मंगळवार, ऑगस्ट 5, 2025
Home Blog Page 1098

एकही शासकीय कार्यालय भाड्याच्या जागेत राहणार नाही यादृष्टीने नवीन आराखडे तयार करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि.२६:  प्रशासकीय इमारतीचे आराखडे करतांना आगामी ५० वर्षांचा सर्वांगीण विचार करता एकही शासकीय कार्यालय भाड्याच्या जागेत राहणार नाही यादृष्टीने नवीन इमारतीचे आराखडे तयार करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शहरातील विविध विकासकामांच्या पाहणी दौऱ्यावेळी दिले.

यावेळी सहकार आयुक्त अनिल कवडे, कृषी आयुक्त प्रवीण गेडाम, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता बाप्पा बहिर, अपर कामगार आयुक्त शैलेश पोळ आदी उपस्थित होते.

विकास कामांची पाहणी करताना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाबाबत माहिती घेतली. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर काळानुरुप गरजेनुसार विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची विस्तारित इमारत आदी शासकीय इमारतीचे काम नव्याने पूर्ण करण्यात आले आहे. नोंदणी भवन, शिक्षण भवन, कृषी भवन, सहकार भवन, कामगार भवन आदी इमारतींचे काम सुरु आहेत तर काही इमारतींच्या कामांच्या प्रशासकीय व तांत्रिक मान्यताही देण्यात आल्या आहेत.

आगामी काळातही विविध शासकीय इमारती नव्याने बांधण्याचे काम हाती घेण्यात येणार आहेत. प्रशासकीय इमारतीचे आराखडे तयार करताना संबंधित विभाग प्रमुखाला विश्वासात घेऊनच आराखडे तयार करावेत. आराखड्यात प्रामुख्याने वीज, वाहनतळ, अग्निशमन यंत्रणा या बाबतीत सुरक्षितेच्यादृष्टीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करा. यासाठी नामांकित, कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करणाऱ्या कंत्राटदारांची नेमणूक करावी.

इमारती पूर्ण झाल्यावर देखभाल दुरुस्तीवरचा खर्च कमीत कमी झाला पाहिजे. वाहनतळाचे नियोजन करताना कार्यालयातील मनुष्यबळाबरोबर नागरिकांच्या वाहनाचांही विचार करावा. या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचे वारंवार मार्गदर्शन घ्यावे. इमारत पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना समाधान वाटले पाहिजे.

सारथी येथील बैठक सभागृहात ध्वनी प्रणाली व प्रकाश व्यवस्था अत्याधुनिक बसवावी. पुरेसा सुर्यप्रकाश, हवा खेळती राहील याची काळजी घेऊन काम करावे. नूतन कार्यालयाच्या इमारतीचे दरवाजे, खिडक्या मजबूत आणि पुरेशा उंच बनवाव्या. सहकार आयुक्त कार्यालयाच्या इमारतीचा आराखडा पारंपरिक न राहता त्यामध्ये नाविन्यता असली पाहिजे. वाहनतळ जागेचा विचार करता ते दुमजली करा, अशा सूचना श्री. पवार यांनी दिल्या.

प्रस्तावित कामगार भवन परिसरातील येथील नागरिकांसोबत चर्चा केल्यानंतर ते म्हणाले, कामगार भवन बांधकामाच्यावेळी विरोध करु नये. या कामांमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांना आवश्यक ते सहकार्य केले जाईल. विकासकामांसाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्री. पवार यांनी केले.

सार्वजनिक विकासकामे करताना ती गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होईल, याकडे लक्ष द्यावे. विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाहीदेखील श्री. पवार यांनी दिली.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी भांबुर्डा येथील सारथी मुख्यालय, ‘शिक्षण भवन’ वास्तू बांधकाम, शिवाजी नगर येथील प्रस्तावित ‘कृषी भवन’ इमारत, साखर संकुल येथील सहकार आयुक्त कार्यालय आणि वाकडेवाडी येथील ‘कामगार भवन’ इमारतीच्या जागेची पाहणी केली.

0000

पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

सातारा, दि. २५ : राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रीतिसंगम, कराड येथील समाधी स्थळावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

राज्याच्या विकासात यशवंतराव चव्हाण यांचा मोठा वाटा – पालकमंत्री

यशवंतराव चव्हाण यांनी सहकार, शिक्षण यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. त्यांचा राज्याच्या विकासात मोठा वाटा असून त्यांच्याच विचारावर राज्य शासन काम करीत आहे. त्यांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र घडविण्याचा प्रयत्न राज्य शासन करीत असल्याचेही श्री. देसाई यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

यावेळी पालकमंत्री श्री. देसाई यांनी येथील भजन कार्यक्रमास उपस्थिती लावली.

00000

यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

सातारा, दि. २५ :- राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रीतिसंगम, कराड येथील समाधी स्थळावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी आमदार दीपक चव्हाण, माजी आमदार आनंदराव पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी पर्णकुटी या समाधी स्थळावरील आयोजित भजनकार्यक्रमास उपस्थिती लावली.

यानंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात एकोपा निर्माण करून समाजकारण आणि राजकारण कसे करायचे याची आदर्श मुहूर्तमेढ व शिकवण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिली. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी त्या काळात घेतलेले निर्णय आजही महत्त्वपूर्ण ठरतात.  त्यांचे विचार, त्यांचे साहित्य हे आजही आपणा सर्वांसाठी मार्गदर्शक आहेत.

00000

‘मिट द प्रेस’ : अमरावती श्रमिक पत्रकार संघाला पालकमंत्र्यांची भेट

अमरावती, दि. 24 (जिमाका): राजापेठ येथील अमरावती श्रमिक पत्रकार भवनाला उच्‍च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज सदिच्छा भेट दिली. भेटीदरम्यान त्यांनी श्रमिक पत्रकार संघटनेचे पदाधिकारी तसेच पत्रकार बांधवांशी संवाद साधला.

श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष गोपाल हरणे यांनी पालकमंत्री श्री. पाटील यांना शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे पाटील, मनपा स्थायी समितीचे माजी सभापती तुषार भारतीय, पत्रकार संघाचे मार्गदर्शक विलास मराठे, उपाध्यक्ष अमोल इंगोले, कोषाध्यक्ष तथा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य गिरीश शेरेकर, सचिव रवींद्र लाखोडे, कार्यकारिणी सदस्य कृष्णा लोखंडे, प्रवीण कपिले आदी सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्र्यांनी घेतला अमरावती महानगरपालिकेतील विविध विषयांचा आढावा

अमरावती, दि. 24 (जिमाका) : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज महानगरपालिका कार्यालय येथे भेट दिली. भेटीदरम्यान त्यांनी महानगरपालिकेतील विविध विषयांचा आढावा घेतला. घनकचरा व्यवस्थापन, नियमित पाणीपुरवठा याची योग्य अंमलबजावणी करावी तसेच भुयारी गटार योजनेसंदर्भातील प्रस्ताव तातडीने सादर करावा. याबाबत नियमितपणे आढावा घेण्यात येईल, असे निर्देश पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी दिले.

या बैठकीत खासदार अनिल बोंडे, आमदार प्रविण पोटे पाटील, जिल्‍हाधिकारी सौरभ कटियार, महानगरपालिका आयुक्‍त देविदास पवार, उपायुक्‍त जुम्‍मा प्‍यारेवाले, माजी नगरसेवक तसेच नगरसेविका, मनपा अधिकारी यावेळी उपस्थित होते.

            पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील घनकचरा व्यवस्थापन योग्य रित्याने होण्यासाठी महानगरपालिकेने संबंधित कंत्राटदाराकडून घनकचरा व्यवस्थापन नियमितपणे करुन घ्यावे. यासाठी महापालिकेने घनकचरा व्यवस्थापनाबाबत प्रत्यक्ष सर्वेक्षण करावे. ही कामे नियमितपणे होत आहे, याबाबत खातरजमा करावी. अमरावती पाणीपुरवठा योजना अमृत 2.0 अंतर्गत सिंभोरा ते नेरपिंगळाई या मार्गावरील प्रस्तावित पोलादी पाईपलाईनचे कामे तसेच जलशुध्दीकरण केंद्र जलवाहिनीच्या प्रस्ताव तातडीने मार्गी लागण्यासाठी पाठपुरावा करावा. तसेच जिल्ह्यातील पाणीपुरवठा नियमित होण्याच्या अनुषंगाने उपाययोजना करावी, असेही ते यावेळी म्हणाले.

