रविवार, ऑगस्ट 3, 2025
Home Blog Page 1099

महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारीचा कोकण विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा

मुंबई दि. 22 : महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी तसेच शिवाजी पार्क येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी येत असतात. या अनुयायांना प्रशासनातर्फे पुरविण्यात येणाऱ्या आवश्यक सोयी-सुविधांच्या पूर्वतयारीचा कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला.

विभागीय आयुक्त श्री. कल्याणकर यांनी चैत्यभूमी तसेच शिवाजी पार्ककडे येणारे रस्ते व त्यावरील वाहतुकीचे नियंत्रण, सुरक्षाव्यवस्था, अनुयायांकरीता पिण्याचे पाणी, शौचालय आदींची सुविधा, परिसर स्वच्छता, सीसीटीव्हीची व्यवस्था, विद्युतव्यवस्था, भोजन व्यवस्था, अतिरिक्त एसटी बस व्यवस्था याबाबत आढावा घेतला. आरोग्य विभागातर्फे देखील आरोग्य सुविधा पुरविण्याबाबत श्री.कल्याणकर यांनी संबंधितांना सूचना दिल्या.

या बैठकीस मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, कोकण विभागीय महसूल उपायुक्त विवेक गायकवाड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, समन्वय समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीच्यावतीने श्री. कांबळे यांनी विविध मागण्या मांडल्या.

******

शैलजा पाटील/विसंअ/

 

ग्रामपंचायत निवडणुकांतील उमेदवारांनी तीस दिवसांत ट्रू-व्होटर ॲपद्वारे निवडणूक खर्च सादर करणे आवश्यक

            मुंबईदि. 22 (रानिआ) : राज्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांतील उमेदवारांनी अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी निवडणूक निकाल लागल्यापासून तीस दिवसांच्या आत ट्रू व्होटर ॲपद्वारे निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करावाअसे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे.

            राज्यातील 2 हजार 352 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिकतसेच थेट सरपंचपदाच्या 130 रिक्त जागा व 2 हजार 950 सदस्यपदाच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकांचा निकाल 6 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर करण्यात आला. त्यामुळे बिनविरोध विजयी झालेल्यांसह निवडणूक लढविलेल्या सर्व उमेदवारांनी 6 डिसेंबर 2023 पर्यंत निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करणे आवश्यक आहे. नक्षलग्रस्त/ दुर्गम भागात मात्र 7 नोव्हेंबर 2023 रोजी निकाल जाहीर करण्यात आला. त्यामुळे तेथील बिनविरोध विजयी झालेल्यांसह निवडणूक लढविलेल्या सर्व उमेदवारांनी 7 डिसेंबर 2023 पर्यंत निवडणूक खर्च सादर करणे आवश्यक आहे. या खर्चाचा हिशेब राज्य निवडणूक आयोगाच्या ट्रू व्होटर ॲपद्वारेच सादर करणे बंधनकारक आहेपरंतु, पोटनिवडणुकांत बिनविरोध विजयी झालेल्यांसह सर्व उमेदवारांना खर्चाचा हिशेब पारंपरिक पद्धतीने सादर करता येईलअसेही आयोगाच्या  प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.

०-०-०

(Jagdish More, SEC)

सहकार महर्षी सुधाकर पंत परिचारक यांच्या सहकार क्षेत्रातील भरीव योगदानामुळे सर्वसामान्यांची प्रगती – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस

पंढरपूर दिनांक 22:- सहकार क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व असलेले कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक यांनी तळागाळातील सर्वसामान्य लोकांसाठी काम केलेले होते. सहकार क्षेत्रातील त्यांच्या भरीव योगदानामुळेच या भागातील सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक प्रगती झालेली आहे असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना च्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. तानाजी सावंत, आमदार सर्वश्री राजेंद्र राऊत ,समाधान आवताडे, राम सातपुते, सचिन कल्याण शेट्टी, माजी मंत्री विजय देशमुख, माजी आमदार प्रशांत परिचारक, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासह कारखान्याचे संचालक मंडळ व सभासद उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री फडवणीस म्हणाले, सहकार महर्षी सुधाकर पंत परिचारक यांनी सहकार उद्योग मोठा केला असून त्यांच्याकडे समाजाभिमुख नेतृत्व होते. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली हे आमचं भाग्य आहे असे  गौरवउद्गारही त्यांनी काढले. त्यांनी या भागात सहकार क्षेत्रातून केलेल्या कामामुळे अनेक लोकांची आर्थिक प्रगती झालेली आहे. सर्व सामान्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांनी सहकार क्षेत्राचा अत्यंत चांगल्या पद्धतीने वापर केला असे त्यांनी सांगितले.

पांडुरंग सहकारी साखर कारखाना वाखरी पासून 30 किलोमीटर  अंतरावर आहे. सभासदांची गैरसोय लक्षात घेता सभासदांना कारखान्याच्या सुविधा मेळाव्यात यासाठी वाखरी येथे प्रशासकीय इमारत बांधण्यात आली आहे, अशी माहिती माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली.

प्रारंभी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते फीत कापून कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.

0000

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरण जनजागृतीचा उपक्रम महत्त्वाचा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पंढरपूर, दिनांक 22:- वातावरणात झालेल्या बदलामुळे पर्यावरणाचा नाश होत असून अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. अतिवृष्टी, अवेळी पडणारा पाऊस त्यातून शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे, त्याप्रमाणेच शहरी भागातही पाणी साचत असल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे पर्यावरण विभागाच्या वतीने आषाढी व कार्तिकी वारीमध्ये पर्यावरण जनजागृतीचा संदेश देण्यात येतो. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

येथील शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात पर्यावरण विभागाच्या वतीने आयोजित कार्तिकी वारी पंढरीच्या दारी शिक्षणाचे धडे देईल घरोघरी या उपक्रमाचे उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री फडणवीस मार्गदर्शन करत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. तानाजी सावंत, आमदार समाधान आवताडे, आमदार राम सातपुते, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी मंत्री विजयकुमार देशमुख, माजी आमदार प्रशांत परिचारक, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्यासह पर्यावरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस म्हणाले की पर्यावरण विभागाच्या वतीने आषाढी व कार्तिकी वारीमध्ये पर्यावरण जनजागृतीचा अत्यंत चांगला उपक्रम राबविला जात असून यातून तरुण वर्ग, विद्यार्थी व समाजातील अनेक घटकापर्यंत पर्यावरण जनजागृतीचा संदेश पोहोचवला जात आहे. आपल्या संतांनी ही  पर्यावरणाचे महत्त्व विशद केलेले आहे. संत ज्ञानेश्वर माऊली पासून ते जगद्गुरु संत तुकाराम महाराजापर्यंत सर्वांनी व्यक्ती सोबतच निसर्गाचा व पर्यावरणाचा विचार मांडलेले आहेत. निसर्गाचा घडलेला समतोल व्यवस्थित होण्यासाठी पर्यावरण जागृती सारखे उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. तसेच पर्यावरण संवर्धनाचे शिक्षण शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

प्रारंभी पर्यावरणाच्या दिंडीने हरिनामाचा गजर करत त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील , आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी भजनाचा टाळ वाजवत ठेका धरला. याप्रसंगी माजी आमदार प्रशांत परिचारक व  पालकमंत्री यांच्या सोबत फडणवीस यांनीही फुगडी खेळली. आणि ज्ञानोबा तुकाराम , जय जय राम कृष्ण हरी असा गजर करत वारकरी भक्तांसोबत दंग झालेले पाहायला मिळाले.

यावेळी  ह.भ.प पुर्वा काणे , संगीत नाटक अकादमी विजेत्या भारुडकार चंदाताई तिवाडी, झी मराठी फेम शाहिर देवानंद माळी हे लोककलावंत त्यांच्या पथकासह सहभागी झाले होते.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, आयोजित ”कार्तिकीची वारी पंढरीच्या दारी”या उपक्रमाची संकल्पना

 पंढरपूरच्या वारीला शतकानुशतके भागवत संप्रदायाची परंपरा आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या दिवशी साजरी होणारी आषाढ वारी आणि कार्तिक महिन्याच्या एकादशीला साजरी होणारी कार्तिकी वारी ही वारकरी संप्रदायासाठी आनंदाची पर्वणी असते. संपूर्ण विश्वात सातशे वर्षाहूनही अधिक काळ वारकरी संप्रदायाची ही वारी दिवसेंदिवस लोकाभिमुख चळवळ म्हणून वृध्दींगत होत आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग व महाराष्ट्र कला संस्कृती मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीप्रमाणे कार्तिकीची वारी पंढरीच्या दारी पर्यावरण शिक्षणाचे धडे देई घरोघरी या उपक्रमाचे आयोजन कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने आयोजित करण्यात येत आहे.

या कार्यक्रमात किर्तन, प्रवचन, भारुड, पोवाडा अशा लोककला प्रकारांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती केली जाणार आहे.  या उपक्रमात प्लॅस्टिक पिशवीचा वापर टाळा,  विजेची बचत (सिएफएल बल्बचा वापर करा) पाण्याचा अतिरिक्त वापर टाळून पाण्याचे नियोजन करा, प्लास्टीकचा वापर टाळा, वृक्षतोड टाळा, सेंद्रिय खताचा वापर करुन शेती करा, घरातील प्रत्येक माणसाने वर्षभरात किमान एक झाड लावावे व त्याचे संगोपन करावे, शेतीसाठी पाण्याचा अतिरिक्त उपसा न करता मर्यादित कालावधीत शेतीपंप चालवावा, ओला कचरा सुका कचरा  वेगळा करुन ओल्या कचऱ्यातून सेंद्रिय खताची निर्मिती करावी अशा विविध संदेशांची पखरण लोक कलांच्या माध्यमातून केली जात असते.  वारीत सहभागी होणाऱ्या ग्रामीण जनतेला  लोककला प्रकार हा अत्यंत जवळचा असल्याने या माध्यमातून लोकजागृतीचे नविन साधन समोर आले आहे व ते यशस्वी होत आहे.

000

जनतेशी सुसंवाद कार्यक्रमाद्वारे नागरिकांच्या कामांना मिळाली गती

मुंबई, दि. 22 : मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील जनतेशी सुसंवाद कार्यक्रमात विनंती केली आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी तातडीने दखल घेऊन आदेश दिल्याने पवित्र पोर्टलवरील तांत्रिक अडचण दूर होऊन शेकडो उमेदवार शिक्षक भरतीच्या अंतिम निवड प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकले आहेत. या उमेदवारांनी मंत्री श्री.केसरकर यांचे पत्र पाठवून आभार मानले आणि कृतज्ञता व्यक्त केली आहे.

मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या ‘शासन आपल्या दारी- जनतेशी सुसंवाद’ कार्यक्रमात याबाबतची माहिती देण्यात आली. धाराशीव जिल्ह्यातील नळदुर्गच्या शुभांगी कदम यांनी मंत्री श्री.केसरकर यांना याअनुषंगाने अर्ज दिला होता. आजच्या सुसंवाद कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी रवी कटकधोंड, जिल्हा नियोजन अधिकारी जी. बी. सुपेकर, उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे यांच्यासह संबंधित सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

आजच्या कार्यक्रमात सात अर्जदारांनी आपले अर्ज सादर केले. तर 14 व्यक्तींना विशेष सहाय्य योजनेअंतर्गत संजय गांधी योजनेतून निवृत्तीवेतन मंजुरीचे प्रमाणपत्र, गौण खनिज उत्खनन परवाने, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र आदींचे वितरण करण्यात आले. नवीन अर्ज सादर केलेल्यांपैकी एका पालकाची मुलगी तायक्वांदो खेळ प्रकारात राष्ट्रीय पातळीवर खेळली आहे, तथापि, आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना खर्च भागविणे शक्य होत नसल्याने त्यांना शासकीय योजनेतून लाभ देण्याची सूचना मंत्री श्री.केसरकर यांनी केली. तर दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. एका नागरिकाच्या पुणे जिल्ह्यातील मालमत्तेच्या प्रलंबित असलेल्या मूल्यांकनाबाबत स्वत: मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून त्यांनी प्रश्न तातडीने मार्गी लावला. मंत्री श्री.केसरकर यांनी अन्य अर्जांवर देखील संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

00000

बी.सी.झंवर/विसंअ/

 

 

सुरक्षित मातृत्व आश्वासन कार्यक्रमांतर्गत राज्यात ६०० संस्था होणार ‘सुमन’ संस्था – आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत

मुंबई, दि. 22 : सुरक्षित मातृत्व आश्वासन कार्यक्रम (सुमन) कार्यक्रमांतर्गत राज्यात सन 2023-24 वर्षासाठी 600 संस्थांची ‘सुमन’ संस्था म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील 600 संस्था सुमन संस्था होणार आहेत. यामध्ये 538 आरोग्य संस्थांची सुमन बेसिक म्हणून, 47 आरोग्य संस्थांची बेसिक इमर्जन्सी ऑब्सेट्रीक ॲण्ड न्यू बॉर्न केअर व 15 आरोग्य संस्थांची कॉम्प्रेहेन्स‍िव्ह इमर्जन्सी ऑब्सेट्रिक ॲण्ड न्यू बॉर्न केअर या प्रकारात निवड करण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी दिली आहे.

सुरक्षित मातृत्व आश्वासन कार्यक्रमांतर्गत राज्यातील आरोगय संस्थांची  सुमन संस्था म्हणून निवड करून त्यांच्या माध्यमातून दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविण्याचा आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांचा मानस आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार सुमन संस्थांची संकल्पना मूर्तरुपात आणण्यात येत आहे.  आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांच्या संकल्पनेतून राज्याच्या आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी विविध निर्णय घेण्यात येत आहे. राज्यात 600 संस्था सुमन संस्था म्हणून निवड करण्याचा शासन निर्णयही निर्गमित करण्यात आला आहे.

सुरक्षित मातृत्व आश्वासन कार्यक्रमाचे (सुमन) ध्येय हे,  टाळता येण्याजोग्या कारणांमुळे होणारे माता व बालमृत्यू, आजार संपुष्टात आणून प्रसूतीचा सकारात्मक अनुभव प्राप्त करणे आहे.  सुमन अंतर्गत सर्व लाभार्थींना उच्च दर्जाच्या वैद्यकीय व अत्यावश्यक सेवा, संदर्भ सेवा देणे, लाभार्थ्यांना उपलब्ध सोयी सुविधांची नियमित माहिती देण्यासाठी आणि तक्रारींना त्वरित प्रतिसाद देणारी प्रभावी आरोग्य सेवा प्रणाली निर्माण करणे, स्वयंसेवी संस्था, स्वयंसहाय्यता गट, लोकप्रतिनिधी यांची 100 टक्के माता मृत्यूच्या नोंदणीसाठी मदत घेणे व त्या मृत्यूच्या अन्वेषणासाठी जनजागृती निर्माण करणे, आरोग्य सेवा पुरविणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे ज्ञान, कौशल्य बळकटीकरण करून त्यांच्यामध्ये लाभार्थींच्या हक्काबाबत जागृती निर्माण करणे, लाभार्थ्यांना गुणात्मक सेवा देण्यासाठी प्रवृत्त करणे, आंतरविभागीय समन्वय साधण्यासाठी कृती योजना तयार करणे ही सुमन कार्यक्रमाची वैशिष्ट्य आहे.

या कार्यक्रमांतर्गंत सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये येणाऱ्या सर्व गर्भवती महिला, नवजात बालकांना आवश्यक आरोग्य सेवा मोफत देण्यात येणार आहे. सर्व आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध संसाधनांच्या आणि सेवांच्या आधारे सेवा हमी पॅकेजनुसार सुमन बेसिक, सुमन बेसिक इमरजन्सी ऑब्सेट्रिक ॲण्ड न्यू बॉर्न केअर आणि सुमन कॉम्प्रेहेन्स‍िव्ह इमर्जन्सी ऑब्सेट्रिक ॲण्ड न्यू बॉर्न केअर याप्रमाणे वर्गीकरण करण्यात आले आहे. तसेच सुमन कॉम्प्रेहेन्स‍िव्ह इमर्जन्सी ऑब्सेट्रिक ॲण्ड न्यू बॉर्न केअर यामध्ये जिल्हा, स्त्री रूग्णालये व संदर्भ सेवा केंद्रे यांचा समावेश आहे. सुमन बेसिक इमर्जन्सी ऑब्सेट्रिक ॲण्ड न्यू बॉर्न केअर यामध्ये प्रथम संदर्भ सेवा केंद्र नसलेल्या काही उपजिल्हा रूग्णालये व ग्रामीण रूग्णालये यांचा समावेश आहे. तसेच सुमन बेसिकमध्ये राज्यस्तरावरील संस्थांमध्ये निवड करण्यात आली आहे. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रांचाही समावेश आहे, या आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून राज्यातील जनतेला अधिकाधिक दर्जेदार व सहज आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे निश्चितच राज्याची आरोग्य व्यवस्था आणखी बळकट होईल, असा विश्वासही आरोग्य मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी व्यक्त केला आहे.

 

००००

नीलेश तायडे/विसंअ/

 

पंढरपुरची वारी आपली संस्कृती, कार्तिकी एकादशी निर्विघ्नपणे पार पडेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. २२: – पंढरपूरची वारी ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे कार्तिकी एकादशी निर्विघ्नपणे पार पडेल, यासाठी आपण सर्वचजण प्रयत्न करत आहोत. आमचे प्रशासन मनापासून काम करत आहे, असे सांगतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्तिक एकादशी निमित्ताने पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांसाठीच्या विविध सोयी-सुविधांचा आढावा घेतला. विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी बांधवाच्या सोयी-सुविधांसाठी सर्वतोपरी दक्षता घेण्यात यावी असे निर्देशही त्यांनी दिले.

उद्या गुरूवारी (दि. २३) उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा निर्विघ्नपणे पार पडेल, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला कार्तिक एकादशीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सह्याद्री राज्य अतिथीगृह येथून दृकश्राव्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून कार्तिक एकादशीच्या तयारीचा आढावा घेतला. या संवादात मंदिर समितीचे गहिनीनाथ अवसेकर महाराज यांच्यासह, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस प्रशासन, जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी, आरोग्य विभाग तसेच विविध यंत्रणांचे अधिकारी आदी सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, पंढरीची वारी हा आपल्या सगळ्यांच्याच आस्थेचा, जिव्हाळ्याचा विषय आहे. विठूरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या आपल्या वारकरी बांधवाच्या सोयी-सुविधांसाठी सर्वच यंत्रणांनी प्रयत्नपूर्वक नियोजन करावे. कार्तिक एकादशी निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी विविध घटकांनी समंजसपणे पुढाकार घेतला आहे. ही चांगली बाब आहे. पंढरपूरची वारीही आपली संस्कृती आहे. ती आपण सगळ्यांनी मिळून जतन केली पाहिजे.  आपण राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटी बस प्रवास आणि महिलांना तिकीट दरात पन्नास टक्के सवलत दिली आहे. त्यामुळे या वारीसाठी मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक आणि महिला भगिनी येतील. त्यांना विठुरायाचे दर्शन घेता येईल. ही एक प्रकारे सेवाच आहे. त्यामुळे आमचे प्रशासन देखील वारकऱ्यांच्या सेवेसाठी मनापासून प्रयत्न करत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हणाले. यासाठी पोलीस प्रशासनासह, विविध यंत्रणांचा आढावा घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. आशीर्वाद यांनी पंढरपुरातील स्वच्छता या घटकाविषयी विशेष काळजी घेतली जात असल्याचे सांगितले. प्रदक्षिणा मार्ग, दर्शन रांग, तसेच चार विश्रांती कक्षांची उभारणी, पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही, नदी किनाऱ्याची स्वच्छता, पाण्याची उपलब्धता, आरोग्य शिबीरांचे आयोजन याविषयीही त्यांनी माहिती दिली.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी वारकरी आणि पंढरपूर वारीबद्दल आस्थेने पुर्वतयारीचा आढावा घेतल्याबद्दल श्री. अवसेकर महाराज यांनी आभार मानले.

००००

आता प्रत्येक बसस्थानकावर महिला बचतगट, दिव्यांग, माजी सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी स्टॉल

जिल्हा बसस्थानकांवर सुरू होणार आपला दवाखाना; नवीन वर्षात ३४९५ एसटी बसेस सेवेत दाखल होणार

मुंबई, दि. २२: राज्यातील प्रत्येक बसस्थानकावर महिला बचत गटासाठी एक स्टॉल, जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या बसस्थानकावर आपला दवाखाना सुरू करण्याचे तसेच १० टक्के ठिकाणी माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना तसेच दिव्यांगांना बसस्थानकावर स्टॉल देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एसटी महामंडळाला दिले. प्रवाशांना चांगल्या सुविधेसाठी महामंडळात नवीन वर्षात ३ हजार ४९५ एसटी बसेस सेवेत दाखल करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली. बसस्थानाकांच्या स्वच्छतेला प्राधान्य देतानाच त्यांचा चेहरामोहरा बदलावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची ३०३ वी संचालक मंडळ बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.

एसटी महामंडळाला २० नोव्हेंबरला एका दिवशी ३६.७३ कोटी रुपये विक्रमी उत्पन्न झाल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी अभिनंदन केले. राज्यातील सामान्य नागरिकांना एसटीच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी महामंडळाने प्रयत्न केले पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी तयार २२०० साध्या बसेस घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली. यामुळे २२०० तयार परिवर्तन साध्या बसेस मार्च २०२४ अखेर एसटीच्या ताफ्यात दाखल होतील. याबरोबरच एसटीच्या २१ वेगवेगळ्या विभागांसाठी १२९५ साध्या बसेस भाडेतत्त्वावर घेण्यासाठी देखील याबैठकीत मान्यता देण्यात आली.

राज्यातील एकूण बसस्थानकांपैकी १० टक्के ठिकाणी माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना दुध, दुग्धजन्य पदार्थ विक्रीचे स्टॉल देण्याच्या निर्णयाला तातडीने मंजुरी देतानाच मुख्यमंत्र्यांनी महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी प्रत्येक बसस्थानकावर एक स्टॉल देण्याचे निर्देश दिले. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्याशी चर्चा करून योजना तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

राज्य शासनाच्या माध्यमातून सामान्यांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी राज्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी मोठ्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणच्या बसस्थानकांवर आपला दवाखाना सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. एसटीतर्फे येत्या दोन वर्षांत ५१५० ई-बसेस भाडेतत्वावर घेण्यात येणार आहेत. जिल्हा आणि तालुकास्तरावर त्यांची सेवा देण्यात येणार आहे. या बससेवकरीता सामान्यांना परवडेल असेच तिकीट दर ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

यावेळी परदेशी शिक्षण अग्रीम योजना, धर्मवीर आनंद दिघे आरोग्य तपासणी योजना, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान याबाबत मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. आरोग्य तपासणी योजनेत महिलांसाठी मॅमोग्राफी तपासणीचा समावेश करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. बसस्थानकांवरील होर्डींग्जची दुरुस्ती करतानाच त्यांची सजावट करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

 

००००

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीचा आढावा

देशातील इतर राज्यांच्या कार्यप्रणालीचा, धोरणांचा अभ्यास करून त्याप्रमाणे उपाययोजना कराव्यात – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई, दि. २२ : राज्यातील विविध प्रकल्प, योजनांसाठी पंधराव्या वित्त आयोगाने मंजूर केलेला सर्व निधी प्राप्त करून घेण्यासाठी संबंधित विभागांनी तातडीने आवश्यक कार्यवाही करावी. त्यासाठी देशातील इतर राज्यांच्या कार्यप्रणालीचा, धोरणांचा अभ्यास करून त्याप्रमाणे उपाययोजना कराव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिले. हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर याबाबत विभागांनी केलेल्या कार्यवाहीचा पुन्हा आढावा घेणार असल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

 केंद्र शासनाकडून पंधराव्या वित्त आयोगामार्फत राज्याला मिळणाऱ्या निधीसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील त्यांच्या दालनात आढावा घेतला. बैठकीस वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव  नितीन करीर, अपर मुख्य सचिव (व्यय) ओमप्रकाश गुप्ता, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, सचिव  (वित्तीय सुधारणा) श्रीमती शैला ए., नगर परिषद प्रशासन संचालनालयाचे संचालक मनोज रानडे, मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव संजय धारुरकर आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, केंद्र शासनाच्या वित्त आयोगाकडून राज्यातील विकास कामांसाठी मंजूर निधी वर्षनिहाय वितरित करण्यात येतो. मंजूर झालेल्या निधीचे वितरण हे विभागांनी केलेल्या कामावरील वर्षनिहाय खर्चानुसार केले जाते. त्यामुळे सर्व संबंधित विभागांनी या निधीतून करावयाची कामे प्राधान्यक्रमाने पूर्णत्वास न्यावीत. राज्याच्या विकासासाठी हा निधी सहाय्यभूत ठरत असल्याने हा निधी वेळेत प्राप्त करून घेण्यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी उपयुक्तता प्रमाणपत्र तत्परतेने आयोगाला सादर करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, आरोग्य विभागाने पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीचा उपयोग प्रामुख्याने प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे यांच्या उभारणीसाठी करावा. तसेच नगरविकास आणि मदत व पुनर्वसन विभागाने समन्वयातून नगरपालिकांच्या अग्निसुरक्षा प्रणालीचे बळकटीकरण करावे. याद्वारे उपलब्ध निधीचा शंभर टक्के उपयोग करून घ्यावा, असेही त्यांनी सूचित केले.

——०००——

मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र : न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांनी घेतला अमरावती विभागाचा आढावा

अमरावती, दि.22 : मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली शासनाने समिती स्थापन केली आहे. या समितीची कार्यकक्षा संपूर्ण महाराष्ट्र राज्य करण्यात आली आहे. समितीला यासंबंधीचा अहवाल सादर करावयाचा असल्याने कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीची नोंद असलेले दस्त ऐवज व कागदपत्रांचा  समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (नि.) यांनी विभागीय बैठकीत आढावा घेतला.

समितीच्या कामकाजाच्या अनुषंगाने राज्यातील महसुली विभागात दौऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने येथील विभागीय आयुक्त कार्यालयात न्यायमूर्ती श्री. शिंदे यांनी मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीच्या नोंदी, अनुषंगिक बाबींचा व कामकाजाचा आढावा घेतला. विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय, विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, विधी व न्याय विभागाचे सहसचिव ॲड. शेखर मुनघाटे, समिती कक्षाचे उपसचिव विजय पोवार, ॲड. अभिजीत पाटील, कक्ष अधिकारी माधुरी देशमुख यांचेसह पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर इमर विभागांचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते.

न्यायमूर्ती श्री. शिंदे म्हणाले की, अमरावती विभागांतर्गत असणाऱ्या पाचही जिल्ह्यांत कुणबी व मराठा जातीच्या समाजाची लोकसंख्या अधिक प्रमाणात आहे. शासकीय विभागाकडे विशेषत: महसूल विभागाकडे असलेल्या महसुली अभिलेखांच्या सन 1948 पूर्वीच्या तसेच सन 1948 ते सन 1967 कालावधीतील मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीच्या नोंदीची तपासणी करुन त्याबाबतचा अहवाल समितीला सादर करण्यात यावा. तसेच जिल्ह्यातील नागरिकांकडून त्यांच्याकडे उपलब्ध असलेले पुरावे, वंशावळी, शैक्षणिक व महसुली पुरावे, संस्थानिकांनी दिलेल्या सनदा, राष्ट्रीय दस्तावेज इ. जुनी अभिलेखे जिल्हाधिकारी कार्यालयातील स्थापित विशेष कक्षाने स्वीकारुन त्याबाबतही अहवाल सादर करण्यात यावेत.

अमरावती विभागातील पाचही जिल्हा प्रशासनाचा याअनुषंगाने कामकाजाचा सविस्तर आढावा न्यायमूर्ती शिंदे यांनी बैठकीत घेतला. मागील पाच वर्षात मराठा, कुणबी जातीचे जात प्रमाणपत्र वितरणाचा तसेच विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून अवैध ठरलेल्या प्रकरणांच्या कारणांचा आढावा घेतला. प्रारंभी विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांनी प्रास्ताविकात कामकाजाची माहिती देऊन विभागात कुणबी जातीच्या नोंदी आढळलेल्यांची संख्या 20,06,413 असल्याचे सांगितले.

यावेळी अमरावती विभागातील पाच जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी माहितीचे सादरीकरण करुन कुणबी जातीविषयक सांख्यिकी आणि केलेल्या कामकाजाविषयी विवेचन केले. यावेळी अधिकाऱ्यांनी प्रकरणांचे निरीक्षण, पडताळणी, तपासणी, वस्तुस्थितीबाबत समिती अध्यक्षांना सविस्तर माहिती दिली.

ताज्या बातम्या

प्रांतीय अस्मितेसह अखिल भारतीय अस्मिता जपूयात –  राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

0
नागपूर,  दि. ३ :- छत्रपती शिवाजी महाराज यांनी अन्यायाच्या विरुद्ध लढा दिला. हिंदवी स्वराज्यासाठी त्यांनी संघर्ष केला. हिंदवी स्वराज्यासाठी ते लढले. ते परिवारासाठी नाही...

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
अमरावती, दि. ३ : मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे शासनाने मत्स्यव्यवसायाला शेतीचा दर्जा दिला आहे....

दिल्लीत क्रांतिसिंह नाना पाटील जयंती साजरी

0
नवी दिल्ली, ३ : स्वातंत्र्यसंग्रामातील महान सेनानी, ‘परदेशी नव्हे, स्वराज्य हवे’ या विचारांचा पुरस्कार करणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सदनाचे व्यवस्थापक प्रमोद...

अवयवदान पंधरवड्यास सुरुवात; आजपासून राज्यात जनजागृतीपर विविध उपक्रम

0
मुंबई, दि. ३ : राज्यातील अवयवदानाचे प्रमाण वाढावे व अवयवदानाच्या प्रतीक्षेतील रुग्णांना नवजीवन मिळावे यासाठी आजपासून विविध उपक्रमांनी अवयवदान पंधरवडा साजरा होत आहे. सार्वजनिक आरोग्य...

तंत्रज्ञानाच्या सहाय्याने महसूल विभाग अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
नागपूर दि.३ : महसूल विभाग राज्याच्या आर्थिक विकासाचा कणा असून गतिमानता, पारदर्शकता व तत्परतेने सेवा देणारा विभाग म्हणून याची ओळख आहे. सध्या राज्यातील जनतेला सर्वाधिक...