मंगळवार, मे 6, 2025
Home Blog Page 1148

धुळे-इंदूर रेल्वे मार्ग लवकर पूर्ण करणार; सुलवाडे-जामफळ योजनेच्या कामास निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

धुळे जिल्ह्याच्या विकासासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री अजित पवार

धुळे, दि. 10 जुलै 2023 (जिमाका) – जिल्ह्याला सुजलाम् सुफलाम् बनविणाऱ्या सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेच्या कामासह धुळे शहराच्या विकास कामांना निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. धुळे-इंदूर रेल्वे मार्गाचे भूसंपादनाचे काम जलदगतीने सुरू असून हा रेल्वे मार्गही लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.

येथील एसआरपीएफ मैदानावर ‘शासन आपल्या दारी’ अभियानातंर्गत धुळे जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री गिरीष महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, मंत्री अनिल पाटील, खासदार डॉ. हीना गावित, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पवार, आमदार किशोर दराडे, जयकुमार रावल, मंजूळाताई गावीत, काशीराम पावरा, चिमणराव पाटील, मंगेश चव्हाण, महापौर प्रतिभा चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

‘शासन आपल्या दारी’ अभियानात धुळे जिल्ह्यात 3 लाख 21 हजारपेक्षा अधिक नागरिकांना लाभ देण्यात आला आहे, असे नमूद करून मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, शासन आपल्या दारी या लोकाभिमुख कार्यक्रमास राज्यभरात उदंड प्रतिसाद मिळत आहे. शासनाच्या योजनांचा लाभ एकाच छताखाली नागरिकांना मिळत आहे. सरकारी कार्यालयांच्या चकरा सर्वसामान्यांना माराव्या लागू नये यासाठी शासनाला काम करावयाचे आहे. आदिवासी समाज संघटनेच्या मागण्यांवर बैठक घेऊन त्यांच्या मागण्यांची दखल घेतली जाईल.

गेल्या वर्षभरात शासनाने सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले. धुळे-नरडाणा-इंदूर रेल्वे मार्गाच्या कामासाठी केंद्र सरकार पन्नास टक्के व राज्याचा पन्नास टक्के निधी देणार आहे. त्यामुळे या रेल्वे मार्गाचे काम लवकरच मार्गी लागणार आहे.

धुळे जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी कटिबद्ध – उपमुख्यमंत्री अजित पवार

सर्वसामान्यांना सरकारी कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागू नये यासाठी शासनच जनतेपर्यंत जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून देशाचा झपाट्याने विकास होत आहे. तापी बॅरेजच्या पाण्याचा वापर वाढला पाहिजे यासाठी शासन प्रयत्नशील आहे. आर्थिक शिस्त ठेवत शासन सर्वसामान्यांसाठी सर्वांगिण काम करत आहे. पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे वळविण्यासाठी खर्च करण्याचे शासनाचे धोरण आहे. पाऊस नसल्याने पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे असे नमूद करून धरण पाणीसाठ्याचे योग्य नियोजन प्रशासनाने करावे, अशी सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

धुळे जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. धुळे जिल्ह्यात रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेतली आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक गाव-वाड्या-वस्त्यांपर्यंत रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यावर शासनाचा भर राहणार आहे. धुळे जिल्ह्यातील उद्योगांच्या विकासावरही शासनाचा भर राहील, असेही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

पालकमंत्री गिरीष महाजन म्हणाले की, धुळे जिल्ह्यात काही भाग आदिवासी बहूल आहे. त्यामुळे दुर्गम भागातील आदिवासी बांधवांना आता कुठे जाण्याची गरज नाही. तुमच्या कामासाठी शासनच आता तुमच्या दारी आले आहे. प्रत्येकाला घर, प्रत्येक घरी शौचालय, वीज, पिण्याचे पाणी, गावांमध्ये जाण्यासाठी रस्ते, प्रत्येकाला अन्नसुरक्षा मिळाली पाहिजे. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. महात्मा फुले आरोग्य योजनेत 5 लाखांपर्यंतचे उपचार मोफत करण्यात आले आहेत. एक रूपयात पीक विमा योजना, महिलांना एसटी तिकिटात 50 टक्के सवलत, 75 वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास अशा सर्वसामान्यांच्या कल्याणकारी योजना शासन राबवत आहे. राज्य व देशात पायाभूत सुविधांचे जाळे तयार होत आहे. अक्कलपाडा धरण व सुलवाडे बॅरेजमुळे धुळे जिल्ह्यातील लाखो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. केंद्रीय योजनेत या प्रकल्पांचा समावेश केल्याने कामांना गती येणार आहे. धुळे महानगरपालिकेला सुध्दा विकासकामांसाठी मुबलक निधी देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभाचे वितरण करण्यात आले. ज्येष्ठ लोक कलावंत नथ्थू ईशी, जितेंद्र भोईटे, संतोष ताडे, अरविंद भामरे, मांगू मगरे यांना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते वृद्ध कलावंत पेन्शन योजनेच्या लाभाचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. रोजगार मेळाव्यातून रोजगार मिळालेले दिनेश पाटील, चेतन गवळी, अमोल जाधव या तरूणांना यावेळी नियुक्तीयांचे पत्राचे वाटप करण्यात आले.

यावेळी धुळे जिल्ह्याने विविध योजनांच्या माध्यमातून दिलेल्या लाभांची माहिती देणारी दृकश्राव्य चित्रफित दाखविण्यात आली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे टोपी, उपरणे, महिला बचतगटांनी तयार केलेल्या खान्देशी पदार्थ देऊन स्वागत करण्यात आले. व्यासपीठावर याप्रसंगी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, मुख्यमंत्री जन कल्याण कक्षाचे राज्य मुख्य समन्वयक डॉ. अमोल शिंदे, मनपा आयुक्त देविदास टेकाळे, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, सहायक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, परिविक्षाधीन सनदी अधिकारी सत्यम गांधी आदी अधिकारी उपस्थित होते.

प्रास्ताविकात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी शासन आपल्या दारी अभियानात केलेल्या कामांची माहिती विशद केली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कृषी आणि कामगार, आदिवासी विभागाच्या लाभार्थ्यांना कामगार किट, ट्रॅक्टरचे वाटप केले तसेच निवडक सरपंचाशी संवादही साधला. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी, धुळे जिल्ह्यातील आदिवासी समुदायातील विविध कलाकारांच्या कलापथकांनी स्थानिक आदिवासी नृत्य सादर करत कार्यक्रमात रंगत आणली.

एका छताखाली शासकीय विभागांच्या माहितीचे स्टॉल

‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात विविध शासकीय विभागांचे 34 स्टॉल उभारण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांसह इतर मान्यवरांनी आदिवासी विकास विभागाच्या स्टॉलला भेट देऊन लाभार्थ्यांना लाभाचे वितरण केले. या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती एकाच छताखाली मिळत मिळाल्यामुळे या प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या माध्यमातून नागरिकांच्या लेखी समस्या, तक्रारी, निवेदने स्वीकारण्यात आली. जिल्हा सामान्य प्रशासन रूग्णालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरासही या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रोजगार मेळाव्यात एकूण 1800 युवकांनी नोंदणी केली. यापैकी 1250 युवकांची प्राथमिक निवड करण्यात आली तर 215 उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या मेळाव्यात 15 विविध आस्थापना सहभागी झाल्या होत्या.

यावेळी बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, खासदार डॉ. हीना गावित, आमदार मंगेश चव्हाण, आमदार जयकुमार रावल यांनी मनोगत व्यक्त केले. राज्यगीताने कार्यक्रमाची सुरूवात झाली. तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश देवपूरकर यांनी केले.

000000

वैद्यकीय शिक्षणाबरोबरच आरोग्य सेवेचे सक्षमीकरण

 

            स्वातंत्र्यानंतर मागील जवळपास 60 वर्षात केवळ 11 शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्यात आली होती. सन 2014 पासून 2023 पर्यंत 9 वर्षात 10 वैद्यकीय महाविद्यालये राज्यात सुरु करण्यात आली आहेत. त्यामुळे दरवर्षी शेकडो नवीन डॉक्टर निर्माण होऊन राज्यभर आरोग्य सेवेचा मोठ्या प्रमाणात विस्तार होणार आहे.

सार्वजनिक आरोग्य ही सुराज्याच्या कल्पनेची एक महत्त्वाची बाब आहे. राज्यात प्राथमिक आरोग्य सुविधा पुरविण्याची जबाबदारी सार्वजनिक आरोग्य विभागाची असली, तरी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून केवळ ॲलोपॅथी (Allopathy) तथा आधुनिक विज्ञान (modern science) या चिकित्सा पद्धतीद्वारे उपचार केले जातात.

वैद्यकीय शिक्षण, आयुष (AYUSH) (आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध व होमिओपॅथी चिकित्सापद्धत) आणि अन्न व औषध प्रशासन या उपविभागाकडून राज्यातील जनतेस प्राथमिक आरोग्यासह औषधोपचार, विशेषोपचार व अतिविशेषोपचार सेवा देण्यात येते.

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिनस्त वैद्यकीय सेवा व व्यवसाय या संदर्भातील कायद्याची अंमलबजावणी करणे, मानवी जीवनाच्या प्रक्रियेमध्ये मानवाच्या शारीरिक, मानसिक, जन्मत: निर्माण होणारे आजार, अपघात, हवामानातील होणाऱ्या बदलामुळे निर्माण होणारे संसर्गजन्य रोग इ. निर्माण होणाऱ्या आजारांवर मात करुन मानवी जीवनाचा दर्जा उंचावण्यासाठी वैद्यकीय क्षेत्राशी निगडित संशोधन, उपाययोजना, वैद्यकीय शिक्षण, औषध निर्मिती व अनुषंगिक कायदे, या प्रयोजनार्थ आवश्यक वैद्यकीय क्षेत्रातील मनुष्यबळ निर्माण करणे तसेच राज्यात वैद्यक शास्त्रात समतोल विकास साधणे व वैद्यक शाखेतील विविध अभ्यासक्रमात एकरुपता आणणे इ. संदर्भातील धोरणात्मक निर्णय घेतले आहेत.

नऊ जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

प्रत्येक नागरिकांस उच्च दर्जाच्या वैद्यकीय सेवा देण्याकरिता प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे धोरण ठरविण्यात आले आहे. त्यानुसार या शैक्षणिक वर्षापासून रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होत आहे. परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला असून नाशिक येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात येत आहे. नऊ जिल्ह्यात (पालघर, गडचिरोली, अमरावती, वाशिम, जालना, बुलढाणा, अंबरनाथ, भंडारा, आणि वर्धा) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे प्रस्तावित असून ती लवकरच सुरू करण्यात येणार आहेत.

निवासी वैद्यकीय अधिकारी यांची 1432 पदे निर्माण

भारतीय वैद्यकीय आयोगाच्या मानकांनुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आवश्यक निवासी वैद्यकीय अधिकारी यांची 1,432 पदे निर्माण करण्यात आली. त्यामुळे तेवढे डॉक्टर जास्तीचे उपलब्ध होतील.

शासकीय महाविद्यालयांचे श्रेणीवर्धन व नव्याने प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालये उभारण्याची कार्यवाही

राज्यातील कार्यरत शासकीय महाविद्यालयांचे श्रेणीवर्धन करणे व नव्याने प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालये उभारण्याकरिता आशियायी विकास बँक (ADB) संस्थेकडून सुमारे 4 हजार कोटी व जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी (JICA) या संस्थेकडून  सुमारे 5500 कोटीचे कर्ज घेण्याचे प्रस्तावित आहे. त्याबाबतची कार्यवाही युद्धपातळीवर सुरु आहे.

वैद्यकीय महाविद्यालयास जोडून वाढीव 157 नर्सिंग महाविद्यालयांना मान्यता

देश पातळीवर नर्सेसचे प्रमाण वाढावे याकरिता वैद्यकीय महाविद्यालयास जोडून वाढीव 157 नर्सिंग महाविद्यालयांना मान्यता देण्याबाबत सन 2023-2024 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली आहे.  त्याच धर्तीवर राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना जोडून बीएसस्सी (Bsc) नर्सिंग अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.

जळगाव येथे मेडीकल हब

जळगाव येथे “मेडीकल हब” निर्माण करण्यात आले असून त्यानुसार शासकीय वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, होमिओपॅथी व भौतिकोपचार महाविद्यालये उभारण्यात येणार आहेत. त्यानुसार तेथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय सुरू झाले आहे.  तर  राज्यातील पहिले शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय जळगांव येथे सन 2022-23 या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात आले आहे.

विविध अभियाने, मिशनमार्फत आरोग्य सेवा समाजाच्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचणार

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमार्फत रक्तदान मोहीम, स्थूलपणा जनजागृती व उपचार अभियान, स्तन कर्करोग जनजागृती व उपचार अभियान, ‍स्वच्छ मुख अभियान, थायरॉईड जनजागृती व उपचार अभियान आणि अवयव दान जनजागृती अभियाने सुरू करण्यात आली असून सातत्याने सुरू ठेवण्यात येणार आहेत. सदर अभियाने,मिशनमार्फत आरोग्य सेवा समाजाच्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहेत.

परिचर्या, तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील एकूण 5182 पदे भरण्याबाबतच्या प्रक्रियेला सुरुवात

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच रूग्णालयातील परिचर्या, तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील एकूण 5182 पदे भरण्याबाबतची  प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सदर भरती टी.सी.एस. या नामांकित कंपनीकडून ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे.

रत्नागिरी येथे 100 विद्यार्थी क्षमतेसह संलग्नित 430 खाटांचे रुग्णालय सुरु

रत्नागिरी येथे 100 विद्यार्थी क्षमतेसह संलग्नित 430 खाटांचे रुग्णालय सुरु करण्यास मागील वर्षी मान्यता देण्यात आली होती. आता रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालयासाठी 448 पदनिर्मितीस मान्यता देण्यात आली असून याकरीता रु. 105.78 कोटी खर्चासही मान्यता देण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित 500 रुग्णखाटांच्या रुग्णालयाकरीता 1086 पद निर्मीतीस मान्यता

याचबरोबर सिंधुदुर्ग येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित 500 रुग्ण खाटांच्या रुग्णालयाकरीता आवश्यक एकूण 1086 पद निर्मीतीसही मान्यता देण्यात आली असून त्यापोटी 109.19 कोटी रुपयांचा भार शासनाच्या तिजोरीवर पडणार आहे. सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यापूर्वीच सुरु झाले आहे.

प्रत्येक नागरिकाला आरोग्यासाठी प्राधान्य देणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून एकात्मिक प्राथमिक आरोग्य सेवा प्रदान करण्यावर भर दिला आहे. आजारांवर उपचार करण्याबरोबरच प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच बालके आणि स्त्रियांच्या आरोग्यविषयक समस्यांचे निराकरण करण्यासाठीही  विशेष प्रयत्न केले आहेत.

ग्रामीण आणि दुर्लक्षित क्षेत्रांमध्ये आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी प्रशिक्षित वैद्यकीय व्यावसायिकांच्या सहभागाला सहाय्यभूत ठरणारे धोरण अंमलात आणले आहे. दर्जेदार आरोग्य यंत्रणा विकसित करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

 

– गिरीष महाजन

मंत्री, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य

 

(शब्दांकन : राजू धोत्रे, विसंअ)

महिला व बालकल्याण आयुक्तपदी डॉ. प्रशांत नारनवरे रूजू

मुंबई, दि. 10 : महिला व बालविकास विभागाच्या आयुक्तपदाची सूत्रे डॉ. प्रशांत नारनवरे यांनी आज स्वीकारली. यावेळी बालविकासचे उपायुक्त राहुल मोरे, प्रशासन विभागाच्या उपायुक्त वर्षा पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉ. नारनवरे यांचे स्वागत केले. श्री. नारनवरे हे प्रशासन सेवेतील 2009 तुकडीचे अधिकारी आहेत.

डॉ. नारनवरे यांनी सांगली येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उस्मानाबाद व पालघरचे जिल्हाधिकारी आणि सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको यासारखी पदे भूषवली आहेत.

जनतेप्रती प्रशासनात संवेदनशीलता निर्माण करणे, उत्तरदायित्वाची भावना निर्माण करून प्रशासन अधिक जलद करणे हे उद्द‍िष्ट्ये ठेवून डॉ. नारनवरे यांची कार्यप्रणाली राहिलेली आहे.

यावेळी सहायक आयुक्त योगेश जवादे, उपसंचालक सुचिता साकोरे, सहायक आयुक्त मनीषा बिरारीस, सहायक आयुक्त ममता शिंदे, परीविक्षा अधीक्षक दत्तात्रय मुंडे, रचना व कार्यपद्धती अधिकारी गोविंद इसानकर, सांख्यिकी अधिकारी प्रमोद निकाळजे, झुंबर जाधव, अश्विनी कांबळे उपस्थित होते.

*****

संध्या गरवारे/विसंअ/

राज्य शासनातर्फे उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा; राज्यात प्रथम येणाऱ्या मंडळास मिळणार पाच लाख रुपयांचे पारितोषिक – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

शासन निर्णय जारी

मुंबई, दि. १० : राज्यात १९ सप्टेंबर २०२३ पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहेत. राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांना अनुक्रमे पाच, अडीच आणि एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार असून या स्पर्धेत अधिकाधिक मंडळांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

राज्यात सन २०२२ मधील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यात आले होते. त्या अनुषंगाने सन २०२३ मध्ये राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पारितोषिक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठीचा निधी आणि या पुरस्कारसाठीचे निकष याबाबतीत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे, असेही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

राज्य समितीकडे जिल्हास्तरीय समितीने निवड केलेल्या ४४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकी वरील प्रमाणे तीन विजेत्या गणेशोत्सव मंडळांना वगळून उर्वरित ४१ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास राज्य शासनाकडून प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

या पुरस्कारासाठीच्या २४ लाख ६० हजार रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या पुरस्कारांसाठी निवड होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी विविध निकष असतील. त्यांना गुण दिले जातील. या स्पर्धेत धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांकडे परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येईल, असे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

या स्पर्धेसाठी पर्यावरणपूरक मूर्तीसाठी दहा गुण, पर्यावरणपूरक सजावट (थर्मोकोल, प्लास्टिक विरहीत) १५ गुण, ध्वनिप्रदूषण रहित वातावरणासाठी पाच गुण, पाणी वाचवा, मुलगी वाचवा, अंधश्रद्धा निर्मूलन आदी समाजप्रबोधन, सामाजिक सलोख्यासंदर्भातील सजावट, देखाव्यासाठी २० गुण, स्वातंत्र्याच्या चळवळीसंदर्भात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्ताने सजावट, देखाव्यासाठी २५ गुण असतील. गणेशोत्सव मंडळाने रक्तदान शिबिर, वर्षभर गडकिल्ले संवर्धन, पर्यावरण रक्षण, सेंद्रीय शेती, सौर ऊर्जेबद्दल जागरुकता निर्माण करणे, रुग्णवाहिका (ॲम्ब्युलन्स) चालविणे, वैद्यकीय केंद्र चालविणे आदी सामाजिक कार्यासाठी २० गुण, शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, आरोग्य आदीबाबत केलेल्या कार्याबद्दल १५ गुण, महिला, ग्रामीण भागातील वंचित घटकांच्या शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक आदीबाबत केलेल्या कार्यासाठी १५ गुण, पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धांसाठी १० गुण, पारंपरिक, देशी खेळांच्या स्पर्धेसाठी १० गुण असतील. गणेश भक्तांसाठी देत असलेल्या प्राथमिक सुविधा उदा. पाणी, प्रसाधनगृह, वैद्यकीय प्रथमोपचार, वाहतुकीस अडथळा येणार नाही, असे आयोजन, आयोजनातील शिस्त, परिसरातील स्वच्छतेसाठी प्रत्येकी पाच असे २५ गुण मिळून अशी १५० गुणांची ही स्पर्धा असणार आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ई- मेल आयडीवर १० जुलै ते ५ सप्टेंबर २०२३ या कालावधीत नोंदणी करावी.

विजेत्यांच्या निवडीसाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी या समितीचा अध्यक्ष असेल. याशिवाय या समितीत शासकीय कला महाविद्यालयातील कला प्राध्यापक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, आरोग्य अधिकारी, पोलिस अधिकारी सदस्य असतील, तर जिल्हा नियोजन अधिकारी सदस्य सचिव असतील. निवड समिती प्रत्यक्ष उत्सवस्थळी भेट देतील तसेच मंडळाकडून व्हीडीओग्राफी व कागदपत्र जमा करुन घेतील. जिल्हास्तरीय समितीकडून प्रत्येक गणेशोत्सव मंडळाबाबत अभिप्रायासह गुणांकन करण्यात येईल. सदर समिती मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या ४ जिल्ह्यातून प्रत्येकी ३ व अन्य जिल्हयातून प्रत्येकी १ उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाची शिफारस करुन त्यांची नावे सर्व कागदपत्र व्हीडीओसह राज्य समितीकडे सादर करेल.

जिल्हास्तरीय समितीकडून शिफारस केलेल्या याद्यांमधून तीन विजेते क्रमांक निवडीसाठी राज्यस्तरावर समिती असेल. या समितीत सर जे. जे. कला विद्यालयाचे अधिष्ठाता, वरिष्ठ प्राध्यापक अध्यक्ष असतील, तर पोलीस महासंचालक कार्यालयातील वरिष्ठ गट ‘अ’ मधील अधिकारी सदस्य, तर राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य जनसंपर्क अधिकारी सदस्य सचिव असतील. राज्यस्तरीय समिती ही जिल्हास्तरीय समिती मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या ४ जिल्ह्यांतून प्रत्येकी ३ व अन्य जिल्ह्यातून प्रत्येकी १ याप्रमाणे एकूण ४४ प्राप्त शिफारशीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमधून गुणांकन व संबंधित कागदपत्राच्या आधारे पहिल्या ३ विजेत्यांची निवड करतील.

राज्य समितीकडे जिल्हास्तरीय समितीने निवड केलेल्या ४४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकी वरील प्रमाणे तीन विजेत्या गणेशोत्सव मंडळांना वगळून उर्वरित ४१ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास राज्य शासनाकडून प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

०००००

दीपक चव्हाण/विसंअ/

ज्येष्ठ नागरिक, महिला, बालकांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 10 : ज्येष्ठ नागरिक, महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस प्रशासनाला दिले.

राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय अर्ध वार्षिक गुन्हे परिषदेचे आयोजन मुंबईतील पोलीस मुख्यालयात करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव मनोज सौनिक, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रजनीश सेठ उपस्थित होते. परिषदेस  पुणे ग्रामीण, कोल्हापूर, अहमदनगर, सांगली, नाशिक ग्रामीण, अकोला, सातारा, वाशीम, उस्मानाबाद (धाराशीव), नागपूर ग्रामीण, सोलापूर ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, कोविड कालावधीत राज्य पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानासह पोलिसांना प्रशिक्षण देण्यात यावे. देशातील आदर्श पोलीस दल म्हणून महाराष्ट्राच्या पोलीस दलाचा नावलौकीक आहे. भविष्यातही हा नावलौकीक कायम राखण्यासाठी प्रयत्न करावे, त्यासाठी शासन सर्व सहकार्य करेल.

“राज्यातील सर्व पोलीस अधिकारी या परिषदेच्या माध्यमातून एकत्र आले आहेत. पोलीस दलाला अधिक सक्षम आणि संवेदनशील बनविण्यासाठी परिषदेत चर्चा व्हावी, उपाययोजना आखण्यात याव्यात यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल.            शासनाचे निर्णय, योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे महत्त्वाचे असून, या कार्यात पोलीस दल महत्त्वाचा घटक आहे. पोलीस आणि रुग्णवाहिका, अग्निशमन दल यांनी समन्वयाने काम केल्यास प्रभावीपणे काम करता येईल” असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, राज्यस्तर ते तालुकास्तरापर्यंत गुन्हेगारी, सायबर गुन्हे, अमली पदार्थांची तस्करी रोखणे, जातीय तेढ निर्माण होऊ नये यासाठीच कारवाई, संघटित गुन्हेगारी मोडीत काढणे, दहशतवादी हल्ले, सागरतटीय रस्त्यावर सुरक्षा वाढविणे, अपघात होऊ नयेत यासाठी उपाययोजना करणे, समाजात कायदा व सुव्यवस्था राखणे असे पोलीस दलाचे कामकाज अभिनंदनीय आहे. पोलीस आणि नागरिक हे एकमेकांना पूरक आहेत, नागरिकांशी संवाद वाढविल्यास त्यांच्यातली भीती दूर होईल आणि पोलीसांप्रति आदर वाढेल, तसेच गुन्हेगारावर जरब बसण्यासाठी मदत होते, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

यावेळी खंडाळा येथील प्रशिक्षण केंद्राला सर्वोत्तम क्षेत्रीय प्रशिक्षण केंद्र म्हणून गौरविण्यात आले.  शशिकांत बोराटे यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच 2021 चा सर्वोत्तम पोलीस स्थानक प्रथम पुरस्कार शिवाजी नगर पोलीस ठाणे, कोल्हापूर पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे, द्वितीय पुरस्कार देगलूर पोलीस ठाणे, नांदेड पोलीस निरीक्षक भगवान धबडगे, तृतीय पुरस्कार वाळूंज पोलीस ठाणे औरंगाबाद, पोलीस निरीक्षक संदीप गुरमे, चौथा पुरस्कार अर्जुनी मोर पोलीस ठाणे, गोंदिया पोलीस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांना, पाचवा पुरस्कार राबोडी पोलीस ठाणे, ठाणे पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे यांचा प्रमाणपत्र आणि करंडक देऊन सत्कार करण्यात आला.

पोलीस अधिकाऱ्यांनी यावेळी विविध गुन्ह्यासंदर्भात आकडेवारीसह सादरीकरण केले.

गुन्हे सिद्धीचा दर वाढविण्यासाठी नवीन निर्णय तातडीने घेणार : उपमुख्यमंत्री

गुन्हे सिद्ध करताना विविध अडचणी येतात. मात्र, शासन निर्णयाची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या परिषदेतून प्राप्त सूचना, शासन निर्णयात करावयाच्या सुधारणा, प्रमाणित पद्धतीमध्ये करावयाच्या सुधारणा संदर्भातील सूचना यांचे एकत्रीकरण करून प्रस्ताव सादर करावा. त्यानुसार तातडीने नवीन निर्णय निर्गमित करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

अमली पदार्थांच्या धोक्याचा सामना करण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करावी. उदयोन्मुख तपासात सायबर (लैंगिक शोषण, कर्ज फसवणूक) या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सर्वसमावेशक व्यासपीठ शासन तयार करीत आहे. यामध्ये समाजमाध्यमासंदर्भात सर्व संस्थांचा समावेश असेल. या व्हर्चुअल इको सिस्टिममुळे पोलीस यंत्रणेला सायबर गुन्हेगारी नियंत्रण आणि कारवाईसाठी सहकार्य लाभणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी मनुष्य बळ वाढविण्यात येईल. यासाठी बाह्य यंत्रणेचा वापर करणे गरजेचे असल्याचे उपमुख्यमंत्री  श्री. फडणवीस यांनी सांगितले.

सेवा प्रशिक्षण कार्यक्रमात प्रशिक्षण विश्लेषक आवश्यक असून, प्रत्येकाने हे प्रशिक्षण पूर्ण करणे गरजेचे असल्याचे महासंचालक यांनी सांगितले. विद्याशाखा आणि अभ्यासक्रमही महत्त्वाचा असून, ज्या विषयाचे प्रशिक्षण आहे त्याच विषयाचे प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

००००

श्रद्धा मेश्राम/ससं/

सिंदखेड राजा येथील ऐतिहासिक वास्तूच्या विकासासाठी सर्वंकष बृहत् आराखडा तयार करावा – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 10 : सिंदखेड राजा हे राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने या स्थळाचे आगळेवेगळे महत्त्व आहे. तेथील ऐतिहासिक वास्तूंचे महत्त्व लक्षात घेऊन त्याच्या विकासासाठी सर्वंकष बृहत् आराखडा तयार करावा. जिल्हास्तरीय समितीने विविध विभागांशी चर्चा करून विविध विकासकामांचा अंतर्भाव असलेला परिपूर्ण विकास आराखडा राज्यस्तरीय समितीकडे पाठवावा, असे निर्देश राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

सिंदखेड राजा येथील ऐतिहासिक वास्तूंच्या विकासासंदर्भात आज मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार राजेंद्र शिंगणे, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, पुरातत्व संचालनालयाचे संचालक तेजस गर्गे यांच्यासह बुलढाणा जिल्हा प्रशासनाचे विविध अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, सिंदखेड राजा येथे सहा राज्य संरक्षित स्मारके आणि पाच केंद्र शासन संरक्षित स्मारके आहेत. यामध्ये राजे लखुजी जाधव राजवाडा, निळकंठेश्वर मंदिर, राजमाता जिजाऊ जन्मस्थळ, सावकार वाडा, रंगमहाल, काळा कोट, मोती तलाव, रामेश्वर मंदिर, चांदणी तलाव, सजना बारव आदी ठिकाणांचा समावेश आहे. या स्थळांसह परिसर विकासाच्या बाबतीत एकत्रित विचार करण्याची आवश्यकता आहे. या ऐतिहासिक स्थळांचे महत्त्व लक्षात घेतच तेथील कामांचे नियोजन  होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने बुलढाणा जिल्हाधिकारी यांनी स्थानिक यंत्रणांची बैठक घेऊन कार्यवाही करावी, अशी सूचनाही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केली.

सध्या या स्थळांच्या विकासासाठी १६८ कोटी रुपयांचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला आहे. याशिवाय तेथील संग्रहालयाच्या विकास कामांचा ३४ कोटी रुपयांचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला आहे. मात्र, या परिसराचे आणि स्थळाचे महत्त्व लक्षात घेता विविध यंत्रणांच्या मदतीने एकत्रित असा  आराखडा आवश्यक आहे. त्यादृष्टीने लवकर कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

यावेळी प्रधान सचिव श्री. खारगे यांनीही जिल्हा प्रशासनाला याबाबत सूचना दिल्या.

0000

दीपक चव्हाण/विसंअ/

कॅशलेस व्यवहाराकडे वाटचाल करताना मुद्रा शास्त्रीय ठेवा जतन करणे आवश्यक – राज्यपाल रमेश बैस

मुंबई, दि. 10 : वेगवेगळ्या राजवटीत जारी केलेले चलनी शिक्के त्या-त्या काळातील घटनांवर व इतिहासावर प्रकाश टाकतात. भारताचा मुद्रा शास्त्रीय ठेवा देशाइतकाच प्राचीन आहे. आज देश कॅशलेस व्यवहारांकडे वाटचाल करताना देशाचा मुद्रा शास्त्रीय ठेवा जतन करणे आवश्यक आहे. इतिहास जाणून घेण्याच्या दृष्टीने प्राचीन नाण्यांचे दस्तऐवजीकरण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी येथे केले.

राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते नाणे शास्त्रज्ञ व संग्राहक डॉ. दिलीप राजगोर यांनी लिहिलेल्या ‘कॉइन्स ऑफ मुंबई मिंट : १९४७ ते २०२३’ व ‘कॉइन्स ऑफ नोएडा मिंट : १९८८ ते २०२३’ या दोन पुस्तकांचे सोमवारी (दि. १०) राजभवन मुंबई येथे प्रकाशन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

भारतात ५५० पेक्षा अधिक संस्थाने होती व अनेकांची आपापली नाणी होती. छत्रपती शिवाजी महाराजांची टाकसाळ होती, तसेच मुघल, पोर्तुगाल, डच, फ्रेंच व ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी शासकांची देखील आपापली नाणी होती, असे राज्यपालांनी सांगितले. आपल्या वैयक्तिक संग्रहामध्ये व्हिक्टोरिया राणी, राजे पंचम जॉर्ज व षष्ठम जॉर्ज यांचे चित्र असलेली नाणी असून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण वापरतो, अशी माहिती राज्यपालांनी यावेळी दिली.

डॉ. राजगोर हे नाणेशास्त्र या विषयावर लिखाण, ब्लॉग व यू ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रबोधन करीत असतात. त्यांच्या मुंबई व नोएडा टांकसाळीत नाण्यांच्या पुस्तकामधून अनेक दुर्मिळ नाण्यांची माहिती मिळते, असे नाणे संग्राहक डॉ. प्रकाश कोठारी यांनी यावेळी सांगितले.

प्रकाशन सोहळ्याला लेखक डॉ. राजगोर, अशोकसिंग ठाकूर आणि डॉ. राजगोर यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

**

Maharashtra Governor release books on Coins of Mumbai & NOIDA Mints

Maharashtra Governor Ramesh Bais released the books ‘Coins of Mumbai Mint: 1947 – 2023’ and ‘Coins of NOIDA Mint : 1988 – 2023’ at Raj Bhavan, Mumbai on Mon (10 July).  The books have been authored by Numismatist and Coin Collector Dr Dilip Rajgor

Speaking on the occasion, the Governor said coins of various rulers reflect the events and history of the era in which they were minted.  He expressed the need to document all the old coins urgently, especially since the world is moving towards a cashless economy.

Coin Collector Dr Prakash Kothari, Ashok Singh Thakur and family members of Dr. Rajgor were present.

**

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांसाठी ३१ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

नवी दिल्ली, दि. 10 : प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांसाठी प्रस्ताव सादर करण्यास 31 ऑगस्ट 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाच्यावतीने प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार  प्रदान केला जातो. यासाठी अर्ज पाठविण्याची तारीख ही 31 जुलै 2023 पर्यंतची होती, ती आता  वाढवून 31 ऑगस्ट 2023 पर्यंत करण्यात आलेली आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्कार (पीएमआरबीपी), 2024 करिता अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेची   संपूर्ण  माहिती https://awards.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

असामान्य धाडस, क्रीडा, समाजसेवा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण, कला आणि संस्कृती तसेच नवोन्मेष या क्षेत्रातील अतुलनीय कार्याला राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवून देण्याच्या उद्देशाने या पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली आहे.

भारताचे नागरिकत्व आणि रहिवासी असलेले मुल, मुली  ज्यांचे वय 18 वर्षांहून अधिक नाही असे या पुरस्कारांसाठी अर्ज करू शकतात. अथवा कोणीही भारतीय नागरिक देखील पुरस्कारासाठी पात्र असणाऱ्या मुला-मुलींचे नामांकन करू शकतात. या पुरस्कारांसाठीचे अर्ज विहीत केलेल्या https://awards.gov.in या संकेतस्थळाच्या माध्यमातूनच स्वीकारण्यात येतील.

00000000000

महाराष्ट्राचा इतिहास, वारसा आणि पुरातत्त्व शास्त्राविषयीच्या ७५ परिसंवाद मालिकेतील पहिला परिसंवाद संपन्न

मुंबई, दि. 10 : पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय, महाराष्ट्र आणि के. जे. सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ धर्म स्टडीज यांच्या वतीने नुकतेच 6 ते 8 जुलै, 2023 या कालावधीत “महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसाः पुरातत्त्व व संग्रहालयशास्त्राचे पुनरावलोकन व भविष्यातील दिशा ” या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्राच्या वैभवशाली भूतकाळाचा मागोवा घेण्याच्या उद्देशाने वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्राचा इतिहास, समृद्ध वारसा आणि पुरातत्त्वशास्त्र या विषयास अनुसरून ७५ परिसंवाद आयोजित करण्याची संकल्पना मांडली आहे. त्यातील पहिला हा परिसंवाद होता.

छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचे महासंचालक डॉ. सव्यसाची मुखर्जी यांच्या हस्ते या परिसंवादाचे उद्धाटन झाले. पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे यांच्यासह विविध मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. या परिसंवादात इतिहासपूर्वकालीन, प्रागैतिहासिक, ऐतिहासिक आणि मध्ययुगीन महाराष्ट्रासह मंदिर स्थापत्य, शिलालेख आणि नाणकशास्त्र, महाराष्ट्रातील संग्रहालये, राज्याशी संबंधित जागतिक वारसा विषय, नवीन तंत्रज्ञानाचा वापर या विषयांवर विद्वानांनी शोधनिबंध सादर केले. तरुण विद्वानांसाठी समर्पित एक स्वतंत्र विभाग देखील आयोजित करण्यात आला होता.

परिसंवादानिमित्त आयोजित छायाचित्र प्रदर्शन, फ्लिंटनॅपिंग आणि प्राचीन खेळांच्या डेमोसही छान प्रतिसाद लाभला. माजी संचालक डॉ. ए.पी.जामखेडकर यांच्या हस्ते समारोप झाला.

00000

‘जिल्हास्तर युवा पुरस्कारा’साठी २५ जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे मुंबई शहर जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे आवाहन

मुंबई दि. १० : क्रीडा व युवकसेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत मुंबई शहर जिल्हा क्रीडा अधिकारी यांचेद्वारा सन २०२१-२२ व २०२२-२३ या दोन वर्षाच्या जिल्हा युवा पुरस्काराकरिता मुंबई शहर जिल्ह्यातील युवक, युवती आणि सामाजिक व युवकांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांकडून अर्ज २५ जुलै २०२३ पर्यंत सादर करण्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी आवाहन केले आहे.

जिल्ह्यातील युवकांनी व सामाजिक संस्थांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्याकरिता त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हा युवा पुरस्कार देण्यात येतात. सन  २०२१-२२ व २०२२-२३ या दोन वर्षाकरिता प्रत्येकी २ युवक, २ युवती आणि २ संस्था असे प्रतिवर्षी एकूण ०६ पुरस्कार देण्यात येणार आहेत.

पुरस्कार पात्रतेचे निकष :

(अ) युवक/युवती पुरस्कार

(१) पुरस्कारवर्षाच्या १ एप्रिल रोजी पुरस्कारार्थींचे वय १३ वर्ष पूर्ण असावे, तसेच ३१ मार्च रोजी वय ३५ वर्षाच्या आत असले पाहिजे.

(२) अर्जदार हा मुंबई शहर जिल्ह्यात सलग ५ वर्षे वास्तव्यास असला पाहिजे.

(३) अर्जदाराने केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफिती, छायाचित्र इ. जोडावेत.

(४) केंद्र, राज्य शासनाच्या शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी, विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांतील प्राध्यापक/कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत.

(ब) संस्था युवा पुरस्कार

(१) संस्थेची नोंदणी झाल्यानंतर संस्था ५ वर्षे कार्यरत पाहिजे.

(२) संस्था सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १८६० किंवा मुंबई पब्लिक ट्रस्ट ॲक्ट १९५० नुसार नोंदणीकृत असावी.

(३) गुणांकनाकरिता संस्थेने केलेल्या कार्याची वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफिती, छायाचित्रे इ. जोडावेत. वरीलप्रमाणे पुरस्काराकरिता इच्छुकांनी विहीत नमुन्यातील अर्ज पाठविण्याची मुदत वाढवली असून इच्छुकांनी आपले विहीत नमुन्यातील अर्ज, दिनांक २५ जुलै २०२३ पर्यंत, सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल – दुसरा मजला धारावी पश्चिम मुंबई ४०००१७ येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ८४५९५८५८४१ यावर संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई शहर यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

राजू धोत्रे /वि.सं.अ

ताज्या बातम्या

मत्स्यव्यवसाय विभाग आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

0
पुणे, दि. 5: राज्यातील मत्स्यव्यवसाय विभाग महत्त्वाचा विभाग असून हा विभाग आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अधिकाऱ्यांनी एकत्रिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. उत्पन्नवाढीसोबतच पश्चिम महाराष्ट्रातील मत्स्य...

‘एआय’च्या सहाय्याने महाराष्ट्र अन्नधान्य निर्यातीत सर्वोत्तम ठरू शकतो — देबजानी घोष

0
मुंबई, दि. ०५: ‘एआय’चा वापर करून महाराष्ट्र अन्नधान्य उत्पादनात आणि निर्यातीत जगातील सर्वोत्तम राज्य बनू शकतो, असा विश्वास निती आयोगाच्या फेलो आणि नॅसकॉमच्या माजी...

 जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी उद्योजकांच्या अडचणी सोडवू – पालकमंत्री मेघना बोर्डीकर

0
परभणी, दि. ०५ (जिमाका): परभणी जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी उद्योजकांच्या अडचणींचे प्राधान्याने निराकरण केले जाईल, अशी ग्वाही राज्याच्या  सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा...

स्वच्छ व सुंदर शहर करण्यावर मनपा व नगरपालिकांनी भर द्यावा – पालकमंत्री मेघना बोर्डीकर

0
परभणी, दि. ०५ (जिमाका): नागरिकांना चांगल्या मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबरच  परभणी मनपा आणि जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांनी आपले शहर स्वच्छ व सुंदर करण्यावर भर...

‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’ योजनेतंर्गत जिल्ह्यातील प्रकल्प जलदगतीने पूर्ण करा- पालकमंत्री मेघना बोर्डीकर

0
परभणी, दि. ०५ (जिमाका):  शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडीत वीज पुरवठा करणारी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 ही राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून परभणी...