बुधवार, ऑगस्ट 6, 2025
Home Blog Page 1097

राजधानीत ‘संविधान दिन’ साजरा

नवी दिल्ली, दि. २६ : महाराष्ट्र सदन येथे आज ‘संविधान दिन’ साजरा करण्यात आला. कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात राज्य घटनेच्या उद्देशिकेचे सामुहिकपणे वाचन करण्यात आले.

यावेळी निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग  ,सहायक निवासी आयुक्त डॉ.राजेश अडपावर  यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

नवीन महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणात राज्य घटनेच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन

 

नवीन महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणात आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंह यांच्या उपस्थित राज्य घटनेच्या  उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

यावेळी निवासी आयुक्त सिंह यांनी राज्य घटनेच्या उद्देशिकेच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, संविधान उदेशिका ही आपल्या देशाच्या मार्गदर्शक तत्त्वे आहेत. या उद्देशिकांवर आधारित आपण एक सुखी, समृद्ध आणि न्याय्य समाजाची निर्मिती करू शकतो.

या कार्यक्रमाला सहायक निवासी आयुक्त डॉ.राजेश अडपावर यांच्यासह महाराष्ट्र सदनातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचारी उपस्थित होते..

संविधान ‍दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याकडून अभिवादन

सांगली, दि. 26, (जि. मा. का.) संविधान ‍दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान मिरज येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असणारा देश आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानानुसार देश चालत आहे. आपण सर्वांनीही संविधानाचा आदर करून पुढे वाटचाल करूया, असे ते म्हणाले.

यावेळी मकरंद देशपांडे, महादेव कुरणे, गजेंद्र कुल्लोळी, मोहन वनखंडे, पांडुरंग कोरे व विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

000

२६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची मानवंदना

मुंबई दि. २६ : मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करताना शहीद झालेल्या मुंबई पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी तसेच सुरक्षा दलातील अधिकारी यांना राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदरांजली वाहिली तसेच त्यांच्या स्मृती स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या प्रांगणातील शहीद स्मारक येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमास मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनोज सौनिक, गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलिस महासंचालक रजनीश शेठ, मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि शहीद कुटुंबीयांचे सदस्य उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थितांनीही पुष्प अर्पण करून शहिदांना अभिवादन केले.

यावेळी सर्व मान्यवरांनी उपस्थित शहिदांच्या कुटुंबाची भेट घेऊन सहसंवेदना व्यक्त केल्या.

000

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भारतीय संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन

मुंबई दि. 26 : संविधान दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले.

संविधान उद्देशिकेच्या सामूहिक वाचन कार्यक्रमावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, प्रधान सचिव विकास खारगे,सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव र.रा. पेटकर तसेच मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

000

संविधान दिन: राज्यपालांकडून राज्यघटनेच्या उद्देशिकेचे वाचन

मुंबई, दि. 26 : भारतीय संविधान दिनानिमित्त महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवन येथे राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह राज्यघटनेच्या उद्देशिकेचे वाचन केले.

दरवर्षी दिनांक 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त राज्यपालांनी राज्यघटनेच्या उद्देशिकेचे वाचन केले.

भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य; दर्जाची व संधींची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रतीवर्धित करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Maharashtra Governor reads out Preamble on ‘Constitution Day’

The Governor of Maharashtra Ramesh Bais along with the staff and officers of Maharashtra Raj Bhavan read out the preamble of the Constitution of India on the occasion of Constitution Day on Sunday (26th Nov.)

Officers and staff reiterated the resolve of the nation to constitute India into a Sovereign, Socialist, Secular Democratic Republic on the occasion.

000

 

डेव्हिड आणि जेकब ससून इमारतीचे नूतनीकरण वारसा इमारतीला साजेसे व्हावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. 25: शहरातील प्रत्येक वारसा असलेल्या इमारती या आपल्या सर्वांसाठी वारसा रूपाने मिळालेला खजिना आहे. डेव्हिड ससून आणि जेकब ससून या त्याच प्रकारच्या इमारती असून त्यांचे नूतनीकरण वारसा असलेल्या इमारतीला साजेसे व्हावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज डेव्हिड आणि जेकब ससून रुग्णालय वारसा इमारतीच्या नुतनीकरणाच्या कामाची आणि सिव्हील कोर्ट मेट्रो स्टेशनची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शेखर प्रधान, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित, महामेट्रोचे महाव्यवस्थापक राजेंद्र पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता बाप्पा बहिर, ससून सर्वोपचार रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण जाधव, महामेट्राचे संचालक अनिल कोकाटे, राजीव त्यागी आदी उपस्थित होते.

डेव्हिड ससून आणि जेकब ससून इमारतीच्या नूतनीकरणाच्या कामांची पाहणी करताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, नुतनीकरणाचे काम गुणवत्तापूर्वक होणे आवश्यक आहे. नूतनीकरणासाठी साहित्य चांगल्या प्रतीचे वापरावे,  सिलींग व्यवस्थित असावे, रंगरंगोटी आकर्षक असावी, विद्युतीकरणाची कामे, जिन्याची कामे दर्जेदार होणे आवश्यक आहे.

उपमुख्यमंत्री श्री. पवार पुढे म्हणाले, वारसा असलेल्या ऐतिहासिक इमारती जपणे आणि त्यांचे संवर्धन करणे आपले कर्तृत्व आहे. त्याचे नूतनीकरणही त्याच पद्धतीने होणे आवश्यक आहे. या वैशिष्ट्यपूर्ण कामांसह विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.

महात्मा गांधी यांच्यावर अपेंडिक्स शस्त्रक्रिया झाली  होती त्या खोलीची पाहणी यावेळी श्री. पवार यांनी केली.

सिव्हील कोर्ट मेट्रो स्टेशनची पाहणी करताना श्री. पवार म्हणाले, प्रवाशांच्या सोयीसाठी सूचना फलक आणि दिशादर्शक फलक अधिक ठिकाणी लावण्यात यावेत. मेट्रो भवनाचे काम, दिवाणी न्यायालय ते स्वारगेट भूमीगत मेट्रोचे काम आणि रामवाडी ते रूबी हॉल मेट्रोचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे, असेही ते म्हणाले. यावेळी डॉ.  दीक्षित यांनी मेट्रोस्टेशनच्या कामाबाबत माहिती दिली.

000

दिव्यांगांना आनंदमय जीवन जगता यावे यासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली, दि. 25 (जि. मा. का.) : दिव्यांग व्यक्तिंना आधार देण्याची शासनाची भूमिका असून त्यादृष्टीने शासन काम करीत आहे. दिव्यांगांना कृत्रिम अवयव व सहायभूत साधने देवून त्यांना आनंदमय जीवन जगता यावे यासाठी प्रयत्न करीत असून शासन त्यांच्या पाठीशी आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज केले.

दिव्यांगासाठी केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयामार्फत ADIP योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत मिरज ग्रामीण भागातील व सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तिंना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात कृत्रिम अवयव व सहायभूत साधनांचे मोफत वितरण आळतेकर हॉल दिंडी वेस मिरज येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास खासदार संजय पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, तहसिलदार डॉ. अपर्णा मोरे, महानगरपालिका उपायुक्त स्मृती पाटील, गट विकास अधिकारी डॉ. संध्या जगताप, जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी बाळासाहेब कामत, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा प्राजक्ता कोरे, सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय व एल्मिको संस्थेचे नोडल अधिकारी मृणाल कुमार व एस. के. रथ आदि मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, दिव्यांग बांधवांना लाभ देण्याकरिता डिसेंबर 2022 ते जानेवारी 2023 या कालावधीत मोजमाप शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराच्या माध्यमातून दिव्यांगत्वाच्या टक्केवारीनुसार त्यांना कोणत्या साहित्याची गरज आहे याची नोंदणी करण्यात आली होती व आज त्यांना साहित्य वाटपाची सुरूवात करण्यात आली आहे, असे ते म्हणाले.

 एल्मिको संस्थेने दिव्यांगांच्यासाठी काम करण्यासाठी मदतीचा हात दिला याबद्दल संस्थेचे अभिनंदन करून पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, एल्मिको संस्था 54 बॅटरीवर चालणाऱ्या सायकल मोफत देत असून आणखी लागणाऱ्या 160 बॅटरीवर चालणाऱ्या सायकल  जिल्हा नियोजन निधीतून घेत आहोत. अशा एकूण 214 बॅटरीवर चालणाऱ्या सायकल आपण दिव्यांग बांधवांसाठी घेत असून यापैकी आज 15 प्राप्त झाल्या आहेत, उर्वरित टप्याटप्याने प्राप्त होतील. मिरज तालुक्यातील शहरी भागातील एकूण 237 व मिरज ग्रामीण भागातील 390 अशा एकूण 627 दिव्यांग लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येवून 1 हजार 164 साहित्याची नोंदणी करण्यात आली होती. यापैकी मिरज शहर 231 व मिरज ग्रामीण मधील 362 अशा एकूण 593 लाभार्थ्यांना कृत्रिम अवयव मंजूर झाले आहेत. या माध्यमातून दिव्यांगांना आनंदमय जीवन जगण्यासाठी प्रयत्न करीत आहोत, दिव्यांगांना 104 घरकुले मंजूर केली आहेत असे त्यांनी सांगितले.

खासदार संजय पाटील म्हणाले, दिव्यांग व्यक्तिंना आवश्यक सहायभूत साधने मिळण्यासाठी प्रयत्नशील असून दिव्यांग बांधव आपल्या दिव्यांगत्वावर मात करून जिद्दीने प्रगती करत आहेत. त्यांच्या या धैर्याला सलाम करून या कार्यक्रमास त्यांनी शुभेच्छा दिल्या.

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले,  दिव्यांग बांधवांसाठी शासन विविध योजना राबवित आहे. शासन, जिल्हा प्रशासन दिव्यांग बांधवांसाठी सदैव तत्पर आहे. त्यांना कोणतीही मदत हवी असल्यास, काही अडचण असल्यास त्या सांगाव्यात त्या दूर करण्याचा प्रयत्न करू. अशा प्रकारचे शिबीर प्रत्येक वर्षी सर्व तालुकास्तरावर किमान एकदा आयोजित करावे, जेणेकरून दिव्यांग बांधवांना त्यांच्या दिव्यांगत्वावर मात करून जीवन सुसह्य होण्यास मदत होईल, असे सांगितले.

मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात दिव्यांग व्यक्तींना बॅटरीवर चालणारी सायकल, हाताने चालविण्याची तीन चाकी सायकल, कानातील मशिन आदि साहित्याचे वाटप करण्यात आले.

प्रास्ताविकात गट विकास अधिकारी संध्या जगताप यांनी कार्यक्रमाबाबत सविस्तर माहिती विशद केली. सूत्रसंचालन विजयदादा कडणे यांनी केले. आभार आरोग्य अधिकारी रविंद्र ताटे यांनी मानले. या कार्यक्रमास दिव्यांग व्यक्ती, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

हवामान सुरक्षित भविष्य सुनिश्चित करण्यासाठी कार्य करावे – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई, दि.25 राज्य सरकार  हवामान बदलावरील कृती आराखड्यावर काम करत आहे. त्यासाठी महत्त्वाकांक्षी धोरणे विकसित केली जात आहेत. तसेच राज्यासाठी “हवामान सुरक्षित भविष्य निश्चित” करण्यावर अधिक भर देण्यात येत आहे. असे  विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

महाराष्ट्र विधिमंडळ आणि फिनलँड संसदीय शिष्टमंडळ समितीची पर्यावरण आणि वातावरणीय बदलासंदर्भात आज विधानभवन येथे बैठक पार पडली.

फिनलँड संसदीय शिष्टमंडळात समितीचे अध्यक्ष श्रीमती जेनी पिटको, उपाध्यक्ष श्रीमती इव्हलिना हेनीलूमा, सदस्य मार्को एसेल, नूरा फेजस्ट्राम, पेट्री हुरू, मे.केविला, हॅना कोसोनेन, मिको ओलिकेनेन, मिको पोल्व्हिनेन, मार्जा इक्रोस, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहसंचालक वि. मो. मोटघरे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक विकास सूर्यवंशी, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे माझी वसुंधरा अभियान संचालक सुधाकर बोबडे, राज्य वातावरणीय बदल कृती सेलचे संचालक अभिजीत घोरपडे संबंधित अधिकारी,पीठासीन अधिकारी उपस्थित होते.

उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की,  निसर्ग आणि मानव हे अविभाज्य घटक आहेत प्राचीन भारतीय साहित्याने ही ओळख आपल्या मनात रुजवलेली आहे. आपले सर्व सण या संबंधाचे साक्षीदार आहेत. प्रत्येक सणाचा त्या भागातील हंगाम, वनस्पती आणि प्राणी यांच्याशी एक वेगळा संबंध असतो. उत्सवादरम्यान झाडे, प्राणी आणि सागरी जीवांचा आदर  केला जातो आणि म्हणून भारत हा पर्यावरण आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी विविध आंतरराष्ट्रीय करारांवर स्वाक्षरी करणाऱ्या देशांमध्ये पहिला आहे. काही महिन्यांपूर्वी  दिल्ली येथे 18व्या जी-20 शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. जगभरातील विविध राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी भारताचे या आयोजनाबाबत कौतुक केले.

यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, उद्योग विभाग, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग यांनी राज्यातील पर्यावरण बाबत केलेल्या उपाययोजना आणि

पर्यावरणपूरक जीवनशैली आत्मसात करुनच शाश्वत विकासाचे उद्दिष्ट कसे साध्य करू शकतो. याविषयी सादरीकरण करून माहिती दिली.

प्रारंभी उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी फिनलँडच्या संसदीय कार्यप्रणाली, पर्यावरण संतुलनासाठी केलेल्या उपाययोजना आणि समितीच्या कामकाजाची माहिती जाणून घेत महाराष्ट्र शासनाने पर्यावरणासाठी केलेल्या उपाययोजना आणि विधिमंडळ  कामकाजाची माहिती शिष्टमंडळाला दिली.

सातत्याने नैसर्गिक आपत्ती येत आहे. आपत्ती निवारणासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून आवश्यक उपाययोजना कशा करता येतील. नुकतेच महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले आहे. त्यातून महिलांना राजकीय क्षेत्रात काम करण्याची अधिक संधी मिळणार आहे. या महिलांच्या पुढाकाराने नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून पर्यावरण विषयक जनजागृती आणि उपाययोजना करण्यासाठी फिनलँड संसद आणि राज्य सरकार व महाराष्ट्र विधानमंडळ यांचे सहकार्य असावे, अशी अपेक्षाही उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी व्यक्त केली.

0000

घराचे स्वप्न साकारण्यासाठी ‘होमथॉन प्रॉपर्टी एक्स्पो’ उपयुक्त – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 25 : आपले स्वतःचे घरकुल असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. ते साकारण्यासाठी होमथॉन प्रॉपर्टी एक्स्पो उपयुक्त ठरेल. या क्षेत्राच्या विकासासाठी सकारात्मक प्रयत्न केले जातील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काऊंसिलच्या (NAREDCO) वतीने वांद्रे- कुर्ला संकुलात देशातील सर्वात मोठे ‘होमथॉन प्रॉपर्टी एक्स्पो’चे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनास उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज दुपारी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ‘नारडेको’चे अध्यक्ष संदीप रुणवाल, सचिव अभय चांडक आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, ‘नारडेको’ने देशातील सर्वात मोठे प्रदर्शन भरविले आहे. यामुळे सर्व सामान्य घर खरेदीदारांना मोठे व्यासपीठ मिळवून दिले आहे. या क्षेत्रात वेगवेगळ्या कंपन्या, कॉर्पोरेट हाऊस यांनी प्रवेश केला आहे. घर खरेदीदारांना स्वस्त आणि चांगले घर निवडण्याची संधी या प्रदर्शनातून मिळणार आहे.

बांधकाम क्षेत्राच्या नियमनासाठी ‘ महारेरा ‘ ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. बांधकाम क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल. तसेच अशा प्रकारचे प्रदर्शन पुढील वर्षी आयोजित करावे, अशीही सूचना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केली.

यावेळी श्री. रुणवाल यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी रिअल इस्टेट क्षेत्रातील व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000

पश्चिम किनाऱ्यावरील राज्यांपैकी महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक पोलीस गस्त नौका

मुंबई, दि. 25: राज्यात 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर गृह विभागाकडून मोठ्या प्रमाणावर सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.  त्यामध्ये राज्याच्या सागरी किनारा सुरक्षिततेसाठी केलेल्या उपाययोजनांचा समावेश आहे. देशाच्या पश्चिम किनाऱ्यावरील राज्यांपैकी महाराष्ट्रात सर्वाधिक पोलीस गस्त नौका आहेत. सध्या राज्यात 30 पोलीस बोटी कार्यरत आहेत आणि राज्याच्या किनारपट्टीवर नियमितपणे गस्त घालत आहेत.  याशिवाय राज्याने 25 ट्रॉलर भाड्याने घेतले असून, हे सर्व ट्रॉलर्स सातही सागरी पोलीस घटकांमार्फत सागरी किनारीभागात गस्त घालण्यासाठी वापरले जातात.

तसेच राज्य शासनातर्फे  28 नवीन बोटी तीन टप्प्यात घेण्याच्या प्रक्रिया सुरु आहेत. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात 10 नवीन बोटी खरेदी केल्या जाणार आहेत. राज्य पोलीस दलाकडे सध्या असलेल्या बोटींचे आधुनिकीकरण करण्याच्या अनुषंगाने मुंबई पोलीस दलाकडील एक बोट – मुंबई 2,  हिचे आधुनिकीरण  करण्यात आले आहे. तसेच सदर नौकाच्या सागरी चाचणीनंतर तिचा वापर सागरी गस्तीसाठी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. याच मार्गावर इतर बोटींना कार्यान्वित करण्यात येणार आहे.

सर्व गस्ती नौकांच्या गस्तीवर लक्ष ठेवण्यासाठी, राज्याने सर्व 7 किनारी घटकांमध्ये नियंत्रण कक्ष स्थापन करण्यासाठी 53 लाख रुपये मंजूर केले आहेत. नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने हे नियंत्रण कक्ष समुद्रात गस्त घालणाऱ्या पोलीस नौकांवर लक्ष ठेवणार असून, त्यांना मार्गदर्शन देखील करु शकणार आहेत. पुढील पाच वर्षांसाठी 5 इंटरमीडिएट सपोर्ट व्हेसल्स (ISV) भाडेत्तवावर घेण्यासाठी राज्य शासनाने 51 कोटी चा निधी मंजूर केला आहे.  या मोठ्या बोटी असून समुद्रात खोलवर जाण्याची त्यांची क्षमता आहे. तसेच त्या प्रतिकूल हवामानाचा सामना देखील करू शकतात.  तांत्रिक मनुष्यबळाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने अलिकडेच 81 मास्टर्स आणि इंजिन डायव्हर्स आणि 158 खलाशांच्या कायमस्वरूपी भरतीला मंजुरी दिली आहे. पोलीस गस्ती नौका चालवण्यासाठी आणि नौकांच्या देखभालीसाठी मदत करतात.  महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने त्यांच्या जेट्टीचा वापर पोलीस नौकांसाठी करण्याची परवानगी दिली आहे. यामुळे पोलीसांच्या गस्ती नौकांच्या देखभाल दुरुस्तीकरीता व पेट्रोलींग करणे सोईचे झाले आहे.

अलिकडेच 16 आणि 17 नोव्हेंबर 2023 रोजी सर्व सागरी सुरक्षेशी निगडीत अस्थापनांच्या सतर्कतेचे मूल्यांकन करण्यासाठी तटरक्षक दलाने ऑपरेशन सागर कवच आयोजित केले होते. या ऑपरेशन मध्ये सर्व 44 किनारी पोलीस ठाण्यांनी भाग घेतला आणि बोटी आणि व्यक्तींच्या अनधिकृत प्रवेशास यशस्वीरित्या प्रतिबंध केला आहे, अशा विविध सुरक्षेच्या उपायोजना राज्य शासनामार्फत करण्यात आल्या आहेत. अशी माहिती गृह विभागाच्यावतीने  दिली आहे.

0000

ताज्या बातम्या

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पूर्वतयारीचा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी घेतला आढावा

0
मतदान केंद्रांवरील सोईसुविधा, आवश्यक मनुष्यबळाचे नियोजन करण्याचे दिले निर्देश नाशिक, दि. 5: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदार संख्या, मतदान केंद्रे, तेथील सोईसुविधा, निवडणूक पार...

‘स्मार्ट’द्वारे शेतकऱ्यांची आत्मनिर्भरता….

0
कांचनी कंपनीची १०० कोटींच्यावर वार्षिक उलाढाल लहान आणि सिमांत शेतकरी तसेच कृषी नवद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून शेतमालाच्या सर्वसमावेशक आणि स्पर्धात्मक मूल्यसाखळ्यांच्या विकासासाठी मदत करण्याच्या उद्देशाने राज्यात...

मराठी चित्रपटसृष्टी महाराष्ट्राचे वैभव – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा मुंबई, दि .5:- मराठी चित्रपटसृष्टी, रंगभूमी आणि कलावंत हे महाराष्ट्राचे वैभव असून दादासाहेब फाळके यांच्या "राजा हरिश्चंद्र" चित्रपटाच्या...

६० व्या व ६१ व्या राज्य मराठी चित्रपट पारितोषिकांचे, तसेच चित्रपती व्ही.शांताराम व स्व.राज...

0
चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराने अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा, तर चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने अभिनेत्री मुक्ता बर्वे यांचा गौरव स्व. राज कपूर जीवनगौरव...

साहित्य अकादमीचे बाल साहित्य व युवा साहित्य पुरस्कार २०२६ साठी आवाहन; पुस्तकांच्या नोंदणीला सुरुवात

0
नवी दिल्ली, 06 : साहित्य अकादमीने बाल साहित्य पुरस्कार 2026 आणि युवा साहित्य पुरस्कार 2026 साठी पुस्तकांची नोंदणी सुरू केली आहे. अकादमीने मान्य केलेल्या 24...