासाठी चांगले नियोजन करण्यात यावे, त्याला शासनस्तरावरून सर्वतोपरी पाठबळ दिले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते प्रदान

ठाणे, दि. 14 (जिमाका) :-  महिलांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील चार महिलांना आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

महिला व बालविकास विभागाच्या वतीने हे पुरस्कार देण्यात येतात. जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास आमदार किसन कथोरे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, ठाणे शहर पोलीस आयुक्त जय जित सिंग, ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर, कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, मीरा भाईंदर पोलीस आयुक्त मधुकर पांडे, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, जिल्हा पोलिस प्रमुख विक्रम देशमाने, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते.

महिलांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जिल्ह्यातील काशीबाई एकनाथ जाधव, शोभा दीपक वैराळ, अनिता दळवी व सारिका भोईटे पवार यांना आज पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, दहा हजार रुपये रोख, शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.

हिरकणी कक्षाचे उद्घाटन

महिला व बालविकास विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय व ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात उभारण्यात आलेल्या हिरकणी कक्षाचे उद्घाटन पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते झाले. आमदार किसन कथोरे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पोलीस आयुक्त जय जित सिंह, महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच पोलीस आयुक्तालयात विविध कामांसाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येत असतात. त्यामध्ये लहान मुले घेऊन येणाऱ्या महिला तसेच स्तनदा मातांचा समावेश असतो. या महिलांना त्यांच्या लहान मुलांना खाऊ घालणे व स्तनपानासाठी जागा उपलब्ध व्हावी, यासाठी या हिरकणी कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये आरामाची सोय, पाण्याची व्यवस्था, मुलांसाठी खेळणी आदींची सोय करण्यात आली आहे.

यापूर्वी पोलीस अधिक्षक कार्यालयातही हिरकणी कक्ष उभारण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील गर्दीच्या विविध सात ठिकाणी हिरकणी कक्षाची उभारणी करण्यात येणार आहेत.

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाची तयारी पूर्ण; पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी घेतला आढावा

पालघर दि. 14 : ‘शासन आपल्या दारी’ पालघर जिल्ह्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ दि. 15 जून रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोळगाव, पालघर येथे होणार असून या कार्यक्रमाची तयारी जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली आहे. या तयारीचा आढावा सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज घेतला.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा, रविंद्र फाटक, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, जिल्हा पोलिस अधिक्षक बाळासाहेब पाटील, सहायक जिल्हाधिकारी आयुषी सिंह, संजिता महापात्रा, जिल्हा परीषदेच्या माजी अध्यक्षा वैदही वाढाण, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन, उपजिल्हाधिकारी (सा.प्र) संजिव जाधवर, जिल्हा नियोजन अधिकारी प्रशांत भामरे तसेच विविध विभागाचे प्रमुख आदि मान्यवर उपस्थित होते.
‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी उपस्थित राहू इच्छिणारे लाभार्थी यांना पिण्याच्या पाण्याची मुबलक उपलब्धता तसेच खाद्य पदार्थ याची उपलब्धता जिल्हा प्रशासन करणार आहे. तसेच कार्यक्रमास उपस्थित राहणारे लाभार्थी यांना वाहतूक सुविधा उपलब्ध करण्याविषयी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आढावा घेतला.
पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केली कार्यक्रम स्थळाची पाहणी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचा शुभारंभ होणार असून कार्यक्रम स्थळी भव्य मंडप उभारण्यात आला आहे. या मंडपात 25 हजार व्यक्तींना बसण्याची सोय करण्यात आली आहे. या सर्व बाबींचा आढावा कार्यक्रमास्थळी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी घेतला.

‘एसटी’ चे आधुनिकीकरण करून लोकवाहिनीला सक्षम करणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १४ : राज्य शासनाने प्रवाशांच्या सुविधेसाठी, एसटीच्या पायाभूत सोयीसुविधांचा विकास करण्यासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या हितासाठीही निर्णय घेण्यात येत आहे. प्रवाशांना दर्जेदार सुविधा मिळण्यासाठी एसटीचे आधुनिकीकरण करून या लोकवाहिनीला सक्षम करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) अमृत महोत्सवी वर्धापन दिन सोहळा कार्यक्रमाचे  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आज आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे हे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी आमदार भरत गोगावले, ‘एसटी’चे सदिच्छादूत तथा अभिनेते मकरंद अनासपुरे, परिवहन व बंदरे विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटिया, ‘एसटी’चे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, एसटीचे अमृत महोत्सवी वर्ष व देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष हा दुग्ध शर्करा योग आहे. एसटीचा 75 वर्षांचा प्रदीर्घ प्रवास झाला असून ही महाराष्ट्राची लोकवाहिनी आहे. एसटी महामंडळाने ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ या ब्रीदवाक्याप्रमाणे काम करावे. एसटीची सेवा गुणवत्तापूर्वक व लोकाभिमुख असली पाहिजे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास व महिलांना 50 टक्के प्रवास सवलत अशा योजनांना प्रवाशांनी उदंड प्रतिसाद दिला.

मुख्यमंत्री श्री. शिंदे पुढे म्हणाले, शासन हे लोकांच्या हिताचे निर्णय घेणारे असावे, कायदा पण लोकांच्या हिताचा असावा. शासनाने मागील काळात लोकहिताचे अनेक निर्णय घेतले. सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीसाठी शेतकऱ्यांना १५०० कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे.  राज्यात मेट्रो प्रकल्प, रस्ते निर्मिती आदी पायाभूत सुविधांची कामे वेगाने सुरू आहेत. सार्वजनिक वाहतुकीला सक्षम करणे गरजेचे आहे. त्यासाठी विविध पर्याय शासनामार्फत विकसित करण्यात येत आहे. आषाढी वारीसाठी महामंडळाने पर्याप्त बसेसची व्यवस्था केलेली आहे. राज्यातील एसटी बस स्थानकांमध्ये काँक्रिटीकरण पूर्ण करून बसपोर्ट ही संकल्पना राबविण्यात यावी. त्यासाठी पहिल्या टप्प्यात 250 कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल. एसटीच्या जमिनीचे मूल्यवर्धन करून त्यावर महामंडळाने उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करावे.

प्रवासी हे एसटीसाठी सर्वस्व असल्याचे सांगत मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, एसटीचा चेहरामोहरा बदलण्याचे काम शासन करीत आहे. नवीन इलेक्ट्रिक बसेस, वातानुकूलित बसेस महामंडळाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात येत आहे.  महामंडळाच्या ताफ्यात लवकरच ७ हजार बसेस येणार आहेत.  तसेच बस स्थानकांवर जमिन उपलब्धतेनुसार मराठी चित्रपटांसाठी मिनी थिएटर ही नवीन संकल्पना राबविण्यात येईल. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. एसटी बसेस, बस स्थानक स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केले.

प्रास्ताविकात महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री.चन्ने यांनी एसटीच्या विविध योजना व आतापर्यंतच्या वाटचालीची माहिती दिली. सदिच्छा दूत मकरंद अनासपुरे यांनी त्यांच्या जडणघडणीत एसटीचा मोठा वाटा असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुणे ते अहमदनगर या पहिल्या बसचे वाहक स्व. केवट यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.  ‘अमृत महोत्सव महाराष्ट्राच्या लोकवाहिनीचा’ कॉफी टेबल बुकचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच २५ वर्ष सतत विना अपघात सेवा देणाऱ्या पाच चालकांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये  आर्वी आगाराचे एजाज खान इस्माईल खान, तळेगाव जि. वर्धा आगाराचे विलास नाथे,  नईमुद्दीमु काझी, धुळे आगाराचे भाऊसाहेब सूर्यवंशी व लासलगाव येथील मेहमूद चौधरी यांचा समावेश आहे. तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यातील तीन विभागांना पुरस्कार देण्यात आले. यामध्ये जळगाव, जालना व भंडारा विभागांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शहादा,  कराड,  बीड, अंबड,  जामनेर,  चोपडा,  राळेगाव, सोयगाव व दिग्रस आगारांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. एसटीच्या विविध योजना व माहिती देणाऱ्या फिरत्या प्रदर्शन विश्वरथचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

 थोडक्यात एसटी..

राज्यातील 38 हजार खेड्यांना एसटीने जोडले असून 97 टक्के जनतेपर्यंत एसटी पोहोचली आहे. एसटीकडे 16 हजार 500 बसेस असून 250 आगार आणि 580 बस स्थानके आहेत. एसटीतर्फे रोज 53 लाख प्रवाशांची ने – आण होते. 75  वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाचा लाभ देण्यात येत आहे, तर महिला सन्मान योजनेअंतर्गत सर्व प्रकारच्या बसमध्ये 50 टक्के तिकीट दरात सवलत देण्यात येत आहे. तसेच अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलींना घरापासून शाळेपर्यंत मोफत प्रवासाची सवलत देण्यात आली आहे.

