शुक्रवार, जुलै 18, 2025
Home Blog Page 1122

माता, बाल मृत्यू नियंत्रणासाठी प्रधानमंत्री मातृ वंदना योजना

माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती महिला व स्तनदा मातेने सकस आहार घेणे आवश्यक आहे. तरच जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचे आरोग्य सुधारेल आणि माता व बाल मृत्यू दरात घट होण्यास मदत होईल. यासाठी प्रधानमंत्री मातृवंदना योजना लाभदायक आहे.

भारतात दारिद्र्यरेषेखालील व दारिद्र्यरेषेवरील अनेक गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत शारीरिक क्षमता नसतानाही मजुरीसाठी काम करावे लागते. यामुळे देशातील गर्भवती माता व बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. या पार्श्वभूमिवर माता व बालमृत्यू दर नियंत्रित करण्यासाठी दि. १ जानेवारी २०१७ पासून प्रधानमंत्री मातृ वंदना योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. राज्यात या योजनेची अंमलबजावणी दि. ०८ डिसेंबर २०१७ पासून आरोग्य विभागामार्फत केली जात आहे.

दरम्यान केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार “मिशन शक्ती” अंतर्गत दोन भागात एकूण चौदा योजना एकत्रित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी “सामर्थ्य” या विभागात एकूण ०६ योजना असून यामध्ये प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत सन २०२३ – २४ पासून लाभार्थीला लाभ देणे व योजना राबविण्याबाबतच्या सुधारित मार्गदर्शक सूचना राज्य शासनाने दि. ९ ऑक्टोबर २०२३ रोजी निर्गमित केल्या आहेत. ही योजना केंद्र व राज्याच्या सहभागाने राबविण्यात येणार असून या योजनेत लाभार्थ्यांकरिता केंद्र शासनाचा ६० टक्के तर राज्य शासनाचा ४० टक्के सहभाग राहणार आहे. आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई हे या योजनेचे राज्यस्तरीय समन्वय अधिकारी (Nodal Officer) असून, त्यांच्यामार्फत प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेची अंमलबजावणी केली जाईल.

योजनेंतर्गत अनुज्ञेय लाभ व त्यांचे वितरण

योजनेचा लाभ घेण्याकरिता लाभार्थीचे वय किमान १८ वर्षे व कमाल ५५ वर्षे या दरम्यान असावे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलेने विहित अटी, शर्ती आणि कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तिला पहिल्या अपत्यासाठी रुपये पाच हजारची रक्कम दोन हप्त्यांमध्ये (पहिला हप्ता रू. ३ हजार व दुसरा हप्ता रू. २ हजार) तर दुसरे अपत्य मुलगी झाल्यास मुलीच्या जन्मानंतर एकाच टप्प्यात रु. सहा हजारचा लाभ आधार संलग्न बँक खात्यात किंवा पोस्ट ऑफिस मधील खात्यात (DBT) व्दारे जमा केला जाईल.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या शासकीय आरोग्य केंद्रात गर्भधारणेची नोंदणी केलेली असावी. तसेच शेवटच्या मासिक पाळीच्या तारखेपासून ६ महिन्यांच्या आत किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी केलेली असावी. दुसऱ्या हप्त्यासाठी बाळाची जन्म नोंदणी, बालकास बीसीजी, ओपीव्हीझीरो, ओपीव्ही ३ मात्रा, पेन्टाव्हॅलेन्ट लसीच्या ३ मात्रा अथवा समतुल्य / पर्यायी लसीकरणाचे प्राथमिक चक्र पूर्ण करणे आवश्यक आहे.

लाभार्थी खालीलपैकी किमान एका गटातील असणे आवश्यक

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी खालीलप्रमाणे किमान एका गटातील असणे आवश्यक असून, लाभार्थीने किमान एका ओळखपत्राच्या पुराव्याची प्रत जोडणे आवश्यक आहे.

ज्या महिलांचे निव्वळ कौटुंबिक उत्पन्न प्रतिवर्ष रू. ८ लाख पेक्षा कमी आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या महिला. ४० टक्के व अधिक अपंगत्व असणाऱ्या (दिव्यांग जन) महिला. बीपीएल शिधापत्रिकाधारक महिला.  आयुष्यमान भारत अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) अंतर्गत महिला लाभार्थी. ई- श्रम कार्ड धारक महिला. किसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी महिला शेतकरी. मनरेगा जॉब कार्डधारक महिला. गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या अंगणवाडी सेविका (AWW)/अंगणवाडी मदतनीस (AWHs)/आशा कार्यकर्ती (ASHAS).

