गुरूवार, मे 8, 2025
Home Blog Page 1185

पंढरपूर आषाढी वारीमध्ये वारकरी भाविकांना आवश्यक सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात – विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे

सोलापूर, दि. 20 (जि. मा. का.) : पंढरपूर आषाढी वारीमध्ये वारकरी भाविकांना आवश्यक सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. वारकरी भाविकांची गैरसोय होणार नाही, यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी, अशा सूचना विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज येथे दिल्या.

पंढरपूर आषाढी वारी 2023 प्रशासकीय नियोजनाचा आढावा बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरून त्या बोलत होत्या. नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी गजानन गुरव, जिल्हा प्रशासन अधिकारी आशिष लोकरे, जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, पंढरपूरचे मुख्याधिकारी अरविंद माळी, देवस्थान समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औंसेकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, सुनील उंबरे, आदि उपस्थित होते.

यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने केलेल्या नियोजनाचे सादरीकरण केले.  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी आषाढी वारी नियोजनाची माहिती दिली. त्यावर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी समाधान व्यक्त केले.

रस्त्याची कामे सुरू असल्याने पर्यायी मार्गाचे तसेच, भाविकांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांचे फलक दर्शनी भागात लावावेत. कामांच्या ठिकाणच्या राडारोड्याचे स्थलांतरण करावे, अशा सूचना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यावेळी केल्या.

दि. 28 जून रोजी पालखी आगमन होणार असून, दि. 29 जून रोजी आषाढी एकादशी आहे. दि. 4 जुलै रोजी महाद्वार काला होऊन आषाढी वारीची सांगता होणार आहे. मानाच्या 10 पालख्या, त्यांच्या मुक्कामाची व रिंगणाची ठिकाणे, घटना प्रतिसाद प्रणाली, जिल्ह्यामध्ये उभारण्यात आलेली 21 आपत्ती व्यवस्थापन केंद्रे, नेमणूक केलेले अधिकारी, कर्मचारी, नोडल अधिकारी, स्वयंसेवी संस्था, यशदा, पुणे मार्फत घेण्यात आलेले प्रशिक्षण यांची माहिती श्री. ठोंबरे यांनी यावेळी दिली.

वारकरी भाविकांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधाबाबत श्री. ठोंबरे म्हणाले, जिल्हा परिषदेमार्फत पाणी पुरवठ्यासाठी 49 टँकर्स व त्यामध्ये पाणी भरण्याची सुविधा करण्यात आली आहे. तसेच औषधोपचार केंद्रे, गॅस वितरण व्यवस्था, शौचालय व्यवस्था, महिलांची वैयक्तिक स्वच्छता व सुरक्षितेबाबत नियोजन करण्यात आल्याचे सांगितले.

यंदा पहिल्यांदाच आषाढी वारीमध्ये महिला वारकऱ्यांसाठी स्वतंत्र सोयी सुविधा देण्यात येणार असून, जवळपास 3 हजार 200 ठिकाणी महिला वारकरी स्नान गृहे उभारण्यात आली आहेत, असे सांगून मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी ग्रामपंचायतीमीर्फत पालखी मार्गांवरील 72 गावात पुरविण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती दिली. ते म्हणाले, 376 ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा, 98 ठिकाणी आरोग्य सुविधा, 95 ठिकाणी टँकर भरणा केंद्र, जवळपास साडे आठ हजार शौचालये, 177 ठिकाणी विसावा मंडप, 82 हिरकणी कक्ष, 352 प्लास्टिक संकलन केंद्र, 69 वारकरी मदत केंद्र, हरित वारी, निर्मल वारी अंतर्गत पालखी मार्गांवर 12 हजार वृक्ष लागवड करण्यात येत आहे.

यावेळी आरोग्य विभाग, परिवहन विभाग, 65 एकर परिसरातील नियोजन, पालखी मार्गांवर भाविकांना दिल्या जाणाऱ्या सुविधांचा आढावा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यावेळी घेतला.

तसेच नावीन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत पंढरीची वारी मोबाईल अँप, हरित वारी, निर्मल वारी यांची माहिती यावेळी देण्यात आली.

000

पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये सर्व घटकांच्या भावनांचा विचार करावा – विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे

सोलापूर, दि. 20 (जि. मा. का.) : पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतिम करताना वारकरी, भाविक, व्यापारी, नागरिक अशा सर्व घटकांच्या भावनांचा विचार करावा, अशा सूचना विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज येथे दिल्या.

सुधारित पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा आढावा बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरून त्या बोलत होत्या. नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी, पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी गजानन गुरव, जिल्हा प्रशासन अधिकारी आशिष लोकरे, जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, पंढरपूरचे मुख्याधिकारी अरविंद माळी, देवस्थान समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औंसेकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, सुनील उंबरे आदि उपस्थित होते.

विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, मंदिर विकासासाठी शासनाने मंजूर केलेल्या 73 कोटी रुपयांच्या निधीमुळे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर व पंढरपूरच्या विकासाला चालना मिळणार आहे. या निधीतून मंदिराचे प्राचीन सौंदर्य उजळून निघेल. त्याच बरोबर मंदिराचे संवर्धन होण्यास मदत होणार आहे. या निधीचा सुयोग्य वापर करावा. या तरतुदीमुळे संत विद्यापीठ, वारकऱ्यांना आरोग्य विषयक सुविधा, भक्त निवास अशा प्रलंबित विषयांना गती मिळणार आहे. त्याच बरोबर शिर्डी प्रमाणे पंढरपूरला विमानतळासाठी प्रस्तावावर आवश्यक कार्यवाही करावी. त्यामुळे जगभरातील भाविक पंढरपूरशी जोडला जाईल. यासंदर्भात वरिष्ठ स्तरावर आवश्यक कार्यवाहीसाठी सहकार्य करू, असे मत त्यांनी व्यक्त केले.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, पंढरपूर कॉरीडोर ऐवजी प्रति पंढरपूर ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवावी. स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन विकास आराखडा अंतिम करावा. कोणावरही अन्याय होऊ न देता, सर्व घटकांना समाविष्ट करून घ्यावे. नागरिकांनाही सहकार्याची भूमिका घ्यावी. पंढरपूर विकास आराखडा तयार करताना जुन्या वास्तू, स्मारकांचा आदर राखला जाईल, याची विशेष दक्षता घ्यावी. कॉरीडोरबाबत गैरसमज दूर करणारे व्हिडिओ समाज माध्यमातून प्रसारित करावेत, असे त्यांनी सूचित केले.

जिल्हा प्रशासन अधिकारी आशिष लोकरे यांनी सादरीकरण केले. यामध्ये तीर्थ क्षेत्र विकास आराखडा निर्मिती कार्यवाही, विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात करावयाच्या पायाभूत सुविधा, पायाभूत विकास कामे, पालखी तळ भूसंपादन, झालेल्या बैठका, अभ्यास पथकाच्या सूचना, स्थानिक संघर्ष समितीचा आराखडा, आवश्यक निधी, सूचना व हरकती आदिबाबत सविस्तर माहिती दिली. त्यावर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी समाधान व्यक्त केले. संजय माळी, गजानन गुरव, अरविंद माळी यांनी त्यांच्या विभागासंदर्भात माहिती दिली.

000

पोक्सोअंतर्गत प्रकरणांबाबत कोकण विभागातील सहा जिल्ह्यांचा २२ जूनला आढावा

मुंबई, दि. २० : पोक्सो अर्थात महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाला बालकांचा लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण अधिनियम, २०१२ ते कलम ४४ अन्वये तसेच बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायदा, २००५ च्या कलम १०९ अन्वये या दोन्ही कायद्याअंतर्गत दाखल प्रकरणांचा आढावा घेण्यासाठी कोकण विभागातील ६ जिल्ह्यांच्या विभागीय बैठकीचे आयोजन २२ जून रोजी मुंबईत करण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष ॲड. सुशीबेन शहा यांनी दिली आहे.

या दोन्ही कायद्यांच्या अंमलबजावणी आणि देखरेखीसंदर्भात कोकण विभागातील ६ जिल्ह्यांतील  बाल कल्याण समिती सदस्य, बाल न्याय मंडळाचे सदस्य, बालगृहांचे अधीक्षक, जिल्हा बाल संरक्षण युनिट व विशेष बाल संरक्षण युनिटचे प्रतिनिधी जिल्हा महिला व बाल विकास विभाग, परिविक्षा अधिकारी, चाईल्ड लाईन व खाजगी स्वंयसेवी संस्थाचे (NGO) प्रतिनिधी व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रतिनिधी या सर्व संबंधित प्रशासकीय यंत्रणा यांची ही एकत्रित बैठक असेल. या बैठकीत ज्या सूचना, शिफारशी सहभागी तज्ज्ञांकडून सुचविल्या जातील त्या राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहेत. या शिफारशींसंदर्भात कालबद्ध पद्धतीने कारवाईचा अहवालही मागविण्यात येणार आहे.

अशा प्रकारे राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या विभागीय मुख्यालयांमध्ये आगामी कालावधीत बैठका आयोजित करण्यात येणार आहेत, अशी माहिती ॲड. सुशीबेन शहा यांनी दिली.

****

संध्या गरवारे/विसंअ/

कौशल्य विकास उपक्रम ग्रामीण भाग केंद्रित हवे – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि.२० : कौशल्य विकास उपक्रम हा ग्रामीण भाग केंद्रित असायला हवा. ग्रामीण भागातील युवकांना कुशल बनवण्याची गरज असून यातूनच ग्रामीण भागातील स्थलांतर कमी होईल आणि घरोघरी कौशल्य पोहोचेल,  असे प्रतिपादन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले आहे.

सीआयआय बिझनेस २० अंतर्गत चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी कार्यशक्ती गटाच्या परिषदेत मंत्री  श्री. लोढा बोलत होते.

उद्योग सहकार्य आणि व्यावहारिक शिक्षणामुळे कर्मचाऱ्यांमध्ये परिवर्तन होईल, अशी अपेक्षा श्री. लोढा यांनी यावेळी व्यक्त केली.

महाराष्ट्रात एक हजारहून अधिक औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) असून तिथे देशातल्या सर्वाधिक सुमारे अडीच लाख युवकांना प्रशिक्षण दिले जात असल्याचे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी यावेळी सांगितले. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गासाठी विशेष कार्यक्रम राबवले जात असून देशातील स्टार्टअपच्या संख्येत महाराष्ट्र आघाडीवर असल्याचेही त्यांनी सांगितले.

सीआयआय पश्चिम विभागाचे अध्यक्ष आणि टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रवीर सिन्हा म्हणाले की, उद्योगाने अकुशल कामगारांपर्यंत पोहोचून एक कौशल्य व्यासपीठ तयार करणे आवश्यक आहे. ज्यामुळे एकूण उत्पादकता वाढेल. सीआयआय बिझनेस २० उपक्रमाचा एक भाग म्हणून, कामाचा गतिशील मार्ग तयार करण्यासाठी आम्ही भविष्यातील कामांचा आराखडा तयार करत असून त्यामध्ये व्यापक कार्य करत आहोत.

असेंचर इंडियाच्या चेअरमन आणि वरिष्ठ व्यवस्थापकीय संचालक रेखा मेनन म्हणाल्या की,  मानव आणि तंत्रज्ञान यांच्यातील सहजीवन संबंधांची गरज आहे. इंडस्ट्री सहयोग, डेटा आधारित मनुष्यबळ विश्लेषण आणि महिलांचा सहभाग वाढवून कौशल्य वाढवले जाईल, असेही त्या म्हणाल्या.

000

 संध्या गरवारे/विसंअ/

आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम – २०२४ जाहीर

मुंबई, दि. २० : आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने दि.१ जानेवारी, २०२४ या अर्हता दिनांकावर पात्र होणाऱ्या नागरिकांसाठी मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केलेला आहे. यामध्ये पूर्व -पुनरीक्षण उपक्रम व पुनरीक्षण उपक्रम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी  श्रीकांत देशपांडे यांनी मंत्रालय – विधिमंडळ वार्ताहर कक्ष  येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर उपस्थित होते.

मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे म्हणाले, पुनरीक्षण-पूर्व उपक्रम कार्यक्रमात मतदार यादी संदर्भातील सर्व कायदे आणि मार्गदर्शक सूचना तसेच, नवीन आयटी ॲप (IT Application) आणि प्रणालीबाबत मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना प्रशिक्षण दि. 01 जून, 2023 (गुरुवार) पासून ते दि. 20 जुलै, 2023 (गुरुवार) असेल, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेद्वारा प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी दि. 21 जुलै, 2023 (शुक्रवार) ते दि. 21 ऑगस्ट, 2023 (सोमवार), मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण मतदार यादी, मतदार ओळखपत्रातील त्रृटी दूर करणे इ., आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करणे, अस्पष्ट, अंधुक छायाचित्र बदलून त्याऐवजी संबंधित मतदाराकडून योग्य दर्जाची छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करणे, विभाग, भाग  यांची आवश्यकतेनुसार नव्याने मांडणी करून मतदान केंद्राच्या सीमांची पुनर्रचना तयार करून मतदान केंद्राच्या यादीस मान्यता घेणे; तुलनात्मक फरक शोधून फरक दूर करण्यासाठी कालबद्ध योजना आखणे, कंट्रोल टेबल अद्यावत करणे दि. 22 ऑगस्ट, 2023 (मंगळवार) ते  दि. 29 सप्टेंबर, 2023 (शुक्रवार) नमुना 1-8 तयार करणे, 01 जानेवारी, 2024 या अर्हता दिनांकावर आधारित पुरवणी व एकत्रित प्रारूप यादी तयार करणे, दि. 30 सप्टेंबर, 2023 (शनिवार) ते दि. 16 ऑक्टोबर, 2023 (सोमवार) असा कार्यक्रम आहे.

पुनरीक्षण कार्यक्रमात एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करणे, दि. 17 ऑक्टोबर, 2023 (मंगळवार), दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी दि. 17 ऑक्टोबर, 2023 (मंगळवार) ते  दि. 30 नोव्हेंबर, 2023 (गुरुवार), विशेष मोहिमांचा कालावधी दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधी, मुख्य निवडणुक अधिकारी यांनी निश्चित केलेले दोन शनिवार व रविवार, दावे व हरकती निकालात काढणे, दि. 26 डिसेंबर,2023 (मंगळवार) पर्यंत, अंतिम प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी मागणे, डाटाबेस अद्यावत करणे आणि पुरवणी याद्यांची छपाई दि. 01 जानेवारी, 2024 (सोमवार) पर्यंत मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी करणे दि. 05 जानेवारी, 2024 (शुक्रवार) दि.21 जुलै, 2023 ते 21 ऑगस्ट, 2023 या कालावधीसाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे घरोघरी भेट देऊन पडताळणीसाठी त्यांच्या संबंधित यादी भागात असलेल्या सर्व मतदारांचा तपशिल घेण्यात येईल. या कार्यक्रमाकरिता प्रत्येक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी सोबत एक बूथस्तरीय एजंट (BLA), नियुक्त करण्याबाबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना विनंती करण्यात आली आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी  हे नोंदणी न केलेले पात्र मतदार (01 ऑक्टोबर, 2023 रोजी पात्र असलेले),संभाव्य मतदार (01 जानेवारी, 2024 रोजी पात्र होणारे),संभाव्य मतदार (पुढील तीन अर्हता दिनांकावर पात्र होणारे), एकापेक्षा अधिक नोंदी, मयत मतदार, कायमस्वरूपी स्थलांतरीत मतदार, मतदार यादीतील नोंदीत दुरुस्ती  ही माहिती गोळा करणार आहेत.

अर्जदार नमुना अर्ज क्र. ६ व नमुना अर्ज क्र. ८ भरताना त्याच्याकडे आधार कार्ड क्रमांक असल्यास स्वेच्छेने आधार कार्ड क्रमांक नमूद करेल. तथापि, आधार कार्ड क्रमांक कळविला नाही किंवा उपलब्ध करुन देण्यास असमर्थता दर्शविली या कारणास्तव मतदार यादीत नोंदणीसाठीचा अर्ज नाकारण्यात येणार नाही किंवा मतदार यादीतील नोंद वगळण्यात येणार नाही. भारत निवडणूक आयोगाने निर्धारीत केलेल्या कार्यक्रमानुसार, मतदार नोंदणी अधिकारी नमुना अर्ज क्र. 5 मध्ये नोटीस जारी करून वर्षाच्या चारही अर्हता दिनांकावर आधारीत दावे व हरकती सादर करता येईल. आतापर्यंत मतदार नोंदणीसाठी १ जानेवारी हा अर्हता दिनांक असायचा. म्हणजे १ जानेवारी किंवा त्या आधी १८ वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना मतदार नोंदणी करता यायची. सन २०२३ पासून  1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै व 1 ऑक्टोबर या तारखेला किंवा त्याआधी ज्या नागरिकांची अठरा वर्षे पूर्ण होतील, त्यांना आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे.

मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे म्हणाले, निवडणुका पारदर्शक आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असते. १७ ऑक्टोंबर, २०२३ रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये प्रारूप यादी प्रकाशित केली जाईल. मतदारांनी आपले नाव, पत्ता, लिंग, जन्मदिनांक, वय, ओळखपत्र क्रमांक, मतदारसंघ इ. तपशील मतदार यादीत तपासून ते अचूक आहेत का याची खात्री करणे आवश्यक आहे. १७ ऑक्टोंबर ते ३० नोव्हेंबर २०२३ हा कालावधी मतदार नोंदणीचा तसेच नावासंबंधी काही हरकती असल्यास हरकती घेण्याचा आहे. एखाद्या मतदारसंघातील एखादा मतदार, यादीत दिलेल्या पत्त्यावर राहत नसेल, तर अशा नावाबद्दल त्याच मतदारसंघातील अन्य मतदार आक्षेप घेऊ शकतो. त्यामध्ये जर तथ्य आढळून आले तर पडताळणी करून संबंधित मतदाराच्या नावाची वगळणी केली जाते. मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण होण्यासाठी अशा अपात्र मतदारांची वगळणीही महत्त्वाची असते.महिला आणि दिव्यांग,वंचित घटकांसाठी, तृतीयपंथी नागरिक, देह व्यवसाय करणाऱ्या महिला, आणि घर नसलेले भटक्या व विमुक्त जमातीचे नागरिक यांच्या नाव नोंदणीसाठी राज्यभर विशेष शिबिरे घेतली जाणार आहेत.तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, नेहरू युवा केंद्र संघटन, भारत स्काऊट यांच्या सहकार्याने राज्यभर मतदार नोंदणीची शिबिरे राबवण्यात येणार आहेत.मतदार नोंदणी, नाव वगळणी, तपशिलातील दुरुस्त्या या सुविधा https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

राज्यात  सध्या वयोगटनिहाय अंदाजे  असलेली मतदार संख्या  आणि प्रत्यक्षात दिनांक ३० एप्रिल २०२३ पर्यत नोंद असलेले एकूण मतदार  नोंदणी केलेली संख्या पुढीलप्रमाणे आहे.

१८ ते १९ वयोगटातील  ४२,९८,७५६ असून प्रत्यक्ष नोंद ७९,९२,२१०,

२० ते २९ वयोगटातील २,२८,५४,६९३ प्रत्यक्ष नोंद १,६४,०५,१८१,

३०-३९ वयोगटातील मतदार २,१५,६०,६४३ प्रत्यक्ष नोंद २,०५,४४,४८०,

४० ते ४९ वयोगटातील मतदार १,७३,७४,०१० प्रत्यक्ष १,९८,४०,२४३

५० ते ५९ वयोगटातील मतदार १,३०,०२,२१९ प्रत्यक्ष १,४८,१७,६९१

६० ते ६९ वयोगटातील मतदार ८२,०५,५९३ प्रत्यक्ष नोंद ९५,८९,५३१

७० ते ७९ वयोगटातील मतदार ४९,१९,०३५ प्रत्यक्ष नोंद ५३,२१,६२८

८० वर्ष व त्यापेक्षा अधिक वयोगटातील मतदार १८,४०,२६६  प्रत्यक्ष नोंद २९,८४,०९८

वरील सर्व वयोगटातील एकूण मतदार ९,४०,५५,२१७ असून दिनांक ३० एप्रिल २०२३ पर्यत नोंद असलेले एकूण मतदार ९,०३,०२,०६२ इतक्या मतदारांची नोंद झालेली आहे. नव्याने होणाऱ्या या पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये मतदार वाढ अपेक्षित आहे.

******

संध्या गरवारे/विसंअ/

भांडुपच्या सर्वांगीण विकासाला चालना – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दि. २० :- राज्य शासनाने मुंबईचा कायापालट करून स्वच्छ, सुंदर मुंबई करण्याचे अभियान हाती घेतले आहे. यामध्ये मुंबई शहरासह उपनगरांतील पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर भर देण्यात येत आहे. या माध्यमातून भांडुपच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यात येईल व त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

भांडुप येथील नवजीवन शिक्षण संस्थेच्या प्रांगणात शिक्षणमहर्षी रामचंद्र सावंत यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त पुतळ्याचे अनावरण व डॉ.दीपक सावंत लिखित “गुलदस्ता” या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नवजीवन संस्थेचे सरचिटणीस डॉ दीपक सावंत, संस्थेचे अध्यक्ष ऍड दीपक साळवी, माजी आमदार श्याम सावंत, अशोक पाटील, अनिला सावंत यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी पहिल्या टप्प्यात ४५० रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येत असून लवकरच सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येईल. मुंबईतील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यावरही विशेष भर देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, मुंबईत सुरू असलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना चालना देण्यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्यात येणार आहे. म्हाडा एमएमआरडीए, सिडको, मुंबई महापालिका, महाप्रित यासारख्या शासकीय संस्थांच्या माध्यमातून बंद पडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना चालना देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. भांडुप आणि परिसरातील पुनर्विकासाचे प्रकल्प, रस्ते, नालेसफाई तसेच सुशोभीकरणाला प्राधान्य देण्यात येईल. तसेच या भागातील नागरिकांसाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु  करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले. विक्रोळी येथे 500 बेडचे सुसज्ज रुग्णालय उभारण्यास मंजुरी दिली असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, “स्व. प्राचार्य सावंत यांनी लावलेल्या नवजीवन संस्थेचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे कार्य अतिशय उल्लेखनीय असेच आहे. शिक्षण हे आपल्या परिवर्तनाचे प्रमुख साधन असून प्रत्येकाने आपली क्षमता, कुवत ताकद ओळखून कार्य करावे. प्रत्येक जण कर्माने मोठा असतो तेव्हा प्रत्येकाने चांगले कर्म करण्यावर भर द्यावा”.

डॉ. दीपक सावंत यांनी कोरोना काळात विविध वृत्तपत्राच्या माध्यमातून केलेले स्तंभलेखन पुस्तक रूपाने प्रकाशित केले आहे.  डॉ. सावंत यांचे राज्याच्या कुपोषण निर्मूलनातील योगदान उल्लेखनीय आहे. हे लक्षत घेऊन त्यांची राज्याच्या कुपोषण निर्मूलन टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.

डॉ. दीपक सावंत यांनी प्रास्ताविकामध्ये दिवंगत रामचंद्र सावंत यांच्या आठवणींना उजाळा दिला. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कार्यक्रमास भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

00000

मनीषा पिंगळे/विसंअ/

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या योग तज्ज्ञ सानिका बाम यांची मुलाखत

मुंबई, दि. 20 : आंतरराष्ट्रीय योग दिवस आणि आंतरराष्ट्रीय संगीत दिवस हे दरवर्षी 21 जून रोजी जगभरात साजरे केले जातात. माणसाला तणावमुक्त राहण्यासाठी योग आणि संगीत खूप फायदेशीर ठरते. या दिनानिमित्त योग तज्ज्ञ सानिका बाम यांची विशेष मुलाखत ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात प्रसारित होणार आहे.

योग तज्ज्ञ सानिका बाम यांनी योग दिनाचा मुख्य उद्देश, योगाचे प्रकार, संगीत थेरपी अशा महत्त्वपूर्ण विषयावर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून सविस्तर माहिती दिली आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत बुधवार, दि. 21 जून  2023 रोजी सायं 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येईल. निवेदक रिताली तपासे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक  पुढीलप्रमाणे –

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

हुतात्मा चंद्रशेखर आजाद यांच्या जन्मस्थळाला मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट

मुंबई, दि. 20 : सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रशेखर आजाद नगर (भापरा) या हुतात्मा चंद्रशेखर आजाद यांच्या मध्य प्रदेशातील जन्मस्थळाला भेट दिली. “भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात ब्रिटिशांविरुद्ध तरुणांना एकत्र करुन क्रांतिकारक लढा देणाऱ्या आणि हौतात्म्य पत्करणाऱ्या चंद्रशेखर आजाद यांच्या स्वप्नातील सुराज्य साकारण्याची जबाबदारी आता आपली सर्वांची आहे”, अशा भावना यावेळी श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.

मंत्री श्री. मुनगंटीवार सध्या मध्य प्रदेश राज्याच्या दौऱ्यावर आहेत.  या दौऱ्यात त्यांनी अलिरजपूर जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागातील भापरा (चंद्रशेखर आजाद नगर) येथील  हुतात्मा चंद्रशेखर आजाद यांच्या जन्मस्थळाला स्थानिक लोकप्रतिनिधी-पदाधिकारी यांच्यासह सोमवारी भेट दिली. चंद्रशेखर आजाद यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर त्यांनी या स्मारकात असलेल्या चंद्रशेखर आजाद यांच्या जीवनावरील चित्र व छायाचित्र प्रदर्शनला भेट दिली.

हुतात्मा चंद्रशेखर आजाद यांच्या जन्मस्थळ स्मारकाच्या या भेटीच्या वेळी मध्यप्रदेश वनविकास महामंडळाचे अध्यक्ष माधोसिंग डावर यांच्यासह अलिराजपूर जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

000

दीपक चव्हाण/विसंअ/

राज्यात जानेवारी ते मे २०२३ अखेर ८८ हजार १०८ उमेदवारांना रोजगार – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि. २० : कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांमध्ये  जानेवारी ते ३१ मे २०२३ अखेर ८८ हजार १०८ नोकरीइच्छुक उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. महारोजगार मेळावे, महास्वयंम वेबपोर्टल आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरीइच्छुक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

मंत्री श्री. लोढा म्हणाले की, बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहितीसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. नोकरीइच्छुक उमेदवारांनी या वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.

विभागामार्फत राज्यात ऑनलाईन व ऑफलाईन रोजगार १०४ रोजगार मेऴाव्यांचे  चांगल्या पद्धतीने आयोजन करता येत असून उद्योजकांसह नोकरीइच्छुक उमेदवारांचा मेऴाव्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे,तसेच ऑनलाईन व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशनही जानेवारी ते ३१ मे २०२३ अखेर २८८ समुदेशन सत्र आयोजित केले असून यामध्ये ८४ हजार ८९० उमेदवारांनी या सत्रांचा लाभ घेतला आहे अशी माहिती मंत्री श्री. लोढा यांनी दिली.

नोंदणीकृत उद्योगांमध्ये नोकरीची संधी

विभागाकडे तसेच महास्वयंम वेबपोर्टलवर आतापर्यंत १ लाख ४ हजार ६९५ इतक्या सार्वजनिक व खाजगी उद्योजकांनी नोंदणी केली आहे. यापैकी अनेक उद्योजक आवश्यकतेनुसार त्यांच्याकडील रिक्त पदांची भरती महास्वयम् वेबपोर्टल तसेच कौशल्य विकास विभागाचे ऑनलाईन मेळावे आदी उपक्रमांमधून वेळोवेळी करतात. त्यामुळे नोकरीइच्छुक उमेदवारांना कौशल्य विकास विभागाच्या उपक्रमांमधून नोकरी मिळविण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, असे मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.

मंत्री श्री. लोढा म्हणाले की, माहे  जानेवारी ते ३१ मे २०२३ अखेर विभागाकडे ६१ लाख ०६ हजार ०५८ इतक्या नोकरीइच्छुक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यात मुंबई विभागात १० लाख ३७ हजार ७४७, नाशिक विभागात ९ लाख ४७ हजार ७८६, अमरावती विभागात ६ लाख ३५ हजार ९२०,औरंगाबाद विभागात १२ लाख ०५ हजार ६८७, नागपूर विभागात  ८ लाख ५१ हजार ३०१ पुणे विभागात १४ लाख २७ हजार ६१७ बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली.

माहे जानेवारी ते  ३१ मे २०२३ अखेर कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे यात मुंबई विभागात २३ हजार ६३४, नाशिक विभागात १४ हजार २११, अमरावती विभागात ३ हजार ३६७,औरंगाबाद विभागात १७ हजार ४५१, नागपूर विभागात  १ हजार १६५ ,पुणे विभागात २८ हजार २८० बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले.

नोकरीइच्छुक उमेदवारांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन मंत्री श्री. लोढा यांनी केले आहे.

०००

संध्या गरवारे/विसंअ/

खरीप हंगामात पेरणीसाठी शेतकऱ्यांना उपयुक्त मार्गदर्शन करा – कृषिमंत्री अब्दुल सत्तार

मुंबई, दि. 20 :- “पावसाचे आगमन येत्या काही दिवसांत होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे या खरीप हंगामात पीकपेरणी नियोजनाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना कृषी विभागाने उपयुक्त सल्ला द्यावा आणि मार्गदर्शन करावे. तसेच, खते, बियाणे आणि कीटकनाशके त्यांना योग्य दरात आणि वेळेवर मिळतील, यासाठीची कार्यवाही करावी, तसेच, खते, बियाणे, कीटकनाशके विक्रीत काळाबाजार करणारे आणि बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करा”, असे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.

कृषिमंत्री श्री. सत्तार यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यातील वरिष्ठ कृषी अधिकारी, राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांचे कुलगुरु यांची पाऊस आणि पेरणीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांसाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुपकुमार, कृषी आयुक्त सुनील चव्हाण हेही या बैठकीस दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

मंत्री श्री. सत्तार म्हणाले की, शेतकऱ्यांना पेरणीपूर्व योग्य पीक पाणी सल्ला देणे गरजेचे आहे.  हवामान विभागातील तज्ज्ञांच्या सल्ल्याने कृषी विभागाने यासंदर्भातील सूचना, मार्गदर्शन शेतकऱ्यांना वेळोवेळी करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर, वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांपासून अगदी गावपातळीवरील विभागाच्या अधिकारी-कर्मचारी यांनी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना पीकपेरणी संदर्भातील माहिती, पावसाला विलंब झाल्यास घ्यावयाची काळजी, विशिष्ट हवामान पद्धतीत कोणते पीक घ्यावे, याबाबतचे मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. शेतकरी हा राज्याचा महत्त्वाचा घटक आहे. शेतकरी संकटात येणार नाही, यासाठी आतापासूनच योग्य ती पूर्वतयारी आणि नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

“सध्या राज्याच्या काही भागात पेरणी झाली आहे. जून महिना अखेरीस पाऊस येईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे पाऊस आल्याशिवाय पेरणीची घाई शेतकऱ्यांनी करु नये, यासाठी कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठांच्या शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवावी”, अशा सूचनाही मंत्री श्री. सत्तार यांनी दिल्या.

“सध्या शेतकरी वर्ग पेरणीसाठी बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करण्यात व्यस्त आहे. अशावेळी त्यांची फसवणूक होणार नाही, याची काळजी कृषी विभागाने घ्यावी. जिल्हास्तरावरील सनियंत्रण समित्यांनी याबाबत वेळोवेळी आढावा घ्यावा. चुकीचे काम करुन शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर कडक कार्यवाही करावी, असे निर्देशही मंत्री श्री. सत्तार यांनी दिले. बोगस बियाणे, खते आणि कीटकनाशके विक्री करणाऱ्यांवर कडक कार्यवाही संदर्भात राज्यासाठी नवीन कायदा करण्याचा विचार सुरु आहे. देशात इतर राज्यांनी असा कायदा केला असेल तर त्याचाही निश्चितपणे अभ्यास करुन आपल्या राज्याचा कायदा अधिक कडक असेल”, असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्या आणि त्यांचे धागेदोरे शोधून संबंधितांवर कडक कार्यवाहीच्या सूचना त्यांनी विभागाला दिल्या.

यावेळी अतिरिक्त मुख्य सचिव श्री. अनुपकुमार, कृषी आयुक्त श्री. चव्हाण, विविध विद्यापीठांच्या कुलगुरुंनीही त्यांचे म्हणणे मांडले.

0000

दीपक चव्हाण/विसंअ/

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांचा दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांबाबत थेट संवाद

0
छत्रपती संभाजीनगर, दि.७, (विमाका) :- छत्रपती संभाजीनगर विभागातील दिव्यांग यांच्या प्रलंबित अडचणी सोडविण्यासाठी संबंधित जिल्हा प्रशासनाने आवश्यक उपाययोजना करावी, दिव्यांगांच्या अडचणी सोडविण्याला सर्वोच्च प्राधान्य...

केंद्रीय मंत्री डॉ.वीरेंद्र कुमार यांनी साधला जीवन विकास प्रतिष्ठानमधील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद

0
छत्रपती संभाजीनगर, दि.7, (विमाका) :- केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी आज येथील जीवन विकास प्रतिष्ठानला भेट देऊन ज्येष्ठ नागरिकांशी...

१६ वा वित्त आयोग ८ ते ९ मे रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर

0
मुंबई,दि.७ : सोळाव्या वित्त आयोगाचा दोन दिवसीय महाराष्ट्र दौरा   ८ व ९ मे , २०२५ रोजी  नियोजित आहे. आयोगाचे अध्यक्ष अरविंद पनगरिया यांच्या सह...

राज्यात १६ ठिकाणी सिक्युरिटी मॉक ड्रिल

0
मुंबई, दि. 7: जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानदरम्यान वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना बुधवार, दि. 7 मे रोजी विविध...

विरार-डहाणू रेल्वे चौपदरीकरणातील बाधितांना सानुग्रह अनुदान द्यावे  – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई, दि. ७ : विरार – डहाणू रोड रेल्वे चौपदरीकरण व रेल्वे कारशेड बांधण्यासाठी प्रकल्पामधील सर्व्हे न. २१६ आसनगाव येथील कुटुंबे बाधित होत आहेत....