मुंबई, दि. 21 : महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारास प्रतिबंध करण्यासाठी धारावी पोलीस ठाणे येथे महिला समुपदेशन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. हे केंद्र चालविण्यासाठी इच्छुक स्वयंसेवी संस्थांनी पुढील दहा दिवसांच्या आत अर्ज करण्याचे माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.
अर्जदार संस्था ही नोंदणीकृत तसेच मुंबई शहर जिल्ह्यातील (स्थानिक) महिला पदाधिकारी असलेली असायला हवी. संस्थेस किमान ३ वर्षांचा महिला समुपदेश क्षेत्रातील अनुभव आवश्यक जास्त अनुभव असल्यास प्राधान्य, समुपदेशनासाठी MSW उत्तीर्ण दोन समुपदेशक कर्मचारी यांची यादी व कागपत्रे जोडणे आवश्यक आहे. संस्थेची घटना व नियमावली आवश्यक ज्यामध्ये महिलांसाठी समुपदेशन केंद्र चालविणे हा उद्देश असावा. संस्थेचे मागील तीन महिन्यांचे महिनानिहाय बँक स्टेटमेंट जोडावे. अर्ज करताना संस्थेने कार्यरत पदाधिकारी यांचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक यादी जोडावी. संस्थेच्या कार्यकारी मंडळातील सदस्य एकमेकांचे नातेवाईक नाहीत, तसेच कोणाही सदस्य शासकीय सेवेत नाहीत, याबाबतचे हमीपत्र जोडावे. संस्थेने सार्वजनिक संपत्तीचा अपहार केलेला नाही, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र जोडावे. संस्थेच्या पदाधिकारी (अध्यक्ष व सचिव) यांचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे स्वाक्षरीचे चारित्र्य प्रमाणपत्र जोडावे. तसेच ज्या स्वयंसेवी संस्थांनी समुपदेशन केंद्रासाठी यापूर्वी प्रस्ताव सादर केले होते, त्यांनीही पुन्हा नव्याने प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय मुंबई शहर, १९७ बी.डी.डी. चाळ, पहिला मजला, वरळी मुंबई ४०००१८ येथे संपर्क साधावा.
मुंबई, दि. 21 : राज्य शासनाकडून महिला व बाल कल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समाजसेविका व संस्थांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने गौरविण्यात येते. गेल्या चार वर्षांच्या पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, मुंबई शहर, 117, बी. डी. डी. चाळ, पहिला मजला, वरळी, मुंबई-4000018, येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई, दि. 21 : बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 29 जुलै 2023 पर्यंत पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत.
पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तिंचा जमाव करणे, मिरवणूक काढणे, जमाव करुन ध्वनिवर्धकाचा, सांगीतीय बँड वाजवणे, फटाके फोडणे यास या आदेशानुसार प्रतिबंध घालण्यात आला आहे. विवाह समारंभ आणि विवाह प्रथेशी संबंधित अन्य समारंभ, अंत्यविधी कार्यक्रम, कंपन्या, सहकारी संस्था आणि अन्य संस्था व संघटनांच्या कायदेशीर बैठका, क्लबमध्ये होणारे कार्यक्रम, सामाजिक मेळावे, सहकारी संस्था तसेच अन्य संस्थांच्या नियमित कामकाजाचा भाग म्हणून होणारे कार्यक्रम यांना या बंदी आदेशातून वगळण्यात आले आहे.
चित्रपटगृहे, नाट्यगृहे तसेच सार्वजनिक मनोरंजनाची अन्य ठिकाणे, न्यायालये, शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये तसेच अन्य शैक्षणिक संस्था, कंपन्या, कारखाने, दुकाने तसेच अन्य आस्थापनांमध्ये नियमित व्यापार, व्यवसाय या कारणांनी होणाऱ्या जमावास यातून वगळण्यात आले आहे. तसेच जमाव करण्यात तसेच शांततापूर्ण मार्गाने मोर्चास पोलिसांनी परवानगी दिलेली असल्यास त्यासही या जमावबंदीतून वगळण्यात आले आहे, असे पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी आदेशान्वये कळविले आहे.
मुंबई, दि. 21 : राष्ट्रीय हिताला बाधा पोहचविणाऱ्या तसेच राष्ट्रद्रोही कारवायांसाठी कारणीभूत ठरतील असे घटक जसे एअर मिसाईल, पॅराग्लाईडर्स, रिमोट कंट्रोल्ड मायक्रोलाईट एअरक्राफ्ट, ड्रोन, पॅरा मोटर्स, हँण्ड ग्लायडर्स हॉट एअर बलून इ. च्या उड्डाण क्रियांना 16 ऑगस्ट 2023 पर्यंत बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात बंदी घालण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त, विशाल ठाकूर यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कुठेही कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, सामान्य जनतेला धोका उत्पन्न होणार नाही, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना धोका निर्माण होणार नाही, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होवू नये याकरिता हे आदेश लागू आहेत. तथापि, ज्यांनी या कालावधीत पूर्व लेखी परवानगी घेतली आहे, अशांसाठी हा आदेश शिथिल असेल. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी पत्राद्वारे स्पष्ट केले आहे.
मुंबई दि. 21 : भविष्य निर्वाह निधीचे २०२२-२३ चे वार्षिक लेखा विवरण सेवार्थच्या https://sevaarth.mahakosh.gov.in या संकेतस्थळावर कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले असून त्याची प्रत्यक्ष प्रत (हार्ड कॉपी) देणे थांबविल्याचे महालेखाकार कार्यालयाने प्रसिद्धी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
महालेखापाल कार्यालय यांनी लेखा आणि कोषागार संचालकांना 2022-23 या वर्षासाठी जीपीएफ लेखा स्लिप प्रदान केल्या असून त्या सेवार्थ या वेबसाइटवर अपलोड केल्या आहेत. कर्मचारी हे विवरण डाउनलोड करून प्रिंट काढू शकतात.
खात्याच्या स्लिपमध्ये विसंगती आढळून आल्यास संबंधित आहरण आणि संवितरण अधिकाऱ्यामार्फत वरिष्ठ उपमहालेखापाल (निधी), महालेखापाल यांच्या निदर्शनास आणल्या जाऊ शकतात. गहाळ क्रेडिट/डेबिट, जन्मतारीख आणि नियुक्तीची तारीख इ. माहिती स्लिपवर छापली नसल्यास, नोंदी पडताळणी आणि अद्ययावत करण्यासाठी agaeMaharshtra1@cag.gov.in या ईमेलवर कळवावे, असेही महालेखाकार कार्यालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
जळगाव, दि.२१ (जिमाका) : नशिराबाद पुलावर गुरूवारी रात्री दहाच्या सुमारास अपघात होऊन अत्यवस्थ अवस्थेतील तरूणांसाठी तेथून जाणारे जिल्हाधिकारी अमन मित्तल देवदूत ठरले. जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविलेल्या संवेदनशीलतेमुळे त्यांचे समाजाच्या सर्व स्तरातून
कौतुक होत आहे.
रावेरहून पूर परिस्थितीचा पाहणी दौरा आटोपून येत असतांना जिल्हाधिकारी मित्तल यांना नशिराबाद पुलावर दुचाकीच्या बाजूला अत्यवस्थ अवस्थेत पडलेला तरुण रूपेश कमलाकर सोनवणे (वय -३२ रा. प्रिंपाळे, जळगाव) दिसला. जिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळी त्यांचे वाहन थांबवत, त्यांच्या मागून येणाऱ्या वाहतूक पोलीस शाखेच्या इंटर सेप्टर व्हॅनमध्ये पाठवत डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मादाय रूग्णालयात दाखल केले. रूपेश च्य नातेवाईकांशी संपर्क होईपर्यंत तसेच प्रकृतीची माहिती येईपर्यंत जिल्हाधिकारी रूग्णालयात मध्यरात्रीपर्यंत स्वतः थांबून होते.
अपघातात रूपेश सोनवणेला मेंदूला जबर इजा झाली होती. अपघात झाल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटाच्या कालावधीतच त्याला दवाखान्यात दाखल केल्यामुळे तरूणाचा जीव वाचला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी रूग्णालय वाहिकेची प्रतिक्षा न करता त्यांच्या मागून येणाऱ्या वाहतूक शाखेच्या वाहनात तरूणाला भरती करण्याचा तात्काळ निर्णय घेतला. रूग्णालयात येईपर्यंत दहा मिनिटांच्या कालावधीत जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः रूग्णालय वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क करून ठेवला. त्यामुळे तरूणाच्या उपचारांसाठी वैद्यकीय चमू सज्ज होता. जिल्हाधिकाऱ्यांनी तत्परतेने केलेल्या मदतीमुळे तरूणांचे प्राण वाचले आहेत. सध्या या तरूणांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉ. रितेश पाटील यांनी दिली आहे .
तरूणाचा जीव वाचवण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. मित्तल यांना वाहतूक शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील, पोलीस नाईक विजय पाटील, गणेश वाटे, मिलिंद पाटील, दिपक पाटील, सचिन मोहिते, नागरिक पवन भोई व डॉ. रितेश पाटील यांची मदत झाली.
आजच्या धावपळीच्या युगात पिझ्झा, बर्गरसारख्या फास्ट फुडमुळे नागरिकांमध्ये आरोग्याच्या समस्या वाढत असून शरीराला आवश्यक ते पोषक घटक मिळत नाहीत. ही परिस्थिती जगभर असल्याने २०२३ हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. पौष्टिक तृणधान्य वर्ष अंतर्गत नाचणी, बाजरी, ज्वारी, राजगिरा आणि भगर या पौष्टिक तृणधान्यांचे उत्पादनात वाढ होवून आपल्या आहारातही या धान्याचा वापर वाढावा, यासाठी या तृणधान्याचे उत्पादन वाढविण्यासाठी कृषी विभागाकडून वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
foxtail millet
धुळे जिल्ह्यात खरीप वर्ष २०२३-२४ मध्ये बाजरीचे ५५ हजार ५५१ हेक्टर, ज्वारी ८ हजार ७२१ हेक्टर, नागली १ हजार ६९० हेक्टर तसेच १ हजार २८७ हेक्टरवर इतर तृणधान्य पिकांच्या लागवडीचे नियोजन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षांनिमित्त पौष्टिक तृणधान्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाचणी, बाजरी, ज्वारी, राजगिरा, नाचणी, राळा आदींचे उत्पादन वाढवून त्यांचा आहारात समावेश करण्यावर भर दिला जात आहे. या तृणधान्यांमध्ये उत्तम असे पोषक अन्न घटक आहेत. त्यातील तंतूमय पदार्थ शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास फायदेशीर ठरतात. शिवाय रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करणे तसेच कर्करोगापासून सुरक्षा, मधुमेह, रक्तदाब, दमा, यकृतांचे आजार आदी बाबतीत उपयोगी ठरते. ही पिके कमी पाण्यावर येणारी आहेत. त्यांचे क्षेत्र अलीकडे सुमारे ६२ टक्क्यांपर्यत कमी झाले आहे. यामुळे २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून पाळण्याचे जागतिक पातळीवर निश्चित केले आहेत.
कृषी विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त वर्षभर विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहे. नाचणी, बाजरी, ज्वारी, राजगिरा, राळा आदी पिकांचे उत्पादन वाढावे, यासाठी शेतकरी मेळाव्यांचे, चर्चासत्र, आठवडी बाजाराचे आयोजन, बियाणे विक्रेत्यांमध्ये याविषयी जनजागृती केली जात आहे.
तृणधान्यांचे आहारातील पोषणमूल्य
आरोग्यवर्धक ज्वारी
पोषण मूल्ये प्रथिने १०.४ टक्के, कर्बोदके – ७२.६ टक्के, स्निग्ध पदार्थ १.९१ टक्के, खनिजे – १.६ टक्के असे प्रमाण ज्वारीत असून ज्वारीमुळे ग्लुटेनमुक्त, फायबर, पोटॅशियम, कॅल्शिअम, लोह, जस्त, फॉस्फरस, जीवनसत्त्वे, खनिजे व सूक्ष्म पोषण घटक रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते, पचनास हलकी, पोटाचे, त्वचेचे आजार कमी होतात. रक्ताभिसरण वाढवते, वजन कमी करते, हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त, ऊर्जा पातळी सुधारते, हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
आरोग्यवर्धक नाचणी
नाचणीमधील पोटॅशियममुळे मूत्रपिंड, हृदय व मेंदू उत्कृष्टपणे काम करतात. व्हिटॅमिन बी हे मेंदूच्या कार्यापासून ते निरोगी पेशी विभाजनापर्यंत उपयोगी, शरीराच्या कॅल्शिअम पूर्ततेसाठी उपयोगी, हाडाचे आरोग्य सुधारते, थकवा कमी करण्यास मदत, शक्तीवर्धक, पित्तशामक असल्याने नाचणी रक्त शुद्ध करण्यास उपयुक्त आहे. कॅल्शियम आणि लोह मुबलक असल्याने गरोदर माता व वयोवृद्ध व्यक्तींना हाडांसाठी व ॲनिमियावर नाचणीचे पदार्थ उपयोगी ठरतात. नाचणीमुळे लठ्ठपणा कमी करणे, मधुमेही रुग्णांसाठी गुणकारी, यकृतातील चरबी कमी करण्यास मदत होते. फायबरमुळे खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित, आतड्यासंबंधित आजार अथवा कर्करोगास आळा बसण्यास मदत होते.
आरोग्यवर्धक बाजरी
बाजरीमध्ये कॅल्शियम, विटामिन A, B व फॉस्फरस, लोह, मँगेनीज अधिक मात्रेत उपलब्ध असते. रक्तातील मेदाचे प्रमाण नियंत्रित, रक्तदाबावर नियंत्रण, हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी व ॲनेमिया आजारावर मात करण्यासाठी बाजरी उपयुक्त आहे. बाजरीत प्रथिने अधिक, ग्लुटेन फ्री असल्याने पचनास सोपे हृदयास सक्षम करते, फॉस्फरस उच्च प्रमाणात आढळते, त्यामुळे पेशींमधील ऊर्जा व खनिज पदार्थ साठविण्यास मदत होते. लोहाचे प्रमाण असल्याने हिमोग्लोबीन वाढीस फायदेशीर आहे.
आरोग्यवर्धक राजगिरा
पोटॅशियम व फायबर, प्रोटिन्स मोठ्या प्रमाणात आढळते. संधिवात, सांधेदुखी, हृदयासाठी उपयोगी. ग्लुटेन फ्री फायबरमुळे वजन कमी करण्यास उपयुक्त, मॅग्नेशिअम अधिक प्रमाणात असल्याने मायग्रेनसाठीही उपयुक्त आहे.
आरोग्यवर्धक राळा
राळ्यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढवते. त्यातील अँटीऑक्सिडन्ट हा गुणधर्म रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो. मोड आलेले राळा खाल्ल्यास हाडांचा ठिसूळपणा कमी होऊन हाडे बळकट होतात. तसेच अर्धशिशी, निद्रानाश, कॉलरा, ताप यांच्या उपचार पद्धतीमध्ये राळ्याचा प्रामुख्याने वापर होतो.
आरोग्यवर्धक वरई
नवजात शिशु, बालक आणि माता यांच्यासाठी उत्तम पोषकधान्य आहे. सदृढ आरोग्य व रोगप्रतिकार क्षमता वाढविण्यास वरई उपयुक्त आहे. वरई मधुमेह, ह्रदयरोग यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव कमी करते.
अलिबाग, (जिमाका) दि. 20 :- बचाव कार्य करणे व वाचलेल्या व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलवणे यास प्राधान्य दिले जात असून नियोजन झाले आहे. कायमचे पुनर्वसन करण्यासंदर्भात देखील विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याबरोबर चर्चा केली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अगदी सकाळीच दरड कोसळलेल्या इरशाळवाडीला पोहचले आणि दिवसभर बचाव कार्याला मार्गदर्शन व गती देण्याचे काम त्यांनी केले.
बचाव कार्यात येणाऱ्या अडथळ्यांबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, सतत पाऊस होत असल्याने मदत कार्यात अडथळे येत आहेत. अवजड यंत्रसामुग्री व अवजारे पोहोचण्यात अडचणी येत आहेत. दोन हेलिकॉप्टर तैनात केले होते, परंतु ते खराब हवामानामुळे येथे पोहोचू शकलेले नाहीत, असे यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन येथे रात्रीपासून उपस्थित असून अधिकारी, रेस्क्यू टीम ही यांच्या संपर्कात रात्रीपासून होती, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले .
ते म्हणाले, बचाव कार्य करताना स्वतःचे जीव धोक्यात घालून या ठिकाणी काम करत आहेत. इथे मदत आणि बचावकार्य अवघड आहे, यात सहभागी स्वयंसेवी संस्थांचे त्यांनी यावेळी आभार मानले. तरीसुद्धा पाऊस असताना जे लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत त्यांना बाहेर सुरक्षित काढण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
नवी मुंबई, दि. 20 :- आजची सकाळ उजडली ती एक दुदैवी घटना घेऊनच, दि. 19 जुलैची रात्र इरशाळवाडीवरील ठाकूर जमातीतील आदिवासीसाठी काळ रात्र ठरली. मध्यरात्री लोक साखर झोपेत असतांनी निसर्गाने जणू घालाच घातला. खालापूर येथील इरशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या वसाहतीवर दरड कोसळून अनेक कुटुंबे ढिगाऱ्याखाली गाढले गेले.
हे वृत्त कळताच सहदर्यी असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहाटे सहा वाजता ‘वर्षा’ बंगल्यावरुन निघाले.तेथे ते आठ वाजता पोहचेले. परिस्थितीची माहिती घेतली. घटना दुदैवी होती. हे लक्षात आले. त्यांनी लगेच शासकीय आणि निमशासकीय यंत्रणेला कामाला लावले. आणि काही क्षणात मदतीचे हजारो हात उभे राहीले. मदतकार्य जोरात सुरु होते. दुघर्टनाग्रस्तांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे सांत्वन मुख्यमंत्री करत होते. मदतकार्याने वेग घेतला आणि सकाळी 11.30 च्या सुमारात मुख्यमंत्र्यांचा ताफा तेथून बाहेर पडला. उपस्थितांना वाटले मुख्यमंत्री मुंबईला परतले म्हणून. परंतु असे सहज परत जातील ते मुख्यमंत्री थोडेच होते. त्यांच्यातला मदतीला धावून जाण्याचा ‘कार्यकर्ता’ या मोठया घटनेतही जागा होता. रायगडचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घारगे यांच्या गाडीतून ते पुन्हा घटनास्थळी रेनकोट घालून आले. गडाच्या खाली उपस्थितांना त्याची कल्पना आली नाही. कारण मुख्यमंत्र्यांचा ताफा नव्हता आणि अचानक मुख्यमंत्री घटनास्थळाकडे चालू लागले. ते थेट इरशाळवाडीत पोहोचले.
यावाडीपर्यंत पोहोचण्याचा पायमार्ग साधा नव्हता. धड चालताही येत नाही.अशी बिकटवाट धड मातीचा नाही की, दगडांचा. दगड गोटयांमधून येणारे पावसाचे पाणी, समोर भव्य असा कडा. पायवाटेच्या खाली 30 अंशापेक्षा जास्त उताराची तीव्रता. याही अवस्थेत मुख्यमंत्री केवळ दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीसाठी चालत होते. आभाळातून जोरदार पाऊस सुरु होता.
घनदाट झाडाझुडपातून वाट काढत दर पंधरा ते वीस मिनिटांनी क्षणभरच थांबत होते. मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष उद्ध्वस्त झालेल्या वस्तीवर येऊन बचावकार्याचे ‘सारथ्य’ केले. आभाळातून कोसाळणारा धो-धो पाऊस, खाली निसरडा गाळाने भरलेल्या दगडगोट्यांची वाट, पाय सटकल्यास काय होईल. याची कल्पना असून देखील न डगमगता या ‘कार्यकर्ता’ मुख्यमंत्री सर्व सामान्यांच्या दु:खात सहभागी होण्यासाठी निघाला होता. तब्बल दीड तासाचे अंतर चालून गेल्यावर मुख्यमंत्री पोहोचले त्यांनी प्रत्यक्ष बचावकार्य पाहिले. उपस्थितांना धीर दिला आणि खाली उतरू लागले.
दुर्घटनाग्रस्त जागेवर जाणे जेवढे कठीण होते. त्या जागेवरुन खाली येणे ही मोठी कसरत होती. तरीही मुख्यमंत्री साऱ्या सहकाऱ्यांसोबत दुपारी 4.05 मिनीटांनी खाली आले.
रेनकोट घातलेले ‘कार्यकर्ते मुख्यमंत्री’ तिथे उपस्थित असणाऱ्या साऱ्यांनी पाहीले, आणि सारेच त्यांच्या या अशक्य वाटणाऱ्या घटनेबद्दल चर्चा करू लागले. तब्बल अडीच तासानंतर डोंगरमाथ्यावर प्रत्यक्ष घटना घडलेल्या ठिकाणी राज्याचा प्रमुख असूनही सर्वसामान्यांचा दु:खात धावून जाणारा नेता मुख्यमंत्री श्री. शिंदेच होते. “देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे” या विंदा करंदीकर यांच्या कवितेची आठवण या निमित्ताने होते. स्वत:ला सामान्यांचा कार्यकर्ता म्हणून भाषणात न सांगता त्यांनी आज सर्वांसमोर हे सिध्द केले. आज महाराष्ट्राने मुख्यमंत्री ‘कार्यकर्ता’ मुख्यमंत्री होते, पावसातला ‘योध्दा ’होते, व्यवस्थापनातील ‘तज्ञ ’होते, प्रशासनातील जरब असलेले नेता होते, त्याचबरोबर ‘मानवी संवेदना’ जपणारा एक ‘माणूस’ देखील होते. स्वत:ला नेहमीच सामान्य कार्यकर्ता म्हणून संबोधतात त्याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा सर्वांना आला.
मुख्यमंत्र्यांच्या या धाडसाचे कौतुक करावे तेवढे थोडेच ! नैसर्गिक आपत्तीने गेलेला माणूस परत आणता येते नाही, परंतु आहे त्या माणसाला मदतीचा हात देण्यासाठी शासन नेहमीच पुढे असते. हे मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण दिवस घटनास्थळी थांबून साऱ्या राज्यासमोर दाखवून दिले आहे.
अलिबाग, दि.20 (जिमाका) :- रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात असलेल्या इरशाळवाडीवर बुधवारी रात्री दरड कोसळून भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत मदत कार्यात पशुधनाची काळजी घेण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत दोन पथके स्थापन करण्यात आली आहेत.
पथकामार्फत गुरुवारी 11 शेळ्या व 10 गोवर्गीय जनांवरावर उपचार करण्यात आले. तसेच या ठिकाणी एकूण 3 बैल व एक शेळी मृत आढळून आलेली असून, त्यांचे फोटो व पंचनामे करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ.शामराव कदम यांनी दिली.
पशुसंवर्धन विभागाच्या पथकाचे काम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील हे मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
इरशाळवाडी येथे बुधवारी रात्री अतिवतुष्टीमुळे दरड कोसळली. या नैसर्गिक आपत्तीचे गांभीर्य लक्षात घेऊन पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा पशुसंवर्धन उपयुक्त व रायगड जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी त्वरित उपाययोजनेचे नियोजन केले. घटनास्थळी पशुधनाची काळजी घेण्यासाठी 1 सहाय्यक आयुक्त, 2 पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक व एक परिचर यांचे एक पथक यानुसार दोन पथके तयार करण्यात आली आहेत.
या पथकांमार्फत जखमी पशुधनास उपचार करणे, मृत पशुधनाचे फोटो व पंचनामे करणे, शास्त्रोक्त पद्धतीने मृत जनावरांची विल्हेवाट लावणे व जखमी पशुधनास खाद्याचे नियोजन करणे इत्यादी कामे करण्यात आली.
या पथकाद्वारे गुरुवारी पहाटे 5.30 वाजता प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली. जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या नियंत्रण कक्षात जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी व पशुधन विकास अधिकारी यांचा समावेश आहे. दुर्घटना ठिकाणी पशुधनासाठी साईबाबा मंदिर संस्थान पनवेल या संस्थेकडून खाद्य प्राप्त झाले असून, ते खाद्य शुक्रवारी इरशाळवाडी येथे पोहोच करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
▪️ भारत-तिबेट सीमा पोलिस दलाच्या जवानांकडून ‘गौरव सलामी’
जळगाव, दि. ११ (जिमाका): मातृभूमीसाठी प्राणार्पण करणाऱ्या 9 वी वाहिनी, भारत-तिबेट सीमा पोलिस दलाच्या शहीद जवान सुनील...
नागपूर, दि. ११: बॉयलर हा औद्योगिक क्षेत्राचा आत्मा आहे. बॉयलरच्या कार्यक्षमतेवर उत्पादन खर्च अवलंबून असतो. याची कार्यक्षमता ही बॉयलरच्या निर्मितीशी निगडीत असून परिपूर्ण कौशल्य...
‘गोवर्धन गोशाळा कोकण’ प्रकल्पाचे उद्घाटन
सिंधुदुर्गनगरी, दि. ११ : शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी देशी गायींचे संवर्धन महत्त्वाचे असून, गोमातेचे संवर्धन केल्याशिवाय नैसर्गिक शेतीला गती मिळणार...
विक्रमी वेळेत आकर्षक पुतळ्याची उभारणी
परिसराचा विकास करुन पर्यटनाला चालना
सिंधुदुर्गनगरी, दि. ११ (जिमाका): छत्रपती शिवाजी महाराज महान योद्धा होते. त्यांचे विचार सर्वांसाठी...