गुरूवार, जुलै 17, 2025
Home Blog Page 1123

आदिवासी बांधवांचे स्थलांतर रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीवर भर देणार – आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित  

नाशिक, दिनांक 13 (जिमाका वृत्तसेवा): आदिवासी बांधवांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासन विविध योजना राबवित आहे. या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून स्थानिक पातळीवरच रोजगाराची अधिक साधने निर्माण करुन त्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली.

येथील शासकीय विश्रामगृहात संसदीय संकुल विकास परियोजनेची आढावा बैठक मंत्री डॉ. गावित यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, नंदूरबारच्या खासदार डॉ. हीना गावित, आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड, नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, व्ही. सतीष, डॉ गजानन डांगे, अपर आयुक्त रविंद्र ठाकरे, (नागपूर) संदीप गोलाईत (नाशिक) प्रकल्प अधिकारी (कळवण) विशाल नरवडे, प्रतिभा संगमनेरे,  ए. डी. गावित, किशोर काळकर आदी उपस्थित होते.

मंत्री डॉ. गावित म्हणाले की, संसदीय संकुल विकास योजना देशातील अनुसूचित जमाती लोकसभा मतदार संघात राबविण्यात येत आहे. यात महाराष्ट्रातील नंदूरबार, दिंडोरी, गडचिरोली या मतदार संघाचा समावेश आहे. नंदूरबार मतदार संघात नटावद संकुल, दिंडोरी मतदार संघात भोरमाळ संकुल तर गडचिरोली मतदार संघात चानगाव संकुल या तीन ठिकाणी ही योजना राबविण्यात येत आहे. या भागातील आदिवासी बांधवांचे रोजगारासाठीचे स्थलांतर रोखण्यासाठी त्यांना स्थानिक पातळीवरच रोजगार उपलब्ध होण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या नागरीकांचे स्थलांतर रोखण्यासाठी ज्यांचेकडे जमिनी आहे, त्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध होण्यासाठी नदीनाल्यांचे पाणी अडविणेकरीता उपाययोजना सुरु आहेत. शासकीय योजना राबविताना या गावांचा प्राधान्याने विचार करुन या क्षेत्रातील नागरीकांना शासकीय योजनांच्या लाभासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे त्यांना तातडीने उपलब्ध करुन द्यावी, या भागातील कुटुंबाना घरकुल योजनेचा लाभ द्यावा, मोह फुलासारखे वनोपज असलेल्या भागात प्रोसेसिंग युनिट उपलब्ध करुन देण्यात येत आहे. याशिवाय रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्यात येणार असून दुर्गम भागातील पाडे, वस्त्या जोडणारी रस्ते बारमाही करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्याचबरोबर या नागरीकांची बांधकाम मजूर म्हणून नोंदणी करुन घ्यावी. शिवाय कुसूम योजनेचा लाभ देण्यासाठी लाभार्थी हिश्श्याची येणारी अडचण सोडविण्यासाठी तसेच नावाजलेल्या खेळाडूंना चांगले प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी आदिवासी विकास विभाग पुढाकार घेईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्राथमिक सुविधांच्या उपलब्धतेवर भरराज्यमंत्री डॉ. भारती पवार

केंद्र शासनाने देशभरात काही जिल्हे आकांक्षित जिल्हे म्हणून घोषित केले आहे. या जिल्ह्यात प्राथमिक सुविधा उपलब्ध करुन देण्यावर केंद्र व राज्य शाासनाचा भर आहे. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा हा तालुका आकांक्षित तालुका म्हणून घोषित करण्यात आला आहे. या तालुक्यात घाट माथ्यामुळे रस्त्यांच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात अडचणी येत असल्या तरी त्यावर उपाययोजना करण्यात येत आहे. संसदीय संकुल विकास योजनेत भोरमाळ संकुलात जल, जंगल, जमीनी बरोबर दुधाळ जनावरांचे वाटप करुन आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यावर भर देण्यात येत आहे. या क्षेत्रातील नागरीकांना केंद्र व राज्य शासनामार्फत शिक्षण, आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले.

खा. डॉ गावित यावेळी म्हणाल्या की, नटावद (नंदूरबार) संकुलात तीन शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यात आल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून  स्थानिकांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होत आहे. याशिवाय बचत गटांच्या माध्यमातूनही रोजगार निर्मितीवर भर देण्यात येत आहे. व्ही. सतीष म्हणाले की, या क्षेत्रातील नागरीकांचे रोजगारासाठी होणार स्थलांतर रोखण्यासाठी वनधन योजना, एकलव्य स्कुल, आदि आदर्श ग्राम  योजनांच्या माध्यमातून या क्षेत्रात निश्चित बदल होईल. तर स्थलांतर थांबविण्यासाठी शासकीय योजना व कार्यक्रमांमध्ये स्थानिक नागरीकांचा सहभाग वाढणे आवश्यक असल्याचे डॉ डांगे यांनी सांगितले. गडचिरोली संकुल क्षेत्राबाबत अक्षय वट्टी यांनी माहिती दिली.

श्रीमती बनसोड म्हणाल्या की, आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून या क्षेत्रात अधिक मदत करण्यात येईल तसेच या भागातील तरुण-तरुणींना  कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येईल. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मित्तल म्हणाल्या की, सुरगाणा तालुक्यात स्ट्रॉबेरी क्लस्टर उभारण्याचा मानस असून नंदूरबार जिल्हा परिषदेच्या धर्तीवर जिल्हा परिषद आपल्या दारी हा उपक्रम सुरगाणा तालुक्यात राबविण्यात येईल. यावेळी नाशिक, नंदूरबार व गडचिरोली जिल्हा परिषद, आदिवासी प्रकल्प कार्यालय व इतर विभागांच्यावतीने या क्षेत्रात सुरु असलेल्या कामांची माहिती बैठकीत दिली.

बैठकीच्या प्रास्ताविकात ए. डी. गावित यांनी संसदीय संकुल विकास परियोजनेची माहिती, या योजनेतंर्गत आतापर्यंत झालेल्या कामाची व पुढील कामकाजाची रुपरेषा विशद केली.

या बैठकीस नाशिक, नंदूरबार व गडचिरोली जिल्हा परिषद, प्रकल्प कार्यालय व इतर विभागांचे अधिकारी, योजक फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते.

मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपद्धतीसाठी नेमलेल्या समितीचा १९ ऑक्टोबर रोजी परभणी जिल्ह्याचा दौरा

छत्रपती संभाजीनगर,दि.13: मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहीत करण्यासाठी गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) व समिती सदस्य यांच्या 16 ऑक्टोबर रोजीच्या दौऱ्यात बदल करण्यात आला असून आता 19 ऑक्टोबर 2023  रोजी परभणी जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

या दौऱ्यादरम्यान, समितीचे अध्यक्ष व सदस्य कामकाजाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे बैठक घेणार आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्याकडील उपलब्ध निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसुली पुरावे, निजाम काळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज इ. समितीस उपलब्ध करुन देण्यात यावीत. पुरावे दुपारी 2 ते 4 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयात उपलब्ध करुन देण्यात यावीत, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

लातूर जिल्ह्यातील एमआयडीसी निर्मितीच्या कामांना गती देणार – उद्योगमंत्री उदय सामंत

  • उद्योगांना पायाभूत सुविधा निर्मिती, विमानतळ विकासाला प्राधान्य

  • लातूर एमआयडीसी पाणीपुरवठ्यासाठी नवीन जलवाहिनी टाकणार

लातूर, दि. 13 (जिमाका) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील मंत्रिमंडळ बैठकीमध्ये लातूर जिल्ह्यात नवीन एमआयडीसीबाबत घोषणा केली होती. त्या अनुषंगाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. या एमआयडीसी निर्मितीला गती देण्यात येणार असून नागरिक, लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने भूसंपादनाची कार्यवाही पूर्ण केली जाईल, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज येथे सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन सभागृहात आयोजित लातूर जिल्हा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व उद्योग विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, आमदार विक्रम काळे, आमदार बाबासाहेब पाटील, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली मुळे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, सहायक जिल्हाधिकारी नमन गोयल, माजी आमदार गोविंद केंद्रे यावेळी उपस्थित होते.

लातूर येथे अतिरिक्त एमआयडीसी टप्पा-2 सोबतच उदगीर, चाकूर  येथे एमआयडीसी उभारण्यात येणार असून जळकोट येथे मिनी एमआयडीसी उभारण्यास तत्वतः मान्यता देण्यात येत आहे. चाकूर एमआयडीसी निर्मितीसाठी 266 हेक्टरचा प्रस्ताव लवकरच उच्च स्तरीय समिती समोर मांडला जाणार आहे. लातूर येथे अतिरिक्त एमआयडीसी टप्पा- 2 साठी 482 हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार असून याबाबतची कार्यवाही गतीने करण्यात येईल, अशी माहिती उद्योगमंत्री ना. सामंत यांनी दिली.

जिल्ह्यातील उद्योगांचा विकास होण्यासाठी पायाभूत सुविधांच्या निर्मितीला प्राधान्य राहणार असून विमानतळाच्या विकासासाठी आवश्यक भूसंपादनाची कार्यवाही गतिमान करण्यात येणार आहे. विमानतळासाठी 48 हेक्टर क्षेत्र आवश्यक असून आतापर्यंत 38 हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात आले असून आणखी 10 हेक्टर भूसंपादन करणे आवश्यक आहे. त्यावर तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. लातूर एमआयडीसीमधील उद्योगांना पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी जुनी झाल्यामुळे अनेकदा जलगळती होते. त्यामुळे मांजरा धरण ते एमआयडीसी दरम्यान नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत निधी देण्यात येईल, असे ना. सामंत यावेळी म्हणाले.

जिल्ह्यातील एमआयडीसीमधील कामांसाठी 43 कोटी रुपये मंजूर

लातूर जिल्ह्यातील एमआयडीसी क्षेत्रातील विविध विकासकामांसाठी 43 कोटी रुपये मंजूर करण्यात येत असल्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली. यामध्ये लातूर अतिरिक्त एमआयडीसीमधील विविध विकास कामे, औसा औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांचे बळकटीकरण, अहमदपूर औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांचे बळकटीकरण व पाणी पुरवठाविषयक कामांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करा

बेरोजगार युवक-युवतींना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या योजनेतून जिल्ह्यात 760 उद्योग उभारणीचे उद्दिष्ट देण्यात आले असून हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. या योजनेमध्ये बँकांची भूमिका महत्त्वाची असून प्रत्येक पात्र लाभार्थ्याला या योजनेचा लाभ देण्यासाठी बँकांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा, अशा सूचना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिल्या.

विश्वकर्मा योजनेच्या लाभासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बारा बलुतेदारांमधील 18 घटकांसाठी विश्वकर्मा योजना जाहीर केली आहे. पारंपारिक व्यवसाय करणाऱ्यांसाठी ही योजना अतिशय उपयुक्त ठरणार आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना देण्यासाठी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत या योजनेची माहिती पोहोचविण्याच्या सूचना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिल्या.

उद्योगमंत्र्यांनी जाणून घेतल्या उद्योजकांच्या समस्या

लातूर जिल्हा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व उद्योग विभागाचा आढावा घेण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत हे लातूर येथे आले होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनमध्ये जिल्ह्यातील उद्योजकांशी संवाद साधला. यावेळी उद्योजकांनी केलेल्या वीज, पाणी, पायाभूत सुविधाविषयक मुद्दे मांडले. या अनुषंगाने तत्काळ कार्यवाही करून उद्योजकांना जास्तीत जास्त सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे ना. सामंत यांनी यावेळी सांगितले.

पाणीपुरवठा योजना कामांच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष द्या – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. १३: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजना, जलजीवन मिशन, हर घर जल योजना आणि नळजोडणी कामांचा आढावा घेतला. पाणीपुरवठा  योजना यशस्वी होण्याच्या दृष्टीने कामाच्या गुणवत्तेबाबत विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश श्री.पवार यांनी यावेळी दिले.

यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधीक्षक अभियंता वैशाली आवटे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री म्हणाले, वीजेअभावी योजना बंद पडण्याची समस्या दूर करण्यासाठी सौर ऊर्जेवर योजना राबवावी. ‘हर घर जल’ योजनेचे उद्दिष्ट निर्धारित वेळेत पूर्ण करावे. पाणीपुरवठा  योजनेची कामे चांगल्या दर्जाची होतील व योजना बंद पडणार नाही याची दक्षता घ्यावी.  महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने कालबद्ध नियोजन करून योजना लवकर पूर्ण कराव्यात. पाणी वितरणासाठी पाईप चांगल्या दर्जाचे वापरावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला जागा उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.चव्हाण यांनी जिल्हा परिषदेकडील योजनांची आणि श्रीमती आवटे यांनी मजीप्राकडील योजनांची माहिती दिली.

सर्वसामान्य रुग्णांकडे दुर्लक्ष झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई – उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयाचा आढावा

पुणे, दि. १३: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांचा आढावा घेतला. सर्वसामान्य रुग्णाला शासकीय रुग्णालयातील सुविधांचा लाभ द्यावा; या संदर्भात दुर्लक्ष झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे श्री.पवार यांनी यावेळी नमूद केले.

बैठकीस आमदार सुनिल टिंगरे, सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ येमपल्ले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे, बारामती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यावेळी म्हणाले, आरोग्य सुविधांसाठी राज्यस्तरावरून अधिकचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आवश्यकता असल्यास जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातूनही निधी देण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांनी औषधाची कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्यावी. येत्या मार्चअखेरपर्यंत दोन्ही महापालिका क्षेत्रात खाटांची संख्या वाढवावी. ससून रुग्णालयात अत्याधुनिक उपचार उपलब्ध करून देण्यात आले असून त्याचा सर्वसामान्य रुग्णाला लाभ झालाच पाहिजे. यात दुर्लक्ष झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल.

रुग्णालय परिसर स्वच्छ ठेवावीत. बाह्य स्रोताद्वारे वर्ग-४ पदे त्वरित भरण्यात यावी. शहरी भागात आयुष्मान कार्ड वितरणाच्या नोंदणीला गती द्यावी आणि जिल्हा राज्यात प्रथम राहील असे प्रयत्न करावे. ग्रामीण भागात वैद्यकीय अधिकारी आरोग्य केंद्रात उपस्थित राहतील यावर लक्ष द्यावे. शासकीय रुग्णालयात आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी डॉ.ठाकूर यांनी ससून रुग्णालयातील सुविधांची माहिती दिली. रुग्णालयातील उपचार सुविधेत वाढ करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ.येमपल्ले आणि डॉ.हंकारे यांनी सादरीकरणाद्वारे जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधांची माहिती दिली.

जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात स्वच्छता अभियान गांभीर्याने राबवा

जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात स्वच्छता पंधरवड्याचे आयोजन करण्यात यावे आणि कार्यालये स्वच्छ व सुंदर दिसतील यासाठी गांभीर्याने प्रयत्न करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी दिले.

ते म्हणाले, या अभियानात अधिकारी- कर्मचाऱ्यांचा सहभाग घेण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात यावे. शासकीय कार्यालयांचा परिसर स्वच्छ राहील यासाठी अधिकाऱ्यांना प्रोत्साहित करावे. जिल्ह्यातील स्वच्छ कार्यालयांना जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्रोत्साहन म्हणून पारितोषिक देण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

