गुरूवार, जुलै 10, 2025
Home Blog Page 1134

राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थातील विद्यार्थी व लोकसहभागातून गड-किल्ले आणि परिसर स्वच्छता मोहीम : मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई,दि. 29 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) यांच्याद्वारे १ ऑक्टोबर रोजी  नजिकचा परिसर स्वच्छता  आणि २ ऑक्टोबर रोजी राज्यातील गड-किल्ल्यांची स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

मंत्री श्री. लोढा म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात १ ऑक्टोबर रोजी ‘स्वच्छतेसाठी एक तारीख -एक तास उपक्रम’ राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने राज्यात कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था(आयटीआय) यांच्या माध्यमातून आणि स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, दुर्गप्रेमी यांच्या सहभागातून १ ऑक्टोबर रोजी  परिसर स्वच्छता आणि २ ऑक्टोबर  रोजी गड-किल्ले परिसर स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात सहभागी होण्यासाठी जवळच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाशी (आयटीआय) संपर्क साधावा.

आपला परिसर आणि आपल्या इतिहासाचे साक्षीदार असलेले गड किल्ले स्वच्छ आणि सुंदर ठेवले गेले पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे 350 व्या वर्षानिमित्त कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था मधील विद्यार्थ्यांद्वारे शिवरायांना एक अनोखी मानवंदना देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यातील गड किल्ल्यांची स्वच्छता मोहीम आखण्यात आली आहे. स्वच्छ आणि सुंदर महाराष्ट्रासाठी राज्यात १ ऑक्टोबर ते 15 डिसेंबर पर्यंत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. कौशल्य विकास विभागाच्या या स्वच्छता विषयक उपक्रमांसाठी सर्वांनी सहभागी होऊन व हे अभियान यशस्वी करूया असे आवाहन ही मंत्री श्री.लोढा यांनी केले आहे.

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी म्हणाले, राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत. स्थानिक आय.टी.आय.आपल्या नजीकच्या गड किल्ल्यावर व परिसर स्वच्छता मोहीम स्थानिक नियोजनानुसार स्वच्छता मोहिमेचा उपक्रम राबविणार आहे.

*****

संध्या गरवारे, वि.सं.अ.

‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..!च्या गजरात वर्षा शासकीय निवासस्थानी श्री गणेशाला निरोप

मुंबई, दि. 28 : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..! च्या गजरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी श्री गणेशाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.

 निवासस्थानाच्या प्रांगणात पर्यावरणपूरक पद्धतीने कृत्रिम जलकुंडात श्रींच्या मूर्तीचे मुख्यमंत्री श्री. शिंदे, त्यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते विधीवत विसर्जन करण्यात आले.

0000

डॉ. स्वामीनाथन यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

            मुंबई, दि. 28 : प्रख्यात कृषी शास्त्रज्ञ आणि भारताच्या हरितक्रांतीचे जनक डॉ. एम एस स्वामीनाथन यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी दुःख व्यक्त केले आहे.

            डॉ. एम एस स्वामीनाथन यांनी भारताच्या कृषी क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलून  देशाला अन्नधान्यांच्या उत्पादनात आत्मनिर्भर बनविले.  त्यांच्या निधनामुळे देशाने कृषी क्षेत्रातील एक चालते बोलते विद्यापीठ गमावले आहे, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

0000

Maha Governor condoles demise of Dr M S Swaminathan

 

            Mumbai, September  28 : Maharashtra Governor Ramesh Bais has expressed grief over the demise of the father of India’s Green Revolution Dr M S Swaminathan. In a condolence message, the Governor wrote:

“Dr M. S. Swaminathan transformed the face of Indian agriculture and was instrumental in making India ‘Atma Nirbhar’ in the production of foodgrains. In his demise, India has lost a one man Agricultural University.”

0000

विसर्जनासाठी आलेल्या गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुष्पवृष्टी

मुंबई, दि. 28 : अनंत चतुर्दशीनिमित्त गिरगाव चौपाटीवर गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी आलेल्या गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुष्पवृष्टी केली. यावेळी “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…” या घोषणांनी सगळा परिसर दुमदुमून गेला.

मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, पर्यटन मंत्री गिरीष महाजन, खासदार सुनील तटकरे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासु, अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी, उपायुक्त, सहायक आयुक्त, वरिष्ठ अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते. मंडपात आगमनापूर्वी सुवासिनींनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांचे ओवाळून औक्षण केले. तसेच महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. चहल यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

गिरगाव चौपाटीवर आज सायंकाळपासून भाविकांचा जनसागर जमला होता. दहा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायांना भावपूर्ण निरोप देण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत मुंबईत विविध ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली असून गिरगाव चौपाटी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेश मूर्तींवर पुष्पवृष्टी करून गणरायांना निरोप दिला. मान्यवरांनी यावेळी उपस्थित असलेल्या विविध देशांच्या दूतावासाच्या प्रतिनिधींची भेट घेतली.

देश विदेशातील पर्यटकांना गणेश विसर्जन सोहळ्याचे दर्शन घडविण्यासाठी पर्यटन विभागाने आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवअंतर्गत उभारलेल्या विशेष गणेश दर्शन गॅलरीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. त्याचप्रमाणे हा सोहळा अनुभवण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या विदेशी पर्यटकांशी संवाद साधला. पोलीस दलाच्या मंडपालाही भेट देऊन त्यांनी तेथून गणेश भक्तांना अभिवादन केले.

0000

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी 

सातारा दि.28 (जिमाका):सातारा शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची व पोलीस बंदोबस्ताची पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज दुचाकीवरून पाहणी केली.  

या पाहणी प्रसंगी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, नगर प्रशासन अधिकारी अभिजीत बापट यांच्यासह पोलिस विभागातील अधिकारी उपस्थित होते.

विसर्जन मिरवणुकी दरम्यान कोणताही  अनुचित प्रकार घडू नये म्हणून संपूर्ण सातारा जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.  गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांना सर्वतोपरी सहकार्य करावे, असे पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले

पालकमंत्री श्री. देसाई यांनी मोती चौक ते  नगरपालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या गणेश विसर्जन कृत्रिम तळ्यापर्यंत पाहणी केली. गणेश विसर्जनासाठी आलेल्या नागरिकांशी, निर्माण करण्यात आलेल्या सुविधेविषयी त्यांनी चर्चाही केली.

००००

शासकीय कामकाज गतिमान करणारा ‘सेवा महिना’

राज्य शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात, शासनाकडून राबविण्यात येणारे विविध उपक्रम, त्या उपक्रमांतून जनतेला लोक कल्याणकारी योजनांचा लाभ मिळाव, त्यांच्या अडी-अडचणी दूर करता याव्यात. यासाठी शासनाने गतवर्षीपासून सेवा महिना हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे. राज्य शासनाकडून हा उपक्रम सलग दुसऱ्या वर्षीही राबविण्यात येत आहे. राज्य शासनाच्या ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाच्या यशस्वीतेनंतर प्रशासन पातळीवर ‘सेवा महिना’ हा कार्यक्रम राबवत शासन जनतेप्रती कायमच बांधील असल्याचे अधोरेखित आहे.

सर्वसामान्य जनतेची कामे विहित कालावधीत पूर्ण व्हावीत, यासाठी राज्य शासनाने 2015 पासून ‘आपले सरकार सेवा पोर्टल’ सुरु केले आहे.  या पोर्टलच्या माध्यमातून राज्यातील जनतेची कामे वेळेत पूर्ण होण्याच्या प्रमाणात बरीच वाढ झाली आहे. राज्य शासनाकडून नागरिकांना मिळणाऱ्या सेवा अधिक गतिमानतेने मिळाव्यात, यासाठी राज्य शासनाने गतवर्षी 17 सप्टेंबर 2022 ते 2 ऑक्टोबर 2022 पर्यंत ‘सेवा पंधरवडा’ राबविला होता व त्याला पुढे 5 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. राज्य शासनाच्या विविध क्षेत्रीय कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देणे तसेच त्यांना योजनांचा योग्य लाभ देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. शासन आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृद्धिंगत व्हावा, यासाठी यावर्षी पुन्हा एकदा 17  सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर 2023 पर्यंत ‘सेवा महिना’ उपक्रम राबवण्यात येत आहे.

‘सेवा महिना’ उपक्रमात समाविष्ट सेवा

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नवीन शासन निर्णयानुसार मदत निधींचे लाभ देणे, वितरण करणे, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतील लाभार्थ्यांना तांत्रिक अडचणीमुळे प्रलंबित असलेल्या पात्र प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे, फेरफार नोंदीचा निपटारा करणे, पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वितरण, मालमत्ता हस्तांतरण नोंद घेणे, नव्याने नळजोडणी देणे, मालमत्ता कराची आकारणी करणे व मागणी पत्र देणे, प्रलंबित घरगुती विद्युत जोडणीस मंजुरी देणे, मालमत्ता हस्तांतरणानंतर विद्युत जोडणीमध्ये नवीन मालमत्ताधारकाचे नाव नोंदविणे, बिरसा मुंडा कृषी क्रांति योजने अंतर्गत सिंचन विहिरींकरिता अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी करून घेणे, अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना प्रलंबित वन हक्क पट्टे मंजूर करणे. (अपिल वगळून), दिव्यांग प्रमाणपत्र देणे, त्यासोबतच नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र देणे, विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे यांचा समावेश ‘सेवा महिना’ उपक्रमात करण्यात आला आहे.

या सेवा महिन्यात संकेतस्थळावर प्राप्त झालेल्या व 15 सप्टेंबर 2023 रोजी प्रलंबित असलेल्या सर्व अर्जाचा मोहीम स्वरुपात निपटारा करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी त्यांची वरील विविध प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी शासन यंत्रणेकडे पाठपुरावा करावा.

आपले सरकार सेवा पोर्टल, महावितरण पोर्टल, डी. बी. टी. पोर्टल, नागरी सेवा केंद्र, सार्वजनिक तक्रार पोर्टल, विभागाच्या स्वत:च्या संकेतस्थळावरील प्रलंबित अर्ज, सेवा महिन्यामध्ये यावर्षी नमूद केलेल्या सेवांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. आधार कार्ड सुविधा, पॅन कार्ड सुविधा, नवीन मतदार नोंदणी, जन्म मृत्यू नोंद घेणे व प्रमाणपत्र देणे, शिकाऊ चालक परवाना, रोजगार मेळावा, महिला बचत गटास परवानगी देणे, महिला बचत गटास प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून देणे, सखी किट वाटप, लसीकरण, जेष्ठ नागरिक प्रमाणपत्र प्रशिक्षित उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देणे यांचा समावेश आहे.

सेवा महिन्यामध्ये प्रामुख्याने सर्वसामान्य जनतेशी निगडीत असणाऱ्या महसूल विभाग, ग्रामविकास विभाग, नगर विकास विभाग, कृषी विभाग, आदिवासी विकास विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, ऊर्जा विभाग या विभागांकडील तसेच सर्व शासकीय विभागाकडील सेवा हक्क अधिनियमाअंतर्गत अधिसूचित केलेल्या सेवाविषयी प्रलंबित कामांचा विहित कालमर्यादेमध्ये निपटारा करण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार अंमलबजावणी करण्यासाठी सर्व संबंधित अधिकारी उपसि्थत राहणार आहेत. तसेच त्यासंबंधीच्या सूचनाही निर्गमित करण्यात आल्या आहेत. सेवा महिना कालावधीत विशेष शिबिरांचे आयोजन, त्यामधील नागरिक आणि प्रशासनाचा मोठ्या प्रमाणावर सहभाग राहणार आहे. सेवा महिन्यात जास्तीत जास्त नागरिकांना सहभागी करून घेत त्यांच्या समस्या निकाली काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

या सेवा महिन्यात सर्व विभागांच्या जनतेशी निगडीत असणाऱ्या सर्व सेवा विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देत तसेच सर्व विभागांच्या वैयक्तिक लाभाच्या सर्व योजनांचा निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट हस्तांतरीत करण्यात येणार आहे.

*****

प्रभाकर बारहाते

माहिती अधिकारी,

जिल्हा माहिती कार्यालय, परभणी

डॉ. स्वामीनाथन यांच्या निधनाने कृषी क्षेत्राची प्रचंड हानी – कृषिमंत्री धनंजय मुंडे

मुंबई दि. 28 :  सुप्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ तथा स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनचे सर्वेसर्वा डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असून, त्यांच्या निधनामुळे कृषी क्षेत्राची प्रचंड हानी झाली असल्याची खंत राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त करत डॉ. स्वामीनाथन यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

कृषी क्षेत्रात क्रांती घडवत डॉ. स्वामीनाथन यांनी गहू, तांदूळ आदी धान्याचे अधिकाधिक उत्पन्न देणारे वाण विकसित केले. त्यांच्या योगदानामुळे अन्नधान्याच्या बाबतीत देशाचे इतर देशांवरील अवलंबित्व कायमचे संपले.

विविध प्रशासकीय पदे भूषवत डॉ. स्वामीनाथन यांनी कृषी क्षेत्रात संशोधन केले. डॉ.स्वामीनाथन यांनी कृषी क्षेत्रात दिलेले योगदान देश सदैव स्मरणात ठेवेल, असेही कृषिमंत्री श्री. मुंडे यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

0000

डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

मुंबई, दि. 28 :- भारताच्या हरित क्रांतीचे जनक ज्येष्ठ शेतीतज्ज्ञ व सुप्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या निधनाने भारताला अन्नधान्यात आत्मनिर्भर करणारा महान शास्त्रज्ञ हरपला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, देशातील अल्प उत्पन्न गटातील शेतकऱ्यांसाठी तांदळाच्या विविध प्रकारच्या उच्च उत्पादन देणाऱ्या प्रजाती तयार करण्यातही त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. प्रशासनात अनेक महत्त्वाच्या पदांवर काम करतानाही त्यांनी शेतकरी हित जपण्याचे महत्त्वाचे कार्य केले. 2004 साली स्वामीनाथन यांनी राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही केलेले कार्य अतिशय महत्त्वपूर्ण आहे. 2006 मध्ये किमान आधारभूत किंमत (एमएसपी) बाबत त्यांनी काही शिफारसी केल्या होत्या, उत्पादन मूल्याच्या दीड पट हमीभाव देण्याच्या त्यांच्या शिफारसींची अंमलबजावणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2018 मध्ये केली. डॉ. स्वामीनाथन यांच्या निधनाने नव्या पिढीचा मार्गदर्शक हरपला आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटुंबियांना लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना !

0000

 

पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत गणपती विसर्जन; रथ मिरवणूकीला झाली जल्लोषात सुरूवात

नाशिक, दिनांक 28 सप्टेंबर, 2023(जिमाका वृत्तसेवा): शहरातील भद्रकाली येथील वाकडी बारव येथून गणपती विसर्जन रथ मिरवणूक  पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत ढोल, ताशांच्या निनादात व टाळ मृदृंगाच्या गजरात उत्साहात सुरूवात झाली. मिरवणूकीत अग्रस्थानी नाशिक महानगरपालिकेचा शासकीय मानाच्या गणपतीसह शहरातील विविध गणपती मंडळांनी सहभाग नोंदविला.

यावेळी आमदार प्रा.देवयानी फरांदे, नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर,नाशिक शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी आवेश पलोड, यांच्यास‍ह शहरातील विसर्जन मिरवणूकीसाठी सहभागी गणेश मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देत मिरवणूक लवकरात लवकर पुढे नेऊन निर्विघ्नपणे पार पाडावी, असे आवाहन यावेळी मंत्री दादाजी भुसे यांनी गणेश मंडळांना केले.

स्वत: ढोल वाजवत पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केला मिरवणूकीस प्रारंभ सुरवातीला महापालिकेच्या शासकीय मानाच्या गणपतीची मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजा करून आरती करण्यात आली. त्यानंतर थेट मिरवणूकीत सहभागी होवून पालकमंत्री दादाजी भुसे यांनी स्वत: ढोल वाजवून मिरवणूकीस प्रारंभ केला. ‘गणपती बाप्पा मोरया,मंगलमुर्ती मोरया’ असा जयघोष करत गणपती विसर्जन मिरवणूकीत सहभागी झालेल्या गणेशमंडळांना आणि भाविकांना पालकमंत्री दादाजी भुसे यांनी शुभेच्छा दिल्या. तसेचकायदा व सुव्यवस्थेचे पालन करून मिरवणूक शांततेत पार पाडण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री.भुसे यांनी उपस्थितांना केले.

000

ज्येष्ठ शास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

मुंबई, दि. 28 :- भारताला अन्न-धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यात ज्येष्ठ शास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ.  एम. एस. स्वामिनाथन यांचा सिंहाचा वाटा आहे. भारताच्या कपाळावरचा अन्न-धान्य टंचाईचा कलंक पुसून देशातील गरीब शेतकऱ्यांना संकरित बियाण्यांच्या माध्यमातून अधिक उत्पादनाचा मूलमंत्र त्यांनी दिला. त्यांच्या निधनाने देशाच्या पहिल्या हरितक्रांतीचा जनक हरपला आहे, अशा शोकभावना व्यक्त करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पद्मविभूषण डॉ.  एम. एस. स्वामिनाथन यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, डॉ. स्वामिनाथन यांनी भारतातील अल्पभूधारक, कमी उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांसाठी अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित वाणांचा शोध लावला. या संकरित वाणांच्या माध्यमातून त्यांनी देशाच्या पहिल्या हरितक्रांतीत अल्पभूधारक शेतकऱ्यांना देखील सहभागी करुन घेतले. तामिळनाडूमधील तंजावर जिल्ह्यात जन्मलेल्या डॉ. स्वामीनाथन यांचा सुरुवातीपासूनचं कृषी क्षेत्राकडे  विशेष ओढा होता. त्यामुळे आयुष्यात आलेल्या अनेक संधी सोडून कृषी क्षेत्रातील मूलभूत संशोधनात त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले. बटाटा, गहू, तांदूळ आणि तागावर संशोधन करुन अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित वाणांचा त्यांनी शोध लावला. केवळ संकरित वाणांची निर्मिती करून ते थांबले नाहीत तर सामान्य शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत त्यांनी संशोधन पोहोचवले.  देशाच्या पहिल्या ‘हरितक्रांती’ कार्यक्रमात त्यांनी देशातील अल्पभूधारक गरीब शेतकऱ्यालाही जोडले. या हरितक्रांतीने भारताला जगातील अन्नटंचाई असलेला देश या कलंकातून मुक्तता मिळाली. त्यांचे निधन ही भारतीय कृषी क्षेत्राची मोठी हानी आहे. देशाच्या पहिल्या हरितक्रांतीच्या प्रणेत्याला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दात  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. स्वामिनाथन यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

**

ताज्या बातम्या

अतिवृष्टी व पुरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज – विजयलक्ष्मी बिदरी

0
बाधित कुटुंबांना सुरक्षीत स्थळी हलविण्याला प्राधान्य नागपूर व वर्धा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट पुरपरिस्थिती हातळण्यासाठी आंतरराज्य समन्वय महसूल, पोलीस व जलसंपदा विभागांचा समन्वय  नागपूर, दि...

कफ परेड फेडरेशनच्यावतीने विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांचा विशेष सत्कार

0
मुंबई, दि. ९ : देशातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष म्हणून ॲड. राहुल नार्वेकर यांनी अल्पावधीतच आपल्या कार्यक्षमतेच्या जोरावर संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या...

पद्म पुरस्कारांसाठी शिफारसीसंदर्भात बैठक

0
मुंबई, दि. 9 : पद्म पुरस्कार २०२६ करिता केंद्र शासनास शिफारशी पाठविण्यासंदर्भात विधानभवनात राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीत केंद्र शासनाला पद्म पुरस्कार २०२६...

परिचारिकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक – वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ

0
मुंबई, दि. 9 : "नर्सेस या आरोग्यव्यवस्थेचा कणा असून, त्यांच्या अडचणींविषयी शासन गंभीर आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच उच्चस्तरीय बैठक घेण्यात...

येवला येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारक ‘बार्टी’ने ताब्यात घेऊन विकसित करावे – अन्न, नागरी...

0
मुंबई, दि. 9 : येवला येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारकाचे काम पूर्ण झाले आहे. या स्मारकाचा ताबा ‘बार्टी’ने घेऊन याचा उपयोग सर्वसामान्य लोकांसाठी आणि...