मंगळवार, मे 6, 2025
Home Blog Page 1149

राज्यस्तरीय नाट्यगौरव पारितोषिकांचे मंगळवारी वितरण

मुंबई, दि. 10 : महाराष्ट्र राज्य हौशी, हिंदी, संगीत, संस्कृत, बालनाट्य आणि दिव्यांग नाट्य स्पर्धेतील राज्यस्तरीय नाट्यगौरव पारितोषिक सन 2021-22 साठीचे वितरण मंगळवार, दि. 11 जुलै 2023 रोजी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित हा पारितोषिक वितरण समारंभ मंगळवारी सायंकाळी 7 वाजता रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे होणार असून लोकसभा सदस्य राहुल शेवाळे आणि विधानसभा सदस्य सदा सरवणकर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

यानिमित्त 60 व्या महाराष्ट्र राज्य हौशी, हिंदी, संस्कृत नाट्य स्पर्धेतील, 18 व्या बालनाट्य स्पर्धेतील आणि तृतीय दिव्यांग नाट्य स्पर्धेतील प्रथम पारितोषिक विजेत्या नाटकांचा महोत्सवही होणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास  खारगे आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी दिली.

बुधवार, दि. 12 जुलै रोजी दिव्यांग बालनाट्य स्पर्धेतील प्रशांत चव्हाण लिखित आणि भरत मोरे दिग्दर्शित ‘वाचवाल का’? हे नाटक सादर होणार आहे. गुरुवार, दि. 13 जुलै रोजी डॉ. सोमनाथ सोनवलकर लिखित व दिग्दर्शित ‘इन द सेल ऑफ सर्व्हायवल’ हे मराठी नाटक आणि शुक्रवार दि. 14 जुलै रोजी ‘मोक्षदाह’ हे नाटक सादर केले जाणार आहे. रवींद्र नाट्य मंदिर येथेच सायंकाळी 7 वाजता या नाटकांचे सादरीकरण होणार आहे.

00000

दीपक चव्हाण/ससं

महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या पाठीशी खंबीरपणे उभा – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर,दि. ९:  महाराष्ट्र वन विकास महामंडळाने आपल्या पूर्ण क्षमतेने काम करावे. केवळ सरकारी नजरेतून कुठल्याही कामाकडे न बघता वैयक्तिक जबाबदारी म्हणून कामात झोकून द्यावे, महामंडळाचा अध्यक्ष म्हणून मी तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे, अशी ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या (एफडीसीएम) वतीने मंत्री श्री.  मुनगंटीवार यांच्या हस्ते फॉरेस्ट किट बॅग व वाहन वितरण करण्यात आले. यावेळी एफडीसीएमचे व्यवस्थापकीय संचालक विकास गुप्ता, मुख्य व्यवस्थापक (नियोजन) संजीव गौर, महाव्यवस्थापक (व्यवसाय विकास) रवींद्र वानखेडे, नागपूर प्रदेश महाव्यवस्थापक चंद्रशेखर बाला एन., जळगाव उपवनसंरक्षक प्रवीण ए., नागपूर वन प्रकल्प विभागाचे विभागीय व्यवस्थापक आर.आर. बारटक्के यांची प्रमुख उपस्थिती होती.

महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे व विपणन तसेच विक्री प्रतिनिधींच्या प्रेझेंटेशनचे त्यांनी कौतुक केले. ते म्हणाले की, ‘आपले शास्त्र, आयुर्वेदाची परंपरा जगाने मान्य केली आहे. या परंपरेचे संवर्धन करण्यासाठी रोपवाटिका विकसित करा आणि त्याठिकाणी आयुर्वेदिक रोपांची जास्तीत जास्त प्रमाणात लागवड करा. आज ३०० कोटींची उलाढाल उद्या एक हजार कोटींची होईल, हा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करा. काम वाढविताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. प्रस्तावांना लागणारा प्रशासकीय वेळ कमी करण्याची जबाबदारी माझी आहे.’ एफडीसीएमच्या कामामध्ये गती असावी, कुठलाही ताण नसावा,महामंडळांच्या निर्णयांना गती देण्यासाठी मी पूर्ण शक्तीनिशी तुमच्या पाठिशी उभा आहे,’ असा विश्वासही त्यांनी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिला.

