मंगळवार, मे 6, 2025
Home Blog Page 1142

मराठी रंगभूमीच्या सक्षमतेसाठी बालरंगभूमीला प्रोत्साहन देणे आवश्यक – उद्योग मंत्री उदय सामंत

नागपूर दि. 12  : मराठी रंगभूमीला अधिक बळकट बनविण्यासाठी बालरंगभूमीला प्रोत्साहन देऊन सक्षम करणे आवश्यक असल्याचे मत उद्योग मंत्री तथा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त उदय सामंत यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नागपूर शाखेचा पुरस्कार वितरण सोहळा आज येथील श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृहात आयोजित करण्यात आला होता.  त्यावेळी ते बोतल होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय हिंदी संस्था संघाचे राष्ट्रिय अध्यक्ष अजय पाटील, नाटककार व दिग्दर्शक सतीश पावडे, परिषदेच्या नागपूर शाखेचे अध्यक्ष प्रफुल्ल फरकसे, शेखर सावरबांधे, समाजसेवक दीपक मते याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.

अखिल भारतीय  मराठी नाट्य परिषद ही सर्व नाट्य संस्थांची मातृसंस्था असून या संस्थेची सर्वांनी प्राधाण्याने सेवा करावी.  व्यावसायिक रंगभूमीप्रमाणेच बालरंगभूमी, हौशीरंगभूमी, झाडीपट्टी, दशावतार यांनाही पुढे नेणे आवश्यक आहे. भविष्याच्या नाट्य परिषदेच्या उन्नतीसाठी आपण सर्वतोपरी मदत करू, असे आश्वासनही श्री. सामंत यांनी दिले.

मराठी रंगभूमीवर आपले विशेष योगदान देणाऱ्या नागपूर जिल्ह्यातील व विदर्भातील रंगकर्मींचा सन्मान व सत्कार दरवर्षी नागपूर शाखेतर्फे करण्यात येत असल्याचे परिषदेचे केंद्रीय उपाध्यक्ष आणि नागपूर शाखेचे कार्यवाह नरेश गडेकर यांनी प्रास्ताविकेत सांगितले तसेच नाट्य परिषदेच्या कार्याची माहिती दिली.

याप्रसंगी ज्येष्ठ रंगकर्मी अरविंद पाठक यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  तर अनेक वर्षांपासून रंगभूमीवर कार्यरत संजय वलिवकर यांना ज्येष्ठ रंगकर्मी पुरस्कार, निवेदन क्षेत्रात कार्यरत रूपाली मोरे यांना श्रेष्ठ रंगकर्मी पुरस्कार,अनिल उर्फ बापू चणाखेकर यांना रंगसेवा पुरस्कार,मंदार मोरोणे यांना नाट्य समीक्षा पुरस्कार,आनंद भीमटे यांना सर्वोत्कृष्ट नाट्य लेखकाचा पुरस्कार,अमरकुमार मसराम यांना झाडीपट्टी ज्येष्ठ रंगकर्मी पुरस्कार तसेच वर्षा शुक्ल (गुप्ते) यांना झाडीपट्टी श्रेष्ठ रंगकर्मी पुरस्कार प्रदान करण्यात आला. उद्योग मंत्री उदय सामंत आणि  डॉ. गिरिश गांधी यांची अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त म्हणून निवड झाल्याबद्दल आयोजकांतर्फे त्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. दिवंगत  नाटककार जयकुमार भुसारी यांच्या  जन्मशताब्दी वर्षानिमित्त्त यावर्षीपासून सर्वोत्कृष्ट बालनाट्य लेखकास स्व. जयकुमार भुसारी स्मृती पुरस्कार देण्याची सुरूवात करण्यात आली. हा पहिला पुरस्कार गणेशकुमार वडोदकर यांना देण्यात आला.  कार्यक्रमाचे संचालन वैदेही चौरी यांनी केले.

कार्यक्रमाला आभा मेघे, निलेश खांडेकर, अविनाश सोनोने, रविंद्र भुसारी, राकेश खाडे, संदीप इटकेवार,अरविंद पाठक तसेच परिषदेचे पदाधिकारी व नाट्यक्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

000

राज्याला वस्त्रोद्योगाचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट ठेवावे – वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. 12 : राज्याच्या विकासात वस्त्रोद्योगाची महत्त्वाची भूमिका आहे. नवीन वस्त्रोद्योग धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करून  महाराष्ट्र  वस्त्रोद्योगाचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे प्रतिपादन वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

वस्त्रोद्योग विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या नवीन संकेतस्थळाचा शुभारंभ मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आला. यावेळी वस्त्रोद्योग विभागाचे सचिव वीरेंद्र सिंग,उपसचिव श्रीकृष्ण पवार व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, या https://mahatextile.maharashtra.gov.in  संकेतस्थळावर वस्त्रोद्योग विभाग, वस्त्रोद्योग आयुक्तालय, रेशीम संचालनालय महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ, महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ, कार्यक्रम अंदाजपत्रकाची माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे वस्त्रोद्योगाची जागतिक बाजारपेठेतील माहिती बरोबरच उद्योजकांना स्पर्धात्मक राहण्यास नक्कीच मदत होईल, असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

००००

काशीबाई थोरात/विसंअ/

 

 

राज्यात ७०० ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना; निधी मंजुरीस मान्यता, शासन निर्णय निर्गमित

मुंबई, दि. १२ : ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ स्थापन करण्यासाठी व सन २०२३ – २४ या आर्थिक वर्षासाठी आवश्यक असलेला रु.२१०.०१ कोटी रुपये निधी आगामी पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे मंजूर करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

जनतेला प्राथमिक आरोग्य केंद्र, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, स्त्री रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय व महानगरपालिका रुग्णालय यांच्यामार्फत आरोग्य सेवा उपलब्ध करुन दिली जाते. राज्यातील दवाखाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाने अद्ययावत बनविण्यासाठी सातत्यपूर्ण आरोग्य, गुणवत्तापूर्ण सेवा तसेच सुलभ आणि परवडणारी जागतिक दर्जाची आरोग्य सेवा प्रदान करुन राज्याचा आरोग्य निर्देशांक वाढविण्याचे शासनाचे धोरण आहे. अतिशय दाटीवाटीने वसलेल्या भागात व झोपडपट्टी क्षेत्रात दवाखाने स्थापन करुन आरोग्य सेवा देण्याचे प्रयोग सुरु करण्यात आलेले आहेत. याच धर्तीवर मुंबई महानगरपालिकेने सन २०२२-२३ मध्ये “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” केंद्राची स्थापना केली आहे.मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर राज्यामध्ये एकूण ७०० ठिकाणी “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” स्थापन करण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात घोषणा केली. त्यानुसार ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ या योजनेसाठी मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर आरोग्य केंद्रासाठी औषधे, चाचण्या, सॉफ्टवेअर, हार्डवेअर, ५०० चौरस फूट जागा, फर्निचर, स्वच्छता व सुरक्षा उपलब्ध करुन देणे, वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका, औषध निर्माण अधिकारी, सफाई कर्मचारी व अटेंडंट एवढा कर्मचारी वर्ग,  ३० प्रकारच्या चाचण्या, १०५ प्रकारच्या औषधी, ६६ प्रकारची वैद्यकीय उपकरणे,  फर्निचर व वैद्यकीय साहित्य सामग्री, सॉप्टवेअर, हार्डवेअर उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात येत आहे.

आपला दवाखान्याची वेळ दुपारी २ ते रात्री १० अशी ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही योजना नवीन असल्यामुळे त्यासाठी नवीन लेखाशीर्ष उघडण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही योजना ५ वर्षासाठी कार्यरत राहणार असल्याने या योजनेसाठी द्यावयाची प्रशासकीय मान्यता ५ वर्षासाठी देण्यात आली आहे.

‘आपला दवाखाना’ या योजनेचे कार्यक्षेत्र राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, कटकमंडळे इ. ठिकाणी साधारणत: १५००० लोकसंख्यामागे एक याप्रमाणे दवाखान्यांची निर्मिती करण्यात येईल.  आपला दवाखाना” आरोग्य केंद्र स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या जागेची निवड १५ व्या वित्त आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी करण्यासाठी तसेच निधीच्या विनियोगाबाबत नियोजन व संनियंत्रण जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीकडून करणार आहे.

‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजनेत या बाबींचा आहे अंतर्भाव…

आरोग्य सेवा लाभार्थ्यांना मोफत पुरविण्यात येईल. जिल्हा आरोग्य सोसायटीने भाड्याने जागा घ्यावी, त्यामध्ये आवश्यक बदल करावेत, सोयीसुविधा पुरवाव्यात, यंत्रसामुग्री, औषधे व डॉक्टरसहीत इतर कर्मचारी वर्ग उपलब्ध करावा.सदर ५०० चौरस फूट भाड्याची जागा “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” साठी उपलब्ध करावी. दवाखान्यामध्ये औषधी वितरण मोफत पुरविण्यात येईल. प्रत्येक दवाखान्यामध्ये एकूण ३० प्रकारच्या चाचण्या करणे आवश्यक राहील. आपला दवाखान्यामध्ये एकूण १०५ प्रकारच्या औषधी असतील.

००००

निलेश तायडे/ससं/

शासकीय कार्यालयांमध्ये प्रीपेड स्मार्ट मीटरचे काम प्राधान्याने हाती घ्यावे – ऊर्जा मंत्रालयाच्या वीज वितरण कंपन्यांना सूचना

नवी दिल्ली 12  : शासकीय विभागांच्या वीज बिलाच्या थकबाकीचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये प्रीपेड स्मार्ट मीटरचे काम प्राधान्याने हाती घेण्याच्या सूचना केंद्रीय ऊर्जा आणि नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर.के.सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत उपस्थित सर्व राज्यांच्या अधिका-यांना दिल्या.

केंद्रीय ऊर्जा आणि नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्री श्री. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे 10 आणि 11 जुलै 2023 रोजी राज्य सरकारे आणि राज्यांतील वीज निर्मिती कंपन्यांबरोबर  आढावा, नियोजन आणि देखरेख  (आरपीएम) संदर्भातील बैठक पार पडली.  केंद्रीय ऊर्जा आणि नवीन व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री क्रिशन पाल गुर्जर यांच्यासह केंद्रीय ऊर्जा  सचिव, विविध राज्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव/सचिव/प्रधान सचिव, राज्य वीज निर्मिती कंपन्यांचे अध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक  बैठकीला उपस्थित होते.

वीज निर्मिती क्षेत्रात गेल्या सात-आठ वर्षांमध्ये देशात प्रचंड बदल घडवून आल्याचे सांगत, केंद्रीय मंत्री श्री. सिंह म्हणाले की, देशाच्या वीज निर्मिती क्षमतेत 185 गिगावॅटची भर घालून आपण आपल्या देशामध्ये परिवर्तन घडवत वीज टंचाईकडून अतिरिक्त वीज उपलब्धता  असलेला देश या स्थितीत आणले आहे. आपण संपूर्ण देशाला  एकात्मिक ग्रीडने जोडले असून, आता 1,12,000 मेगावॉट वीज देशाच्या एका कोपऱ्यातून सहजगत्या दुसऱ्या कोपऱ्यात हस्तांतरित होऊ शकते.

या बैठकीमध्ये, ऊर्जा क्षेत्रासंदर्भात नुकत्याच करण्यात आलेल्या विविध सुधारणांबाबत चर्चा करण्यात आली. सर्व राज्यांनी यापुढे बहु-वार्षिक  शुल्क आकारणी पद्धती अनुसरण्याचे निर्देश श्री.सिंह यांनी दिले. तसेच डीआयएससीओएमकडून अनुदानाचे अचूक लेखापरीक्षण तसेच संबंधित राज्य सरकारांकडून अनुदानाची प्रलंबित रक्कम वेळेत अदा करण्याचे महत्त्व केंद्रीय मंत्र्यांनी विषद केले. शासकीय विभागांच्या वीज बिलाच्या थकबाकीचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये प्रीपेड स्मार्ट मीटरचे काम प्राधान्याने हाती घेण्याच्या सूचना वीज वितरण कंपन्यांना यावेळी  देण्यात आल्या.

झोपडपट्टी पुनर्वसन योजना पूर्ण करण्यास मंजुरी देण्यासाठी समिती गठित

मुंबई, दि. 12 : रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना पूर्ण करण्यासाठी नामिका सूचीतील विकासकांमार्फत प्राप्त निविदांची छाननी करुन झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने सादर केलेल्या प्रस्तावावर निर्णय घेणे, तसेच अभय योजनेअंतर्गत वित्तीय संस्था/ त्यांनी प्राधिकृत केलेल्या सक्षम संस्थेस ही योजना पूर्ण करण्यास मंजुरी देण्याच्या अनुषंगाने निर्णय घेण्यासाठी अपर मुख्य सचिव (गृहनिर्माण) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे.

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक हे या समितीचे सदस्य असून गृहनिर्माण विभागाचे उप सचिव (झोपसु-१) हे या समितीचे सदस्य सचिव असणार आहेत.

रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना पूर्ण करण्यासाठी नामिका सूचीतील विकासकांमार्फत प्राप्त निविदांची छाननी करून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने सादर केलेल्या प्रस्तावावर निर्णय घेणे, तसेच अभय योजनेअंतर्गत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून प्राप्त प्रस्तावावर वित्तीय संस्था / त्यांनी प्राधिकृत केलेल्या सक्षम संस्थेस रखडलेली योजना पूर्ण करण्यास मंजुरी देणे ही या समितीची कार्यकक्षा असेल. या समितीने घेतलेले निर्णय शासन मान्यतेने अंतिम करण्यात येतील, असे याबाबतच्या शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

0000

बी.सी.झंवर/विसंअ/

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात डॉ. विनायक सावर्डेकर यांची मुलाखत

मुंबई, दि. 12 : पावसाळ्यात वर साचणाऱ्या दूषित पाण्यामुळे साथीचे रोग पसरण्याचे प्रमाण वाढते. हिवताप, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस, स्वाईन फ्ल्यू सारख्या आजारांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणावर दिसून येतो. सर्दी, खोकला आणि तापाची लक्षणे जाणवल्यास नागरिकांनी तातडीने उपचार करून आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन सेंट जॉर्ज रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर यांनी  ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमाच्या माध्यमातून केले आहे.

पावसाळ्यात आढळणाऱ्या सामान्य व्याधी म्हणजे ताप, सर्दी, खोकला, जुलाब, अतिसार, उलट्या होणे तसेच पावसाळ्यातील विषाणूजन्य व्याधी म्हणजे हिवताप, स्वाइन फ्लू, डेंग्यू, चिकन गुनिया, कावीळ, कॉलरा या आजारांपासून स्वत:चा आणि आपल्या कुटुंबाचा बचाव करावयाचा असेल, तर आपण वेळीच खबरदारी घेणे आवश्यक आहे. पाणी उकळून घेणे, पालेभाज्या, फळे वापरताना मिठाच्या पाण्यात स्वच्छ करणे, रस्त्यावरील, उघड्यावरील पदार्थ खाण्याचे टाळावे तसेच वरील आजारावरील लक्षणे जाणवल्यास त्यावरील औषधोपचार अशा महत्वपूर्ण विषयांवर डॉ. सावर्डेकर यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून सविस्तर माहिती दिली आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत गुरुवार, दि. 13 जुलै 2023 रोजी सायं 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येईल. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक ट्विटर –

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

लिपिक-टंकलेखक, कर सहायक या संवर्गांच्या सर्वसाधारण गुणवत्ता याद्या, तात्पुरत्या निवड याद्या प्रसिद्ध

मुंबई, दि. १२ : महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा – २०२१ मधील लिपिक – टंकलेखक (मराठी व इंग्रजी) व कर सहायक या दोन्ही संवर्गांच्या सर्वसाधारण गुणवत्ता याद्या व तात्पुरत्या निवड याद्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या असून त्याआधारे उमेदवारांकडून भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प संवर्गनिहाय स्वतंत्ररित्या मागविण्यात येत आहे.

या परीक्षांच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्याकरीता आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ‘ONLINE FACILITIES’ या मेनूमध्ये ‘Post Preference / Opting Out’ वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. ही वेबलिंक दिनांक १३ जुलै, २०२३ रोजी १२.०० वाजेपासून दिनांक १९ जुलै, २०२३ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.

भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्यास कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण उद्भवल्यास आयोगाच्या १८००-१२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या टोल फ्री क्रमांकावर अथवा support online@mpsc.gov.in या ई-मेल आयडीवर विहित कालावधीत संपर्क

साधता येईल.

0000

राजू धोत्रे/विसंअ/

 

 

महाराष्ट्र कृषी सेवा (मुख्य) परीक्षा-२०२१ अंतिम निकाल जाहीर

मुंबई, दि. १२ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे १० ते १३ एप्रिल २०२३ या कालावधीत महाराष्ट्र कृषी सेवा (मुख्य) परीक्षा- २०२१ करीता मुलाखती घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे.

या परीक्षेमध्ये अमरावती जिल्ह्यातील देशमुख नीलेश हनुमंतराव राज्यातून आणि गोंदिया जिल्ह्यातील गिऱ्हेपुंजे धर्मेंद्र यवाक्रम हे मागासवर्गवारीतून प्रथम आले आहेत. तसेच पुणे जिल्ह्यातील गावडे भारती चंद्रकांत  या महिला वर्गवारीतून राज्यात प्रथम आल्या आहेत.

उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तूत निकाल व प्रत्येक प्रवर्गाकरीता शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण(Cut off marks) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

प्रस्तुत अंतिम निकालात अर्हताप्राप्त, शिफारसपात्र न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे, अशा उमेदवारांनी गुणपत्रके त्यांच्या प्रोफाईलवर पाठविल्याच्या दिनांकापासून १० दिवसांत आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने (Online) विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे.

0000

राजू धोत्रे/विसंअ/

मातंग समाजातील उमेदवारांनी थेट कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

मुंबई, दि. 12 : मातंग समाज व या समाजातील बारा पोट जातीतील गरजू घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी, तसेच त्यांना स्वयंरोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजना राबविली जाते. या कर्ज योजनेंतर्गत लाभार्थी करिता भौतिक व आर्थिक उद्दिष्ट प्राप्त झालेले असून इच्छुक लाभार्थ्यांनी थेट कर्ज योजनेतंर्गत लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाची जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.

जिल्हा कार्यालय मुंबई शहर- उपनगर, करिता थेट कर्ज योजनेंतर्गत सन २०२३ २४ या आर्थिक वर्षाकरिता लाभ घेण्यास इच्छुक असणाऱ्या अर्जदारांनी शासनाच्या नियमानुसार व महामंडळाच्या परिपत्रकातील अटी, शर्ती, निकष व नियमानुसार आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करुन (मध्यस्तांशिवाय) दि. २० जुलै ते दि.५ सप्टेंबर २०२३ या कालावधीत अर्ज करावेत. जिल्हा कार्यालय मुंबई शहर-उपनगर, गृहनिर्माण भवन, कलानगर, तळमजला, रुम क्रमांक ३३, वांद्रे (पू), मुंबई- ४०००५१ या पत्त्यावर अर्ज मुळ दस्ताऐवजासह स्वतः साक्षांकित केलेले कर्ज प्रस्ताव सादर करावेत.

*****

शैलजा पाटील/विसंअ/

राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन योजनेच्या लाभार्थ्यांना आवाहन

मुंबई दि. १० : राज्यातील राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधन योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या काही जुन्या लाभार्थ्याची परिपूर्ण माहिती अद्ययावत करण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड, भ्रमणध्वनी क्रमांक, हयातीचा दाखला व मानधन जमा होत असलेल्या बँक खात्याचे पासबुकच्या छायांकित प्रती तालुक्याच्या ठिकाणी गटविकास अधिकारी, पंचायत समिती या ठिकाणी जाऊन जमा करावेत, असे आवाहन सहसंचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी केले आहे.

मुंबई शहर व मुंबई उपनगर मधील लाभार्थ्यांनी आपली माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालय, जुने सचिवालय, पहिला मजला, विस्तार भवन, मुंबई -32 या ठिकाणी द्यावी किंवा dcamandhan@gmail.com या ईमेलवर पाठवावी, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

000

दीपक चव्हाण/विसंअ/

ताज्या बातम्या

मत्स्यव्यवसाय विभाग आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

0
पुणे, दि. 5: राज्यातील मत्स्यव्यवसाय विभाग महत्त्वाचा विभाग असून हा विभाग आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अधिकाऱ्यांनी एकत्रिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. उत्पन्नवाढीसोबतच पश्चिम महाराष्ट्रातील मत्स्य...

‘एआय’च्या सहाय्याने महाराष्ट्र अन्नधान्य निर्यातीत सर्वोत्तम ठरू शकतो — देबजानी घोष

0
मुंबई, दि. ०५: ‘एआय’चा वापर करून महाराष्ट्र अन्नधान्य उत्पादनात आणि निर्यातीत जगातील सर्वोत्तम राज्य बनू शकतो, असा विश्वास निती आयोगाच्या फेलो आणि नॅसकॉमच्या माजी...

 जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी उद्योजकांच्या अडचणी सोडवू – पालकमंत्री मेघना बोर्डीकर

0
परभणी, दि. ०५ (जिमाका): परभणी जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी उद्योजकांच्या अडचणींचे प्राधान्याने निराकरण केले जाईल, अशी ग्वाही राज्याच्या  सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा...

स्वच्छ व सुंदर शहर करण्यावर मनपा व नगरपालिकांनी भर द्यावा – पालकमंत्री मेघना बोर्डीकर

0
परभणी, दि. ०५ (जिमाका): नागरिकांना चांगल्या मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबरच  परभणी मनपा आणि जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांनी आपले शहर स्वच्छ व सुंदर करण्यावर भर...

‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’ योजनेतंर्गत जिल्ह्यातील प्रकल्प जलदगतीने पूर्ण करा- पालकमंत्री मेघना बोर्डीकर

0
परभणी, दि. ०५ (जिमाका):  शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडीत वीज पुरवठा करणारी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 ही राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून परभणी...