शुक्रवार, जुलै 18, 2025
Home Blog Page 1121

माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

ठाणे, दि. १५ (जिमाका) : देशाचे माजी राष्ट्रपती, ‘मिसाईल मॅन’, शास्त्रज्ञ, भारतरत्न दिवंगत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथील निवासस्थानी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वाचन प्रेरणा दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी उपविभागीय अधिकारी उर्मिला पाटील, तहसीलदार युवराज बांगर, नायब तहसिलदार दिनेश पैठणकर आदी उपस्थित होते.

०००

राज्यात ‘वाचन चळवळ’ उभी करणार – मंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि.१५: माजी राष्ट्रपती भारतरत्न दिवंगत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मंत्रालयात  त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी वाचन संस्कृती रुजविणे आणि वाढविण्यासाठी राज्यात लवकरच ‘वाचन चळवळ’ उभी करणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. माजी राष्ट्रपती डॉ. कलाम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘वाचन प्रेरणा दिन’ कार्यक्रमात मंत्री श्री. केसरकर बोलत होते.

यावेळी शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव हर्षवर्धन जाधव, अवर सचिव अजय भोसले, कक्ष अधिकारी ऐश्वर्या गोवेकर, सहायक कक्षधिकरी राजेंद्र बच्छाव, विजय शिंदे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, वाचन चळवळ ही संपूर्ण देशभरात उभी रहावी यासाठी देशात ‘रीड इंडिया’ ही चळवळ राबविली जात आहे. याच धर्तीवर राज्यात ही चळवळ उभी राहण्यासाठी लवकरच ‘वाचन चळवळ’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यावर्षी उपक्रमाची सुरूवात मुंबई शहरातून करण्यात आली असून राज्यात तळागाळापर्यंत वाचनसंस्कृती पोहचविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे.

वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून २ कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील विद्यार्थी आणि तरूण पिढीपर्यंत राज्यातील  मराठी साहित्य, थोर महापुरूष तसेच शूर सरदारांचा इतिहास आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ यांचे कार्य समजावे यासाठी प्रत्येक शाळेत पुस्तकेही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ज्या ठिकाणी सर्वाधिक वाचन केले जाते त्या ठिकाणी जास्त शास्त्रज्ञ घडतात. मराठी भाषा भवनचे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. विश्व मराठी साहित्य संमेलनातून मराठी भाषेची महती जगभर पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्‍यात येत असल्याचे मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले.

डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम हे उत्तम लेखक, शास्त्रज्ञ तर होतेच याचबरोबर ते उत्तम वाचकही होते. वैज्ञानिक आणि राष्ट्रपती म्हणून ते जनसामान्यांशी जोडले गेले होते. त्यामुळे त्यांचे हे कार्य भावी पिढ्यांसाठी दिशा देणारे ठरले. त्यांची जयंती आज राज्यात सर्वत्र ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरी केली जात आहे. या दिनानिमित्त संपूर्ण राज्यात शासनातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले.

०००

समृद्धी महामार्गावरील वैजापूरजवळील अपघाताचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दु:ख

मुंबई, दि. १५: नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गावर वैजापूर तालुक्यात जांबरगाव टोलनाक्याजवळ टेम्पो ट्रॅव्हलर आणि ट्रकच्या भीषण अपघातात निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागल्याची घटना अत्यंत दुःखद, वेदनादायी आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले आहे. अपघातातील मृतांना उपमुख्यमंत्र्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करुन त्यांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा केली आहे. तर जखमींवर तातडीने, शासकीय खर्चाने सर्वतोपरी उपचार करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

अपघातात १२ जणांचा मृत्यू तर १५ जण जखमी झाले आहेत. सर्व प्रवाशी नाशिक परिसरातील असून देवदर्शन करुन ते नाशिककडे परतत असल्याची प्राथमिक माहिती आहे.

