रविवार, जुलै 13, 2025
Home Blog Page 1128

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयातून २४ तासात १३४ रुग्ण बरे होऊन घरी परतले

नांदेड (जिमाका) दि. ६ : येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात एकूण ८१९ रुग्णांनी ओपीडीमध्ये उपचार घेतला. सद्यस्थितीत ७६८ रुग्ण रुग्णालयामध्ये भरती आहेत. मागील २४ तासात म्हणजेच दि. ४ ते ५ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत एकूण १३६ नवीन रुग्णांची भरती झाली आहे. या २४ तासात १३४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, याचबरोबर या २४ तासात ११ अतिगंभीर रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात ३ नवजात बालक (पुरुष जातीचे १, स्त्री जातीचे २ ) व बालक १ (स्त्री जातीचे) व प्रौढ ७ (पुरुष जातीचे ६, स्त्री जातीचे १) यांचा समावेश आहे.

गत २४ तासात एकूण ४७ शस्त्रक्रिया झाल्या. यात ३४ रुग्णांवर मोठ्या शस्त्रक्रिया तर १३ रुग्णांवर लहान शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मागील २४ तासात २३ प्रसुती करण्यात आल्या. यात ९ सीझर होत्या तर १४ नॉर्मल प्रसुती झाल्या, अशी माहिती वैद्यकिय अधिक्षक डॉ. गणेश मनुरकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.

०००

आरोग्य सेवा-सुविधांचा दर्जा उंचाविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नियमित आढावा घ्यावा – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

सुपरस्पेशालिटी हॉस्पीटलची तपासणी

अमरावती, दि. 5 : रुग्णांना तत्काळ आरोग्य सेवा-सुविधा उपलब्ध होण्यासाठी शासनाव्दारे विभागात सर्वीकडे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालय, संदर्भसेवा रुग्णालय आदी निर्माण करण्यात आले आहेत. आरोग्य विभागाने सुध्दा नागरिकांच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य देत, रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक गरजूला तत्काळ उपचार सेवा पुरवाव्यात. याबाबत जिल्हा प्रशासनाने दररोज रुग्णालयांना भेटी देऊन तेथील सेवा-सुविधांची तपासणी करुन नियमित आढावा घ्यावा, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहातून महत्वाच्या राज्यस्तरीय आरोग्य विषयक व्हीसीला विभागीय आयुक्त ऑनलाईन सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी डॉ. पाण्डेय यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सेवा-सुविधा, औषधींचा साठा, वैद्यकीय उपचार यंत्र, उपकरणे, संसाधन, ओपीडी, आयपीडी रुग्ण यासंबंधी सविस्तर आढावा घेतला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, संदर्भसेवा रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. मेढे, प्रशासकीय अधिकारी श्री. कावळे प्रत्यक्षरित्या तसेच पाचही जिल्ह्यांचे वैद्यकीय अधिकारी दूरदृश्यप्रणालीव्दारे बैठकीला उपस्थित होते.

 डॉ. पाण्डेय म्हणाल्या की, नागरिकांना वेळेत आरोग्य सुविधा पुरविणे हे आरोग्‍य विभागाचे प्राधान्यक्रम काम आहे. त्यासाठी रुग्णालयात औषधींचा पुरेसा साठा, वैद्यकीय उपकरण-यंत्रे, वैद्यकीय तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ तसेच सर्व आजारांचे वैद्यकीय तज्ज्ञ सेवेत उपलब्ध ठेवावे. डॉक्टरांची रिक्त पदे तातडीने भरण्याची कार्यवाही करावी. रुग्णालय व रुग्णालयाचा परिसर स्वच्छ राहण्यासाठी स्वच्छता मोहिम नियमितपणे राबवावी. महात्मा फुले जन आरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करुन गरजूंना त्याचा लाभ मिळवून द्यावा. रुग्ण व त्यांच्या नातेवाईंकांच्या गाऱ्हाणी व तक्रारींच्या निराकरणासाठी तक्रारपेटी दर्शनी भागात लावण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.

नागरिकांना व रुग्णांना तात्काळ आरोग्य सेवा-सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच त्यात नियमितता राहावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने दररोज जिल्ह्यातील रुग्णालयांना भेट देऊन सेवा-सुविधांची तपासणी करुन नियमित आढावा घ्यावा. आवश्यक बाबींची पूर्तता संबंधित यंत्रणेकडून करुन घ्याव्यात, असे विभागीय आयुक्तांनी यावेळी सांगितले.

सुपरस्पेशालिटी हॉस्पीटलची तपासणी

बैठकीनंतर डॉ. पाण्डेय यांनी शहरातील सुपरस्पेशालिटी हॉस्पीटलला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील आरोग्य सेवा सुविधांची तपासणी केली. आयसीयुतील रुग्णांशी विभागीय आयुक्तांनी संवाद साधून उपचारासंबधी माहिती जाणून घेतली. ओपीडी-आयपीडी रुग्ण संख्या, वैद्यकीय उपकरणांची सद्यस्थिती, डॉक्टर्स व परिचारीकांची संख्या, सुरक्षा रक्षक, वाॅर्डातील रुग्णांची सद्यस्थिती याबाबत त्यांनी डॉक्टरांकडून आढावा घेतला. शिवभोजन थाली व नातेवाईकांना बसण्यासाठी बाक आदी सुविधा लोकांना चांगल्या वाटल्याबद्दल त्यांनी रुग्णालयाचे कौतूक केले. शुध्द पिण्याच्या पाण्याची सुविधा रुग्णालयात सर्वच ठिकाणी उपलब्ध करुन द्यावी. सुरक्षिततेच्या दृष्टीने आणखी सीसीटीव्ही कॅमेरे रुग्णालय परिसरात बसविण्यात यावेत, असे आदेश विभागीय आयुक्तांना रुग्णालय प्रशासनाला दिले.

0000

विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड यांची नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील अभिलेख कक्षाला भेट

नांदेड (जिमाका), दि. 5 :- मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक व अनिवार्य असलेले निझामकालीन पुरावे, महसुली पुरावे, निझामकाळात झालेले करार, निझामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी व इतर महत्त्वाची आवश्यक ती कागदपत्रे तहसिल व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अभिलेखात अर्थात भूमि अभिलेख कार्यालयाच्या दस्त यामध्ये मिळण्याची शक्यता अधिक आहे. हे लक्षात घेता त्यासंदर्भातील आवश्यक ती नोंद असलेली कागदपत्रे गांभीर्याने पडताळून तपासून शोधावीत, असे निर्देश छत्रपती संभाजीनगर विभागाचे आयुक्त मधुकरराजे अर्दड यांनी दिले. आज सायंकाळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील उपअधिक्षक भुमिअभिलेख कार्यालयाला भेट देऊन विविध कागदपत्रे पडताळून पाहिली.

यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, भूमि अभिलेख अधीक्षक गजानन दाबेराव, भूमि अभिलेख उपअधीक्षक बळवंत मस्के व इतर अधिकारी उपस्थित होते.

नमुना नंबर 33 लातूर जिल्ह्यात मिळाला. यासारखी इतर कागदपत्रे नांदेड जिल्ह्याच्या अभिलेखात मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचबरोबर अनेक कागदपत्रे हे उर्दू व मोडी लिपीतून असल्याने ही भाषा जाणणाऱ्या तज्ज्ञांकडून ती तातडीने पडताळून घेण्याचे विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

00000

रायगड जिल्ह्यातील प्रादेशिक पर्यटन विकासांतर्गत कामे गतीने पूर्ण करावेत – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. 5 : रायगड जिल्ह्यातील प्रादेशिक पर्यटन विकासांतर्गत श्रीवर्धन, म्हसळा, तळा, माणगाव, रोहा येथील विविध  विकास कामे  सुरू असून  यासाठी ५७ कोटी ३० लाख रुपयांची तरतूद आहे.  ही कामे  विहित वेळेत प्राधान्याने पूर्ण करावेत, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

श्रीवर्धन मतदार संघातील प्रादेशिक पर्यटन विकास कामांबाबत मंत्रालयात आज बैठक झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भारत बास्टमोड, पर्यटन विभागाच्या सहसचिव उज्ज्वला दांडेकर, उपवनसंरक्षक (रोहा) अप्पासाहेब निकत, मुख्याधिकारी (म्हसळा) विठ्ठल राठोड आदी उपस्थित होते.

मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपालिका, रायगड पाटबंधारे विभाग, जिल्हा परिषद, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग आणि पर्यटन संचालनालय यांनी त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रादेशिक पर्यटनाच्या विकास कामांना गती द्यावी.

दिवेआगार येथे कासव संवर्धन प्रकल्प उभारणे, पर्यटन मार्केट सुविधा तयार करणे, तळा महादेव तलाव परिसराची पर्यटनदृष्ट्या सुधारणा करणे, मोरबा येथील गाव तलावाचे सुशोभीकरण करणे, रोहा नगरपरिषद हद्दीतील मंदिर परिसराचे सुशोभीकरण करणे, श्रीवर्धन समुद्रकिनारी धूप प्रतिबंधक बंधाऱ्यावर सुशोभीकरण करणे, रोहा येथील ग्रामपंचायत पाटण – सई हद्दीतील कामे, जोगेश्वरी मंदिर परिसर सुशोभीकरण, मौजे नागोठाणे येथील सरखेल कान्होजी आंग्रे यांचे पुरातन निवासस्थान सुशोभीकरण,   रोहा नगरपरिषद हद्दीतील हनुमान टेकडी परिसर सुशोभीकरण, तळघर येथील तलावाचे संवर्धन करणे  अशी रायगड जिल्ह्यातील प्रादेशिक पर्यटन विकासांतर्गत सन २०२१-२२ मधील श्रीवर्धन, म्हसळा, तळा, माणगाव, रोहा येथील विविध  ४४ कोटी ७९ लाख रुपयांची कामे प्राधान्याने पूर्ण करावेत.

श्रीवर्धन शहरातील पर्यटक निवासी इमारतींचे नूतनीकरण, तलाव कुंडाचे नूतनीकरण,म्हसळा येथील जानसई नदी सुशोभीकरण कामे, श्रीवर्धन येथील मंदिर विकासाची कामे, रोहा नगरपरिषद हद्दीतील शिवसृष्टी परिसर सुशोभीकरण, रोहा येथे शिवसृष्टी शिल्प तयार करणे, तळा येथील कुडा लेणी येथे पर्यटनाच्या मूलभूत सुविधा निर्माण करणे, अशी सन 2022 -23 मधील बारा कामे १२ कोटी ५१ लाखांची असून  सर्व यंत्रणांनी हे कामे गतीने पूर्ण करावेत, असेही निर्देश मंत्री कु. तटकरे यांनी दिले.

*****

संध्या गरवारे/विसंअ/

कोल्हापूरच्या शेंडापार्क येथील आयटी पार्कसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ३० हेक्टर जागा – उपमुख्यमंत्री अजित पवार

            मुंबईदि.  :- कोल्हापुरात संगणकमाहिती तंत्रज्ञान उद्योगांची वाढ व्हावीस्थानिक युवकांना रोजगार मिळावा यासाठी शेंडापार्क परिसरात आयटी पार्क उभारण्यात यावे. शेंडापार्क येथील आयटी पार्कसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ३० हेक्टर जागा उपलब्ध करून द्यावी. या जागेच्या बदल्यात कृषी विद्यापीठास त्यांच्या विविध प्रकल्पांसाठी शहरालगतची ५० हेक्टर जागा द्यावीअसे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात कोल्हापूरच्या शेंडापार्क परिसरात आयटी पार्क उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत बैठक झाली. बैठकीस वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफकृषी मंत्री धनंजय मुंडेशालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरआमदार ऋतुराज पाटीलआमदार जयश्री जाधवमहात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटीलवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितिन करीरमहसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवराकृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमारनियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजयउद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळेकोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार (व्हीसीद्वारे)एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन शर्मा (व्हीसीद्वारे) आदी उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीकोल्हापूरची वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणाचा वेग लक्षात घेता येथील विद्यार्थीयुवकांना स्थानिक परिसरात रोजगार उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यासाठी शहरातील शेंडा पार्क येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ३० हेक्टर जागा आयटी पार्क साठी उपलब्ध करुन द्यावी. यामुळे विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाच्या आणि तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. आयटी पार्कसाठी कृषी विद्यापीठाची मोकळी ३० हेक्टर जागा देतानाविद्यापीठाला पर्यायी ५० हेक्टर जागा उपलब्ध करून द्यावी. शहरातील या क्षेत्रापासून विमानतळ आणि पुरेशा नागरी सुविधा उपलब्ध असल्याने आंतरराष्ट्रीय कंपन्यांची गुंतवणूक वाढण्यास मदत होणार आहे. आंतरराष्ट्रीय कंपन्यांना पुण्यानंतर कोल्हापूर हा चांगला पर्याय आहे. आयटी पार्कची उभारणी निश्चित कालमर्यादेत करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. कोल्हापूर शहरात असलेले शासकीय आयटीपार्क पूर्ण क्षमतेने सुरू करण्याच्या प्रक्रियेस गती द्यावीअसेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

००००

श्रद्धा मेश्राम/ससं/

श्रीमंत पेशवे यांच्या श्रीवर्धन येथील स्मारकाचा आराखडा तयार करावा – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. 5 : श्रीवर्धन (जि. रायगड) येथील श्रीमंत पेशवे यांच्या नियोजित स्मारकासाठी सर्व परवानग्या जलदगतीने घेऊन आराखडा उत्कृष्टरितीने तयार करावा, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

            मंत्रालयातील दालनात यासंदर्भात आयोजित बैठकीत मंत्री कु. तटकरे बोलत होत्या. यावेळी धर्मादाय आयुक्त महेंद्र महाजन, मुख्याधिकारी (श्रीवर्धन) विराज लबडे, नारायण देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त प्रसाद पेंडसे, प्रतिनिधी अविनाश गोगटे, श्रेयस जोशी, लक्ष्मी नारायण देवस्थानचे प्रतिनिधी गजानन करमरकर उपस्थित होते.

                  यावेळी स्मारकाच्या जागेचा प्रश्न सोडविण्यासाठी सर्व यंत्रणांनी तातडीने मार्ग काढावा, अशी सूचना मंत्री कु. तटकरे यांनी केली. देवस्थान समितीने स्मारकासाठी जागा देण्याबाबत सकारात्मक चर्चा केली, तरीही याबाबतीत काही अडचणी असल्यास धर्मादाय आयुक्त यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन त्याप्रमाणे कार्यवाही करावी, अशा सूचना मंत्री कु. तटकरे यांनी केल्या.

             मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, नगरविकास, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागांनी स्थानिक ठिकाणी आवश्यक त्या परवानग्या विहीत वेळेत घेऊन या कामाला गती द्यावी. या ठिकाणी उभारण्यात येणारे स्मारक आपल्या इतिहासाचे साक्षीदार ठरेल असे स्मारक उभारण्यासाठी सर्वांच्या सूचना लक्षात घेऊन काम करावे. रायगड जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटक, इतिहासप्रेमी  आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारे हे स्मारक होईल, अशी अपेक्षाही यावेळी मंत्री कु. तटकरे यांनी व्यक्त केली.

*****

संध्या गरवारे/विसंअ/

मुंबई (पूर्व) प्रादेशिक परिवहन कार्यालयात दुचाकी वाहनांच्या नोंदणीसाठी नवीन मालिका

मुंबई, दि. ५ : प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) येथे दुचाकी वाहनांसाठी असलेली एमएच०३इएच (MH03EH) ही मालिका संपत आहे. त्यामुळे दुचाकी वाहनांसाठी एमएच०३इजे (MH03EJ) नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका सुरू करण्यात येणार आहे.

ज्या वाहन धारकांना आपल्या वाहनांसाठी या नवीन क्रमाकांच्या मालिकेतून आकर्षक अथवा पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करावयाचा असेल, त्यांनी विहीत नमुन्यातील अर्ज, पत्त्याचा पुरावा, छायाचित्र ओळखपत्र, पॅनकार्ड आणि पसंतीच्या क्रमांकासाठीच्या प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) (REGIONAL TRANSPORT OFFICE MUMBAI (EAST)) किंवा RTO MUMBAI (EAST)  यांच्या नावे काढलेल्या विहीत शुल्काचा राष्ट्रीयकृत बँकेच्या धनाकर्षासह 9 ऑक्टोंबर 2023 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) कार्यालयात सादर करावा.

एकाच नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास राज्य शासनाच्या 8 मे 2016 च्या अधिसुचनेनुसार नियमित शुल्का व्यतिरिक्त सर्वात जास्त रकमेच्या धनाकर्ष सादर करणाऱ्यास सदर नोंदणी क्रमांक देण्यात येणार आहे. आकर्षक व पसंतीचा नोंदणी क्रमांक देण्यासाठीची कार्यपद्धती कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आलेली आहे. अनधिकृत व्यक्तीकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी वाहन धारकांनी स्वत: कार्यालयात अर्ज करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

००००

नीलेश तायडे/विसंअ/

विधानपरिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त आजी-माजी सदस्यांचा स्नेहमेळावा आणि परिसंवाद

मुंबई, दि. ५ : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त विद्यमान आणि विधानपरिषदेच्या माजी सदस्यांसाठी परिसंवाद आणि स्नेहमेळावा लवकरच आयोजित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विधानपरिषदेतील गटनेते आणि सदस्यांची आज बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत या परिसंवाद आणि स्नेहमेळाव्याचे उद्घाटन सत्र व्हावे, असे निश्चित करण्यात आले.

या बैठकीत विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त प्रकाशित करावयाच्या संदर्भसमृद्ध ग्रंथांच्या कामाचा आढावा देखील घेण्यात आला. विधानपरिषद या दुसऱ्या सभागृहाचे महत्त्व आणि वैशिष्ट्य, गत १०० वर्षातील महत्वपूर्ण विधेयके, ठराव, विधानपरिषदेमध्ये लोकहिताच्या महत्वाच्या प्रश्नांवर, विषयांवर झालेल्या चर्चा, शंभर वर्षे शंभर भाषणे आणि छायाचित्रांचे संकलन असलेले कॉफी टेबल बुक अशी पाच प्रकाशने प्रस्तावित असून त्यात कोणकोणते महत्वाचे संदर्भ समाविष्ट करण्यात यावेत यावर उपस्थित मान्यवरांनी महत्वपूर्ण सूचना या बैठकीत केल्या.

प्रस्तावित प्रकाशने आणि परिसंवाद यासंदर्भात ज्येष्ठ विद्यमान आणि माजी सदस्य, ज्येष्ठ पत्रकार, राजकीय अभ्यासकांना काही सूचना करावयाच्या असल्यास त्यांनी लेखी स्वरूपात आपले मत विधानमंडळाकडे अवश्य कळवावे, असे आवाहन विधानपरिषद उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी केले आहे. हा परिसंवाद आणि स्नेहमेळावा सर्वांनी मिळून यशस्वी करावा आणि ज्येष्ठांचे सभागृह असा लौकिक प्राप्त झालेल्या विधानपरिषदेच्या शतक महोत्सव सुवर्णक्षणांचे साक्षीदार व्हावे, असे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी म्हटले आहे.

याबैठकीस माजी मंत्री ॲड. अनिल परब, सदस्य कपिल पाटील, सत्यजित तांबे, विधानमंडळ सचिवालयाचे सचिव २ विलास आठवले, उपसभापती यांचे खासगी सचिव रवींद्र खेबुडकर, विशेष कार्य अधिकारी अविनाश रणखांब, विधिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी नीलेश मदाने, ग्रंथपाल आणि उपग्रंथपाल अनुक्रमे नीलेश वडनेरकर आणि शत्रुघ्न मुळे उपस्थित होते.

००००

 

महिला घरेलू कामगारांच्या प्रश्नावर राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. 5 : महिला घरेलू कामगारांची नोंदणी करणे, वेतन विषयक विविध प्रश्न, जनश्री विमा योजना लागू करणे या विविध प्रश्नांसाठी कामगार विभाग यांच्या समन्वयातून  महिला घरेलू कामगारांच्या प्रश्नावर शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य घरेलु कामगार समन्वय समितीची बैठक आज मंत्रालयात आयोजित केली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या.

मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, उच्च न्यायालय यांनी दिलेल्या निर्णयानुसार मंडळाच्या त्रिपक्षीय मंडळाची स्थापना करणे, किमान वेतन, घरेलू महिला कामगारांना जनश्री विमा योजना लागू करणे, ५५ वर्षांवरील महिला घरेलू कामगारांचे वेतनविषयक इतर प्रश्नांबाबत कामगार विभागाशी चर्चा करून याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल.

यावेळी राष्ट्रीय घरेलू कामगार चळवळ, महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघ, कामगार एकता युनियन, विदर्भ मोलकरीण संघटना, महाराष्ट्र महिला परिषद, महामाया समाज विकास ट्रस्ट, जनकल्याण सोशल फाऊंडेशन, सावित्रीबाई फुले घरेलू कामगार संघटन,  सीएफटीयूआय, महाराष्ट्र घरकामगार विकास संघटन, घर हक्क संघर्ष समिती, कष्टकरी घरकामगार संघटना, निर्माण मजदूर, श्रमजिवी संघटना, विश्वशांती महिला विकास मंडळ, आनंद आधार घरेलु कामगार संघटना, श्रमिक किमयागार संघटना, महाराष्ट्र फेरीवाला महासंघ, महाराष्ट्र असंघटित कामगार संघटना, घर कामगार मोलकरीण संगठना, कष्टकरी संघर्ष महासंग, सर्व श्रमिक संघटना, ओएचएससी, मोलकरीण घरेलू कामगार संघ, गृहकार्य सेवा श्रमिक संघटना, महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार संघटना, महाराष्ट्र कष्टकरी घरकामगार संघटना, मोलकरीण पंचायत, श्रमजीवी संघटना, घरकुल संघर्ष समिती, एआटीयूसी, सुराज्य श्रमिक सेना, भाकर फाऊंडेशनचे सदस्य उपस्थित होते.

००००

संध्या गरवारे/विसंअ/

शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘आयटी’ उपक्रम प्रभावीपणे राबवावा – कृषिमंत्री धनंजय मुंडे

मुंबई, दि. 5 : राज्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट पोहोचवण्याच्या प्रक्रियेत माहिती तंत्रज्ञान विभागाचा वाटा लक्षणीय असून शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी कृषी आणि माहिती तंत्रज्ञान विभागाने समन्वयाने काम करावे, अशा सूचना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केल्या.

कृषी विभागामार्फत कार्यान्वित आयटी उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, माहिती तंत्रज्ञान विभागाच्या (महा आयटी) व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज, कृषी विभागाच्या सहसचिव सरिता बांदेकर, फलोत्पादन विभागाचे संचालक कैलास मोते यांची उपस्थिती होती.

कृषी विभागाच्या विविध 27 योजना महाडीबीटी पोर्टलमार्फत सुरू असून आतापर्यंत 34 लाख शेतकऱ्यांनी नोंदणी करून विविध योजनांसाठी एक कोटी दोन लाख अर्ज केले आहेत. या माध्यमातून शासनाकडे शेतकऱ्यांची व त्यांच्या जमीन आणि पीक प्रक्रियेची माहिती संकलित झाली आहे.

कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टल, महाकृषी मोबाईल ॲप्लिकेशन व वेब पोर्टल, क्रॉपसॅप, क्रॉपवॉच, कृषी निविष्ठा विक्री परवाना वितरण कार्यप्रणाली, फार्मर डेटाबेस, महाॲग्रीटेक, पर्जन्यमापन आणि विश्लेषण, ई-ठिबक, ई- सॉईल ३.००, नमो शेतकरी महा सन्मान निधी या योजनेअंतर्गत सुरू असलेला तांत्रिक प्रक्रियेचा आढावा यावेळी कृषी मंत्री श्री. मुंडे यांनी घेतला. तसेच प्राप्त अर्जांच्या तुलनेत लाभार्थींची संख्या वाढवण्याची महत्त्वपूर्ण सूचना कृषी विभागाला केली.

शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या लाभांची प्राथमिकता ठरविण्यात यावी. तांत्रिक बाबतीत सुधारणा करण्यात यावी, प्रथम येणाऱ्या अर्जाला प्रथम प्राधान्य देण्यात यावे. संपूर्ण पूर्तता करून आलेले सर्व अर्ज मंजूर करून उपलब्ध निधीनुसार लाभ देण्यात यावा. लॉटरी पद्धत बंद करण्याबाबत तातडीने कार्यवाही व्हावी, शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी सुधारित एसओपी तयार करण्यात यावी, अशा सूचना मंत्री श्री. मुंडे यांनी दिल्या.

००००

राजू धोत्रे/विसंअ/

ताज्या बातम्या

सामाजिक न्याय विभागाच्या शैक्षणिक सहाय्य योजना

0
वंचित घटकांतील नागरिकांना शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा या क्षेत्रात समान संधी आणि सामाजिक न्याय सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग...

कामठीतून जाणाऱ्या जबलपूर-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरण होणार

0
▪️कामठीत साकारणार भव्य व्यापारी संकुल नागपूर, दि. १२ : कामठी शहरातून नागपूर-जबलपूर हा राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने कामठी शहरात होणाऱ्या वाहतूकीच्या कोंडीवर मात काढण्यासाठी आज...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते माळेगाव येथील क्रीडा संकुलाच्या बहुउद्देशीय हॉलचे भूमिपूजन

0
बारामती, दि.१२: माळेगाव येथील तालुका क्रीडा संकुलाच्या बहुउद्देशीय हॉलचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक...

कराड – चिपळूण महामार्गाचे पाटण तालुक्यातील काम १५ डिसेंबर आधी पूर्ण करा -पालकमंत्री शंभूराज...

0
सातारा दि. १२ : पाटण तालुक्यातील कराड - चिपळूण राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचे काम पाऊस कमी झाल्यानंतर 15 डिसेंबरच्या आधी पूर्ण करावे, असे निर्देश पालकमंत्री...

मिरगाव येथील भूस्खलन बाधितांना पक्की घरे मिळण्यासाठी डिसेंबरअखेर काम पूर्ण करा -पालकमंत्री शंभूराज देसाई

0
सातारा, दि. १२ :  मिरगाव येथील अतिवृष्टीमुळे भूस्खलन झालेल्या बाधित कुटुंबांना पक्की घरे ताब्यात मिळण्यासाठी येत्या डिसेंबर अखेर काम पूर्ण करावे, अशा सूचना पर्यटन,...