हॅपिनेस इंडेक्स वाढतो

जेवढ्या वेगाने प्रस्ताव येतात तेवढ्याच वेगाने ते मंजूर झाले पाहिजे. त्या प्रस्तावांवर निर्णय झाले पाहिजे. गोरेवाडा प्राणी संग्रहालयाचे काम पूर्ण करण्यासाठी माझा आग्रह आहे. काही गोष्टी केवळ पैशांमध्ये मोजता येत नाहीत. गोरेवाडा प्राणीसंग्रहालयात जेव्हा एक कुटुंब एकत्रितपणे फिरण्याचा आनंद घेते, तेव्हा हॅपिनेस इंडेक्स आपोआप वाढतो. आनंदी जीवनाची टक्केवारी वाढविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे, असेही मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले.

जगाला पोसणारे तीनच विभाग

जगाला पोसणारे केवळ तीनच विभाग आहेत. त्यात कृषी, मत्स्य आणि वन विभागाचा समावेश होतो. आणि आपण वन विभागातील जबाबदार व्यक्ती आहोत, याची जाणीव ठेवून काम करण्याची गरज आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

०००

पालकमंत्री गिरीष महाजन यांच्याकडून ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमस्थळाची पाहणी

धुळे, दि. ९ (जिमाका ) : ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत धुळे येथे जिल्हास्तरीय कार्यक्रम सोमवार, १० जुलै, २०२३ रोजी दुपारी १ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थितीत एसआरपीएफ मैदान, धुळे येथे होणार आहे.

या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली असून ग्रामविकास व पंचायतराज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी आज या ठिकाणाची पाहणी केली. यावेळी खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार मंगेश चव्हाण, महापौर प्रतिभाताई चौधरी, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेशवरी एस., जिल्हा पोलीस अधिक्षक संजय बारकुंड, मुख्यमंत्री जन कल्याण कक्षाचे राज्य मुख्य समन्वयक डॉ. अमोल शिंदे, मनपा आयुक्त देविदास टेकाळे, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, मुख्यमंत्र्याचे विशेष कार्यकारी अधिकारी अमित हुक्केरीकर, सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, उपमहापौर वैशाली वराडे, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावडे, परिविक्षाधीन सनदी अधिकारी सत्यम गांधी यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री. महाजन यांनी मुख्य स्टेज, सभा मंडप, लोकप्रतिनिधींची व मान्यवर बैठक व्यवस्था त्याचबरोबर लाभार्थ्यांची बैठक व्यवस्था, सरपंचांची बैठक व्यवस्था, शासकीय विभागांमार्फत लावण्यात येणारे विविध स्टॉल, रोजगार मेळावा, आरोग्य शिबिर जागा, पोलीस बंदोबस्त, वाहतुकीचे नियोजन आदींची पाहणी केली. प्रशासनाने केलेल्या नियोजनाची माहिती जिल्हाधिकारी श्री. शर्मा व पोलीस अधिक्षक श्री. बारकुंड यांचेकडून जाणून घेतल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त केले.

पालकमंत्री श्री. महाजन म्हणाले की, ‘शासन आपल्या दारी’अभियानातंर्गत जिल्हास्तरीय कार्यक्रम यशस्वीपणे पार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन केलेले आहे. कार्यक्रमाच्या दिवशी येणाऱ्या नागरीक, लाभार्थ्यांची गैरसोय होवू नये याची दक्षता घ्यावी. वाहनतळ ते कार्यक्रमस्थळावरील मार्गावर वाहतुकीचे नियोजन व्यवस्थीत करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी यंत्रणेला दिल्यात. तसेच शासन आपल्या दारी या मुख्य कार्यक्रमास जिल्हावासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री. महाजन यांनी यावेळी केले.

‘शासन आपल्या दारी’कार्यक्रमाचा डॉ. अमोल शिंदे यांनी घेतला आढावा

शासन आपल्या दारी अभियानातंर्गत धुळे जिल्हास्तरीय कार्यक्रमाची पूर्वतयारी आढावा बैठक येथील एसआरपी कॅम्प, धुळे येथे आज मुख्यमंत्री जन कल्याण कक्षाचे राज्य मुख्य समन्वयक डॉ. अमोल शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

यावेळी  डॉ. शिंदे म्हणाले की, ‘शासन आपल्या दारी’हा उपक्रम शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी, लाभार्थी आणि स्वयंसेवकांच्या समन्वयातून राज्यात राबविण्यात येत आहे. राज्यात आजपर्यंत विविध जिल्ह्यात शासन आपल्या दारी उपक्रम यशस्वी झाला असून या उपक्रमांस राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. धुळे जिल्ह्यातआज होणाऱ्या कार्यक्रमासाठी प्रत्येक विभागाला दिलेली जबाबदारी योग्यरित्या पार पाडावी. कार्यक्रमासाठी येणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्यांसाठी नाश्ता व पिण्याच्या पाण्याची चोख व्यवस्था करावी. उपस्थित राहणाऱ्या दिव्यांग लाभार्थींची स्वतंत्र्य बैठक तसेच लाभार्थ्यांना कार्यक्रमस्थळी नेण्याची व्यवस्था करावी. मुख्यमंत्री महोदय स्टॉलला भेट देण्याची शक्यता असल्याने त्यासाठी यंत्रणेने सतर्क राहून परिपूर्ण नियोजन करावेत. लाभार्थींना वाटप करण्याच्या वस्तू व्यवस्थित लावाव्यात. स्टॉलवर भेट देणाऱ्या नागरिकांना संपूर्ण योजनेची परिपूर्ण माहिती देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी यंत्रणेला दिल्यात.

या बैठकीस जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

०००

वीर जवान मनोज माळी यांच्यावर शासकीय इतमामात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

धुळे, दि. ९ (जिमाका) : ‘अमर रहे…, अमर रहे… वीर जवान मनोज माळी अमर रहे…’च्या घोषात आज सकाळी वाघाडी, ता. शिरपूर येथे वीर जवान मनोज माळी यांना हजारो नागरिकांनी साश्रूपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप दिला.

भारतीय सैन्य दलात सिक्कीम येथे कार्यरत लान्सनायक मनोज माळी यांना ६ जुलै, २०२३ रोजी सिक्कीम येथे उंच डोंगराळ प्रदेशात कर्तव्य बजावत असतांना त्यांचा अचानक पाय घसरुन थेट ५०० ते ६०० फुट खोल दरीत कोसळून जखमी होऊन वीरमरण प्राप्त झाले. त्यांचे पार्थिव आज सकाळी वाघाडी, ता. शिरपूर येथे आणण्यात आले. त्यानंतर सजविलेल्या वाहनातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यानिमित्त ग्रामस्थांनी अंगणात रांगोळ्या रेखाटल्या होत्या. शालेय विद्यार्थी हातात तिरंगा घेवून ‘अमर रहे…, अमर रहे….. वीर जवान मनोज माळी अमर रहे’सह भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणा देत होते.

वीर जवान मनोज माळी यांचे पार्थिव अंत्यसंस्काराच्या ठिकाणी आल्यानंतर आमदार काशिराम पावरा, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा मेजर डॉ. निलेश पाटील, तहसीलदार महेंद्र माळी, भूपेशभाई पटेल, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ तुषार रंधे, सैनिक कल्याण संघटक रामदास पाटील यांचेसह मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. पोलिस दल आणि सैन्य दलाच्या तुकडीने हवेत गोळीबाराच्या तीन फैरी झाडत मानवंदना दिली. माजी सैनिकांनीही वीर जवानास अभिवादन केले.

वीर जवान माळी यांच्या भावाने मुखाग्नी दिला. आमदार श्री. पावरा व इतरांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी वीर जवान माळी यांचे कुटुंबीय, सैन्य दलाचे अधिकारी, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, नातेवाईक, आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००

विदर्भाच्या विकासाचा ‘टेक ऑफ’ झाला आहे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर,दि.९ :  रस्ते, रेल्वे, विमानतळ विकास यामार्फत विदर्भ लॉजिस्टिक हब म्हणून विकसित होणार आहे. समृद्धी महामार्गामुळे हे शक्य झाले आहे. यासोबतच वैनगंगा-नळगंगा नदी जोड प्रकल्पातून शाश्वत सिंचनाचा पर्याय पुढील काही वर्षात उपलब्ध होणार आहे. विदर्भाच्या सर्वांगिण विकासाचा ‘टेक ऑफ’ झाला आहे. आता विकासाचा आलेख खाली येणार नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक दिवसीय विदर्भ विकास मंथन परिषदेचा समारोप करतांना केले.

विवेक स्पार्क फाऊंडेशन व वेद परिषद यांच्या मार्फत एक दिवसीय विदर्भ विकास मंथनचे आयोजन करण्यात आले होते. कृषी, शिक्षण आणि कौशल्य विकास, पर्यावरण, आरोग्य, उद्योग आणि रोजगार, खाणी आणि खनिजसंपदा, सामाजिक न्याय व सुरक्षा, जलसंधारण, साहित्य आणि संस्कृती विकास या नऊ विषयांवर विदर्भ विकास मंथनचे आयोजन करण्यात आले होते.

या परिषदेतील नऊही विषयावरील चर्चेतील सार ऐकूण घेतल्यानंतर उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यातील तज्ज्ञांच्या महत्वपूर्ण व परिणामकारक सूचनांवर शासन निश्चित विचार करेल. आजच्या विचार मंथनाचा अहवाल शासन दरबारी सादर करावा, असे सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की,  विदर्भाच्या विकासासाठी शाश्वत विकासाचे सूत्र वापरण्यात आले आहे. त्यासाठी काही योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून सिंचन, जलसंधारण, वीज पुरवठा, दळणवळण, उद्योग, कौशल्य विकास या क्षेत्रात कायमस्वरुपी प्रभाव टाकणाऱ्या योजनांना कार्यान्वित करण्यात आल्याचे सांगितले. समृद्धी महामार्गामुळे येणाऱ्या काळात लॉजिस्टिक हब निर्मितीला चालना मिळेल. या महामार्गाच्या जोडीला नागपूरचे नवीन विमानतळ लवकरच तयार होत आहे. मिहान प्रकल्पासाठी गतीशील निर्णय व्हावेत यासाठी नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनाच सहव्यवस्थापकाचे (जॉईंट एमडी) अधिकार बहाल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

जलयुक्त शिवार योजनेमुळे महाराष्ट्रातील भूगर्भातील पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. ही योजना प्रभावीपणे राबविली जाईल. तसेच यापूर्वीच्या चेक डॅम व अन्य जलसाठ्यांचे पुनर्जीवन केले जाईल. पाणी वाटप संस्था व त्यांचे प्रशिक्षण याकडे लक्ष वेधले जाईल. राज्य शासनाने नदी जोड प्रकल्पाअंतर्गत वैनगंगा ते नळगंगा या बहुआयामी प्रकल्पाला पुढील सात वर्षात पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. यातून पूर्व व पश्चिम विदर्भाला शाश्वत जलसाठा व सिंचन क्षमता निर्माण होईल. हा प्रकल्प कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रात शेतकऱ्यांना सिंचनासाठी  दिवसा १२ तास वीज मिळावी यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दमदारपणे राबविली जात आहे. शेतीचे सर्व फिडर सौर ऊर्जेवर करण्यात येणार आहे. या क्षेत्रात कोट्यावधीची गुंतवणूक खाजगी कंपन्यामार्फत होत आहे. शाश्वत ऊर्जानिर्मितीच्या माध्यमातून सिंचन समृद्धी केली जाणार आहे. एकाच ठिकाणी अनेक योजना यशस्वीपणे राबविणाऱ्या नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजने मार्फत गावे समृद्ध करण्याकडे लक्ष वेधले जात असून जागतिक बँकेने या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सहा हजार कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे.

पर्यावरणाच्या संदर्भात जागरुकता व क्षमतावृद्धी या सूत्रावर काम करण्यात येईल. शैक्षणिक सुधारणा करतांना नव्या काळाची पाऊले ओळखून नोकरी देणाऱ्या अभ्यासक्रमांना शिक्षणामध्ये समाविष्ट करण्यात येईल.

आरोग्याच्या संदर्भातील सामान्य माणसांच्या आर्थिक क्षमता लक्षात घेऊन महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून आता कोणत्याही नागरिकांचा ५ लाखापर्यंतचा उपचार मोफत केला जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडीकल कॉलेज उघडण्यात येत असून वैद्यकीय शिक्षणातील व पॅरामेडिकल क्षेत्रातील मनुष्यबळ वाढविण्यात येणार आहे. विदर्भात सिकलसेल, थॅलिसिमीया आजारावरील केंद्र उभारण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमाच्या मंचावर विवेक स्पार्क फाऊंडेशन, वेद परिषद या संस्थेचे देवेंद्र पारेख, सुधीर मेहता, दीपक तामशेट्टीवार, बाळासाहेब चौधरी, महेश पोहणेरकर आदींची उपस्थिती होती. नागपूर व विदर्भातील वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ या एक दिवसीय परिषदेत सहभागी झाले होते. सकाळपासून नऊ विषयांवर तज्ज्ञांच्या समितीने विचारमंथन करुन शासनाने या संदर्भात काय करावे याबाबतचा सूचना तयार केल्या होत्या. उपमुख्यमंत्र्यांपुढे हे मंथन सक्षिप्तपणे सादर करण्यात आले.

०००

पोंभुर्णा तहसील कार्यालय दुरुस्तीसाठी ३० लाख रुपयाची प्रशासकीय मान्यता

चंद्रपूर, दि. ९ : पोंभूर्णा तहसील कार्यालयाच्या देखभाल दुरुस्तीसाठी ३० लाख आणि बोर्डा (ता. चंद्रपूर) येथे नवीन तलाठी कार्यालयासाठी ३० लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता.

जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम सन 2023-24 अंतर्गत शासकीय कार्यालयीन इमारत दुरुस्ती बाब 27-लहान बांधकामे अन्वये, पोंभुर्णा, तहसील कार्यालयाच्या इमारत दुरूस्त करण्यात येणार आहे . त्यासोबतच, शासकीय कार्यालयीन इमारत बांधकाम  बाब 53-मोठी बांधकामे या शिर्षा खाली, बोर्डा येथील तलाठी कार्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. याबाबत या भागातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

०००

जोखीमग्रस्त गावांसाठी शीघ्र प्रतिसाद पथके तत्पर ठेवावी – आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत

पुणे, दि. ९: राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे, या पावसाळ्यात साथरोगाच्या दृष्टिकोनातून जोखीमग्रस्त गावे ओळखून यादी करावी. त्याप्रमाणे गट तयार करून शीघ्र प्रतिसाद पथके सज्ज ठेवावीत, अशा सूचना आरोग्य मंत्री प्रा. डॉ .तानाजी सावंत यांनी दिल्या.

पावसाळ्यात उद्भवणारे आजार व पूर परिस्थिती यावर प्रभावीपणे त्वरित कार्य करण्यासाठी आरोग्य विभागाने जिल्हा व गावपातळीपर्यंत केलेल्या आरोग्य सेवा तयारीचा आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी पुणे येथे राज्यस्तरीय आढावा घेतला. यावेळी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार, संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांची उपस्थिती होती.

कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे व उद्रेक झाल्यास त्वरित उपाययोजना करण्यात यावी, तयारीसाठी जिल्हास्तरावरील अहवाल दररोज तयार करण्यात यावा व त्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात यावे. पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत तपासून पाहावेत ज्यामुळे पिण्यायोग्य पाणी आहे किंवा नाही याची खात्री केली जावी, जिल्ह्यातील नोडल अधिकारी त्यांचे दूरध्वनी क्रमांकांची यादी तयार करून ती प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अद्ययावत ठेवावी व राज्यस्तरावरही पाठवावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

साथरोग नियंत्रणासाठीच्या किट वाटप करण्यात याव्यात व त्याचा अद्ययावत अहवाल तयार ठेवावा, आशासेविका व आरोग्य कर्मचारी यांच्या याद्याही जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे ठेवण्यात याव्यात. तसेच डास उत्पत्ती ठिकाणे यावरही लक्ष द्यावे व पाणी साठे चांगले राहतील यावरही लोकसहभागाद्वारे नियंत्रण ठेवावे. शीघ्रप्रतिसाद पथकाद्वारे करावयाचे कामे तसेच सूचनासाठी एक माहिती पुस्तक तयार करण्यात यावे व  मार्गदर्शक सूचना देण्यात याव्यात, औषध साठा अद्ययावत करून उपलब्ध ठेवण्यात यावा, साथरोगाबाबत जनजागृतीसाठी ग्रामपंचायत, नगरपंचायत येथे फलकही लावण्यात यावेत, असे निर्देशही यावेळी मंत्री डॉ. सावंत यांनी दिले.

अतिरिक्त मुख्य सचिव श्री. म्हैसकर यांनी साथ रोगाबाबतची माहिती लोकांपर्यंत जाण्यासाठी व्यापक जनजागृती करावी, असे सूचित केले. कठीण परिस्थितीत आरोग्य विभाग चांगली जबाबदारी पार पाडत असून पावसाळ्यातील आरोग्य परिस्थितीही व्यवस्थितपणे हाताळण्यास सर्वांनी सक्रिय रहावे, असेही यावेळी सुचविण्यात आले. आरोग्य विभागातील विभागीय आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी सर्व दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

आरोग्य विभागामार्फत पावसाळ्यातील डेंगू, मलेरिया, जापानी मेंदूज्वर, लेप्टोस्पायरोसिस अशा आजारांना नियंत्रित ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहे.

आरोग्य विभागाने केलेल्या उपाययोजना

  • जोखीमग्रस्त गावांची यादी तयार करण्यात आली आहे.
  • गृहभेटी व आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत सर्वेक्षण व रुग्णशोध मोहीम.
  • आश्रमशाळा यांना वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या मार्फत नियमित भेटी.
  • पाणी गुणवत्ता नियंत्रण 76 हजार पाणी नमुने तपासण्यात आले आहेत.
  • पाण्याच्या स्रोतांचा सर्व्हे व प्रत्येक गावांना हिरवे, पिवळे, लाल कार्ड देण्यात आले आहेत.
  • एकात्मिक कीटक व व्यवस्थापन यात परिसर स्वच्छता, डासांचे पासून वैयक्तिक संरक्षणसाठी मच्छरदाणी, डास प्रतिबंधक क्रीम, खिडक्यांना जाळ्या बसविण्याबाबत समुपदेशन करण्यात आले.
  • प्रयोगशाळा सिद्धता
  • पुरेसा औषध साठा
  • शीघ्र प्रतिसाद पथके यांची स्थापना .
  • गावपातळीवर साथरोग सर्वेक्षण तसेच अंतर विभागीय समन्वय व आरोग्य शिक्षण यावरही भर देण्यात येत आहे .

०००

मानवी संवेदनेतून कवितेचा उगम – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर,दि.९ : कायम माणसांच्या गर्दीत हरवणारे डॉ. उपेंद्र कोठेकर यांनी मानवी संवेदनेतून विविध प्रकारच्या काव्यरचना करुन समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

वसंतराव देशपांडे सभागृह येथे डॉ. उपेंद्र कोठेकर यांच्या ‘दिक्कालाच्या मांडवात’ आणि ‘काठावर दूर नदीच्या’ या काव्यसंग्रहांच्या प्रकाशन सोहळा तसेच डॉ. मनिषा कोठेकर यांच्या उंबरठ्यापल्ल्याड या लेखसंग्रहाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

मंचावर वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रकाशक चंद्रकांत लाखे, भारतीय स्त्री शक्तीच्या संस्थापक अध्यक्षा उर्मिला आपटे, कवि श्याम धोंड, डॉ. उपेंद्र कोठेकर, डॉ. मनिषा कोठेकर, मोरेश्वर निस्ताने उपस्थित होते. यावेळी डॉ. उपेंद्र कोठेकर यांच्या सांजरंग व राष्ट्ररंग या काव्यरचनांच्या ध्वनिफीतीचेही विमोचन करण्यात आले.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, डॉ.उपेंद्र कोठेकर हे उत्तम संघटक असून त्यांच्यातील राष्ट्रभावना, राष्ट्रप्रेम व समाजाप्रती असलेले समर्पण अतुलनिय आहे. या समर्पण भावनेतून त्यांनी काव्यनिर्मिती केली आहे. प्रेम, मानवी भावभावनासह सखल रंगात्मक कविता डॉ. कोठेकर यांनी रचली आहे. माणसाच्या गर्दीत हरवलेल्या, संघटनकलेत निपुण असणाऱ्या, सिद्धहस्त कवीची मानवी संवेदना व्यक्त करण्याची कला कवितेत प्रतीत होत असल्याचे, ते यावेळी म्हणाले.

मनिषा कोठेकर यांचाही सामाजिक कार्यातील वाटा फार मोलाचा असून एका विचाराने प्रेरित होऊन त्यांनी स्त्रीशक्तीसाठी सतत लेखन केल्याचे उपमुख्यमंत्री श्री.  फडणवीस यांनी सांगितले.

श्री. मुनगंटीवार म्हणाले की, माणसाच्या गर्दीतील कवितेची निर्मिती डॉ. कोठेकर यांनी केली. विद्यार्थी असतांना त्यांनी उत्तम संघटन तयार करुन आपल्या कार्याला योग्य दिशा देण्याचे कार्य केले. यावेळी श्याम धोंड, उर्मिला आपटे यांनी आपले विचार व्यक्त केले. केंद्रीय भुपृष्ठ व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दृकश्राव्य संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची सुरुवात आषाढरंग या सांगितीक कार्यक्रमाने झाली. श्वेता शेलगावकर व रेणुका देशकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी मोठ्या संख्येने साहित्यप्रेमी, रसिक, श्रोते उपस्थित होते.

०००

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ सायबर गुन्हे मुक्त करण्यासाठी २५ लाखांचा निधी देणार – पालकमंत्री दीपक केसरकर  

 मुंबई, दि. ९ : ज्येष्ठ नागरिक सायबर गुन्ह्यांचे बळी ठरलेले दिसून येतात. मुंबईतील हे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून प्रायोगिक तत्वावर दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ सायबर गुन्हे मुक्त करण्यासाठी २५ लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली. याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी शहरात विरंगुळा केंद्र उभारण्यात येणार असून तेथे ने-आण करण्यासाठी बेस्ट मार्फत १० बस उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बृहन्मुंबई पोलीस उपायुक्त परिमंडळ – ५ च्या वतीने शनिवारी सायंकाळी येथे आयोजित शासन आपल्या दारी कार्यक्रमात मंत्री श्री. केसरकर यांनी दादर परिसरातील महिला व ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ज्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करणे शक्य आहे, त्या समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश त्यांनी दिले.

खासदार राहुल शेवाळे, आमदार सर्वश्री कालिदास कोळंबकर, सदा सरवणकर, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त रमाकांत बिरादार, पोलीस उपायुक्त मनोज पाटील, जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व संबंधित शासकीय विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका, पोलीस विभाग आदींचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, नागरिकांना त्यांच्या समस्यांवर तातडीने न्याय मिळावा, ही शासनाची भूमिका आहे. यासाठी मुंबईसह राज्यात ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर असून त्या अनुषंगाने शहरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याबरोबरच दर्जेदार सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचाही शासनाचा प्रयत्न आहे. मुंबईत स्वच्छता राहावी, नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, मुंबई सुंदर दिसावी यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. आपला दवाखाना योजनेच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी केली जात असून अधिकच्या तपासण्यासाठी फिरती तपासणी वाहने उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ज्येष्ठ नागरिकांना धान्य घेण्यासाठी लांब जाण्याची आवश्यकता भासू नये यासाठी १४ वाहने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगून मंत्री श्री. केसरकर म्हणाले, मुंबईतील नागरिकांच्या समस्या जाणून त्यावर तातडीने उपाययोजना करण्यात येत आहेत. उद्याने, बाजारपेठांमध्ये उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मुंबादेवी, महालक्ष्मी, हाजीअली, सिद्धीविनायक आदी धार्मिक स्थळांच्या परिसराचा कायापालट करण्यात येणार आहे. कोळीवाड्यांचा विकास करण्यात येत असून उत्तम फिश मार्केटसह तेथे फूड कोर्ट सुरू करण्यात येणार आहेत. कामगारांसाठी असलेल्या कल्याण केंद्रामध्ये अत्याधुनिक सुविधा निर्माण केल्या जात आहेत. ड्रग्ज मुक्त मुंबईसाठी उपाय केले जात आहेत. रूग्णांच्या सोयीसाठी जे. जे. रूग्णालयात सुसज्ज वॉर्ड तयार करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली.

श्री. केसरकर म्हणाले, मंत्री हा नागरिकांचा प्रतिनिधी असतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी रहिवाशांच्या समस्या जागेवरच सोडविण्यासाठी प्रत्येक विभागात जाऊन जनतेशी सुसंवाद साधण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नागरिकांमध्ये जाऊन आणि त्यांच्या समस्या जाणून त्या तातडीने सोडविण्यात येत आहेत.

खासदार राहुल शेवाळे म्हणाले, राज्य शासनाने हाती घेतलेल्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यात सुमारे ४५ लाख नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळाला आहे. मुंबईत पालकमंत्री दीपक केसरकर हे या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या जाणून त्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. याद्वारे नागरिकांच्या समस्या सोडविल्या जाऊन त्यांना दिलासा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. आपला लोकसभा मतदारसंघ हा सायबर गुन्हे मुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार सदा सरवणकर यांनी यावेळी परिमंडळ ५ या पोलीस विभागाने चोरीचा मुद्देमाल कौशल्याने शोधून काढल्याबद्दल त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले. तर आमदार कालिदास कोळंबकर यांनी पोलिसांचा घरांचा विषय अतिशय महत्त्वाचा असल्याचे सांगून शासनाने तातडीने याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी पालकमंत्री मंत्री श्री. केसरकर यांच्याकडे केली.

यावेळी मंत्री श्री. केसरकर यांच्या हस्ते पोलीस तपासात परत मिळविलेला ४० लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत करण्यात आला. यामध्ये कुर्ला पोलीस स्टेशन हद्दीतील मनोज जैन यांचे २८ लाखांचे दागिने, धारावी हद्दीतील तीन लाख रुपयांची कार यांसह दादर, माहीम आदी पोलीस स्टेशन हद्दीतील गहाळ झालेले अथवा चोरीला गेलेले विविध दागिने, मोबाईल, घड्याळ, वाहने आदी मुद्देमालाचा समावेश होता. सुमारे दोन कोटींहून अधिकचा मुद्देमाल आतापर्यंत परत करण्यात आल्याची माहिती यावेळी पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी प्रास्ताविकात दिली. पोलीस विभागाच्या या कामगिरीची मंत्री श्री. केसरकर यांनी प्रशंसा केली.

या सुसंवाद कार्यक्रमात परिसरातील नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. यात प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, स्वच्छता, वाहतुकीच्या समस्या, कचरा निर्मूलन, फेरीवाले, पार्किंग आदींचा समावेश होता. या समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. केसरकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

०००

दिवंगत बाळासाहेब सावंत यांच्या स्वप्नातील विकसित कोकण घडविण्यासाठी कटिबद्ध – पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी दि. ८ (जिमाका):  राज्याचे माजी कृषी मंत्री दिवंगत बाळासाहेब सावंत यांच्या स्वप्नातील सर्वांगीण विकसित कोकण घडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योग तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.

मौजे जाकीमिऱ्या येथे उभारण्यात आलेल्या बाळासाहेब सावंत बहुउद्देशीय सभागृह, वाचनालय व दिवंगत बाळासाहेब सावंत यांच्या स्मारकाचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते.

मंचावर जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, सार्वजनिक बांधकामच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक, कार्यकारी अभियंता अमोल ओठणकर, रत्नागिरी न. पा.  मुख्याधिकारी तुषार बाबर, जाकीमिऱ्याच्या सरपंच आकांक्षा कीर, यांच्यासह सावंत कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले की, दिवंगत बाळासाहेब सावंत यांनी कोकणसह राज्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या विचारांवरच आपण वाटचाल करत राहू.

जाकीमिऱ्या येथे उभारण्यात आलेल्या वाचनालयामध्ये एमपीएससी, यूपीएससीचा अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी पुस्तके उपलब्ध करून देण्यात येतील. याकरिता सुमारे दहा लाख रुपयाचा निधी जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ उपलब्ध करुन द्यावा, त्याचबरोबर ही बहुउद्देशीय इमारत समुद्रालगत असल्याने नौदल व फिशरीजच्या अनुषंगाने काही कोर्सेस सुरू करता येतील का ? याची चाचपणी प्रशासनाने करावी अशी सूचनाही पालकमंत्र्यांनी  केली.

तत्पूर्वी पालकमंत्र्यांनी दिवंगत बाळासाहेब सावंत यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करुन सावंत कुटुंबीयांच्या निवासस्थानाला भेट दिली. तसेच मौजे जाकीमिऱ्या येथील विविध विकास कामांसाठी मंजूर करण्यात आलेल्या सुमारे २ कोटी २० लाख रुपये रक्कमेच्या विकास कामांचे, मौजे सडामिऱ्या येथील १ कोटी ५० लाख रुपयांच्या विकास कामांचे त्याचबरोबर शिरगाव जिल्हा परिषद गटासाठी सुमारे १७ कोटी रुपयांच्या निधीतून मंजूर करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

याप्रसंगी एमआयडीसीच्या प्रादेशिक व्यवस्थापक वंदना करमाळे, रत्नागिरीचे तहसिलदार राजाराम म्हात्रे, गटविकास अधिकारी जे. पी. जाधव यांच्यासह संबधित गावांचे सरपंच, ग्रामसेवक, तलाठी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००

ताज्या बातम्या

मत्स्यव्यवसाय विभाग आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

0
पुणे, दि. 5: राज्यातील मत्स्यव्यवसाय विभाग महत्त्वाचा विभाग असून हा विभाग आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अधिकाऱ्यांनी एकत्रिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. उत्पन्नवाढीसोबतच पश्चिम महाराष्ट्रातील मत्स्य...

‘एआय’च्या सहाय्याने महाराष्ट्र अन्नधान्य निर्यातीत सर्वोत्तम ठरू शकतो — देबजानी घोष

0
मुंबई, दि. ०५: ‘एआय’चा वापर करून महाराष्ट्र अन्नधान्य उत्पादनात आणि निर्यातीत जगातील सर्वोत्तम राज्य बनू शकतो, असा विश्वास निती आयोगाच्या फेलो आणि नॅसकॉमच्या माजी...

 जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी उद्योजकांच्या अडचणी सोडवू – पालकमंत्री मेघना बोर्डीकर

0
परभणी, दि. ०५ (जिमाका): परभणी जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी उद्योजकांच्या अडचणींचे प्राधान्याने निराकरण केले जाईल, अशी ग्वाही राज्याच्या  सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा...

स्वच्छ व सुंदर शहर करण्यावर मनपा व नगरपालिकांनी भर द्यावा – पालकमंत्री मेघना बोर्डीकर

0
परभणी, दि. ०५ (जिमाका): नागरिकांना चांगल्या मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबरच  परभणी मनपा आणि जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांनी आपले शहर स्वच्छ व सुंदर करण्यावर भर...

‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’ योजनेतंर्गत जिल्ह्यातील प्रकल्प जलदगतीने पूर्ण करा- पालकमंत्री मेघना बोर्डीकर

0
परभणी, दि. ०५ (जिमाका):  शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडीत वीज पुरवठा करणारी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 ही राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून परभणी...