सोमवार, मे 12, 2025
Home Blog Page 1138

सांस्कृतिक धोरण समितीच्या रंगभूमी उपसमितीची बैठक आपात परिस्थितीमुळे पुढे ढकलली

मुंबई, दि. 20 : संपूर्ण राज्यात आणि विशेषतः विदर्भात हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर  सांस्कृतिक धोरण समितीच्या रंगभूमी उपसमितीची दिनांक 22 व 23 जुलैरोजी अनुक्रमे नागपूर व अमरावती येथे होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे.

मुंबई पुण्यासह संपूर्ण कोकणपट्टीत आणि महाराष्ट्राच्या अनेक भागातही मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर समितीच्या सदस्यांना प्रवास करणे  अवघड होऊ शकते किंवा प्रवासादरम्यान मध्येच अडकून पडावे लागू शकते. या बाबीचा विचार करता नागपूर व अमरावती येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठका तूर्तास रद्द करण्यात आल्या आहेत. सांस्कृतिक धोरण समितीचे कार्याध्यक्ष डॉ विनयजी सहस्रबुद्धे यांच्याशी तसेच उपसमितीचे निमंत्रक व सदस्यांशी विचार विनिमय करून लवकरच विदर्भातील बैठकांसाठी पुढील  तारीख ठरविण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

००००

दीपक चव्हाण/विसंअ/

इरशाळवाडी येथील दुर्घटनाग्रस्त नागरिकांसाठी मदतीचे आवाहन; जिल्हा प्रशासनाकडून बँक खाते क्रमांक जाहीर

अलिबाग, दि.20 (जिमाका) :- दि.19 जुलै 2023 रोजी खालापूर तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे मौजे चौक-नानिवली ग्रामपंचायतीच्या हद्दीमधील मौजे इरशाळवाडी ता.खालापूर येथे दरड कोसळून मोठयाप्रमाणात जनजीवन विस्कळीत होवून पशुधनाचे व खासगी मालमत्तांचे नुकसान झाले आहे. अशावेळी त्यांना आधार देवून आयुष्यात पुन्हा उभारी घेण्यासाठी सामाजिक संस्था/ट्रस्ट/फाँऊंडेशन्स/सीएसआर/दानशूर व्यक्ती यांच्याकडून आर्थिक मदत व साहित्याच्या स्वरुपात मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पुढील खाते क्रमांक व पत्ता उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

ज्यांना आर्थिक स्वरुपात मदत करावयाची आहे त्यांनी खात्याचे नाव :- जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधी (District Disaster Response Fund), • बँकचे नाव :- स्टेट बँक ऑफ इंडिया, मुख्य शाखा,अलिबाग (State Bank of India, Alibag), बँक खात्याचा नंबर :- 38222872300, IFSC Code:-SBIN0000308या बँक खात्यामध्ये निधी जमा करावा.

ज्यांना साहित्य स्वरुपात मदत करावयाची आहे त्यांनी उपविभागीय अधिकारी, कर्जत श्री.अजित नैराळे, मो.8390090040, खालापूर तहसिलदार श्री.आयुब तांबोळी, मो.क्र.9975751076 यांच्याशी संपर्क करुन ठिकाणी मदत पोहोच करावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी कळविले आहे.

 

०००

मतदारांनी आपल्या घरी येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सहकार्य करावे – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

मुंबई, दि. 20 : राज्यात आजपासून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ घरोघरी भेटी देऊन मतदारांच्या माहितीची पडताळणी करणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि भारत निवडणूक आयोगाच्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत हा उपक्रम राबवला जात असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.

आजपासून ते २० ऑगस्ट २०२३ या संपूर्ण महिनाभराच्या काळात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रत्येक मतदाराच्या घरी भेटी देतील. आपल्या या भेटींमध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदारांचे वैयक्तिक तपशील, पत्ता आणि छायाचित्रांची पडताळणी करतील, मृत आणि स्थलांतरीत मतदार, दुबार नोंदणी असलेले मतदार, मतदारांचाही शोध घेतील, तसंच मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड जोडण्याची प्रक्रिया करतील. यासोबतच नव मतदार, तृतीयपंथी आणि भटक्या विमुक्त जाती जमातीतील मतदार, देहव्यवसाय करणाऱ्या महिला मतदारांचा शोध घेऊन त्यांची तसंच मतदार यादीत नाव नसलेल्यांचा शोध घेऊन त्यांची नोंदणी करण्याचं कामही या काळात केलं जाणार असल्याचं श्री. देशपांडे यांनी सांगितले.