०००००

निलेश तायडे/विसंअ

 

 

यंदा जिल्हा वार्षिक योजनेचा शंभर टक्के निधी खर्च करण्याचे नियोजन करावे – पालकमंत्री शंभूराज देसाई

ठाणे, दि. 14 (जिमाका) :- जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक योजनेत सन 2023-24 वर्षासाठी जिल्ह्याला वाढीव निधी मिळाला आहे. हा निधी 100 टक्के खर्च होण्यासाठी आतापासूनच नियोजन करावे, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. तसेच पुढील काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी संबंधित जिल्हा परिषद व महापालिकांनी दक्षता घ्यावी. आवश्यकता भासल्यास पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

जिल्हा नियोजन समितीच्या विविध यंत्रणांचा आढावा तसेच शासन आपल्या दारी, पाणी पुरवठा, शहरांमधील नालेसफाई व आपत्ती व्यवस्थापन अंतर्गतच्या तयारीचा आढावा पालकमंत्री श्री. देसाई यांनी आज जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित बैठकीत घेतला. यावेळी आमदार किसन कथोरे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, ठाणे शहर पोलीस आयुक्त जय जित सिंग, ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर, कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, मीरा भाईंदर पोलीस आयुक्त मधुकर पांडे, नवी मुंबई महापालिका आयुक्त मिलिंद भारंबे, जिल्हा पोलिस प्रमुख विक्रम देशमाने यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा वार्षिक योजनांच्या निधीचा विनियोग व पुढील काळातील नियोजन, आपत्ती काळात राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना, शासन आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत लाभार्थ्यांची निवड आदींचा आढावा यावेळी घेण्यात आला.

श्री. देसाई म्हणाले की, ठाणे जिल्ह्याला गेल्या वर्षीपेक्षा यंदा 132 कोटी रुपये जास्तीचे मिळाले आहेत. पुढील काळात संभाव्य निवडणुका पाहता हा निधी यंदा डिसेंबर अखेरपर्यंत खर्च करण्यासाठी 15 जुलैपर्यंत संबंधित यंत्रणांनी प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करावेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्या कामाचे अंदाजपत्रके लवकरात लवकर द्यावेत. यंदाच्या वार्षिक योजनेचा निधी वेळेत व शंभर टक्के खर्च होईल यासाठी नियोजन करावे. हे करत असताना कामे दर्जेदार होतील याकडेही लक्ष द्यावे.

महिलांचे सक्षमीकरणावर मा. मुख्यमंत्री महोदयांनी भर दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात महिला बचत गटांची संख्या वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करावे. ज्या महिला अद्याप बचत गटात नाहीत, त्यांना बचत गटात समावेश करून घ्यावे. तसेच असंघटित कामगारांच्या नोंदणीसाठी विशेष यंत्रणा उभारावी, असे निर्देशही पालकमंत्री महोदयांनी दिले.

पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे. धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना पर्यायी जागेत स्थलांतरित करून ती इमारत निष्कासित करण्याची कार्यवाही तातडीने करावी. यासाठी गरज पडल्यास पोलीस यंत्रणांनी मदत करावी. तसेच नाले सफाई, रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, विद्युत वाहिन्यांवरील झाडांचे फांद्या कापणे ही कामे तातडीने पूर्ण करावीत. अतिवृष्टीमुळे दरड कोसळून रस्ते बंद पडणे, वाहतूक कोंडी होणे या घटना होऊ नयेत यासाठी उपाययोजना करावे. तसेच अशा घटना घडल्यास तातडीने पर्यायी व्यवस्था करावी, असेही निर्देश श्री. देसाई यांनी यावेळी दिले.

शासन आपल्या दारी या उपक्रमास नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. ठाणे जिल्ह्यात या उपक्रमाअंतर्गत 3 लाख लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवून सर्व यंत्रणांनी नियोजन करावे, असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

जिल्हास्तरीय दक्षता व संनियंत्रण समितीची बैठकही यावेळी झाली. जिल्ह्यातील शिधावाटप दुकानांची संख्या वाढवावी. तसेच नवीन दुकाने वाटप करताना महिला बचत गटांना प्राधान्य देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव यांनी सूत्रसंचालन केले.