०००

समृद्धी महामार्गावरील वैजापूरजवळील टेम्पो अपघाताचे मुख्यमंत्र्यांना दुःख

मुंबई दि. १५: मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गावर मध्यरात्री वैजापूरजवळ टेम्पो अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना त्यांनी प्रत्येकी ५ लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा केली असून जखमींवर शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करावेत, असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

मध्यरात्री जांबरगाव टोल नाक्याजवळ टेम्पो ने ट्रकला धडक दिल्यामुळे १२ जणांचा मृत्यू झाला तर १५ जण जखमी झाले आहेत. हे सर्व प्रवासी नाशिक परिसरातील होते. अपघात झाल्याचे समजताच लगेच बचाव कार्य सुरू करण्यात आले असून याविषयीही मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली. अपघात नेमका कशामुळे झाला त्याची चौकशी करून तपास करण्याचे आणि दोषींवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

पालकमंत्री, गृहनिर्माणमंत्र्यांची घटनास्थळी आणि रुग्णालयास भेट; जखमींची विचारपूस

दरम्यान, छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदिपान भुमरे आणि गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी अपघातस्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर या अपघाताचा सविस्तर अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केला. अपघातातील जखमींवर छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात आणि वैजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या रुग्णालयांत मंत्री श्री. भुमरे आणि श्री. सावे यांनी भेट दिली आणि जखमींची विचारपूस केली. तातडीचे आणि योग्य ते उपचार करण्याच्या सूचना त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.

०००

भारत २०३६ च्या ऑलिम्पिकसाठी सज्ज – पंतप्रधान नरेंद्र मोदी

चार दशकानंतर भारतात होणाऱ्या १४१ व्या अधिवेशनाचे उद्घाटन

 

मुंबई, दि. १४ :- ‘खेळ हे पदक जिंकण्यासाठी नसतात. तर खेळातून हृदय जिंकले जाते.खेळात जगाला जोडण्याची क्षमता असते असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत २०३६ मधील ऑलिम्पिक स्पर्धेच्या संयोजनासाठी सज्ज असल्याचे निःसंदिग्ध अशी ग्वाही दिली. त्यांनी २०२९ मध्ये होऊ घातलेल्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेच्या संयोजनाची तयारी दर्शवली.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या १४१ व्या अधिवेशनाचे पंतप्रधान श्री. मोदी यांच्या हस्ते दिमाखदार उद्घाटन झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. या उद्घाटन सोहळ्यात भारतीय प्राचीनात्वाच्या खूणा आणि वैविध्यपूर्ण परंपरा आणि कला, नृत्य आणि संस्कृतींचा परिचय करून देणारा नजराणाच जगभरातील प्रतिनिधी समोर सादर करण्यात आला. या सादरीकरणाने बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर मधील ग्रँड थिएटर दुमदुमून गेले.

पंतप्रधान श्री. मोदी म्हणाले, भारत वेगाने वाटचाल करणारी अर्थव्यवस्था आहे. आमच्याकडे उत्तम पायाभूत सुविधा आहेत. गेल्या काही वर्षांत आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक क्रीडा स्पर्धांचे यशस्वीपणे संयोजन केले आहे. भारताला जी-२० चे अध्यक्षपद मिळाले. या काळात आम्ही भारतातील विविध शहरांमध्ये विविध कार्यक्रमांचे यशस्वीपणे आयोजन केले आहे. आता कोट्यवधी भारतीय जनतेला ऑलिम्पिक स्पर्धेच्या संयोजनाची संधी मिळावी अशी आस लागून राहिली आहे. आम्ही २०३६ मधील ऑलिम्पिकचे यशस्वीपणे संयोजन करू शकतो असा विश्वास आहे. या दरम्यान होऊ घातलेल्या २०२९ मधील युवा ऑलिम्पिक स्पर्धेच्या संयोजनाची देखील आमची तयारी आहे. भारतीयांच्या या आकांक्षेची, स्वप्नाची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती दखल घेईल असा विश्वासही पंतप्रधान श्री. मोदी यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान श्री. मोदी यांनी भारतातील प्राचीन क्रीडा परंपरेचा देखील आढावा घेतला. ते म्हणाले, भारतातील गावागावांत विविध खेळांची परंपरा आहे.  या गावात प्रत्येक सणाला वेगवेगळ्या खेळ खेळण्यांची प्रथा आहे. आमची क्रीडा परंपरा समृद्ध आहे. प्राचीन ग्रंथामध्ये ६४ विद्यांचा उल्लेख आढळतो. त्यामध्ये अश्वारोहण, धनुर्विद्या, जलतरण आणि मल्लविद्या यांचा समावेश आहे. धनुर्वेद अशी स्वतंत्र संहिता आहे. कच्छ येथील उत्खननात धौलाविरा परिसरात पाच हजार वर्षांपूर्वीचे प्रेक्षागृह आढळले आहे. राक्षीगढी येथेही असे जुने अवशेष सापडले आहेत. खेळात कुणी हारणारा नसतो. तर खेळाडू हा विजेता आणि शेवटपर्यंत शिकणारा असतो याचा उल्लेख करून आणि भारत  हा वसुधैव कुटुंबकम् ची संकल्पना मांडणारा देश असल्याचा उल्लेखही त्यांनी आवर्जून केला.

भाषणाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान मोदी यांनी भारतीयांच्या क्रिकेट प्रेमाचा उल्लेख केला. तसेच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या कार्यकारी मंडळाने क्रिकेटचा ऑलिम्पिक मध्ये समावेश करण्याची शिफारस केली आहे आणि आम्ही त्याबाबत लवकरच सकारात्मक बातमी ऐकण्याची आशा करत आहोत असा आशावाद प्रकट केला. याचवेळी त्यांनी अहमदाबाद येथे झालेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारतीय संघाच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त करत, भारतीय संघाचे अभिनंदन केले.

भारताला ४० वर्षांनंतर दुसऱ्यांदा तर मुंबईला पहिल्यांदाच या अधिवेशनाच्या संयोजनाची संधी मिळाली आहे. १५ ते १७ ऑक्टोबर, २०२३ या कालावधीत हे अधिवेशन होत आहे.

अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख यांच्यासह जगभरातील ऑलिम्पिक संघटनेचे पदाधिकारी, सदस्य आदी उपस्थित. भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षा पी. टी. उषा,  आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्य तथा रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती नीता अंबानी उपस्थित तसेच रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्यासह तसेच क्रीडा तसेच कला व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष श्री. बाख यांनी जागतिक शांतता आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून खेळ आणि क्रीडा क्षेत्राच्या योगदानाबद्दल भाष्य केले. ते म्हणाले, पॅरीसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक २०२४ मध्ये शांती, सलोखा आणि संवाद यासाठी प्रयत्न करण्यासाठी जी -२० च्या जाहीरनाम्यात समावेश करण्यात आला आहे. यासाठी पंतप्रधान श्री. मोदी यांच्या पुढाकाराचे स्वागत करायला हवे’ श्री. बाख यांनी क्रीडा क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता – एआय च्या परिणामकारक वापराबाबतही मांडणी केली.

सुरवातीला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्य तथा रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती अंबानी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या, ‘एक मुंबईकर म्हणून या अधिवेशनासाठी जगभरातील क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांचे स्वागत करताना खूप आनंद होत आहे.  ‘वसुधैव कुटुंबकम्’ हे ब्रीद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जी-२० च्या अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सहकार्याने भारतात मुलांसाठी शिक्षण आणि क्रीडा यांचा मेळ साधण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात असल्याचा उल्लेख त्यांनी केला. जगभरातील कोट्यवधी आणि भारतातील २ कोटीहून अधिक मुलांपर्यंत ऑलिम्पिक व्ह्यॅल्यु एज्युकेशन प्रोग्रॅमच्या माध्यमातून क्रीडा कौशल्य पोहचवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी, याच ठिकाणी १२ ते १४ ऑक्टोबर, २०२३ दरम्यान आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या कार्यकारी मंडळाची बैठक संपन्न झाली.

 

000

 

मराठा आरक्षणाबाबतची क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करुन घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा होकार

मुंबई, दि. 14 : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करून घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने होकार दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य शासनाने याबाबत केलेल्या प्रयत्नांना मिळालेले हे यश आहे. राज्य शासनाने दाखल केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर सुनावणी घेण्यास सरन्यायाधीश न्या. धनंजय चंद्रचूड यांनी होकार दिला आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याच्या राज्य सरकारच्या प्रयत्नांना बळ मिळाले आहे.

काल राज्य सरकारचे सर्वोच्च न्यायालयातील वकील ज्येष्ठ विधिज्ञ मनिंदर सिंह यांनी ही क्युरेटिव्ह याचिका दाखल करून घेऊन त्यावर सुनावणी करण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाकडे केली. त्यावर ‘आम्ही ही याचिका दाखल करून त्यावर सुनावणी घ्यायला तयार आहोत’ असे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्या. धनंजय चंद्रचूड यांनी सांगितले.