या उपक्रमामुळे राज्यातील मतदार याद्यांच्या शुद्धीकरणाचे आणि अद्ययावतीकरणाचे काम सुलभ होऊ शकणार आहे, तसंच हा उपक्रम म्हणजे आपण आपल्या मताधिकारापासून वंचित राहू नये याची निश्चिती करण्याची नागरिकांसाठीची मोठी संधी आहे असं श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले. त्यामुळेच जेव्हा हे अधिकारी आपल्या घरी येतील तेव्हा नागरिकांनी आपले स्वतःचे तसंच आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे मतदार यादीत आहेत की नाहीत हे तपासून घ्यावे, ज्यांनी वयाची १८ वर्ष पूर्ण केली आहेत पण अजूनही मतदार नोंदणी केलेली नाही अशांची मतदार नोंदणी करून घ्यावी, मतदार यादीतील आपले वैयक्तिक तपशील, पत्ता यात काही दुरूस्त्या असतील तर त्यासाठीचे अर्ज भरून द्यावेत, लग्नानंतर नाव बदललेल्या स्त्री मतदारांनी आपली नावं बदलून घ्यावीत, स्थलांतरीत  झालेल्यांनी नव्या पत्त्याची नोंद करून घ्यावी, असे आवाहन श्री. देशपांडे यांनी केलं आहे.

मतदारांच्या सहकार्यामुळेच हा उपक्रम यशस्वी होणार असल्याने, सर्व मतदारांनी त्यांच्या घरी येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सहकार्य करावे आणि विनासंकोच आवश्यक ती माहिती आणि दस्तऐवज द्यावेत, असे आवाहनही श्री. देशपांडे यांनी केलं आहे.

*****

संध्या गरवारे/विसंअ/

राजधानीत ५ व ६ ऑगस्ट रोजी “ग्रंथालय महोत्सव २०२३” चे आयोजन

नवी दिल्‍ली 20 : ग्रंथालयांच्या विकासाला आणि डिजिटलायझेशनला गती देण्यासाठी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने “ग्रंथालय महोत्सव 2023”  चे आयोजन केले  आहे.  या महोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे.

राजधानीतील प्रगती मैदानामधील हॉल क्रमांक 5 येथे  5 व 6 ऑगस्ट 2023 रोजी  दोन दिवसीय ‘ग्रंथालय महोत्सव 2023’ चे आयोजन करण्यात येणार आहे. कायदा आणि न्याय मंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि सांस्कृतिक व संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी याबाबत नवी दिल्ली येथे “ग्रंथालय  महोत्सव” च्या वेळापत्रकाचे बुधवारी अनावरण केले. सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव गोविंद मोहन आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहसचिव मुग्धा सिन्हा यावेळी उपस्थित होते.

उपराष्ट्रपती जगदीप धनखड या कार्यक्रमाच्या सांगता  समारंभाला उपस्थित राहतील. भारतातील ग्रंथालयांचे आधुनिकीकरण आणि डिजिटायझेशन यावर संवाद सुरू करण्यासाठी या महोत्सवात जगभरातील प्रतिष्ठित ग्रंथालयांची ओळखही यावेळी करून देण्यात येणार  आहे.

आधुनिक माहिती व तंत्रज्ञान साधनांचा वापर करुन, नव्या पिढीची मानसिकता ओळखून, त्यांच्या सोयीने पुस्तके अथवा ग्रंथातील ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहचविणे  हे या महोत्सवाचे उद्द‍िष्ट आहे. यामुळे भावी पिढीमध्ये वाचनसंस्‍कृती वाढेल तसेच  वाचन चळवळीला खरी गतीमानताही प्राप्त होईल.

00000000

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त क्र.126/ 20.7.2023

विधान परिषद प्रश्नोत्तरे

नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालय व मेयो रूग्णालयातील रिक्त पदे

भरण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व मेयो रूग्णालय येथे परिचारिकांची 145 व चतुर्थ श्रेणी संवर्गातील 160 पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य प्रवीण दटके यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री श्री.मुश्रीफ म्हणालेपरिचारिकांची रिक्त पदे टीसीएस या कंपनीमार्फत भरण्याची कार्यवाही सुरू असून स्पर्धा परीक्षाही घेण्यात आली आहे. ही कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. तर संस्थेतील वर्ग चार ची सरळसेवेची पदे जिल्हास्तरीय समितीमार्फत भरण्याबाबत कळविण्यात आले आहे. ही पदे उपलब्ध होईपर्यंत संस्थेने बाह्यस्त्रोतामार्फत पदे भरण्यासाठी केलेल्या करारास मुदतवाढ देण्यात आली आहे. पदभरती करताना प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेणार असल्याचे त्यांनी एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले. यवतमाळ येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्याबाबत तत्कालिन वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे कार्यवाही होईलअसेही त्यांनी अन्य एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

सदस्य सर्वश्री अभिजित वंजारीएकनाथ खडसेवजाहत मिर्झासतेज पाटीलनिलय नाईकसचिन अहिर यांनी या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सहभाग घेतला.

000

देवठाण सुधारित पाणीपुरवठा योजनेसाठी महिनाभरात

कार्यादेश देणार – पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

मुंबईदि. 20 – अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील देवठाण येथील तीन गावांसाठी असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या सुधारित प्रस्तावाची निविदा प्रक्रिया सुरू असून महिनाभरात कार्यादेश देण्यात येईलअसे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य प्रा.राम शिंदे यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता.

देवठाण पाणी पुरवठा योजनेच्या सद्यस्थितीबाबत अधिक माहिती देताना मंत्री श्री.पाटील म्हणालेही योजना जिल्हा परिषदेकडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे वर्ग करण्यात आली आहे. याअंतर्गत समाविष्ट गावे व वाड्यासाठी सर्वेक्षण करून 24.93 कोटी रूपयांची मूळ योजना तयार करण्यात आली होती. यापूर्वीचे योजनेचे सर्वेक्षण योग्य असून ग्रामस्थांनी वाढीव टाक्यावितरण व्यवस्था व दूरच्या चार वाड्यापर्यंत पाईपलाईनची मागणी केली आहे. पुनर्सर्वेक्षण करून सुधारित प्रस्तावात या बाबींचा समावेश करण्यात आला आहे. सुधारित अंदाजपत्रक अंतिम करण्याची कार्यवाही प्रगतीत असून निविदा प्रक्रिया सुरू आहे. येत्या महिनाभरात याबाबतचे कार्यादेश देण्यात येतीलअसे त्यांनी सांगितले. याकामाच्या सर्वेक्षणामध्ये त्रुटी आढळल्यास त्याची उच्चस्तरीय चौकशी केली जाईलअसेही ते म्हणाले. पुरेशा पाण्याच्या उद्भवाशिवाय पाणी योजनांची पुढील कामे होऊ नयेतयाबाबतची अंमलबजावणी करण्यात येईलअसेही त्यांनी एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

सदस्य एकनाथ खडसे यांनी याअनुषंगाने झालेल्या चर्चेत सहभाग घेतला.

000

किनवट तालुक्यामध्ये स्वतंत्र स्त्री रूग्णालय आणि गोकुंदा उपजिल्हा रूग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्यास विशेष बाब म्हणून मान्यता देणार – डॉ.तानाजी सावंत

नांदेड जिल्ह्यातील किनवट हा आदिवासी बहुल तालुका आहे. येथील स्वतंत्र स्त्री रूग्णालय तसेच गोकुंदा उपजिल्हा रूग्णालयाच्या श्रेणीवर्धनाच्या प्रस्तावास विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात येईलअसे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य राजेश राठोड यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता.

डॉ.सावंत म्हणालेगोकुंदा हे गाव किनवट पासून चार किमी अंतरावर आहे. येथील उपजिल्हा रूग्णालयाचे 100 खाटांच्या रूग्णालयात श्रेणीवर्धन करण्यासाठी लोकसंख्येचा असणारा निकष पूर्ण होत नसल्याने हा प्रस्ताव अमान्य करण्यात आला आहे. तथापि किनवट हा दुर्गमआदिवासी भाग असल्याने येथे स्वतंत्र स्त्री रूग्णालय तसेच गोकुंदा येथील उपजिल्हा रूग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्याबाबत बैठक घेऊन विशेष बाब म्हणून मान्यता देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. राज्यात आवश्यक असणारी डॉक्टर आणि नर्सेसची पदे लवकरच भरली जातीलअसेही त्यांनी एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

 सदस्य सर्वश्री भाई जगतापप्रवीण दरेकरश्रीमती प्रज्ञा सातव यांनी या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सहभाग घेतला.

000

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने दिले जाणारे क्रीडा पुरस्कार वितरण पुढील वर्षापासून १९ फेब्रुवारी रोजीच – क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे

क्रीडा क्षेत्रातील कामगिरीबद्दल देण्यात येणारे पुरस्कार कोविड-19 च्या प्रादूर्भावामुळे प्रलंबित होते. जाहीर झालेले पुरस्कार यावर्षी राष्ट्रीय क्रीडा दिनी म्हणजेच 29 ऑगस्ट रोजी देण्याचा शासनाचा विचार आहे. पुढील वर्षापासून हे प्रस्ताव जानेवारी महिन्यात अंतिम करून शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी म्हणजेच 19 फेब्रुवारी रोजी देण्यात येतीलअसे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य अभिजित वंजारी यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता.

क्रीडा मंत्री श्री.बनसोडे म्हणालेकोणत्याही पात्र खेळाडूवर अन्याय होऊ नये तसेच पात्र खेळाडू पुरस्कारापासून वंचित राहू नयेयाकरीता शासनाने प्रस्तावित पुरस्कार यादीबाबत हरकती व सूचना करण्यासाठी तरतूद केली आहे. तथापि यासंदर्भात चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनविविध मान्यताप्राप्त खेळाडूंच्या संघटना तसेच विधिमंडळाचे संबंधित सदस्य यांची एक बैठक आयोजित करण्यात येईल. थेट नियुक्तीच्या धोरणात सुधारणा करून पात्र खेळाडूंना नियुक्ती देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले. योगासनाचा समावेश शिवछत्रपती पुरस्कारांमध्ये करण्याबाबत तपासून निर्णय घेतला जाईलअसेही त्यांनी अन्य एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री सतेज पाटील, गोपीचंद पडळकर, सत्यजित तांबे यांनी सहभाग घेतला.

000

बी.सी.झंवर/विसंअ/

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळात प्रतिनियुक्तीने पदे भरण्यात येणार

मुंबई, दि. 20 : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या आस्थापनेवर अधिकारी आणि कर्मचारी यांची पदे प्रतिनियुक्तीने भरण्यात येणार असल्याची  माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांनी दिली आहे.

या महामंडळाच्या आस्थापनेवरील पुढील पदे सामान्य प्रशासन विभागाच्या दि. १७ डिसेंबर २०१६ रोजीच्या शासन निर्णयातील अटी व शर्तीच्या अधीन राहून प्रतिनियुक्तीने भरण्यात येणार आहेत. भरण्यात येणारी पद व पदाची एकूण संख्या पुढीलप्रमाणे आहे, व्यवस्थापक एकूण पदे १ (वेतनश्रेणी एस २३), सहव्यवस्थापक एकूण पदे ३ (वेतनश्रेणी एस १६), उपव्यवस्थापक एकूण पदे ७ (वेतनश्रेणी एस १४), उच्च लघुलेखक एकूण पदे १ (वेतनश्रेणी एस १३), सहायक व्यवस्थापक एकूण पदे ५ (वेतनश्रेणी एस १०), सहाय्यक एकूण पदे ७ (वेतनश्रेणी एस ८), जिल्हा व्यवस्थापक एकूण पदे ३० (वेतनश्रेणी एस १५), लेखापाल एकूण पदे ३२ (वेतनश्रेणी एस ८), वसुली निरीक्षक एकूण पदे २३ (वेतनश्रेणी एस ८)  या वेतनश्रेणीतील पदे भरण्यात येणार आहेत.

ही पदे प्रथम एक वर्ष कालावधीकरिता व नंतर कालावधी वाढविण्याच्या अटीवर प्रतिनियुक्तीने भरण्यासाठी शासनाच्या विविध विभागात या पदाच्या व वेतनश्रेणीच्या समकक्ष पदावर व वेतनश्रेणीवर कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांनी दि. १५ जुलै ते दि. ४ ऑगस्ट २०२३ या कालावधीत अर्ज  व्यवस्थापकीय संचालक, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित, मुंबई येथे करावेत.  तसेच मंत्रालयीन इंन्ट्रानेट या संकेतस्थळावर प्रतिनियुक्त्या (Deputation) या लिंकखाली सविस्तर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

याबाबतच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत, विहीत मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

ही जाहिरात किंवा त्याद्वारे झालेली निवड प्रक्रिया कोणत्याही टप्यावर कोणतेही कारण न देता रदद करण्याचे अधिकार महामंडळाकडे राहतील. यासाठी अधिकारी / कर्मचारी कार्यरत असणाऱ्या विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे.

*****

शैलजा पाटील/विसंअ/

 

 

राज्य राखीव बल पोलीस शिपाई भरतीच्या लेखी परीक्षेसाठी परीक्षा केंद्रामध्ये अंशतः बदल

मुंबई, दि. २० :- राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ८, मुंबई यांच्या आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपाई भरतीसाठी लेखी परीक्षा २३ जुलै २०२३ रोजी सकाळी 11.00 वाजता आयोजित करण्यात आली आहे. या लेखी परीक्षेतील  उमेदवारांच्या परीक्षा केंद्रामध्ये अंशतः बदल करण्यात आला असुन उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य राखीव पोलीस बलाचे समादेशक प्रणय अशोक यांनी केले आहे.

सशस्त्र पोलीस शिपाई भरती २०२१ मधील शारीरिक चाचणीमध्ये २५६२ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र झाले आहेत. छाती क्रमांक ८७ ते छाती क्रमांक १२३२८ पर्यंत १५३६ उमेदवार यांची बैठक व्यवस्था रॉयल गोल्ड स्टुडिओ, रॉयल पाम,गोरेगाव (पूर्व) मुंबई या ठिकाणी करण्यात आली आहे. या परीक्षा केंद्रावर पोहचण्यासाठी गोरेगाव रेल्वे स्टेशन येथून ४५२ क्रमांकाच्या बसने  मयुर नगर थांबा येथे  उतरावे.

छाती क्रमांक १२३२९ ते छाती क्रमांक १८१३७ पर्यंत १०२६ उमेदवारांची बैठक व्यवस्था मुंबई एक्झीबिशन सेंटर, नेस्को हॉल नंबर ५, गोरेगाव (पूर्व) मुंबई येथे करण्यात आली आहे. या परीक्षा केंद्रावर येण्याकरिता जवळील रेल्वे स्टेशन राम मंदिर (पूर्व) हे आहे.

या लेखी परीक्षेस पात्र उमेदवारांनी २३ जुलै २०२३ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत केंद्रावर उपस्थित रहावे. परीक्षा सकाळी ११ वाजता सुरू होईल उशिरा येणाऱ्या उमेदवारांना परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

या लेखी परीक्षेसाठी येताना उमेदवारांनी महाआयटी यांनी ईमेलद्वारे पुरविलेल्या शारीरिक चाचणी व लेखी परीक्षेच्या ओळखपत्राची रंगीत प्रत आणि आवेदन अर्जावरील  दोन रंगीत पासपोर्ट आकाराचे छायाचित्र तसेच कार्यालयाकडून मैदानी चाचणी करिता पुरविण्यात आलेले ओळखपत्र सोबत असणे अनिवार्य आहे.

परीक्षा केंद्रावर उमेदवारांना प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, काळा पेन तसेच पॅड बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी पुरविण्यात येणार आहे. उमेदवारांनी कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करू नये. लेखी परीक्षा नि:पक्ष व पारदर्शकपणे घेण्यात येणार असल्याचे प्रणय अशोक यांनी कळविले आहे.

०००००

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत फूड पॅकेटस, ब्लॅकेटस्, कंटेनर यासह मदत साहित्याचा ओघ

अलिबाग,दि.20(जिमाका) :- च्या पायथ्याला डोंगरात वसलेल्या दुर्घटनाग्रस्त आदिवासी पाड्यावर बचाव व मदत कार्यासाठी शासन यंत्रणा संपूर्ण प्रयत्नशील असून येथे मदत कामासाठी कार्यरत प्रत्यक्ष मनुष्यबळासाठी व दुर्घटनेतील वाचलेल्या नागरीकांसाठी घटना स्थळावर तात्पुरते निवारे, अन्न, मदत साहित्य यांची तातडीने उपलब्धता केली जात आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन रायगड जिल्ह्यातील उद्योग व संस्थापुढे आल्या आहेत      जिल्हा प्रशासनाच्यावतीने सुविधा निर्माण करण्यासाठी साहित्य घटनास्थळाकडे पाठविले जात आहेत.

यामध्ये मदत साहित्य व निवाऱ्यासाठी  घटनास्थळाच्या बेसकॅम्पकडे 20 X 10 आकाराचे 4 कंटेनर, 40 X 10 चे 2 व इतर दोन कंटेनर पाठविण्यात येत आहेत. सदर कंटेनर उरण, जेएनपीटी, रत्नागिरी एमआयडीसी, जेएसडब्लू समूह येथून रवाना झाले आहे. चौक , खालापूर येथील तात्परती निवाराव्यवस्था केली जात आहे.

घटनास्थळ हे उंचावर असून मशिनरी साहित्या पोहचत नसल्याने दरड कोसळल्याने निर्माण झालेले मातीचे ढिगारे दूर करणेसाठी पनवेल येथून 80 अनुभवी कारागीरांचे पथक अवजारांसह दुपारनंतर घटना स्थळी पोहोचले असून सकाळ पासून मदत कार्यात असलेल्यांना त्यामुळे विश्रांती मिळणार आहे.

दुर्घटनाग्रस्त भागात विद्युत पुरवठा होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग विद्युत अभियंता,  महावितरण यांचे पथक पाठविण्यात आले आहे. यासह यंत्रणेसाठी तात्पुरती निवारा व्यवस्था, अन्न व पिण्याच्या पाण्‍याचा  पुरवठा यादृष्टीने महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी, जिल्हा परिषदेचे पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता व त्यांची यंत्रणा काम करत आहे. तेथे साहित्य सामुग्री व अति महत्वाच्या व्यक्तींच्या समन्वयन, हेलिपॅड आदी सुविधा तयार केल्या जात आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक अलिबाग यांचे कडून जखमींवर  उपचार साठी सुविधा देण्यात येत आहे.   विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील मदत कार्यावर लक्ष ठेवून आहेत. स्वत: विभागीय आयुक्त डॉ. कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ. म्हसे दुर्घटनेची माहिती समजल्यानंतर  रात्री दीड वाजता घटना स्थळी प्रत्यक्षात पोहोचले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत उपविभागीय अधिकारी श्री. अजित नैराळे. खालापूर तहसिलदार अयुब तांबोळी यांनी रात्री परिस्थितीचा अंदाज घेत, बचावकार्यासाठी आवश्यक साधन सामग्री, मनुष्यबळ कराच्या उपाययोजना तयारी केली.

महसूल, जिल्हा परिषद व पोलिस विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह नागरी संरक्षण दल मुंबई येथून दोन पथके, एनडिआरएफची चार पथके 150 मनुष्यबळासह घटनास्थळी असून इतर विभागांचे अधिकारी कर्मचारी , स्वयंसेवी संस्थांचे सदस्यख्‍ युवा मंडळे, ट्रेकर्स् ग्रपचे प्रतिनिधी असे दुपारनंतर जवळपास 700 जण मदत कार्यात सहभागी होते. पुणे येथून एनडिआरएफचे पथक पहाटे ४ वाजता घटनास्थळी पोहाचले होते. नवी महानगरपालिका अग्निशमन दलाचे पथक, पनवेल नगरपालिका येथून 44 अधिकारी कर्मचारी 2 जेसीबी पाठविण्यात आले तसेच 8 ॲम्बुलन्स, कर्जत येथून कळम, आंबिवली, मोहिल आदी प्राथमिक आरोग्यकेंद्रचे वैद्यकीय पथके घटनास्थळी पहाटेच पोहोचले होते. त्यानंतर  देखील आरोग्य विभागाचे इतर ठिकाणचे वैद्यकिय अधिकारी कर्मचारी यांना पाठविण्ण्यात आले आहे.

आज भर पावसात मदत कार्य सुरु असून काल सर्वाधिक 198 मि.मी. पावसाची नोंद रायगड जिल्हयात झाली यावेळी कोकण विभागाच्या सरासरी 136.7 मि.मी. पाऊस झाला आहे. अशावेळी दुर्घटनास्थळी वाहने पोहोचण्यात अडचण असल्याने मदत कार्य थांबू नये यासाठी माहिती असलेल्या स्थानिकांची व संस्थांची मदत घेतली जात आहे. यामध्ये युवा संघटना, महाराष्ट्र सह्याद्री ट्रेकर ग्रुप्स, यशवंती हॅकर्स, विविध ट्रेकर्सचा देखील सहभाग आहे.

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनानंतर 3000 फूड पॅकेटस उपलब्ध करण्यात आले आहेत. यासह घटनास्थळावर पाणी बॉटल्स, ब्लॅंकेट्स, टॉर्च, मदतसाहित्य,  चादरी,  बिस्कीट तसेच इतर प्रथम उपचार साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.

जिल्ह्याच्या दुर्घटनाग्रस्त आदिवासी पाड्यावर बचाव व मदत कार्यात स्वयंसेवी संस्थांचा सहभाग आहे. मदतीसाठी शासकिय विभागांची, संघटना व स्वयंसेवी संस्थांची मदत पथके रवाना झाली. यामध्ये पुणे, अलिबाग, खोपोली, कर्जत, लोणावळा, पनवेल, वाशी, मुंबई व येथील सहभाग आहे.

विविध शासकीय अधिकारी, पोलीस यंत्रणा, एनडीआरएफ टीम, स्वयंसेवी संस्थांचे सदस्य यांच्याकडून मदत कार्य करण्यात येत आहे .

०००

सर्व विभागांनी एकत्र येऊन नागरिकांच्या समस्या सोडवाव्या – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

 23 जुलैच्या आढावा बैठकीत अहवाल सादर करण्याच्या सुचना

चंद्रपूर, दि. २० : चंद्रपूर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या संकटावर मात करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व विभागांनी समन्वय साधून काम करावे. पुरग्रस्तांना मदत करताना प्रशासनाने नागरिकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहावे. सर्व विभागांनी एकत्र येऊन नागरिकांच्या समस्या सोडवाव्या आणि तातडीने कार्यवाही करून अहवाल सादर करावा, असे निर्देश चंद्रपूर,गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

चंद्रपूर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीचा आढावा पालकमंत्री ना. मुनगंटीवार यांनी बुधवारी (दि.19) घेतला. मंत्रालयातून दूरदृष्य प्रणालीद्वारे चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यातील जिल्हाधिकारी तसेच अधिकाऱ्यांशी चर्चा केली व आवश्यक सूचना केल्या. सर्व सूचनांवर अमलबजावणी करून 23 जुलैला होणाऱ्या बैठकीत अहवाल सादर करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले. ज्या गावांना आणि वस्त्यांना अतिवृष्टीचा फटका बसला तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे. पण त्यांना निवारा शिबिरात पायाभूत सुविधांची कमतरता राहणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेशही त्यांनी दिले. तसेच इरई व झरपट नदीच्या खोलीकरणाच्या संदर्भात व इरई नदीला संरक्षक भिंत बांधण्याच्या प्रस्तावावर अभ्यास करून तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देशही पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिले.

जिल्ह्यातील नागरिकांना मदतकार्य करण्यासाठी विविध विभागातील अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन करावी आणि त्यांच्या माध्यमातून अभ्यास करून कार्यवाही करावी, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यासोबतच भविष्यात असे संकट पुन्हा आले तर आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन तयार ठेवा. आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक साधनसामग्री अद्ययावत ठेवण्याची सूचनाही त्यांनी केली.

बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे (गोंदिया), मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, मनपा आयुक्त विपीन पालिवाल, हरीश शर्मा, राहुल पावडे, देवराव भोंगळे, डॉ.मंगेश गुलवाडे, प्रमोद कडू, ब्रिजभूषण पाझारे, राम लाखीया, डॉ.भगवान गायकवाड, नरेंद्र जिवतोडे, प्रवीण ठेंगणे यांची उपस्थिती होती.

मदत कार्य करण्याचे आदेश : चंद्रपूर शहरात एका दिवसातील अतिवृष्टीमुळे 240 मिलीमीटर पाऊस पडला. यात 320 घरांमध्ये पाणी शिरले. चंद्रपूर शहरात एका घराचे पूर्ण नुकसान झाले असून 47 घरांचे किरकोळ नुकसान झालेले आहे. तर आतापर्यंत 1 जूनपासून झालेल्या पावसामुळे 804 घरांचे नुकसान झाले आहे. या सर्वांचे पंचनामे तातडीने करून मदतकार्य करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले. तसेच पाऊस आल्यानंतर काही दिवसांनी घर पडल्यास त्याचाही पंचनामा करून मदत करण्याच्या सूचना ना. मुनगंटीवार यांनी दिल्या.

गोंदियातील परिस्थिती नियंत्रणात : गोंदिया जिल्ह्यात जूनपासून 119 टक्के पाऊस झालेला असला तरीही पूर परिस्थितीसारखे संकट उद्भवलेले नाही. पण वेळ आल्यास आपत्ती व्यवस्थापन तयार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. मात्र गाफील न राहता संपूर्ण व्यवस्था, संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज ठेवण्याचे आदेश पालकमंत्री ना. मुनगंटीवार यांनी दिले.

०००

शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवणाऱ्या कृषि विभागाच्या विविध योजना

सातारा जिल्ह्याचा पश्चिम भाग अति पावसाचा तर पुर्वेकडील प्रदेश दुष्काळीपट्टा. अशी नैसर्गिक परिस्थिती असलेला हा जिल्हा आता बदलताना दिसतोय. सिंचन क्षेत्रामध्ये होणारी ही एक क्रांतीच म्हणावी लागणार आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडणारा महाबळेश्वर परिसर आहे, येथे चेरापुंजी इतका पाऊस पडतो, तर सर्वात कमी पावसाचा प्रदेश म्हणून ओळखले जाणारे माण, खटाव तालुके याच जिल्ह्यात आहेत. साहजिकच त्यामुळे माण, खटाव, फलटण, खंडाळा हे कायम दुष्काळी पट्टयात मोडणारे तालुके होते. कृष्णा खोरे विकास महामंडळाने हे चित्र बदलवून या तालुक्यात आणलेल्या कृष्णेच्या पाण्यामुळे आगामी काळात संपूर्ण सातारा जिल्हा 100 टक्के बागायत होणार आहे.

आता जिल्ह्यात सिंचनाच्या चांगल्या सोयी निर्माण झाल्यामुळे शेती आणखी फायद्यात आणणे ही तितकेच गरजेचे आहे. याचा विचार करता त्यासाठी जिल्ह्यात कृषि विभागामार्फत अनेक कल्याणकारी योजना राबवण्यात येत आहे.

पंतप्रधान पीक विमा योजना अत्यंत उपयुक्त आणि निश्चित लाभ देणारी

शासनाने सुरु केलेली पंतप्रधान पीक विमा योजना निश्चित फलदायी असून या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्याने केवळ 1 रुपया भरुन नाव नोंदणी करावयाची आहे, विमा हप्त्याची रक्कम केंद्र शासन भरणार आहे. शेतकऱ्याने आपले आधार, ७/१२ उतारा, बँक पासबुक झेरॉक्स, पीक पेरणी स्वयंघोषणा पत्र घेऊन आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन नाव नोंदणी केल्यानंतर त्यांना लाभ मिळणार आहे. अतिवृष्टी अथवा अवर्षणाने जमीन नापेर राहिल्यास त्या क्षेत्रालाही विमा संरक्षण मिळण्याची तरतूद या योजनेत करण्यात आली आहे.

राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत शेततळ्यासाठी अर्थसहाय्य

राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत संरक्षित सिंचन सुविधासाठी विविध आकारमानाच्या शेततळे अस्तरीकरणासाठी किमान १५×१५×१५ मीटर आकाराच्या शेततळ्यासाठी २८ हजार २७५ रुपये व कमाल ३०×३०×३० मीटर आकाराच्या शेततळ्यासाठी ७५ हजार रुपये रकमेच्या मर्यादेत अनुदान देय आहे. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत ही वरील प्रमाणे रक्कम उपलब्ध होत आहे.

शेततळ्यासाठी जास्तीत जास्त ७५ हजार रुपये अनुदान

विविध आकारमानाच्या शेततळ्या पैकी कोणत्याही एका आकारमानाच्या शेततळ्याकरिता मागणी अर्ज महाडीबीटी पोर्टलवर करता येईल. यामध्ये जास्तीत जास्त ३४×३४×३ मीटर व कमीत कमी १५×१५×३ मीटर आकारमानाचे इनलेट आऊट लेटसह किंवा इनलेट- आऊटलेट विरहित शेततळे घेता येणार असून शेततळ्याच्या आकारमानानुसार अनुदानाची जास्तीत जास्त रक्कम ७५ हजार इतकी असणार आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड, गांडूळ खत युनिट, नाडेप कंपोस्ट युनिट, बांबू लागवड इ. लाभ दिले जातात.

फळबाग लागवडीसाठी अनुदानाच्या २ योजना

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडी करिता पात्र ठरु शकत नाहीत, अशा शेतकऱ्यांसाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना कार्यान्वित असून किमान ०.२० हेक्टर ते कमाल ६.०० हेक्टर क्षेत्र असणारे शेतकरी यासाठी पात्र आहेत. यामध्ये फळपिके, आंबा कलमे व रोपे, पेरु कलमे व सधन लागवड, डाळींब कलमे, कागदी लिंबु, नारळ, सिताफळ, आवळा, चिंच, जांभुळ, अंजीर, चिक्कु, मोसंबी, संत्री इत्यादी पिकांच्या लागवडीसाठी निर्धारीत अंतरावर लागवड केल्यास संबंधीत शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे.

कृषी यांत्रिकीकरणासाठी अनुदान

ट्रॅक्टर, पॉवर टिलर आणि ट्रॅक्टर चलित औजारे, ठिबक आणि तुषार सिंचन संच, शेडनेट, पॉली हाऊस, कांदाचाळ, प्लास्टिक मल्चिंग इ. बाबींसाठी अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी  महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने अर्ज केल्यास त्यांना लाभ घेता येईल.

शेती व शेतकऱ्यांसाठी विविध योजना

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात अनुग्रह अनुदान योजना, हवामान आधारित फळपिक विमा योजना, सर्वसमावेशक पिक विमा योजना, PM किसान योजना, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत पीक प्रात्यक्षिके, प्रमाणित बियाणे, मोटर, पाईप इत्यादीसाठी अनुदानाच्या अनेक योजना कृषि विभागामार्फत राबविल्या जातात. या योजनांबाबत अधिक माहितीसाठी स्थानिक पातळीवरील कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी अथवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय  येथे संपर्क केल्यास या योजनांविषयी माहिती व मार्गदर्शन करण्यात येते.

हेमंत चव्हाण

माहिती अधिकारी,

जिल्हा माहिती कार्यालय, सातारा.

ताज्या बातम्या

जिल्ह्यात २८ शहीद स्मारके उभारणार  – पालकमंत्री गुलाबराव पाटील

0
▪️ भारत-तिबेट सीमा पोलिस दलाच्या जवानांकडून ‘गौरव सलामी’ जळगाव, दि. ११ (जिमाका): मातृभूमीसाठी प्राणार्पण करणाऱ्या 9 वी वाहिनी, भारत-तिबेट सीमा पोलिस दलाच्या शहीद जवान सुनील...

नागपूर येथे लवकरच जागतिक दर्जाच्या वेल्डिंग इन्स्टीट्यूटची पायाभरणी –  कामगार मंत्री आकाश फुंडकर

0
नागपूर, दि. ११: बॉयलर हा औद्योगिक क्षेत्राचा आत्मा आहे. बॉयलरच्या कार्यक्षमतेवर उत्पादन खर्च अवलंबून असतो. याची कार्यक्षमता ही बॉयलरच्या निर्मितीशी निगडीत असून परिपूर्ण कौशल्य...

गोमाता संवर्धनाशिवाय नैसर्गिक शेतीला गती नाही — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
‘गोवर्धन गोशाळा कोकण’ प्रकल्पाचे उद्घाटन सिंधुदुर्गनगरी, दि. ११ : शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी देशी गायींचे संवर्धन महत्त्वाचे असून, गोमातेचे संवर्धन केल्याशिवाय नैसर्गिक शेतीला गती मिळणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पुढील पिढ्यांना स्फूर्तिदायक  -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
विक्रमी वेळेत आकर्षक पुतळ्याची उभारणी परिसराचा विकास करुन पर्यटनाला चालना सिंधुदुर्गनगरी, दि. ११ (जिमाका): छत्रपती शिवाजी महाराज महान योद्धा होते. त्यांचे विचार सर्वांसाठी...

निवडणूक आयुक्तांचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाशी संवाद

0
मुंबई दि. ११:  मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू व डॉ. विवेक जोशी यांनी आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे...