बुधवार, मे 7, 2025
Home Blog Page 1187

जी-२० निमित्ताने ‘पायाभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र’ प्रदर्शनाचे उद्घाटन

पुणे, दि. १७: शिक्षण, मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र, डिजिटल उपक्रम, संशोधन आणि कौशल्य विकासातील सर्वोत्तम पद्धती आदींचे सादरीकरण असलेल्या मल्टीमीडिया प्रदर्शनाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

जी- २० अंतर्गत शिक्षण कार्यगटाच्या चौथ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या उद्घाटन प्रसंगी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, भारत सरकारच्या शालेय शिक्षण विभागाचे सचिव संजय कुमार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य रविंद्र शिंगणापूरकर, समन्वयक राजेश पांडे आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून कृती आधारित शिक्षण पद्धतीद्वारे मुलांना आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे या उद्देशाने भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनात विविध शैक्षणिक साधने आणि शिक्षकांच्या गुणवत्ता वाढीसाठी उपक्रमांचा समावेश आहे. आदर्श बालवाडी, ५५ भाषांतील पुस्तके, आयुकाद्वारे निर्मित ४० विज्ञान प्रयोगांची माहिती देणारी ‘द वेलो ग्यानेश्वरी’ सायकल, खेळ आणि अभ्यासाचे महत्त्व, कौशल्य अभ्यासक्रम, भारतीय पारंपरिक खेळ, पूर्व प्राथमिकसाठी डिजिटल अभ्यासक्रम, वाचन, गणन व लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी खेळणी, प्रात्यक्षिके, कोडी, सामान्यज्ञान, प्रश्नमंजूषा, गोष्टी, कविता, डिजिटल साहित्य आदीची रेलचेल प्रदर्शनात आहे.

पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञानाबरोबर मुलांचा गणिती व वैज्ञानिक दृष्टिकोन, कौशल्य शिक्षण, आकलन, निरीक्षण, उपयोजन, विश्लेषण, संश्लेषण, निर्णय प्रक्रिया या मूलभूत प्रक्रिया विकसित व्हाव्यात यासाठी शैक्षणिक साहित्य येथे उपलब्ध आहे. भारतीय ज्ञान परंपरेबरोबर आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नाविन्यपूर्ण शैक्षणिक साधनांचा प्रदर्शनात समावेश आहे. प्रदर्शनात शिक्षणसंस्था, उत्पादक, स्टार्टअप आदींची सुमारे १०८ दालने असून २२ जूनपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ६ यावेळेत पुणे विद्यापीठातील खाशाबा जाधव क्रीडा संकुलात प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. यापैकी ३६ राज्यांची दालनेदेखील आहेत.

प्रदर्शनात सहभागी प्रमुख संस्था
युनिसेफ, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एनएसडीसी), एनसीईआरटी, नॅशनल बुक ट्रस्ट, भारतीय नॉलेज सिस्टम्स्‌‍ डिव्हिजन (आयकेएस), मायक्रोसॉफ्ट, गुगल, आयुका, आयसर, विविध स्टार्ट अप यांच्यासह विविध राज्य शासनांचे शिक्षण विभाग अशा एकूण १०८ प्रदर्शन दालनांचा प्रदर्शनात सहभाग आहे.

प्रदर्शनाचे महत्व:
पायाभूत क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षणासाठी हे प्रदर्शन उपयुक्त आहे. मुलांचा शारीरिक, मानसिक, भावनिक, आत्मिक विकास, बौद्धिक व कौशल्य वृद्धी यासह लेखन, वाचन व गणन या प्रक्रिया सोप्या पद्धतीने शिकण्यासाठीची कौशल्ये येथे प्रदर्शित करण्यात आली आहेत. आकलन, निरीक्षण, उपयोजन, विश्लेषण, संश्लेषण, निर्णय प्रक्रिया या मूलभूत प्रक्रिया विकसित होण्यासाठी या प्रदर्शनातील बाबी सहाय्यभूत ठरणार आहेत.

राष्ट्राच्या उन्नतीसाठी जनतेच्या शैक्षणिक सशक्तीकरणाला सर्वाधिक महत्त्व- केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी

पुणे, दि. १७: जनतेचे आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक दृष्टिकोनातून सशक्तीकरण होत असताना राष्ट्राच्या उन्नतीसाठी शैक्षणिक सशक्तीकरणाला सर्वाधिक महत्त्व आहे, असे मत केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांनी व्यक्त केले. नागरिक जितके अधिक सशक्त होतील तेवढे राष्ट्र अधिक सशक्त होत जाईल, असेही त्या म्हणाल्या.

जी -२० शिक्षण कार्यगटाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे ‘मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र’ या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री श्रीमती अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, भारत सरकारचे शालेय शिक्षण विभागाचे सचिव संजय कुमार, शिक्षणतज्ज्ञ, अभिनेते तथा चित्रपट निर्माते डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू करण्याबाबत विविध राज्यात सुरु असलेल्या शैक्षणिक उपक्रमाबाबत या परिषदेत चर्चा होईल असे सांगून केंद्रीय राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी म्हणाल्या, या परिषदेच्या निमित्ताने तसेच आयोजित प्रदर्शनातूनही शिक्षणाचे महत्त्व दिसून येत आहे. भारत सरकार मूलभूत शिक्षण आणि संख्यज्ञान, कौशल्य विकास याला खूप महत्व देत आहे. जी-२० चे एक उदि्दष्ट गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि कौशल्यांमधील तफावत कमी करणे हेदेखील आहे. त्यादृष्टीने या बैठकींतून चर्चा होत आहे.

त्या पुढे म्हणाल्या, बालकांची शिक्षण क्षमता विकसित करणे, त्यांचे संख्याज्ञान समज विकसित करण्यासाठी ‘निपुण भारत’ अंतर्गत पायाभूत साक्षरता तसेच संख्याशास्त्र हे या परिषदेचे केंद्रबिंदू आहे. तथापि, ही राष्ट्र निर्माणामध्ये शिक्षणाच्या योगदानाचे अवलोकन करण्याची संधीदेखील आहे. राष्ट्र म्हणजे केवळ जमीन नव्हे तर राष्ट्रातील नागरिक जितके अधिक सक्षम होतील तेवढेच राष्ट्र अधिक सशक्त होत जाईल.

राष्ट्रीय शिक्षण धोरणात २०२५ पर्यंत प्राथमिक शाळांमध्ये मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान यावर भर देण्यात आला आहे. यासाठी २०२१ मध्ये निपूण भारतची सुरुवात करण्यात आले. त्यानुसार २०२६-२७ पर्यंत कालबद्ध पद्धतीने उद्दिष्टे प्राप्त करण्यावर लक्ष देण्यात येत आहे. आपल्या बालकांना बदलत्या गरजेनुसार आव्हानांना तयार केले पाहिजे. शैक्षणिक विकासात आपण पुढे गेल्यास खऱ्या अर्थाने विकसित राष्ट्र बनू. त्यादृष्टीने भारत सरकार प्रयत्नशील असल्याचेही श्रीमती अन्नपूर्णा देवी म्हणाल्या.

सावित्रीबाई फुले यांचे नाव असलेल्या या विद्यापीठात ही राष्ट्रीय परिषद होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करुन श्रीमती देवी म्हणाल्या, जेव्हा महिलांसाठी घराबाहेर निघणे कठीण होते त्या काळी अनेक कठिण प्रसंगाला सामोरे जात, संघर्ष करत सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षणासाठी काम केले.

राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी-चंद्रकांतदादा पाटील
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले, राज्यात शालेय शिक्षण विभाग केंद्र शासनाच्या निर्देषानुसार शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करेल. याशिवाय उच्च व तंत्र शिक्षणामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात राज्याने विशेष पुढाकार घेतला आहे. यावर्षी नवीन शैक्षणिक वर्षात १ हजार २७० पदव्युत्तर शिक्षणाची महाविद्यालये, ८७ स्वायत्त कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालये, संस्था तसेच ५० स्वायत्त तंत्रनिकेतने, अभियांत्रिकी महाविद्यालये अशा १ हजार ४०० ठिकाणी नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. वरिष्ठ महाविद्यालयांसाठी चौकट तयार होत आहे. मात्र पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक यामध्ये विशेष लक्ष देण्याची गरज आहे, असेही श्री. पाटील म्हणाले.

प्रदर्शनाला ५ लाख विद्यार्थी भेट देण्याचे नियोजन
राष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने शिक्षण, मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान, डिजिटल उपक्रम, संशोधन आणि कौशल्य विकासातील सर्वोत्तम पद्धती प्रदर्शित करणारे मल्टीमीडिया प्रदर्शनदेखील आयोजित करण्यात आले आहे. प्रत्येक राज्याने शिक्षणामध्ये काय नाविन्यपूर्ण बाबी केल्या आहेत हे यातून पहायला मिळणार आहे या प्रदर्शनाला पहिली ते पदव्युत्तर वर्गातील पुणे व परिसरातून ५ लाख विद्यार्थ्यांनी भेट द्यावी असे उदि्दष्ट ठेवण्यात आले आहे, असेही मंत्री श्री. पाटील म्हणाले.

विद्यार्थ्याला भाषा, गणित, संख्याशास्त्राचे ज्ञान देणे गरजेचे-दीपक केसरकर
शालेय शिक्षणमंत्री श्री. केसरकर म्हणाले, जगात शिक्षणाच्या अनुषंगाने विविध तंत्र विकसित झाली आहेत. आपण त्यांचा अवलंब करत आहोत. त्याच वेळी आपल्याला आपल्या स्वत:च्या शिक्षणपद्धतीचा विचार करावा लागेल. सहाव्या शतकाच्या अखेरीस पहिली शाळा युनायटेड किंगडम येथे स्थापन झाली. त्यावेळी आपल्याकडे आपली गुरुकुल पद्धती अस्तित्वात होती. पाचव्या शतकात नालंदा, तक्षशीला अशी विश्वविद्यापीठे कार्यरत होती.

ते पुढे म्हणाले, इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय संवाद भाषा आहे यात शंका नाही. परंतु, प्रत्येक युरोपीय देशाची स्वत:ची मातृभाषा आहे. रशिया, जर्मनी, फ्रान्स, चीन आदी देशांचे उदाहरण पाहता तेथील बहुतांश नागरिकांना इंग्रजीचे ज्ञान नसले तरी त्या देशांनी ज्ञान, तंत्रज्ञानात मोठी प्रगती केली आहे. विज्ञानाला कोणतीही भाषा नाही. म्हणून मातृभाषेतूनच चांगले ज्ञान देता येऊ शकते असे म्हटले जाते. जेव्हा आपण शिक्षणावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करण्यावर लक्ष देणे गरजेचे आहे. भाषा, गणित, संख्याशास्त्र याचे ज्ञान चांगल्याप्रकारे देणे गरजेचे आहे. आपली पारंपरिक शिक्षण पद्धती प्रत्येकालाच रोजगार देतेच असे नाही. त्यामुळे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आम्ही व्यावसायिक कौशल्याचे प्रशिक्षण देण्याचा समावेश करत आहे.

आपली तरुणांची लोकसंख्या मोठी असताना आपल्या मनुष्यबळाला आपली संपदा बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच विविध देशांची कुशल मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. त्यासाठी विद्यार्थ्यांना कौशल्याचे प्रशिक्षण, भाषांचे शिक्षण देण्यावर भर दिला जात आहे. प्रत्येक विद्यार्थी स्वावलंबी असला पाहिजे असे प्रयत्न आहे. त्यासाठी महाराष्ट्रात पहिल्या इयत्तेपासून स्काऊट आणि गाईड बंधनकारक करत आहोत. तसेच आपला देश कृषिप्रधान असल्याने शिक्षणामध्ये कृषिचा समावेश करत आहोत. मातृभाषेतून शिक्षण देण्याच्या दृष्टीने यावर्षीपासून अभियांत्रिकी चे शिक्षण मराठीतून सुरू करण्यात येणार आहे. भविष्यात वैद्यकीय शिक्षणही मराठीतून देण्याचा मानस आहे, असेह श्री. केसरकर म्हणाले.

यावेळी श्री. द्विवेदी म्हणाले, आज विविध मतांच्या, विचारांच्या नावावर संघर्ष पाहता समन्वयाची गरज आहे. शिक्षणाचा उद्देश असा समन्वय असलेला समाज निर्माण करणे असावा. बदलत्या काळानुसार बदलत्या समाजासमोर विद्यार्थ्यांचे ओटीटी प्लॅटफॉर्म, समाजमाध्यमे, टीव्ही, गेम्स वर अधिक वेळ घालविण्याचे आव्हान दिसून येते. या नवतंत्रज्ञानाची आव्हाने लक्षात घेऊन आपल्या शिक्षण धोरणात बदल करत राहावे लागेल. नवीन माध्यमांनाही, प्लॅटफॉर्मलाही गुरू मनावे लागेल. मात्र त्यावर नियमन ही करावे लागेल, असेही द्विवेदी म्हणाले.

सचिव श्री. संजय कुमार यांनी भारत सरकारच्या शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली.

या परिषदेसाठी केंद्र शासनाच्या शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी, राज्ये, केंद्रशासित प्रदेशांच्या शिक्षण विभागाचे सचिव आदी उपस्थित आहेत.

जी-२० बैठकीनिमित्त आयोजित प्रदर्शनासाठी चोख बंदोबस्त ठेवा- पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे दि.१७-जी-२० शिक्षण कार्यगटाच्या चौथ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे आयोजित शैक्षणिक प्रदर्शनास मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी भेट देणार असल्याने सुरक्षेच्यादृष्टीने चोख बंदोबस्त ठेवावा, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

जी-२० बैठकीनिमित्त आयोजित प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियोजन करण्यासाठी पोलीस आयुक्तालय पुणे येथे घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पोलीस आयुक्त रितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त प्रवीण पाटील , विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य रवी शिंगणापूरकर आणि शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, बैठकीसाठी येणाऱ्या परदेशी प्रतिनिधींच्या सुरक्षेबाबत अत्यंत गांभीर्याने लक्ष द्यावे. शैक्षणिक प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असल्याने सुमारे ४ ते ५ लाख विद्यार्थी भेट देण्याची शक्यता आहे. विद्यार्थी शाळेच्या बसेसने येणार असल्याने वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यात यावे. नागरिकांना वाहतूककोंडीचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांसाठी पुरेशा प्रमाणात पिण्याच्या पाण्याची आणि तात्पुरत्या स्वच्छतागृहाची सोय करावी, त्यासाठी महानगरपालिकेचे सहकार्य घ्यावे, असे त्यांनी सांगितले.

सुरक्षाविषयक समन्वयासाठी कमांड सेंटरची स्थापना करण्यात आली असून वाहतूक नियोजनासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. ऑनलाईन सुविधेद्वारे विद्यार्थ्यांना भेटीची पूर्वनियोजित वेळ देण्यात येत असून एकाच वेळी गर्दी होऊ नये याची दक्षता घेण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वेळेवर उपलब्ध होण्यासाठी सुलभ कार्यपद्धतीचा अवलंब करणार- पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार,दिनांक.17 जून ,2023 (जिमाका वृत्तसेवा): आदिवासी विकास विभागातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वेळेवर उपलब्ध होण्यासाठी सुलभ कार्यपद्धतीचा अवलंब करून पूर्वी ज्या पद्धतीने ते उपलब्ध करुन देत होतो त्या पद्धतीने सर्व शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देणार असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.

ते आज शहादा तालुक्यातील मोहिदा तसेच अक्कलकुवा तालुक्यातील मोरंबा, भांग्रापाणी, भगदरी आणि सरी येथील शासकीय मुलींच्या वसतीगृह/आश्रमशाळांच्या नूतन इमारतीचे भुमीपूजन प्रसंगी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती हेमलता शितोळे, जिल्हा परिषदेचे सदस्य शांताराम पाटील, मोहन शेवाळे, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मीनल करनवाल, तहसिलदार  दिपक गिरासे (शहादा), तहसिलदार रामजी राठोड (अक्कलकुवा ),सार्वजनिक बांधकाम विभाग (आदिवासी विकास) उपअभियंता ए.पी.चौधरी, सहायक प्रकल्प अधिकारी, एस.एन.काकडे, के.एस.मोरे यांच्यासह लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी डॉ.गावित म्हणाले की, आदिवासी विकास विभागातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेचे गणवेश ,बुट, शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी पैसे देण्यात येतात परंतू काही पालक विद्यार्थ्यांसाठी नवीन शैक्षणिक साहित्य वेळेवर खरेदी करीत नसल्याने येत्या काळात नवीन पद्धतीचा अवलंबून  पुर्वी ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन देत होतो, त्या पद्धतीने त्या उपलब्ध करुन देण्यात येईल. यामुळे राज्यातील सर्व आश्रमशाळेतील गणवेश, बुट व इतर शैक्षणिक साहित्यात एकसमानता राखता येईल. ज्या ठिकाणी नवीन आश्रमशाळाच्या इमारतींची गरज आहे अशा ठिकाणी नवीन ठिकाणी सुसज्ज व सर्व सोईयुक्त सुविधा इमारती बांधण्यात येतील. या इमारतीत ई-लायब्ररी, अत्याधुनिक लॅब, व्हर्चुअल क्लासरूमची सुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबरच खाजगी शाळेमध्ये ज्या सुविधा उपलब्ध असेल अशा सर्व सुविधा या वर्षांपासून आश्रमशाळेत उपलब्ध करुन देण्यात येतील. आश्रमशाळेत विद्यार्थी हे  पहिल्या इयत्ते पासून शाळेत येतात त्यावेळी त्यांचे वय खुप कमी असल्याने अशा विद्यार्थ्यांचे गणवेश व कपडे धुण्यासाठी वॉशिग मशीन तसेच कपड्यांना इस्त्री धोबी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री डॉ. गावित पुढे म्हणाले, आदिवासी विकास विभागाने शिक्षणामध्ये आमुलाग्र बदल करण्याचे ठरिवले आहे. आश्रमशाळेत प्रवेश घेतांना विद्यार्थी हा पहिल्या वर्गापासून ते बारावीपर्यंत तो आश्रम शाळेत  शिक्षण घेतो त्यामुळे प्रत्येक आश्रमशाळेतील निकाल हा 100 टक्के लागणे अपेक्षित असल्याने प्रत्येक विद्यार्थ्यांना 75 टक्क्यापेक्षा जास्त मार्क मिळाले पाहिजे अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे. यासाठी येत्या वर्षापासून त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणार असून राज्यातील सर्व आश्रमशाळेत एका पद्धतीने सर्व अभ्यासक्रम शिकविले जाणार असून सर्व विद्यार्थ्यांची दोन तीन महिन्यांनी परीक्षा तसेच शिक्षकांच्या परीक्षाही घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या विषयांत मुलांचा निकाल समाधानकारक लागणार नाही. अशा विषयांच्या शिक्षकांच्या वेतनवाढ रोखण्यात येतील. तर सातत्याने चांगले निकाल लागणाऱ्या शिक्षकांना वाढीव वेतनवाढ किंवा बक्षीस देण्यात येईल. दर तीन महिन्यांनी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे परीक्षांचे मुल्यमापन करण्यात येवून त्यानंतरही परिस्थिती न बदल्यास अशा विद्यार्थ्यांना ई-क्लास रुमच्या माध्यमातून  तंज्ञ शिक्षकांकडून शिक्षण देण्यात येईल. शिक्षणांच्या बाबतीत कुठेही शिस्त आणि नियमांशी तडजोड केली जाणार नाही. जे शिक्षक व कर्मचारी वेळेत येणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. विद्यार्थ्यांनीही शिस्तीचे पालन  करायला पाहिजे यासाठी पालकांचे मेळावे घेण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

आंतरराष्ट्रीय योगदिनी विधानभवनाच्या प्रांगणात मान्यवरांच्या सहभागात योगासनांची प्रात्यक्षिके

        मुंबईदि. १७ : यंदाच्या वर्षी आंतरराष्ट्रीय योगदिनी म्हणजेच बुधवार, दिनांक २१ जून, २०२३ रोजी प्रात:काली विधान भवनाच्या प्रांगणात योग प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला आहे. सन्माननीय विधिमंडळ सदस्यांसह सुमारे २००० योगप्रेमी याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. सकाळी ७ ते ९.०० यावेळेत ‘योगप्रभात @विधानभवन’ हा कार्यक्रम होईल. यावेळी विशेष अतिथी म्हणून माननीय राज्यपाल श्री. रमेश बैस, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. विधानपरिषदेच्या माननीय उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लाभेल तसेच विशेष निमंत्रित म्हणून सर्व मंत्रीगण, माननीय विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माननीय विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार हे उपस्थित राहतील.

            योगविद्या आणि ध्यानधारणा ही आपल्या भारतीय संस्कृतीकडून अखिल विश्वाला लाभलेली अनमोल देणगी आहे. २१ जून हा दिवस “आंतरराष्ट्रीय योग दिवस” म्हणून साजरा करण्यात येणे ही सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद अशी घटना आहे. भारताचे पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेनुसार जगातील सर्वच देशांमध्ये या दिवशी सामूहिक योगासनांचे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि आरोग्यसंपन्न जीवनशैलीसाठी योगाचे महत्व अधोरेखित केले जाते. याच पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम यंदा विधान भवन, मुंबई येथे आयोजित करण्यात आल्याचे माननीय विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले. अधिकाधिक सन्माननीय सदस्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. योगप्रसार कार्यात उल्लेखनीय योगदान देत असलेल्या शतकमहोत्सवी कैवल्यधाम, मुंबई या संस्थेचा विशेष सहभाग या उपक्रमासाठी लाभला आहे.

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक; गृह विभागाला सुनियोजनाचे निर्देश

            मुंबईदि. १७:- आगामी बकरी ईद सणानिमित्त नियोजनाकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालीउपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

            सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस मुंबई शहर जिल्ह्याचे पालक मंत्री दीपक केसरकरग्राम विकास मंत्री गिरीष महाजन कृषी मंत्री अब्दुल सत्तारआमदार अबू आझमीआमदार रईस शेखमुख्य सचिव मनोज सौनिकगृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिकपोलीस महासंचालक रजनीश सेठमुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकरमुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. आय.एस.चहलजमाते उलेमाचे राज्याचे अध्यक्ष नदीम सिद्दीकीविविध जिल्ह्यातून आलेले मुस्लिम धर्मगुरू आणि समाज बांधव संघटनांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. बकरी ईदसाठी हेल्पलाईन सुरु केली जाईल. बाजार समित्यांच्या बाहेर बकऱ्यांची विक्री करण्यास परवानगी दिली जाईल. पशुवैद्यकीय तपासणी शुल्क पुर्वीप्रमाणेच आकारण्याचे निर्देश देण्यात येतीलअसे निर्णय घेण्यात आले.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीनेहमीच सर्व धर्मियांच्या सण-उत्सवाप्रमाणे बकरी ईद सणासाठी शासनाच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सण-उत्सवातील कायदा सुव्यवस्थेचे नेहमीच आदर्श म्हणून उदाहरण दिले जाते. आपण सर्व सण उत्सव नेहमीच सर्वधर्मीय बांधव एकत्र येऊन साजरे करतो. गणेशोत्सवनवरात्रोत्सवदिवाळी त्याचप्रमाणे ईद मध्येही आपला गृह विभाग नियोजन करत असतो. कायदा व सुव्यवस्था राखण्याची सर्वच धर्मियांची जबाबदारी आहे. शांतता व सुव्यवस्थेच्या माध्यमातून आपल्याला सर्वच बांधवानां एकत्र घेऊन पुढे जायचे आहे.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीदरवर्षीप्रमाणेच गृह विभाग या सणासाठी नियोजन करेल, आवश्यक ती दक्षता घेईल. या सणापूर्वी तीन-चार दिवस आधी पशूंची वाहतूक सुरु होते. त्यामध्ये काही अनधिकृत घटक अडथळा आणत असतील तर त्याबाबत पोलीस दक्षता घेतील. यापुर्वी देखील आपण या सणासाठी उत्तम नियोजन केले आहे. त्याहून अधिक प्रभावी आणि चांगली अशी अंमलबजावणी यंदा होईलयाकडे लक्ष दिले जाईल.

            यावेळी मुस्लिम बांधवाच्या वतीने श्री. सिद्दीकी यांनी यंदा ईद व एकादशी एकाच दिवशी आल्याचे सांगून. मुस्लिम बांधवांनी अशा प्रकारे एकाच दिवशी आलेल्या अनेक सणांच्या पावित्र्याचा नेहमीच आदर केल्याचे सांगितले. आमदार श्री. आझमीआमदार श्री. शेख यांनी बाजार समित्यांबाहेर बकरी विक्रीस परवानगी दिल्याबद्दल व पशूवैद्यकीय तपासणी शुल्क पूर्वीप्रमाणेच आकारणी करण्याचे निर्देश दिल्याबद्दल आभार मानले.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

राष्ट्रीय आमदार संमेलनासह इतर कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी मुंबई दौऱ्यावर असलेले लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानास भेट दिली.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री. बिर्ला यांचे पुष्पगुच्छ आणि गणेश मूर्ती देऊन स्वागत केले.

रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालयासाठी ४४८ पदनिर्मितीसह १०५.७८ कोटी खर्चास मान्यता- वैद्यकीय शिक्षण मंत्री

             मुंबईदि. १७ : रत्नागिरी येथे १०० विद्यार्थी क्षमतेसह संलग्नीत ४३० खाटांचे रुग्णालय सुरु करण्यास मागील वर्षी मान्यता देण्यात आली होती. आता रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालयासाठी ४४८ पदनिर्मितीस मान्यता देण्यात आली असून याकरीता रु. १०५.७८ कोटी खर्चासही मान्यता देण्यात आली असल्याची माहिती ग्रामविकासवैद्यकीय शिक्षण आणि क्रीडा मंत्री गिरीष महाजन यांनी माहिती दिली.

            मंत्री गिरीष महाजन म्हणाले की,युती शासनाचा मागील ०९ वर्षात १० शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्यात आले आहेत. रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या तसेच सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास संलग्नित ५०० रुग्णखाटांच्या रुग्णालयाच्या रुपात कोकणवासीयांना  शासनाने  दुहेरी आरोग्यदायी भेट दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

दरवर्षी हजारो नवीन डॉक्टर्स निर्माण होणार

मंत्री गिरीष महाजन म्हणालेस्वातंत्र्यानंतर मागील जवळपास ६० वर्षात केवळ ११ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्यात आली आहेत. तर सन २०१४ पासून २०२३ पर्यंत ०९ वर्षात १० वैद्यकीय महाविद्यालये राज्याच्या सुरु करण्यात आली आहेत. त्यामुळे दरवर्षी हजारो नवीन डॉक्टर्स निर्माण होवून राज्यभर आरोग्य सेवेचा विस्तार होणार आहे.

मागील ०९ वर्षातील १० वे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु

रत्नागिरी येथील नवीन वैद्यकीय महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला असून मागील ०९ वर्षातील १० वे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाले आहे. तसेच ज्या जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालये नाहीत, अशा ०९ जिल्ह्यांमध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्याच्या प्रस्तावास लवकरच मान्यता देण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी यावेळी सांगितले.

रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय  या शैक्षणिक वर्षापासून प्रथम वर्षाचे प्रवेश सुरु होणार

  रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सन २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यास केंद्राचा हिरवा कंदील मिळाला असून या शैक्षणिक वर्षापासून प्रथम वर्षाचे प्रवेश सुरु होणार असल्याचे मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित ५०० रुग्णखाटांच्या रुग्णालयाकरीता १०८६ पदनिर्मितीस मान्यता

याच बरोबर सिंधुदुर्ग येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित ५०० रुग्णखाटांच्या रुग्णालयाकरीता आवश्यक एकूण १०८६ पदनिर्मीतीसही मान्यतेचा शासन निर्णय काढण्यात आला असून त्यापोटी १०९.१९ कोटी रुपयांचा भार शासनाच्या तिजोरीवर पडणार आहे. सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यापूर्वीच सुरु झाले आहे.

रत्नागिरी येथील १०० विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय महाविद्यालय व सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित ५०० रुग्णखाटांचे रुग्णालय सुरु झाल्याने कोकणवासीयांना वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्याकडून दूहेरी भेटच मिळाली आहे.

कोकणातील  ग्रामीण भागातील नागरीकांना आरोग्य विषयक चांगल्या सोयीसुविधा मिळणार

            त्यामुळे कोकणातील सर्वसामान्य नागरिकांना विशेषोपचार आरोग्य सुविधा माफक दरात उपलब्‍ध होणार आहेत. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरील खर्चात बचत होणार आहे. कोकणातील आसपासच्या ग्रामीण भागातील नागरीकांना आरोग्य विषयक चांगल्या सोयीसुविधा मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून या महत्त्वपूर्ण निर्णयाचे सामान्य नागरिकांतून स्वागत केले जात आहे.

तिलारी प्रकल्पातील कालव्यांच्या पुनरुज्जीवनासाठी ३३० कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता

            मुंबईदि. १७:- महाराष्ट्र व गोवा या दोन्ही राज्यांच्या संयुक्त व महत्वाकांक्षी तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पाच्या कालव्यांच्या पुनरुज्जीवनाकरिता ३३० कोटी रुपयांच्या खर्चास आज तिलारी आंतरराज्य धरण प्रकल्पाच्या नियंत्रण मंडळाच्या ६ व्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

            बैठकीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदेगोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतउपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीसगोव्याचे जलसंपदा मंत्री सुभाष शिरोडकर यांच्या प्रमुख उपस्थित सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक झाली.

            आपले विचार एक आहेत. त्यामुळे गोवा आणि महाराष्ट्राच्या हितासाठी आपण एकत्र येऊन खूप काही करू शकतो,’ असा विश्वास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेगोवा महाराष्ट्राचा लहान बंधू आहे. त्यामुळे गोव्याच्या आमच्याकडून ज्या अपेक्षा असतीलत्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू.

            गोव्याचे मुख्यमंत्री श्री. सावंत म्हणाले, ‘महाराष्ट्र सरकारने वेळोवेळी खूपच चांगले सहकार्य केले आहे. पाणी या विषयाबरोबरच सर्वच क्षेत्रात यापुढेही असेच सहकार्य लाभेल असा विश्वास आहे. तिलारी प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकारकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दलत्यांनी आभारही मानले. गोव्याचे जलसंपदा मंत्री श्री शिरोडकर यांनीही पाणी वाटपच नव्हेतर अन्य विषयातही सहकार्य वाढवू असे अपेक्षा व्यक्त केली.

            तिलारी प्रकल्पाच्या कालव्यांची कामे ३० ते ३५ वर्षापुर्वी झाली आहेत. त्यामुळे जीर्ण झालेल्या आणि गळती होणाऱ्या डाव्या व उजव्या कालव्यांच्या पूनरुज्जीवनाबाबत  बैठकीत एकमत झाले. त्यासाठी ३३० कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील अतिरिक्त अशा २२ प्रकल्पबाधितांना नुकसान भरपाई देण्याचाही निर्णय घेण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री श्री. सावंत यांनी प्रकल्पाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव दिला. त्यावर धरणाचा सर्वंकष अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. गोव्यातील अभियंताच्या क्षमता बांधणीसाठी महाराष्ट्राकडून सहकार्य करण्याचे मान्य करण्यात आले. तिलारी प्रकल्पाच्या ठिकाणी कालवे पुनरूज्जीवन आणि संनियंत्रणाच्या दृष्टीने संयुक्त कार्यालय स्थापन करण्याचा निर्णयही घेण्यात आला.

            यावेळी राज्याचे जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांनी प्रकल्पांबाबत विस्तृत सादरीकरण केले. बैठकीस वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ नितीन करीरमहसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरागोव्याच्या जलसंपदा विभागाचे सचिव सुभाष चंद्राकृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोलेगोव्याच्या जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी,अधिक्षक अभियंता ज्ञानेश्वर सालेकर,  कार्यकारी अभियंता मिलिंद गावड आदी उपस्थित होते.

 तिलारी प्रकल्प दृष्टिक्षेपात…

            या आंतरराज्य प्रकल्पासाठी गोवा राज्य ७६.७० टक्के खर्च उचलते. या प्रकल्पाची २१.९३ टिएमसी इतकी क्षमता आहे. यातून गोवा राज्यासाठी १६.१० टिएमसी आणि उर्वरित ५.८३ टिएमसी महाराष्ट्राला पाणी मिळते. प्रकल्पामुळे गोवा राज्यातील २१ हजार १९७ हेक्टर जमीन सिंचना खाली येते. तर महाराष्ट्रातील ६ हजार ७७६ हेक्टरला सिंचन लाभ होतो. या प्रकल्पातून मुख्यत्वे गोवा राज्यातील उत्तर गोवा जिल्ह्यास पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येते. त्यादृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा आहे.

आरोग्य संस्थांसाठी औषधे, वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीत सुसूत्रता ठेवा; रुग्णालयांना औषधांचा तुटवडा जाणवणार नाही याची दक्षता घ्या- मुख्यमंत्री

           मुंबईदि. १७ : राज्यातील शासकीयनिमशासकीय आरोग्य संस्थांसाठी औषधेवैद्यकीय उपकरणे यांच्या खरेदीमध्ये सुसूत्रता ठेवण्यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामार्फत पारदर्शक पद्धतीने खरेदी प्रक्रिया राबवावी. रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा जाणवणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.

            सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाची पहिली बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजनआरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंतमुख्य सचिव मनोज सौनिकवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीरआरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर आदी यावेळी उपस्थित होते.

            सार्वजनिक आरोग्यवैद्यकीय शिक्षण विभागासाठी लागणारी औषधेवैद्यकीय उपकरणे यांची खरेदी करण्यासाठी प्राधिकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या आठ वरिष्ठ पदांना आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी या प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहतील. सध्या आरोग्य विभागाच्या आयुक्तांना या पदाचा तात्पुरता कार्यभार देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. हे प्राधिकरण म्हणजे क्रांतिकारक पाऊल असून त्याच्या स्थापनेमागचा हेतू चांगला आहे. त्यामाध्यमातून रुग्णालयांनाआरोग्यसंस्थांना वेळेवर औषधे आणि उपकरणे उपलब्ध झाले पाहिजे. प्राधिकरणाची प्रक्रिया पारदर्शक ठेवावीअसे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

            प्राधिकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करावे या संस्थेची विश्वासार्हता वाढवावी. त्याची कार्यपद्धती पारदर्शक राहिल्यास खासगी रुग्णालये देखील या प्राधिकरणाच्या माध्यमातून औषधे खरेदी करू शकतीलअसे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. यावेळी प्राधिकरणाचा कार्यक्रम आराखडा२७०० विविध औषधे आणि साहित्य खरेदीकंत्राटी पद्धतीने पदभरती आदी बाबत चर्चा करण्यात आली. यावेळी आरोग्य विभागाचे सचिव नविन सोनावैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव अश्विनी जोशीआरोग्य आयुक्त धीरज कुमार उपस्थित होते.

ताज्या बातम्या

राज्यात १६ ठिकाणी ‘मॉक सिक्युरिटी ड्रिल’चे आयोजन

0
मुंबई, दि. ६ : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानदरम्यान वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना बुधवारी दिनांक ७ मे रोजी...

शासकीय कामकाजात विश्वासार्हता आणि सुरक्षा वाढवण्यासाठी ‘ब्लॉकचेन प्रणाली’ प्रभावी – बेकर ह्यूज कंपनीचे तज्ज्ञ...

0
मुंबई, दि. ६ : आपले दैनंदिन जीवन अधिक सुरक्षित व पारदर्शक करण्यासाठी ब्लॉकचेनचा प्रभावी वापर करता येऊ शकतो. पारदर्शकतेसाठी व भ्रष्टाचारविरोधी उपाय म्हणून त्याचा...

छत्रपती शिवाजी महाराज यांचा देदिप्यमान इतिहास संग्रहालयाच्या माध्यमातून जनतेसमोर येणार

0
संग्रहालयाचे काम अंतिम टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन नवी दिल्ली, दि. 6 : छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल राष्ट्रीय समितीच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ‘पाणीदार अहिल्यानगर’ पुस्तिकेचे प्रकाशन

0
अहिल्यानगर, दि. ६ : - चौंडी येथील मंत्रिपरिषद बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हा जलसंधारण अधिकारी निर्मित आणि जिल्हा माहिती कार्यालयाने संपादित केलेल्या...

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूत गिरणी’ व ‘मुख्यमंत्री ग्रामसडक योजनें’तर्गत ‘चौंडी ते निमगाव डाकू...

0
अहिल्यानगर, दि. ६ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूत गिरणी व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत चौंडी ते निमगाव डाकू रस्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते...