गौरी आगमनापूर्वी सर्व पात्र लाभार्थींपर्यंत आनंदाचा शिधा पोहोचवा – पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश
दिग्रसच्या विकासासाठी शंभर कोटींचा डीपीआर तयार – पालकमंत्री संजय राठोड
यवतमाळ, दि. १८ (जिमाका) : दिग्रस शहराच्या विकासासाठी शंभर कोटींचा डिपीआर तयार करण्यात आला आहे. या माध्यमातून दिग्रस शहराचा कायापालट करुन सुंदर शहर निर्माण होणार असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रयत्नातून वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत दिग्रस नगरपरिषद क्षेत्रातील हिंदु स्मशानभूमी सभोवताल आवार भिंत बांधणे व सौदर्यींकरणाच्या कामांसह भाजी मार्केट विकसित करण्यात येणार आहे. या ७ कोटी ६३ लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव सुपारे, नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष विजय बंग, मुख्याधिकारी ज्ञानेश सोनवाणे, तहसिलदार सुधाकर राठोड आदी उपस्थित होते.
दिग्रस शहराच्या विकासासाठी शंभर कोटींचा डिपीआर तयार करण्यात आला आहे. लवकरच त्याला मंजुरी मिळेल. या विकास आराखड्याच्या माध्यमातून दिग्रस शहराचा कायापालट करुन सुंदर शहर निर्माण होणार आहे. मागच्या काळात विविध विकासकामे केले आहेत. येणाऱ्या काळात शहरामध्ये भूमिगत विद्युत व्यवस्था, पाईपलाईन यासह सिमेंट रस्ते, ई-लायब्ररी, युवकांसाठी व्यायामशाळा, दिग्रसवासियांना मुलभूत सोयीसुविधा, बेरोजगारांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात येणार आहे. शहरी आणि ग्रामीण भागामध्ये विकासाची कामे केली जाणार आहेत, असेही पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
दिग्रसमध्ये आदर्श मोक्षधाम करण्याचा आराखडा तयार करा
वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत हिंदु स्मशानभूमी सभोवताल आवार भिंत बांधणे व सौदर्यींकरणाची कामे मंजूर करण्यात आली आहेत. या कामाची अंदाजपत्रकीय रक्कम ५ कोटी ७ लाख ९८ हजार रुपये इतकी आहे. दिग्रस येथील मोक्षधाम परिसर सर्वदृष्टीने विकसित व्हावा यासाठी प्रयत्न करणार आहे. राज्यामध्ये जेवढे मोक्षधाम विकसित झाले आहे. त्यांचा विकास आरखडा एकत्र करुन दिग्रसमध्ये आदर्श ठरेल, असा मोक्षधाम निर्माण करण्याचा आराखडा तयार करावा. जेणेकरुन दिग्रस येथील मोक्षधाम पाहण्यासाठी राज्यभरातून लोक येतील. यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
भाजी मार्केटचे भूमिपूजन
नगरपरिषदेमार्फत वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत २ कोटी ५५ लाख १४ हजार रुपये अंदाजपत्रकीय रक्कमेचे भाजी मार्केट विकसित करण्यात येणार आहे. हे भाजी मार्केट नागपूर विमानतळाच्या धर्तीवर विकसित करण्यात येणार आहे. या भाजी मार्केटमध्ये १६ ओटे, शेड, महिला पोलिसांसाठी शौचालय बांधण्यात येणार आहे. या भाजी मार्केटच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. सुरुवातीस मुख्याधिकारी ज्ञानेश सोनवाणे यांनी प्रास्ताविक केले.
०००
दारव्हात सुसज्ज बचत भवन आणि बॅडमिंटन हॅाल बांधकामाचे भूमिपूजन
दारव्हा नगरपरिषद हद्दीतील जुन्या बचत भवनाच्या क्षतीग्रस्त इमारतीच्या जागेवर सुसज्ज बचत भवन आणि बॅडमिंटन हॅाल बांधण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी डॅा. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा. मैनाक घोष, पोलीस अधीक्षक डॅा. पवन बनसोड, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर, तहसिलदार विठ्ठल कुमरे, मुख्याधिकारी विठ्ठल केदारे आदी उपस्थित होते.
वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत या बचत भवन आणि बॅडमिंटन हॅाल बांधकाम केले जाणार आहे. या कामाची अंदाजपत्रकीय रक्कम सहा कोटी ९९ लाख ५२ हजार ६५६ इतकी आहे.
नाशिक कृषी टर्मिनल मार्केटसाठी १०० एकर जागा हस्तांतरणाची कार्यवाही तातडीने करा – मंत्री छगन भुजबळ
नाशिक, दिनांक 18 सप्टेंबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा) : नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण प्रकल्प असणाऱ्या कृषी टर्मिनल मार्केटच्या कामास गती येण्यासाठी मौजे सैय्यद पिंपरी ता. जि. नाशिक येथील गट नं. १६५४ मधील १०० एकर जागा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडे लवकरात लवकर हस्तांतरित करण्याची कार्यवाही करावी. असे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात लासलगाव बाहय वळण रस्ता, सावरगाव साठवण तलाव, राजापूरसह 41 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, धुळगाव व १७ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, पुणेगाव डावा कालवा व दरसवाडी पोहोच कालवा भूसंपादन मोबदला, तसेच नाशिक येथील कृषि टर्मिनल मार्केट बाबत आढावा बैठक मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी ते बोलत होते.
बैठकीस विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार दिलीप बनकर, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अर्जुन गुंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते, पणन महामंडळाचे सहव्यवस्थापक एस. वाय पुरी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, निफाडच्या प्रांताधिकारी हेमांगी पाटील, येवल्याचे प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, चांदवड प्रांताधिकारी चंद्रशेखर देशमुख, भूसंपादन अधिकारी रविंद्र भारदे, सीमा अहिरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी व शेतकरी उपस्थित होते.
मंत्री भुजबळ पुढे म्हणाले की, नाशिक हा कृषीप्रधान जिल्हा असल्यामुळे येथे भाजीपाला, फळे व अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन घेतले जाते. शेतकऱ्यांच्या कृषी मालाला चांगली बाजारपेठ मिळावी यासाठी नाशिक येथे अद्ययावत कृषी टर्मिनल मार्केट उभारण्याच्या प्रस्तावास नाशिक
विकास पॅकेज अंतर्गत शासनाने मान्यता दिलेली आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने नाशिक येथे कृषी टर्मिनल मार्केट उभारणीसाठी मौजे पिंपरी सैय्यद, ता. जि. नाशिक येथील
गट क्र. १६२१ व गट नं १६५४ मधील शासन मालकीच्या जागेपैकी १०० एकर जमीनीची मागणी केलेली होती. या विषयावर मार्ग काढण्यासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री यांचे अध्यक्षतेखाली बैठक झाली असून या जागांची संबंधित अधिकाऱ्यांसोबत स्थळ पाहणीही केलेली आहे. त्यानुसार गट नं. १६५४ मधील क्षेत्र योग्य असून हे क्षेत्र वाणिज्य वापर विभागात अंतर्भुत असल्याने या गटातील १०० एकर जागा या प्रकल्पाला उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय झालेला असल्याने ही जागा कृषी टर्मिनल मार्केटसाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाला लवकरात लवकर हस्तांतरित करण्यात यावी. त्याचबरोबर लासलगांव-विंचूर रामा क्र.७ या रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपूल बांधणे, वळणरस्ता व उड्डाणपुलाचा पोहोच मार्ग या कामांच्या भूसंपादनाबाबत 31 कोटींचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे. नागरीकांची गैरसोय होवू नये याकरीता शेतकऱ्यांनी भूसंपादनासाठी नाहरकत असल्याचे कळविल्यास पुढील प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
तसेच सावरगाव, ता. निफाड येथील साठवण तलावासाठी भूसंपादित होणारी सावरगाव ग्रामपंचायतची जमीन हस्तांतरण करणे व खडकमाळेगाव येथील भूसंपादनासाठी सर्व यंत्रणांची नाहरकत लवकरात लवकर मिळवून कार्यवाही करण्याच्या सुचनाही त्यांनी बैठकीत दिल्यात.
राजापूर सह ४१ गांवे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, धुळगाव व १७ गांवे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतंर्गत 62 किमी पैकी 15 किमीचे काम सुरु असून नागरीकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी वन विभागाच्या हद्दीतील कामांसाठी वन विभागाची मान्यता लवकरात लवकर प्राप्त करुन घ्यावी. पुणेगाव डावा कालवा व दरसवाडी पोहोच कालव्यासाठी दिंडोरी, चांदवड, निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना भूसंपादनाचा दर मान्य नसल्याने त्यांना नियमानुसार योग्य तो मोबदला देण्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याच्याही सूचना मंत्री भुजबळ यांनी सर्व संबंधितांना दिल्यात.
यावेळी निफाड-कुंदेवाडी येथील पुल तयार असून रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या जागेच्या भुसंपादनाची कार्यवाही करणे तसेच ड्रायपोर्ट प्रकल्पाला चालना देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची सूचना आमदार बनकर यांनी बैठकीत केली. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी या कामांबाबत जिल्हा प्रशासनाच्या पातळीवरील कार्यवाही तातडीने करण्यात येईल असे बैठकीत सांगितले.
000
पूरामुळेबाधित शेती क्षेत्राचे तात्काळ पंचनामे करावेत – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन
जळगाव,दि. 18 सप्टेंबर (जिमाका) – तापी नदीला आलेल्या पुरामुळे व बॅकवॉटरने बाधीत शेतपिकांची तात्काळ स्थळ पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी जिल्हा प्रशासनास केल्या आहेत.
संततधार पाऊस आणि वादळामुळे शनिवारी, रावेर तालुक्यातील पिकांचे नुकसान झाले आहे. मध्यप्रदेशातील पावसामुळे तापी नदीच्या जलपातळीत झालेल्या वाढीमुळे हतनूर धरणाचे सर्व ४१ दरवाजे पूर्ण उघडण्यात आल्याने तसेच तापी नदीचे बॅकवॉटर नदीकाठच्या गावातील शेत पिके व घरांमध्ये शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. या गावातील ६७ कुटुंबांना दुसरीकडे स्थलांतरित करण्याचे काम केले. तलाठी, महसूल सहायक यांनी नुकसानग्रस्त गावांना भेटी देऊन नुकसानीचा पंचनामा करून अहवाल सादर करावा. लोकांना दिलासा देण्यासाठी उपाययोजना राबविण्यात याव्यात. असा सूचनाही ग्रामविकास मंत्री श्री. महाजन यांनी दिलेल्या आहेत.
०००
इंडियन स्वच्छता लीग अंतर्गत नवीमुंबई महापालिकेचा विक्रम; एकाच वेळी १ लाख १४ हजार विद्यार्थी व नागरिक सहभागी
नवी मुंबई, दि.18 : ‘इंडियन स्वच्छता लीग’ कार्यक्रमा अंतर्गत नवीमुंबई महापालिका क्षेत्रात 1 लाख 14 हजारहून अधिक विद्यार्थी आणि नागरिकांनी एकात्मता आणि स्वच्छता विषयक शपथ घेण्याचा विक्रम केला आहे.
गतवर्षी नवीमुंबई महानगर पालिकेला देशात प्रथम क्रमांकाचे नामांकन मिळाले होते. हे नामांकण कायम रहावे यासाठी नवीमुंबई महानगरपालिका आयुक्ता तथा प्रशासक श्री.राजेश नार्वेकर यांनी शहरातील विविध भागात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी नेरूळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई या उपक्रमस्थळी उपस्थित राहून उपस्थितांचा उत्साह वाढविला. याठिकाणी आयुक्तांसमवेत सर्व उपस्थितांनी स्वच्छता शपथ सामुहिकरित्या घेतली. यावेळी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी नवी मुंबईकरांचा उत्साह बघून भारावून गेलो असल्याची भावना व्यक्त केली. नवी मुंबईकर विद्यार्थी, युवक, नागरिक, लोकप्रतिनिधी यांची स्वच्छतेविषयीची ही जागरूकता व शहराविषयीचे प्रेमच नवी मुंबईला कायम नंबर वनवर ठेवेल असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.
शहरात विविध विभागांमध्ये 9 ठिकाणी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. याशिवाय काही स्वयंसेवी संस्थांनी आपापल्या भागात स्वच्छता मोहीमा राबवून त्याठिकाणीही स्वच्छतेची सामुहिक शपथ ग्रहण केली.
पाच ठिकाणी खाडीकिनारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तेथेही उपस्थितांनी स्वच्छता शपथ घेतली. आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्यासमवेत अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी त्याठिकाणी उपस्थित राहून खारफुटी स्वच्छतेत सहभागी झालेल्या जागरूक नागरिकांना प्रोत्साहित केले. यामध्ये 10 हजार 500 हून अधिक नागरिक स्वयंस्फु्र्तीने सहभागी झाले होते. त्यातही युवकांची व विशेषत्वाने युवतींची संख्या लक्षणीय होती.
लेट्स सेलिब्रेट फिटनेस या संस्थेच्या माध्यमातून रिचा समित यांच्या पुढाकाराने वाशी विभागात 235 तृतीयपंथी नागरिकांनी एकत्र येत स्वच्छतेविषयी अभिनव पध्दतीने जनजागृती केली.
स्वच्छ व सुंदर शहर अशी ओळख असणा-या नवी मुंबईकर विद्यार्थी, नागरिकांची स्वच्छतेविषयी असलेली जागरूकता आणि शहराविषयी असणारे प्रेम यांचे दर्शन घडविणारा हा भव्यतम उपक्रम नवी मुंबईला स्वच्छतेच्या धाग्याने जोडणारा व शहरात स्वच्छतेची चळवळ निर्माण करणारा ठरला.
प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी केले अभिवादन
छत्रपती संभाजीनगर, दि.१७(जिमाका)- थोर समाजसुधारक, पत्रकार प्रबोधनकार तथा केशव सीताराम ठाकरे यांच्या जयंती निमित्त आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
सिद्धार्थ उद्यानातील स्मृती संग्रहालयात हा कार्यक्रम पार पडला. उपमुख्यमंत्री अजित पवार,आ.प्रदीप जैस्वाल, आ. संजय शिरसाट तसेच विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी स्वातंत्र्य सैनिक लाला लक्ष्मीनारायण जयस्वाल यांच्या तैलचित्राचे अनावरण ही करण्यात आले.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वर्ग तीनची रिक्त पदे १५ दिवसात भरणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
• संचमान्य प्राध्यापक आणि वर्ग ४ च्या पदभरतीबाबतही लवकरच निर्णय
लातूर, दि. 17 (जिमाका) : येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त जागाबाबतची सद्यस्थिती जाणून घेतली असून येत्या 15 दिवसात वर्ग तीनच्या रिक्त जागा भरल्या जातील. तज्ज्ञ प्राध्यापकांच्या भरतीसाठी राज्यस्तरावर समिती नेमली आहे, त्यांचा अहवाल येताच संचमान्य प्राध्यापक यांची नेमणूक केली जाईल. तसेच वर्ग चारच्या पदांबाबतही आपण सकारात्मक असून त्याचा निर्णय लवकरच घेणार असल्याचे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कामकाजाचा आढावा बैठकीत ना. मुश्रीफ बोलत होते. अधिष्ठाता डॉ. समीर जोशी, प्राध्यापक डॉ. शैलेन्द्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता डॉ. सलीम शेख, कार्यकारी अभियंता डी. बी. नीळकंठ यांच्यासह अधिकारी यावेळी उपस्थित होते.
राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांचे बळकटीकरण करण्यास शासनाचे प्राधान्य असून काल छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हिंगोली येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबत महत्वाचा निर्णय झाला आहे. राज्यातील काही वैद्यकीय महाविद्यालये जिल्हा सामान्य रुग्णालयांशी त्या त्या वेळी जोडले गेले.तसेच काही वैद्यकीय महाविद्यालयांच्या इमारती जुन्या झाल्या असल्याने येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांना पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी विविध पदांची पदभरती प्रक्रिया सुरु असल्याचे ना. मुश्रीफ यांनी सांगितले.
गरीब, गरजू कुटुंबांसाठी महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजनेतून औषध उपचाराची सुविधा आता 5 लाखांवर नेण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेतील खासगी रुग्णालयातही रुग्णांना 5 लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार असल्याचे ना. मुश्रीफ म्हणाले. तसेच सध्या राज्यात कॅन्सर रुग्णांचे प्रमाण वाढत असून कॅन्सर होऊच नये यासाठी प्रबोधनाची गरज आहे. तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनापासून नागरिकांनी दूर राहावे, असे आवाहन त्यांनी केले. शासकीय रुग्णालयात येणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी आपुलकीने वागण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. मुश्रीफ यांनी लातूर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलची पाहणी केली. तसेच हे हॉस्पिटल लवकरात लवकर सुरु करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले.
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रास भेट
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रास भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते बौद्धिक दिव्यांग मुलांना टीएलएम कीटचे वितरण करण्यात आले. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे दिव्यांगासाठीचे कार्य महत्वपूर्ण असल्याचे ना. मुश्रीफ यावेळी म्हणाले. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. समीर जोशी, डॉ. शैलेंद्र चव्हाण, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य वैजनाथ व्हनाळे, सुरज बाजूळगे, पारस कोचेटा, व्यंकट लामजने, योगेश बुरांडे उपस्थित होते.
तरुणांच्या कौशल्य विकासातून रोजगार निर्मितीवर भर – मंत्री छगन भुजबळ
नाशिक, दि. 17 सप्टेंबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा) :- शासनामार्फत विविध प्रशिक्षणाच्या माध्यमातून तरुणांमधील कौशल्य विकसित करून रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्यात येत असल्याचे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त येवला, जि. नाशिक येथे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता व नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, येवला यांच्यातर्फे पीएम स्कील रन तसेच सन २०२३ मधील परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान समारंभ, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बाभूळगाव ता. येवला येथे संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.
मंत्री श्री. भुजबळ म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात काम करत असलेल्या महायुती सरकार तरुणांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत अनेक योजना राबवीत आहे. भारतासारख्या मोठी लोकसंख्या असणाऱ्या देशाला भेडसावणाऱ्या प्रश्नापैकी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे रोजगार निर्मिती. रोजगार निर्मिती वाढविण्यासाठी देश पातळीवर अनेक प्रयत्न केले जात आहेत. गरजेनुसार व बदलत्या आधुनिक गरजांनुसार विविध योजना नव्याने आणल्या जातात व त्यांची अंमलबजावणी करण्यात येते. याव्दारे रोजगार निर्मिती अथवा स्वयंरोजगार पुरवून रोजगाराचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. कौशल्य विकासाच्या प्रशिक्षणातून रोजगार प्राप्ती हा दृष्टीकोन समोर ठेवण्यात आला आहे. मेक इन इंडिया, स्किल इंडिया या संकल्पनेस अनुसरून कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र हे ध्येय समोर ठेवलेले आहे. राज्यातील युवक-युवतींचा प्रशिक्षणाद्वारे कौशल्य विकास करून रोजगार तसेच स्वयंरोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकास अभियान राबविण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यातील तरुणांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीने शनिवार दि.२३ सप्टेंबर रोजी एमईटी भुजबळ नॉलेज सिटी मध्ये भव्य रोजगार मेळावा आयोजित केल्याचेही त्यांनी सांगितले.
मंत्री भुजबळ पुढे म्हणाले की, नियमित अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थ्यांनी वेगवेगळी कौशल्ये आत्मसात केली तर त्याचा निश्चितच फायदा होतो. कौशल्य आणि ज्ञान हे देशाच्या आर्थिक वाढीची आणि सामाजिक विकासाची प्रेरक शक्ती आहे. भारतासारख्या लोकसंख्येसह वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेत एकीकडे उच्च प्रशिक्षित गुणवत्ता कुशल संसाधनांची कमतरता असून, दुसरीकडे लोकसंख्येचा एक मोठा वर्ग असा आहे की, ज्याच्याकडे थोडी किंवा अजिबातच नोकरीविषयक कौशल्ये नाहीत. शैक्षणिक पात्रतांसह, बदलत्या काळाचा सामना करण्यासाठी आणि कठीण तंत्रज्ञानाच्या आव्हानांना तोंड देण्यास सक्षम असलेल्या गतिशील आणि उद्योजक तरुणांना तयार करणे आवश्यक आहे.
कोणतेही विशिष्ट कार्य करण्यासाठी कौशल्य एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. कौशल्य निर्माणाकडे उत्पादनाची परिणामकारकता आणि कामगारांचे त्यातील योगदान सुधारण्याचे एक साधन म्हणून पाहिले जाऊ शकते. कौशल्य निर्माण हे उत्पादन क्षमता व अर्थव्यवस्थेचा विकासदर वाढविण्यासाठीचे ते एक महत्त्वपूर्ण घटक आहेत, असेही त्यांनी सांगितले.
भारत हा जगातील वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेपैकी एक असून भारताकडे जगभरातील विविध अर्थव्यवस्थांना कुशल मनुष्यबळ पुरविण्याची क्षमता आहे. तसेच स्वतःच्या वाढीच्या क्षमतेमुळे स्वतःच्या गरजा पुरविण्याची क्षमता भारतात आहे. वाढती बाजारपेठ आणि कुशल मनुष्यबळाचे स्त्रोत असलेल्या भारतात विदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यासाठी आपल्या देशात कुशल मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणावर गरज निर्माण झाली आहे. यासाठी शासनाच्या वतीने कौशल्य विकासास प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कौशल्य विषयक शिक्षण घेणे काळजी गरज बनली असून विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रातील कौशल्य आत्मसात करण्याची आवश्यकता आहे, असेही मंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीताने करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व श्री विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी मंत्री भुजबळ यांच्या हस्ते रन फाॅर स्कील तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात श्री. राठोड यांनी कार्यक्रम आयोजनामागील भूमिका विशद करून संस्थेच्या प्रगतीची माहिती दिली.
कार्यक्रमास प्राचार्य वाय. के. कुलकर्णी, सदस्य सचिव आर. एस. राजपूत, यांच्यासह संस्थेतील शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000