मे 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने दिलेल्या निर्णयामुळे मराठा आरक्षण रद्द झाले होते. 5 सदस्यांनी याबाबत सुनावणी घेऊन मराठा समाजासाठीचे आरक्षण रद्द करत मराठा समाजाला आरक्षण देता येणे शक्य नसल्याचे आपल्या आदेशात स्पष्ट केले होते. त्याच निर्णयाचा पुनर्विचार व्हावा यासाठी ही क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्यात आली आहे.

राज्य शासनाने 2018 साली एसईबीसी कायद्यांतर्गत मराठा समाजाला आरक्षण दिले होते. परंतु मे 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ते रद्द केले होते. त्यावेळी मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये राज्य शासनाने दिलेले आरक्षण या निर्णयामुळे रद्द झाले होते. मराठा समाज सामाजिक, शैक्षणिक, आर्थिकदृष्ट्या मागास असल्याचे सिद्ध होऊ न शकल्यामुळे न्यायालयाने हे आरक्षण रद्दबातल ठरवले होते. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह याचिका ऐकून घेण्यास होकार दिल्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य शासनाच्या प्रयत्नांना बळ मिळाले आहे.

ooo

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मुंबईत आगमन

मुंबई, दि,14 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आज एक दिवसीय मुंबई भेटीसाठी विशेष विमानाने आगमन झाले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय  विमानतळावर  राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे स्वागत केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रमुख उपस्थितीत मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या 141 व्या सत्राचे उद्घाटन होणार आहे.

000

PM arrives in Mumbai; to inaugurate session of IOC

Mumbai , Date 14 : Prime Minister Narendra Modi arrived in Mumbai today for a one-day visit on Sat (14 Oct). Maharashtra Governor Ramesh Bais, Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis, Deputy Chief Minister Ajit Pawar welcomed the Prime Minister.

The Prime Minister is scheduled to inaugurate the 141st session of the International Olympic Committee at Jio World Center in Mumbai.

000

 

विभागीय मध्यस्थी परिषदेच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत – मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय

पुणे, दिनांक १४ : विभागीय मध्यस्थी परिषदेच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी केले.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई, मुख्य मध्यस्थी देखरेख समिती मुंबई, उच्च न्यायालय मध्यस्थी देखरेख उपसमिती मुंबई आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजित विभागीय मध्यस्थी परिषदेच्या उद्धघान प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष न्यायमूर्ती नितीन जमादार, मध्यस्थी देखरेख उपसमितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती सुनील बी. शुक्रे, मध्यस्थी देखरेख उपसमितीच्या सदस्य न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई, न्यायमूर्ती भारती एच. डांगरे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्याम चांडक, मध्यस्थी देखरेख उपसमितीचे सदस्य सचिव दिनेश पी. सुराणा, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणेच्या सचिव सोनल पाटील आदी उपस्थित होते.

न्या उपाध्याय म्हणाले, मध्यस्थी ही एक प्रक्रिया असून ती विवादांच्या निकालाच्या पारंपरिक पद्धतींना पर्यायी असल्याचे म्हटले जाते. समाजात व्यक्तींमधील, व्यक्ती आणि समूह यांच्यातील, दोन गटांमधील असे विविध संघर्ष होत असतात. अशा प्रकारच्या संघर्ष निराकरणासाठी विशिष्ठ प्रकारची यंत्रणा विकसित केली पाहिजे. यातून नागरिकांना न्याय मिळणे हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे.

भारतीय संसदेने मध्यस्थी कायदा २०१५ मध्ये संमत केला आहे. मध्यस्थीच्या फायद्यांच्यादृष्टीने हा कायदा अद्यापही पूर्ण क्षमतेने अंमलात आणला जात नाही. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही कलम ८९ चा उपयोग ही पूर्ण क्षमतेने करण्यात आला नाही. सर्वांना निर्णयाच्या व्यवस्थेचे प्रशिक्षण दिले गेले असल्याने कलम ८९ चा जास्तीत जास्त वापर करावा .

कोर्टात येणाऱ्या वादांवर तोडगा काढण्याच्यादृष्टीने विचार करून तडजोडीचे घटक शोधावेत. प्रत्येक न्यायालयाचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा प्रयत्न म्हणजे पक्षकारांद्वारे सहमती देता येईल असे काही तोडग्याचे घटक आहेत का हे शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक विधी सेवा प्राधिकरणाने मध्यस्थी परिषदेच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगून महाराष्ट्रात एप्रिल २०२१ ते मार्च २०२३ या कालावधीत देशात सर्वात जास्त २५ टक्के प्रकरणे निकाली काढल्याची माहिती त्यांनी दिली.

श्री. जमादार म्हणाले, मध्यस्थी विषयावर या वर्षातील ही दुसरी परिषद असून वर्षातून चार परिषदा घेतल्या जातात. परिषदेला वेगवेगळे न्यायिक अधिकारी, सरकारी अधिकारी उपस्थित असतात. मध्यस्थी ही आपल्यासाठी स्थिर घटना नसून तो एक क्षण असतो. मध्यस्थी ही एक लांब आणि कठीण प्रवास म्हणून कल्पना करावी लागेल. या माध्यमातून संघर्ष सोडवून आपण शांततापूर्ण आणि सौहार्दपूर्ण समाजाच्या दिशेने प्रवास सुरू करतो. या परिषदांमुळे आम्हाला आमच्या प्रगतीवर विचार करण्याची, अनुभवाचे आदान प्रदान करण्याची, एकमेकांकडून शिकण्याची संधी मिळते.

मध्यस्थी हे सर्व उपायांसाठी एकाच आकाराचे नाही. हे एक साधन आहे जे कौटुंबिक संघर्षांपासून व्यावसायिक विवादांपर्यंत आणि अगदी समुदायांच्या मतभेदापर्यंत वेगवेगळ्या संदर्भांमध्ये लागू केले जाऊ शकते. आज नवीन मध्यस्थी कायद्यावर विशेष सत्र आहे. मध्यस्थीसाठी आता १८० दिवसांची वेळ मर्यादा आहे, ही पक्षांद्वारे वाढविली जाऊ शकते. मध्यस्थांची नियुक्ती परस्पर कराराद्वारे किंवा संस्थांद्वारे केली जाऊ शकते. मध्यस्थ, संस्था, सेवा प्रदाते यांची नोंदणी करणे हे या कायद्याद्वारे स्थापित भारतीय मध्यस्थी परिषदेचे कार्य आहे. मध्यस्थीचे यश हे त्याच्या अंमलबजावणीवर आणि आपल्या वचनबद्धतेवर अवलंबून आहे, असे त्यांनी सांगितले.

श्री. सुराणा यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.

तांत्रिक शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार – सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील

पुणे, दि. १४ : तांत्रिक शिक्षणाचे भविष्यातील महत्त्व लक्षात घेता विद्यार्थ्यांना ‘सेंटर ऑफ एक्सलंस’च्या माध्यमातून रोजगारक्षम शिक्षण देत रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.

पद्मभूषण डॉ. भाऊराव पाटील यांच्या १३६ व्या जयंतीनिमित्त मंचर येथील अण्णासाहेब आवटे विद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या नियामक सभेचे सदस्य देवेंद्र शहा, बाळासाहेब भेंडे, डॉ. काशिनाथ सोलनकर, प्राचार्य उत्तमराव आवारी आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. वळसे पाटील म्हणाले, पद्मभूषण डॉ. भाऊराव पाटील यांचे कार्य आणि विचाराचा आदर्श समोर ठेऊन विद्यार्थ्यांनी पुढे जाण्याचा प्रयत्न करावा. परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षण व रोजगार मिळण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. नागरिकांनी सामाजिक जाणीव ठेवून यासाठी मदत करावी.

नवीन शैक्षणिक धोरणानुसार शैक्षणिक क्षेत्रात बदल होत आहेत. वर्गखोल्यातील शिक्षणाबरोबरच वर्गखोल्याबाहेरही प्रयोगात्मक शिक्षण घ्यावे लागणार आहे. त्यानुसार शिक्षक व विद्यार्थ्यांनी आपल्या अध्ययन व अध्यापन पद्धतीमध्ये बदल करावा लागणार आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न नीट समजून घेतले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

शिक्षणाचा उपयोग ज्ञान, रोजगार मिळण्यासाठी आपण केला पाहिजे. समाज माध्यमात प्रसारित होणारे विविध संदेश, चित्रफितीची खात्री न करता अफवांना तरुण बळी पडत आहेत, ही चिंतेची बाब आहे. याबाबत तरुण पिढीने विचार केला पहिजे, असेही श्री. वळसे पाटील म्हणाले.

नव्या पिढीने महापुरुषांचा आदर्श समोर ठेवावा आणि आपल्या आयुष्याचे अंतिम ध्येय निश्चित करून त्यानुसार आत्तापासून वाटचाल करावी. आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यातून विद्यार्थ्यांना देश-विदेशात शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक कर्ज देण्यात येत आहे, या सुविधेचा विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री. वळसे पाटील यांनी केले.

अण्णांनी रयत शिक्षण संस्थेचा पाया घातला; आज या संस्थेचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला असून यामध्ये सुमारे १७ हजार शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. अण्णाच्या दूरदृष्टीमुळे त्यांना रोजगार मिळाला आहे. आज संस्थेत सुमारे साडेचार लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहे. रयत शिक्षण संस्थेचे आज विद्यापीठात रुपांतर करण्यात आले असून या माध्यमातून त्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे, असेही श्री. वळसे पाटील म्हणाले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गार्डी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी श्री. शहा, डॉ. काशिनाथ सोलंकर यांनीही विचार व्यक्त केले.

000

चला..! कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा महोत्सवाचे साक्षीदार होवूया..!

कोल्हापूरचा शाही दसरा देशभरात प्रसिध्द असून त्याला ऐतिहासिक वारसा आहे. संस्थान काळात तर हा दसरा राजेशाही थाटात.. मोठ्या दिमाखात साजरा होत होता. कोल्हापूरचा हा दसरा महोत्सव देश विदेशात पोहोचविण्यासाठी जिल्हा प्रशासनासह राज्य शासन प्रयत्नशील आहे. यावर्षी दसऱ्या दिवशी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते पारंपरिक पध्दतीने होणाऱ्या सीमोल्लंघनाबरोबरच राजेशाही परंपरा कायम ठेवत भव्यदिव्य पध्दतीने शाही दसरा साजरा होणार आहे. जुना राजवाडा ते दसरा चौक दरम्यान छबीना, लवाजमा, पारंपरिक वाद्य, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, राजेशाही पोषाखातील राज घराण्यातील वंशज पारंपरिक वेशभुषा अशा दिमाखात नागरिकांच्या सहभागाने दसरा महोत्सव साजरा होणार आहे. यावर्षी दिनांक 15 ते 24 ऑक्टोबर 2023 दरम्यान विविध उपक्रम, स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होवून आपणही या ऐतिहासिक शाही दसरा महोत्सवाचे साक्षीदार होवूया… !

घटस्थापनेदिवशी होणार उद्घाटन दसरा महोत्सवाला घटस्थापनेपासून सुरुवात होणार आहे. यादिवशी रविवार 15 ऑक्टोबर रोजी भवानी मंडप येथे सायंकाळी 5 वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ व श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत पर्यटन परिचय केंद्र व पर्यटन प्रदर्शनाच्या उद्घाटनाने महोत्सवाला प्रारंभ होणार आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या दिवसापासून भवानी मंडप परिसरातील पागा इमारतीत जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचे महत्व व माहिती देणारे प्रदर्शन व कायम स्वरुपी माहिती केंद्र सुरु होणार आहे.

पारंपरिक वेशभूषेवर भर पारंपरिक कला संस्कृतीचा वारसा जपणारा कोल्हापूर जिल्हा आहे. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सोमवार 16 ऑक्टोबरला जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय व खासगी कार्यालयांमध्ये पारंपरिक वेशभुषा दिवस साजरा करण्यात येणार असून यापुढे दरवर्षी नवरात्रीचा दुसरा दिवस संपूर्ण जिल्ह्यात पारंपरिक वेशभूषा दिवस साजरा करण्यात येणार आहे. याच दिवशी सायंकाळी 6.30 वाजता दसरा चौक रंगमंचावर शिवाजी विद्यापीठाच्या युवा महोत्सव विजेत्या संघाच्यावतीने लोककलांचा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी महोत्सवात 17 ते 21 ऑक्टोबर दरम्यान दसरा चौकातील रंगमंचावर सायंकाळी 6.30 ते 9 यावेळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे. मंगळवार 17 ऑक्टोबर रोजी मराठी संस्कृती आणि सण-वारांवर आधारित नृत्य संगीताचा आविष्कार असणारा ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा 80 कलाकारांचा सहभाग असलेला सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे. बुधवार 18 ऑक्टोबर रोजी राजेश देशपांडे दिग्दर्शित व भाऊ कदम, ओंकार भोजने अभिनित ‘करुन गेलो गाव’ हे नाटक तर गुरुवार 19 ऑक्टोबरला दादा कोंडके यांच्यावर आधारित कलाविष्कार कार्यक्रम सादर केला जाणार आहे. यात ‘चला हवा येवू द्या’ फेम प्रख्यात कलाकार भारत गणेशपुरे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे व अन्य 35 कलाकारांचा सहभाग असेल. तसेच लहान मुलांकडून प्रचंड प्रतिसाद मिळालेले ‘अलबत्या गलबत्या’ हे नाटक शुक्रवार 20 ऑक्टोबरला सादर होणार आहे. नवरात्र म्हणजे देवीचा जागर घालणारा उत्सव.. याचसाठी शनिवार 21 ऑक्टोबर रोजी सिनेतारकांचा ‘नवदुर्गा.. नवतारका’ हा संगीत व नृत्य- नाट्य कार्यक्रम होणार आहे. यात दूरचित्रवाणीवरील बहुतांशी अभिनेत्री सहभागी होणार आहेत..

नारी शक्तीचा प्रत्यय देणार नवदुर्गांची शोभायात्रा सध्याच्या युगात सक्षमपणे काम करणाऱ्या विविध क्षेत्रातील महिलांचा सहभाग असणारी शोभा यात्रा (बाईक रॅली) गुरुवार 19 ऑक्टोबर रोजी होणार आहे.  दसरा चौक ते भवानी मंडप – बिंदू चौक – उमा टॉकीज – रेल्वे पुल- कावळा नाका- दसरा चौक या मार्गाने ही रॅली मार्गक्रमणा करेल. घोषवाक्य, प्रबोधनपर फलक यासह विद्यार्थिनी, शिक्षक, वकील, अधिकारी, पत्रकार, डॉक्टर, परिचारिका, इंजिनियर, पोलीस, होमगार्ड आदी क्षेत्रांतील महिलांचा सहभाग यात्रेची शोभा वाढवणार आहे.

कौशल्यपूर्ण क्रीडा प्रकाराला प्रोत्साहन देशात विविध प्रकारचे पारंपरिक युद्ध प्रकारांचे सराव करणारे खेळाडू आहेत. कोल्हापूरला मर्दानी खेळांची परंपरा आहे. या कौशल्यपूर्ण क्रीडा प्रकाराला प्रोत्साहन मिळावे व सर्वांना या खेळांचा परिचय व्हावा, यासाठी 20 व 21 ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे सकाळी 8 ते 11.30 व सायंकाळी 4 ते 7.30 यावेळेत भारतीय युद्धकला प्रात्यक्षिक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

रचना शिल्प प्रात्यक्षिकासह अनुभवायला मिळणार मजा..-  22 ते 24 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 11 ते रात्री 9 या वेळेत महावीर कॉलेज ते खानविलकर पेट्रोल पंप मार्गावर रचना शिल्प प्रात्यक्षिक व स्पर्धा होणार आहे. रविवार 22 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 ते 11 यावेळेत दसरा चौक ते जयंती पुल रस्ता हा फन स्ट्रीटवर जुने खेळ, आट्या पाट्या, गलोर, गोट्या, भोवरा,  गाणी, चित्र, मार्शल आर्ट, मर्दानी खेळ, गो कारटिंग, महिलांसाठी लेझीम आदी मजा अनुभवायला मिळेल. रविवार 22 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 ते सायंकाळी 7 या वेळेत महाव्दार रोडवर गालिचा रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

करवीरच्या लेकीचा होणार सन्मान राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर कर्तृत्ववान ठरलेल्या कोल्हापुरच्या लेकीचा (महिलेचा) गौरव होणारा ‘करवीर तारा सन्मान’ कार्यक्रम सोमवार 23 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता केशवराव भोसले नाट्यगृहात  होणार आहे.

शाही थाटात सीमोल्लंघन पारंपरिक विजयादशमीचा सण दरवर्षी करवीरनगरीत ऐतिहासिक दसरा चौकात शाही थाटात आणि उत्साहात संपन्न होतो.  प्रारंभी करवीर निवासिनी श्री अंबाबाई, जुन्या राजवाड्यातील तुळजाभवानी आणि गुरु महाराज यांच्या पालख्यासह आणल्या जातात. यानंतर श्रीमंत शाहू महाराज छत्रपती व त्यांच्या कुंटुंबातील सदस्यांचे परंपरागत पध्दतीने ऐतिहासिक मेबॅक मोटारीतून दसरा चौकात आगमन होते. यावेळी पोलीस विभाग व टी.ए. बटालियनच्या बँड पथकाकडून करवीर संस्थानचे गीत वाजवून स्वागत होते. औक्षण झाल्यानंतर पारंपरिक पध्दतीने विधीवत पूजा होवून देवीची आरती होते. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते शमीपूजन झाल्यानंतर छत्रपतींच्या कुटुंबातील सदस्यांनी सोने लुटताच करवीरवासिय नागरिक अपूर्व उत्साहात सीमोल्लंघन करुन सोने लुटतात. श्रीमंत शाहू महाराज यांच्यासह राजघराण्यातील सदस्यांना सोने देवून नागरिक दसऱ्याचा आंनद साजरा करतात.

यावर्षी मंगळवार 24 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 वाजता भवानी मंडप ते दसरा चौक व नवा राजवाडा ते दसरा चौक या मार्गावर होणाऱ्या शाही दसरा मिरवणूकीत ढोल ताशा पथक, लेझिम पथक, मावळा पथक विविध कला सादर करणार आहेत. तसेच जिल्ह्यातील नामवंत खेळाडूंचाही लवाजाम्यामध्ये समावेश असणार आहे.

दसरा महोत्सवाअंतर्गत 15 ते 24 ऑक्टोबर दरम्यान होणारे सर्व कार्यक्रम विनामुल्य असून नागरिकांसाठी खुले राहणार आहेत. कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवातील सर्व कार्यक्रमांचा लाभ नागरिकांनी घ्यावा दसऱ्याचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

 

वृषाली पाटील,

माहिती अधिकारी,

जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर.

ताज्या बातम्या

महाराष्ट्रासाठी पर्यायी ऊर्जा प्रकल्पांची मांडणी – राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची माहिती

0
राजधानीत ' ऊर्जा वार्ता' परिषद नवी दिल्ली 17 : महाराष्ट्र राज्य हे ऊर्जा क्षेत्रात आघाडीवर  ठेवण्यासाठी  पर्यायी ऊर्जा प्रकल्पांची आवश्यकता असल्याची धोरणात्मक मांडणी ऊर्जा...

विकसित महाराष्ट्र २०४७ मध्ये ‘आयएसओवा’ सक्रीय सहभागी – आयएसओवाचे अध्यक्ष अर्चना मीना

0
मुंबई, दि. 17 : सक्षमता, ज्ञान आणि अनुभवाची जोड देऊन आपण सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात पूर्ण क्षमतेने योगदान देण्यास सक्षम आहोत. विकसित महाराष्ट्र २०४७ या...

उमराणेतील शेतकऱ्यांना कांद्याची थकीत बिले देण्यासाठी ४५ दिवसांत अहवाल सादर करा – पणन मंत्री जयकुमार...

0
मुंबई, दि. १७ : नाशिक येथील उमराणे रामेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतकऱ्यांना कांद्याचे थकीत बिले अदा करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश पणन मंत्री जयकुमार...

नागपूर-अमरावती जिल्ह्यातील नझूल निवासी भूखंडधारक अभय योजनेला ३१ जुलै २०२६ पर्यंत मुदतवाढ – महसूलमंत्री चंद्रशेखर...

0
मुंबई दि. १७ : नागपूर आणि अमरावती विभागातील निवासी प्रयोजनार्थ भाडेपट्ट्यावर दिलेल्या नझूल भूखंडांसाठी लागू करण्यात आलेल्या अभय योजनेला ३१ जुलै २०२६ पर्यंत मुदतवाढ...

पावसाळ्यात वाहून जाणारे अतिरिक्त पाणी सात गावांना देण्याबाबत प्रस्ताव सादर करावा – जलसंपदा मंत्री...

0
मुंबई, दि. १७ :- सीना-माढा उपसा सिंचन योजनेत बंद नलिका वितरण प्रणाली व ठिबक सिंचनाचा अवलंब केल्यामुळे होणारी पाण्याची बचत आणि पावसाळ्यात धरण भरल्यामुळे  वाहून...