या किमान एका कागदपत्रासोबत लाभार्थी आधार कार्ड प्रत किंवा आधार नोंदणी (EID) कागदपत्र त्यासोबत विहित केलेले कागदपत्र जसे कि परिपूर्ण भरलेले माता आणि बाल संरक्षण कार्ड ज्यामध्ये शेवटच्या मासिक पाळीची तारीख, गरोदरपणाची नोंदणी तारीख, प्रसूतिपूर्व तपासणीच्या नोंदी असाव्यात. लाभार्थीच्या स्वतःच्या बँक पासबुकची प्रत. बाळाचे जन्मनोंदणी प्रमाणपत्राची प्रत. माता आणि बाल संरक्षण कार्डवर बाळाच्या लसीकरणाच्या नोंदी असलेल्या पानाची प्रत. गरोदरपणाची नोंदणी केलेला RCH पोर्टलमधील लाभार्थी नोंदणी क्रमांक. लाभार्थीचा स्वतःचा किंवा कुटुंबातील सदस्यांचा मोबाईल क्रमांक. वेळोवेळी विहित केलेली अन्य कागदपत्रे व तपशील देणे आवश्यक आहे.

लाभार्थीकडे आधारकार्ड नसल्यास वरील विहित कागदपत्रांसह आधार नोंदणी (EID) कागदपत्रासोबत पुढीलपैकी कोणत्याही एका ओळखपत्राच्या पुराव्याची प्रत जोडणे आवश्यक राहील –  बँक किंवा पोस्ट ऑफिस फोटो पासबुक, मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड, किसान फोटो पासबुक, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड,  मनरेगा जॉब कार्ड, सरकारने किंवा सार्वजनिक क्षेत्रातील कोणत्याही उपक्रमाद्वारे जारी केलेले तिच्या पतीचे कर्मचारी फोटो ओळखपत्र.

राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेश प्रशासनाने जारी केलेले इतर कोणतेही फोटो ओळखपत्र. अधिकृत लेटरहेडवर राजपत्रित अधिकाऱ्याने जारी केलेल्या छायाचित्रासह ओळखीचे प्रमाणपत्र. प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) किंवा सरकारी रुग्णालयाद्वारे दिले गेलेले आरोग्य कार्ड; राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेश प्रशासनाद्वारे निर्दिष्ट केलेले इतर कोणतेही दस्तऐवज. आधारकार्डला पर्यायी कागदपत्रे केवळ लाभार्थीची योजनेमध्ये नोंदणी करण्यासाठी असून लाभार्थीने EID च्या साहाय्याने आधार कार्ड प्राप्त करून घेऊन संबंधित आरोग्य केंद्रात सादर केल्यानंतरच लाभ रक्कम जमा होणार आहे.

लाभार्थींनी महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या https://wcd.nic.in) संकेतस्थळावरुन अर्ज डाऊनलोड करून आणि Citizen Login मधून ऑनलाईन फॉर्म भरावयाचा आहे. परिपूर्ण भरलेला अर्ज लाभार्थीने स्वाक्षरी केलेल्या हमीपत्रासह सर्व आवश्यक कागदपत्रांसह नजीकच्या आरोग्य केंद्रात किंवा आशा स्वयंसेविका यांच्याकडे जमा करावा. लाभार्थींनी हस्तलिखीत फॉर्म जमा केलेला असेल, परंतु प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या नवीन संगणक प्रणाली द्वारे कोणत्याही कारणामुळे ऑनलाईन पध्दतीने फॉर्म स्वीकारले जात नसल्यास अशा लाभार्थ्यांना लाभ देय नसेल.

एकूणच माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने ही योजना महत्त्वपूर्ण आहे. यामुळे गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करुन त्यांच्या आरोग्यात सुधारणा होण्यास मदत होईल. जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचे आरोग्य सुधारेल. तसेच माता मृत्यू व बाल मृत्यू दरात घट होऊन तो नियंत्रणात राहील. या योजनेंतर्गत मिळणारा लाभ हा जन्माच्या वेळी लिंग गुणोत्तर सुधारणे, स्त्री भ्रूणहत्येस अवरोध करणे आणि स्त्री जन्माचे स्वागत होण्यासाठी हितकारी ठरेल. लाभार्थींकडून आरोग्य संस्थांच्या सुविधांचा लाभ घेण्याचे प्रमाण वाढून संस्थात्मक प्रसुतीचे प्रमाण वृध्दिंगत करणे. नवजात अर्भकाच्या जन्माबरोबरच जन्मनोंदणीचे प्रमाणात वाढही होण्यास उपयुक्त ठरेल.

संकलन –

संप्रदा बीडकर

जिल्हा माहिती अधिकारी

सांगली

आरोग्य व वन विभागाच्या कामकाजाचा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी घेतला आढावा

सांगली दि. १४ (जि.मा.का.) :-  पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत आरोग्य व वन विभागाच्या कामकाजाचा आढावा घेऊन संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, उप वनसंरक्षक आदिती भारद्वाज, सहाय्यक उप वनसंरक्षक अजित साजने, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, कार्यकारी अभियंता क्रंतिकुमार मिरजकर आदि उपस्थित होते.

आरोग्य विभागाचा आढावा घेताना पालकमंत्री डॉ. खाडे यांनी सांगितले, जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जात आहे. रुग्णालयात पुरेसा औषध साठा असावा याची दक्षता घेण्याची सूचना करून  डॉ. खाडे यांनी सांगितले आवश्यक औषधांची मागणी वेळीच करावी. त्यामुळे औषध खरेदीत विलंब होणार नाही. रुग्णालयात आवश्यक यंत्र सामग्री सुस्थितीत असावी. नवीन यंत्र सामग्री खरेदीबाबत  बैठकीत चर्चा करण्यात आली. या बाबतचे प्रस्ताव तयार करून सादर करावेत याचा शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल, असे पालकमंत्री डॉ. खाडे यांनी सांगितले.

वन विभागाच्या कामकाजाचा आढावा घेऊन पालकमंत्री डॉ. खाडे यांनी सांगितले, दंडोबा डोंगर व परिसर विकासासाठी करण्यात येणारी कामे  सुरू करण्याचे नियोजन  करावे. वन विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांच्यामार्फत करण्यात येणाऱ्या कामांबाबत आवश्यक तयारी करावी. पार्किंग, पिण्याचे पाणी, रस्ते या बाबींना प्राधान्य द्यावे, असे सांगितले.

०००

खडकवासला धरण परिसरातील सांडपाण्यावर प्रक्रिया न करणाऱ्या हॉटेलवर कारवाई करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. 14 : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत पुणे महानगरपालिका क्षेत्रातील विकासकामांचा आढावा घेतला. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने सांडपाणी आणि कचऱ्यावर प्रक्रिया न करणाऱ्या खडकवासला धरण परिसरातील हॉटेल आणि रिसॉर्टवर कारवाई करावी, असे निर्देश श्री.पवार यांनी यावेळी दिले.

 यावेळी  विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार,  जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  रमेश चव्हाण,  पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उपायुक्त महेश पाटील, मुख्य अभियंता अतुल चव्हाण आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील गावातून धरणात येणाऱ्या अशुद्ध पाण्याबाबत माहिती घेतली. धरण परिसरात असलेल्या गावातून येणाऱ्या सांडपाण्यासाठी भूमिगत गटार आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी प्रस्ताव तयार करावा.  धरण परिसरातील २४ गावातील सांडपाणी व कचरा व्यवस्थापनाबाबत पीएमआरडीएने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करावा. विभागीय आयुक्तांनी स्वतंत्र बैठक घेऊन तात्काळ करावयाच्या उपाययोजनांची रुपरेषा तयार करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामाच्या सद्यःस्थितीबाबतही यावेळी आढावा घेण्यात आला. रस्त्याच्या कामासाठी भूसंपादन प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी. पिसोळी गावापासून रस्ता रुंदीकरणाबाबतही कार्यवाही करावी. शाळा, महाविद्यालय आणि कार्यालयीन वेळ लक्षात घेऊन सकाळी आणि संध्याकाळी  २-२ तास कात्रज-कोंढवा रस्त्यावरील जड वाहतूक बंद ठेवावी,असे निर्देश श्री.पवार यांनी दिले.

उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी क्रांतिवीर लहुजी साळवे स्मारकाबाबत माहिती घेतली. हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रश्नाबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.

000

 

दीर्घकाळ शहरासाठी उपयुक्त असणाऱ्या कामांना प्राधान्य द्या – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. १४ : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील विकासकामांचा आढावा घेतला. दीर्घकाळ शहरासाठी उपयुक्त असणाऱ्या कामांना प्राधान्य द्यावे, असे निर्देश श्री.पवार यांनी यावेळी दिले.

यावेळी आमदार अण्णा बनसोडे, विभागीय आयुक्त सौरभ राव,  पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख,  मुख्य अभियंता अतुल चव्हाण आदी उपस्थित होते.

 उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी-निगडी कॉरिडॉर प्रकल्पाची माहिती घेतली. ते म्हणाले, रस्त्याच्या बाजूला दोन झाडांच्यामध्ये अधिक जागा असल्यास तेथे वृक्षारोपण करावे, प्रामुख्याने स्थानिक प्रजातीची झाडे वापरावी. पदपथाच्या बाजूला असणारी हिरवळ आणि फुलझाडांचे नीट जतन होईल याचे सुरुवातीपासून नियोजन करावे.

पदपथावर आलेले अतिक्रमण काढण्यात यावे. तसेच कामादरम्यान रस्त्याच्या बाजूला होणारे अतिक्रमण तात्काळ काढावे. पूल आणि मेट्रोमार्ग परिसरात सुशोभीकरण करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले. कामांची देखभाल दुरुस्ती चांगल्या पद्धतीने होण्यासाठी उत्तम दर्जाची सामुग्री वापरावी, अशी सूचना त्यांनी केली.

 पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील पिण्याचे पाणी, सांडपाणी व्यवस्थापन, झोपडपट्टी पुनर्विकास, शहरातील अतिक्रमण काढणे आदीविषयी देखील उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी माहिती घेतली. पवना धरण भरले असले तरी आतापासून पाण्याचे योग्य नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले.

 पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका रुग्णालयात औषधे, मनुष्यबळ, आरोग्य सुविधांमध्ये त्रुटी राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश श्री.पवार यांनी दिले.

 आयुक्त श्री.सिंह यांनी सादरीकरणाद्वारे प्रकल्पाविषयी माहिती दिली. दापोडी-निगडी कॉरिडॉर १२ किलोमीटर लांबीचा असून त्यात विविध प्रकारच्या सुविधांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

000

बचत गटातील सदस्यांच्या सक्षमीकरणासाठी तेजस्विनी फूड्स व तेजस्विनी कलादालन उपयुक्त – महिला व बालविकास मंत्री कुमारी आदिती तटकरे

पुणे, दि. १३ : बचत गटातील सदस्यांच्या सक्षमीकरणासाठी तेजस्विनी फूड्स व तेजस्विनी कलादालन उपयुक्त आहे, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री कुमारी आदिती तटकरे यांनी केले.

सावरकर भवन येथे महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत सुरू असलेल्या तेजस्विनी फूड्स व तेजस्विनी कलादालनास मंत्री कुमारी तटकरे यांनी भेट दिली. यावेळी त्या  बोलत होत्या. यावेळी महिला व बालविकास विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे, उपयुक्त राहुल मोरे, बाल विकास प्रकल्प अधिकारी सुरेश टेके, बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) तृप्ती ढेरे, रचना व कार्यपद्धती अधिकारी गोविंद इसानकर, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वय अधिकारी अर्चना क्षिरसागर आदी उपस्थित होते.

यावेळी मंत्री कुमारी तटकरे म्हणाल्या, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून महिला बचत गटातील सदस्यांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या तेजस्विनी फूड्स व तेजस्विनी कलादालनासारखे उपक्रम स्तुत्य असून यामुळे महिला बचत गटांच्या उत्पादनांना चांगली बाजारपेठ मिळत आहे. यामुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत याचे समाधान वाटते.

सणासुदीच्या कालावधीत महिलांना उपयुक्त ठरणाऱ्या व इतर वस्तू या ठिकाणी विक्रीसाठी ठेवल्या जातात. तसेच फूड्स दालनात विविध खाद्य पदार्थांची विक्री केली जाते. याला बाजारपेठ मिळणे आवश्यक आहे. महिला बचत गटांच्या उत्पादनांना ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी विविध कंपन्यांसोबत बैठका घेऊन ऑनलाईन खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात येईल.

महिला बचत गटांच्या बळकटीकरणासाठी तसेच फूड्स आणि कलादालनाच्या विकासासाठी उपाययोजना सुचवाव्यात. बचत गटांच्या उन्नतीसाठी तसेच त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी शासनाच्या वतीने सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी  कुमारी तटकरे यांनी  तेजस्विनी फूड्स व तेजस्विनी कलादालनाची पाहणी करुन महिला बचत गटांच्या सदस्यांशी संवाद साधला. श्री. नारनवरे यांनी या उपक्रमाची माहिती दिली.

‘छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महोत्सवाचे डिसेंबरमध्ये आयोजन – मुंबई उपनगर पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि. 13 : देशी खेळांना प्रोत्साहन मिळावे तसेच पारंपरिक क्रिडा प्रकार जपले जावेत यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात डिसेंबर 2023 मध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रिडा महोत्सव’ आयोजित केला जाणार आहे. महोत्सवाचे नियोजन देशी मैदानी क्रीडा संघटनांनी समन्वय साधून  काटेकोरपणे करावे, असे निर्देश कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.

देशी मैदानी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत मंत्री श्री.लोढा बोलत होते. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी वर्षा साळवी, मालाडचे उपजिल्हाधिकारी धनाजी तोरस्कर, उपजिल्हाधिकारी संदीप निचीत, क्रीडा भारतीचे श्रीकांत धर्माधिकारी, डॉ. उत्तम केंद्रे, सदस्य गणेश विचारे तसेच विविध देशी मैदानी  क्रीडा संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

मंत्री श्री. लोढा म्हणाले, आपले पारंपरिक क्रीडा प्रकार लुप्त होवू नयेत यासाठी अशा प्रकारचे क्रीडा महोत्सव केले जावेत, अशी मागणी वारंवार केली जाते. ही मागणी  पाहता डिसेंबर महिन्यात खो-खो,दंड बैठक, मल्लखांब, लंगडी, विटी-दांडू, लगोरी, अखाडा कुस्ती, मानवी मनोरा (पिरॅमिड), रस्सी खेच, दोरी उडी, सूर्यनमस्कार, पावनखिंड दौड, शरीरसौष्ठव, तलवार बाजी, ढाल तलवार आदी मैदानी खेळांचा समावेश करुन पंधरा दिवसांच्या क्रीडा महोत्सवाचे नियेाजन करण्यात येणार आहे. क्रीडा महोत्सवास संपूर्ण सहकार्य केले जाईल. या महोत्सवा दरम्यान खेळाडूंना विविध सोयी-सुविधा पुरविण्यात याव्यात. नियोजन काटेकोरपणे करावे अशा सूचना पालकमंत्री श्री.लोढा यांनी यावेळी केल्या.

०००

संध्या गरवारे/विसंअ/

हरविलेल्या १९ हजारपेक्षा जास्त मुली, महिलांना परत मिळविण्यात पोलिसांच्या प्रयत्नांमुळे यश

मुंबई, दि. 13 : राज्यात 05 महिन्यांत 29 हजार मुली व महिला बेपत्ता झाल्याचे वृत्त विविध माध्यमांतून  प्रसारीत झाले आहे. पण, पोलीस विभागामार्फत प्राप्त माहितीनुसार यात तथ्य नसल्याचे दिसून आले आहे. राज्यात यावर्षी मे, 2023 पर्यंत अपहरण झालेल्या मुलींपैकी 68.93 टक्के मुली परत मिळाल्या असून हरविलेल्या महिलांपैकी 63.10 टक्के महिला परत मिळाल्या आहेत, अशी माहिती महाराष्ट्र पोलीस विभागाच्या महिला व बाल अपराध प्रतिबंध शाखेने दिली आहे.

राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये मुली व महिला हरविल्याच्या नोंदी घेण्यात येतात. मात्र पोलीस प्रशासनाने केलेल्या तपासाअंती जानेवारी ते ऑगस्ट 2023 दरम्यान हरविलेल्या 29 हजार 807 महिलांपैकी 19 हजार 89 महिला घरी परतल्या आहेत. त्याचप्रमाणे जानेवारी ते ऑगस्ट 2023 दरम्यान अपहरण झालेल्या 5 हजार 495 मुलींचा शोध घेण्यात आला आहे. मुली व महिला हरविल्याच्या तुलनेत त्यांचा शोध घेऊन घरी परतण्याचे प्रमाण अधिक आहे. महिला, मुली हरविल्याची तक्रार नोंद झाल्यानंतर संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी महिलेचा कसून शोध घेतात. तपासासाठी आवश्यक पर्यायांचा उपयोग करीत महिलेला शोधून घरापर्यंत आणण्यात येते.

राज्य शासन महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करीत आहे. राज्याचा गृह विभाग महिलांच्या सुरक्षेसाठी विविध उपक्रम राबवित आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी गृह विभाग कटिबध्द आहे.

000

निलेश तायडे/विसंअ/

दीक्षाभूमी व चैत्यभूमीप्रमाणेच येवल्याच्या मुक्तिभूमीला ऐतिहासिक महत्त्व – मंत्री छगन भुजबळ

मुक्तिभूमी येथे ८८ व्या धर्मांतर घोषणेचा वर्धापन दिन कार्यक्रम संपन्न 

नाशिक, दिनांक: 13 (जिमाका वृत्तसेवा): महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथे धर्मांतराची घोषणा केली होती. त्यामुळे या ऐतिहासिक स्थळाला मुक्तिभूमी म्हणून संबोधण्यात येते. नागपूर येथील दीक्षाभूमी व दादारची चैत्यभूमी प्रमाणेच येवल्याच्या मुक्तिभूमीला ऐतिहासिक महत्त्व असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

आज येवला येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी येथे ८८ व्या धर्मांतर घोषणेच्या वर्धापन दिन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय तथा सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, मुक्तिभूमी स्मारक समितीचे सदस्य व मोठ्या संख्येने कार्यकर्ते व अनुयायी उपस्थित होते.

मंत्री छगन भुजबळ म्हणाले, दरवर्षी १३ ऑक्टोबर, विजयादशमी व १४ एप्रिल या दिवशी देशभरातून लाखो बौद्धबांधव मुक्तिभूमीवर डॉ.बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी येत असतात. तसेच वर्षभर हजारो पर्यटक आणि बौद्धबांधव येथे भेटी देत असतात. मुक्तिभूमी स्थळाला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे पदस्पर्श लाभल्यामुळे हे स्थान अतिमहत्त्वाचे तीर्थस्थळ बनलेले आहे. १३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथे परिषद भरली. भारताच्या कानाकोपऱ्यातून १० हजार अनुयायी येथे जमले होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केल्यामुळे या जागेला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. धर्मांतराच्या ऐतिहासिक घोषणेनंतर तब्बल २१ वर्षांनी १३ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतर घोषणेची प्रतिज्ञापूर्ती केली होती. त्यामुळे नागपूर हा धर्मांतराचा कळस तर येवला मुक्तिभूमी धर्मांतराचा पाया असल्याचे म्हटले जाते. असेही मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

नाशिक शहरात त्रिरश्मी बुद्ध लेणी येथील बुद्ध स्मारकाच्या परिसरात २४ ऑक्टोबर २०२३ रोजी श्रीलंकेतील अनुराधापुर येथील बोधी वृक्षाच्या फांदीचे रोपण करण्यात येणार आहे. या बोधी वृक्षारोपणाच्या महोत्सवासाठी देश विदेशातून उपासक येणार असल्याने या कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहण्याचे आवहन मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थितांना केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्वांनी पुढे न्यावेत : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

येवला शहर  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी असून येथे त्यांनी ८८ वर्षांपूर्वी  धर्मांतराची घोषणा केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेले संविधान हे सर्व जाती, धर्माला न्याय देणारे संविधान आहे. संविधानातून अखंड भारताची रचलेली लोकशाही जगभरात कौतुकास पात्र आहे. १२ वर्षानंतर या मुक्तिभूमीस १०० वर्षे पूर्ण होत आहे. त्या निमित्ताने जागतिक स्तरावर या स्थानाला महत्त्व प्राप्त होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न व्हावेत तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्वांनी पुढे न्यावेत अशी अपेक्षा यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय तथा सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.

कार्यक्रमाच्या सुरवातीला राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ आणि केंद्रीय सामाजिक न्याय तथा सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुक्तिभूमी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून बुद्धवंदना केली.