            पालकमंत्री श्री. पाटील यांनी महानगरपालिकेतील सर्वसाधारण कामकाज, प्रधानमंत्री आवास योजना, पाणी योजना प्रगती पुरवठा, भुयारी गटार, घनकचरा व्‍यवस्‍थापन योजना, स्‍वच्‍छता सेवा नियोजन, मनपा निधी, मनपा कार्यान्वित अन्‍य प्रकल्‍प व उपक्रम, या विषयांवर संबंधितांशी चर्चा करुन माहिती जाणून घेतली. अमरावती शहर स्वच्छ व सुंदर करण्‍याच्‍या सूचना यावेळी त्‍यांनी दिल्‍या.

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

अमरावती, दि.24(जिमाका) : केंद्र शासनाच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत, यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रा मोहिम राबवित आहे. या मोहिमेंतर्गत शासनाच्या योजनेची माहिती देणारे प्रसिद्धीरथाचे बोरगाव धर्माळे येथून उच्‍च व तंत्र शिक्षण, वस्‍त्रोद्योग, संसदीय कार्य मंत्री, महाराष्‍ट्र राज्‍य तथा पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी शुभारंभ केला. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये शासकीय योजनांची प्रचार व प्रसिद्धी करावी. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचावा यासाठी प्रशासनाने नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी दिले.

अमरावती तालुक्यातील ग्रामपंचायत बोरगाव धर्माळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथून ‘विकसित भारत संकल्प यात्रे’स प्रारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रविण पोटे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, तहसीलदार विजय लोखंडे, सरपंच  श्रीमती जोशीला राऊत, ग्रामसेवक मनीष इंगोले तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी लाभार्थ्यांना पालकमंत्री यांचे हस्ते आयुष्यमान भारत गोल्ड कार्डचे वाटप करण्यात आले. तसेच गावाला शंभर टक्के ‘हर घर जल’ घोषित झाल्याबाबत प्रमाणपत्र देऊन सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमस्थळी आरोग्य तपासणीसह विविध विभागांचे माहिती  देणारे स्टॉल लावण्यात आले होते. नागरिकांनी या स्टॉल्सला भेटी देऊन आरोग्य तपासणीसह विविध योजनांचा लाभ घेतला. मा.पंतप्रधान यांचा विकसित भारत बनविण्याचा संकल्प संदेश सर्व मान्यवर व नागरिकांनी ऐकला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी संकल्प शपथ घेतली.

विकसित भारत संकल्प यात्रा मोहिम यात्रेच्या माध्यमातून ग्रामस्वराज्य अभियान राबविले जाणार असून, अद्यापपर्यंत ज्या योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचले नाहीत, अशा लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा देशव्यापी मोहीम केंद्र शासनाकडून राबविण्यात येत आहे. या यात्रेसाठी शासनाकडून विविध कल्याणकारी योजनाची सविस्तर माहिती असलेले चित्ररथाद्वारे जिल्ह्यातील नगरपालिका, नगर परिषद क्षेत्र आणि विविध ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये केंद्र शासनाच्या विविध योजनांची व्यापक प्रचार-प्रसिद्धी केली जाणार आहे. नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विद्यापीठ अधिसभा सभागृहाचा नामकरण सोहळा संपन्न

अमरावती, दि. 24 (जिमाका) : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अधिसभा सभागृहाचे ‘डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख अधिसभा सभागृह’ असे नामकरण उच्‍च व तंत्र शिक्षण, वस्‍त्रोद्योग, संसदीय कार्य मंत्री, महाराष्‍ट्र राज्‍य तथा पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले.

खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार प्रताप अडसड तसेच विद्यापीठ व्यवस्थापन परिषद व अधिसभा सदस्य तथा श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, विद्यापीठाचे कुलसचिव तुषार देशमुख, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, विद्यापीठातील शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

प्रशस्त वातानुकुलित हॉल, अद्ययावत साऊंड सिस्टीम, बैठक व्यवस्था तसेच अत्याधुनिक यंत्रसामुग्रीने सज्ज असे डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख अधिसभा सभागृह आहे.  अधिसभा सभागृहाला भारताचे कृषीमंत्री, शिक्षणाची गंगा खेडोपाडी पोहोचविणारे शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे नाव देण्याचा ठराव विद्यापीठ अधिसभेत सदस्य डॉ. रविंद्र मुंद्रे यांनी मांडला होता.  त्यांचा ठराव सर्वानुमते सभागृहाने मान्य केला.

स्व. डॉ. दिलीप मालखेडे यांच्या जीवनचरित्रावर आधारित पुस्तकाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

 संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु स्व. डॉ. दिलीप मालखेडे यांच्या जीवनचरित्रावर आधारित ‘ध्येयवेडा कुलगुरु’ या पुस्तकाचे विमोचन उच्‍च व तंत्र शिक्षण, वस्‍त्रोद्योग, संसदीय कार्य मंत्री, महाराष्‍ट्र राज्‍य तथा पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले.

पुस्तकाच्या विमोचन प्रसंगी पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, कुलगुरु डॉ. दिलीप मालखेडे हे विद्यार्थी केंद्री धोरण राबविणारे कुलगुरु तसेच उत्कृष्ट प्रशासक होते. विद्यापीठामध्ये काम करताना अल्पावधीत विद्यार्थ्यांमध्ये ते लोकप्रिय बनले. त्यांच्या काम करण्याच्या शैलीमुळे प्राध्यापकांसह विद्यार्थीही प्रभावित झाले होते. त्यांच्या अकाली जाण्यामुळे एक अभ्यासू, दूरदृष्टी असणारा मार्गदर्शक तसेच शिस्तप्रिय व्यक्ती हरपला. त्यांनी केलेले कार्य पुढील पिढीला मार्गदशक ठरावे यासाठी त्यांच्या आयुष्यावर आधारित ‘ध्येयवेडा कुलगुरु’ या पुस्तकामध्ये स्मृती स्वरुपात जतन करण्यात आले आहे. या पुस्तकांच्या रुपाने त्यांचे कार्य सदैव स्मरणात राहील, असेही ते यावेळी म्हणाले.

पुस्तकाचे लेखक डॉ. मनीष गवई यांनी यावेळी ‘ध्येयवेडा कुलगुरु’ या पुस्तकाची पार्श्वभूमी सांगितली. स्व. डॉ. दिलीप मालखेडे यांच्या पत्नी श्रीमती दिपाली मालखेडे यांनी यावेळी त्यांच्या सहवासात घालविलेल्या स्मृतींना उजाळा दिला.

संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

मुंबई दि. २४ : भारतीय संविधानाविषयी जनतेमध्ये जनजागृती व्हावी या दृष्टीने दरवर्षी दि.२६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. दरवर्षी या उपक्रमाचा एक भाग म्हणून संविधानातील निहित मूल्ये आणि तत्त्वे अधोरेखित आणि पुनरुत्थान करण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम आयोजित केले जातात.

सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, स्वायत्त संस्था, संस्था आणि संस्थांसह शैक्षणिक संस्थेत संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले जाते. तसेच संवैधानिक मूल्यांवर चर्चा/वेबिनार आयोजित करण्यात येतात. दि.२६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याबाबतचे शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.

०००

आदिवासी भागातील सेवेचे अधिकाऱ्यांनी संधीत रूपांतर करावे केंद्रीय मंत्री नारायण राणे

नंदुरबार, दिनांक 24 नोव्हेंबर 2023 (जिमाका वृत्त) – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून वंचित आणि दुर्गम भागातील प्रत्येक गरीबाला समृद्ध करण्यासाठी ‘विकसित भारत संकल्पयात्रा’ देशभरातील आदिवासी भागातून सुरू असून या भागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी आपल्या सेवेचे संधीत रूपांतर करावे, असे आवाहन केद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले आहे.

ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ‘विकसित भारत संकल्प यात्रे’च्या अनुषंगाने केंद्र सरकारच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या योजनांच्या आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की व केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री श्री. राणे म्हणाले, खरी समानता तेव्हाच दिसते जेव्हा जेव्हा देशातील कोणत्याही नागरिकाबरोबर भेदभाव होण्याच्या साऱ्या शक्यता समाप्त होतात. समानता आणि सामाजिक न्यायाचा विश्वास तेव्हाच वाटतो जेव्हा सर्वांना बरोबरीने, समान भावनेतून सरकारी योजनांचा लाभ मिळेल. देशात दुर्दैवाने आजही असे अनेक गरीब लोक आहेत ज्यांच्याकडे सरकारी योजनांची योग्य अशी माहिती नाही. ज्यांना योजनांचा लाभ घेण्यासाठी जी धावपळ करावी लागते ती करण्यास ते सक्षम नाहीत. शेवटी आपण कुठवर या लोकांना आहे त्या हालाखित जगायला लावणार आहोत? प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना भेडसावणाऱ्या याच प्रश्नाच्या वेदनेतून, त्रासातून, संवेदनेमधून ‘विकसित भारत संकल्प यात्रे’चा विचार उदयास आला आहे. या यात्रेदरम्यान प्रशासन मिशन मोडमध्ये राज्यातील, जिल्ह्यातील गावागावात जाईल, ज्याचा खऱ्या अर्थाने या सरकारी योजनांवर खरा हक्क आहे, त्या प्रत्येक गरीब, वंचिताला, त्याच्या हक्काच्या या सरकारी योजनांचा लाभ देईल. विकसित भारत संकल्प यात्रेत प्रत्येक गावात जाऊन खऱ्या  लाभार्थ्यांना भेटून  यशस्वी करण्याच्या संकल्पामुळे मोफत अन्नधान्य मिळवून देणारी शिधापत्रिका प्रत्येक गरीबाजवळ असेल,प्रत्येक गरिबाकडे उज्वला गॅस जोडणी असेल, सौभाग्य योजनेद्वारे वीज पुरवठा सुरू राहील आणि नळातून पिण्याचे पाणी मिळेल. प्रत्येक गरीबाजवळ पाच लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय इलाज उपलब्ध करून देणारे आयुष्मान भारत कार्ड असेल. प्रत्येक गरिबा जवळ त्याचे स्वतःचे पक्के घर असेल. प्रत्येक शेतकरी सरकारच्या निवृत्तीवेतन योजनेबरोबर जोडला जाईल. प्रत्येक कामगार निवृत्ती वेतन योजनेचा लाभार्थी बनेल, प्रत्येक पात्र युवक मुद्रा योजनेचा लाभ घेऊ शकेल आणि एक नवउद्योजक बनण्याच्या दिशेने वाटचाल करेल. विकसित भारत संकल्प यात्रा एका प्रकारे देशातील गरिबांना, माता भगिनींना, युवकांना, शेतकऱ्यांना हमखास विकासाचा खात्रीशीर पर्याय आहे.

ते पुढे म्हणाले, विकसित भारताच्या प्रवासात देशातील प्रत्येक व्यक्तीचे सामर्थ्य वापरून घेण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. दोन महिन्यांपूर्वी पी एम विश्वकर्मा योजना देखील सुरू केली आहे. जे आपल्या पारंपरिक कौशल्य साठी ओळखले जातात. विविध व्यवसाय करणारे बलुतेदार विश्वकर्मा मित्र असोत, किंवा शेतकरी बांधव यावसर्वांना प्रशिक्षण दिले जाईल आणि या दरम्यान  त्यांना पैसाही मिळेल. सुक्ष्म,लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून त्यांना उत्तम साधने आणि तंत्रज्ञान देखील केंद्र सरकारमार्फत पुरवले जाईल.

ते पुढे म्हणाले, देशातल्या शेतकऱ्यांना नुकताच पीएम किसान सन्मान निधीचा १५ वा हप्ता देण्यात आला त्यात कोणाचीही मध्यस्थता नाही. सरकारचे शेतकऱ्यांशी थेट नाते जुळले आहे. शेतकऱ्यांच्या गरजा ओळखून अधिकाऱ्यांनी त्यांच्या उत्पन्नवाढीसाठी बिसाणे, पीकपद्धती याबात मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. सरकारने  शेतकऱ्यांसोबत पशुपालक आणि मासेपालकांना किसान क्रेडिट कार्डाच्या सुविधेशी जोडले आहे.पशुधनाच्या मोफत लसीकरणावर सरकारने भर दिला आहे. पशूंचे मोफत लसीकरण केले जात आहे. आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ द्या. मत्स्य पालनाला चालना देण्यासाठी, मत्स्य संपदा योजने अंतर्गत, आर्थिक मदत दिली जात आहे. आज देशात संघटित  एफ पी ओ, तयार होत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी झाला आहे. आणि बाजारपेठेत जाण्याचा मार्ग सुलभ झाला आहे. भरड धान्याला नवी ओळख देत या अशी आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष साजरे केले जात आहे. याचाही लाभ आमच्या आदिवासी बंधू भगिनींना होताना दिसत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीनंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तळोदा तालुक्यातील करडे,सिंगसपूर या ग्रामपंचायतींच्या वतीने आयोजित विकसित भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमांसाठी उपस्थित होते.

भारत आंतरराष्ट्रीय मेळाव्यात महाराष्ट्रातील उत्पादनांना मागणी

नवी दिल्ली, दि.24 : कोल्हापूरचा मसाला, गुळ, चप्पल, सांगलीची हळद, मनुका, चटई, नागपूरचे संत्रे, महाबळेश्वरचे मध, पैठणची पैठणी यासह राज्यातील  विविध पारंपरिक वस्तुंना भारत आंतरराष्ट्रीय मेळाव्यात वाढती मागणी मिळत आहे.

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या वतीने भारतीय उद्योग प्रोत्साहन संस्था अर्थात आयटीपीओच्या वतीने देशाची राजधानी दिल्लीतील प्रगती मैदानावर भारत आंतरराष्ट्रीय मेळाव्याचे दरवर्षी 14 ते  27 नोव्हेंबर या दरम्यान आयेाजन करण्यात येते. या मेळ्यात विदेशातील उद्योग दालने आणि देशातील प्रत्येक राज्याची दालने  मेळाव्याचे खास आकर्षण असते. मेळाव्याच्या माध्यमातून उत्पादकांना थेट ग्राहक व ग्राहकांनाही थेट उत्पादन मिळते. यावर्षी, ‘वसुधैव कुटुंबकम-युनिटी इन ट्रेड’ या मध्यवर्ती संकल्पनेच्या धर्तीवर महाराष्ट्र दालनही सजविण्यात आले आहे.

महाराष्ट्र दालनात एकूण 48 स्टॉल लावण्यात आले आहेत. यामध्ये कोल्हापूर चप्पल, गूळ, मसाले, सांगलीची हळद, मनुका, चटई महाबळेश्वरचे मध, नागपूरची संत्री, पैठणी पर्स, नंदुरबारचे मसाले, पापड व चटण्या, सोलापूरचे टेरी टॉवेल, धारावीची बॅग, माथेरानची चप्पल, घर सुशोभीकरण्याच्या वस्तू, हँड पेंटिंग, विविध क्लस्टर व महिला बचत गटामार्फत उत्पादित वस्तू आदी वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत.

सांगलीचे बापूसो शामराव चव्हाण यांनी त्यांच्या दालनात सर्व प्रकारच्या ज्यूट चटई, वॉल हॅगिंग, लेटरबॉक्स, बस्तर, द-या, सतरंज्या, टेबल मॅट आदी विक्रीसाठी ठेवल्या आहेत. त्यांनी सांगितले की, त्यांच्या उत्पादनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोलकत्याला जाऊन श्री. चव्हाण यांनी ज्यूटपासून बनविण्यात येणाऱ्या उत्पादनांबद्दल सर्व आवश्यक माहिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी खानबाग येथे चटई बनविण्याला सुरुवात केली. सध्या त्यांच्या  चरक स्वास्थ बहुउद्देशीय संस्थेमार्फत 60 महिलांना प्रशिक्षण देण्यात येत आहे, 30 महिला प्रशिक्षणानंतर पूर्णवेळ ज्यूटपासून विविध उत्पादने तयार करतात.

कोल्हापूरचा ‘वर्णे मसाले’ गाळा मेळ्यात लावण्यात आला आहे. या संस्थेच्या मीना वर्णे यांनी स्वत: तयार केलेले विविध प्रकारचे मसाले विक्रीस ठेवले आहेत. मेळ्यात सहभागी होण्यापूर्वी त्यांनी सलग 10 दिवस 1000 किलो मसाले तयार केल्याचे सांगितले. या मसाल्यांना अस्सल चव असल्याची भावना व्यक्त करतात. त्यांच्या मुलाने अभियांत्रिकी पदवी मिळवूनही तो आईची मदत करत असल्याचे त्यांनी सांगितले. मुलाच्या सहकार्यामुळे राजधानी पर्यंत पोहचल्याची व मालास चांगला प्रतिसाद मिळत असल्याची भावना श्रीमती वर्णे यांनी व्यक्त केली.

या दालनात महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाडून प्रामुख्याने सेंद्रीय मध विक्रीसाठी ठेवले आहे. कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील जंगलात मधमाशांच्या मधपेट्या ठेऊन मध संकलन करण्यासाठी वन खात्याची मान्यता घेऊन सेंद्रीय मध तयार करत असल्याची माहिती  संजय पाटील यांनी दिली. संपूर्ण देशी तंत्रज्ञानाने व शास्त्रोक्त पध्दतीने मध संकलनाचे प्रशिक्षण देण्यात येते व रोजगार निर्मितीची उत्तम क्षमता असणारा उद्योग असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोल्हापूरचे प्रसिध्द कोल्हापूरी चप्पल मेळ्याचे खास आकर्षण ठरत आहे. या गाळ्याच्या सर्वोसर्वे श्रीमती मनीषा डोईफोडे यांनी त्यांच्या ‘रोहित फुटवेअर स्टॉल’ मध्ये विविध प्रकारचे कोल्हापूरी चप्पल ठेवले असून या स्टॉलवर भरपूर गर्दी दिसायला मिळते.

नागपूर येथील ‘माऊली क्रिएशन्स’ स्टॉल ला पैठणीचे आकर्षक पर्स, हँड बॅग, साड्या, दुप्पटा, डायरी सारख्या वस्तु श्रीमती मृणाल दाणी व अस्मिता यांनी विक्रिस ठेवल्या आहेत. पहिल्यांदाच एवढा मोठ्या व आंतरराष्ट्रीय मेळ्यात सहभागी झाल्याचा  व त्यांच्या हस्तकलेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा त्यांनी आंनद व्यक्त केला व पुन्हा या मेळ्यात सहभागी होण्याची आशाही व्यक्त केली.

देशाच्या राजधानीत या मेळाव्यात महाराष्ट्र शासनाकडून दालन उभारून राज्यातील ग्रामीण उद्योजकांना उत्तम संधी दिल्याची भावना व्यक्त करत, सर्व सहभागी कारागिरांनी शासनाचे आभार मानत, या पुढेही राज्यशासन असल्या संधी उपलब्ध करून देण्याविषयी आशा व्यक्त केली.

००००

ताज्या बातम्या

साहित्य अकादमीचे बाल साहित्य व युवा साहित्य पुरस्कार २०२६ साठी आवाहन; पुस्तकांच्या नोंदणीला सुरुवात

0
नवी दिल्ली, 06 : साहित्य अकादमीने बाल साहित्य पुरस्कार 2026 आणि युवा साहित्य पुरस्कार 2026 साठी पुस्तकांची नोंदणी सुरू केली आहे. अकादमीने मान्य केलेल्या 24...

कांदळवन नुकसान व अनधिकृत बांधकाम प्रकरणी तत्काळ कार्यवाही करावी –  विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

0
मुंबई,दि.५ : अलिबाग परिसरात काही कंपन्यांकडून होणारे कांदळवनाचे नुकसान व अनधिकृत बांधकामांच्या प्रकरणांची संबंधित विभाग व यंत्रणांनी गांभीर्याने नोंद घेऊन त्यासंदर्भात तत्काळ कार्यवाही करण्याचे ...

कांदळवन नुकसानप्रकरणी अहवाल सादर करावा – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

0
मुंबई, दि. ५ : कांदळवन वृक्षतोड प्रकरणी संबंधित कंपनीवर केलेल्या कारवाईचा अहवाल संबंधित विभाग व यंत्रणांनी सादर करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी...

पुढील पिढीच्या नवउद्योजकांसाठी नवी दिशा – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

0
मुंबई, दि.५ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत आणि नाविन्यता चालित अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनाला अनुसरून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील नवउद्योजकांना सक्षम करण्याच्या...

ग्लोबल चित्रपट निर्मितीसाठी ‘इंडिया सिने हब पोर्टल’चा वापर करण्याचा केंद्र सरकारचा राज्यांना आग्रह; दुर्लक्षित...

0
माहिती आणि प्रसारण मंत्रालयामार्फत सार्वजनिक संवाद व माध्यम/मनोरंजन क्षेत्रातील क्रिएटिव्ह इकॉनॉमीसाठी केंद्र-राज्य समन्वय वाढविण्यासाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या माहिती व जनसंपर्क सचिवांची परिषद सामयिकांचे नोंदणी...