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी वार्षिक योजनेच्या निधीची माहिती दिली. जिल्हा वार्षिक योजनेतून सन 2022-23 या वर्षासाठी 618 कोटी नियतव्य मंजूर झाला होता. हा संपूर्ण निधी खर्च झाला आहे. यंदा सन 2023-24 साठी 750 कोटीचा नियतव्य मंजूर झाला असून गेल्या वर्षीपेक्षा 132 कोटी वाढीव मिळाले आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेच्या योजना, आरोग्य सुविधा, नगरपालिका क्षेत्र, शाळा दुरुस्ती, महिला व बालकल्याण, पोलीस यंत्रणा, गतिमान प्रशासन यासाठी वाढीव निधी मंजूर झाला आहे. तसेच यंदा नव्याने गड किल्ले संवर्धनासाठी जिल्ह्यास 16 कोटी रुपये मंजूर झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी यावेळी दिली.

शेतकऱ्यांना बियाणे वाटप

राष्ट्रीय कृषी विकास कार्यक्रम व अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाणे वाटपाचा कार्यक्रम यावेळी पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते झाला. यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात पाच शेतकऱ्यांना बियाण्याचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दीपक कुटे यांनी योजनेची माहिती दिली.

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा

  1. मुंबई, दि. 14 : महाराष्ट्रात नवीन शैक्षणिक वर्षाला गुरूवार दि. 15 जून 2023 पासून सुरूवात होत आहे. शालेय शिक्षण विभाग विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण देण्यासाठी सज्ज असून विद्यार्थ्यांनी आनंदाने शिक्षण घेऊन यशस्वी व्हावे, अशा शब्दात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

शुभेच्छा देताना मंत्री श्री.केसरकर म्हणाले, विद्यार्थी हे महाराष्ट्राचे भविष्यातील नेतृत्व आहेत. त्यांच्या हिताच्या दृष्टीने शासनाने विविध निर्णय घेतले आहेत. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यात आले असून एकाच पुस्तकामध्ये सर्व विषयांचा अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आला आहे. याच पुस्तकात नोंदी घेण्यासाठी वह्यांची पाने देण्यात आली आहेत. सर्व विद्यार्थ्यांना गणवेश, बूट, सॉक्स देण्यात येणार आहेत. शेतीचे ज्ञान आवश्यक असल्याने यापुढे शेती विषय शिकविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोणतेही काम करण्यात कमीपणा नसतो हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी श्रमाची महती समजून घ्यावी आणि  माणुसकी जपावी असा सल्लाही श्री.केसरकर यांनी दिला. विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करावा आणि महाराष्ट्रासह देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावावा. जगातील सर्वात तरूण देश म्हणून जगाला उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करावा. या कामी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शासन विद्यार्थ्यांच्या सोबत असून जगाचे दूत म्हणून सेवा देण्यासाठी तयार व्हावे, असेही श्री.केसरकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना सांगितले.

00000

बी.सी.झंवर/विसंअ

 

 

ताज्या बातम्या

शासकीय कामात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी अनेक टूल्स – कृषी आयुक्त सुरज मांढरे

0
मुंबई, दि. ०६ : शासकीय कामात माहितीचे व्यवस्थापन, वेळेचे नियोजन, कामाचे निरीक्षण आणि अहवाल व्यवस्थापन करण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी अनेक टूल्स उपलब्ध आहेत...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना मुख्यमंत्र्यांसह मंत्रिपरिषद सदस्यांचे अभिवादन

0
अहिल्यानगर, दि. ०६ : जिल्ह्यातील चौंडी येथे होणाऱ्या मंत्रिपरिषद बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ चौंडीत दाखल...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून वैभवी देशमुख हिच्या बारावी परीक्षेतील यशाबद्दल अभिनंदन

0
मुंबई, दि. ०६: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हीने अत्यंत कठीण, आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जात इयत्ता बारावी परीक्षेत...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूतगिरणी व चौंडी ते निमगाव डाकू रस्त्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

0
अहिल्यानगर, दि. ६ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूतगिरणी व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत चौंडी ते निमगाव डाकू रस्त्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते...

मत्स्यव्यवसाय विभाग आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

0
पुणे, दि. 5: राज्यातील मत्स्यव्यवसाय विभाग महत्त्वाचा विभाग असून हा विभाग आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अधिकाऱ्यांनी एकत्रिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. उत्पन्नवाढीसोबतच पश्चिम महाराष्ट्रातील मत्स्य...