शनिवार, जुलै 12, 2025
Home Blog Page 1130

मुंबई शहरातील प्रगतीपथावरील प्रकल्प वेळेत पूर्ण करावेत – पालकमंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि. 4 – मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. येथील नागरिकांसाठी विकास, सुविधा तसेच सौंदर्यीकरणाचे विविध प्रकल्प बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत प्रगतीपथावर आहेत. हे प्रकल्प वेळेत पूर्ण करावेत, असे निर्देश मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत सुरू असलेल्या विकास कामांचा श्री.केसरकर यांनी आढावा घेतला. यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबालसिंह चहल, अतिरिक्त महापालिका आयुक्त पी.वेलरासु, डॉ.अश्विनी जोशी, सुधाकर शिंदे, संबंधित उपायुक्त, सहायक आयुक्त आदी उपस्थित होते.

आज आढावा घेतलेल्या प्रकल्पांमध्ये प्रामुख्याने महालक्ष्मी आणि मुंबादेवी मंदिर परिसर विकास, हाजीअली दर्गा परिसर विकास, वरळी, माहिम आणि कफ परेड कोळीवाड्यांचा पर्यटनदृष्ट्या विकास, शाळांच्या इमारतींची दुरूस्ती, ज्येष्ठ नागरिकांसाठी तसेच महिलांसाठी सुविधा केंद्र उभारणे, व्यावसायिक रस्त्यांवर रात्री फूडकोर्ट सुरू करणे, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आर्टिफिशियल इंटिलिजन्सचा वापर करणे, कमी दरात पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देणे, बाजारपेठा अद्ययावत करणे आदी विषयांचा समावेश होता.

पालकमंत्री श्री.केसरकर म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा केंद्र हा राज्य शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. मुंबई शहरात यासाठी दहा ठिकाणे निश्चित करुन प्राधान्याने या केंद्रांचे काम सुरु करावे. ज्येष्ठ नागरिकांना येथे ने-आण करण्यासाठी बेस्टमार्फत इलेक्ट्रिक बस उपलब्ध करून देण्यात याव्यात. त्याचप्रमाणे महिलांसाठी कॉमन फॅसिलिटी सेंटर (सुविधा केंद्र) सुरु करून तेथे त्यांच्यासाठी रोजगाराची साधने उपलब्ध करून द्यावीत. महालक्ष्मी, मुंबादेवी आणि हाजी अली परिसराच्या विकासाची सुरू असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावीत. नवरात्रीमध्ये भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता त्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. कोळीवाड्यामध्ये कायमस्वरूपी तसेच व्यावसायिक रस्त्यांवर व्यवसाय संपल्यानंतर मुंबईचे वैशिष्ट्य जपणारे फूड कोर्ट सुरू करावेत, याद्वारे रोजगार निर्मितीदेखील करता येईल, असे श्री.केसरकर यांनी सांगितले.

ओला आणि सुका कचरा विलगीकरणाबाबत जनजागृतीवर भर देण्यात यावा. मुंबईतील रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडीची ठिकाणे शोधून तेथे आर्टिफिशियल इंटिलिजन्सचा वापर करून वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न करावा. त्याचप्रमाणे जेथे पार्किंगची सोय नाही अशा ठिकाणी कमी दरात पार्किंगची सुविधा उपलब्ध करुन द्यावी, अशी सूचनाही श्री.केसरकर यांनी यावेळी केली.

राज्यात हेलिपॅड उभारणीसाठी एमएडीसी नोडल एजन्सी, एअर ॲम्ब्युलन्सचा मार्गही सुकर

मुंबई, दि.४ : – राज्यात आवश्यक तेथे हेलिपॅड उभारणीसाठी तसेच हवाई- रुग्णवाहिका -एअर ॲम्ब्युलन्स सुविधा सुरु करण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेडला नोडल एजन्सी म्हणून काम करता येईल, असा निर्णय आज महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कंपनीचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

कंपनीच्या संचालक मंडळाची ८५ वी बैठक मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी झाली. या बैठकीत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शिर्डी, अमरावती तसेच कराड यांसह विविध विमानतळ विकासाच्या कामांचा आढावाही घेतला. राज्यात शक्य असेल, त्या ठिकाणी विमानतळ किंवा धावपट्ट्यांच्या ठिकाणी नाईट लँडिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे याठिकाणी अपघात झाल्यास तत्काळ मदत व बचावासाठी हेलिकॉप्टरची सुविधा उपयुक्त ठरते. याशिवाय रुग्णांच्या सेवेसाठी एअर ॲम्ब्युलन्स सेवा आवश्यक ठरते. अशा सुविधा पुरवणाऱ्या कंपन्यांशी समन्वय साधण्यात यावा, असे निर्देशही त्यांनी दिले.

बैठकीत कंपनीच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांनी विषयांची मांडणी केली. बैठकीस वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, विमानचालन संचालनालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, तसेच एमआयडीसी, सिडको आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी प्रसन्न, नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर दृकश्राव्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.

राज्यात विमानचालन संचालनालयाकडे हेलिपॅड उभारणीचे अधिकार आहेत. हे अधिकार विमानतळ विकास कंपनीस नोडल एजन्सी म्हणून प्रदान करण्यावर एकमत झाले. जेणेकरून यातून तालुका स्तरावरही हेलिपॅड उभारता येणार आहेत. यात शक्य तिथे राज्यातील प्रत्येक पोलीस वसाहतींच्या परिसरात अशा हेलिपॅडची उभारणी करण्यात यावी. जेणेकरून या मैदानांचा पोलिस कवायतींसाठी वापर होईल. त्यांची देखभाल दुरुस्तीही होईल तसेच आवश्यक त्यावेळी या हेलिपॅडचा वापर करणेही शक्य होईल, अशा सूचना करण्यात आल्या.

शिर्डी विमानतळाच्या सभोवतालचा परिसर (आशा- एरिया अराऊंड शिर्डी हब एअरपोर्ट) विकसित करण्यासाठीचे अधिकारही कंपनीला देण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय शिर्डी येथे नवीन इंटिग्रेटेड टर्मिनल उभारणीच्या ५२७ कोटी रुपयांच्या प्रस्तावासही मान्यता देण्यात आली. तसेच आता वापरात असलेल्या विमानतळाच्या धावपट्टीच्या नूतनीकरणास आणि त्यासाठीच्या ६२ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. अमरावती येथील बेलोरा विमानतळाच्या विकासासाठी तिथे देशातील सर्वात मोठे असे हवाई प्रशिक्षण केंद्र सुरु व्हावे असे प्रयत्न आहेत. याठिकाणी टाटा समूहाची एअर-विस्तारा ही कंपनी केंद्र सुरु करणार असल्याचे सांगण्यात आले. यामुळे या परिसरात रोजगार संधीही उपलब्ध होणार आहे.

राज्यातील एमआयडीसीकडील लातूर, नांदेड, बारामती, धाराशिव आणि यवतमाळ हे पाच विमानतळ हे एका खासगी कंपनीस देण्यात आले होते. त्यापैकी धाराशिव आणि यवतमाळ हे विमानतळ सुरु नाहीत. त्यांच्यासह हे पाचही विमानतळ परत घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. त्यासाठी कायदेशीवर सर्व त्या विहीत पद्धतीने कार्यवाही करण्यात यावी अशा सूचना देण्यात आल्या.

बैठकीत विविध प्रकल्पग्रस्तांसाठीच्या वाढीव अनुदान खर्चास मंजुरी देण्यात आली. यात मिहान प्रकल्पाकडून ‘सीएसआर’अंतर्गत महिला सबलीकरणासाठी महिलांना शिलाई मशिन्स आणि मुलींना सायकलींचे वाटप करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

मातंग समाजाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. 4 : मातंग समाजापर्यंत विविध योजना पोहोचविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. मातंग समाजाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

मातंग समाजाच्या विविध मागण्यांबाबत मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली. मंत्री श्री. देसाई म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार ही बैठक घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री श्री. शिंदे मातंग समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहेत. मुंबईत आझाद मैदान येथे मातंग समाजाच्या वतीने विविध मागण्यांसंदर्भात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांच्यावतीने यावेळी मी उपस्थित राहून सकारात्मक चर्चा केली होती. याबाबत दोन बैठका घेतल्या आहेत, असे मंत्री श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीला सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे,समाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, ‘बार्टी’चे महासंचालक सुनील वारे, तसेच मातंग समाजाच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मातंग समाजाच्या प्रश्नांबाबत घेण्यात आलेल्या बैठकीच्या अनुषंगाने  केलेल्या कार्यवाहीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.

मंत्री श्री. देसाई म्हणाले की, कर्नाटक व पंजाब राज्याने त्यांच्या राज्याकरिता अनुसूचित जातीचे जातीनिहाय उपवर्गीकरण केले आहे. त्या संदर्भात अवलंबिलेल्या कायदेशीर बाबींचा अभ्यास करण्यासाठी पंजाब व कर्नाटक या राज्यांना भेट देण्यासाठी पाठविण्यात येणाऱ्या शिष्टमंडळात मातंग समाजाच्या प्रतिनिधींचाही समावेश करण्यात येईल. लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाच्या शिफारशीनुसार संबंधित विभागाकडून अनुपालन अहवाल मागविण्यात येईल.   या आयोगाच्या 82 शिफारशी पैकी 68 शिफारशी तत्त्वतः मान्य केल्या आहेत. मातंग समाज योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी जिल्ह्यांमध्ये जनजागृती शिबिरे आयोजित करावीत असे निर्देश संबंधितांना यावेळी मंत्री श्री. देसाई यांनी दिले. साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (आर्टी) स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करावा, अशा सूचना यावेळी मंत्री श्री. देसाई यांनी दिल्या. तसेच साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचे चिरागनगर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याकरता विविध विभागांचे अभिप्राय मागविण्यात यावेत,  असेही मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

*****

शैलजा पाटील/विसंअ/

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे उद्या चर्चासत्राचे आयोजन

मुंबई, दि. ०४ : राज्यात सर्वत्र १ ऑक्टोबर हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दि. ५ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अध्यक्षस्थानी असतील. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार अरविंद सावंत उपस्थित राहणार आहेत.

*****

शैलजा पाटील/विसंअ/

महिला सक्षमीकरणासाठी ‘उमेद’ च्या माध्यमातून कृतिशील प्रयत्न – प्रधान सचिव एकनाथ डवले

मुंबई, दि. 4 :  महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील (उमेद) स्वयंसहाय्यता गटाच्या महिलांच्या कृषी व बिगर कृषी उत्पादनांना शाश्वत बाजारपेठ मिळवून देण्यासाठी  शासन प्रयत्न करत आहे. ‘उमेद’च्या महिलांचा उत्पादित माल मोठ्या कंपन्या आणि खरेदीदार यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ‘बायर – सेलर मीट’ हा नाविन्यपूर्ण कार्यक्रम मैलाचा दगड ठरणार असल्याचे प्रतिपादन ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी केले.

देशभरातील प्रमुख 41 साखळी व्यवसाय कंपन्यांच्या प्रतिनिधींसह राज्यभरातून स्वयंसहाय्यता गटाच्या आणि शेतकरी महिला उत्पादक कंपनीच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये 28 करार या कार्यक्रमात करण्यात आले. नवी मुंबई येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांनी बेसिक्सच्या सहाय्याने राज्यस्तरीय ‘बायर – सेलर मीट’ चे आयोजन केले होते. कार्यक्रमासाठी उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य परिचालन अधिकारी परमेश्वर राऊत, अवर सचिव धनवंत माळी, उपसंचालक शीतल कदम उपस्थित होते.

प्रधान सचिव श्री. डवले म्हणाले की, “ग्रामविकास विभाग ‘उमेद’ अभियानाच्या माध्यमातून  ग्रामीण महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वायत्त होण्यासाठी विविध प्रकारे मदत करत आहे. महिलांची उत्पादने दर्जेदार आहेत, गुणवत्तापूर्ण आहेत. आता त्यांना शाश्वत बाजारपेठ मिळवून देणे आवश्यक आहे. साखळी व्यावसायिक आणि मोठमोठ्या कंपन्यांनी पुढे येऊन या महिलांना सक्षम बनण्यासाठी हातभार लावावा.

अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जयवंशी यांनी ‘उमेद’च्या उत्पादक महिलांना सातत्याने विक्रीसाठी वेगवेगळे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर खरेदीदार कंपन्यांना उत्तम प्रतीचा आणि शुद्धता असलेला शेतमाल आणि इतर उत्पादने उपलब्ध करून देण्यासाठी समन्वय ठेवण्यासाठी यंत्रणेला जिल्हा आणि राज्यस्तरावरून कार्यरत करण्यात आलेले असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यभरातील 34 जिल्ह्यातून ‘उमेद’ अंतर्गत कार्य करत असलेल्या महिलांच्या प्रतिनिधी उत्पादन किंवा शेतमालाच्या नमुन्यांसह उपस्थित होत्या. त्यात सोयाबीन, मिरची, हळद, तूर, हरभरा, मका, बाजरी, नाचणी, ज्वारी  यासारखे दर्जेदार धान्य आणि कडधान्य तसेच मसाले, गूळ, मध, फळे, वनौषधी, तेलबिया इत्यादी उत्पादने नमुना स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आले होते. खरेदीदार म्हणून 30 पेक्षा जास्त संस्था आणि कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सेंद्रिय आणि शुद्धता असलेले उत्पादने महिलांनी उपलब्ध करून दिल्यामुळे खरेदीदार संस्था आणि कंपन्यांच्या प्रतिनिधी यांनी करार करण्यासाठी उत्साह दाखवला. या कार्यक्रमात खरेदीदार यांनी दाखविलेल्या रुचीमुळे भविष्यात महिलांना शाश्वत बाजारपेठ मिळण्यास मदत होणार आहे.

0000

राजू धोत्रे/विसंअ/

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना संवेदनशीलपणे मदत करावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विमा कंपन्यांना निर्देश

मुंबई, दि. ४ :- राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा योजनेतून नुकसान भरपाई देताना कंपन्यांनी संवेदनशीलपणे आणि सकारात्मक भावनेने मदत करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विमा कंपन्यांना दिले.

वर्षा निवासस्थानी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या खरीप हंगाम अंमलबजावणीबाबत आढावा बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. कृषिमंत्री धनंजय मुंडे, सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, मुख्य सचिव मनोज सौनिक, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, कृषी आयुक्त सुनिल चव्हाण यांच्यासह विमा कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिल्याने राज्यातील शेतकरी बांधव त्रस्त आहे. त्याला दिलासा देण्यासाठी राज्य शासन खंबीरपणे पाठीशी उभे आहे. विमा कंपन्यांनीदेखील या काळात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. त्यामुळे शेतकरी संकटात असताना त्याला मदत करण्याची भूमिका संवेदनशीलपणे आणि सकारात्मक भावनेने घ्यावी, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

बळीराजाला दिलासा म्हणून राज्य शासनाने एक रुपयामध्ये पीक विमा योजना सुरू केली आहे. अशी विमा योजना सुरू करणारे महाराष्ट्र पहिले राज्य असल्याचे सांगत विम्यापोटी शेतकऱ्यांनी भरायचा हिस्सा राज्य शासन अदा करत आहे. यामागची शासनाची भूमिका विमा कंपन्यांनी समजून घेतली पाहिजे. विमा कंपन्यांनी प्रस्तावांवर जे आक्षेप घेतले आहेत. ते जिल्हाधिकाऱ्यांनी वस्तुनिष्ठ पद्धतीने तपासून घ्यावेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना वेळेवर मदत करावी, असे मंत्री श्री. मुंडे, श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले. खरीप २०२३ मध्ये प्रधानमंत्री पिकविमा योजनेसाठी १ कोटी ७० लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. ११३ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित आहे. ओरिएन्टल इन्शुरन्स, आयसीआयसीआय लोम्बार्ड, युनिव्हर्सल सोम्पो, युनायटेड इंडिया, चोलामंडलम एम एस., भारतीय कृषी विमा कंपनी, एचडीएफसी अर्गो, रिलायन्स जनरल या विमा कंपन्या राज्यात कार्यरत आहेत.

 

महसूल विभागामार्फत दिले जाणारे विविध दाखले निश्चित मुदतीत द्या

मुंबई, दि. 4 : महसूल विभागामार्फत दिले जाणारे विविध दाखले त्यासाठी लागणाऱ्या निश्चित मुदतीत दिले जावेत. त्याचप्रमाणे काम झाल्यानंतर नागरिकांना त्याबाबत कळविण्यात यावे. त्यासाठी त्यांना फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासू नये, असे निर्देश मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

पालकमंत्री श्री.केसरकर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयात नागरिकांशी सुसंवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे, जिल्हा नियोजन अधिकारी बी. जी. सुपेकर, महानगरपालिका कार्यालयात सहायक आयुक्त मृदुला अंडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री.केसरकर यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. या समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश त्यांनी दिले. ज्या समस्या सोडविण्यासाठी कालमर्यादा ठरलेली असते, त्या मुदतीच्या आत सोडविण्यात याव्यात. तसेच काम झाल्यानंतर नागरिकांना त्याबाबत कळविण्यात यावे, अशी सूचना त्यांनी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांनी प्रामुख्याने जात प्रमाणपत्र, अभिलेखात नाव समाविष्ट करणे, मालमत्तापत्र, वारस नोंद, उत्पन्नाचा दाखला, रहिवास दाखला याबाबत समस्या मांडल्या, तर महानगरपालिका येथे झालेल्या सुसंवादात पाणीपुरवठा, रस्ता ओलांडण्यासाठी पूल बांधणे, अतिक्रमण हटविणे आदी विषयांचा समावेश होता. तातडीने अतिक्रमण हटविण्याबाबत पालकमंत्र्यांनी सहायक आयुक्तांना दूरध्वनीवरुन निर्देश दिले.

पालकमंत्री श्री. केसरकर यांच्या हस्ते संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पेन्शन मंजुरी आदेशाचे तसेच तात्पुरत्या गौण खनिज परवान्यांचे वितरण करण्यात आले.

0000

बी.सी.झंवर/विसंअ/

समाजाप्रति संवेदना बाळगून सामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण करा – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन

सांगली दि. ४ : स्पर्धा परीक्षेत यश मिळवून शासकीय सेवेत दाखल होत असलेल्या उमेदवारांनी समाजाप्रति संवेदना बाळगून आपल्या कर्तव्यातून सामान्य माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी सचोटीने काम करावे, असा मोलाचा सल्ला ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना दिला.

राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा प्रबोधिनी व अभ्यासिका  यांच्या वतीने आयोजित स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव प्रसंगी ते बोलत होते. इस्लामपूर येथील राजारामबापू पाटील नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमास आमदार गोपीचंद पडळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस उप अधीक्षक प्रणिल गिल्डा, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, तहसीलदार राकेश गीते, प्रदीप उबाळे, जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित देशमुख यांच्यासह मान्यवर,  स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.

‍ यशस्वी विद्यार्थ्यांच्या यशामागे त्यांच्या आई-वडिलांचा, पालकांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या प्रती नेहमीच कृतज्ञता ठेवावी, असे सांगून ग्रामविकास मंत्री श्री. महाजन म्हणाले, आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवावी. शासन सेवा मिळाल्याने सामान्य माणसाला शासनाच्या योजनांचा लाभ ‍मिळवून देण्यासाठी आग्रही रहावे. चांगल्या कामातून वेगळी ओळख निर्माण होत असते. यासाठी आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी आपुलकीने वागून त्यांचा आधार बना, असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

श्री. महाजन म्हणाले, यापुढे विद्यार्थ्यांनी कौशल्यावर आधारीत शिक्षण, प्रशिक्षण घेवून स्वत:चा व्यवसाय उद्योग सुरू करण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. शासन उद्योग व्यवसायाला आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देत असून याचा लाभ घेऊन यशस्वी उद्योजक बनावे. याबरोबरच तरूणांनी स्वत:ला व्यसनापासून दूर ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शासन सेवेत आलेल्या विद्यार्थ्यांनी शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहचवून सामान्य माणसाचे जीवन सुखकर करावे, असे आवाहन केले.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या, प्रशासनात काम करताना आव्हाने पेलावी लागतात. यासाठी मानसिक स्थितीबरोबरच संयम बाळगणे तितकेच महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने मिळालेल्या संधीचे सोने करून समाजाप्रति आपली संवेदना जपावी, असेही त्या म्हणाल्या.

पोलीस उप अधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून तरूणांनी कारणांच्या मागे न लागता कष्टाची तयारी ठेवावी, असा सल्ला  दिला.

यावेळी माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, सत्यजित देशमुख यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमात 125 हून अधिक स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव मंत्री महाजन व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

पुणे विभागातील घरगुती नळजोडणीची कामे मिशन मोडवर करण्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

मुंबई, दि. ४ : घरगुती नळजोडणीची कामे मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. पुणे विभागातील घरगुती नळजोडणीची प्रलंबित कामे मिशन मोडवर पूर्ण करुन दैनंदिन कामाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

पुणे विभागातील पाणीपुरवठा योजनांच्या कामाबाबतीत आढावा बैठक मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात झाली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्रधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, जलजीवन मिशनचे संचालक अमित सैनी, मुख्य अभियंता मनीषा पलांडे,    जलजीवन मिशन आणि जिल्हा परिषदेचे पुणे विभागातील मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संबंधित  अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, पुणे विभागातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषदेकडील पाणीपुरवठा योजनांची प्रलंबित कामे मिशन मोडवर पूर्ण करावीत. ठेकेदारांच्या कामाबाबत तक्रारी येऊ नये. ज्या तीर्थक्षेत्राला पाणीपुरवठा योजनेची गरज आहे तेथील योजनेचा सुधारित आराखडा तत्काळ सादर करण्यात यावा.

पुणे विभागातील सर्व जिल्ह्यातील ज्या पाणीपुरवठा योजनाची कामे बंद पडली आहेत, त्याचा आढावा घेऊन ती कामे पुन्हा तत्काळ सुरू करावीत. घरगुती नळजोडणीची  कामे  दर्जेदार व वेळेत पूर्ण व्हावी याकडे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे. ‘हर घर जल’ योजनाची कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत. ज्या पाणीपुरवठा योजनांना पाणी मिळण्यासाठी अडचणी आहेत त्या योजनांना कालवा सल्लागार समिती मार्फत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. जिल्हा परिषदेच्या नवीन पाणीपुरवठा योजनांच्या कामाला गती देण्याच्या सूचनाही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी दिल्या.

0000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

ग्रामीण भागात क्रीडा नैपुण्याला वाव देण्यासाठी अधिक चांगल्या सुविधा निर्माण करणार – क्रीडा मंत्री संजय बनसोडे

मुंबई, दि. ४ : ग्रामीण भागातील खेळाडूंच्या क्रीडा नैपुण्याला वाव देण्यासाठी अधिक चांगल्या सुविधा देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळेच सर्व क्रीडाविषयक सोयीसुविधांनी युक्त तालुका क्रीडा संकुल निर्मितीला प्राधान्य आहे. क्रीडा विभागाने सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील तालुका क्रीडा संकुलाचा परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी दिले. मौजे वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथील विस्तारित क्रीडा संकुलासाठी तत्वत: मंजुरी देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री श्री. बनसोडे यांनी मोहोळ क्रीडा संकुल आणि वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथे तालुका क्रीडा संकुलाबाबतची आढावा बैठक आज मंत्रालयात घेतली. त्यावेळी ते बोलत होते. आमदार यशवंत माने,  भारत शिक्षण संस्थेचे सचिव जितेंद्र साठे, क्रीडा विभागाचे उपसचिव सुनील हांजे, उपसंचालक (क्रीडा) अनिल चोरमले, मोहोळ तालुका  क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे, उत्तर सोलापूर तालुका क्रीडा अधिकारी सत्येन जाधव, हरिभाऊ घाडगे, समाधान कराड, भाऊसाहेब लामकाणे आदींची यावेळी उपस्थिती होते.

मंत्री श्री. बनसोडे यांनी मोहोळ हे सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर असल्याचे सांगितले. त्यामुळे येथील तालुका क्रीडा संकुलात खेळाडूंना आवश्यक सर्व सुविधा असणे अपेक्षित आहे. क्रीडा विभागाने त्या अनुषंगाने सुधारित परिपूर्ण प्रस्ताव तत्काळ सादर करावा. त्यास शासन निश्चितपणे सहकार्य करेल.  राज्य क्रीडा समितीच्या बैठकीत त्यास मंजुरी घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

उत्तर सोलापूर तालुका क्रीडा संकुल सोलापूर महानगरपालिका हद्दीत येते. जेथे जागा अपुरी असल्यामुळे विस्तारित क्रीडा सुविधा निर्माण करण्यास मर्यादा येत असल्याची बाब आमदार श्री. माने यांनी निदर्शनास आणून दिली. यावर सध्या वडाळा येथे विस्तारित क्रीडा संकुलासाठी तत्वत: मंजुरी देण्यात येत असल्याचे मंत्री श्री. बनसोडे यांनी सांगितले. याबाबतचा प्रस्ताव तालुका आणि जिल्हा पातळीवरुन तत्काळ सादर करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

००००

दीपक चव्हाण/विसंअ/

 

 

ताज्या बातम्या

महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२३ : लिपिक-टंकलेखक संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर

0
मुंबई, दि. ११ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दि. १७ डिसेंबर, २०२३ रोजी मुंबईसह छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, नाशिक व पुणे जिल्हाकेंद्रांवर घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०२३ मधील...

इटलीतील मॉन्टोन येथे नायक यशवंत घाडगे यांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण

0
नवी दिल्ली, दि. 11 : दुसऱ्या महायुद्धातील भारतीय वीर नायक यशवंत घाडगे यांच्या अतुलनीय शौर्यास श्रद्धांजली म्हणून इटलीतील मॉन्टोन शहरात त्यांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. भारताच्या...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या धैर्य, शौर्य, पराक्रमाचा वारसा लाभलेल्या बारा किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा...

0
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत महाराष्ट्रातील अकरा आणि जिंजी किल्ल्याच्या समावेशाबद्दल आनंद व अभिमान - उपमुख्यमंत्री अजित पवार तामिळनाडूतील जिंजीसह महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा...

छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास जागतिक पातळीवर पोहोचणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आनंद...

0
मुंबई दि. ११ : युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा समावेश झाल्याची घोषणा आज झाली असून, ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि...

देशातील सर्वोत्तम ‘ऑफ शोअर एअरपोर्ट’ मुंबईत उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. ११ : भारताला ‘मेरीटाईम पॉवर’ बनविणारे वाढवण बंदर जसे देशातील सर्वोत्तम 'ऑफ शोअर पोर्ट'  होणार आहे त्याचप्रमाणे सर्वोत्तम 'ऑफ शोअर एअरपोर्ट' मुंबईत उभारणार असून जे मुंबईतील तिसरे एअरपोर्ट...