मंगळवार, जुलै 8, 2025
Home Blog Page 1141

इगतपुरी तालुक्यातील वासाळी येथे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे भव्य स्मारक उभारण्याच्या कामाला गती द्यावी – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई, दि. 21 :- आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे हे आदिवासी बांधवांसह सर्वांचे श्रद्धास्थान आहेत. नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यात वासाळी येथे त्यांचे भव्य स्मारक उभारण्याची आदिवासी भागातील आमदारांची मागणी आहे. या मागणीचा विचार करून आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे स्मारक प्रेरणास्थान तसेच आजूबाजूचा परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित करावा. यासंदर्भातील कामे गतीने पूर्ण करावीत, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे भव्य स्मारक उभारण्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस आमदार सुनील शेळके, चंद्रकांत नवघरे, माणिकराव कोकाटे, अपर मुख्य सचिव (वित्त) नितीन करीर, प्रधान सचिव नियोजन सौरभ विजय, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, पर्यटन संचालक बी.एन.पाटील यांच्यासह पुणे विभागाचे विभागीय आयुक्त सौरभ राव, पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, नाशिकचे  जिल्हाधिकारी आदी  मान्यवर दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

बैठकीत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारकाची जागा इगतपुरी व कळसूबाई शिखर परिसराला लागून आहे. स्मारकापासून कळसूबाई शिखरापर्यंत रोप-वे च्या कामासाठी केंद्र सरकारकडून पर्वतमाला योजनेतून निधी मिळणे शक्य आहे. त्यासाठी प्रयत्न करावा, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

स्मारकाबरोबर आजूबाजूचा परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित केल्यास परिसरातील आदिवासी बांधवांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होवू शकतो.  यासाठी  आदिवासी विकास विभागाचा निधी वापरून या परिसराचा विकास करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

सिद्धेश्वर धरण परिसराचे सुशोभीकरण व विकास वृंदावन बागेच्या धर्तीवर करण्यासाठी जलसंपदा विभाग प्रयत्न करीत आहे. यासाठी पर्यटन विभागाकडून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. आतापर्यंत झालेल्या कामाचा आढावा घेऊन पुढील निधी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी बैठकीत सांगितले.

0000

लोणावळा पर्यटन विकासासाठी प्रकल्प अहवाल महिन्याभरात तयार करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई, दि. 21 :- लोणावळा येथील टायगर पॉईंट आणि लायन्स पॉईंट येथील पर्यटन विकासासाठी आणि परिसरातील निसर्ग पर्यटनाला चालना देण्यासाठी ग्लास स्कायवॉक उभारण्याबाबत पर्यटन विभागाने सविस्तर प्रकल्प आराखडा एका महिन्यात तयार करावा. या पर्यटन प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

पुणे जिल्ह्यातील लोणावळा आणि मावळ परिसरातील पर्यटन विकासाबाबत मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस नियोजन विभागाचे आमदार सुनील शेळके, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, वन विभागाचे प्रधान सचिव बी गोपाल रेड्डी, पुणे प्रादेशिक मुख्य वन संरक्षक एन. आर. प्रवीण तर दूरदृश्य प्रणालीद्वारे विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त राहुल रंजन महिवाल, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, लोणावळा परिसरातील निसर्ग संपदा लक्षात घेता याठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. पर्यटनाला चालना देण्यासाठी लहान मुलांचे साहसी खेळ आणि इतर सुविधांचा समावेश असलेल्या उत्तम आराखडा महिन्याभरात तयार करावा. आराखडा तयार करताना तो निसर्गस्नेही असेल आणि पर्यावरणाला धक्का लागणार नाही याची दक्षता घ्यावी. आराखडा तयार करण्यासाठी पर्यटन विभागामार्फत तातडीने नियोजन करण्यात यावे.

या परिसरात वाऱ्याचा वेग अधिक असल्याने आराखडा तयार करताना पर्यटकांची सुरक्षितता आणि पर्यावरणाच्या जपणूकीला प्राधान्य द्यावे. पर्यटकांसाठी पाऊलवाट तयार करतांना काँक्रीट ऐवजी दगडांचा वापर करावा. पर्यटकांना सभोवतालच्या निसर्गाचा आनंद घेता येईल अशी रचना करण्यात यावी. परिसरात वाहनतळ तसेच पर्यटकांसाठी आवश्यक असलेल्या सुविधांचा समावेशही आराखड्यात करावा, अशी सूचनाही त्यांनी केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2022 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये लोणावळा येथे पर्यटन सुविधा निर्माण करण्याबाबत घोषणा केली होती. लोणावळा येथे पर्यटक मोठ्या संख्येने येतात. येथील पर्यटनाला चालना देण्यासाठी टायगर पॉईंट आणि लायन्स पॉईंट येथे काचेचा स्कायवॉक उभारण्याचे प्रस्तावित आहे. 4.84 हेक्टर परिसरात हा प्रकल्प उभारण्यात येणार असून येथे झीप लाईनींगसारखे साहसी खेळ, फुड पार्क, ॲम्पी थिएटर, खुले जीम आणि विविध खेळ आदी सुविधा असणार आहे. प्राथमिक अंदाजानुसार या प्रकल्पासाठी सुमारे 100 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

कुसूर पठारावर जागतिक पर्यटन केंद्राचा जिल्हा आराखड्यात समावेश करावा

            उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मावळ तालुक्यातील कुसूर (कुसवली) पठारावर जागतिक पर्यटन केंद्र बनविण्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली. मावळपासून नवी पनवेल आणि मुंबई कमी अंतरावर आहे. त्यामुळे या परिसरात पर्यटन विकासाला चांगला वाव आहे. परिसरात निसर्ग संपदाही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे येथे जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र तयार करण्यासाठी जिल्हा विकास आराखड्यात या प्रकल्पाचा समावेश करावा. शासनामार्फत त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने आवश्यक माहिती संकलित करावी, लवकरच याबाबत पुणे येथे बैठक घेण्यात येईलअसे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

            बैठकीस पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगीपर्यटन संचालक डॉ. बी.एन.पाटील,  पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ज्ञानेश्वर दाभाडे उपस्थित होते.

            कुसवली पठार हे समुद्र सपाटीपासून 3 हजार मीटर उंचीवर असून साधारण 1 हजार 200 एकरचा हा परिसर आहे. परिसराच्या एका बाजूस ठोकळवाडी, तर दुसऱ्या बाजूस वडीवळे आणि शिरोता अशी धरणे आहेत. पठाराच्या शेवटी पश्चिम घाट आहेअशी माहिती यावेळी देण्यात आली.

0000

निलेश तायडे/राजू धोत्रे/विसंअ/

 

0000000

सारथीच्या कौशल्य विकास प्रशिक्षण व शिष्यवृती योजना

सारथीमार्फत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी अनेकविध योजना राबविल्या जात आहेत.  कौशल्य विकासाच्या योजनांच्या लाभामुळे मराठा समाजातील अनेक विद्यार्थी आत्मनिर्भर बनले असून शैक्षणिक योजनांमुळे गुणवत्तावाढीसाठी मदत झाली आहे. कौशल्य विकास व शैक्षणिक योजनांबाबत थोडक्यात माहिती…

       कौशल्य विकास विभाग: सारथी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम

       छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व संगणक कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम(CSMS-DEEP)– या योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सारथीच्या लक्षित गटातील ३० हजार उमेदवारांना नि:शुल्क प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे. MKCL मार्फत उमेदवारांना ४ module अंतर्गत spoken English, soft skills, IT skills, accounting with Tally, Hardware and Networking, web designing, data management, digital freelancing, mobile app development कोर्सेस शिकवले जातात. लक्षित गटातील उमेदवारांसाठी सारथी मार्फत सदर प्रशिक्षण मोफत उपलब्ध करुन दिले जाते. या योजनेंतर्गत प्रति विद्यार्थी.२६ हजार ३६०/- रुपये खर्च येतो. आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये २३ हजार ७१८ विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आलेला आहे. दिनांक १२ सप्टेंबर २०२३ अखेर सांगली जिल्ह्यांतर्गत सहभागी विद्यार्थ्यांची संख्या ५७६  इतकी आहे.

       श्रीमंत मालोजीराजे भोसले सारथी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमइंडोजर्मन टूल रूम (IGTR)- इंडो-जर्मन टूल रूम(IGTR), छत्रपती संभाजीनगर ही संस्था भारत सरकारच्या सूक्ष्म, लघू व मध्यम उद्यम मंत्रालय अंतर्गत काम करते. या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत औरंगाबाद, पुणे, नागपूर व कोल्हापूर येथील प्रशिक्षण केंद्रांमधून एकूण 24 अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देण्यात येते.  ही संस्था पदव्युत्तर स्तर, पदव्युत्तर पदविका स्तर, पदविका स्तर आणि प्रमाणपत्र स्तरावर तांत्रिक मनुष्यबळाच्या विस्तृत स्पेक्ट्रमच्या समावेश करण्यासाठी विविध अभ्यासक्रम उपलब्ध करते. त्यामध्ये टूल डिझायनिंग, CAD/CAM, CNC मशिनिंग, LCA तसेच टेलर मेड मोड्युलस च्या विशिष्ट  क्षेत्रातील अल्पकालीन अभ्यासक्रमांची संख्या ग्राहकांच्या गरजेनुसार डिझाईन आणि आयोजित केली जाते. सारथीच्या लक्षित गटातील ग्रामीण तरुणांचे कौशल्य वाढवण्याच्या उद्देशाने सारथीचा या संस्थेसोबत करार करण्यात आला आहे. सारथीमार्फत सदर प्रशिक्षण मोफत उपलब्ध करुन दिले जाते. सन 2022-23 मध्ये एकूण 424 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून त्यांच्या प्रशिक्षणासाठी रुपये 71.73 लक्ष निधी खर्च करण्यात आलेला आहे.  या  योजनेचा सांगली जिल्ह्यातील 20 विद्यार्थ्यानी लाभ घेतला आहे यामुध्ये 4 मुलींचा समावेश आहे.

 शिक्षण विभाग

छत्रपती राजाराम महाराज शिष्यवृती योजना: –भारतातील सर्व राज्यांतील एक लाख विद्यार्थ्यांना दरवर्षी केंद्र सरकारकडून NMMS शिष्यवृती अदा केली जाते. महाराष्ट्रासाठी एकूण 11 हजार 682 इतका कोटा मंजूर आहे. महाराष्ट्रातून लक्षित गटातील दरवर्षी 25 हजार पेक्षा जास्त विद्यार्थी सदर परीक्षेमधून उत्तीर्ण होतात पण सर्वांनाच शिष्यवृतीचा लाभ मिळत नाही.  म्हणून महाराष्ट्रातील NMMS परीक्षा उत्तीर्ण झालेले पण केंद्र सरकारची NMMS शिष्यवृती अप्राप्त असलेल्या लक्षित गटातील तसेच आर्थिक दुर्बल घटकातील 9 वी ते 12 वी पर्यंत नियमित शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सारथीने ही योजना सुरु केली आहे. यामध्ये प्रती विद्यार्थी प्रती वर्ष 9 हजार 600 रुपये असे चार वर्षांसाठी 38 हजार 400 रुपये  दिले जातात.  सन 2021-22 या वर्षात 9 वी मधील 10 हजार 414 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 9 हजार 600 रुपये प्रमाणे 9 कोटी 99 लाख 74 हजार 400 रुपये इतकी  शिष्यवृतीची रक्कम अदा केली आहे.  सन 2022-23 या वर्षात इयत्ता 9 वी मधील 13 हजार 127 व इयत्ता 10 वी मधील 9 हजार 173 असे 22 हजार 300 विद्यार्थ्यांना प्रत्येकी रु. 9 हजार  600 रुपये  प्रमाणे 21 कोटी 40 लाख 80 हजार  रुपये अदा करण्यात आलेले आहेत. यामध्ये  सांगली 2 हजार 247 विद्यार्थ्यांचा समावेश असून त्यांना 2 कोटी 15 लाख 71 हजार रुपये देण्यात आले आहेत.

 सारथी गुणवंत मुलामुलींना देशांतर्गत व परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृती 

डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृती योजना:- सन 2022-23 मध्ये तीनशे विद्यार्थी निवडीसाठीची जाहिरात जुलै 2023 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली असून यामध्ये 153 पात्र विद्यार्थ्यांची यादी सारथीच्या संकेतस्थळावर एप्रिल 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यास संबंधित विद्यापीठ/शैक्षणिक संस्थेने अभ्यासक्रमासाठी ठरवून दिलेले पूर्ण शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, नोंदणी फी, जिमखाना, ग्रंथालय, संगणक इ. शुल्क संबंधित विद्यापीठ /शैक्षणिक संस्थेमार्फत संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यात जमा करण्यात येईल. जे विद्यार्थी वसतिगृहात जागेअभावी अन्यत्र राहात असतील अशा विद्यार्थ्यांना वसतीगृह शुल्क व भोजन शुल्काची रक्कम ही तो शिक्षण घेत असलेल्या संबंधित संस्थेच्या आकारणी करण्यात येत असलेल्या रकमेच्या मर्यादेत विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बॅंक खात्यात जमा करण्यात येईल. सारथी अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातून 300 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. तसेच पुस्तकांसाठी एकूण 25 हजार व शैक्षणिक साहित्य व खर्च यासाठी 25 हजार  लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे.  यामध्ये सांगली जिल्ह्यातील  12 मुलांचा सहभाग आहे.

महाराजा सयाजीराव गायकवाड परदेशसारथी गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षण शिष्यवृती योजना:महाराष्ट्र राज्यातील अधिवास असलेले मराठा, कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी–मराठा या सारथीच्या लक्षित गटातील मुलामुलींना परदेशात पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पी.एच.डी)चे विशेष अध्ययन करण्यासाठी आर्थिक मदत करणे. महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी–मराठा या जातीतील पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका आणि पी. एच. डी साठी अद्ययावत QS, World university ranking 200 च्या आतील परदेशी शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या 75 विद्यार्थ्यांना (पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका दोहोंसाठी 50 आणि पी. एच. डी साठी 25) ही शिष्यवृती मंजूर करण्यात येणार आहे.

छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी निमित्त तालुकास्तरीय निबंध स्पर्धा: सन 2022-23 हे वर्ष राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. या वर्षात शाहू महाराजांच्या विविधांगी कार्याची ओळख महाराष्ट्रातील सर्वांना व्हावी यासाठी सारथी संस्थेने महराष्ट्रातील 358 तालुके व 29 महानगरपालिकेतील प्राथमिक, माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी शाहू महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित विविध विषयांवर स्पर्धा आयोजित केली होती. महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. प्राथमिक गटात 25 हजार 756 तर माध्यमिक गटात 35 हजार 779 असे एकूण 61 हजार 535 विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धेत सहभागी होऊन आपले निबंध सादर केले होते. प्रती तालुका 10 विद्यार्थ्यांना पारितोषिके व प्रशस्ती पत्रे देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्यासाठी 10 लाख 22 हजार 253 निधीची तरतूद करण्यात आली आहे. छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी निमित्त तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत सांगली जिल्ह्यातील इयत्ता  3 री ते 5 वी मधील  367 व इयत्ता  6 वी ते 10 वी मधील 389 अशा 756 विद्यार्थ्यानी सहभाग घेतला.

विशेष उपक्रम: दिनांक 15 ऑगस्ट 2023 रोजी सारथीच्या छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व संगणक कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम या योजनेंतर्गत लाभ घेत असलेल्या विद्यार्थ्यांद्वारे सारथीच्या सर्व योजनांच्या माहितीचे वाचन ग्राम सभेमध्ये करण्यासाठी व त्याद्वारे सारथीचा प्रचार प्रसिद्धी करण्यासाठी  विशेष  मोहीम राबविण्यात आली होती. उपक्रमांतर्गत एकूण 1 हजार 22 ग्रामपंचायतींमध्ये 1 हजार 193 विद्यार्थ्यांमार्फत एकाच वेळी योजनांचे वाचन करण्यात आले या उपक्रमामध्ये 51 हजार 535 ग्रामस्थांचा सहभाग होता. यामध्ये सांगली जिल्ह्यातील 26 ग्रामपंचायतींमध्ये सदर कार्यक्रम राबविण्यात आला असून त्यामध्ये सदर योजनेच्या 26 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. त्यामध्ये एकूण 815 ग्रामस्थांचा सहभाग होता.

सारथीच्या सर्व योजना तपशीलवार पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ- https://sarthi-maharashtragov.in.  सारथी Application –SARTHI PUNE प्ले स्टोअर वर उपलब्ध आहे. युट्युबवर-SARTHI PUNE, फेसबुकवर –SARTHI PUNE, सारथी उपकेंद्र कोल्हापूर कार्यालय पत्ता: आर.एस. 376, राजाराम कॉलेज परिसर, प्रि. आय.ए.एस. प्रशिक्षण सेंटरच्या मागे, कोल्हापूर – 416 004. E- mail id- divkolhapursarthi@gmail.comsarthikop21@gmail.com

  • संकलन:- जिल्हा माहिती कार्यालय, सांगली

 

०००

 

सयाजीराव गायकवाड – सारथी गुणवंत विद्यार्थी परदेश उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना

राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या जातीच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता असून आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणासाठी परदेशातील नामांकित विद्यापीठामध्ये प्रवेश घेता येत नाही. यासाठी राज्य शासनाने आता पदव्युत्तर पदवी, पदविका तसेच पीएचडी अभ्यासक्रमासाठी क्यू वर्ल्ड रँकिंगमध्ये २०० च्या आत रँकिंग असलेल्या शैक्षणिक संस्था, विद्यापीठामध्ये गुणवत्तेनुसार प्रवेश घेणाऱ्या मराठा प्रवर्गातील एकत्रितपणे ७५ विद्यार्थ्यांसाठी सन २०२३ -२०२४ पासून छत्रपती शाहू महाराज व मानव विकास संस्था (सारथी ) पुणे या संस्थेमार्फत ‘सयाजीराव गायकवाड- सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना’ राबविण्यास मान्यता दिली आहे.

अभियांत्रिकी  पदवी, पदविकेसाठी 20 तर पीएचडीसाठी 5, वास्तुकलाशास्त्र पदवी, पदविकासाठी 4 पीएचडीसाठी 2, व्यवस्थापन पदवी, पदविकेसाठी 2 पीएचडीसाठी 1, विज्ञान पदवी, पदविकासाठी 10 पीएचडीसाठी 5, वाणिज्य /अर्थशास्त्र पदवी, पदविकासाठी 4 पीएचडीसाठी 5, कला पदवी, पदविकासाठी 4 पीएचडीसाठी 5, विधी अभ्यासक्रम पदवी, पदविकासाठी 4 पीएचडीसाठी 1 तसेच औषध निर्माण शास्त्र पदवी, पदविकासाठी 2 तर पीएचडीसाठी 1 असे 50 पदवी, पदविका अभ्यासक्रमासाठी तर 25 पीएचडी अभ्यासक्रमासाठी प्रत्येक वर्षासाठी शाखानिहाय शिष्यवृत्ती देण्यात येईल.

अशा आहेत अटी व शर्ती

✅     लाभार्थी हा मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या जातीतील महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी व भारतीय नागरिक असावा.

✅    विद्यार्थ्यांला परदेशातील क्यूएस वर्ल्ड रँकिंगमध्ये 200 च्या आत रॅकींग असलेल्या शैक्षणिक संस्था, विद्यापीठामध्ये गुणवत्तेनुसार प्रवेश मिळालेला असावा.

✅    विद्यार्थ्याने पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अर्ज करतांना पीएचडी अभ्यासक्रमासाठी अर्ज करतांना, पीएचडीसाठी यापूर्वी इतर कोणत्याही राज्य शासनाची अथवा केंद्र सरकारची परदेशी शिष्यवृती घेतलेली नसावी, तसेच त्यांने अन्य प्रशासनिक विभागाच्या परदेशी शिष्यवृत्तीच्या योजनेसाठी अर्ज केलेला नसावा.

✅    परदेशातील विद्यापीठ, शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश घेणारा विद्यार्थी हा पूर्णवेळ विद्यार्थी म्हणून प्रवेशित असावा.

✅    एक्झीक्युटीव्ह पदव्युत्तर पदवी किंवा एक्झीक्युटीव्ह पदव्युत्तर पदविका व अर्धवेळ अभ्यासक्रमास प्रवेशित विद्यार्थी व योजनेसाठी पात्र असणार नाही.

✅    प्रवेशित अभ्यासक्रमासाठी अर्ज करतांना नमूद केलेल्या विहीत कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण करणे विद्यार्थ्यांवर बंधनकारक राहील. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ मान्य केली जाणार नाही.

✅    पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी लाभार्थींना  35 वर्ष आणि पीएचडी अभ्यासक्रमासाठी कमाल 40 वर्ष वयोमर्यादा असावी.

✅    या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे ,कुटुंबाचे व विद्यार्थी नोकरी  करीत असल्यास त्याचे स्वत:चे उत्पन्न धरुन सर्व मार्गानी मिळणारे मागील आर्थिक वर्षांतील वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त नसावे.

✅    विद्यार्थी किंवा पालक किंवा दोन्ही नोकरीत असतील तर त्यांचे आयकर विवरणपत्र, फॉम नंबर 16 व सक्षम प्राधिकारी  यांच्याकडील मागील आर्थिक वर्षांचे कुटुंबाचे सर्व मार्गानी मिळणाऱ्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.

✅   इतर विद्यार्थ्यांसाठी सक्षम प्राधिकारी यांच्याकडील मागील आर्थिक वर्षाचे कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणाऱ्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र, नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असेल.

✅   परदेशातील पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याने भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठामधून किमान 75 टक्के गुणांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

✅    पीएचडी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांने भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून किमान 75 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. ही पदवी किंवा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम त्याने अर्जाच्या दिनांकाला उत्तीर्ण केलेला असावी.

✅     या योजनेचा लाभ एका कुटुंबातील एका विद्यार्थ्यास फक्त एकदाच घेता येईल.

✅     एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त मुलांना ही शिष्यवृत्ती लागू राहणार नाही. यासाठी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी तसे प्रतिज्ञापत्र करुन देणे बंधनकारक असेल.

 

असा असेल अभ्यासक्रम कालावधी

✅     पीएचडी-4 वर्ष किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जो कमी असेल तो.

✅    पदव्युत्तर पदवी 2 वर्ष किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जो कमी असेत तो.

✅     पदव्युत्तर पदविका 1 वर्ष किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जो कमी असेल तो.

 

विद्यार्थ्यास मिळणारे लाभ

✅    परदेशातील शैक्षणिक संस्थेने पत्रामध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक कालावधीपासून लागू केलेली संपूर्ण शिक्षण फी, अभ्यासक्रमासाठी नजिकच्या मार्गानी इकॉनॉमी क्लास विमान प्रवास भाडे (परतीच्या प्रवासासह) निर्वाह भत्ता, वैयक्तिक आरोग्य विमा यावरील विद्यार्थ्याने प्रत्यक्ष केलेला खर्च विहित केलेल्या वित्तीय मर्यादेत मूळ शुल्क भरणा पावती, प्रवासाचे मूळ तिकिट, मूळ बोर्डिंग पास, परतीच्या प्रवासाचे तिकिट इत्यादी तपासून विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर भारतीय रुपयांमध्ये प्रतिपूर्ती सारथी संस्थेमार्फत विद्यार्थ्यांकडून प्रस्ताव प्राप्त झाल्याच्या १५ कार्यालयीन दिवसाच्या आत जमा करण्यात येईल.

✅   सर्वसाधारण पदव्युत्तर पदवीसाठी २ वर्ष किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जो कमी असेल व पदव्युत्तर पदविकासाठी १ वर्ष किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जो कभी असेल त्या अभ्यासक्रमासाठी नजीकच्या मार्गाने इकॉनॉमी क्लास विमान भाडे परतीच्या भाड्यासह, शिक्षण शुल्क, निर्वाह भत्ता, वैयक्तिक आरोग्य विमा यासह एका विद्यार्थ्यामागे प्रतिवर्षी रु. ३० लाखाच्या मर्यादेत, तर पीएचडीसाठी ४ वर्ष किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जो कमी असेल त्यासाठी प्रतिविद्यार्थी प्रतिवर्षी रु. ४० लाखाच्या मर्यादेत शाखा/अभ्यासक्रम निहाय मार्गदर्शक तरतूदीनुसार परदेशी शिष्यवृत्ती अदा करण्यात येईल.

✅   प्रवेश घेतलेल्या संबंधित शैक्षणिक संस्थेने ठरवून दिलेल्या अथवा भारत सरकारच्या DOPT विभागाने विदेशी शिष्यवृत्तीसाठी ठरवून दिलेल्या दराप्रमाणे येणारा खर्च भारत सरकारच्या इंडियन ओव्हरसिज स्कॉलरशिप या योजनेअंतर्गत देण्यात येत असलेल्या दरवर्षी युएसए व इतर देशांसाठी (युके वगळून) १५४०० युएस डॉलर्स आणि युकेसाठी ९९०० जीबीपी इतक्या रकमेच्या मर्यादेत निर्वाह भत्ता संबंधित विद्यार्थ्याच्या परदेशातील वैयक्तिक खात्यामध्ये जमा केला जाईल. सदर निर्वाह भत्याची रक्कम ही उपरोक्त नमूद पदव्युत्तर पदवी / पदविका असलेल्या प्रतिवर्षी रु.३० लाखाच्या व पीएचडीसाठी असलेल्या प्रतिवर्षी रु. ४०  लाखाच्या मर्यादेमध्ये अंतर्भूत आहे.

✅    विद्यार्थ्यास परदेशी शिक्षण संस्थेमार्फत किंवा इतर कोणत्याही यंत्रणेमार्फत मिळणारी शिष्यवृत्ती, इतर कोणत्याही प्रकारचे आर्थिक लाभ किंवा शिकविण्याबाबतचे मानधन किंवा फेलोशिप किंवा रिसर्च असोशिएट म्हणून मिळणारी ही रक्कम देय होणाऱ्या शिक्षण शुल्क वा एकूण देय रकमेमधून कपात करण्यात येईल.

✅   सुरुवातीस परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणे आणि विहीत कालावधीत अभ्यासक्रमपूर्ण केल्यानंतर त्वरीत कालमर्यादेत भारतात परत येण्यासाठी भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे नजिकच्या मार्गाने इकॉनॉमी क्लास विमानप्रवासभाडे देण्यात येईल. त्यासाठी विमान प्रवासाचे मूळ तिकीट, मूळ बोर्डींग पास, परतीचे प्रवास भाडे मिळण्यासाठी अभ्यासक्रम विहीत कालावधीत यशस्वीपणे पूर्ण केल्याच्या पुरावा इ. कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे.

✅   विद्यार्थ्यांस परदेशात राहण्याच्या कालावधीसाठी विद्यापीठाने ठरवून दिल्यानुसार वैयक्तिक आरोग्य विमा काढणे अनिवार्य राहील. यासाठीचा संबंधीत विद्यापीठाच्या निकषानुसार किमान खर्च सारथी संस्थेकडून अनुज्ञेय राहील.

✅   वरीलप्रमाणे शिक्षण शुल्क, निर्वाहभत्ता, वैयक्तिक आरोग्य विमा आणि यासाठी निर्धारीत केलेल्या दरापेक्षा होणारा जास्तीचा खर्च विद्यार्थी / उमेदवारास स्वतः सोसावा लागेल व अशा प्रकारचे हमीपत्र विद्यार्थ्यास व पालकास अर्जासोबत द्यावे लागेल.

 

हा खर्च अनुज्ञेय नाही

✅    व्हिसा अर्जावरील खर्च.

✅    विद्यार्थ्याच्या कुटुंबातील सदस्यांचा प्रवास व इतर खर्च

✅    नियमित शिक्षणाच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर कोणत्याही अभ्यासक्रम अथवा प्रशिक्षणावरील खर्च.

✅    भाषा प्रशिक्षणावरील खर्च.

✅    नियमित अभ्यासक्रमाच्या कालावधीत अतिरिक्त प्रवासाचा खर्च. संशोधन, पुरक शैक्षणिक साहित्य, क्षेत्र भेटी, कार्यशाळा/ सेमिनार, आंतरवसियता यामधील सहभागाचा खर्च.

✅    संगणक व तत्सम शैक्षणिक साहित्य.

✅   विद्यार्थ्यास वरील लाभ मिळण्यासाठी परदेशातील प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमामध्ये प्रत्येक वेळी उत्तीर्ण होणे बंधनकारक असून, तसे शैक्षणिक संस्था / विद्यापीठाचे प्रमाणपत्र, गुणपत्रिका, प्रगती अहवाल प्रत्येक सत्रासाठी किंवा सहा महिन्यासाठी सादर करणे अनिवार्य आहे.

✅   अपवादात्मक प्रसंगी, निवड समितीमार्फत निवड झालेल्या विद्याथ्र्यांनी / पालकांनी, परदेशी शिक्षण संस्था / विद्यापीठ, शिक्षण फी / इतर अनुज्ञेय फी स्वतः भरलेली असेल, अशा वेळी आवश्यक त्या पावत्या व पुरावे सादर केल्यानंतर, अशी रक्कम विद्यार्थ्यास देय होणाऱ्या शिष्यवृत्तीमधून विद्यार्थ्यांच्या परदेशातील खात्यावर जमा करण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक, सारथी, पुणे यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.

✅    विद्यार्थ्यांने भारतात राष्ट्रीयकृत बँकेत व परदेशात अधिकृत बँकेत खाते उघडणे अनिवार्य आहे. त्याच खात्यावर त्यांना देय होणारी शिष्यवृत्ती सीएमपी किंवा आरटीएसजीने अदा केली जाईल. या खात्याचा तपशिल त्याने परदेशात जाऊन प्रवेश घेतल्यानंतर तात्काळ व्यवस्थापकीय संचालक सारथी पुणे यांना सादर करावा.

✅   सदरची योजना नियमावली, अटी व शर्ती नुसार राबविण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक, सारथी, पुणे यांना प्राधिकृत करण्यात येत असून त्यांच्या मार्फत राबविण्यात येईल. परदेशी शिष्यवृत्ती अभ्यासक्रमासाठी गुणवत्ता यादी व निवड यादी तयार करुन विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.

  • संदीप गावित, उपसंपादक, जिल्हा माहिती कार्यालय,धुळे

०००

शासन दिव्यांगांच्या दारी या जिल्हास्तरीय अभियानाचे बच्चू कडू यांच्या हस्ते उद्घाटन

सोलापूर, दि. 20 (जिमाका):-जागतिक स्तरावर तीन डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिन साजरा केला जातो. राज्य शासनाने मागील वर्षी 3 डिसेंबर रोजी दिव्यांगासाठी स्वतंत्र विभाग स्थापन केला. या विभागाच्या वतीने राज्यातील दिव्यांगाना विविध शासकीय योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याच अनुषंगाने दिव्यांगासाठी स्वतंत्र घरकुल योजना राज्य शासनाने राबवावी अशी मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे केलेली असून ती लवकरच पूर्ण होईल, असे प्रतिपादन दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष व मार्गदर्शक ओमप्रकाश (बच्चू) कडू यांनी केले.

येथील कर्मयोगी आप्पासाहेब काडादी सांस्कृतिक सभागृह येथे आयोजित दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियान अंतर्गत आयोजित कार्यक्रमात श्री. बच्चू कडू मार्गदर्शन करत होते. यावेळी आमदार सुभाष देशमुख, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, दिव्यांग कल्याण आयुक्त विष्णुदास घोडके, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर, प्रहार संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष संजीवनी बारगुडे यांच्यासह दत्ता चौगुले, नितीन माने, आभूताई भोजने, झविर शेख आदी उपस्थित होते.

दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष श्री कडू पुढे म्हणाले की, दिव्यांग कल्याण विभागाची स्थापना झाल्यापासून राज्यातील सर्व जिल्ह्यात दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी हे अभियान राबवले जात आहे. या अंतर्गत शासनाच्या विविध शासकीय योजनांचा लाभ दिव्यांग बांधवांना मिळवून दिला जात आहे. तसेच या अभियानात दिव्यांग नागरिकांच्या विविध तक्रारी ऐकून घेऊन त्यावर प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करण्याबाबतचे निर्देश दिले जात आहेत. या माध्यमातून हजारो लाखो दिव्यांगांना शासनाच्या योजनेचे प्रत्यक्ष लाभ मिळत आहेत. एक ही पात्र दिव्यांग व्यक्ती लाभापासून वंचित राहणार नाही यासाठी शासन व प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेतली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

दिव्यांगासाठी स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय असावे यासाठी मागील पंधरा वीस वर्षापासून लढा दिला जात होता, त्याला यश येऊन 3 डिसेंबर 2022 पासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून हे दिव्यांग मंत्रालय स्थापन झालेले आहे. तेव्हापासून हा विभाग दिव्यांगांच्या कल्याणासाठी कृतीशील पणे काम करत असून प्रशासनाकडून ही तेवढेच सहकार्य मिळत आहे. आज या ठिकाणी सोलापूर जिल्हा प्रशासनाने दिव्यांगाची अत्यंत चांगली सोय केलेली आहे व मागील वर्षभरात प्रशासन दिव्यांगांसाठी उत्कृष्टपणे कार्य करत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. दिव्यांगाप्रती अशीच संवेदना ठेवून सकारात्मक काम करावे व सोलापूर जिल्हा दिव्यांगाच्या योजना राबवण्यात राज्यात प्रथम क्रमांकावर असावा असे आवाहनही त्यांनी प्रशासनाला केले.

पुरवठा विभागाकडे पाच ते सहा टक्के अन्नधान्य शिल्लक राहत असून जिल्हाधिकारी यांनी त्याचा आढावा घेऊन शिल्लक राहिलेले स्वस्त धान्य दिव्यांगाना वाटप करण्याबाबत निर्णय घ्यावा. तसेच जिल्ह्यातील अपंगांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात शक्ती केंद्र निर्माण करावीत व 100% अपंगत्वाचे प्रमाणपत्र वाटप करावीत. दिव्यांगाचे बचत गट स्थापन करून त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून द्यावा. दिव्यांगाने ही शासनाच्या पाच टक्के निधीवर अवलंबून न राहता शिक्षण प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचे उद्योग व्यवसाय उभारणीसाठी पुढाकार घ्यावा, त्यासाठी शासन व प्रशासन मदत करेल, अशी माहिती श्री. कडू यांनी दिली.

शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी दिव्यांगाची सेवा ईश्वर सेवा म्हणून करावी. दिव्यांगाच्या सर्व अडचणी सोडवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहावे असे आवाहन करून सोलापूर शहर व पंढरपूर शहरातील कोणताही दिव्यांग बांधव उपाशी राहत असेल तर त्याची माहिती द्यावी त्या बांधवाला घरपोच दोन वेळ जेवण लोकमंगल च्या वतीने उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती आमदार सुभाष देशमुख यांनी दिली.

जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांना शिक्षण प्रशिक्षण देऊन तसेच विविध शासकीय योजनेचा लाभ देऊन मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. मागील वर्षी 16 हजार 800 अपंगत्वाचे प्रमाणपत्र प्रशासनाच्या वतीने दिव्यांगाना घरपोच देण्यात आलेली आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी देऊन आज या ठिकाणी दिव्यांगाशी संबंधित 28 विभागाचे शासकीय योजनांवर आधारित माहितीपर स्टॉल लावण्यात आलेले आहेत त्या स्टॉलला भेट द्यावी असे आवाहन ही त्यांनी केले. जिल्हा परिषदेच्या वतीने ही प्रत्येक गावात प्रत्येक दिव्यांग कुटुंबापर्यंत पोहोचून त्या कुटुंबातील प्रत्येक दिव्यांगला शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिली.

प्रारंभी दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष ओमप्रकाश कडू यांच्या हस्ते दीप्रज्वलनाने अभियानाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने दिव्यांगासाठी असलेल्या योजनांची एकत्रित माहिती वर आधारित केलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन श्री कडू व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच सेवानिवृत्त दिव्यांग शिक्षिका छाया उंब्रजकर आठवणीची साठवण या पुस्तिकेचेही प्रकाशन झाले. त्यानंतर श्री कडू यांच्या हस्ते अंध क्रिकेटपटू गंगा कदम हीस 50 हजाराचा धनादेश महापालिकेच्या वतीने देण्यात आला. अस्थिव्यंग क्रिकेटपटू मनोज धोत्रे, कळसुबाई शिखर पार केलेले दिव्यांग सोमनाथ घुले, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अस्थिव्यंग अबूताई भगत, वेल्डर दस्तगीर शेख, चित्रकार लक्ष्मी शिंदे, गायक शिवशरण गडतुटे, समाजसेवक प्रभाकर कदम यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास सुमारे दहा हजार दिव्यांग बांधव उपस्थित होते. श्री. कडू यांनी प्रत्येक दिव्यांग व्यक्तीकडे जाऊन त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या व त्या तक्रारी संबंधित कार्याप्रमुखांनी तात्काळ सोडवण्याबाबत निर्देश दिले. दिव्यांगासाठी योजना राबवत असलेल्या 28 विभागांचे शासकीय योजनांचे माहितीपर स्टॉल कार्यक्रमाच्या ठिकाणी लावण्यात आले होते. या स्टॉलवर ही दिव्यांग व्यक्तींची गर्दी होती.कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांनी केले तर आभार सच्चिदानंद बांगर यांनी मानले.

मंत्री सुधीर मुनगंटीवार आता व्हॉट्सॲप चॅनेलवर; व्हॉट्सअप चॅनेल फॉलो करण्याचे आवाहन

मुंबई, दि. 20 :  वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार आता राज्यातील जनतेशी थेट व्हॉट्सॲपवरून जोडले गेले आहेत. काल गणेश चतुर्थीच्या दिवशी मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या ‘Sudhir Mungantiwar | सुधीर मुनगंटीवार’ या व्हॉट्सॲप चॅनेलचा शुभारंभ करण्यात आला आहे. मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अखत्यारीत असलेल्या तीनही विभागांचे महत्त्वाचे निर्णय, त्यांनी केलेली विविध कामे, संबंधित योजना, विविध विकास प्रकल्प आदींची अचूक आणि अधिकृत माहिती, त्यांचे विविध कार्यक्रम, दौरे, बैठका यांची माहिती या व्हॉट्सअप चॅनेलच्या माध्यमातून आता थेट जनतेपर्यंत पोहोचणार आहे.

समाजातील संवाद माध्यमांमध्ये नवीन तंत्रज्ञानानुसार वेगाने बदल होत असून  सर्वसामान्यांचे संवादाचे प्रभावी माध्यम ठरलेल्या ‘व्हॉट्सॲप’ने चॅनलच्या माध्यमातून संवादाचा नवीन मार्ग उपलब्ध करून दिला आहे.

सोबत दिलेल्या दुव्यावरून आपल्या या चॅनेलला फॉलो करण्याचे आवाहन मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केले आहे. या चॅनेलवरून सोप्या पद्धतीने सर्व अधिकृत माहिती जनतेला थेट हातातील स्मार्टफोनवर मिळणार आहे.

या व्हॉट्सअप चॅनेलला केवळ स्वतःच्या व्हॉट्सअपवरून फॉलो करायचे आहे. त्यासाठी कुठलीही नोंदणी करण्याची आवश्यकता नसून आपला व्हॉट्सअप क्रमांकही व्हॉटसअपकडून गुप्त राखला जातो. शिवाय एका व्हॉट्सअप चॅनेलला किती लोकांनी फॉलो करावे यावरही व्हॉट्सअप ग्रुपसारखे काही बंधन नाही. त्यामुळे व्हॉट्सअप चॅनेल हे अधिक मुक्त, स्वतंत्र आणि प्रभावी असे लोकप्रिय संवाद माध्यम ठरेल, असे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

चॅनेलला असे करा फॉलो :

व्हॉटसॲपवरील ‘अपडेट्स’ मेनूमध्ये गेल्यावर तिथे चॅनेल विभागात हे चॅनेल आहे. त्याला क्लिक करुन फॉलो केले की तुम्हाला सर्व अपडेट्स विनासायास उपलब्ध होणार आहेत. https://whatsapp.com/channel/0029Va9ERCr4NViuAvsdCI14 या लिंकवर व्हॉटसॲपधारकांनी क्लिक केल्यास ‘Sudhir Mungantiwar | सुधीर मुनगंटीवार’ या चॅनलला फॉलो करता येणार आहे.

००००

दीपक चव्हाण/विसंअ/

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

अमरावती, दि. 20 : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासकीय योजनेंतर्गत तात्काळ मदत उपलब्ध करुन देऊन दिलासा देणे हे जिल्हा प्रशासनाचे प्रथम प्राधान्यक्रम काम आहे. याअंतर्गत मदतीसाठी पात्र ठरलेल्या कुटुंबियांच्या प्रकरणांची प्राथम्याने चौकशी करुन विस्तृत अहवाल लवकरात लवकर शासनास सादर करावा. तसेच शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनच्या अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

            येथील डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय प्रबोधिनी येथे आज आयोजित बैठकीत मिशनच्या अध्यक्षा डॉ. पाण्डेय यांनी वर्धा जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचा व केलेल्या विविध उपाययोजनांचा जिल्हाधिकारी डॉ. राहुल कर्डिले यांच्याकडून आढावा घेतला.

वर्धा जिल्ह्यात माहे जानेवारी ते ऑगस्ट 2023 पर्यंत एकूण 65 शेतकरी आत्महत्या झाल्या असून त्यापैकी 28 शेतकरी आत्महत्या मदतीसाठी पात्र ठरल्या आहेत. तर 34 प्रकरणे नियमात बसत नसल्याने मदतीसाठी अपात्र ठरली आहेत. तसेच तीन प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. मदतीसाठी पात्र ठरलेल्या 28 आत्महत्यांपैकी 12 प्रकरणांत आत्महत्याग्रसत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत देण्यात आली असून शासनाकडून निधी प्राप्त होताच उर्वरित प्रकरणात मदत देण्यात येईल, अशी माहिती वर्धेचे जिल्हाधिकारी डॉ. कर्डिले यांनी दिली.

जिल्हा प्रशासनाव्दारे आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या घरी जाऊन कुटुंबातील सदस्यांची सांत्वनपर भेटी घेतल्या आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना तात्काळ मदत उपलब्ध करुन देण्यासाठी गठित समितीच्या नियमित बैठका घेण्यात येतात. शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या योजनेंतर्गत तसेच स्वयंसेवी संस्थांकडून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आवश्यक ती मदत तात्काळ देण्यात येते. तसेच जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सुक्ष्म नियोजन करण्यात आले आहे, अशीही माहिती जिल्हाधिकारी डॉ. कर्डिले यांनी यावेळी दिली.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांची मुलाखत

मुंबई, दि. 20 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे.

खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत ग्रामीण क्षेत्रातील गरजू लोकांना रोजगार, कारागीर व बलुतेदारांच्या उद्योगाचे स्थैर्य, स्वयंरोजगाराच्या क्षेत्राची व्यापक प्रमाणात वृद्धी करणे तसेच कारागिरांचे तांत्रिक कौशल्य वाढविण्यास निवडक ग्रामोद्योगांचे प्रशिक्षण देणे, तयार मालाच्या विक्रीस मदत करणे इत्यादी कामे प्रामुख्याने केली जात आहेत. लघु उद्योग तसेच ग्रामीण कारागिरांच्या जीवनमानामध्ये अमूलाग्र बदल घडविणे हे मंडळाचे मुख्य ध्येय असून ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या मालाला हक्काची बाजारपेठ मिळवून देण्याकरिता मंडळ प्रभावी योजना राबवत आहे. मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि उपक्रमांबाबत मंडळाचे सभापती श्री. साठे यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत गुरुवार दि. 21 सप्टेंबर, 2023 रोजी सायंकाळी 7.30 वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

 

महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज मोहिमेत सहभागासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत

मुंबई, दि. २० : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत ‘महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज’ मोहीम ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत राबविण्यात येणार आहे, असे मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त रवींद्र सुरवसे यांनी प्रसिद्धीसपत्रकाद्वारे कळविले आहे.

नवीन संकल्पना आणि नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य, रोजगार व उद्योजकता विभाग व नावीन्यता विभागातर्फे स्टार्टअप धोरण जाहीर करण्यात आले आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांच्या नव कल्पनांना मूर्तस्वरूप देण्यासाठी सोसायटीतर्फे महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजचे आयोजन करण्यात आले आहे. यात विद्यार्थ्यांना १० लाख रुपयांपर्यंतचे भांडवल मिळणार आहे. राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नव संकल्पनांचा शोध घेणे व त्यांच्या उद्योजकतेचे स्वप्न साकार करण्यासाठी पाठबळ पुरविणे हे या योजनेचे मुख्य उद्द‍िष्ट आहे.

ही स्पर्धा तीन टप्प्यात होईल. पहिल्या टप्प्यात संस्थांची नोंदणी व संस्थास्तरावर संकल्पनांची निवड, दुसऱ्या टप्प्यात जिल्हास्तरीय सादरीकरण व संकल्पनांची निवड, तिसऱ्या टप्प्यात इन्क्युबेशन प्रोग्रॅमचा समावेश असेल. या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना पुढीलप्रमाणे बक्षीसे मिळणार आहेत. त्यात तालुकास्तरावरील उत्तम तीन विजेत्यांना रोख पारितोषिक, जिल्हास्तरावरील सर्वोत्तम १० विजेत्यांना प्रत्येकी १ लाख रुपयांचे बीज भांडवल, राज्यस्तरावर सर्वोत्तम १० विजेत्या नवउद्योजकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बीज भांडवल मिळेल. याशिवाय विशेष इन्क्युबेशन प्रोग्रॅम, इतर योजनांचा लाभ आणि शैक्षणिक संस्था आणि जिल्ह्यांना पारितोषिके मिळतील.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शासनाच्या www.msins.in अथवा www.schemes.msins.in या संकेतस्थळावर जास्तीत जास्त शैक्षणिक संस्था, महाविद्यालयांनी नोंदणी करावी, असे आवाहन सहायक आयुक्त श्री. सुरवसे यांनी केले आहे.

०००००

गोपाळ साळुंखे/ससं/

डेक्कन ओडिसी ट्रेन २.० पुन्हा नव्या रूपात धावण्यास सज्ज; छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे उद्या शुभारंभ

मुंबई, दि. २० : आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिलेली डेक्कन ओडिसी ट्रेन २.० नव्या रुपात धावण्यास सज्ज झाली आहे. डेक्कन ओडिसी २.० या ट्रेनचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, फलाट क्रमांक १८ येथे गुरूवार दिनांक २१ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी २ वाजता विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी-शर्मा, भारतीय रेल्वेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे. मान्यवरांना घेऊन ही ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे असा प्रवास करणार आहे.

देशातील प्रसिद्ध ४ शाही रेल्वेपैकी एक असणारी आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिलेली डेक्कन ओडिसी ट्रेन २.० ही नव्या रुपात पुन्हा पर्यटकांसाठी खुली होणार आहे. या ट्रेनमध्ये उच्च दर्जाच्या सोयीसुविधा देण्यात येतात. सन २००४ ते २०२० पर्यंत या आलिशान व आरामदायी ट्रेनला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. मात्र, सध्या डेक्कन ओडिसी ट्रेन अत्याधुनिक सोयीसुविधांनी पुन्हा पर्यटकांच्या सेवेकरिता सुरू होत आहे. या नूतनीकरण करण्यात आलेल्या डेक्कन ओडिसी सहलींमध्ये महाराष्ट्रा व्यतिरिक्त देशातल्या अन्य राज्यामधील पर्यटन स्थळांचाही समावेश करण्यात आला आहे.

0000

संध्या गरवारे/विसंअ/

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई दि. 7 : मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. महामार्गाच्या संदर्भात विधानभवनात...

पणन मंत्री जयकुमार रावल आणि कृषिमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांनी घेतली केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार...

0
नवी दिल्ली 7 : महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांदा पिकाचे उत्त्पन्न घेतात. केंद्र शासनाने या शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करावा अशी मागणी पणन मंत्री...

अभियांत्रिकी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. ७ : राज्यातील अकृषी सार्वजनिक विद्यापीठ आणि अशासकीय महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर रिक्त पदे भरल्यास नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीनुसार उच्च शिक्षणाची गुणवत्ता...

पनवेल व उरणमधील आदिवासी बांधवांचे नियोजनबद्धरित्या पुनर्वसन करावे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

0
मुंबई, दि. 7 : पनवेल व उरण तालुक्यातील सिडको परिक्षेत्रात वास्तव्यास असलेल्या आदिवासी बांधवांचे पुनर्वसन नियोजनबद्धरीत्या करण्यात यावे, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिले. आदिवासी...

मिरा-भाईंदर येथील ‘पंडित भीमसेन जोशी’ शासकीय रुग्णालयातील आरोग्य सुविधांची कामे वेळत पूर्ण करावी – सार्वजनिक आरोग्य...

0
मुंबई, दि. 7 : मिरा-भाईंदर शहरातील ‘पंडित भीमसेन जोशी’ शासकीय रुग्णालयातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी कामे वेळेत पूर्ण करण्यात यावीत, तसेच तांत्रिकदृष्ट्या मान्यतेसाठी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही...