मंगळवार, जुलै 15, 2025
Home Blog Page 1167

मृद व जलसंधारण विभागांतील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अभियंत्यांचा गौरव करणार – मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

मुंबई दि. 14 : सार्वजनिक बांधकाम व जलसंपदा विभागांमार्फत अभियंत्यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल दरवर्षी पुरस्कार देण्याची परंपरा आहे. त्याच धर्तीवर आता मृद व जलसंधारण विभागांतील उल्लेखनीय कार्य केलेल्या अभियंत्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली.

भारतरत्न, सर विश्वेश्वरय्या यांचा 15 सप्टेंबर हा जन्मदिवस दरवर्षी “अभियंता दिन” म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने मृद व जलसंधारण विभागांतर्गत कार्यरत व उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अभियंत्यांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्याचा शासनाने निर्णय घेतला असून याबाबतचे धोरण लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही मंत्री श्री. राठोड यांनी सांगितले.

मंत्री श्री. राठोड म्हणाले की, मृद व जलसंधारण विभागांतर्गत साखळी सिमेंट नाला बांध, नाला खोलीकरण व रूंदीकरण करणे, जुन्या जलसंरक्षणांचे पुनर्जीवन करणे, अस्तित्वातील लघु पाटबंधारे संरचनांची (केटी वेअर/साठवण बंधारा) यांची दुरूस्ती करणे, पाझर तलाव, लघु सिंचन तलाव दुरूस्ती व नुतनीकरण व क्षमता पुनर्स्थापित करणे, पाणलोट विकासाची कामे करण्यात येतात. सदर कामांची/संरचनांची संकल्पना तयार करून व इतर उपकरणांचा/संगणकांचा वापर करून संकल्पचित्रे व कामांचे सविस्तर आराखडे बनविताना अभियंत्यांचे कौशल्य पणाला लागते व त्यामुळे अशा अभियत्यांची सेवा समाजपयोगी ठरते. सबब अशा तांत्रिक संवर्गातील अभियंत्यांचे प्रशासकीय व तांत्रिक कौशल्य विचारात घेऊन त्यांचा वैयक्तिक पुरस्कार देऊन गौरव करणे न्यायोचीत ठरते

मृद व जलसंधारण विभागांतर्गत कार्यरत व उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अभियंत्यांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्याचा शासनाने निर्णय घेतला असून याबाबतचे धोरण लवकरच जाहीर करण्यात येईल असेही मंत्री श्री. राठोड यांनी सांगितले.

000000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

‘अभियंता दिनानिमित्त’ उद्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता, कर्मचाऱ्यांचा गौरव

मुंबई, दि. १४ : अभियंता दिनानिमित्त राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे विभागातील अभियंता आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव सोहळा उद्या शुक्रवार १५ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता षण्मुखानंद सभागृह (माटुंगा, मुंबई) येथे आयोजित करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अभियंता व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येईल. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (सार्वजनिक उपक्रम वगळून) उपस्थित राहतील. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा पाटणकर- म्हैसकर यांची प्रमुख उपस्थिती राहील.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) सदाशिव साळुंखे, सचिव (इमारती) संजय दशपुते, मुं. म. प्र. वि. प्रा. चे सचिव सुनील वांढेकर, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे सचिव खंडेराव पाटील, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, सुधाकर मुरादे यांची विशेष उपस्थिती राहील, असे सार्वजनिक बांधकाम, मुंबई मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रमोद बनगोसावी, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता रणजित हांडे यांनी कळविले आहे.

०००००

गोपाळ साळुंखे/ससं/

 

नागरिकांच्या समस्यांच्या अनुषंगाने गणेशोत्सवानंतर क्षेत्रीय स्तरावर बैठका घ्याव्यात – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे, दि. 14: पुणे शहरातील नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने गणेशोत्सव कालावधीनंतर क्षेत्रीय स्तरावर अधिकाऱ्यांच्या बैठका आयोजित कराव्यात तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन उपाययोजना कराव्यात, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

