गुरूवार, जुलै 10, 2025
Home Blog Page 1132

आशेवाडी गाव स्वच्छतेचा आदर्शवत अग्रदूत; स्वच्छता अभियानात नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा

नाशिक, दि. स्वच्छता अभियान ही प्रत्येकाची जबाबदारी असून यात नागरिकांचा स्वयंस्फूर्तीने सहभाग महत्त्वाचा आहे. ‘आशेवाडी’ हे गाव स्वच्छतेचा आदर्शवत अग्रदूत असून या गावातील स्वच्छतेचे अनुकरण इतर गावांनीही करावे. असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले.

आज दिंडोरी तालुक्यातील रामशेज किल्ला, आशेवाडी येथे आयोजित ‘स्वच्छता हिच सेवा’ कार्यक्रमात केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक पाटील, दिंडोरीचे तहसिलदार पंकज पवार,  गटविकास अधिकारी नम्रता जगताप, बाल विकास प्रकल्प अधिकारी विलास कवळे, आशेवाडीचे सरपंच साहेबराव माळेकर, उपसरपंच सौ. लताबाई कापसे, माजी जि.प सदस्या मनिषा बोडके, दिंडोरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक शाम बोडके यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, विविध गावचे लोकप्रतिनिधी, विविध संस्थांचे पदाधिकारी, आशेवाडी प्राथमिक विद्यालयाचे विद्यार्थी, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री डॉ.भारती पवार यावेळी म्हणाल्या, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आज स्वच्छता हिच सेवा अभियान देशभरात राबविले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून एक तास स्वच्छतेसाठी या जिल्हास्तरीय उपक्रमाची सुरवात आज रामशेज किल्ला आशेवाडी येथून  ग्रामस्थ व विद्यार्थ्यांसमवेत करण्यात आली. आरोग्यदायी जीवन आणि गावाचा विकास साधायचा असेल तर त्याचे मूळ स्वच्छता आहे. आपल्या घरासोबतच आपला परिसर व आपले गाव स्वच्छ राहिल यादृष्टीने नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येवून इतरांनाही प्रेरणा मिळेल असे काम केले पाहिजे. आपली संस्कृतीही आपल्याला स्वच्छतेची शिकवण देते. आज आशेवाडी गावातील स्वच्छता हि कौतुकास्पद आहे परंतु गावकऱ्यांनी भविष्यातही हे सातत्य सदैव ठेवणे गरजेचे आहे. यासाठी गावातून स्वच्छतेसाठी फेरीचे आयोजन करून जनजागृती झाली पाहिजे. आशेवाडी गावाला रामशेज किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा आहे.

हा वारसा पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने वनविभागाशी चर्चा करून सकारात्मक प्रयत्न केला जाईल. परंतु यात सर्वांचा सहभाग व प्रयत्न आवश्यक आहे. असेही राज्यमंत्री डॉ. पवार यांनी यावेळी सांगितले.

राज्यमंत्री डॉ. भारती पवार पुढे म्हणाल्या, स्वच्छतेचा अर्थ केवळ परिसर स्वच्छता हा नाही तर यात आपण आपले चांगले विचार, उत्तम आरोग्य, आपली दिनचर्येतील सूसुत्रता आणने हे अभिप्रेत आहे. कार्यालयात काम करतांनाही आपण योग्य नियोजन केले तर कामे अपूर्ण न राहता वेळेत पूर्ण होतील. उत्तम आरोग्य ही दिर्घ आयुष्याची गुरूकिल्ली असून प्रत्येकाने आपल्या दिनचर्येत योगाभ्यास व  व्यायाम यांचा समावेश करणे गरजेचे आहे. असेही राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगून आशेवाडीच्या गावकऱ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

आशेवाडी मनात रमणार गाव

आशेवाडी गाव निसर्गरम्य असून मनात रमणार गाव आहे. अशा शब्दात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आशेवाडी गावाचे कौतुक केले. ते पुढे म्हणाले, आज स्वच्छता हीच सेवा या अभियानाची सुरवात रामशेज किल्ला आशेवाडी येथून झाली. या गावाला प्रथमच भेट दिली असून येथील ऐतिहासिक वारसा व निसर्गरम्य वातावरण मनाला भावून गेले. प्रत्येक घरात स्वच्छता ठेवली तर निश्चितच गावही स्वच्छ होईल यात शंका नाही परंतु गोळा केलेल्या कचऱ्याची विल्हेवाटही योग्य पद्धतीने लावणे तितकेच गरजेचे आहे. गावाच्या विकासासाठी गावकऱ्यांनी केलेल्या मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने शासनस्तवर प्रयत्न केले जातील असे बोलून जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी गावकऱ्यांना अश्वासित केले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी व संत गाडेगाबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. आशेवाडी प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनींनी स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिपक पाटील यांनी केले. यावेळी माजी जिप सदस्या मनिषा बोडके, सरपंच साहेबराव माळेकर यांनी गावक-यांच्यावतीने मनोगत व्यक्त केले.

स्वच्छता हिच सेवा अभियानाचा प्रारंभ राजशेज किल्ल्याच्या प्रवेशद्वारापासून करण्यात आली. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तसेच किल्ल्याच्या पायथ्याशी स्वच्छता करण्यात आली या मोहिमेत शासकीय अधिकारी, आशेवाडी प्राथमिक विद्यालयातील विद्याथी तसेच गावकरी यांनी सहभाग घेतला. यावेळी ‘स्वच्छ भारत निरोगी भारत’, ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’अशा घोषणाही देण्यात आल्या.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुभाष पाटील सर यांनी तर उपस्थितांचे आभार बाल विकास प्रकल्प अधिकारी विलास कवळे यांनी मानले.

स्वच्छतेसाठी ‘एक तारीख एक तास’ उपक्रमात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे श्रमदान

पुणे, दि. १: स्वच्छता हीच सेवा या अभियानांतर्गत स्वच्छतेसाठी ‘एक तारीख एक तास’ या उपक्रमात पुणे महानगरपालिकेच्यावतीने आयोजित वॉकेथॉनमध्ये सहभागी होऊन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी हाती झाडू घेत श्रमदान केले. स्वच्छता ही लोकचळवळ झाली असून स्वच्छतेबाबतची आपल्या देशाविषयीची प्रतिमा बदलत आहे, असे प्रतिपादन मंत्री श्री. पाटील यांनी केले.

यावेळी पुणे महानगर पालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, विकास ढाकणे, घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त संदीप कदम यांच्यासह महानगरपालिकेचे विविध विभागप्रमुख उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे अनेक विषयांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना जोडून घेत त्याची लोकचळवळ निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत. गेल्या साडेनऊ वर्षांत सर्वसामान्यांना स्वच्छता मोहिमेशी जोडत आपल्या देशाची स्वच्छतेबाबतची प्रतिमा बदलली आहे.

आज शहरात साडेतीनशेपेक्षा जास्त ठिकाणी स्वच्छतेसाठी उपक्रम राबविण्यात आला. यात दीड लाखाहून अधिक लोक सहभागी झाले आहेत हे या अभियानाचे यश आहे. सर्व विद्यापीठे, महाविद्यालये, शाळा, विविध संस्था, कारखाने, स्वयंसेवी संस्था यात सहभागी झाले असून लोकसहभागाचे मोठे यश अभियानाला लाभले आहे. यातूनच स्वच्छतेची सवय निर्माण होण्यास मदत होते, असेही ते म्हणाले.

‘स्वच्छता हीच सेवा’ उपक्रमाअंतर्गत पुणे महापालिकेच्या वतीने आयोजित वॉकेथॉनमध्ये महापालिका परिसर, शनिवार वाडा, भिडे पूल आदी ठिकाणी पालकमंत्री यांनी सर्वांसोबत सहभागी होत स्वच्छता केली. यावेळी त्यांनी उपस्थितांना स्वच्छताविषयक शपथ दिली तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांशीही संवाद साधला.

स्वच्छता हे राष्ट्रीय आचरण बनले; स्वच्छ भारत अभियान घराघरात पोचले – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार, दि. 1  नऊ वर्षांपूर्वी, 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेच्या जागरुकतेविषयी नारा दिला होता. त्याला प्रतिसाद देत समाजातल्या सर्व स्तरातील नागरिकांनी स्वच्छ भारतासाठी जबाबदारी घेण्यास प्रचंड उत्साह दाखवला. परिणामी, स्वच्छता हे राष्ट्रीय आचरण बनले आणि स्वच्छ भारत अभियान घराघरात पोचले, असे प्रतिपादन आज राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार यांनी केले आहे.

ते आज नंदुरबार शहरातील अंधारे चौकात नंदुरबार नगरपरिषदेच्या वतीने आयोजित  ‘स्वच्छतेसाठी एक तारीख- एक तास’ या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी खासदार डॉ. हिना गावित, नंदुरबार नगर परिषदेचे मुख्याधिकारी अमोल बागूल, नागरिक अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले, गांधी जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी देशवासियांना कृती करण्याचे अनोखे आवाहन केले आहे. ‘मन की बात’च्या 105 व्या भागात पंतप्रधानांनी आज (1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता ) स्वच्छतेसाठी 1 तास श्रमदान करण्याचे आवाहन केले. यावेळी बापू जयंतीच्या पूर्वसंध्येला देशातील सर्व नागरिक एकत्रितपणे त्यांना ‘स्वच्छांजली’ अर्पण करतील. ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान या विषयावर बोलताना पालकमंत्री म्हणाले, सर्वांनी वेळ काढून स्वच्छतेच्या या मोहिमेत सहभागी होऊन मदत करावी. तुम्ही या स्वच्छता मोहिमेत तुमच्या गल्लीत किंवा परिसरात किंवा उद्यान, नदी, तलाव किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी देखील सहभागी होऊ शकता.

स्वच्छता पंधरवड्याच्या ‘स्वच्छता ही सेवा’ अंतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनाच्या आदल्या दिवशी (दि. 1 ऑक्टोबरला ) स्वच्छतेसाठी ‘एक तारीख, एक तास’ हा उपक्रम राबविण्यात येत  आहे.  या अभियानासाठी मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देतो. वर्षभरापूर्वी राज्यात स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियान-2 चा शुभारंभ केला. महाराष्ट्र कचरामुक्त आणि स्वच्छ असावा हे आपले उद्दिष्ट आहे. स्वच्छतेच्या मंत्राची पंरपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. संत गाडगेबाबांनी हाती झाडू घेऊन स्वच्छतेचे धडे दिले आहेत. केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालयाने 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2023 या काळात स्वच्छता पंधरवडा राबवायला सुरुवात केली आहे. संपूर्ण जिल्ह्यात हा उपक्रम यशस्वी करायचा असून त्यासाठी त्याचे नियोजन करा, असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत हद्दीच्या बाहेरच्या भागात नेहमी कचऱ्याचे ढीग, डेब्रिज टाकलेले असते. अशा महानगरपालिका हद्दीबाहेरच्या जागा शोधून प्रशासनाने स्वच्छता मोहीम राबवावी. त्यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी आढावा घेण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

अभियानांतर्गत सफाई मित्र, सुरक्षा शिबिरे आयोजित करून स्वच्छतेची गरज त्याची फायदे याचे महत्व पटवून द्यावे. एक तासाचे हे अभियान प्रतिकात्मक असून श्रमदानासाठी नागरिकांना सहभागी करून घ्यावे. पण, आपल्याला प्रशासन म्हणून स्वच्छतेचे काम दररोजच करायचे आहे, असे सांगत अभियानानंतर 15 डिसेंबर 2023 पर्यंत मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा आणि मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड स्पर्धा ही सुद्धा मोठ्या प्रमाणावर यशस्वी करावी, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. हे अभियान शंभर टक्के यशस्वी करून राज्यात जिल्ह्याचा पहिला  क्रमांक  कायम राहण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणेने ‘मिशन मोड’वर काम करावे, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

यावेळी अंधारे चौकातील स्वच्छता अभियानात पालकमंत्र्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन ‘एक तारीख, एक तास’ मोहिमेचा शुभारंभ केला.

असे आहे एक तारीख,एक तासअभियान

या महास्वच्छता मोहिमेद्वारे सर्व स्तरातील नागरिकांना सार्वजनिक ठिकाणे जसे की बाजारपेठ, रेल्वे मार्ग, पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे इत्यादी ठिकाणी स्वच्छतेच्या प्रत्यक्ष उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. प्रत्येक शहर, ग्रामपंचायत, नागरी विमान वाहतूक, रेल्वे,माहिती आणि तंत्रज्ञान यासारख्या शासनाच्या सर्व विभागांना,  सार्वजनिक संस्था नागरिकांच्या नेतृत्वाखाली स्वच्छतेच्या कार्यक्रमांसाठी सुविधा उपलब्ध करून देतील.सामाजिक संस्था,रहिवासी कल्याण संघटना, खाजगी उपक्रम, स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजिन केलेल्या असलेल्या संस्थांना पोर्टलच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्था,जिल्हा प्रशासन ऑनलाइन स्वच्छता ही सेवा उपक्रमा संबंधी https://swachhatahiseva.com/ या खास निर्माण करण्यात आलेल्या संकेतस्थळावर सार्वजनिक माहितीसाठी स्वच्छता कार्यक्रम उपलब्ध आहेत. स्वच्छतेच्या ठिकाणी नागरिक फोटो काढू शकतात आणि हे फोटो पोर्टलवर अपलोडही करू शकतात. या पोर्टलमध्ये नागरिकांना, मोहिमेला वाहून घेतलेल्या लोकांना या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आणि स्वच्छता दूत बनून लोकांच्या चळवळीचे नेतृत्व करण्यासाठी आमंत्रित करणारा विभाग देखील आहे.

दोन ऑक्‍टोबरपर्यंत साजरा होणारा स्वच्छता पंधरवडा हा-स्वच्छता ही सेवा 2023 या उपक्रमाच्या स्वच्छता मोहिमेचा एक भाग आहे. जुन्या इमारतींचे जीर्णोद्धार, जलकुंभ, घाट, भिंती रंगविणे, नुक्कडनाटके स्पर्धा आयोजित करणे अशा विविध स्वच्छता उपक्रमात नागरिक सहभागी होत आहेत. हा पंधरवडा सुरू झाल्यापासून, या निमित्ताने आयोजित विविध कार्यक्रमात आतापर्यंत 6 कोटीहून अधिक नागरिक सहभागी झाले आहेत.

सुंदर महाराष्ट्राच्या दिशेने ठोस पाऊल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि.१ : आज गिरगाव चौपाटी येथे सागराच्या साक्षीने सुंदर महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल टाकण्यात आले. उत्साही नागरिक, विद्यार्थी यांच्या जोडीने, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मान्यवरांनी स्वत: हातात झाडू घेऊन श्रमदान केले आणि स्वच्छतेसाठी ‘एक तारीख एक तास’ या राज्यस्तरीय मोहिमेची सुरुवात केली. सुंदर महाराष्ट्र, सुंदर भारत घडविण्यासाठी आपण टाकलेले हे मोठे पाऊल असून प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी यांच्यामुळे आज स्वच्छतेची ही लोकचळवळ झाली आहे असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. राज्यात शहरी आणि ग्रामीण मिळून ७२ हजारांपेक्षा जास्त ठिकाणी स्वच्छतेची ही मोहीम पार पडली असून त्याबद्धल मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.

उद्या (२ ऑक्टो) रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यभर नागरिकांच्या श्रमदानाने स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. नगरविकास विभागाच्या वतीने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले. गिरगाव चौपाटी येथे शुभारंभासाठी मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनोज सौनिक, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव के एच गोविंद राज, ज्येष्ठ क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर, इस्रायलचे कौन्सिल जनरल श्री कोबी, कोस्टगार्ड महासंचालक कैलाश नेगी, अभिनेते नील नितीन मुकेश, पद्मिनी कोल्हापुरे, जुही चावला, सुबोध भावे आदींची उपस्थिती होती.

या ऐतिहासिक मोहिमेत सर्वांनी घेतलेल्या उत्स्फूर्त सहभागासाठी धन्यवाद देताना मुख्यमंत्री म्हणाले की, प्रधानमंत्र्यांनी जेव्हा पहिल्यांदा लाल किल्ल्यावरून ‘स्वच्छ भारत’ची घोषणा केली आणि स्वत: झाडू घेऊन रस्त्यावर उतरले, तेव्हा अनेकांनी त्यावर टीका केली आणि खिल्ली उडविण्याचा प्रयत्न केला. पण सगळी जनता जेव्हा या अभियानात उतरली आणि जो इतिहास त्यानंतर रचला तो सगळ्या जगाने पाहिला आणि टीकाकारांची तोंडं बंद झाली. प्रधानमंत्री  म्हणतात त्याप्रमाणे, स्वच्छता हा काही केवळ एक दिवस आणि कुणीतरी एकानेच राबविण्याचा कार्यक्रम नाही, तर ती नेहमीसाठीची आपली जीवनशैली असली पाहिजे.

स्वच्छता फक्त कागदावर नको

स्वच्छता हीच सेवा हे अभियान महत्त्वाचं आहे. ते कागदावर ठेवू नका. प्रत्यक्ष फिल्डवर काम दिसलं पाहिजे. आजचा दिवस झाला की संपलं, असं नाही. आज स्वच्छता आणि उद्या कचरा असं होता कामा नये. असेही मुख्यमंत्री म्हणाले. स्वच्छतेत महाराष्ट्राला देशात अव्वल स्थान मिळवून देऊया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी केले.

गडकिल्ले, मंदिर परिसरात स्वच्छता

राज्यातल्या गडकिल्ले, धार्मिक स्थळे, मंदिरे यांच्या परिसरातदेखील स्वच्छता असली पाहिजे. ही तीर्थक्षेत्रे सुंदर दिसली पाहिजेत यासाठीदेखील सर्वांनी सहभागी होऊन काम केले पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी यांच्यामुळे जगात भारताचा डंका वाजत आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, जे पन्नास साठ वर्षात जमले नाही ते प्रधानमंत्र्यांनी गेल्या आठ नऊ वर्षांत केले आणि देशात स्वच्छतेचे काम झाले, भ्रष्टाचाराची सफाई झाली.

चौपाटीवर नागरिकांचा उत्साह

गिरगाव चौपाटीवर येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रथम ग्रीनलॉन्स स्कूलच्या छोट्या विद्यार्थ्यांमध्ये मिसळले. हे विद्यार्थी स्वच्छतेच्या मोहिमेत सहभागी होण्यासाठी आपल्या शिक्षकांबरोबर आले होते. मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांबरोबर हस्तांदोलन केले आणि त्यांचे कौतुक केले. जोगेश्वरीच्या मर्कझ उल मारिफ एज्युकेशन अँड रिसर्च सेंटरचे विद्यार्थीसुद्धा स्वच्छतेसाठी गिरगाव चौपाटीवर आले होते. मुख्यमंत्री त्यांच्याशीदेखील बोलले. आज चौपाटी येथे स्वच्छता स्वयंसेवकांच्या जोडीने अनेक संस्थादेखील उतरल्या होत्या. स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आलोक कुमार स्वत: त्यांच्या कर्मचाऱ्यांसह आले होते. याशिवाय नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, एनसीसी, गुरुनानक हायस्कूल,नवनीत कॉलेज, सागरी सीमा मंच, उत्कल सेवा समिती, नैशनलं हौसिंग बँक, सेंट झेव्हियर्स कॉलेज तसेच पोलीस, होमगार्ड्स, महानगरपलिका कर्मचारी यांनी उत्साहाने या मोहिमेत भाग घेतला. यावेळी स्वच्छ महाराष्ट्र- स्वच्छ भारताच्या घोषणा देण्यात येत होत्या.

प्रारंभी जय जय महाराष्ट्र माझा राज्य गीताने गिरगाव चौपाटीवर कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी स्वच्छतेची प्रार्थनादेखील घेण्यात आली.

पाण्याच्या प्रश्नाला प्रथम प्राधान्य देऊन विकासाची कामे अविरत सुरू ठेवणार : मंत्री छगन भुजबळ

नाशिक, दिनांक: 30 सप्टेंबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा) : शेतकरी व नागरिकांच्या पाण्याच्या प्रश्नाला प्रथम प्राधान्य देऊन विकासाची कामे अविरतपणे सुरू ठेवाणार आहे. असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

आज निफाड तालुक्यातील टाकळी विंचूर येथील विविध कामांचे भूमीपूजन व लोकार्पण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते संपन्न झाले, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी टाकळी विंचूर च्या सरपंच अश्वीनी जाधव, लासलगाव बाजार समितीचे संचालक डॉ. श्रीकांत आवारे, ग्रामपंचायत सदस्य संतोष राजवाडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री छगन भुजबळ यावेळी म्हणाले, ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न हा अत्यंत जिव्हाळ्याचा असून त्याबाबत उपाययोजना करण्यासाठी सदैव कटिबद्ध आहे. ओझरखेड कॅनाल आणि चाऱ्यांच्या कामाची निविदा लवकरच काढण्यात येईल. मांजरपाडाच्या पाण्यामुळे ओझरखेड धरण भरते आहे. त्यामूळे ओझरखेड कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी फायदा होतो आहे. येवला व निफाड तालुक्यांतील रस्त्यांची कामेही वेगाने सुरू आहेत. अशी माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

 या कामांचे झाले भूमीपूजन

1.लासलगाव स्टेशन रोड (टाकळी विंचूर) येथे 2515 निधी अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे कामाचे भूमीपुजन (रक्कम रू. 15 लक्ष)

2.2515 निधी अंतर्गत सभामंडपाचे उद्घाटन (रक्कम रू. 15 लक्ष)

3.संधान नगर येथे 2515 निधी अंतर्गत काँक्रिटीकरण करणे कामाचे भुमीपूजन

4.टाकळी विंचूर ते 12 बंगले येथे 2515 निधी  अंतर्गत भुमीगत गटार बांधणे कामाचे भुमीपूजन (रक्कम रू. 15 लक्ष)

5.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत मागासवर्गीय वस्तीत अनुषंगिक कामे करणे कामांचे भुमीपूजन ( रक्कम रू. 8 लक्ष)

6.स्थानिक विकास निधी अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे कामाचे उद्घाटन (रक्कम रू.10 लक्ष)

7.2525 निधी अंतर्गत सभामंडप बांधणे कामाचे भुमीपूजन (रक्कम रू. 15 लाख)

8.जिल्हा क्रिडा निधी अंतर्गत ग्रीन जीम (व्यायामशाळा) चे उद्घाटन

यावेळी मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते मेरी माटी मेरा देश अभियानांतर्गत अमृत कलशाचे उदघाटन करण्यात आले.

००००००

शासन मराठवाड्याच्या विकासासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे दि.30 (जिमाका) :- हे शासन सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारे शासन आहे. “मराठवाडा मुक्ती संग्राम” हे इतिहासातील न विसरता येणारे पर्व आहे. या स्वातंत्र्यसंग्रामात प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व स्वातंत्र्यवीरांना शतशः नमन करतो आणि हे शासन मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही देतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

मराठवाडा जनविकास परिषदेच्या वतीने येथील गडकरी रंगायतन येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त मराठवाडा भूषण व मराठवाडा रत्न पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यावेळी पद्मश्री डॉ.रमण गंगाखेडकर, कृषी मंत्री धनंजय मुंडे, आमदार संजय केळकर, माजी खासदार आनंद परांजपे, अखिल भारतीय वारकरी महासंघाचे अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश बोधले महाराज, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मराठवाडा जनविकास परिषदेचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे, वरिष्ठ उपाध्यक्ष नितीन कदम, डॉ. दिलीप सपाटे, डॉ. अशोक नांदापूरकर, डॉ.अविनाश भागवत, डॉ.राजेश कुलकर्णी यांच्यासह अन्य मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.शिंदे पुढे म्हणाले, पद्मश्री डॉ.रमण गंगाखेडकर यांना “मराठवाडा भूषण” हा पुरस्कार देण्यात आला. त्यांनी करोना काळात केलेले काम अत्त्युच्च दर्जाचे होते. त्यांनी केलेल्या कामाचे मोल होवूच शकत नाही. पद्मश्री डॉ. गंगाखेडकर यांना हा पुरस्कार प्रदान केल्याने खरे तर या पुरस्काराची उंची वाढली आहे.

ते म्हणाले, पुढच्या पिढीला माहिती देणारे, प्रेरणा व ऊर्जा देणारे असे कार्यक्रम सतत होणे गरजेचे आहे. मराठवाड्यातील स्वातंत्र्यसेनानींनी मराठवाडा मुक्तीसाठी दिलेले बलिदान कधीही विसरता येणार नाही. हे शासन मराठवाडा विकासासाठी कटिबद्ध आहे. यासाठीच मराठवाड्यातील विविध प्रकल्पांसाठी 60 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीस मंजूरी देण्यात आली आहे. मराठवाडा विकासित होणारच. मराठवाडा समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणार असून त्याचबरोबर नागपूर- गोवा शक्तिपीठ महामार्गासही मराठवाडा जोडला जाणार आहे.

हे शासन काम करणारे आणि चांगले काम करणाऱ्यांचा सन्मान करणारे शासन आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी कोरोना काळात प्राणांची बाजी लावून काम करणाऱ्या सर्व डॉक्टरांचे विशेष कौतुक केले. यावेळी स्व. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आठवण सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, स्व. बाळासाहेब नेहमी सांगायचे वय वाढले तरी मनाने तरुण असले पाहिजे. चांगल्या कामाचा सदैव ध्यास ठेवला पाहिजे, त्यासाठी सदैव प्रयत्नशील राहावे. स्व. बाळासाहेबांच्या आणि स्व. धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीवरच हे शासन काम करीत असून “शासन आपल्या दारी” उपक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत 1 कोटी 75 लाख लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हा उपक्रम अजूनही सुरूच आहे. सर्वसामान्य जनतेला जास्तीत जास्त शासकीय योजनांचा सहज सुलभपणे लाभ मिळावा, हाच या उपक्रमाचा एकमेव उद्देश आहे.

आयोजकांनी “मराठवाडा भवन” साठी शासनास प्रस्ताव सादर करावा. याविषयी निश्चित सकारात्मक भूमिका घेतली जाईल, असे जाहीर करून जेष्ठ नागरिक आरोग्य तपासणी मोहीम लवकरच सुरू करण्यात येत असून त्यास स्व.हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे नाव दिले जाईल, अशी घोषणाही मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी शेवटी केली.

यावेळी मनोगत व्यक्त करताना कृषी मंत्री धनंजय मुंडे म्हणाले, मराठवाडा मुक्ती संग्राम कधीही विसरू नका. आपल्या कार्यातून हा इतिहास टिकवून ठेवायला हवा. सबंध महाराष्ट्राबरोबरच मराठवाड्याचाही विकास नक्कीच होणार. त्या दृष्टीने मुख्यमंत्री श्री. शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा पवार मनापासून कष्ट घेत आहेत. मुख्यमंत्री हे फक्त काम करणारेच मुख्यमंत्री असून त्यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उत्तम साथ मिळत आहे. मुख्यमंत्री श्री. शिंदे मराठवाड्याची मनापासून काळजी घेत आहेत. स्व.धर्मवीर आनंद दिघे यांच्या कार्याचा ध्यास घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सतत कार्यरत असतात. त्यांच्या नेतृत्वात मराठवाड्याचा विकास व्हावा, ही अपेक्षा व्यक्त करतानाच श्री. शिंदे हे सर्वसामान्यांसाठी झटून काम करणारे मुख्यमंत्री असल्याने ही अपेक्षा निश्चित पूर्ण होणार, हा विश्वासही त्यांनी शेवटी व्यक्त केला.

या कार्यक्रमात मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते पद्मश्री डॉ.रमण गंगाखेडकर यांना “मराठवाडा भूषण” पुरस्काराने गौरविण्यात आले तर श्री.कैलास जाधव (प्रशासकीय क्षेत्र), सोमनाथ वाळके (शैक्षणिक क्षेत्र), कर्ण एकनाथ तांबे (सामाजिक क्षेत्र), मिलिंद शिंदे (कला क्षेत्र), सोनाली मात्रे (प्रशासकीय क्षेत्र), आत्माराम सोनवणे (सामाजिक क्षेत्र) यांना “मराठवाडा रत्न” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने मराठवाडा भूषण पुरस्कार सन्मानार्थी पद्मश्री डॉ.रमण गंगाखेडकर तसेच ह.भ.प प्रकाश बोधले महाराज आणि मराठवाडा जनविकास परिषदेचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती वंदना व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर किल्लारी भूकंपातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रास्ताविक डॉ.दिलीप सपाटे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक व जेष्ठ पत्रकार श्री.राजेंद्र हुंजे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

0000000

मुक्ती दिन व नवरात्रोत्सवाच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी समन्वयाने कामे वेळेत पूर्ण करावीत : मंत्री छगन भुजबळ

नाशिक, दिनांक: 30 सप्टेंबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा) : येवला शहरातील मुक्तीभुमी येथे १३ ऑक्टोबर रोजी होणारा मुक्तीभूमी दिन कार्यक्रम त्याचप्रमाणे श्री. क्षेत्र कोटमगाव, निमगाव वाकडा व लोणजाई माता यात्रोत्सवाच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी समन्वयाने कामे वेळेत पूर्ण करावीत. असे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

आज येवला येथील संपर्क कार्यालयात आयोजित 13 ऑक्टोबर २०२३ रोजी होणारा मुक्तिदिन कार्यक्रम, श्री. क्षेत्र कोटमगाव, निमगाव वाकडा व लोणजाई माता, सुभाषनगर येथील यात्रोत्सवासाठी उपाययोजना व विविध विकास कामांच्या आढावा बैठकीत मंत्री भुजबळ बोलत होते. या बैठकीस येवला उपविभागीय अधिकारी बााबासाहेब गाढवे, निफाड चे उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पालवे, येवला तहसिलदार आबा महाजन, निफाड तहसिलदार शरद घोरपडे, उपविभागीय अभियंता अभिजित शेलार यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री छगन भुजबळ यावेळी म्हणाले, १३ ऑक्टोबर रोजी मुक्तीभूमी येथे मुक्तीभूमी दिनाचा भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने अनुयायी येणार आहेत. त्यामुळे  अनुयायांच्या गर्दीचे योग्य नियोजन करण्यात यावे. या कार्यक्रमासाठी बार्टीच्या अधिकाऱ्यांनी पोलीस यंत्रणांशी समन्वय साधून मुक्तीभूमी येथील बाहेरील बॅराकेटिंग व मुक्तीभूमीच्या आतील सर्व व्यवस्था चोख ठेवावी. कार्यक्रमाच्या दिवशी मुक्तीभूमीच्या परिसरात लावले जाणारे स्टॉल्स हे शिस्तबद्ध रितीने लावले गेले पाहिजे. पोलीस यंत्रणेने लाऊड स्पीकरची परवानगी देतांना कालबद्ध नियोजन करूनच परवानगी द्यावी जणेकरून एकाच वेळी लाऊड स्पीकरच्या आवाजाचा गोंधळ होणार नाही याबाबत योग्य दक्षता घ्यावी. बाहेरील परिसराची संपूर्ण साफसफाई, येणाऱ्या लोकांसाठी पिण्याचे स्वच्छ पाणी व पुरेशा प्रमाणात फिरते स्वच्छतागृह, कार्यक्रम पार पडल्यानंतर स्वच्छतेला नगरपालिका अधिका-यांनी प्राधान्य द्यावे. वैद्यकीय अधीक्षक व तालुका आरोग्य अधिकारी यांनी सुसज्ज वैद्यकीय पथक पूर्णवेळ उपलब्ध ठेवावे. उपअभियंता महावितरण येवला यांनी या काळात विद्युत पुरवठा खंडीत होणार नाही याची दक्षता घ्यावी. या ठिकाणी येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंगची

व्यवस्था तहसीलदार, शहर पोलीस व नगरपालिका यांनी संयुक्तरित्या करण्यात यावी. तसेच पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्याच्या सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिल्या.

मंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले, श्री. क्षेत्र कोटमगाव यात्रोत्सवाच्या अनुषंगाने औरंगाबाद रोडपासून मंदिरापर्यंत अतिक्रमण असल्यास ते गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत व मंदिर ट्रस्ट यांनी संयुक्तरित्या काढावे तसेच आवश्यक तेथे बॅराकेटिंग करावे. महावितरण अधिकाऱ्यांनी यात्रा काळात सर्व विद्युत पोल, विद्युत जोडण्या, फ्युज बॉक्सची तपासणी करून सुस्थितीत ठेवावे, तसेच पूर्णवेळ विद्युत पुरवठा करण्यात यावा. यात्रेच्या ठिकाणी पार्किंगसाठी पुरेशी जागा उपलब्ध होण्यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी, शहर पोलीस, ग्रामपंचायत व मंदिर ट्रस्टने संयुक्तरित्या कार्यवाही करावी. औरंगाबाद महामार्गावर होणारी पार्किंग व वाहतुकीचे नियोजन हे शहर पोलीस, उपअभियंता राष्ट्रीय महामार्ग व उप प्रादेशिक परिवहन विभाग यांनी संयुक्तरित्या करावे. यात्रा ठिकाणी दुकाने व स्टॉलसाठी परवानगी देतांना ग्रामपंचायतीने सुयोग्य नियोजन करावे. वैद्यकीय अधीक्षक व तालुका आरोग्य अधिकारी यांनी संपूर्ण यात्रा कालावधीत सुसज्ज वैद्यकीय पथक पूर्णवेळ उपलब्ध ठेवावे. संपूर्ण यात्रा कालावधीत परिसराची स्वच्छता ठेवावी. आरोग्याच्या दृष्टीने वेळोवेळी निर्जंतूक फवारणी करण्यात यावी. याप्रमाणेच निमगाव वाकडा व लोणजाई माता यात्रोत्सवासाठी नियोजन आणि उपाययोजना करण्याचे निर्देश मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी बैठकीत दिले.

मंत्री छगन भुजबळ आढावा घेतांना म्हणाले, विशेष सामाजिक सहाय्य योजनेंतर्गत शिबिरांचे आयोजन करण्यात यावे. शिबीरात लाभार्थ्यांना रेशन कार्ड अद्ययावतीकरण मोहीम राबविणे. ई श्रम कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, आभा कार्ड, पी एम विश्वकर्मा योजना नोंदणी करणे. उत्पन्न् दाखले, अधिवास प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र इत्यादी बाबींचे लाभ देण्यात यावेत. राजापूर व ४० गाव पाणी पुरवठा योजनेसाठी  सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पाईपलाईन साठी आवश्यक परवानगी देण्यात यावी तसेच  महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने राजापूर व ४० गाव पाणी पुरवठा योजना व धुळगाव साठवण तलाव योजनेसाठी प्रलंबित असलेला प्रस्ताव  ऑनलाईन सादर करावा. तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी येवला (प्रादेशिक) यांनी वन जमीन हस्तांतरण प्रस्ताव उचित कार्यवाहीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्याच्या सूचना यावेळी दिल्या.

मायबोली निवासी कर्णबधीर विद्यालय आंगणगाव येथे ग्रीन जीमचे  उद्घाटन संपन्न

मायबोली निवासी कर्णबधीर विद्यालय आंगणगाव येथे जिल्हा क्रीडा निधी अंतर्गत ग्रीन जीम चे उद्घाटन मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते संपन्न झाले  यावेळी येवला उपविभागीय अधिकारी  बााबासाहेब गाढवे प्रा. अर्जून कोकाटे, शिक्षक उपस्थित होते.

येवला तालुक्यातील रायते येथे सभामंडपाचे झाले लोकर्पण

येवला तालुक्यातील रायते येथे स्थानिक विकास निधीतून (रू १५ लक्ष) साकारलेल्या सभामंडपाचे लोकार्पण यावेळी मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी येवला

उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, सरपंच भूषण गोठी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

0000000

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ऋतुजा भोसले, स्वप्नील कुसाळे यांचे अभिनंदन

मुंबई, दि. ३०:- चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत टेनिसमधील मिश्र दुहेरी गटात महाराष्ट्राच्या ऋतुजा भोसले हिने व पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये स्वप्नील कुसाळे याने सुवर्णपदक पटकावले आहे. या दोघांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.

‘महाराष्ट्राच्या क्रीडापटूंनी सुरुवातीपासूनच या क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ऋतुजाने टेनिस मध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. स्वप्नीलने देखील नेमबाजीचा उत्कृष्ट कामगिरीचा आलेख उंचावणारी कामगिरी केली आहे. या दोघांनीही सांघिक खेळात जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर भारताला पदकांची कमाई करून दिली आहे, हे आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे, असे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी या यशासाठी ॠतुजा व स्वप्नीलचे तसेच त्यांच्या प्रशिक्षक, मार्गदर्शक आणि कुटुंबियांचे अभिनंदन केले आहे व दोघांनाही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

0000

वाघनखे करारावर स्वाक्षरी करण्यासाठी मंत्री सुधीर मुनगंटीवार रविवारी होणार लंडनला रवाना; मुंबईच्या विमानतळावर छत्रपतींच्या पुतळ्याला करणार अभिवादन

मुंबई, दि. 30:  छत्रपती शिवाजी महाराज यांचे युद्धकालीन शस्त्र असलेली वाघनखे ब्रिटनच्या विक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियम मधून भारतात परत आणण्याबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी  वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार रविवारी दिनांक 1 ऑक्टोबर रोजी रात्री लंडनकडे रवाना होणार आहेत. मुख्यमंत्र्यांचे तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, पूरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, विशेष कार्यकारी अधिकारी अमोल जाधव हे मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या सोबत असतील.

एक ऑक्टोबर रोजी मध्यरात्री ब्रिटिश एअरवेजच्या विमानाने लंडनकडे रवाना होण्यापूर्वी मंत्री श्री. मुनगंटीवार मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचतील आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतील. यावेळी विविध संघटना, मंडळे, संस्था यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे  ३५० वे वर्ष प्रारंभ होताच ही वाघनखे भारतात परत आणण्याचा संकल्प सांस्कृतिक कार्य मंत्री. श्री मुनगंटीवार यांनी केला होता. यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात केंद्र शासन तसेच आंतराष्ट्रीय पातळीवर श्री. मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला. दिनांक १५ एप्रिल २०२३ रोजी मुंबई येथे ब्रिटनचे पश्चिम भारत उप उच्चायुक्त अँलेन गँमेल यांच्यासह ब्रिटनच्या राजकीय व द्विपक्षीय संबंध उपप्रमुख श्रीमती इमोगेन स्टोन यांच्यासोबत बैठक घेवून महाराष्ट्र शासनाने व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयाशी पत्रव्यवहार सुरू केला होता.

या दौऱ्यात लंडन येथील टॅव्हिस्टॊक चौक येथे 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमास मंत्री श्री. मुनगंटीवार उपस्थित रहातील. तेथील विविध भारतीय तथा महाराष्ट्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना भेटून ते चर्चा करणार असून मंगळवारी 3 ऑक्टोबर रोजी व्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियम येथे भेट देऊन या संग्रहालयाचे संचालक ट्रायस्टम हंट यांच्यासोबत त्यांची बैठक होईल व करारावर स्वाक्षऱ्या होतील. यानंतर लगेच दूरदृश्यप्रणालीद्वारे पत्रकार परिषद होणार असून मंत्री श्री. मुनगंटीवार हे पत्रकारांशी संवाद साधतील.

या दौऱ्यात मंत्री श्री. मुनगंटीवार हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन येथील निवासस्थानास भेट देणार असून तेथे महामानवास अभिवादन करणार आहेत.

000

स्वच्छतेसाठी महाश्रमदानात नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे – पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

मुंबई, दि.30 : दि.15 सप्टेंबर ते दि.2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून ‘स्वच्छता हीच सेवा’ अभियानाअंतर्गंत ‘कचरामुक्त भारत’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वच्छता पंधरवड्यानिमित्त पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत राज्यात विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. दि. 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता ‘1 तारीख, एक तास’  उपक्रम राबविण्यात येत असून प्रत्येक गावात महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी ग्रामीण भागात सुमारे 56,786 ठिकाणी नियोजन करण्यात आले असून यामध्ये सर्व नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

या पंधरवड्यानिमित्त दैनंदिन स्वच्छता विषयावर उपक्रम राबविण्याबाबत जिल्ह्यांनी नियोजन केले आहे. त्या अनुषंगाने राज्यात सद्यस्थितीत 19,461 उपक्रम राबविण्यात आले असून सुमारे 95,84,680 नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे राज्यात स्वच्छतेचे जनआंदोलन उभारले गेले आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्याच्या प्रशासनाबरोबर ग्रामपंचायती व नागरिकांचा सहभाग मोलाचा आहे. सार्वजनिक ठिकाणे, शासकीय इमारती, धार्मिक स्थळे, रेल्वे स्थानके, बसस्थानके, खुल्या जागा येथे साफसफाई, कचरा संकलन व वर्गीकरण करण्यात येणार आहे.  ग्रामस्थांच्या सहभागाने नदी, समुद्र किनारे, नाले काठावरील व तळ्यातील प्लास्टिक कचरा गोळा करण्याबाबत मोहीम राबविण्यात येणार आहे. सदर स्वच्छता मोहिमेत राज्यातील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी,  गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक यांच्यासह महिला बचतगट सदस्य, शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, स्वंयसेवी संस्था, युवा ग्रुप, ग्रामस्थ यांनी मोठ्या प्रमाणावर सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहनही श्री. पाटील यांनी केले आहे.

000

ताज्या बातम्या

पारधी समाजातील युवकांनी व्यवसाय अर्थसहाय्यासाठी ३० ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

0
मुंबई, ‍‍दि. १० :- मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील पारधी समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवकांनी व्यवसाय करण्यास अर्थ साहाय्य मिळण्यासाठी ३० ऑगस्ट २०२५ पर्यंत...

विधानसभा लक्षवेधी

0
पीक कापणी, काढणी पश्चात नुकसान भरपाईचे वाटप प्रगतीपथावर – कृषिमंत्री माणिकराव कोकाटे मुंबई, दि. १० : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत परभणी जिल्ह्यात सन २०२४-२०२५ या...

विधानपरिषद प्रश्नोत्तरे

0
उरण फाटा येथे पारसिक हिलवर झालेल्या वृक्षतोडीची चौकशी - मंत्री उदय सामंत मुंबई, दि. १० : नवी मुंबई मधील सीबीडी बेलापूर येथील उरण फाटा येथे...

विधानसभा प्रश्नोत्तरे

0
अंबेजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी १८१ कोटींच्या प्रशासकीय मान्यता - वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ मुंबई, दि. १० : बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथील...

कर्नाक पुलाचे ‘सिंदूर’ नामकरण केल्याने इतिहासाच्या काळ्या खुणा पुसल्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. १०: भारतीयांना फसविणारा आणि अत्याचार करणारा अशी ओळख असेलेल्या कर्नाक या ब्रिटीश गव्हर्नरच्या नावाने मुंबईत स्थित दिडशे वर्षांपासूनच्या इतिहासाच्या काळ्या खुणा पुसत...