मंगळवार, जुलै 8, 2025
Home Blog Page 1139

मुंबई – सेंट पीटर्सबर्ग सिस्टर सिटी संदर्भातील सामंजस्य करारामुळे भारता आणि रशियाचे मैत्रीसंबंध दृढ होणार – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

मुंबई, दि. २२ : भारत – रशियामध्ये राजकीय आणि वैचारिक नाते आहे. याचबरोबर मुंबई आणि सेंट पीटर्सबर्ग या शहराला सिस्टर सिटीची परंपरा लाभली आहे. या सिस्टर सिटी संदर्भात भविष्यात होणाऱ्या सामंजस्य करारामुळे रशिया आणि भारताचे मैत्रीपूर्ण संबंध दृढ होतील, असे विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी सांगितले. महाराष्ट्र विधिमंडळात रशियाच्या शिष्टमंडळाने आज विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर आणि विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट घेतली. मुंबई-सेंट पीटर्सबर्गमधील प्रस्तावित सामंजस्य करारासंदर्भात विचार विनिमय या भेटीदरम्यान करण्यात आला.

अध्यक्ष श्री. नार्वेकर म्हणाले की, मुंबई आणि सेंट पीटर्सबर्ग या दोन्ही शहरांना सिस्टर सिटीची ५५ वर्षाची परंपरा आहे. या सिस्टर सिटी संदर्भातील सामंजस्य करारामुळे दोन्ही शहरांसह देशांतील नागरी, कृषी, व्यापार संदर्भातील समस्या सोडविण्यासाठी सहकार्य लाभणार आहे. रशिया भारताचा जुना मित्र देश असून, संसदीय, राजकीय, सांस्कृतिक आणि शैक्षणिक पद्धतीच्या देवाणघेवाणीमुळे उभय शहरासह देशांमध्येही नाते वृद्धिंगत होणार आहे. करारावर चर्चा करण्यासाठी भारतास भेट दिल्याबद्दल अध्यक्ष श्री. नार्वेकर यांनी यावेळी शिष्टमंडळाचे आभार मानले.
उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, उभय देशांत वैचारिक, राजकीय संवाद आहे. भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रशियासोबत मैत्रिपूर्ण संबंध अधिक दृढ केले आहेत. भविष्यातही व्यापार, तंत्रज्ञान, शाश्वत विकास, कृषी क्षेत्रातील संशोधन, राजकारण, साहित्य यासंदर्भात विचारांची देवाण-घेवाण करून प्रगतीसाठी संयुक्तिकरित्या प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. उभय देशाच्या प्रगतीसाठी रशियाने संसदीय कार्यपद्धतीचा अभ्यास करण्यासाठी भारत भेट दिली याचा आनंद झाला असल्याचे उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.

सेंट पीटर्सबर्ग विधानसभेचे अध्यक्ष अलेक्झांडर बेलस्की यांनी मुंबई शहराच्या संस्कृती, पर्यटन, पायाभूत सुविधा, दळणवळण, पाणीपुरवठा, चित्रपटसृष्टी व्यवस्थानाबाबत कौतुक केले. तरूणांना शिक्षणासाठी पिटर्सबर्ग येथे पाठविल्यास आम्ही शैक्षणिक सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी विधिमंडळाचे आमदार रईस शेख, अमिन पटेल, सचिव जितेंद्र भोळे यांच्यासह सेंट पीटर्सबर्ग विधानसभेच्या युनायटेड रशिया पक्षाच्या प्रमुख पावेल कुरपिंक, सेंट पीटर्सबर्गच्या विधानसभेच्या संपादकीय कमिटीचे उपाध्यक्ष ओलेगा मीयुता, सेंट पीटर्सबर्गच्या विधानसभेच्या आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अध्यक्ष श्रीमती आखो दोवा नर्गिस, रशियन फेडरेशन संघाचे महावाणिज्यदूत एच. इ. आलसकी सुरोस्तव, मुंबई रशियन हाऊसचे उप-वाणिज्य दूत तथा संचालक डॉ. एलिना रेमजोव्हा, रशियन फेडरेशनच्या वाणिज्यदूत जोरजी डेरे इर, वाणिज्यदूत येलेक्सी कलगीन, मुंबईच्या रशियन फेडरेशनचे उपवाणिज्यदूत ॲलेक्स क्री सिलिनिकोव यावेळी उपस्थित होते.

या शिष्टमंडळाने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाला भेट दिली आणि कामकाजासंदर्भात माहिती जाणून घेतली.

०००

श्रद्धा मेश्राम/स.सं

मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अभय देशपांडे यांची ‘दिलखुलास’ मध्ये दि. २३, २५ सप्टेंबरला मुलाखत

मुंबई, दि. 22 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मत्सव्यवसाय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अभय देशपांडे यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे.

किसान क्रेडिट कार्ड ही केंद्र सरकारची महत्वपूर्ण योजना असून या योजनेच्या माध्यमातून केंद्र शासनाने मच्छीमार व मत्स्यशेतकरी यांना खेळते भांडवल उपलब्ध करुन देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेची राज्य शासनामार्फत कशा प्रकारे अंमलबजावणी करण्यात येत आहे. तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी मच्छीमार व मत्स्यशेतकरी यांनी कुठे व कसा अर्ज करावा, या योजनेच्या माध्यमातून किती प्रमाणात अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अशा महत्वपूर्ण विषयावर प्रादेशिक उपायुक्त श्री. देशपांडे  यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रम शनिवार दि. 23 आणि सोमवार दि. 25 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल साळुंखे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

०००

मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या भागभांडवलात भरीव वाढ करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 22 :- महाज्योती, सारथी, बार्टी यासारख्या संस्थांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये समानता आणण्यासाठी गठित करण्यात आलेल्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळालाही लागू करण्याचा आणि न्यायालयाचा कोणताही अडसर नसलेल्या पाच टक्के शैक्षणिक आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी मंत्रालयात घेतलेल्या बैठकीत सांगितले. मौलाना आझाद महामंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या कर्ज योजनांची सांगड केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या विश्वकर्मा योजनेशी घालता येईल किंवा कसे, ही बाबही महामंडळाने तपासून घ्यावी, असेही निर्देशही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी दिले.

राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या विविध समस्यांबाबत उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक त्यांच्या मंत्रालयातील दालनात गुरुवारी झाली. यावेळी अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे अध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा, संजय खोडके, हाफेज मोहम्मद नदीम सिध्दिकी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.राजगोपाल देवरा, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, कौशल्य विकास, उद्योजकता, नगरविकास, अल्पसंख्याक विकास विभाग, ग्रामविकास, नियोजन, शालेय शिक्षण, विधी व न्याय, पाणीपुरवठा व स्वच्छता, सामाजिक न्याय, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, या विभागाचे सचिव हे प्रत्यक्ष तर छत्रपती संभाजीनगर व सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

या बैठकीत मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या भाग भांडवलामध्ये वाढ करणे व शासनाने द्यावयाच्या हमी संदर्भात देखील चर्चा करण्यात आली.  महामंडळाचे सध्याचे भाग भांडवल 700 कोटी रुपये असून ते टप्प्या-टप्प्याने एक हजार कोटी रुपयांपर्यंत नेण्यात येईल, शासनाने तीस कोटी रुपयांची कर्ज हमी दिलेली आहे, त्यात देखील वाढ करुन ती टप्प्या-टप्प्याने पाचशे कोटी रुपयांपर्यंत नेण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी स्पष्ट केले.

मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाकडून गरजूंना देण्यात येणाऱ्या कर्जासाठी असलेल्या अटींचा पुनर्विचार करुन नव्याने अटी व शर्ती निश्चित कराव्यात, अशाही सूचना श्री. पवार यांनी महामंडळाला दिल्या.

मागासवर्गीय मुस्ल‍िम अल्पसंख्याकांसाठी सामाजिक तसेच शैक्षणिक आरक्षण देण्याच्या बाबतीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून किमान शैक्षणिक आरक्षण कसे देता येईल, हे बघू, असे श्री. पवार यांनी आश्वासित केले. याशिवाय मागासवर्गीय मुस्ल‍िम अल्पसंख्याकांसाठी विशेष पॅकेज देण्याबाबतीतही यावेळी बैठकीत चर्चा करण्यात आली.

वक्फ मिळकतीसंबंधी महाराष्ट्र राज्यातील गाव नमुना नंबर 7/12 च्या उताऱ्यावर तसेच नागरी भागातील वक्फ मिळकतीच्या अधिकार अभिलेखांमध्ये केवळ संबंधित वक्फ संस्थेच्या नावाची नोंद घेणे व इतर वक्फ सदरी “वक्फ प्रतिबंधित सत्ता प्रकार” अशी नोंद घेणेबाबत सर्वसमावेशक सूचना शासनाचे सर्व जुने शासन निर्णय अधिक्रमित करून राज्यातील वक्फ संस्थांच्या जमिनीच्याबाबत अधिकार अभिलेखात वक्फ संस्थांचे नाव घेऊन इतर वक्फ सदरी “वक्फ प्रतिबंधित सत्ता प्रकार व कायदेशीर वारसांची नोंद घेण्याबाबत नवीन शासन निर्णय निर्गमित करण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. या विषयामधील सर्व कायदेशीर बाबी तपासण्यासाठी अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करावी, या समितीत अल्पसंख्याक विभागाच्या सचिव, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, वक्फ बोर्डाचे सदस्य सचिव यांचा समावेश करावा, बैठकीत झालेल्या चर्चेनुसार 7/12  वर अगोदर वक्फ बोर्ड, त्यानंतर ट्रस्ट आणि इतर अधिकारात मुतलकी यांचे नाव घेता येईल का, हेही तपासावे, कोणत्याही परिस्थितीत मालमत्तेची मालकी वक्फ बोर्डाकडेच राहिली पाहिजे, असेही निर्देश श्री. पवार यांनी दिले.

महाराष्ट्र राज्य वक्फ महामंडळाच्या अधिपत्याखाली असलेल्या वक्फ संस्थाकडून वक्फ फंड, विलंब शुल्क, ऑडिट फी, जीएसटी घेतला जातो, ही रक्कम जास्त असल्याने कमी करावी, अशाप्रकारची मागणी जमियत-ए-उलमा हिंद यांच्याकडून करण्यात आली होती. विलंब शुल्क व व ऑडिट फी  कमी करुन विलंब शुल्क 1 हजार रुपयांऐवजी 500 रुपये, ऑडिट फी 500 रुपयांऐवजी 200 रुपये, 2 हजार रुपयांऐवजी 500 रुपये आणि 5 हजार रुपयांऐवजी 1 हजार रुपये आकारण्यात यावेत, असा निर्णय तत्काळ घेत असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी जाहीर केले.

छत्रपती संभाजीनगर येथील हज हाऊस तातडीने सुरु करण्याबाबत निर्णय झाला असून त्याचे लवकरच उद्घाटन केले जाईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

छत्रपती संभाजीनगर येथील वक्फ बोर्डाची जागा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ताब्यात ठेवली असून ती बोर्डाला परत मिळाली पाहिजे, या मागणीबाबत चर्चा करण्यात आली, यासंदर्भात देखील अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) यांच्या समितीने योग्य तोडगा काढावा, अशा सूचना श्री. पवार यांनी दिल्या.

सोलापूर शहर येथील शैक्षणिक व खेळासाठी आरक्षित असलेल्या शासकीय भूखंडाची मागणी जमियत – उलमा-ए-महाराष्ट्र या संस्थेने केली आहे. या भुखंडासाठी आणखीही काही अल्पसंख्याक संस्थांनी अर्ज केला असल्याची बाब अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) यांनी निदर्शनास आणून दिली. शासनाच्या नियमानुसार संस्थेची पात्रता, भूखंडावर विकास करण्याची संस्थेची आर्थिक क्षमता, संस्थेचे कार्य या बाबी तपासूनच सुयोग्य संस्थेला भूखंड वितरित करण्याचा निर्णय लवकरात लवकर महसूल विभागाने घ्यावा, असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

राज्यात जिल्हा परिषद नगरपालिका व महानगरपालिका अंतर्गत उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये रिक्त असलेली पदे भरण्याबाबत, उर्दू शिक्षक भरतीसाठी बिंदू नामावलीनुसार आरक्षित जागांवर उमेदवार उपलब्ध न मिळाल्यास ती जागा खुल्या प्रवर्गातून भरण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.  आरक्षणातील उमेदवार न मिळाल्यास खुल्या प्रवर्गातून पदे भरावीत, अशा प्रकारचा शासन निर्णय असल्याची बाब सामाजिक न्याय विभागाच्या सचिवांनी निदर्शनास आणून दिली.  उर्दू शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे या शासन निर्णयाची अंमलबजावणी करून ही पदे तातडीने भरण्याबाबत महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांना तातडीने कळवावे, असेही निर्देश उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिले.

वक्फ मालमत्तांच्या भूसंपादन करीत असताना मालमत्तांचा मोबदला महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाला मिळत नाही, ही बाब देखील महामंडळाने निदर्शनास आणून दिली. याबाबत अतिरिक्त मुख्य सचिवांच्या समितीने अभ्यास करावा व शिफारस करावी, अशीही सूचना श्री. पवार यांनी केली. अल्पसंख्याक आयुक्तालयाच्या निर्मितीबाबतही प्राथमिक चर्चा या बैठकीत करण्यात आली. यावेळी  संजय खोडके यांनी प्रौढ शिक्षण विभागाकडील कामाचा भार कमी झालेला आहे.  प्रौढ शिक्षण विभागाच्या मनुष्यबळाचा वापर करुन घेण्यासाठी या विभागाकडील कर्मचाऱ्यांना प्रस्तावित अल्पसंख्याक आयुक्तालयात समाविष्ट करून घेता येऊ शकेल. त्यामुळे आयुक्तालयासाठी कमी पदे निर्माण करावी लागतील व शासनावरील भार कमी होईल, अशी सूचना केली. ही बाब देखील अल्पसंख्याक विभागाने तपासून घ्यावी, अशा सूचना श्री. पवार यांनी केल्या.

००००

दीपक चव्हाण/विसंअ/

 

मोदी आवास घरकुल योजना

“सर्वांसाठी घरे-२०२४” हे शासनाचे धोरण असून, त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना सन २०२४ पर्यंत स्वत:चे हक्काचे घर मिळावे असा प्रयत्न शासनाचा आहे. त्यानुसार राज्यात ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना राबविण्यात येत आहेत.

शासनामार्फत अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना घरकुल योजनाचा लाभ देण्यासाठी रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आदीम आवास योजना तसेच विमुक्त जाती भटक्या जमातीसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना व धनगर आवास योजना आहेत. तथापि, इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्याकरीता अशा प्रकारची कोणतीही योजना अस्तित्वात नव्हती त्यामुळे इतर मागास प्रवर्गातील घरकुलास पात्र लाभार्थी वंचित राहत होते.

यामुळे राज्य शासनाने सन 2023-2024 या वर्षांचा अर्थसंकल्प सादर करतांना राज्यात इतर मागास वर्गासाठी 3 वर्षांत 10 लाख घरे पूर्ण करण्यासाठी ‘मोदी आवास घरकुल योजना’ सुरु करण्याची घोषणा केली आहे. त्याअनुषंगाने इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी  येत्या तीन वर्षांत 10 लाख घरे बांधण्यासाठी नवीन ‘मोदी आवास घरकुल योजना’ राबविण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.

???? अशी आहे योजना

राज्यात ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील आवास प्लस मधील प्रतिक्षा यादीत नाव असलेले लाभार्थी, आवास प्लस प्रणालीवर नोंद झालेले परंतु ऑटोमॅटीक सिस्टिमद्वारे रद्द झालेले पात्र लाभार्थी, जिल्हा निवड समितीने शिफारस केलेले लाभार्थींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

वरील नमूद मधून उपलब्ध झालेल्या इतर मागास प्रवर्गातील पात्र लाभार्थींना नवीन घर बांधण्यासाठी अथवा अस्तित्वात असलेल्या कच्च्या घराचे पक्क्या घरात रुपांतर करण्यासाठी 1 लाख 20 हजार अर्थसहाय्य देण्यात येईल. लाभार्थींना किमान 269 चौ. फूट इतके क्षेत्रफळाचे बांधकाम करणे आवश्यक असेल.

इतर मागास प्रवर्गातील निवड झालेल्या लाभार्थींना  प्राधान्यक्रमानुसार ग्रामसभेमार्फत निवड करण्यात येवून लाभार्थ्यांची छाननी तालुकास्तरावर गट विकास अधिकारी यांचे मार्फत करुन घरकुलाचे प्रस्ताव जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत निकषानुसार लाभार्थींना निवड केली जाईल.

???? अशी असेल लाभार्थी पात्रता

???? लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील इतर मागास प्रवर्गातील असावा.

???? लाभार्थ्यांचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान 15 वर्ष असावे.

???? लाथार्थ्यांचे वार्षिंक उत्पन्न रु.1 लाख 20 हजार पेक्षा जास्त नसावे.

???? लाभार्थ्यांचे स्वत:च्या अथवा कुटूंबियाच्या मालकीचे राज्यात पक्के घर नसावे.

???? लाभार्थ्यांकडे स्वत:ची अथवा शासनाने दिलेली जमीन असणे आवश्यक आहे अथवा त्यांचे स्वत:चे कच्चे घर असलेल्या ठिकाणी घर बांधता येईल.

???? लाभार्थी कुटूंबाने महाराष्ट्र राज्यात अन्यत्र कोठेही शासनाच्या कोणत्याही गृहनिर्माण गृहकर्ज योजनांचा लाभ घेतलेला नसावा.

???? एकदा लाभ घेतल्यानंतर लाभार्थी पुन्हा योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहणार नाही.

???? लाभार्थी हा प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गतच्या कायमस्वरुपी प्रतिक्षा यादीमध्ये समाविष्ट नसावा.

???? आवश्यक कागदपत्रे

सातबारा उतारा, मालमत्ता नोंदपत्र, ग्रामपंचायतमधील मालमत्ता नोंदवहीतील उतारा अथवा अथवा ग्रामपंचायत प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत, आधारकार्ड, स्वेच्छेने दिलेल्या आधारकार्डची प्रत, रेशनकार्ड, निवडणुक ओळखपत्र, विद्युत बिल, मनरेगा जॉब कार्ड लाभार्थींच्या स्वत:च्या नावे वापरात असलेल्या बचत खात्याच्या पासबुकची छायांकित प्रत.

प्राधान्यक्षेत्र लाभार्थींची यादी करतांना ग्रामसभेने घरात कोणीही कमवत नाही अशा विधवा, परितक्त्या महिला, कुटूंब प्रमुख, पूरग्रस्त क्षेत्रामधील लाभार्थी अथवा पिडीत लाभार्थी, जातीय दंगलीमुळे घराचे नुकसान (आग व इतर तोडफोड) झालेली व्यक्ती, नैसर्गिक आपत्तीबाधीत व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती उद्दिष्टाच्या किमान 5 टक्के उद्दिष्ट दिव्यांगाकरीता राखीव ठेवणे आवयश्क आहे. इतर पात्र कुटुंबे यांना ग्रामसभेने प्राधान्य क्षेत्र देण्यात येणार आहे. घराच्या बांधकामाच्या प्रगतीनुसार राज्य व्यवस्थापक कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयाकडून ठरवून दिलेले बांधकाम पूर्ण झाल्याची खात्री झाल्यानंतर सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे निधी लाभार्थींच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येईल.

घरकुल योजनेंतर्गत राज्य शासनाने घोषित केलेल्या  डोंगराळ, दुर्गम भाग क्षेत्रामध्ये घरकुल बांधकामाकरीता प्रति घरकुल 1.30 लक्ष व सर्वसाधारण क्षेत्राकरीता प्रति घरकुल 1.20 लक्ष अर्थसहाय्य देय राहील. तसेच प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण योजनेप्रमाणे ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना मनरेगा अंतर्गत अनुज्ञेय असलेले अनुदान 90/95 दिवस अकुशल मजुरीच्या स्वरुपात अभिसरणाद्वारे अनुज्ञेय राहील. तसेच शौचालय बांधकामासाठी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत देय असलेले 12 हजार प्रोत्साहनपर अनुदानास देखील लाभार्थी पात्र असेल. इतर मागास प्रवर्गातील ज्या पात्र लाभार्थ्यांकडे घरकुल बांधकामाकरिता स्वत:ची जागा उपलब्ध नाही. असे लाभार्थी योजनेच्या  लाभापासून वंचित राहू नये, याकरीता सदर लाभार्थ्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेतर्गत 500 चौ.फुट जागेपर्यत 50 हजार पर्यंत अनुदान देय राहील. तसेच इतर मागास प्रवर्गा व्यतिरिक्त अन्य प्रवर्गातील पात्र लाभार्थी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेतंर्गत प्रचलित असलेल्या तरतुदीनुसार लाभ मिळण्यास पात्र असेल.

  • संदीप गावीत, उपसंपादक, जिल्हा माहिती कार्यालय, धुळे

०००

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या थेट कर्ज योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. २२: सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागांतर्गत अनुसूचित जातींच्या सामाजिक व आर्थिक विकासाकरिता स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने वैयक्तिक अर्जदारांना उद्योग अथवा व्यवसाय करण्यासाठी कर्ज उपलब्ध केले जाते. मुंबई शहर व उपनगरातील अनुसूचित जातीमधील मातंग पोटजातीतील अर्जदारांनी १० ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक अंगद कांबळे यांनी केले आहे.

थेट कर्ज योजनेंतर्गत एक लाख रुपये कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते. अनुसूचित समाजाच्या जातीतील मांग, मातंग, मिनी मादिंग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमां, मांग गारुडी, मांग गारोडी, मदारी मादगी या १२ पोटजातीतील इच्छुक अर्जदार या कर्जासाठी अर्ज करू शकतात. विहित कालावधीत जिल्हा कार्यालय मुंबई शहर-उपनगर, गृहनिर्माण भवन, कलानगर, तळमजला, या पत्त्यावर अर्ज व मूळ दस्तावेजासह स्वत: साक्षांकित करून सादर करावेत. अधिक माहितीसाठी ०२२- २६५९११२४ अथवा rmslasdcbandra@gmail.com यावर संपर्क साधावा, असे श्री. कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

०००

श्रद्धा मेश्राम/ससं/

 

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून आता ठिबकऐवजी खतांसाठी अनुदान मिळणार – कृषी मंत्री धनंजय मुंडे

मुंबई दि. २२ : माजी कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने फलोत्पादन विभागाकडून सुरू असलेल्या स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेंतर्गत १५ फळ पिकांचा समावेश करण्यात आला आहे. याअंतर्गत आता ठिबक सिंचनाऐवजी आवश्यक खतांसाठी अनुदान देण्यात येणार असल्याचा शासन निर्णय कृषी विभागामार्फत निर्गमित करण्यात आला आहे.

फळबाग लागवडीअंतर्गत ठिबक सिंचन करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून अनुदान देण्यात येते, त्यामुळे ठिबक ऐवजी हे अनुदान खतांसाठी देण्याचा निर्णय कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला होता. आता भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून ठिबक ऐवजी सर्व प्रकारच्या आवश्यक खतांसाठी 100 टक्के अनुदान देण्यात येणार असून यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती मंत्री श्री. मुंडे यांनी दिली आहे.

राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करत मंत्री श्री. मुंडे यांनी आवश्यकता भासल्यास 100 कोटींच्या तरतुदीमध्ये आणखी वाढ करण्यात येईल, अशी माहिती देखील दिली आहे.

राज्य सरकारने 6 जुलै, 2018 रोजी भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना राबविण्यास मान्यता दिलेली असून यामध्ये 15 फळपिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. खड्डे खोदणे, कलमे लागवड करणे, पीक संरक्षण, नांग्या भरणे, ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे, इत्यादी कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदान देण्यात येत होते. यामध्ये आता सुधारित मापदंड लागू करण्यात आले असून मजुरीसाठी देखील वाढीव खर्च देण्यात येईल.

यापैकी ठिबक सिंचनाचे अनुदान राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून मिळत असल्याने, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये ठिबक सिंचनाऐवजी आता सर्व प्रकारच्या खतांसाठी 100 टक्के अनुदान दिले जाणार असून, याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

०००

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

शेतकऱ्यांना मिळणार ‘रासायनिक व सेंद्रीय खते’ – मंत्री संदिपान भुमरे

मुंबई, दि. २२ : भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत ‘ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे’ या बाबीऐवजी या वर्षी ‘रासायनिक व सेंद्रीय खते देणे’ ही बाब समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी दिली.

मंत्री श्री. भुमरे म्हणाले की, भाऊसाहेब फुंडकर फळबाग या योजनेंतर्गत लाभार्थींना ठिबक सिंचन संचाच्या उभारणीकरिताचे अनुदान केंद्र पुरस्कृत ‘राष्ट्रीय योजना प्रति थेंब अधिक पीक’ या योजनेतून देण्यात येत होते. तसेच शेतकऱ्यांना इतर योजनांमधून ठिबक सिंचन संचाचा लाभ होत असल्याने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून ठिबक ‘सिंचनाद्वारे पाणी देणे’ या बाबीऐवजी आता ‘खते देणे’ ही बाब समाविष्ट करण्याची तसेच सुधारित केलेल्या मापदंडांना मंजूरी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत शासन अनुदानीत बाबींच्या प्रती हेक्टरी सुधारित मापदंडांना मंजूरी देण्यात आली आहे.

यापुढे जिवंत झाडांचे प्रमाण निश्चित केल्यानुसार प्रमाणात दिसून आल्यास लाभार्थींना देय असणारे अनुदान तीन वर्षांत ५०:३०:२० या प्रमाणात न देता अंदाजपत्रकामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षामध्ये देय दर्शविण्यात आलेल्या अनुदानाप्रमाणे देण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती मंत्री श्री. भुमरे यांनी दिली.

०००

राजू धोत्रे/विसंअ/

‘सारथी’ मुळे मिळतेयं मराठा समाजाच्या तरूणांच्या स्वप्नांना बळ!

राज्यातील सर्व घटकांच्या विकासाला पूरक वातावरण, सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासन नेहमीच प्रयत्नशील असते. याच उद्देशाने महाराष्ट्रातील विविध जातसमूहांच्या अस्तित्वाची दखल घेऊन त्या अनुषंगिक सहाय्यक योजना, उपक्रम राबवण्याच्या दृष्टीने विविध महामंडळांची, विभागांची निर्मिती राज्य शासन करत असते. या पार्श्वभूमीवर मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या, युवा पिढीच्या प्रगतीसाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे सारथीची स्थापना करण्यात आली आहे. सारथीच्या माध्यमातून राज्यातील मराठा समजाच्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीसाठी विविध कल्याणकारी उपक्रम, योजना व्यापक स्वरुपात राबवण्यात येत आहेत. आतापर्यंत राज्यातील १ लाख ३३ हजार २३६ विद्यार्थ्यांनी या संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेतला आहे.

संरचना आणि निधीची तरतूद

राज्य शासनाच्या नियोजन विभागांतर्गत स्वायत संस्था म्हणून छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, अर्थात सारथी कार्यरत आहे. शासनाकडून या संस्थेस भरीव निधी प्राप्त होत असून सन २०२३-२४ या  वर्षात ३०० कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. या संस्थेचे मुख्यालय पुणे येथे असून उपकेंद्र कोल्हापूर येथे कार्यरत आहे. त्यासोबतच राज्यात सारथीची ८ विभागीय कार्यालये कोल्हापूर, खारघर नवी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, लातूर, अमरावती व नागपूर या ठिकाणी कार्यरत आहेत. ही संस्था राज्य शासनाच्या नियोजन विभागाच्या अधिपत्याखाली Indian Companies Act 2013 & Rules कंपनी कायदा 2013 च्या कलम 8 अन्वये नोंदणीकृत असून संस्थेमार्फत मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या प्रवर्गाच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी विविध कल्याणकारी योजनांची कालबद्ध तऱ्हेने व प्रभावीपणे अंमलबाजावणी करण्यात येते. सारथीच्या संचालक मंडळावर शासनाने बारा संचालकांची नियुक्ती केलेली आहे.

संचालक मंडळाच्या बैठकीच्या माध्यमातून संस्थेचे कामकाजावर नियंत्रण ठेवण्यात येते. सारथी संस्थेचे संस्थापन समयलेख Memorandum of Association & Article of Association (MoA व AoA) हे Registrar of Companies यांचेकडे चार जून 2018 रोजी नोंदणीकृत केले असून त्यामध्ये नमूद तीन मुख्य उद्दिष्टे व 82 पूरक उद्दिष्टानुसार संस्थेचे कामकाज चालू आहे.

सारथीमार्फत राबविण्यात येत असलेल्या शैक्षणिक प्रगतीच्या योजना

उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती

डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती सन 2022-23 मध्ये तीनशे विद्यार्थी निवडीसाठीची जाहीरात जूलै 2022 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली असून यामधील 153 पात्र विद्याथ्यांची यादी सारथीच्या संकेतस्थळावर एप्रिल 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

परदेश शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत मुलामुलींना परदेश शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना या वर्षापासून सुरु करण्यात येत असून चार जुलै 2023 रोजी मंत्रीमंडळाने या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. यासाठीची जाहिरात ऑगस्ट 2023 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली असून 75 अर्ज प्राप्त झाले आहेत.

छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (CSMNRF)

या अतंर्गत सारथी मार्फत लक्षित गटातील उच्च शिक्षित विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे / विकसित करणे. संशोधन पुर्ण होईपर्यंत परंतू कमाल पाच वर्षाच्या कालावधी करिता संशोधन प्रगती अहवालाच्या आधारे प्रतिमाह रु. 31,000/- अधिछात्रवृत्ती देण्यात येते. यामध्ये 2019 ते 2023 या कालावधीत एकुण 2109 विद्यार्थांचा सहभाग आहे. कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम 2022-23 मध्ये छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास संगणक कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम (csms-deep) राबवण्यात येतो. दि.1 फेब्रुवारी 2023 पासून प्रशिक्षणास सुरवात करण्यात आली असून यामध्ये ऑनलाईन प्राप्त झालेल्या एकूण 36,525 अर्जांपैकी अंतिम छाननीतून सारथी संस्थेने मान्यता दिलेल्या अर्जाची संख्या 27,346 इतकी आहे.

छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती 2022-23 योजना 

यामध्ये एकूण 31.23 कोटी रु. वाटप करण्यात आले आहे. यासाठी इयत्ता 9 वी व 11 वी मध्ये पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण, 10 वी मध्ये 60% गुण मिळणे आवश्यक आहे. सारथी संस्थेने वरील अटीसह उत्तीर्ण झालेल्या व केंद्राच्या कोट्यामुळे शिष्यवृत्ती अप्राप्त असणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा रु. 800 प्रमाणे वार्षिक रू. 9600/- प्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येते.. तर मुख्यमंत्री विशेष संशोधन अधिछात्रवृत्ती (CMSRF)- सारथी मार्फत लक्षित गटातील उच्च शिक्षित विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी ही योजना राबवण्यात येते.

शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम

सन 2022-23 पासून ही योजना सारथीतर्फे राबवण्यात येते. यामध्ये वार्षिक लाभार्थी संख्या 2500 इतकी असून फलोत्पादन उत्पादन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण, कापणीनंतरचे प्रशिक्षण, यामध्ये सामान्य हरितगृह व्यवस्थापन, शेड नेट हाऊस व्यवस्थापन, वनस्पती प्रसार आणि भाजीपाला रोपवाटिका व्यवस्थापन याबाबत पाच दिवसाचे प्रशिक्षण दिल्या जाते. शेतकरी उत्पादन कंपनी प्रशिक्षण कार्यक्रम 2023-24 योजनेचा कार्यारंभ आदेश जानेवारी 2023 रोजी देण्यात आला आहे. प्रवेशासाठी ऑनलाईन पोर्टल तयार करण्याचे कामकाज एमसीडीसी स्तरावर सुरु असून ऑक्टोबर 2023 पासून प्रशिक्षणाचे राज्यातील 26 ठिकाणी सुरवात करण्यात येईल. याचे वार्षिक लाभार्थी एक हजार असणार आहेत.

सारथी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम

या कार्यक्रमांतर्गत 35 सेक्टरचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मुंबई यांच्यामार्फत राजमाता जिजाऊ कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याचे प्रयोजन आहे. सदर संस्थेमार्फत वीस हजार विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण सुरु करण्याच्या अनुषंगाने डिसेंबर 2022 रोजी सामंजस्य करार करुन कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची माहिती देण्यासाठी सहाय्यक आयुक्त (कौशल्य विकास) यांना सूचित करण्यात आले आहे. विद्यार्थी नोंदणी सुरु असून 186 अर्ज प्राप्त झाले आहेत.

छत्रपती शाहू महाराज तालुकास्तरीय निबंध स्पर्धाचे आयोजन

छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतीशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्रातील सर्व तालुक्यामध्ये प्राथमिक व माध्यमि गटातील विद्यार्थ्यांसाठी निबंधस्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विविध वयोगटातील एकूण 61 हजार 535 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला तर 5290 विद्यार्थ्यांना 10.25 लक्ष रुपयांची पारितोषिके देण्यात आली आहेत. तसेच करिअर मार्गदर्शन व समुपदेशन शिबिरांचे ही राज्यभरात विविध जिल्ह्यांत आयोजन केल्या जाते. ज्याचा विद्यार्थाना मोठ्या प्रमाणात लाभ मिळतो.

विभागाकडून राबविण्यात येणारे विविध प्रकल्प / योजना

या सोबतच कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम 2022-23 मध्ये सारथी मार्फत श्रीमंत मालोजीराजे सारथी इंडो जर्मन टुल रूम प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. यामध्ये औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर व नागपूर येथील प्रशिक्षण केंद्रांमधून डिसेंबर 2022 व 6 फेब्रुवारी 2023 पासून 466 उमेदवारांचे प्रशिक्षण सुरु झाले आहे. यापैकी 166 मुलांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून नोकरीसाठी त्यांच्या मुलाखती सुरु आहे. तसेच नवीन जाहीरात ही 3 जूलै 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या कौशल्य विकास प्रशिक्षणामध्ये औद्योगिक तंत्रज्ञान क्षेत्रातील अद्यावत, आधुनिक कौशल्य विद्यार्थ्यांना उपलब्ध करून उद्योगांना आवश्यक रेडी टू वर्क मनुष्यबळ उपलब्ध करणे हे उद्देश आहेत. यामध्ये 24 वेगवेगळ्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. तसेच इंडो जर्मन टूल रूम प्रशिक्षण संस्थेचे शुल्क सारथी संस्थेमार्फत अदा करण्यात येते.

याप्रमाणे सारथी मार्फत विविध योजना मराठा समाजातील विद्यार्थ्यांसोबतच समाजातील सर्व घटकांच्या प्रगतीसाठी, आर्थिक सक्षमीकरणासाठी व्यापक स्वरुपात राबविण्यात येत आहे.

  • संकलन, जिल्हा माहिती कार्यालय,नाशिक

नारीशक्ती विधेयक राज्यसभेत मंजूर ; महिलांसाठी गौरवाचा क्षण – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दि.२१- महिलांना आरक्षण देणारे नारीशक्ती विधेयक सर्वसंमतीने राज्यसभेत मंजूर झाले. हा क्षण महिलांसाठी गौरवाचा क्षण असून देशाच्या इतिहासात सुवर्णक्षराने लिहीला जाणार आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विधेयकाचे स्वागत केले.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आज महिला विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवत आहे. या कायद्यामुळे त्यांना राजकीय क्षेत्रात नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे. हा निर्णय देशासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री मोदीजींच्या दूरदृष्टी आणि धाडसी निर्णय क्षमतेमुळे हा निर्णय होऊ शकला आहे. हे विधेयक मंजूर झाल्याबद्दल प्रधानमंत्री मोदीजींचे अभिनंदन करतो.

आमच्या शासनाने ही प्रधानमंत्री मोदीजींच्या प्रेरणेतून नमो महिला सक्षमीकरण अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महिलांना विविध शासकीय योजनांचे लाभ दिले जाणार आहेत.

000

शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांबरोबर उस उत्पादनावर भर द्यावा – पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ, दि. २१ (जिमाका) : शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांबरोबर उस या नगदी पीक उत्पादनावर भर द्यावा, असे आवाहन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

दारव्हा तालुक्यातील मुंगसाजी नगर, बोदेगाव येथे शेतकऱ्यांसाठी कृषि प्रदर्शनी, शेतकरी मेळावा आणि उस पीक परिसंवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पालकमंत्री श्री.राठोड बोलत होते. या कार्यक्रमाला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, पोलिस अधीक्षक डॉ.पवन बनसोड, कृषिरत्न डॉ.संजिवदादा माने, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष कालिंदा पवार, विभागीय कृषि सहसंचालक किसनराव मुळे, माफसूचे संचालक अनिल भिकाने,क्षजिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे, आत्माचे प्रकल्प संचालक संतोष डाबरे, एसएस इंजिनिअर्सचे एस.बी.भड आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकरी मेळावा आणि उस पीक परिसंवाद कार्यक्रमामुळे उस पिकाविषयी शेतकऱ्यांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात सध्या तीन साखर कारखाने सुरू आहेत. बोदेगाव येथील जय किसान साखर कारखाना सुरू व्हावा यासाठी अनेक महिन्यांपासूनच्या पाठपुराव्याला यश आले. लवकरच हा कारखाना सूरू होईल. शेतकऱ्यांनी उस पिकाची लागवड करावी. या भागातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. अडाण धरणाचे पाणी पोहोचविण्यासाठी दोनशे कोटींच्या प्रस्तावला मंजुरी दिली आहे. तसेच राज्यात कोट्यवधींची जलसंधारणाची कामे सुरु असून येणाऱ्या काळात हजारो कोटींची कामे केली जाणार आहेत, असे पुढे बोलतांना पालकमंत्री म्हणाले.

विद्युतीकरण आणि त्यासाठीच्या पायाभूत सुविधांसाठी कोट्यवधींचे प्रस्ताव मंजूर झाले आहे. यामुळे विजेचाही प्रश्न लवकरच निकाली काढण्यात येईल. शेतकऱ्यांना सर्व सोयीसुविधा देण्यात प्रयत्न आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांबरोबर उस या नगदी पीक उत्पादनावर भर द्यावा. उसाला चांगला भाव देण्याचा प्रयत्न केला जाईल. या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आयुष्यात नक्कीच समृद्धी येईल. उस लागवडीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाईल. जय किसान साखर कारखाना सुरु करण्यासाठी राज्य शासन सहकार्य करेल. शेतकऱ्यांनी हा आपला साखर कारखाना समजावा, शेतकऱ्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री संजय राठोड यांनी यावेळी दिली.

जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया म्हणाले की, शेतकऱ्यांनी कृषी उत्पादकतेवर भर दिला पाहिजेत. कापूस, तुर, गहू आणि सोयाबीन या पारंपरिक पिकांबरोबर ऊस उत्पादनाची संधी शेतकऱ्यांना आहे. ऊस उत्पादनातून साखरेसोबत इथेनॅाल, वीज निर्मिती केली जाते. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो. शासनाच्या विविध अनुदान योजना सुरू आहेत. शेतकऱ्यांना आवश्यक मदत व सहकार्य केले जाईल.

ताज्या बातम्या

विकसित महाराष्ट्र- २०४७’ सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करावे

0
विधानसभा/विधानपरिषद निवेदन मुंबई दि. ८ : राज्य शासनाने १०० दिवसांच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर दिनांक ०६ मे २०२५ ते दिनांक ०२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत १५०...

विधानसभा लक्षवेधी

0
खारघर परिसरातील दारूबंदीचे निवेदन प्राप्त झाल्यास योग्य ती कार्यवाही करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई, दि. ८ :  खारघर परिसरात प्रभागाकरिता दारूबंदी करण्याबाबत विहित प्रक्रियेनुसार...

 ‘दिलखुलास’ मध्ये मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या प्रमुख शुभांगी भुते यांची १०, ११, १२ व १४...

0
मुंबई, दि. ८: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात, 'हवामान अंदाज तंत्रज्ञान आणि प्रादेशिक हवामान केंद्राची कार्यपद्धती' या विषयावर मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या...

संसदीय राजभाषा समिती सदस्यांकडून राज्यपालांची भेट

0
मुंबई, दि. ८: संसदीय राजभाषा समितीच्या ९ सदस्यांनी समितीचे निमंत्रक खासदार डॉ. दिनेश शर्मा (उ.प्र.) यांच्या अध्यक्षतेखाली राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई...

शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई दि. 7 : मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. महामार्गाच्या संदर्भात विधानभवनात...