येवला मुक्तिभूमी विकास कामे

मुक्ती भूमीचे महत्त्व लक्षात घेवून सदर जागेवर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पहिल्या टप्प्यात विश्वभुषण स्तुपाचे १५ कोटी किंमतीचे बांधकाम पूर्ण झालेले आहे. फेज १ अंतर्गत येवला येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ऐतिहासिक मुक्तिभूमी चा विकास करून याठिकाणी भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा, विश्वभूषण स्तूप व विपश्यना हॉल निर्माण करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या येवला मुक्तिभूमी या ऐतिहासिक स्थळाला महाराष्ट्र शासनाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी ‘ब’ वर्ग तीर्थस्थळाचा दर्जा देण्यात आलेला आहे. येवला मुक्तिभूमी स्मारक परिसरात फेज दोन अंतर्गत पाली व संस्कृत अभ्यास केंद्र, सुसज्ज ग्रंथालय, ऑडीओ व्हिज्युअल रूम, आर्ट गॅलरी, ॲम्पीथिएटर, मिटिंग हॉल, भिक्कू पाठशाला, १२ भिक्कू विपश्यना खोली, कर्मचारी निवासस्थान, डायनिंग हॉल, संरक्षण भिंत, लॅण्डस्केपिंग, आदी विकास कामे पूर्ण झाली आहे.

राज्य घटनेनुसार लोकसेवेचे काम सुरु राहणार – पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ,दि.१३ (जिमाका) : भारतीय राज्यघटनेमध्ये लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या लिखित आहेत. या राज्यघटनेनुसारच लोकसेवेचे काम सुरु असून यापुढेही ते सुरु राहणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

दिग्रस तालुक्यातील लाख, तुपटाकळी आणि सावंगा येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण पालकमंत्री श्री.राठोड यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुधीर देशमुख, राजकुमार वानखेडे, उत्तमराव ठवकर, लाख, तुपटाकळी आणि सावंगा ग्रामपंचायतीचे सरपंच, माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री संजय राठोड पुढे म्हणाले, राज्यघटनेचे शिल्पकार डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात लोकप्रतिनिधींचे कर्तव्य, जबाबदाऱ्या समाविष्ट केल्या आहेत. या घटनेनुसारच कृती आणि जबाबदाऱ्या पार पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. जातीधर्म, गरीब-श्रीमंत न पाहता सर्वसामान्य, शेतकरी हिताची कामे केली जात आहे. गोरगरीब, शेतकरी, महिलांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणण्याचा प्रयत्न सातत्याने करीत आहे. लोकहिताची कामे ही बोलण्यापेक्षा करुन दाखवण्यावर माझा विश्वास आहे. लोकांचे ऋण फेडण्याच्या भूमिकेतून काम करीत आहे. यापूर्वीही अनेक विकासाची कामे केली असून यापुढेही सार्वजनिक विकासकामांसाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असेही पालकमंत्री श्री.राठोड यांनी सांगितले.

आगामी काळात मोठे उद्योग आणून तरुणांना रोजगाराच्या संधी ग्रामीण भागातील महिलांना सक्षम करण्यासाठी धोरण आखले जात आहे. या माध्यमातून महिला बचत गटांना उद्योग उभारण्यासाठी आर्थिक सहाय्य केले जात आहे. ग्रामसंघांना गोदामासाठी ५० लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागात डांबरी पांदन रस्ते, शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा प्रयत्न करणार आहे. जलसंधारणाची कोट्यवधी रुपयांची कामे होणार आहेत. त्याचे नियोजन सुरु आहे. निराधारांना १५०० रुपये देण्यात येणार आहे. शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून त्यांच्या जीवनामध्ये समृद्धी आणण्याचा प्रयत्न करत आहोत.

शेतकरी हिताचे निर्णय घेतले जात आहेत. अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी निधी उपलब्ध झाला आहे. नमो शेतकरी सन्मान निधी योजनेतून आर्थिक सहाय्य दिले जात आहे. आरोग्य शिबिर, नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया, गोरगरिब रुग्णांना मदत आदी लोकाभिमुख कामे केली  जात असल्याचे पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले.

पालकमंत्री संजय राठोड यांनी दिग्रस तालुक्यातील लाख येथे २ कोटी २९ लाख, तुपटाकळी ३ कोटी २० आणि सावंगा येथील २ कोटी रुपयांच्या विकासकामांसाठी निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल ग्रामस्थांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.

चिमुकल्यांनी केले नऊ भाषेत पालकमंत्र्यांचे स्वागत

तुपटाकळी येथील जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्या मुलामुलींनी जपानी, ग्रीक, इंग्रजी, तेलगु, कन्नड, गुजरातीसह नऊ भाषांमध्ये पालकमंत्री संजय राठोड यांचे स्वागत केले. चिमुकल्यांच्या या भाषाज्ञानाचे कौतुक करुन पालकमंत्र्यांनी या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

अभिवाचन, काव्यवाचनाने मंत्रालयात साजरा झाला ‘वाचन प्रेरणा दिन’

मुंबई, दि. १३ : माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त आज मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अभिवाचन आणि काव्यवाचन करून वाचन प्रेरणा दिन साजरा केला.

मराठी भाषेच्या संवर्धनाबरोबरच भाषेच्या प्रचार व प्रसाराच्या हेतूने मराठी भाषा विभागाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी येणाऱ्या वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात अभिवाचन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. अभिवाचनासाठी शिवराज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त ‘350 वा शिवराज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांचा, उत्सव शिवचरित्रपर पुस्तकाच्या वाचनाचा’ हा विषय निवडण्यात आला.

या अभिवाचन आणि काव्यवाचन कार्यक्रमात सर्वश्री ज्ञानेश पाटमासे, अतुल कुलकर्णी, अजय सावद, दीपक दळवे, अरविंद शेटे, श्रीमती अनघा पटवर्धन, सोनाक्षी पाटील, शिल्पा नातू, सारिका चौधरी, पूजा भोसले, मंगल नाखवा आदींनी सहभाग घेऊन वृत्तपत्रातील लेख, शिवचरित्रात्मक पुस्तकांतील उतारा, कविता वाचन, ओवी गायन, गीत गायन, बखरीतील लेख, शिवरायांचे मूळ मोडी लिपितील पत्र व त्याबाबतचे विवेचन असे विविधांगी वाचन आणि गायन सादर केले. कार्यक्रमाचे निवेदन वासंती काळे यांनी केले.

वाचन प्रेरणा दिनानिमित्त मराठी भाषेतील पुस्तकांचे प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले. यात मराठी भाषा विभागाच्या अखत्यारीतील विविध मंडळे, शासकीय मुद्रणालय, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या स्टॉलचा समावेश होता. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी प्रदर्शनास भेट देऊन पाहणी केली. तसेच अभिवाचन कार्यक्रमास उपस्थित राहून अधिकारी, कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढविला.

०००

बी.सी.झंवर/विसंअ

ताज्या बातम्या

महाराष्ट्रासाठी पर्यायी ऊर्जा प्रकल्पांची मांडणी – राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची माहिती

0
राजधानीत ' ऊर्जा वार्ता' परिषद नवी दिल्ली 17 : महाराष्ट्र राज्य हे ऊर्जा क्षेत्रात आघाडीवर  ठेवण्यासाठी  पर्यायी ऊर्जा प्रकल्पांची आवश्यकता असल्याची धोरणात्मक मांडणी ऊर्जा...

विकसित महाराष्ट्र २०४७ मध्ये ‘आयएसओवा’ सक्रीय सहभागी – आयएसओवाचे अध्यक्ष अर्चना मीना

0
मुंबई, दि. 17 : सक्षमता, ज्ञान आणि अनुभवाची जोड देऊन आपण सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात पूर्ण क्षमतेने योगदान देण्यास सक्षम आहोत. विकसित महाराष्ट्र २०४७ या...

उमराणेतील शेतकऱ्यांना कांद्याची थकीत बिले देण्यासाठी ४५ दिवसांत अहवाल सादर करा – पणन मंत्री जयकुमार...

0
मुंबई, दि. १७ : नाशिक येथील उमराणे रामेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतकऱ्यांना कांद्याचे थकीत बिले अदा करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश पणन मंत्री जयकुमार...

नागपूर-अमरावती जिल्ह्यातील नझूल निवासी भूखंडधारक अभय योजनेला ३१ जुलै २०२६ पर्यंत मुदतवाढ – महसूलमंत्री चंद्रशेखर...

0
मुंबई दि. १७ : नागपूर आणि अमरावती विभागातील निवासी प्रयोजनार्थ भाडेपट्ट्यावर दिलेल्या नझूल भूखंडांसाठी लागू करण्यात आलेल्या अभय योजनेला ३१ जुलै २०२६ पर्यंत मुदतवाढ...

पावसाळ्यात वाहून जाणारे अतिरिक्त पाणी सात गावांना देण्याबाबत प्रस्ताव सादर करावा – जलसंपदा मंत्री...

0
मुंबई, दि. १७ :- सीना-माढा उपसा सिंचन योजनेत बंद नलिका वितरण प्रणाली व ठिबक सिंचनाचा अवलंब केल्यामुळे होणारी पाण्याची बचत आणि पावसाळ्यात धरण भरल्यामुळे  वाहून...