विद्युत पारेषण वाहिन्यांच्या कामांना गती द्यावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. १३: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृह येथे पुणे जिल्हा व पुणे शहरामधील विद्युत पुरवठ्याच्या विविध योजना व इतर प्रश्नांबाबत महावितरण आणि महापारेषण अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. विद्युत पारेषण वाहिन्यांच्या कामांना गती द्यावी, २०३० पर्यंत स्थानिक वीजेची मागणी लक्षात घेऊन सुधारित वितरण क्षेत्र योजनेअंतर्गत उपकेंद्रांसाठी आराखडा तयार करावा, असे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी आमदार सुनिल टिंगरे, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार, बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील पावडे, महापारेषणचे मुख्य अभियंता अनिल कोलप, अधीक्षक अभियंता युवराज जरग, अरविंद बुलबुले आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी जेजुरी – हिंजवडी (फेज-३) ४०० केव्ही वितरण वाहिनी, २२० केव्ही उर्से ते चिंचवड वाहिनी, २२० केव्ही खेड सिटी आणि २२० केव्ही चिंचवड ते हिंजवडी वाहिनी तसेच पुणे जीआयएस पॉवर ग्रीड मल्टी सर्किट तळेगाव वाहिनीबाबत यावेळी आढावा घेतला. विद्युत पारेषण वाहिन्यांना गती देताना कामाला विरोध करणाऱ्यांशी संवाद साधावा आणि आवश्यक तेथे पोलीस संरक्षण घेऊन काम सुरु करावे, असे उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले.

भाटघर उपकेंद्र नूतनीकरण, भुगाव १३२ केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रासाठी जागा घेताना नव्या तंत्रज्ञानानुसार कमी जागेत काम होईल असे पाहावे. खडकवासला, दिवा सासवड (ता. पुरंदर) २२० केव्ही उपकेंद्रासाठी जागा, पुणे शहरी भागातील १६ उपकेंद्रे, भूमिगत वाहिन्या, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०, ग्रीड सेपरेशन, आरडीएसएस योजनेअंतर्गत प्रस्तावित उपकेंद्र आदी विविध विषयांचाही यावेळी आढावा घेण्यात आला.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, सुधारित वितरण क्षेत्र योजनेंतर्गत शेतकऱ्यांची मागणी लक्षात घ्यावी. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील वीजेची गरज लक्षात घ्यावी. कृषी धोरण २०२० अंतर्गत कामे दर्जेदार करावीत, त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत विद्युत सुविधांसाठी १०० कोटी रुपये देण्यात येतील.

पुणे शहरातील अति उच्चदाब उपकेंद्रांसाठी जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकेने जागा उपलब्ध करून द्यावी. उपकेंद्राचे काम करताना अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे. महावितरणने हवेली व वडगाव मावळ नव्या विभाग निर्मितीसाठी प्रस्ताव सादर करावा, त्यासाठी सहकार्य करण्यात येईल, असे श्री.पवार यांनी सांगितले.

आपदग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी सर्वांचा समन्वय महत्त्वाचा – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

मुंबई, दि. 13 : राज्यात येणाऱ्या  नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती कालावधीत आपदग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी तालुका, जिल्हा, राज्य यांचा समन्वय ठेवला जातो. याशिवाय लष्कर, नौदल, तटरक्षक दल, राज्य व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल यांच्या समन्वयातून प्रत्येक आपत्तीला आपण खंबीरपणे तोंड देऊ शकतो, हे वारंवार सिद्ध केले आहे, असे मत मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केले.

मंत्रालय येथे मदत व पुनर्वसन विभागामार्फत आंतरराष्ट्रीय आपत्ती धोके निवारण दिनानिमित्त  आयोजित कार्यक्रमात मदत व पुनर्वसन मंत्री श्री. पाटील बोलत होते.यावेळी मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव डॉ.सोनिया सेठी, आपत्ती व्यवस्थापन संचालक अप्पासाहेब धुळाज, तटरक्षक दलाचे महासंचालक श्री. कौशिक, राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे कमांडर दीपक तिवारी, नौदलाचे कमांडर अभिषेक कारवानी, अग्निशमन दलाचे संचालक संतोष वारी, उपसचिव संजय धारूरकर, उपसचिव श्रीनिवास कोतवाल आदी उपस्थित होते.

मंत्री श्री.पाटील म्हणाले की, आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपत्तीपूर्व आणि आपत्तीनंतरदेखील आपत्ती विभागाची जबाबदारी असते. ज्या ठिकाणी आपत्तीचा धोका संभवतो त्या परिसरात तत्काळ संदेश जाणे अत्यंत गरजेचे असते. त्याचबरोबर परिस्थिती पाहून मदत व बचाव कार्यही तत्काळ सुरू करावे लागते. अशावेळी सर्व यंत्रणांचा संवाद असणे गरजेचे असते. यवतमाळ, नागपूर येथे आलेल्या पूर कालावधीमध्ये बचाव यंत्रणांनी केलेले कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. आपत्कालीन यंत्रणा अत्याधुनिक यंत्रांनी सुसज्ज असल्या पाहिजेत, यासाठी प्रशासनाने अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी आग्रही असावे. आपत्कालीन कालावधीमध्ये कोणती खबरदारी घ्यावी, याचे प्रशिक्षण शालेय स्तरापासूनच विद्यार्थ्यांना दिले जावे, यासाठी देखील प्रयत्न करण्यात यावेत.

आपत्ती व्यवस्थापनचे संचालक श्री. धुळाज म्हणाले की, राज्यात आपत्तीविषयक विविध प्रशिक्षण घेण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत लोकांचे फोन येत असतात त्यालाही  राज्य नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून  तत्काळ मदत केली जाते. आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत उष्णतेच्या लाटा यासंदर्भात राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळा नुकतीच झाली. आपत्ती पूर्व आणि आपत्तीनंतर कशा प्रकारे काळजी घ्यावी यासाठी क्षमता बांधणी ही काम आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत केले जाते. राज्यात आपत्ती सौम्यीकरणाचे 3200 कोटी रुपयांची कामे देखील सुरू आहेत. प्रत्येक यंत्रणांचा चांगल्या प्रकारे समन्वय साधण्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग अहोरात्र कार्यरत आहे. आपत्कालीन कालावधीत तत्काळ मदत मिळण्यासाठी विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.

राज्य मंत्रालय नियंत्रण कक्षातील अधिकारी, कर्मचारी यांनी आपत्कालीन परिस्थितीत केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

आपत्ती सौम्यीकरणाच्या विविध उपक्रमात सहभागी होण्यासाठी सर्वांनी घेतली शपथ

मी प्रतिज्ञा करतो की, शासनाच्या आपत्ती सौम्यीकरणाच्या विविध उपक्रमात सक्रिय सहभाग घेईन. आपत्तीच्या धोक्यापासून मी स्वतःची, माझ्या परिवाराची, समाजाची तसेच सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणेविषयीचे ज्ञान व कौशल्य प्राप्त करेन. आपत्तीचे धोके कमी करण्याऱ्या सामुदायिक उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेईन.

आपत्तीच्या धोक्यापासून सुरक्षिततेसाठी करावयाच्या पूर्वतयारीची माहिती मी जनजागृतीच्या माध्यमातून संपूर्ण समाजापर्यंत पोहोचण्यासाठी सदैव प्रयत्न करीन. राज्यातील आपत्तीप्रवण भागात जीवित, वित्त व पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून सदैव कार्यतत्पर राहीन.

शासनाच्या वतीने आपत्ती निवारणार्थ घेण्यात येत असलेल्या सौम्यीकरणाच्या कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून संभाव्य धोका कमी करण्यासाठी प्रयत्नशील राहीन. युएनडीपीचे राज्य प्रकल्प अधिकारी श्रीदत्त कामत यांनी सूत्रसंचालन केले.

******

संध्या गरवारे/विसंअ/

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या युपीआय सेवेचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ

पुणे, दि. 13: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची युपीआय सेवा आणि पगारदारांकरिता अपघात विमा योजनेचा शुभारंभ करण्यात आला. बँकेने नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांचा विश्वास संपादन करावा. योग्य नियोजन तसेच उत्तम आणि पारदर्शक कारभाराद्वारे ग्राहकांचे समाधान होईल असे काम करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाला आमदार अशोक पवार, संजय जगताप, बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, रमेश थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, बँकेच्या संचालक मंडळाचे सदस्य, अधिकारी आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, युपीआयसारख्या सुविधेचा वापर करून बँकेने आपण काळासोबत असल्याचे दाखवून दिले आहे. या सेवेमुळे ग्राहकांना एका क्लिकवर विविध सुविधा मिळू शकतील आणि बँकेत होणारी गर्दी कमी होईल.  बँकींग क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. अशावेळी व्यापारी आणि स्थानिक पतसंस्थांशी स्पर्धा करताना अनुकूल बदल घडवून आणावे लागतील. त्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणात सातत्य ठेवावे.

बँकेने ग्राहक हित समोर ठेवून वाटचाल करावी. मोबाईल बँकीगमुळे या क्षेत्रात बदल होत आहेत. त्यामुळे नव्या कर्मचाऱ्यांची भरती करताना नवे तंत्रज्ञान जाणणाऱ्या उमेदवारांची निवड करावी, स्थानिक उमेदवारांना यात प्राधान्य देण्यात यावे.  बँकेच्या शाखा वाढवून व्यवसाय वाढविण्यावर भर द्यावा. बँकेच्या विकासविषयक बाबी मार्गी लावण्यासाठी कायम सहकार्य राहील, अशी ग्वाही श्री.पवार यांनी दिली.

पगारदारांसाठी सुरू करण्यात आलेल्या अपघात विमा योजनेमुळे त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक संरक्षण मिळेल असे सांगून हे विमा संरक्षण 30 लाखाहून 50 लाख रुपयांपर्यंत वाढविण्याबाबत संचालक मंडळाने विचार करावा, अशी सूचना त्यांनी केली. बँक कर्मचाऱ्यांनी कुटुंब आणि समाजाच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी आणि ग्राहकांचे हीत जपण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी केले.

बारामतीच्या नागरिकांमुळे बँकेचा संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. सर्वसामान्यांच्या आर्थिक प्रगतीत हातभार लावता आला, बँकेमुळे सर्वांचे भरभरून प्रेम मिळाले. त्यामुळे बँकेशी निगडीत घटकांचा कायम ऋणी राहील, अशा शब्दात त्यांनी बँकेविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.

प्रारंभी श्री.दुर्गाडे यांनी बँकेच्या प्रगतीविषयी माहिती दिली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नागरी सहकारी बँकांमध्ये पहिल्या पाचमध्ये पोहोचली आहे. बँकेच्या यूपीआय सेवेमुळे खातेदारांना त्यांच्या आर्थिक गरजेनुसार तात्काळ आणि सुरक्षितपणे व्यवहार करता येईल. अपघात विमा योजनेचा बँकेच्या सुमारे 26 हजार पगारदार खातेदारांना लाभ होणार असून त्यापोटी बँकेला 1 कोटी 55 लाख रुपये खर्च येणार आहे,  असे त्यांनी सांगितले.

0000

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या मुंबईत होणाऱ्या १४१ व्या सत्राचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करणार उद्‌घाटन

            नवी दिल्ली, 12 : मुंबईत येत्या 14 ऑक्टोबर 2023 रोजी, जियो वर्ल्ड सेंटर येथे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या 141 व्या सत्राचे आयोजन होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या सत्राचे उद्‌घाटन करणार आहेत.

            हे सत्र, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक  समितीच्या सदस्यांची एक महत्वाची बैठक मानली जाते. या सत्रात ऑलिम्पिक स्पर्धांच्या भविष्याशी संबंधित महत्वाचे निर्णय घेतले जातात. भारतात ही बैठक दुसऱ्यांदा होत आहे. याधीची बैठक सुमारे 40 वर्षांपूर्वी झाली होती. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक  समितीचे 86 वे सत्र, नवी दिल्लीत 1983 मध्ये झाले होते.

            आता हे 141 वे सत्र भारतात होत असून, हे सत्र, जागतिक सहकार्याला प्रोत्साहन देणारे, क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्तमाचा गौरव करणारे आणि मैत्री, परस्पर सन्मान, उत्कृष्टता अशा ऑलिम्पिक च्या आदर्श उद्दिष्टाना अधिक बळकट करणारे असेल. हे सत्र, क्रीडा क्षेत्राशी संबंधित विविध भागधारकांना परस्पर संवाद आणि ज्ञानाची देवाण-घेवाण करण्याची संधी उपलब्ध करून देणारे ठरेल.

            या सत्राला, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक  समितीचे अध्यक्ष थॉमस बाच आणि इतर सदस्य उपस्थित असतील. त्याशिवाय भारतातील क्रीडा क्षेत्रातील महत्वाच्या व्यक्ती आणि भारतीय ऑलिम्पिक  संघटनेसह विविध क्रीडा महासंघाचे प्रतिनिधी उपस्थित असतील.

००००

बीड जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीच्या ६० कोटींच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता

मुंबई, दि. 12 : बीड जिल्हाधिकारी कार्यालय इमारत बांधकामाच्या सुमारे 60 कोटी रुपयांच्या आराखड्यास महसूल विभागाने आज प्रशासकीय मान्यता प्रदान केली. याबाबतचा आदेश निर्गमित करण्यात आला आहे.

कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत नव्याने बांधण्याचा प्रस्ताव आणला होता. या कामाच्या प्रस्तावास छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. कामाची रक्कम 15 कोटींपेक्षा जास्त असल्याने सदर प्रस्ताव मान्यतेसाठी उच्चस्तरीय समितीकडे पाठविण्यात आला होता. समितीने या स्थापत्य कामाचा दर व अन्य बाबी तपासून 59 कोटी 61 लाख रुपयांच्या आराखड्यास मान्यता दिली आहे.

दरम्यान, एकात्मिक पायाभूत विकास साधत असताना जिल्ह्याची प्रमुख कचेरी म्हणून ओळख असलेले जिल्हाधिकारी कार्यालय सुसज्ज व सर्व सुविधायुक्त असावे, या दृष्टीने या इमारतीचे काम पूर्ण केले जावे, असे पालकमंत्री श्री. मुंडे यांनी म्हटले आहे.

मागील आठवड्यात बीड येथील प्रशासकीय इमारतीच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. बीड जिल्ह्यात प्रथमच सोयाबीन संशोधन व प्रक्रिया केंद्र उभारण्यास देखील मान्यता मिळाली आहे. त्याआधी कृषी भवन उभारण्यास 14 कोटी रुपये, परळी तालुक्यात शासकीय कृषी महाविद्यालय, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय उभारणीच्या कामांनाही मान्यतेसोबतच आता गती मिळत आहे.

००००

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

ताज्या बातम्या

पत्रकारांच्या एसटी प्रवास सवलतीत सुधारणा होणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

0
मुंबई, दि. १७ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (रा.प. महामंडळ) बसेसमधून प्रवास करणाऱ्या पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या सवलतीत लवकरच सुधारणा केली जाणार आहे. तसेच काही नवीन सवलती...

महावितरणला सबसिडीसाठी लागणारे अनुदान लवकरात लवकर वितरित करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. १७ : ऊर्जा विभागाने वीज निर्मिती व खर्च याबाबत योग्य नियोजन केले तर ग्राहकांना माफक दरात वीज वितरण करणे शक्य होणार आहे....

आगामी कुंभमेळ्यापूर्वी शिर्डी विमानतळावरील प्रस्तावित कामे पूर्ण करावीत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. 17 : आगामी काळात होणाऱ्या नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या दृष्टीने शिर्डी विमानतळ हे महत्त्वाचे विमानतळ असणार आहे. त्यामुळे हे विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी नूतनीकरण व...

विधानपरिषद प्रश्नोत्तरे

0
मिठी नदी गाळ भ्रष्टाचार प्रकरणाची सन २००६ पासून चौकशी - मंत्री उदय सामंत मुंबई, दि. 17 : मिठी नदीतील गाळ काढण्यात झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी तीन वर्षात...

विधानसभा कामकाज

0
सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न पूर्ण करून मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसांना परत आणणार - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना अधिक गती वरळीमध्ये ५५६ सदनिकांचे वाटप...