मंगळवार, मे 13, 2025
Home Blog Page 1133

पावसाळ्यात वटवृक्षाची लागवड करा – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नागपूरदि.23 :  दिवसेंदिवस वृक्षतोडीमुळे वृक्षांची संख्या घटत आहे. वड व पिंपळ आपल्या पौराणिक महत्वासोबतच निसर्गात जास्तीत जास्त ऑक्सीजनचा पुरवठा करतात. येत्या पावसाळयात मोठ्या प्रमाणात वटवृक्षांची  लागवड करुन वृक्षारोपण कार्यक्रमास हातभार लावा, निसर्ग रक्षणास सहकार्य करा, असे आवाहन केंद्रीय महामार्ग व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले.

वाढती लोकसंख्येमुळे वृक्षतोड वाढत आहे, अशा परिस्थितीत वृक्षांची संख्येत मोठ्या प्रमाणात घट होत आहेत. यासाठी ‘मिशन बिलीयन बनियन’ हा वटवृक्ष लागवडीचा उपक्रम आज पासून राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा प्रारंभ मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या परिसरात करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

हा उपक्रम करण कोठारी ज्वेलर्स, नागपूर यांच्या विद्यमाने राबविण्यात आला. यावेळी  उपक्रमाचे स्वयंसेवक, सामाजिक कार्यकर्ते, महिला व नागरिक उपस्थित होते. नागपुरातील प्रत्येक कुटुंबाने एक झाड लावावे, यापूर्वी नागपुरातील प्रत्येकाने आपल्या घरात संत्र्याचे झाड लावावे या आवानालाही अनेकांनी प्रतिसाद दिला होता. वडवृक्ष लावणीच्या या अभियानात सहभागी व्हावे, निसर्गाच्या हिरवेपण जपण्याची जबाबदारी, आपणा सर्वांची आहे त्यासाठी सगळ्यांनी पुढे यावे असेही त्यांनी यावेळी सांगितले. वृक्ष लागवडीच्या अभियानास त्यांनी शुभेच्छा दिल्या.

०००

सरकार खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी – कृषिमंत्री धनंजय मुंडे

बीड दि. 23  ( जिमाका ) :- कमी पावसात दमट हवामानामुळे गोगलगायीची समस्या निर्माण झाली आहे यामुळे बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, याचे लवकरात लवकर पंचनामे करावे व नियमानुसार पुढील प्रक्रिया करावी, असे निर्देश देत शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे, असे प्रतिपादन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज परळी येथे केले.

कृषिमंत्री मुंडे यांनी आज परळी तालुक्यातील वाघबेट आणि वेळब गावात प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली व शेतकऱ्यांची संवाद साधला यावेळी बीड जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या समवेत पाहणीस हजर होत्या.

याबाबतच्या उपाययोजना कशाप्रकारे करता येतील आणि नुकसान झालेल्या भागातील पंचनामे लवकर होतील या संदर्भात कृषीमंत्री यांनी दूरध्वनीद्वारे मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांच्याशी संपर्क साधला व त्या स्वरूपाचे प्रस्ताव आजच कृषी विभागाने तयार करून मंत्रालयास पाठवावे असे निर्देश स्थानिक अधिकाऱ्यांना दिले.

याआधी देखील बीड जिल्ह्याचा काही भाग तसेच उस्मानाबाद आणि नांदेडमध्ये अशा प्रकारचा गोगलगायींचा प्रादूर्भाव झाला होता त्यावेळी शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून त्यांना शासन स्तरावरून मदत करण्यात आली होती त्याच पद्धतीने याबाबतीत काम करावे लागेल असे श्री. मुंडे म्हणाले.

शेतकऱ्यांना या संकटाचा मुकाबला करण्यासाठी तातडीने स्थानिक स्तरावर औषधी खरेदी करण्यासंदर्भात यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. नियोजन निधी मधील कृषी विभागाच्या रकमेतून ही खरेदी शक्य आहे त्यामुळे शेतकऱ्यांना त्वरित दिलासा मिळण्याच्या दृष्टिकोनातून अधिकाऱ्यांनी काम करावे असे कृषिमंत्री यावेळी म्हणाले.

…तर कारवाई करू

पीक विम्यासाठी शेतकऱ्यांकडून ज्यादा पैसे घेतले जात आहेत अशा स्वरूपाची लिखित तक्रार आल्यास त्या संदर्भात निश्चितपणे कार्यवाही करून व दोषी व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल असे कृषिमंत्र्यांनी पत्रकारांशी यावेळी बोलताना सांगितले.

यंदा पावसाने ओढ दिली आणि पावसाला विलंब झालेला आहे तसेच मागील वर्षाच्या तुलने पावसाचे प्रमाण अत्यल्प असे आहे, मात्र 25 तारखेला नंतर त्यात फरक पडेल अशी शक्यता असल्याने येणाऱ्या काळात पाऊस सुरू होईल असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात यावेळी सांगितले.

या दौऱ्यात कृषी विभागाचे तसेच महसूल विभागाचे अधिकारी सामील झाले होते.

आज दौऱ्याला प्रारंभ करण्यापूर्वी कृषिमंत्री मुंडे यांनी येथील ज्योतिर्लिंग वैद्यनाथाचे दर्शन घेतले.

संवेदनशील कृषी मंत्री

बीड जिल्ह्यात झालेला कमी पाऊस आणि शेतकऱ्यांच्या अडचणी तसेच नुकत्याच घडलेल्या इर्शाळगड येथील दुर्घटनेमुळे सर्वांचे स्वागत नाकारत स्वागत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आपली संवेदनशीलता दाखवून दिली.

नुकसानग्रस्तांना सानुग्रह अनुदान व धान्याचे तातडीने वाटप करा – मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील

यवतमाळ, दि.23 (जिमाका) : गेल्या दोन दिवस झालेल्या सततधार पावसामुळे सर्वत्र मोठे नुकसान झाले आहे. शेतपिकांसह घरे, जनावरे, शासकीय मालमत्तेचीही हाणी झाली. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना तातडीने 5 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान व धान्याचे वाटप करा. नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करा, असे निर्देश मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात श्री.पाटील यांनी जिल्ह्याच्या पुरपरिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला पालकमंत्री संजय राठोड, आ.मदन येरावार, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलिस अधीक्षक पवन बनसोड, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिह दुबे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात परवा प्रचंड पाऊस झाला. बहुतांश मंडळामध्ये अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेती व घराचे देखील नुकसान झाले. नुकसानग्रस्तांना योग्य मोबदला मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वे तातडीने करण्यात यावे. एकही नुकसानग्रस्त सुटणार नाही याची दक्षता घ्या. शेतपिकांचे नुकसान झालेच शिवाय शेतजमिनी देखील खरडून गेल्या, त्याचा स्वतंत्र अहवाल सादर करावा. तातडीची मदत म्हणून शासनाच्या धोरणाप्रमाणे नुकसानग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी 5 हजाराचे सानुग्रह अनुदान व धान्य दोन दिवसात वाटप करा. धान्य देत असतांना धान्यासोबत अन्य आवश्यक खाद्य पदार्थाची किट सामाजिक संस्थांच्या मदतीने देता येईल तर तसा प्रयत्न करावा, असे श्री.पाटील म्हणाले.

शेती व शेतपिकांसह शासकीय मालमत्तेचे जे नुकसान झाले आहे, त्याचे देखील सर्वेक्षण करण्यात यावे. या नुकसानीसाठी जिल्ह्याला जास्तीत जास्त निधी कसा उपलब्ध करून देता येतील यासाठी प्रयत्न करू. स्थलांतरीत केलेल्या नागरिकांना निवारागृहात भोजनासह आवश्यक सुविधा पुरविण्यात याव्या. कृषि, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपआपल्या मालमत्तांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करून अहवाल मदत व पुनर्वसन विभागास सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

अतिक्रमीत जागेवर वास्तव्य करणाऱ्या अनेक गोरगरिबांची घरे पडली आहे. अशा अतिक्रमीत नुकसानग्रस्तांना देखील मदत मिळणे आवश्यक असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी बैठकीत सांगितले. त्यांना कशी मदत करता येईल यासाठी निश्चितच प्रयत्न करू असे श्री.पाटील यांनी सांगितले. खरडून गेलेल्या जमीनीचा स्वतंत्र अहवाल करावा, असे निर्देश बैठकीत पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले. आ.मदन येरावार यांनी यवतमाळ शहरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना सानुग्रह अनुदान लगेच वाटप करणे आवश्यक आहे, असे सांगितले.

सुरुवातीस जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्याच्या पुरपरिस्थितीची माहिती दिली. सततधारमुळे 1 हजार 426 घरांची पडझड झाली आहे. त्यात अंशत: 1 हजार 189 तर पुर्णत: पडझड झालेल्या 237 घरांचा समावेश आहे. जवळजवळ 280 नागरिकांना बचाव पथकांद्वारे पुरातून सुरक्षित बाहेर काढण्यात आले. 6 हजार 275 नागरिकांना स्थलांतरीत करून तात्पुरत्या निवारागृहात त्यांनी निवास व भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. एकून तीन व्यक्तींना मृत्यू झाला असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

बचाव पथकाचे दोनही मंत्र्यांकडून कौतूक

काल जिल्ह्यात सर्वत्र पुरस्थिती होती. अडकलेल्यांना पुरातून सुरक्षित बाहेर काढणे शोध व बचाव पथकांसमोर मोठे आवाहन होते. ठिकठिकाणी जिल्हा व तालुका पथकांनी उत्तम कामगिरी करत तब्बल 280 नागरिकांनी सुरक्षित बाहेर काढले. अनेकांचे सुरक्षेच्यादृष्टीने स्थलांतरण करण्यात आले. त्यामुळे बचाव पथकातील सदस्यांचे पालकमंत्री संजय राठोड, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी कौतूक केले.

दुर्गम भागातील पावसाळी आपत्तीचे समन्वयाने नियोजन करा – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार दि २३ जुलै २०२३ (जिमाका वृत्त) : नंदुरबार जिल्ह्याचे बहुतांश क्षेत्र हे डोंगरी व दुर्गम असून पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे आरोग्य,दळणवळणासह दैनंदिन व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेवून सर्व विभागांनी पावसाळी आपत्तीचे समन्वयाने नियोजन करावे. तसेच अत्यावश्यक सेवांसह सर्व विभागांनी सतर्कता बाळगण्याच्या सूचना राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिल्या आहेत.

ते जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ‘दिशा’ समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी खासदार डॉ.हिना गावित होत्या. जि.प. अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की, पदाधिकारी व विविध यंत्रणांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले, खतांचा पुरवठा, गरज यांचा वेळोवेळी आढावा घेवून कुठेही खत टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता संबंधित यंत्रणांनी घ्यावी.धरणांमधील पाणी साठा व विसर्गाचे नियोजन करून नदी व धरण काठावरील गावे, नागरिकांना वेळोवेळी सतर्कतेच्या सूचना देण्यात याव्यात. कुठेही जीवित व वित्त हानी होणार नाही याची काळजी घ्यावी. पूलांची डागडूजी व दुरूस्तीची कामे तात्काळ पूर्ण करावित. रूग्णवाहिका सुस्थितीत ठेवण्यासह वैद्यकीय अधिकारी, अंगणवाडी सेविक,शिक्षक तसेच ग्रामीण व दुर्गम भागातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी मुख्यालयीच थांबवे. जलजीवन मिशनच्या लाभापासून एकही पाडा आणि गाव वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी. जलयुक्त शिवाराची कामे करताना ग्रामसभा घ्याव्यात असेही यावेळी पालकमंत्री डॉ. गावित यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी करावी

केंद्र सरकार पुरस्कृत योजनांचा सर्व्हे करताना एकही गाव, नागरिक सुटणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच या योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी करण्याच्या सूचना देताना कुठल्याही योजनेचा लाभ देताना स्थानिक ग्रामसभा व लोकप्रतिनिधींच्या सूचनांचाही आदर करण्याच्या सूचना यावेळी खासदार डॉ. हिना गावित यांनी दिल्या आहेत.

000

लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

मुंबई, दि.२३ : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती आज विधान भवनात साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव (१) (कार्यभार) जितेंद्र भोळे यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळाचे उप सचिव (विधी) श्रीमती सायली कांबळी, अवर सचिव श्री.विजय कोमटवार यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही लोकमान्य टिळक यांच्या अर्धपुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन  केले.

000

राजधानीत लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी

नवी दिल्ली दि. 23 : भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची  जयंती आज महाराष्ट्र सदन येथे साजरी करण्यात आली.

कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांनी  प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी  उपस्थित महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी  व  कर्मचाऱ्यांनी  लोकमान्य टिळकांच्या  प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

000

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन

मुंबईदि.२३ : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुंबई येथील शासकीय निवासस्थानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

मुंबई, दि. २३ : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी वर्षा शासकीय निवासस्थानी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.

‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, असे ब्रिटिशांना ठणकावून सांगताना लोकमान्य टिळक यांनी तरुणांच्या मनात स्वातंत्र्य संग्रामाचे चैतन्य निर्माण केले. ते तत्त्वचिंतक, पत्रकार आणि प्रखर राष्ट्रवादी होते. त्यांच्या परखड लेखन आणि वाणीने ब्रिटिश सत्तेला हादरे बसले. भारतातील सामाजिक – शैक्षणिक आणि सांस्कृतिक अशा विविध स्तरांवरील ऐक्यासाठी त्यांनी अथक परिश्रम केले. अशा या भारत मातेच्या सुपुत्राला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन,’ असेही मुख्यमंत्र्यांनी संदेशात म्हटले आहे.

000

तानसा धरण परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा

ठाणे, दि. २२ (जिमाका) : ठाणे जिल्ह्यात असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तानसा धरण परिसरात सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे तानसा धरण भरून वाहण्याची शक्यता आहे, त्यामुळे धरणाखालील व नदीच्या परिसरातील गावांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

तानसा धरण ओसंडून वाहण्याची पातळी १२८.६३ मीटर टीएसडी इतकी आहे. आज ही पातळी १२६.६०२ मीटर टीएसडी हुन जास्त झाली आहे. त्यामुळे लवकरच धरण ओसंडून वाहण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने तानसा धरणाखालील व नदीच्या परिसरातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी आणि पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
धरणातून विसर्ग होत असताना ग्रामस्थांनी काळजी घ्यावी. तसेच महसूल व पोलीस प्रशासनाने दक्ष राहावे, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सूचना देण्यात आल्या आहेत.

000

गृहनिर्माण संस्थांमध्ये १०० टक्के मतदार नोंदणीसाठी सदस्यांनी पुढे यावे – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

पुणे, दि. २२ : निवडणूक प्रक्रियेविषयी असणारी उदासीनता दूर करण्यासाठी गृहनिर्माण संस्थांमधील सदस्यांनी सहकार्य करावे आणि पुणे जिल्हा मतदान प्रक्रिया व हक्कांबद्दल जागरूक आहे हे दाखवून द्यावे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी कर्तव्यभावनेने सुटीच्या दिवशी आपल्याकडे मतदार नोंदणीसाठी येत असताना त्यांना प्रतिसाद देऊन १०० टक्के मतदार नोंदणी करून अभियान यशस्वी करावे, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले.

हिंजवडी येथील ब्लू रिज गृहनिर्माण संस्था येथे जिल्ह्यातील गृहनिर्माण संस्थांमध्ये वास्तव्यास असणाऱ्या मतदारांची १०० टक्के मतदार नोंदणी करण्यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे आयोजित ‘गृहनिर्माण सोसायटी मतदार नोंदणी अभियाना’च्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे, उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार रणजित भोसले, ब्लू रिज गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन राजेंद्र कुमार, सचिव पांडुरंग पाटील आदी उपस्थित होते.

मुख्य निवडणूक अधिकारी श्री.देशपांडे म्हणाले, देश जेव्हा प्रतिकूल परिस्थितीतून किंवा वेगळ्या स्थित्यंतरातून जात असताना मतदारांची भूमिका महत्त्वाची असते. लोकशाही प्रक्रियेत सर्वसमावेशकता आणि मतदारांचा सहभाग असल्यास लोकशाही यशस्वी ठरते. त्यासाठी मतदार याद्यांचे शुद्धीकरण आवश्यक आहे. देशाचे भवितव्य तरुणांच्या हातात असताना केवळ १३ टक्के युवा मतदारांची नोंदणी झाली आहे. हे चित्र बदलण्याची गरज आहे.

मतदारांनी निवडणूक आयोगाचे ॲप आणि संकेतस्थळाचा वापर करून मतदार यादीतील नाव तपासून घ्यावे. २१ ऑगस्ट पर्यंत चालणाऱ्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाचा लाभ घेत नागरिकांनी या प्रक्रियेत सहभाग घ्यावा. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हा निवडणूक प्रक्रियेचा कणा आहे त्यांच्या प्रयत्नांना गृहनिर्माण संस्थांच्या सदस्यांनी साथ द्यावी आणि राज्य व देशाला मार्गदर्शक काम पुणे जिल्ह्याने करून दाखवावे, असेही आवाहन त्यांनी केले.

भारतातील पहिली निवडणूक १९५२ मध्ये घेण्यात आली. त्यावेळी देशात ही लोकशाही पद्धत टिकणार नाही असे भाकीत करण्यात आले. मात्र हे खोटे ठरवत भारतीय नागरिकांनी एकत्रितपणे निवडणूक प्रक्रिया यशस्वी करून दाखवली. देशातील लोकशाही प्रक्रियेच्या यशस्वी प्रवासावर आधारित ५ भागांची निवडणूक प्रक्रियेचे यश सांगणारी मालिका लवकरच दूरचित्रवाणी वाहिनीवर प्रदर्शित करण्यात येणार आहे, असेही श्री.देशपांडे म्हणाले.

जिल्हाधिकारी डॉ.देशमुख म्हणाले, भारतीय लोकशाही बळकट करण्यात भारत निवडणूक आयोगाची भूमिका महत्त्वाची आहे. आयोगाने निवडणूक प्रक्रियेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून अनेक सुधारणा केल्या आहेत. निवडणूक पारदर्शकपणे घेण्यासोबत आता सर्वसमावेशक मतदार यादी तयार करण्यावर तसेच निवडणुका मतदारांच्यादृष्टीने सुविधाजनक होतील यावर भर देण्यात येत आहे. मतदार याद्यांचे शुद्धीकरण करण्यात येत आहे.

पुणे जिल्ह्याच्या मतदार यादीत मोठ्या संख्येने युवा मतदारांना अद्याप नोंदणी करण्याची संधी आहे. निवडणूक प्रक्रियेत सुशिक्षित नागरिकांची भूमिका मार्गदर्शक असावी आणि त्यांनी मतदान प्रक्रियेत पुढाकार घेण्याची गरज आहे. त्यादृष्टीने मतदार नोंदणीकरिता नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी गृहनिर्माण संस्थांमध्ये हे अभियान राबविण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

संस्थेचे सचिव श्री.पाटील यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. प्रशासनाने मतदार नोंदणीसाठी घेतलेला पुढाकार स्तुत्य असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.कचरे यांनी केले. मतदार नोंदणीसाठी ब्लु रिज सोसायटीने चांगले सहकार्य केल्याचे सांगून त्यांनी नागरिकांना मतदार नोंदणी करण्याचे आवाहन केले.

मुख्य निवडणूक अधिकारी श्री.देशपांडे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात छायाचित्र मतदार ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले आणि मतदार नोंदणी अर्ज स्वीकारून अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. आज जिल्हाभरातील १ हजार १६८ गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

000

ताज्या बातम्या

दहावी परीक्षेच्या निकालात मुलींची वाढती टक्केवारी समाधानकारक

0
मुंबई, दि. १३: दहावीच्या परीक्षेत मुलींच्या यशाची वाढती टक्केवारी ही समाजातील सकारात्मक बदलाचे प्रतीक आहे. शिक्षणाच्या माध्यमातून मुली आत्मनिर्भर बनत असून, हे यश त्यांच्या...

पीएम जनमन, धरती आबा सारख्या योजनांमधून प्रत्येक आदिवासी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र...

0
वर्धा, दि.12 (जिमाका) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी पीएम जनमन, धरती आबा सारख्या अनेक योजना नव्याने सुरु केल्या. राज्यात या योजनांच्या...

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाच्या माध्यमातून नवीन पिढीला प्रेरणा मिळेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
वर्धा दि. 12 (जिमाका) : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वातंत्र्याच्या लढ्याला एक वेगळी कलाटणी दिली. सावरकरांनी स्वातंत्र्यवीर म्हणून तर काम केलेच सोबतच अनेक क्रांतीकारक तयार...

‘कबड्डी’तून खेळाडूंचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
वर्धा, दि.१२ (जिमाका)  : ग्रामीण भागातील तरुणाईला कबड्डी या खेळाची विशेष आवड आहे. अतिशय कमी गुंतवणुकीत हा खेळ खेळता येतो. या खेळामध्ये प्रचंड चपळाई,...

येत्या काळात आरोग्य क्षेत्रातील सर्वच विभागांसाठी पुरस्कार सुरु करणार – सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

0
कोल्हापूर, दि. १२ मे : ‘ज्याप्रमाणे परिचारिकांना फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्काराने सन्मानित केले जाते, त्याचप्रमाणे सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील इतरही विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या उत्कृष्ट...