मंगळवार, मे 13, 2025
Home Blog Page 1135

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सुरक्षितता बाळगावी – जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड

बुलडाणा, दि 22 : जिल्ह्यात येत्या दोन दिवसात सर्वत्र अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या इशाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन परिस्थिती चांगल्याप्रकारे हाताळत आहे. नागरिकांनीही सहकार्य करीत सुरक्षितता बाळगावी, तसेच घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी केले आहे.
जिल्ह्यात पुढील दोन दिवस चांगल्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या 24 तासात संग्रामपूर तालुक्यातील संग्रामपूर, सोनाळा, बाबनबीर या महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. तसेच संग्रामपूर तालुक्यातील नदीनाल्यांना पूर आला आहे.
जिल्ह्यातील नागरिकांनी पाऊस सुरू असताना नदीनाल्यांमध्ये पुराचे पाणी असताना जाऊ नये. नागरिकांनी पुराचे पाणी पाहण्यासाठी नदी-नाल्याच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे.तसेच पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडून जाण्याचा प्रयत्न करू नये. तसेच धोकादायक ठिकाणी सेल्फी घेऊ टाळावे. पाऊस सुरू असताना घराबाहेर पडू नये. जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास पावसाचा अंदाज घेऊनच कामकाजाचे नियोजन करावे.
नागरिकांनी वीज पडण्यापासून संरक्षणासाठी दामिनी ॲपचा उपयोग करावा. तसेच सुरक्षितस्थळी आश्रय घ्यावा. आपत्तीच्या काळात नागरिकांनी पोलीस विभाग व स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
पूर परिस्थितीमध्ये काय करावे
पूर परिस्थितीमध्ये नागरिकांनी उंच ठिकाणी जावे. विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा वीज पुरवठा बंद करावा. गाव, घरात जंतुनाशके असल्यास ते पाण्यात विरघळणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. पूरासंदर्भात पूर्वकल्पना मिळाल्यास घरातील उपयुक्त सामान व महत्वाची कागदपत्रे सुरक्षित ठिकाणी घेवून जावी.
परिस्थितीमध्ये काय करु नये 
पूर असलेल्या भागात विनाकारण भटकू नये. पुराच्या पाण्यात चूकुनही जावू नये. दुषित व उघड्यावरचे अन्न व पाण्याचे सेवन करणे टाळावे. पुलावरुन पाणी वाहत असताना पूल ओलांडू नये. पाऊस सुरू असताना घराबाहेर पडू नये.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी सतर्क रहावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, दि.२२ जुलै (जिमाका वृत्तसेवा) – शासन शेतकरी व नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. ही भावना सर्वसामान्यांमध्ये रूजविण्यासाठी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवत सर्तक रहावे. अशा सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे दिल्या.

शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजीत कृषी विभाग आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आयोजीत बैठकीत पालकमंत्री बोलत होते. या बैठकीला ग्रामविकास, पंचायतराज व पर्यटनमंत्री गिरीश महाजन, मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची उपस्थिती होती. यात पालकमंत्र्यांनी शेतकर्‍यांच्या पाठीशी शासन सर्वतोपरी खंबीरपणे उभे असल्याचे नमूद केले. तर सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे आपत्कालीन उपाययोजनांसाठी प्रशासनाने सज्ज राहण्याच्या सूचना देखील त्यांनी केल्या.

जळगाव जिल्ह्यात जुलै महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे रावेर, भुसावळ, जामनेर, मुक्ताईनगर तसेच इतर तालुक्यातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अवैध, बोगस खतांमुळे ही शेती पिकांचे नुकसान झाले आहे. कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच अलीकडे होत असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक तालुक्यांमध्ये मोठी हानी झाली असून या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या कामकाजाचा पालकमंत्र्यांसोबत ग्रामविकास मंत्री व मदत, पुनर्वसन मंत्र्यांनी व्यापक आढावा घेतला. आणि प्रशासनाला सूचना केल्या.

या बैठकीला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह ग्रामविकास, पंचायतराज व पर्यटनमंत्री गिरीश महाजन, मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील खासदार रक्षा खडसे, आमदार शिरीष चौधरी, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी अमन मित्तल, पोलीस अधीक्षक एम.राजकुमार आदींसह विविध शासकीय विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले,  कपाशीवरील लाल्या रोगाच्या प्रादुर्भावापासून  संरक्षण करण्यासाठी कृषी विभागाने शेतकर्‍यांसाठी जनजागृती करावी. टोल फ्री क्रमांक जाहीर करावा. नॅनो युरियाची फवारणी केली पाहिजे यावर शेतकर्‍यांमध्ये जागृती करावी. अवैध खत विक्रेते व कंपन्यांवर कारवाई करावी्. सततचा पाच दिवस पडणारा पाऊस अतिवृष्टी म्हणून ग्राह्य धरावा.

या बैठकीत विविध महत्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. यात प्रामुख्याने आधी पाऊस पडला नसला तरी अलीकडच्या काळात झालेल्या समाधानकारक पावसामुळे ९१ टक्के पेरण्या आटोपल्या असल्याची माहिती देण्यात आली. तर कपाशीची लागवड ही उद्दीष्टापेक्षा जास्त म्हणजे १०८ टक्के झाल्याचे नमूद करण्यात आले. जिल्ह्यात दोन महिन्यातील पावसाचा आढावा देखील याप्रसंगी घेण्यात आला. यात जुलैमध्ये आजवर होत असलेल्या सरासरी पावसापेक्षा १३६ टक्के पाऊस जास्त झाला असून जिल्ह्यातील ८६ पैकी ८२ मंडळांमध्ये एकूण सरासरीच्या पन्नास टक्कयांपेक्षा जास्त पर्जन्यमान झाल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात जूनपासून आजवर पाच जणांचा मृत्यू झाला असून त्यांना प्रत्येकी चार लाख रूपये याप्रमाणे शासकीय मदत प्रदान करण्यात आली आहे. तर ३६ गुरांचा मृत्यू झाला असून यासाठी ७ लक्ष २२ हजार रूपये दिलेले आहेत. यावल आणि रावेर तालुक्यातील ३३ गावांमध्ये सुमारे साडेतीनशे घरांची अंशत: हानी झाली असून यासाठी अंदाजे चौदा लक्ष रूपयांची तरतूद करण्यात येणार आहे. तर अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता आपत्कालीन पथक तयार करण्यात आले असून त्यांना बचावाचे साहित्य प्रदान करण्यात आल्याचे देखील बैठकीत सांगण्यात आले.

जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये सरदार कंपनीच्या खते आणि बियाण्यांमुळे शेतकऱ्यांची हानी झाली असून या कंपनीवर कारवाई करण्यात आलेली आहे. बोगस बियाणे आणि खतांची विक्री खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा याप्रसंगी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिला. शेतकर्‍यांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना तातडीने मदत देण्यात यावी. ३१ जुलैपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा प्रदान करण्यात यावा असे निर्देश देखील त्यांनी दिलेत. तर ना. गिरीश महाजन यांनी ग्रामविकासमधील सर्व अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी मुख्यालयात थांबण्याचे निर्देश दिलेत.

एक रूपयात पीक विमा योजनेचे अर्ज  भरून घेण्यासाठी जिल्ह्यात गावनिहाय मोहीम राबविण्यात यावी. दररोज किमान ४० हजार शेतकऱ्यांचे अर्ज भरून घेण्याचे काम कृषी विभागाने करावे. शेतकऱ्यांकडून अवास्तव पैसे आकारणार्‍या सेतू सेवा केंद्रांवर कारवाई करा. अशा सक्त सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

जिल्ह्यात जरी मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असला तरी धरणातील पाणी पातळी कमी आहे. तेव्हा पाण्याचे काटकसरीने वापर करण्याच्यादृष्टीने नियोजन करावे. जिल्ह्यात राजरोसपणे अवैध दारू विक्री सुरू आहे. याला प्रतिबंध घालण्याचे काम उत्पादन शुल्क विभागाने करावे. जळगाव शहरातील अंतर्गत रस्ते व गटारींचे कामे करण्यात यावेत. अशा सूचना ही पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिल्या.

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, अतिवृष्टीमुळे जसे शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे तसाच प्रकारे बोगस खते व बियाणे यामुळे शेती पिकांचे नुकसान होत आहे. याला आळा घालण्यासाठी शासन लवकरच कायदा करणार आहे्. पोलीस विभागाने ही अशा उत्पादकांवर कडक कारवाई करावी्.  खतांची गुणवत्ता विभागाने तपासणी करावी.  केळी पिकविणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी लवकरच केळी विकास महामंडळाच्या माध्यमातून धोरणात्मक निर्णय घेण्यात येतील. गळके छत असलेल्या शाळांची दुरूस्ती करण्यात यावी. महावितरण विभागाने यंत्रणा सक्षम ठेवत अखंडीत वीज पूरवठा करण्याचे काम करावे्. ग्रामविकास यंत्रणेतील कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये. अशा सूचनाही ग्रामविकास मंत्री श्री. महाजन यांनी यावेळी दिल्या.

मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील म्हणाले, जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने आवश्यक असलेले प्रस्ताव तयार करावेत. या प्रस्तावांना मान्यता व निधी पुरविण्याचे काम केले जाईल् .

यावेळी खासदार रक्षा खडसे, आमदार शिरीष चौधरी, आमदार मंगेश चव्हाण व आमदार चंद्रकांत पाटील यांनी ही उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

000

विद्यापीठात कवयित्री बहिणाबाईंचा पुतळा उभारण्यात येईल – पालकमंत्री गुलाबराव पाटील

तरूणांनी व्यसनांपासून दूर रहावे – ग्रामविकास मंत्री गिरी महाजन

जळगाव, दि.२२ जुलै (जिमाका) – कवयित्री बहिणाबाई चौधरी पुतळ्यासाठी जिल्हा नियोजन मधून एक कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. लवकरच पुतळाही उभारण्यात येणार आहे. अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे दिली. जी-२० संमेलनाच्या रूपाने तरूणांसाठी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. देशाला शिखरावर पोहचविण्याचे काम तरूणच करू शकतात. अशी आशा ही पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात आयोजित ‘जी-२० युवा संवाद – भारत @२०४७ संमेलना’चे उद्घाटन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ग्रामविकास, पंचायतराज व पर्यटनमंत्री गिरीष महाजन, खासदार रक्षा खडसे, आमदार मंगेश चव्हाण, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विजय माहेश्वरी, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सल्लागार समिती सदस्य राजेश पांडे, राष्ट्रीय सेवा योजनेचे क्षेत्रिय संचालक डी‌. कार्तिगेन, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश मोरखाडे , नितीन झाल्टे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

पालकमंत्री श्री गुलाबराव पाटील म्हणाले की, तरूणांनी प्रगती करण्यासाठी शिस्त अंगिकारण्याची‌ गरज आहे. आजचा तरूण सोशल मिडियात अडकला आहे‌. भारतातील तरूणाची आता जगाला कौशल्य रूपी मनुष्यबळाच्या रूपाने गरज आहे.

आज तरूणांमध्ये प्रतिभा आहे. तरूणांना दिलेले उद्दिष्ट तरूण निश्चित पूर्ण करणार आहेत.  केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून शिक्षणाकरिता आज भरपूर निधी दिला जात आहे.  तरूण देशाचे भवितव्य आहे. तरूणांनी संधीचे सोने करावे. असे ही पाटील यांनी सांगितले.

ग्रामविकास मंत्री श्री.महाजन म्हणाले की, भारत तरूणांचा देश आहे. जगाला कौशल्ययुक्त तरुणांची गरज आहे. ही गरज भारताचे तरूण पूर्ण करू शकतात. यासाठी तरूणांनी कौशल्य आत्मसात केले पाहिजेत. गाव सोडण्याचे धाडस केले पाहिजे. तरूणांनी कामात प्रामाणिकपणाना अंगिकारला पाहिजे. मनामध्ये जिद्द ठेवून काम केले पाहिजे‌. संकटाला न घाबरता धाडस करून तरूणांनी काम केले पाहिजे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षांच्या काळात तरूणांच्या शैक्षणिक व सर्वांगिण हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. तरूण देशाचे भविष्य आहे. तरूणांनी स्वत:ला ओळखावे. तरूणांनी व्यसनांपासून दूर रहावे. अशी अपेक्षाही श्री.महाजन यांनी यावेळी व्यक्त केली‌.

कुलगुरू श्री‌ माहेश्वरी यांनी आपले अध्यक्षीय भाषण केले. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या पंचप्रण संकल्पनेवर तरूणांनी काम करावे. युवकांमधील उर्जेचा वापर करण्याचे आपल्यापुढे आवाहन आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण ही काळाची गरज आहे. नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ सक्षमपणे करत आहे.

तासिका नियमित करा, कॉपी न करता परीक्षा द्या. जीवनात शिस्तपणा असला पाहिजे. चांगल्या मित्रांचा गोतावळा तयार करा, प्रमाणिकपणा जपा, ज्ञान, कौशल्य व प्रतिभेचा वापर करून देशाला विकासाकडे घेऊन जाण्याचे काम तरूणांनी करावे. अशा शब्दात कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

राजेश पांडे यांनी बीज भाषण केले. श्री.पांडे म्हणाले की, २०४७ पर्यंत जगातील सर्वात जास्त तरूणांचा देश भारत असणार आहे. नरेंद्र मोदींनी दिलेल्या पंचप्रण संकल्पनेवर तरूणांनी काम करायचे आहे. भारताची युवाशक्ती आपल्या कौशल्यावर जगाचं नेतृत्व करणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणात युवकांचे कौशल्य व कल्पनाशक्तीला वाव देणारा अभ्यासक्रम असणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी १ ऑगस्ट रोजी पुण्याहून महाराष्ट्रातील ५ लाख तरूणांशी संवाद साधणार आहेत. येत्या पंधरा दिवसांत या संमेलनाच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातील अडीच लाख तरूणांपर्यंत विकसित भारताचा संकल्प पोहोचला पाहिजे. अशी अपेक्षा श्री.पांडे यांनी यावेळी व्यक्त केली.

भारत सरकारच्या युवक व क्रीडा मंत्रालय, राष्ट्रीय सेवा योजना, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण विभाग व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनाच्या उद्घाटनपूर्वी विद्यापीठ आवारात तिरंगा रॅली काढण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांना दिलेल्या अमृत काळातील पंचप्रण संकल्पनेवर हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

यावेळी खासदार रक्षा खडसे, आमदार मंगेश चव्हाण यांनीही युवकांशी संवाद साधला.

000


पावसाची स्थिती पाहून नागरिकांनी परतीच्या वारीत सहभागी व्हावे – जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड

बुलडाणा, दि 22 : श्री संत गजानन महाराज यांची परतीची वारी सोमवार, दि. २४ जुलै रोजी खामगाववरून शेगावला परतणार आहे. या परतीच्या वारीत भाविक मोठ्या प्रमाणावर सहभागी होतात. मात्र यावर्षीची पावसाची परिस्थिती पाहून नागरिकांनी परतीच्या वारीत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी केले आहे.
श्री संत गजानन महाराज यांच्या परतीच्या वारीचे आगमन झाले आहे. ही वारी खामगाव येथे दि. 23 जुलै रोजी मुक्कामी राहणार असून सोमवार दि. 24 जुलै रोजी खामगाववरून शेगावला परतणार आहे. या दोन्ही दिवशी भाविक मोठ्या प्रमाणावर सोहळ्याला उपस्थित असतात. मात्र यावर्षी सर्वत्र पावसाची स्थिती आहे. यामुळे भाविकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. परतीच्या वारीच्या दिवशी वातावरणाचा अंदाज पाहून नागरिकांनी परतीच्या पालखीत सहभागी व्हावे, तसेच पावसाची परिस्थिती असल्यास नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून परतीच्या वारीत सहभागी होऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब केंद्रीय गृहमंत्री यांची सदिच्छा भेट घेतली

नवी दिल्ली, दि. २२ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांची त्यांच्या  शासकीय निवासस्थानी सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली.

यावेळी श्री. शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री श्री. शहा यांना पुष्पगुच्छ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची अश्वारूढ प्रतिमा भेट दिली.

या भेटीत श्री शिंदे त्यांचे वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, त्यांची पत्नी वृषाली शिंदे नातु रूद्रांश यांच्या सोबत होते.

याप्रसंगी श्री. शहा यांनी श्री. शिंदे यांच्या सोबत महाराष्ट्रासंबंधी विविध विषयांवर चर्चा केली.

०००

बाल संरक्षण कक्षासाठी केंद्र सरकार कार्यालय उपलब्ध करून देणार – केंद्रीय मंत्री श्रीमती स्मृती इराणी

मुंबई, दि.२२ : जिथे बाल कल्याण समिती यांना कार्यालय नाहीत तसेच बाल संरक्षण कक्ष नाहीत अशा ठिकाणी केंद्रीय महिला बाल विकास मंत्रालय या कार्यालयांची निर्मिती करेल आणि निधी देखील उपलब्ध करून देईल अशी घोषणा केंद्रीय महिला व बाल कल्याण, अल्पसंख्यांक मंत्री स्मृती जुबिन इराणी यांनी केली.

षण्मुखानंद ऑडिटोरियम, सायन पूर्व मुंबई येथे राष्ट्रीय बाल संरक्षण आयोग भारत सरकार व महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने “वत्सल भारत” या विभागीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात केंद्रीय महिला व बाल कल्याण, अल्पसंख्यांक मंत्री स्मृती इराणी बोलत होत्या. या कार्यक्रमास महाराष्ट्र सह गुजरात, आंध्रप्रदेश, गोवा, दादरा नगर हवेली, दमन, दिव राज्यातील सदस्य सहभागी झाले होते.

केंद्रीय मंत्री श्रीमती इराणी म्हणाल्या, ‘चाइल्ड ट्रॅकिंग’ या सिस्टमच्या माध्यमांतून जी मुले हरवली होती अशी देशातील चार लाख मुले शोधली आहेत आणि त्या मुलांना सुरक्षितपणे त्यांच्या कुटुंबांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं गेलं आहे. 2 हजार 500 मुलं ही दत्तक घेतली गेली आहेत. पोक्सो अंतर्गत महिलांना भारत सरकार पूर्णपणे मदत करणार असून  त्यांचा कायदेशीरदृष्ट्या येणारा आर्थिक भार देखील भारत सरकार उचलणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात अवैध मानवी तस्करी रोखण्यासाठी युनिट बनवलेले आहे, यामध्ये काही त्रुटी असतील तर त्या जरूर आम्हाला कळवाव्यात. प्रत्येक गावागावाच्या बाल सुरक्षा  समित्या कार्यरत आहेत. ग्रामपंचायत स्तरावर एखाद्या बालकाला जर मदतीची आवश्यकता असले तर त्याची माहिती भारत सरकारला कळवावी, आम्ही त्याच्यासाठी नक्की मदत करू.

प्रत्येक जण आप आपल्या परीने स्वताच्या राज्यातील वेगवेगळ्या शासकीय व निम शासकीय आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून लहान मुलांची बालकांची काळजी समर्पित भाव ठेऊन सेवा देत आहात याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. प्रत्येक बालकाला शिक्षण घेण्याचा हक्क आहे. शिक्षणापासून एकही बालक वंचित राहू नये यासाठी केंद्र शासन पूर्णपणे प्रयत्न करेल असेही मंत्री श्रीमती स्मृती इराणी म्हणाल्या.

यावेळी केंद्रीय महिला बालविकास विभागाचे अतिरिक्त सचिव संजीव कुमार चड्ढा यांनी बाल हक्क अधिनियम कशाप्रकारे लागू केला जात आहे, वत्सल भारत योजनेबाबत माहिती दिली. यावेळी सहसचिव इंद्रा मालो यांनी वत्सल भारत योजनेसाठी सर्व राज्यांचे सहकार्य मिळत असल्याबद्दल सर्वांचे आभार मानले तसेच मिशन वस्तूंचे ते पोर्टल देखील लॉन्च केले असल्याची माहिती यावेळी दिली.

केंद्रीय बाल संरक्षण बालसुरक्षा आणि बाल कल्याण विभागाच्या सदस्य सचिव रूपाली बॅनर्जी, महाराष्ट्र राज्याचे महिला बाल विकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव, महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, उपायुक्त राहुल मोरे, बापूराव भवाने, जिल्हा महिला बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड, शोभा शेलार आणि अब्दुल चौधरी यासह राज्यातील जिल्हा महिला बालविकास अधिकारी उपस्थित होते.

000

 

महाराष्ट्राच्या सर्वच विकास प्रकल्पांना केंद्र शासनाचे पूर्ण पाठबळ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नवी दिल्ली, दि. २२ : राज्यात सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांना केंद्र शासनाचे पूर्ण पाठबळ असल्याचे आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना दिली.

आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी प्रधानमंत्री श्री. मोदी यांची त्यांच्या 7 लोककल्याण मार्ग स्थित शासकीय निवासस्थानी सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली. श्री. शिंदे यांनी त्यांचे वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व त्यांची पत्नी वृषाली शिंदे, नातु रूद्रांश यांच्या समवेत भेट घेतली.

मुख्यमंत्री यांनी सांगितले, भेटी दरम्यान कुटुंबियांची प्रधानमंत्री यांनी आस्थेवाईकपणे विचारपूस केली. यासोबतच राज्याच्या सर्वंकष विषयांवर चर्चा करून राज्यात सुरू असलेल्या सर्वच विकास प्रकल्पांना केंद्र शासनाचे पाठबळ असल्याचे आश्वासक आश्वासनही यावेळी प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी दिले.

प्रधानमंत्री यांनी रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इरशाळवाडी दुर्घटनेबाबत सहवेदना करून या दुःखाच्या समयी केंद्र सरकार खंबीरपणे पाठिशी उभे असल्याचे सांगितले. तसेच या ठिकाणी सुरू असलेले बचावकार्य आणि पुनर्वसनाबाबतची माहिती जाणून घेतली.

धारावी प्रकल्प आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प असून यामुळे मुंबईचा चेहरा-मोहरा बदलणार आहे. या प्रकल्पामुळे येथील लोकांचे जीवनमान उंचावेल त्यासाठी हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावा अशी अपेक्षा प्रधानमंत्री श्री.मोदी यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्याकडे व्यक्त केली. प्रत्येक कुटुबांला हक्काचे घर मिळावे, असे केंद्र शासनाचे धोरण असून राज्य त्या दिशेनेही काम करीत असल्याचे समाधान प्रधानमंत्री यांनी व्यक्त केले असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

राज्यातील रखडलेले पुनर्विकासाचे प्रकल्प मार्गी लावावेत. पायाभूत सुविधांना बळ मिळाले की राज्याच्या समृद्धीचा मार्ग सुकर होतो. त्यामुळे राज्यातील असे सर्व प्रकल्प त्वरित पूर्ण करावेत, अशाही सूचना प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी यावेळी केल्या असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यासह राज्यात वांरवार होणारी अतिवृष्टी त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांचे होणारे नुकसान याबाबतही प्रधानमंत्री यांनी विचारपूस केली. कोकणात पडणाऱ्या पावसाचे पाणी समुद्राला मिळते. हे पाणी दुष्काळग्रस्त भागात कसे वळविता येईल, यावर भविष्यात काही उपाययोजना आखता येतील का? याबाबतही चर्चा करण्यात आली.  मराठवाडा वॉटर ग्रीड या राज्य सरकारच्या योजनेबाबतची माहिती प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी  घेतली. यासह राज्यातील आरोग्य व्यवस्था, उपलब्ध शैक्षणिक सुविधा याबाबतही विचारणा केली असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

000

इरशाळवाडी दुर्घटनेतील बचावलेल्या मुलांचे पालकत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारले – विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

अलिबाग,दि.22(जिमाका) :- इरशाळवाडी ता.खालापूर जि रायगड येथे  दुर्घटनेत बचावलेल्या अनाथ मुलांचे पालकत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारले असून अचानक कोसळलेल्या मोठ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये देखील शासन मोठ्या ताकदीने त्यांच्या पाठिशी उभे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले.

विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज नढळ येथे दुर्घटनेतील पीडितांच्या तात्पुरत्या निवारा केंद्रास भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने त्यांनी पालकत्व स्वीकारल्याचे यावेळी जाहीर केले. यावेळी आमदार मनीषा कायंदे, आमदार महेंद्र थोरवे, अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख मंगेश चिवटे उपस्थित होते.

या मुलांशी संवाद साधताना डॉ.गोऱ्हे यांनी मुलांना लगेच कामाला न जाता शिक्षण पूर्ण करण्याबाबत सांगितले. काहीही लागल्यास त्यांच्या फोनवर संपर्क साधण्याकरिता स्वतःचा नंबर अनाथ मुलांना दिला. तसेच गावातील स्थानिक व्यक्ती ज्याला आपण सर्व ओळखता त्यांच्या संपर्कात राहण्याच्या सूचनाही त्यांनी मुलांना केली.

दुर्घटनाग्रस्त इरशाळवाडी मध्ये एकूण 1 ते 18 वयापर्यंतचे 31 मुल- मुले असून त्यापैकी 21 जण आश्रम शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत.

डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने या इरशाळवाडी दुर्घटनेतील या अनाथ मुलांचे पालकत्व स्विकारले आहे. ही मुले 18 वर्षाचे पूर्ण होईपर्यंत त्यांच्या शिक्षण व पालनपोषणाची जबाबदारी संस्थेने घेतली असून त्यांच्या आवश्यक त्या सर्व गरजा पूर्ण करण्यात येणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांची डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन ही स्वयंसेवी आहे  खा.डॉ.शिंदे यांनी यावेळी दूरध्वनीद्वारे संबंधितांशी संवाद साधला. स्वतः मुख्यमंत्री  या संपूर्ण घटनेवर आणि मदत कार्यावर लक्ष ठेवून आहेत. शंभर टक्के पुनर्वसन होईपर्यंत मदत कार्य सुरू राहील, असा विश्वास यावेळी दुर्घटनाग्रस्त मुलांना देण्यात आला. तसेच मदत साहित्याचे वितरण करण्यात आले. आमदार मनीषा  कायंदे व स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांना देखील यावेळी मुलांशी संवाद साधला.

राज्याचे मुख्यमंत्री श्री.शिंदे साहेब यांनी यापूर्वी देखील 2020 साली महाड येथील तारीक गार्डन या दुर्घटनाग्रस्त इमारतीत बचावलेल्या दोन लहान बालकांचे संपूर्णता पालकत्व स्वीकारले होते. तसेच 2021 साली पालघर येथे रोजगाराअभावी आत्महत्या केलेल्या कामगार दाम्पत्यांच्या 2 मुलांचे होते.

०००

 

 

 

इरशाळवाडी दुर्घटनाग्रस्तांचे पुनर्वसन लवकर व्हावे यासाठी प्रयत्न करणार – विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

अलिबाग,दि.22(जिमाका) :- इरशाळवाडी दुर्घटनेतील मुले, मुली, महिला, पुरुष, एकल स्त्रिया या सर्वांचे सर्व्हेक्षण करून अधिकाऱ्यांनी त्याची व्यवस्थित नोंद ठेवावी. या ग्रामस्थांचे कायमस्वरूपी पुनर्वसन व्हावे, यासाठी तात्काळ कार्यवाही सुरु करावी असे उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

इरशाळवाडी दुर्घटनेत अनाथ झालेल्या मुलांची उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी नढळ गावात जाऊन भेट घेत त्यांची विचारपूस केली. तसेच त्यांच्या तात्पुरत्या राहण्याची सोय असलेल्या ठिकाणी जाऊन भेट देत उपलबद्ध सुविधांची पाहणी केली.

यावेळी त्यांनी सांगितले की मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी स्वतः तत्परतेने व संवेदनशीलतेने तात्काळ भेट दिली होती. याबाबत त्यांनी सविस्तर निवेदन विधान सभेमध्ये केले होते व प्रत्येक मृत व जखमी कुटुंबाला शासनाची सर्वोतोपरी मदत जाहिर केली होती.  विधानभवनात माझी भेट घेऊन सविस्तर माहिती ही दिली होती. या भेटी वेळी त्यांनी आपादग्रस्त लोकांना तात्काळ मदत पोहचत आहे का? तसेच सर्व मुले व महिलांना आवश्यक सुविधा दिल्या आहेत का? याबाबत या ठिकाणी जाऊन पाहणी करण्याचेही सांगितले असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

या दरम्यान त्यांनी दुर्घटनेतून बचावलेल्या लोकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, सर्वांनी एकत्रित येऊन दहा दहा लोकांचा समूह करून त्यातील एक जणाने सर्व आपादग्रस्त लोकांची जबाबदारी घ्यावी आणि काय वस्तू लागणार आहे त्याची यादी करावी व ती आम्हाला कळवावी. जेणेकरून आपण एक कुटुंब असल्यासारखं एकमेकांच्या संपर्कात राहू शकतो.  कोणत्याही व्यक्तीसोबत गैरकृत्य होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल असेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

यावेळी आमदार महेंद्र थोरवे, आमदार मनिषा कायंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, तहसिलदार आयुब तांबोळी, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव, पोलीस उपअधीक्षक विक्रम कदम, अप्पर तहसिलदार पूनम कदम, नगरसेविका शीतल म्हात्रे, स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलमताई जोशी, मंगेश चिवटे उपस्थित होते.

000

 

आजादी का अमृत महोत्सव समारोप कार्यक्रमाची पूर्व तयारी बैठक

मुंबई, दि. २२ :  केंद्रीय सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या वतीने आयोजित आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमाच्या समारोप कार्यक्रमासंदर्भात पूर्व तयारी करण्याविषयी केंद्रिय कॅबिनेट सचिव राजीव गोबा यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीव्दारे सर्व राज्याचे मुख्य सचिव यांची बैठक घेण्यात आली.

यावेळी राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक, कौशल्य विकास विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितिन गद्रे, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, गृह विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार सिंग, वन विभागाचे प्रधान सचिव वी. वेणुगोपाल रेड्डी, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालक जयश्री भोज आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आजादी का अमृतमहोत्सव या उपक्रमाचा समारोप “मेरी माटी मेरा देश”, मिट्टी को नमन, विरोंका वंदन, ही संकल्पना घेऊन संपूर्ण देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. मार्च २०२१ पासून सूरु झालेला या उपक्रमाचा ऑगस्ट २०२३ अखेर समारोप होणार आहे. या समारोप उपक्रमात विविध विभागांच्या वतीने अनेक कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.

000

ताज्या बातम्या

पीएम जनमन, धरती आबा सारख्या योजनांमधून प्रत्येक आदिवासी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र...

0
वर्धा, दि.12 (जिमाका) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी पीएम जनमन, धरती आबा सारख्या अनेक योजना नव्याने सुरु केल्या. राज्यात या योजनांच्या...

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाच्या माध्यमातून नवीन पिढीला प्रेरणा मिळेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
वर्धा दि. 12 (जिमाका) : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वातंत्र्याच्या लढ्याला एक वेगळी कलाटणी दिली. सावरकरांनी स्वातंत्र्यवीर म्हणून तर काम केलेच सोबतच अनेक क्रांतीकारक तयार...

‘कबड्डी’तून खेळाडूंचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
वर्धा, दि.१२ (जिमाका)  : ग्रामीण भागातील तरुणाईला कबड्डी या खेळाची विशेष आवड आहे. अतिशय कमी गुंतवणुकीत हा खेळ खेळता येतो. या खेळामध्ये प्रचंड चपळाई,...

येत्या काळात आरोग्य क्षेत्रातील सर्वच विभागांसाठी पुरस्कार सुरु करणार – सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

0
कोल्हापूर, दि. १२ मे : ‘ज्याप्रमाणे परिचारिकांना फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्काराने सन्मानित केले जाते, त्याचप्रमाणे सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील इतरही विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या उत्कृष्ट...

मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय जिल्हास्तरीय मदत कक्षाचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते...

0
धुळे, दिनांक 12 मे, 2025 (जिमाका वृत्तसेवा) :  मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालयांमार्फत नागरिकांना द्यावयाच्या मदतीसाठी कार्य करणाऱ्या जिल्हास्तरीय मदत कक्षाचे आज राज्याचे...