शनिवार, जुलै 12, 2025
Home Blog Page 1131

मुंबई उपनगरात झोपडपट्टीवासियांसाठी शासन ४० हजार शौचालये बांधणार – पालकमंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई, दि. ४ : मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून बृहन्मुंबई महानगरपालिका वस्ती स्वच्छता कार्यक्रम राबवण्यात येत आहे. त्याद्वारे वांद्रे (प.) नित्यानंद नगर येथील लॉट १२ अंतर्गत दुरुस्त केलेल्या सार्वजनिक शौचालयांचे आज पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी लोकार्पण केले. यावेळी आमदार आशिष शेलार व मुंबई महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांची स्वच्छतागृहाची मागणी आजवर दुर्लक्षित होती. ती सोडवण्यासाठी पालकमंत्री श्री. लोढा यांनी पुढाकार घेतला असून, येत्या काळात उपनगरातील वस्त्यांमध्ये ४०,००० शौचालये बांधण्यात येणार आहेत. यापैकी १२,००० शौचालये नव्याने बांधण्यात येतील, तर २८,००० शौचालयांची पुनर्बांधणी करून त्यांना नवे रूप देण्यात येणार आहे. पालकमंत्री श्री. लोढा यांच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या या प्रकल्पासाठी पालकमंत्री निधीतून आणि मुंबई महापालिकेद्वारे ६३८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

पालकमंत्री श्री. लोढा म्हणाले की, “मुंबई उपनगरातील झोपडपट्टीवासियांच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन, आखण्यात आलेल्या शौचालय उभारण्याच्या योजनेचा आज शुभारंभ झाला याचा आनंद आहे. या योजनेअंतर्गत नागरिकांसाठी अत्याधुनिक दर्जाची, स्वच्छ आणि सुरक्षित शौचालये उभारण्यात येतील. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून संपूर्ण मुंबई उपनगरातील नागरिकांची होणारी अडचण दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. नागरिकांच्या कोणत्याही मागणीकडे किंवा समस्येकडे दुर्लक्ष केले जाणार नाही. त्यांच्या समस्या तत्परतेने सोडवण्यासाठी आम्ही नेहमीच पुढाकार घेऊ!”

****

संध्या गरवारे/विसंअ/

राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर

मुंबई, दि. ४ : राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.

सुधारित १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे :

पुणे- अजित पवार

अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील

सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील

अमरावती- चंद्रकांत दादा पाटील

वर्धा – सुधीर मुनगंटीवार

भंडारा- डॉ.विजयकुमार गावित

बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील

कोल्हापूर- हसन मुश्रीफ

गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम

बीड- धनंजय मुंडे

परभणी- संजय बनसोडे

नंदुरबार- अनिल पाटील

0000

 

शिवप्रेमींसाठी हा ऐतिहासिक क्षण – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

व्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियम तीन वर्षासाठी देणार वाघनखं

मुंबई, दि. ३ – छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत महत्त्वाची भूमिका असलेल्या गनिमी काव्याचं उत्तम उदाहरण असलेली वाघनखं ब्रिटनमधून भारतात आणण्यासंबंधीचा सामंजस्य करार आज लंडन येथे करण्यात आला. शिवछत्रपतींची ही वाघनखं आता केवळ महाराष्ट्रच नव्हे तर भारतातील तमाम शिवप्रेमींसाठी एक प्रकारे शिवदर्शन ठरणार आहे, असे प्रतिपादन यावेळी दूरदृश्यसंवाद प्रणालीद्वारे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी केले.

व्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियमचे संचालक ट्रायस्टम हंट यांच्यासोबत वाघनखं भारतात आणण्याच्या करारावर यावेळी स्वाक्षरी करण्यात आली. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योग मंत्री उदय सामंत, मुख्यमंत्र्यांचे तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, संचालक, पुरातत्व आणि संग्रहालय तेजस गर्गे हे यावेळी उपस्थित होते.

ही वाघनखं नोव्हेंबर २०२३ ते नोव्हेंबर २०२६ या तीन वर्षांच्या कालावधीकरिता भारतात राहतील. ही वाघनखं महाराष्ट्रातील विविध संग्रहालयात शिवप्रेमी, इतिहासप्रेमी नागरिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येतील. यात सातारा, नागपूर, कोल्हापूर येथील राज्य पुरातत्व विभागाच्या संग्रहालयांसह मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचा समावेश राहणार आहे.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, सर्व शिवप्रेमींसाठी, अवघ्या महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी सुद्धा आजचा हा क्षण ऐतिहासिक आहे. शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्धापनदिनाचा सोहळा राज्यात मोठ्या उत्साहात साजरा केला. याच वर्षात आपण शिवछत्रपतींच्या पराक्रमाचे प्रतीक असणारी ही वाघनखं शिवभूमीत आणत आहोत, हा दुग्धशर्करा योग आहे.  शिवकालीन हत्यारांमध्ये वाघनखांना मोठं महत्त्व होतं, असे त्यांनी सांगितले.

शिवस्पर्श झालेली ही वाघनखं आपल्यासाठी अनमोल आहेत. शिवराज्याभिषेकाच्या निमित्तानं सांस्कृतिक कार्य विभागानं हा आगळा संकल्प केला आणि तो पूर्णत्वासही नेला, त्याबद्दल या विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि सांस्कृतिक विभागातील त्यांचे सहकारी कौतुकास पात्र आहेत, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी काढले. या करारासाठी राज्याचा सांस्कृतिक कार्य विभाग, केंद्र सरकार आणि ब्रिटीश सरकार यांचे अभिनंदन, अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या. करतो…

ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांसारखी दूरदृष्टी असलेला राजा भारतात दुसरा झाला नाही. शिवछत्रपतींची ही वाघनखं आता केवळ महाराष्ट्रच नव्हे तर भारतातील तमाम शिवप्रेमींसाठी एक प्रकारे शिवदर्शन ठरणार आहे.  शिवप्रतापाचं स्मरण करून देणारं ते निमित्त ठरेल. या शिवप्रतापाची प्रेरणा घेऊनच आपली पुढची पिढी महाराजांनी घालून दिलेल्या आदर्शावर वाटचाल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लंडन येथे आज ढोल आणि ताशांच्या निनादात आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय ‘ या जयघोषात अतिशय स्फूर्तिदायक वातावरणात आज या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी या संग्रहालयातील ऐतिहासिक ठेवा मंत्री श्री. मुनगंटीवार, मंत्री श्री. सामंत आणि उपस्थितांनी पाहिला.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे  ३५० वे वर्ष प्रारंभ होताच ही वाघनखे भारतात परत आणण्याचा संकल्प मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केला होता. यासाठी केंद्र शासन तसेच आंतराष्ट्रीय पातळीवर राज्य शासनाच्या वतीने त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. दिनांक १५ एप्रिल २०२३ रोजी मुंबई येथे ब्रिटेनचे पश्चिम भारत उप उच्चायुक्त अँलेन गँमेल यांच्यासह ब्रिटनच्या राजकीय व द्विपक्षीय संबंध उपप्रमुख श्रीमती इमोगेन स्टोन यांच्यासोबत बैठक घेवून महाराष्ट्र शासनाने व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयाशी पत्रव्यवहार सुरू केला होता. त्यास खऱ्या अर्थाने आज यश आले.

0000

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला मुंबई विद्यापीठाच्या कामकाजाचा आढावा

                मुंबई, दि. ३ :  उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबई विद्यापीठाच्या विविध अडचणी आणि कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र कुलगुरू अजय भामरे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            मंत्री श्री. पाटील म्हणाले की, मुंबई विद्यापीठाची विद्यार्थी संख्या जास्त आहे. परीक्षेचे नियोजन, निकाल वेळेत जाहीर करणे. याबाबत कालबद्ध पद्धतीने  नियोजन करावे. यासाठी खासगी कंपन्यांची मदत लागली, तर त्या बाबतही आराखडा तयार करावा आणि वेळेत परीक्षेचे  निकाल जाहीर करावेत. तसेच प्राध्यापक भरती प्रक्रियेला गती देऊन तातडीने याबाबत जाहिरात प्रसिद्ध करावी. बैठकीत शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या अडचणी, विद्यार्थी डेटा, डॅशबोर्ड, नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

0000

काशीबाई थोरात/विसंअ

पुणे विभागीय आयुक्त कार्यालय येथे कार्बन न्युट्रलिटी सुविधा कक्षाची स्थापना

पुणे, दि. ३ : विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते पुणे आंतरराष्ट्रीय संस्थेच्या पर्यावरण विभागाच्या सहकार्याने विभागीय आयुक्त कार्यालय येथे स्थापन करण्यात आलेल्या कार्बन न्युट्रलिटी सुविधा कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.

            यावेळी पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवळे, पुणे आंतरराष्ट्रीय संस्थेचे पर्यावरण विभागप्रमुख प्रा. अमित मल्लिक, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पीएमपीएमएल, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, नगरपरिषदांचे मुख्याधिकारी उपस्थित होते

            श्री. राव म्हणाले की, अतिरिक्त कार्बन उत्सर्जनामुळे गंभीर स्वरूपाच्या पर्यावरणीय हानीपासून पृथ्वीला वाचविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. कार्बन न्युट्रलिटी सुविधा कक्ष काळाची गरज असल्यामुळे स्वयंस्फूर्तीने हा कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या माध्यमातून कार्बनचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. कार्बन स्थिरीकरणाच्या महत्वाविषयी जनजागृती करणे, हा या कक्ष स्थापनेमागील प्रमुख उद्देश आहे.  पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीपासून या पथदर्शी प्रकल्पाच्या अंमलबजावणीस सुरुवात केली जाणार असून हा प्रकल्प यापुढे कार्बन स्थिरीकरणासाठी संपूर्ण पुणे विभागात राबविण्यात येणार असल्याचेही श्री. राव म्हणाले.

            या कक्षाचे सनियंत्रण सहआयुक्त पूनम मेहता आणि उपायुक्त विजय मुळीक  यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषद प्रशासन विभागाद्वारे करण्यात येणार आहे.

राज्यातील रोहयोची मंजूर कामे तातडीने सुरू करण्याचे मंत्री संदिपान भुमरे यांचे निर्देश

मुंबई, दि. ३ : राज्यातील रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेली कामे तत्काळ सुरू करण्यात यावीत, असे निर्देश रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी दिले.

मंत्री श्री. भुमरे यांच्या शासकीय निवासस्थानी रोजगार हमी योजनेच्या विविध उपक्रमांच्या अंमलबजावणी विषयी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीस विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, उपसचिव संजना खोपडे उपस्थित होते.

मंत्री श्री. भुमरे म्हणाले की, राज्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे मंजूर करण्यात आली आहेत. काही भागात पाऊस असल्याने कामांना सुरुवात झाली नसेल, तर ती कामे तत्काळ सुरू करण्यात यावीत. ज्या ठिकाणी काही समस्या निर्माण होत आहेत त्यांनी शासनाकडे तत्काळ मार्गदर्शन मागवावे.

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील मंजूर कामे पुढील आठवड्यात सुरु करुन त्याचा अहवाल द्यावा अशीही सूचना मंत्री श्री भुमरे यांनी केली.

यावेळी नाशिक जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी हिरामण झिरवळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा पडोळ, गट विकास अधिकारी नम्रता जगताप यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

0000

राजू धोत्रे/विसंअ

 

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून नवनियुक्त कुलगुरू डॉ. महानवर यांचे अभिनंदन

मुंबई, दि. ३ :  सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. प्रकाश महानवर यांची नियुक्ती झाली आहे. याबद्दल उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉ. महानवर यांचा शाल, पुष्पगुच्छ, पुस्तक भेट देऊन सत्कार केला आणि अभिनंदन केले.

यावेळी माजी मंत्री प्रा. राम शिंदे, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उपसचिव अजित बाविस्कर, उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्र शिक्षण संचालक विनोद मोहितकर उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील यांनी कुलगुरू श्री.महानवर यांच्याशी विद्यापीठ आणि प्रशासकीय कामकाज, शैक्षणिक गुणवत्ता, शैक्षणिक कारकीर्द याबाबत सविस्तर चर्चा करून त्यांना  पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. डॉ. महानवर मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या संचालक पदावर कार्यरत होते.

सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया ९ ऑक्टोबर पासून सुरू

पुणे, दि.३ : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या २८ जून २०२३ रोजीच्या आदेशान्वये ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत पुढे ढकलण्यात आलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया ९ ऑक्टोबर २०२३ पासून सुरू करण्यात येणार असल्याचे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव वसंत पाटील यांनी कळविले आहे.
निवडणुकांकरीता प्रारूप अथवा अंतिम मतदार याद्या  ७ जून २०२३ पर्यंत किंवा त्यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या  सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत, त्या टप्प्यापासून  सुरू करण्यात येणार आहेत. ज्या सहकारी संस्थांच्या निवडणूकीकरीता ८ जून ते २१ ऑगस्ट २०२३ या कालावधीत प्रारूप अथवा अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत अशा सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकांकरीता १ ऑक्टोबर २०२३ या अर्हता दिनांकावर नव्याने प्रारूप मतदार याद्या तयार करावयाच्या आहेत.
       ज्या प्रलंबित सहकारी संस्थांच्या निवडणूकांकरीता प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या नाहीत, अशा प्रलंबित सहकारी संस्थांच्या निवडणुकांकरीता प्रारूप मतदार याद्या तयार करण्यासाठी आवश्यकतेनुसार अर्हता दिनांकाबाबतचे प्रस्ताव कारणमिमांसा नमूद करून प्राधिकरणास सादर करणे आवश्यक आहे.
        संघीय संस्थांच्या निवडणुकांकरीता सभासद संस्थांनी प्रतिनिधी नियुक्तीचे ठराव जिल्हा, तालुका, प्रभाग सहकारी निवडणूक अधिकारी यांना सादर केलेले असल्यास पुन्हा ठराव मागविण्याची आवश्यकता नाही. तथापि महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियम २०१४  चे नियम १० (४) मध्ये नमुद केलेल्या परिस्थितीत बदल करण्याची मुभा असलेले बदल जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांनी स्विकारावेत. नवीन अर्हता दिनांकामुळे सभासद संस्था, नव्याने पात्र होत असल्यास अशा संस्थांकडून प्रतिनिधी नियुक्ती ठराव मागविण्याची प्रक्रिया जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांनी करावी, असेही राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून कळविले आहे.
0000

जिल्हा भेटीच्या वेळी रेडक्रॉस पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार – राज्यपाल रमेश बैस

मुंबई, दि. ३ : राज्यपाल रमेश बैस यांनी इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या महाराष्ट्र शाखेच्या पदाधिकाऱ्यांची मंगळवारी (दि. ३) राजभवन मुंबई येथे बैठक घेऊन संस्थेच्या समस्यांचा आढावा घेतला.  राज्यपाल हे इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या महाराष्ट्र शाखेचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत.

राज्यातील विविध जिल्ह्यांना भेटी देऊ, त्यावेळी आपण रेडक्रॉस पदाधिकाऱ्यांची त्या त्या जिल्ह्यात आवर्जून बैठक घेऊ, असे राज्यपालांनी बैठकीत सांगितले. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये रेडक्रॉसच्या कार्याला जिल्हा प्रशासनाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही, याची दखल घेऊन राज्यपालांनी संबंधित जिल्हा प्रशासनाकडून  अहवाल मागविण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी रेडक्रॉस महाराष्ट्र राज्य शाखेच्या वतीने राज्यपालांना संस्थेच्या कार्याची माहिती देण्यात आली. रेडक्रॉसचे विक्रोळी येथील कोठार असलेल्या जागी आपत्ती निवारण केंद्र विकसित करणे,  महाराष्ट्र शाखेच्या वतीने करण्यात येणारे रक्त संकलन, प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान राबविण्यात सहकार्य करणे, प्रथमोपचार प्रशिक्षण, पाचगणी येथील बेल एअर हॉस्पिटल व वाई येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचलन, नर्सिंग कॉलेजचे संचलन इत्यादी कार्याची माहिती रेड क्रॉस महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष होमी खुसरोखान यांनी यावेळी दिली.

बैठकीला महाराष्ट्र शाखेचे उपाध्यक्ष सुरेश देवरा तसेच भंडारा, वर्धा, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, सांगली, पुणे व कोल्हापूर रेडक्रॉस शाखांचे पदाधिकारी उपस्थित होते.

००००

Maharashtra Governor meets officials of State Branch of Indian Red Cross

Mumbai 3 :- Maharashtra Governor Ramesh Bais, in his capacity as the State President of the Indian Red Cross Society met officials of the State Branch of the Society at Raj Bhavan Mumbai on Tue (3 Oct)

Chairman of the State Branch Homi Khusrokhan, Vice Chairman Suresh Deora and members of district branches of Red Cross Society were present.

Addressing the office bearers, the Governor said he will hold review meetings of the Red Cross District branch officials during his visit to various districts of the State.

Taking cognisance of the lack of support received to the Red Cross Branch from district administration, the Governor directed to call for reports from the concerned districts.

Chairman Homi Khusrokhan briefed the Governor about the various activities of the Society, while district representatives flagged the problems faced by them.

नांदेड येथील घटनेची मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल; चौकशीअंती दोषींवर कारवाई करणार -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ३ : नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात झालेल्या घटनेची शासनाने गंभीर दखल घेतली असून या घटनेची चौकशी करुन त्यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मंत्रालय येथे आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, याबाबतीत प्राथमिक माहिती घेतली असता लक्षात आले की, रुग्णालयात औषधांची कमतरता नव्हती. रुग्णालयात पुरेशी औषधे होती. तिथे पुरेसे डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांची उपलब्धता आहे. यानंतरही अशा प्रकारची घटना घडल्याने ही गंभीर बाब आहे. त्यामुळे नांदेड येथे झालेल्या मृत्यूंची चौकशी होईल. यात कोणी दोषी आढळला, तर त्याच्यावर कारवाई केली जाईल.

राज्य सरकारने ही घटना अतिशय गांभीर्याने घेतली आहे. त्यामुळेच मंत्री, सचिव आणि अधिकाऱ्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. आता याप्रकरणी चौकशी होईल आणि पुढील कारवाई केली जाईल.

ताज्या बातम्या

महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२३ : लिपिक-टंकलेखक संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर

0
मुंबई, दि. ११ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दि. १७ डिसेंबर, २०२३ रोजी मुंबईसह छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, नाशिक व पुणे जिल्हाकेंद्रांवर घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०२३ मधील...

इटलीतील मॉन्टोन येथे नायक यशवंत घाडगे यांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण

0
नवी दिल्ली, दि. 11 : दुसऱ्या महायुद्धातील भारतीय वीर नायक यशवंत घाडगे यांच्या अतुलनीय शौर्यास श्रद्धांजली म्हणून इटलीतील मॉन्टोन शहरात त्यांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. भारताच्या...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या धैर्य, शौर्य, पराक्रमाचा वारसा लाभलेल्या बारा किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा...

0
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत महाराष्ट्रातील अकरा आणि जिंजी किल्ल्याच्या समावेशाबद्दल आनंद व अभिमान - उपमुख्यमंत्री अजित पवार तामिळनाडूतील जिंजीसह महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा...

छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास जागतिक पातळीवर पोहोचणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आनंद...

0
मुंबई दि. ११ : युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा समावेश झाल्याची घोषणा आज झाली असून, ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि...

देशातील सर्वोत्तम ‘ऑफ शोअर एअरपोर्ट’ मुंबईत उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. ११ : भारताला ‘मेरीटाईम पॉवर’ बनविणारे वाढवण बंदर जसे देशातील सर्वोत्तम 'ऑफ शोअर पोर्ट'  होणार आहे त्याचप्रमाणे सर्वोत्तम 'ऑफ शोअर एअरपोर्ट' मुंबईत उभारणार असून जे मुंबईतील तिसरे एअरपोर्ट...