कोथरूड आणि शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील समस्या व विकासकामांचा आढावा पालकमंत्री श्री. पाटील यांनी शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत घेतला. यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, मनपा आयुक्त विक्रमकुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता अनिरुद्ध पावसकर यांच्यासह महानगरपालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी व प्रभाग कार्यालयांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, नागरिकांच्या पाणीपुरवठा, स्वच्छता व कचरा वाहतूक, रस्ते, सांडपाणी (ड्रेनेज) वाहिन्या सुस्थितीत असणे या मूलभूत अपेक्षा असतात. त्याची वेळीच दखल घेत महापालिका प्रशासनाने कार्यवाही करावी. पाणीपुरवठ्यातील समस्या कायमस्वरुपी सोडविण्याच्यादृष्टीने समान पाणीपुरवठा योजनेची कामे तसेच पाण्याच्या टाक्यांची कामे गतीने पूर्ण करावीत. रस्त्यावरील खड्डे भरण्याची कामांचे योग्य संनियंत्रण करावे, असेही ते म्हणाले.

मतदार संघातील समस्यांच्या अनुषंगाने आमदार श्री. शिरोळे यांनी माहिती देऊन त्या त्वरित दूर करण्यात याव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली.

****

महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट- क संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीचा निकाल जाहीर

मुंबई, दि. १४ : महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट- क सेवा (मुख्य) परीक्षा – २०२२ लिपिक – टंकलेखक (मराठी /इंग्रजी) व कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. तो आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा – २०२२, मधील लिपिक टंकलेखक (मराठी / इंग्रजी) व कर सहायक या संवर्गातून टंकलेखन कौशल्य चाचणीकरिता पात्र ठरलेल्या विज्ञापित पदसंख्येच्या तीन पट उमेदवारांची यादी अनुक्रमे दिनांक ०३ मे २०२३ व दिनांक १८ मे, २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. या उमेदवारांची टंकलेखन कौशल्य चाचणी आयोगामार्फत दिनांक २४ व २५ जुलै, २०२३ रोजी घेण्यात आली होती. या टंकलेखन कौशल्य चाचणीचा संवर्गनिहाय निकाल आज १४ सप्टेंबर, २०२३ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

00000

राजू धोत्रे/विसंअ/

नवीन आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालयांना मंजुरीसह श्रेणीवर्धन व पदभरतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. १४ :- राज्यातील वरुड, मोर्शी, अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी, तुमसर, पुसद, चंदगड, गडहिंग्लज, आजरा, वसमत, गंगापूर, खुलताबाद, औंढा नागनाथ, अकोले, संगमनेर, सुरगाणा, शिरूर, आंबेगाव, मंचर, बारामती, खेड, मोहोळ, अहमदनगर आदी तालुक्यातील नवीन प्राथमिक तसेच उप आरोग्य केंद्रे, उप जिल्हा रुग्णालयांना मंजुरी देण्याबरोबरच, रुग्णालयांचे श्रेणीवर्धन, पदभरतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात यावी. रुग्णालयांना वैद्यकीय चाचणी आणि अद्ययावत उपचार यंत्रणा उपलब्ध करावी. औषधांचा पुरवठा नियमित सुरु राहील, याची दक्षता घ्यावी. रुग्णांची कुठलीही गैरसोय होणार नाही याची संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी आरोग्य यंत्रणा प्राधान्याने सक्षम करण्यात येत आहे. कोविड संकट काळात आरोग्य यंत्रणेचे महत्व आपल्याला समजले आहे. त्यामुळे आरोग्य सुविधांच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत उपस्थित लोकप्रतिनिधींना दिला.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत विविध कामांना वित्त विभागाची मान्यता व निधी उपलब्ध करण्याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार सर्वश्री यशवंत माने, मनोहर चंद्रिकापुरे, राजू कारेमोरे हे प्रत्यक्ष, तर सतीश चव्हाण, देवेंद्र भुयार, दिलीप मोहिते, डॉ. किरण लहामटे, नितीन पवार, राजेश पाटील, चंद्रकांत नवघरे हे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते. यावेळी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष शर्मा, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, आरोग्य सेवा आयुक्त धीरजकुमार, तसेच संबंधित जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून नवीन उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये सुरू करण्याची मागणी येत आहे. अस्तित्वात असलेल्या शासकीय रुग्णालयांमध्ये खाटांची संख्या वाढवून त्यांचे श्रेणीवर्धन करण्याची मागणीही होत आहे. या पार्श्वभूमीवर नवीन उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णालय यांना मान्यता देणे, खाटांची संख्या वाढवून श्रेणीवर्धन करणे याबाबत सर्वंकष निकष ठरवण्यात यावेत. निकष ठरवताना २०२१ ची वाढीव लोकसंख्या आणि आरोग्य केंद्रांमधील अंतर लक्षात घेऊन आरोग्य विभागाचा बृहत आराखडा मंत्रिमंडळासमोर आणावा. या सुविधा देतांना आदिवासी भाग, आकांक्षित तालुक्यांचा प्राधान्याने विचार करावा. त्यांच्यासाठी वेगळे निकष ठरवावेत, अशा सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

रुग्णालयांच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण होण्यापूर्वी पदनिर्मितीची प्रक्रिया सुरू करण्यात यावी. ज्याठिकाणी रुग्णालयांचे बांधकाम पूर्ण झाले आहे, अशा ठिकाणी फर्निचर देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी देण्यात येईल. त्यानुसार सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील. आरोग्य सेवा अत्यावश्यक सेवा असल्याने या विभागातील डॉक्टर, नर्सेस, अधिकारी, कर्मचारी  सेवानिवृत्त होण्यापूर्वी, त्यांच्या पदांसाठी किमान ३ महिने आधी भरती प्रक्रिया सुरू करावी, असे निर्देशही त्यांनी दिले. लोकप्रतिनिधींची मागणी विचारात घेऊन आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रांची बांधकामे सध्याच्या निकषांच्या आधारे तातडीने पूर्ण करावीत. यासाठी १५व्या वित्त आयोगातील निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिले.

शिरूर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय पाबळ, मलठण, आंबेगाव तालुक्यातील तळेघर ग्रामीण रुग्णालयास मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येईल. राजणी (ता. आंबेगाव), करंदी (ता. शिरूर) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केले जाईल. पिंपरखेडा, कारेगाव व पिंपळे खालसा (ता. शिरूर) येथे नवीन उपकेद्र मंजूर करण्यात येईल. मंचर उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आली. खेड येथे ट्रामा केअर युनिट निर्माण करणे, चाकण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करणे व डायलिसीस सेंटर सुरू करण्यासही मंजुरी देण्यात आली. निरावागज (ता. बारामती)  व जेरवाडी (ता. खेड) येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्याबाबत बैठकीत निर्देश देण्यात आले.

मोहोळ (जि. सोलापूर) येथे उपजिल्हा रूग्णालय मंजूर करणे, अकोले तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र मंजुरी, बोटा (ता. संगमनेर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे व अकोले ग्रामीण रूग्णालयाचे श्रेणीवर्धन करणे, सुरगाणा (जि. नाशिक) व पारनेर (जि. अहमदनगर) येथील ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन, ढवळपुरी (ता. पारनेर) येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणे, गंगापूर (जि. औरंगाबाद) येथील ट्रॉमा केअर युनिटचे अपूर्ण बांधकाम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिले.

खुलताबाद (जि. औरंगाबाद), चंदगड (जि. कोल्हापूर), उपजिल्हा रुग्णालय मोर्शी व वरूड (जि. अमरावती) येथे नवीन ट्रॉमा केअर युनिट सुरू करणे, वसमत (जि. हिंगोली) येथील स्त्री रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करणे, साळना (ता. औंढा नागनाथ) येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र निर्माण करणे, बाभूळगाव (ता. वसमत) येथील आरोग्य केंद्राच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देणे, वरूड (जि. अमरावती) येथे १०० खाटांचे महिला व शिशु रुग्णालयास मान्यता देणे, टेंभूरखेडा (ता. वरूड), पिंपळखुटा व रिद्धपूर (ता. मोशी) येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करणे, खेड व लोणी (जि. अमरावती) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करणे, मोरगाव अर्जुनी व सडक अर्जुनी (जि. गोंदिया) ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करणे, तुमसर (जि. भंडारा) येथील उपजिल्हा रुग्णालयाचे व मोहाडी ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करणे, पुसद (जि. यवतमाळ) येथे नवीन स्त्री रुग्णालय मंजूर करणेबाबत कार्यवाही करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिल्या आहेत.

0000

निलेश तायडे/विसंअ/

“स्त्रीवादी परराष्ट्र धोरण आणि स्त्रियांवरील अत्याचार व हिंसाचार प्रतिबंधासाठी धोरण” या विषयावर एक दिवसीय परिसंवाद

मुंबई, दि. १४ : विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पुढाकाराने उद्या शुक्रवार १५ सप्टेंबर, २०२३ रोजी दुपारी २ वाजता, कक्ष क्रमांक १४५, पहिला मजला, विधानभवन, मुंबई येथे “स्त्रीवादी परराष्ट्र धोरण आणि स्त्रियांवरील अत्याचार व हिंसाचार प्रतिबंधासाठी धोरण” या विषयावर एक दिवसीय परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.

या परिसंवादास प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिसंवादाचे अध्यक्ष म्हणून विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर उपस्थित राहणार आहेत. मेक्सिको, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, नेदरलॅण्डस्, जपान, रशिया, फ्रान्स या देशांचे मुंबईतील महावाणिज्यदूत देखील परिसंवादात सहभागी होणार आहेत.

0000

 

 

 

 

राज्यातील सर्व आयटीआयमध्ये ‘पीएम स्कील रन’चे आयोजन – मंत्री मंगल प्रभात लोढा

             मुंबई, दि. 14 : राज्यातील युवक -युवतींमध्ये कौशल्य विकासाबाबत जनजागृती व्हावी यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर रोजी सकाळी ७ ते ८ या वेळेत राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थाद्वारे (आयटीआय) ‘पीएम स्कील रन’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात सर्वांना सहभागी व्हावे, असे आवाहन कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नावीन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले आहे.

मंत्री श्री.लोढा म्हणाले की, १७ सप्टेंबर रोजी सकाळी ७ ते ८ या वेळेत हा उपक्रम राबविण्यात येईल. प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विजेत्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जवळच्या आयटीआयमध्ये संपर्क साधता येईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य विकास विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. कौशल्य विकास विभाग कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी सर्व शासकीय व खासगी आयटीआयचे बळकटीकरण करून विद्यार्थ्यांना उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण देण्यासाठी जागतिक दर्जाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर आहे.

आयटीआयच्या सर्व उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे आयुक्त डॉ.रामास्वामी एन, व्यवसाय  शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी यांनी केले आहे.

0000

संध्या गरवारे/विसंअ/

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये कर्ज योजनेंतर्गत ४ कोटी रक्कम जमा – मंत्री अब्दुल सत्तार

मुंबई, ‍‍दि. १४ : केंद्र शासनाकडून मुदत कर्ज योजनेअंतर्गत १६ कोटी रुपये निधी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळास उपलब्ध झाला आहे. महामंडळास उपलब्ध झालेल्या १६ कोटी निधीपैकी आज  ४.०२  कोटी रुपये ऑनलाईन पद्धतीने अर्जदार व विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले असल्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

मंत्री श्री. सत्तार म्हणाले की, आज वितरीत करण्यात आलेल्या ४.०२ कोटी रकमेमधील मुदत कर्ज योजनेंतर्गत व्यवसायासाठी ८१ लाभार्थ्यांना २.३५ कोटी रुपये इतकी रक्कम वितरीत करण्यात आली आहे व शैक्षणिक कर्ज योजनेतंर्गत १६७ विद्यार्थ्यांना १.६७ कोटी रुपये रक्कम वितरीत करण्यात आली आहे. केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेंतर्गत प्राप्त झालेला १६ कोटी निधी जलद गतीने अल्पसंख्याक समाजातील अर्जदार व विद्यार्थी यांना वितरीत करण्याबाबतच्या सूचना महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक यांना मंत्री श्री. सत्तार यांनी यावेळी दिल्या.

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ हे राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास एवम वित्त निगम, नवी दिल्ली (एनएमडीएफसी) यांची राज्य वाहिनीकृत यंत्रणा म्हणून महाराष्ट्रात कार्यरत आहे. एनएमडीएफसी मार्फत कर्ज स्वरुपात प्राप्त होणाऱ्या निधीतून मुदत कर्ज योजना, सूक्ष्म पतपुरवठा योजना, डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजना या योजनांची अंमलबजावणी महामंडळामार्फत राज्यामध्ये करण्यात येते.

*****

शैलजा पाटील/विसंअ/

‘जैन धर्म हितेशी’ सन्मानाने राज्यपाल रमेश बैस सन्मानित

मुंबई, दि. 14 : राज्यपाल रमेश बैस यांनी बुधवारी (दि. १३) श्रीमद राजचंद्र मिशन धरमपूर या संस्थेतर्फे आयोजित ‘पर्युषण महापर्व – २०२३’ कार्यक्रमाला उपस्थित राहून सत्संग श्रवण केले. तसेच उपस्थितांशी संवाद साधला.

यावेळी मिशनचे गुरुदेवश्री राकेशजी यांच्या हस्ते राज्यपालांना झारखंड येथील पवित्र जैन तीर्थस्थळ ‘श्री सम्मेत शिखरजी’ पर्यटन स्थळ होण्यापासून वाचवल्याबद्दल ‘जैन धर्म हितेशी’ उपाधी देऊन सन्मानित करण्यात आले.

जगातील काही लोक ऐश्वर्याने जगत असतील आणि बहुसंख्य लोक गरिबीत जीवन कंठत असतील, तर कोणतीही व्यक्ती शांततेत जगू शकणार नाही, असे सांगून आपल्या कमाईचा एक दशमांश भाग, तरी सधन व्यक्तींनी जगातील दुःखी व गरीब लोकांच्या सेवेसाठी ठेवला पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले.

‘पर्युषण’ हा आंतरिक शुद्धीचा सण आहे. हा सण मनुष्य तसेच प्राणीमात्र अशा प्रत्येकाच्या जीवनाला स्पर्श करणारा आहे. त्यामुळे पर्युषण हा सृष्टीचा सण आहे, असे सांगताना राज्यपालांनी पर्युषणानिमित्त केल्या जाणाऱ्या क्षमायाचनेच्या गुणाचे महत्व सांगितले.

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. राज्याच्या प्रत्येक भागात वेळोवेळी संतांचे अवतरण झाले.  महात्मा गांधी यांच्यावर ज्यांच्या विचारांचा प्रभाव होता, असे संत श्रीमद राजचंद्र यांनी देखील मुंबईत  काही काळ व्यतीत केला होता. श्रीमद राजचंद्र मिशनचे अध्यात्मिक गुरु राकेशजी हे श्रीमद राजचंद्र यांचे कार्य पुढे नेत आहेत, असे राज्यपालांनी सांगितले.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते ‘डिलिंग विथ एंगर इफेक्टिव्हली’ व ‘रिलिजिंग एंगर मेडिटेशन’ या क्रोध नियंत्रण या विषयावरील पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. अध्यात्मिक प्रमुख गुरुदेवश्री राकेश जी यांनी पर्युषण निमित्त प्रवचन केले.

Maharashtra Governor given ‘Jain Hiteshi Award’ by Gurudevshri Rakeshji

 

Maharashtra Governor Ramesh Bais attended the Satsang discourse by revered Gurudevshri RakeshJi, Spiritual head of the Shrimad Rajchandra Mission Dharampur on the occasion of ‘Paryushan Mahaparva’ in Mumbai on Wed (13 Sept).

Pujya Gurudevji conferred the title of ‘Jain Dharma Hiteshi’ on Maharashtra Governor Ramesh Bais for the latter’s role in preventing the Jain Teertha Sthal of ‘Shri Sammet Shikharji’ from becoming a tourist place.

In his address the Governor complimented the Shrimad Rajchandra Mission for its services to humanity and muted animals. The Governor highlighted the importance of Paryushan Parva for creating harmony in society.

The Governor accompanied by Pujya Gurudevshri released the books ‘Dealing With Anger Effectively’ and ‘Releasing Anger Meditation’.

0000

अभियांत्रिकी महाविद्यालय तंत्रज्ञान विद्यापिठाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे, दि. 14 : अभियांत्रिकी क्षेत्रात नावलौकीक असलेल्या आणि 170 वर्षाची परंपरा असणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालय तंत्रज्ञान विद्यापिठाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

माजी विद्यार्थी नियामक मंडळ अभियांत्रिकी महाविद्यालय तंत्रज्ञान विद्यापीठ पुणे यांच्यावतीने आयोजित अभिमान पुरस्कार वितरण समारंभात श्री. पाटील बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरु  डॉ. सुधीर आगाशे, माजी विद्यार्थी नियामक मंडळाचे अध्यक्ष भरत गीते,  बोर्ड ऑफ गव्हर्नन्सचे अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी, सचिव डॉ. सुजित परदेशी, नियामक मंडळाचे सदस्य, विद्यार्थी आदी उपस्थित होते.

पुरस्कार्थींचे अभिनंदन करून श्री. पाटील  म्हणाले, अभिमान पुरस्कार विजेत्यांचा संस्थेलाही अभिमान  आहे.   विद्यापीठाने केवळ अभियांत्रिकी क्षेत्रातील ज्ञान विद्यार्थ्यांना न देता त्यांनी संस्कारमूल्य जपण्याचेही मार्गदर्शन करावे. देशात नवीन शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी होत असून मातृभाषेतील शिक्षणाला प्राधान्य देण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना विषयाचे ज्ञान चांगल्याप्रकारे होऊन त्यांची संशोधनाची वृत्ती वाढण्यास मदत होईल. तसेच नवीन शैक्षणिक धोरणात व्यवसायभिमूख शिक्षणावर देखील भर देण्यात येत असल्याचे पालकमंत्री म्हणाले.

अभियांत्रिकी महाविद्यालयाला शासनाने स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा दिलेला आहे. त्यानंतर येथे आवश्यकतेनुसार विविध अभ्यासक्रम घेतले जात असून त्याचा विद्यार्थ्यांना चांगला फायदा होत आहे. विद्यापीठाकडे स्पर्धेची भावना असली पाहीजे. तंत्रज्ञान विद्यापीठाचे भारतीय तंत्रज्ञान संस्थेमध्ये रूपांतर करण्यासाठी विद्यापीठाने ज्ञान-तंत्रज्ञानाच्या स्पर्धेत सहभागी होऊन शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करावी. विद्यापीठाचे प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्यात येतील, असेही श्री.पाटील म्हणाले.

श्री. आगाशे म्हणाले, विद्यापीठातील बहुसंख्य विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची कौटुंबिक पार्श्वभूमी नसते. माजी विद्यार्थ्यांनी प्रत्येक सेमिस्टर मध्ये दोन तास लेक्चर दिल्यास विद्यार्थ्यांना त्यांच्या अनुभवाचा चांगला फायदा होईल. विद्यापीठाला जागतिक दर्जा मिळण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी श्री. गीते आणि श्री. चौधरी यांनीही  मनोगत व्यक्त केले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे विद्यापीठाचे माजी विद्यार्थी अशिष अचलेरकर, अरूण कुदळे, विवेक फणशीकर, चेतन धारिया, डॉ. रवी भटकळ व  डॉ. विजय पटेल यांना अभिमान पुरस्काराने पालकमंत्र्यांच्या  हस्ते गौरविण्यात आले.

यावेळी माजी विद्यार्थी नियामक मंडळाच्या पुस्तकाचे प्रकाशनही श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात  आले.

****

ताज्या बातम्या

विद्यार्थी सहाय्य जनजागृती अभियानातून युवकांच्या जीवनाला सकारात्मक दिशा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

0
सांगली, दि. १४, (जिमाका): जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता राबवण्यात येत असलेल्या विद्यार्थी सहाय्य जनजागृती अभियानातून शासकीय संस्थांच्या योजना, स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास, अधिछात्रवृत्ती अशा अनेक...

देशाचा समृद्धीसाठी विद्यार्थ्यांची बौद्धीक क्षमता वाढवावी – राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे

0
नांदेड, दि. १४ : जगात शिक्षणाला अत्यंत महत्त्व आहे, त्यामुळे आपल्या देशाचा सर्वांगिण विकास व  समृद्धीसाठी विद्यापीठे, शाळांनी विद्यार्थ्यांची बौद्धीक क्षमता वाढविण्यावर विशेषत्वाने भर...

प्रकरणांचा तत्काळ निपटारा होण्याच्या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न करा – विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल

0
अमरावती, दि. १४ : विभागीय लोकशाही दिनासाठी प्राप्त अर्जांवर विहित कालमर्यादेत कार्यवाही करुन निपटारा होण्याच्या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. विभागाला प्राप्त होणाऱ्या प्रकरणांच्याबाबत मुद्देनिहाय...

राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची गुंज येथील नॅचरल शुगर युनिटला भेट

0
यवतमाळ, दि.१४ (जिमाका) : राजस्थानचे राज्यपाल महामहिम हरिभाऊ बागडे यांनी महागांव तालुक्यातील गुंज येथील नॅचरल शुगर युनिटला भेट दिली. यावेळी उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार...

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक तयारीचा विभागीय आयुक्तांकडून आढावा

0
छत्रपती संभाजीनगर दि.१४ (विमाका): विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर  यांनी छत्रपती संभाजीनगर विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तयारीचा जिल्हानिहाय आढावा घेतला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत...