शनिवार, मे 3, 2025
Home Blog Page 1145

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांसाठी ३१ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

नवी दिल्ली, दि. 10 : प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांसाठी प्रस्ताव सादर करण्यास 31 ऑगस्ट 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाच्यावतीने प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार  प्रदान केला जातो. यासाठी अर्ज पाठविण्याची तारीख ही 31 जुलै 2023 पर्यंतची होती, ती आता  वाढवून 31 ऑगस्ट 2023 पर्यंत करण्यात आलेली आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्कार (पीएमआरबीपी), 2024 करिता अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेची   संपूर्ण  माहिती https://awards.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

असामान्य धाडस, क्रीडा, समाजसेवा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण, कला आणि संस्कृती तसेच नवोन्मेष या क्षेत्रातील अतुलनीय कार्याला राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवून देण्याच्या उद्देशाने या पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली आहे.

भारताचे नागरिकत्व आणि रहिवासी असलेले मुल, मुली  ज्यांचे वय 18 वर्षांहून अधिक नाही असे या पुरस्कारांसाठी अर्ज करू शकतात. अथवा कोणीही भारतीय नागरिक देखील पुरस्कारासाठी पात्र असणाऱ्या मुला-मुलींचे नामांकन करू शकतात. या पुरस्कारांसाठीचे अर्ज विहीत केलेल्या https://awards.gov.in या संकेतस्थळाच्या माध्यमातूनच स्वीकारण्यात येतील.

00000000000

महाराष्ट्राचा इतिहास, वारसा आणि पुरातत्त्व शास्त्राविषयीच्या ७५ परिसंवाद मालिकेतील पहिला परिसंवाद संपन्न

मुंबई, दि. 10 : पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय, महाराष्ट्र आणि के. जे. सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ धर्म स्टडीज यांच्या वतीने नुकतेच 6 ते 8 जुलै, 2023 या कालावधीत “महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसाः पुरातत्त्व व संग्रहालयशास्त्राचे पुनरावलोकन व भविष्यातील दिशा ” या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्राच्या वैभवशाली भूतकाळाचा मागोवा घेण्याच्या उद्देशाने वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्राचा इतिहास, समृद्ध वारसा आणि पुरातत्त्वशास्त्र या विषयास अनुसरून ७५ परिसंवाद आयोजित करण्याची संकल्पना मांडली आहे. त्यातील पहिला हा परिसंवाद होता.

छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचे महासंचालक डॉ. सव्यसाची मुखर्जी यांच्या हस्ते या परिसंवादाचे उद्धाटन झाले. पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे यांच्यासह विविध मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. या परिसंवादात इतिहासपूर्वकालीन, प्रागैतिहासिक, ऐतिहासिक आणि मध्ययुगीन महाराष्ट्रासह मंदिर स्थापत्य, शिलालेख आणि नाणकशास्त्र, महाराष्ट्रातील संग्रहालये, राज्याशी संबंधित जागतिक वारसा विषय, नवीन तंत्रज्ञानाचा वापर या विषयांवर विद्वानांनी शोधनिबंध सादर केले. तरुण विद्वानांसाठी समर्पित एक स्वतंत्र विभाग देखील आयोजित करण्यात आला होता.

परिसंवादानिमित्त आयोजित छायाचित्र प्रदर्शन, फ्लिंटनॅपिंग आणि प्राचीन खेळांच्या डेमोसही छान प्रतिसाद लाभला. माजी संचालक डॉ. ए.पी.जामखेडकर यांच्या हस्ते समारोप झाला.

00000

‘जिल्हास्तर युवा पुरस्कारा’साठी २५ जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे मुंबई शहर जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे आवाहन

मुंबई दि. १० : क्रीडा व युवकसेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत मुंबई शहर जिल्हा क्रीडा अधिकारी यांचेद्वारा सन २०२१-२२ व २०२२-२३ या दोन वर्षाच्या जिल्हा युवा पुरस्काराकरिता मुंबई शहर जिल्ह्यातील युवक, युवती आणि सामाजिक व युवकांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांकडून अर्ज २५ जुलै २०२३ पर्यंत सादर करण्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी आवाहन केले आहे.

जिल्ह्यातील युवकांनी व सामाजिक संस्थांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्याकरिता त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हा युवा पुरस्कार देण्यात येतात. सन  २०२१-२२ व २०२२-२३ या दोन वर्षाकरिता प्रत्येकी २ युवक, २ युवती आणि २ संस्था असे प्रतिवर्षी एकूण ०६ पुरस्कार देण्यात येणार आहेत.

पुरस्कार पात्रतेचे निकष :

(अ) युवक/युवती पुरस्कार

(१) पुरस्कारवर्षाच्या १ एप्रिल रोजी पुरस्कारार्थींचे वय १३ वर्ष पूर्ण असावे, तसेच ३१ मार्च रोजी वय ३५ वर्षाच्या आत असले पाहिजे.

(२) अर्जदार हा मुंबई शहर जिल्ह्यात सलग ५ वर्षे वास्तव्यास असला पाहिजे.

(३) अर्जदाराने केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफिती, छायाचित्र इ. जोडावेत.

(४) केंद्र, राज्य शासनाच्या शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी, विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांतील प्राध्यापक/कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत.

(ब) संस्था युवा पुरस्कार

(१) संस्थेची नोंदणी झाल्यानंतर संस्था ५ वर्षे कार्यरत पाहिजे.

(२) संस्था सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १८६० किंवा मुंबई पब्लिक ट्रस्ट ॲक्ट १९५० नुसार नोंदणीकृत असावी.

(३) गुणांकनाकरिता संस्थेने केलेल्या कार्याची वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफिती, छायाचित्रे इ. जोडावेत. वरीलप्रमाणे पुरस्काराकरिता इच्छुकांनी विहीत नमुन्यातील अर्ज पाठविण्याची मुदत वाढवली असून इच्छुकांनी आपले विहीत नमुन्यातील अर्ज, दिनांक २५ जुलै २०२३ पर्यंत, सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल – दुसरा मजला धारावी पश्चिम मुंबई ४०००१७ येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ८४५९५८५८४१ यावर संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई शहर यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

राजू धोत्रे /वि.सं.अ

राज्यस्तरीय नाट्यगौरव पारितोषिकांचे मंगळवारी वितरण

मुंबई, दि. 10 : महाराष्ट्र राज्य हौशी, हिंदी, संगीत, संस्कृत, बालनाट्य आणि दिव्यांग नाट्य स्पर्धेतील राज्यस्तरीय नाट्यगौरव पारितोषिक सन 2021-22 साठीचे वितरण मंगळवार, दि. 11 जुलै 2023 रोजी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित हा पारितोषिक वितरण समारंभ मंगळवारी सायंकाळी 7 वाजता रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे होणार असून लोकसभा सदस्य राहुल शेवाळे आणि विधानसभा सदस्य सदा सरवणकर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

यानिमित्त 60 व्या महाराष्ट्र राज्य हौशी, हिंदी, संस्कृत नाट्य स्पर्धेतील, 18 व्या बालनाट्य स्पर्धेतील आणि तृतीय दिव्यांग नाट्य स्पर्धेतील प्रथम पारितोषिक विजेत्या नाटकांचा महोत्सवही होणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास  खारगे आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी दिली.

बुधवार, दि. 12 जुलै रोजी दिव्यांग बालनाट्य स्पर्धेतील प्रशांत चव्हाण लिखित आणि भरत मोरे दिग्दर्शित ‘वाचवाल का’? हे नाटक सादर होणार आहे. गुरुवार, दि. 13 जुलै रोजी डॉ. सोमनाथ सोनवलकर लिखित व दिग्दर्शित ‘इन द सेल ऑफ सर्व्हायवल’ हे मराठी नाटक आणि शुक्रवार दि. 14 जुलै रोजी ‘मोक्षदाह’ हे नाटक सादर केले जाणार आहे. रवींद्र नाट्य मंदिर येथेच सायंकाळी 7 वाजता या नाटकांचे सादरीकरण होणार आहे.

00000

दीपक चव्हाण/ससं

महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या पाठीशी खंबीरपणे उभा – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर,दि. ९:  महाराष्ट्र वन विकास महामंडळाने आपल्या पूर्ण क्षमतेने काम करावे. केवळ सरकारी नजरेतून कुठल्याही कामाकडे न बघता वैयक्तिक जबाबदारी म्हणून कामात झोकून द्यावे, महामंडळाचा अध्यक्ष म्हणून मी तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे, अशी ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या (एफडीसीएम) वतीने मंत्री श्री.  मुनगंटीवार यांच्या हस्ते फॉरेस्ट किट बॅग व वाहन वितरण करण्यात आले. यावेळी एफडीसीएमचे व्यवस्थापकीय संचालक विकास गुप्ता, मुख्य व्यवस्थापक (नियोजन) संजीव गौर, महाव्यवस्थापक (व्यवसाय विकास) रवींद्र वानखेडे, नागपूर प्रदेश महाव्यवस्थापक चंद्रशेखर बाला एन., जळगाव उपवनसंरक्षक प्रवीण ए., नागपूर वन प्रकल्प विभागाचे विभागीय व्यवस्थापक आर.आर. बारटक्के यांची प्रमुख उपस्थिती होती.

महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे व विपणन तसेच विक्री प्रतिनिधींच्या प्रेझेंटेशनचे त्यांनी कौतुक केले. ते म्हणाले की, ‘आपले शास्त्र, आयुर्वेदाची परंपरा जगाने मान्य केली आहे. या परंपरेचे संवर्धन करण्यासाठी रोपवाटिका विकसित करा आणि त्याठिकाणी आयुर्वेदिक रोपांची जास्तीत जास्त प्रमाणात लागवड करा. आज ३०० कोटींची उलाढाल उद्या एक हजार कोटींची होईल, हा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करा. काम वाढविताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. प्रस्तावांना लागणारा प्रशासकीय वेळ कमी करण्याची जबाबदारी माझी आहे.’ एफडीसीएमच्या कामामध्ये गती असावी, कुठलाही ताण नसावा,महामंडळांच्या निर्णयांना गती देण्यासाठी मी पूर्ण शक्तीनिशी तुमच्या पाठिशी उभा आहे,’ असा विश्वासही त्यांनी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिला.

हॅपिनेस इंडेक्स वाढतो

जेवढ्या वेगाने प्रस्ताव येतात तेवढ्याच वेगाने ते मंजूर झाले पाहिजे. त्या प्रस्तावांवर निर्णय झाले पाहिजे. गोरेवाडा प्राणी संग्रहालयाचे काम पूर्ण करण्यासाठी माझा आग्रह आहे. काही गोष्टी केवळ पैशांमध्ये मोजता येत नाहीत. गोरेवाडा प्राणीसंग्रहालयात जेव्हा एक कुटुंब एकत्रितपणे फिरण्याचा आनंद घेते, तेव्हा हॅपिनेस इंडेक्स आपोआप वाढतो. आनंदी जीवनाची टक्केवारी वाढविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे, असेही मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले.

जगाला पोसणारे तीनच विभाग

जगाला पोसणारे केवळ तीनच विभाग आहेत. त्यात कृषी, मत्स्य आणि वन विभागाचा समावेश होतो. आणि आपण वन विभागातील जबाबदार व्यक्ती आहोत, याची जाणीव ठेवून काम करण्याची गरज आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

०००

पालकमंत्री गिरीष महाजन यांच्याकडून ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमस्थळाची पाहणी

धुळे, दि. ९ (जिमाका ) : ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत धुळे येथे जिल्हास्तरीय कार्यक्रम सोमवार, १० जुलै, २०२३ रोजी दुपारी १ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थितीत एसआरपीएफ मैदान, धुळे येथे होणार आहे.

या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली असून ग्रामविकास व पंचायतराज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी आज या ठिकाणाची पाहणी केली. यावेळी खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार मंगेश चव्हाण, महापौर प्रतिभाताई चौधरी, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेशवरी एस., जिल्हा पोलीस अधिक्षक संजय बारकुंड, मुख्यमंत्री जन कल्याण कक्षाचे राज्य मुख्य समन्वयक डॉ. अमोल शिंदे, मनपा आयुक्त देविदास टेकाळे, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, मुख्यमंत्र्याचे विशेष कार्यकारी अधिकारी अमित हुक्केरीकर, सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, उपमहापौर वैशाली वराडे, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावडे, परिविक्षाधीन सनदी अधिकारी सत्यम गांधी यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री. महाजन यांनी मुख्य स्टेज, सभा मंडप, लोकप्रतिनिधींची व मान्यवर बैठक व्यवस्था त्याचबरोबर लाभार्थ्यांची बैठक व्यवस्था, सरपंचांची बैठक व्यवस्था, शासकीय विभागांमार्फत लावण्यात येणारे विविध स्टॉल, रोजगार मेळावा, आरोग्य शिबिर जागा, पोलीस बंदोबस्त, वाहतुकीचे नियोजन आदींची पाहणी केली. प्रशासनाने केलेल्या नियोजनाची माहिती जिल्हाधिकारी श्री. शर्मा व पोलीस अधिक्षक श्री. बारकुंड यांचेकडून जाणून घेतल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त केले.

पालकमंत्री श्री. महाजन म्हणाले की, ‘शासन आपल्या दारी’अभियानातंर्गत जिल्हास्तरीय कार्यक्रम यशस्वीपणे पार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन केलेले आहे. कार्यक्रमाच्या दिवशी येणाऱ्या नागरीक, लाभार्थ्यांची गैरसोय होवू नये याची दक्षता घ्यावी. वाहनतळ ते कार्यक्रमस्थळावरील मार्गावर वाहतुकीचे नियोजन व्यवस्थीत करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी यंत्रणेला दिल्यात. तसेच शासन आपल्या दारी या मुख्य कार्यक्रमास जिल्हावासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री. महाजन यांनी यावेळी केले.

‘शासन आपल्या दारी’कार्यक्रमाचा डॉ. अमोल शिंदे यांनी घेतला आढावा

शासन आपल्या दारी अभियानातंर्गत धुळे जिल्हास्तरीय कार्यक्रमाची पूर्वतयारी आढावा बैठक येथील एसआरपी कॅम्प, धुळे येथे आज मुख्यमंत्री जन कल्याण कक्षाचे राज्य मुख्य समन्वयक डॉ. अमोल शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

यावेळी  डॉ. शिंदे म्हणाले की, ‘शासन आपल्या दारी’हा उपक्रम शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी, लाभार्थी आणि स्वयंसेवकांच्या समन्वयातून राज्यात राबविण्यात येत आहे. राज्यात आजपर्यंत विविध जिल्ह्यात शासन आपल्या दारी उपक्रम यशस्वी झाला असून या उपक्रमांस राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. धुळे जिल्ह्यातआज होणाऱ्या कार्यक्रमासाठी प्रत्येक विभागाला दिलेली जबाबदारी योग्यरित्या पार पाडावी. कार्यक्रमासाठी येणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्यांसाठी नाश्ता व पिण्याच्या पाण्याची चोख व्यवस्था करावी. उपस्थित राहणाऱ्या दिव्यांग लाभार्थींची स्वतंत्र्य बैठक तसेच लाभार्थ्यांना कार्यक्रमस्थळी नेण्याची व्यवस्था करावी. मुख्यमंत्री महोदय स्टॉलला भेट देण्याची शक्यता असल्याने त्यासाठी यंत्रणेने सतर्क राहून परिपूर्ण नियोजन करावेत. लाभार्थींना वाटप करण्याच्या वस्तू व्यवस्थित लावाव्यात. स्टॉलवर भेट देणाऱ्या नागरिकांना संपूर्ण योजनेची परिपूर्ण माहिती देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी यंत्रणेला दिल्यात.

या बैठकीस जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

०००

वीर जवान मनोज माळी यांच्यावर शासकीय इतमामात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

धुळे, दि. ९ (जिमाका) : ‘अमर रहे…, अमर रहे… वीर जवान मनोज माळी अमर रहे…’च्या घोषात आज सकाळी वाघाडी, ता. शिरपूर येथे वीर जवान मनोज माळी यांना हजारो नागरिकांनी साश्रूपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप दिला.

भारतीय सैन्य दलात सिक्कीम येथे कार्यरत लान्सनायक मनोज माळी यांना ६ जुलै, २०२३ रोजी सिक्कीम येथे उंच डोंगराळ प्रदेशात कर्तव्य बजावत असतांना त्यांचा अचानक पाय घसरुन थेट ५०० ते ६०० फुट खोल दरीत कोसळून जखमी होऊन वीरमरण प्राप्त झाले. त्यांचे पार्थिव आज सकाळी वाघाडी, ता. शिरपूर येथे आणण्यात आले. त्यानंतर सजविलेल्या वाहनातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यानिमित्त ग्रामस्थांनी अंगणात रांगोळ्या रेखाटल्या होत्या. शालेय विद्यार्थी हातात तिरंगा घेवून ‘अमर रहे…, अमर रहे….. वीर जवान मनोज माळी अमर रहे’सह भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणा देत होते.

वीर जवान मनोज माळी यांचे पार्थिव अंत्यसंस्काराच्या ठिकाणी आल्यानंतर आमदार काशिराम पावरा, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा मेजर डॉ. निलेश पाटील, तहसीलदार महेंद्र माळी, भूपेशभाई पटेल, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ तुषार रंधे, सैनिक कल्याण संघटक रामदास पाटील यांचेसह मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. पोलिस दल आणि सैन्य दलाच्या तुकडीने हवेत गोळीबाराच्या तीन फैरी झाडत मानवंदना दिली. माजी सैनिकांनीही वीर जवानास अभिवादन केले.

वीर जवान माळी यांच्या भावाने मुखाग्नी दिला. आमदार श्री. पावरा व इतरांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी वीर जवान माळी यांचे कुटुंबीय, सैन्य दलाचे अधिकारी, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, नातेवाईक, आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००

विदर्भाच्या विकासाचा ‘टेक ऑफ’ झाला आहे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर,दि.९ :  रस्ते, रेल्वे, विमानतळ विकास यामार्फत विदर्भ लॉजिस्टिक हब म्हणून विकसित होणार आहे. समृद्धी महामार्गामुळे हे शक्य झाले आहे. यासोबतच वैनगंगा-नळगंगा नदी जोड प्रकल्पातून शाश्वत सिंचनाचा पर्याय पुढील काही वर्षात उपलब्ध होणार आहे. विदर्भाच्या सर्वांगिण विकासाचा ‘टेक ऑफ’ झाला आहे. आता विकासाचा आलेख खाली येणार नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक दिवसीय विदर्भ विकास मंथन परिषदेचा समारोप करतांना केले.

विवेक स्पार्क फाऊंडेशन व वेद परिषद यांच्या मार्फत एक दिवसीय विदर्भ विकास मंथनचे आयोजन करण्यात आले होते. कृषी, शिक्षण आणि कौशल्य विकास, पर्यावरण, आरोग्य, उद्योग आणि रोजगार, खाणी आणि खनिजसंपदा, सामाजिक न्याय व सुरक्षा, जलसंधारण, साहित्य आणि संस्कृती विकास या नऊ विषयांवर विदर्भ विकास मंथनचे आयोजन करण्यात आले होते.

या परिषदेतील नऊही विषयावरील चर्चेतील सार ऐकूण घेतल्यानंतर उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यातील तज्ज्ञांच्या महत्वपूर्ण व परिणामकारक सूचनांवर शासन निश्चित विचार करेल. आजच्या विचार मंथनाचा अहवाल शासन दरबारी सादर करावा, असे सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की,  विदर्भाच्या विकासासाठी शाश्वत विकासाचे सूत्र वापरण्यात आले आहे. त्यासाठी काही योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून सिंचन, जलसंधारण, वीज पुरवठा, दळणवळण, उद्योग, कौशल्य विकास या क्षेत्रात कायमस्वरुपी प्रभाव टाकणाऱ्या योजनांना कार्यान्वित करण्यात आल्याचे सांगितले. समृद्धी महामार्गामुळे येणाऱ्या काळात लॉजिस्टिक हब निर्मितीला चालना मिळेल. या महामार्गाच्या जोडीला नागपूरचे नवीन विमानतळ लवकरच तयार होत आहे. मिहान प्रकल्पासाठी गतीशील निर्णय व्हावेत यासाठी नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनाच सहव्यवस्थापकाचे (जॉईंट एमडी) अधिकार बहाल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

जलयुक्त शिवार योजनेमुळे महाराष्ट्रातील भूगर्भातील पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. ही योजना प्रभावीपणे राबविली जाईल. तसेच यापूर्वीच्या चेक डॅम व अन्य जलसाठ्यांचे पुनर्जीवन केले जाईल. पाणी वाटप संस्था व त्यांचे प्रशिक्षण याकडे लक्ष वेधले जाईल. राज्य शासनाने नदी जोड प्रकल्पाअंतर्गत वैनगंगा ते नळगंगा या बहुआयामी प्रकल्पाला पुढील सात वर्षात पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. यातून पूर्व व पश्चिम विदर्भाला शाश्वत जलसाठा व सिंचन क्षमता निर्माण होईल. हा प्रकल्प कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रात शेतकऱ्यांना सिंचनासाठी  दिवसा १२ तास वीज मिळावी यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दमदारपणे राबविली जात आहे. शेतीचे सर्व फिडर सौर ऊर्जेवर करण्यात येणार आहे. या क्षेत्रात कोट्यावधीची गुंतवणूक खाजगी कंपन्यामार्फत होत आहे. शाश्वत ऊर्जानिर्मितीच्या माध्यमातून सिंचन समृद्धी केली जाणार आहे. एकाच ठिकाणी अनेक योजना यशस्वीपणे राबविणाऱ्या नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजने मार्फत गावे समृद्ध करण्याकडे लक्ष वेधले जात असून जागतिक बँकेने या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सहा हजार कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे.

पर्यावरणाच्या संदर्भात जागरुकता व क्षमतावृद्धी या सूत्रावर काम करण्यात येईल. शैक्षणिक सुधारणा करतांना नव्या काळाची पाऊले ओळखून नोकरी देणाऱ्या अभ्यासक्रमांना शिक्षणामध्ये समाविष्ट करण्यात येईल.

आरोग्याच्या संदर्भातील सामान्य माणसांच्या आर्थिक क्षमता लक्षात घेऊन महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून आता कोणत्याही नागरिकांचा ५ लाखापर्यंतचा उपचार मोफत केला जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडीकल कॉलेज उघडण्यात येत असून वैद्यकीय शिक्षणातील व पॅरामेडिकल क्षेत्रातील मनुष्यबळ वाढविण्यात येणार आहे. विदर्भात सिकलसेल, थॅलिसिमीया आजारावरील केंद्र उभारण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमाच्या मंचावर विवेक स्पार्क फाऊंडेशन, वेद परिषद या संस्थेचे देवेंद्र पारेख, सुधीर मेहता, दीपक तामशेट्टीवार, बाळासाहेब चौधरी, महेश पोहणेरकर आदींची उपस्थिती होती. नागपूर व विदर्भातील वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ या एक दिवसीय परिषदेत सहभागी झाले होते. सकाळपासून नऊ विषयांवर तज्ज्ञांच्या समितीने विचारमंथन करुन शासनाने या संदर्भात काय करावे याबाबतचा सूचना तयार केल्या होत्या. उपमुख्यमंत्र्यांपुढे हे मंथन सक्षिप्तपणे सादर करण्यात आले.

०००

पोंभुर्णा तहसील कार्यालय दुरुस्तीसाठी ३० लाख रुपयाची प्रशासकीय मान्यता

चंद्रपूर, दि. ९ : पोंभूर्णा तहसील कार्यालयाच्या देखभाल दुरुस्तीसाठी ३० लाख आणि बोर्डा (ता. चंद्रपूर) येथे नवीन तलाठी कार्यालयासाठी ३० लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता.

जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम सन 2023-24 अंतर्गत शासकीय कार्यालयीन इमारत दुरुस्ती बाब 27-लहान बांधकामे अन्वये, पोंभुर्णा, तहसील कार्यालयाच्या इमारत दुरूस्त करण्यात येणार आहे . त्यासोबतच, शासकीय कार्यालयीन इमारत बांधकाम  बाब 53-मोठी बांधकामे या शिर्षा खाली, बोर्डा येथील तलाठी कार्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. याबाबत या भागातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

०००

जोखीमग्रस्त गावांसाठी शीघ्र प्रतिसाद पथके तत्पर ठेवावी – आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत

पुणे, दि. ९: राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे, या पावसाळ्यात साथरोगाच्या दृष्टिकोनातून जोखीमग्रस्त गावे ओळखून यादी करावी. त्याप्रमाणे गट तयार करून शीघ्र प्रतिसाद पथके सज्ज ठेवावीत, अशा सूचना आरोग्य मंत्री प्रा. डॉ .तानाजी सावंत यांनी दिल्या.

पावसाळ्यात उद्भवणारे आजार व पूर परिस्थिती यावर प्रभावीपणे त्वरित कार्य करण्यासाठी आरोग्य विभागाने जिल्हा व गावपातळीपर्यंत केलेल्या आरोग्य सेवा तयारीचा आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी पुणे येथे राज्यस्तरीय आढावा घेतला. यावेळी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार, संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांची उपस्थिती होती.

कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे व उद्रेक झाल्यास त्वरित उपाययोजना करण्यात यावी, तयारीसाठी जिल्हास्तरावरील अहवाल दररोज तयार करण्यात यावा व त्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात यावे. पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत तपासून पाहावेत ज्यामुळे पिण्यायोग्य पाणी आहे किंवा नाही याची खात्री केली जावी, जिल्ह्यातील नोडल अधिकारी त्यांचे दूरध्वनी क्रमांकांची यादी तयार करून ती प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अद्ययावत ठेवावी व राज्यस्तरावरही पाठवावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

साथरोग नियंत्रणासाठीच्या किट वाटप करण्यात याव्यात व त्याचा अद्ययावत अहवाल तयार ठेवावा, आशासेविका व आरोग्य कर्मचारी यांच्या याद्याही जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे ठेवण्यात याव्यात. तसेच डास उत्पत्ती ठिकाणे यावरही लक्ष द्यावे व पाणी साठे चांगले राहतील यावरही लोकसहभागाद्वारे नियंत्रण ठेवावे. शीघ्रप्रतिसाद पथकाद्वारे करावयाचे कामे तसेच सूचनासाठी एक माहिती पुस्तक तयार करण्यात यावे व  मार्गदर्शक सूचना देण्यात याव्यात, औषध साठा अद्ययावत करून उपलब्ध ठेवण्यात यावा, साथरोगाबाबत जनजागृतीसाठी ग्रामपंचायत, नगरपंचायत येथे फलकही लावण्यात यावेत, असे निर्देशही यावेळी मंत्री डॉ. सावंत यांनी दिले.

अतिरिक्त मुख्य सचिव श्री. म्हैसकर यांनी साथ रोगाबाबतची माहिती लोकांपर्यंत जाण्यासाठी व्यापक जनजागृती करावी, असे सूचित केले. कठीण परिस्थितीत आरोग्य विभाग चांगली जबाबदारी पार पाडत असून पावसाळ्यातील आरोग्य परिस्थितीही व्यवस्थितपणे हाताळण्यास सर्वांनी सक्रिय रहावे, असेही यावेळी सुचविण्यात आले. आरोग्य विभागातील विभागीय आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी सर्व दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

आरोग्य विभागामार्फत पावसाळ्यातील डेंगू, मलेरिया, जापानी मेंदूज्वर, लेप्टोस्पायरोसिस अशा आजारांना नियंत्रित ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहे.

आरोग्य विभागाने केलेल्या उपाययोजना

  • जोखीमग्रस्त गावांची यादी तयार करण्यात आली आहे.
  • गृहभेटी व आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत सर्वेक्षण व रुग्णशोध मोहीम.
  • आश्रमशाळा यांना वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या मार्फत नियमित भेटी.
  • पाणी गुणवत्ता नियंत्रण 76 हजार पाणी नमुने तपासण्यात आले आहेत.
  • पाण्याच्या स्रोतांचा सर्व्हे व प्रत्येक गावांना हिरवे, पिवळे, लाल कार्ड देण्यात आले आहेत.
  • एकात्मिक कीटक व व्यवस्थापन यात परिसर स्वच्छता, डासांचे पासून वैयक्तिक संरक्षणसाठी मच्छरदाणी, डास प्रतिबंधक क्रीम, खिडक्यांना जाळ्या बसविण्याबाबत समुपदेशन करण्यात आले.
  • प्रयोगशाळा सिद्धता
  • पुरेसा औषध साठा
  • शीघ्र प्रतिसाद पथके यांची स्थापना .
  • गावपातळीवर साथरोग सर्वेक्षण तसेच अंतर विभागीय समन्वय व आरोग्य शिक्षण यावरही भर देण्यात येत आहे .

०००

ताज्या बातम्या

अल्पसंख्याक समुहातील विद्यार्थ्यांना परदेश शिक्षणाची संधी

0
अल्पसंख्याक समुहाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना विविधतेत एकता असलेला भारत देश हा अनेक जाती समुहांचा एकसंध देश आहे. याची संस्कृती आणि एकता अबाधित राहण्यासाठी सर्व...

साहित्य अकादमी भाषांतर पुरस्कार २०२५ साठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

0
नवी दिल्ली, दि. 3 : साहित्य अकादमी भाषांतर पुरस्कार वर्ष २०२५ साठी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख...

‘क्रिएट इन इंडिया’ स्पर्धेतील विजेत्यांचे उद्या सादरीकरण

0
मुंबई, दि. ०३ : जिओ वर्ल्ड सेंटर, बीकेसी येथे वेव्हज्‌ 2025 या आंतरराष्ट्रीय दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषदेत उद्या ४ मे रोजी ' क्रिएट इन...

स्थानिक विषयावरील आशयघन निर्मिती जागतिक स्तरावर प्रभावशाली ठरेल – डिबेरा रिचर्ड्स

0
मुंबई, दि. ०३ : मनोरंजनाच्या स्पर्धेत यशस्वी होत दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी कोणत्याही माध्यमातून व्यक्त होताना आशयघन मांडणी महत्त्वाची बाब आहे. त्यादृष्टीने स्थानिक विषयावरील सकस...

‘आयआयसीटी’ची स्थापना भारतासाठी महत्त्वाची – केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव

0
मुंबई, दि. ०३: भारताच्या एव्हीजीसी-एक्सआर परिसंस्थेला सक्षम बनवण्याच्या दिशेने एक मोठी झेप घेत, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने, फिक्की आणि सीआयआयच्या सहकार्याने, केवळ एव्हीजीसी-एक्सआर क्षेत्रासाठी...