रविवार, ऑगस्ट 10, 2025
Home Blog Page 1093

जनता दरबारामध्ये सादर झालेल्या अर्जांचा जलद गतीने निपटारा करा – पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या सूचना

कोल्हापूर, दि. 4 (जिमाका) : जनता दरबारामध्ये नागरिकांकडून सादर होणाऱ्या अर्जांचा जलद गतीने निपटारा करुन नागरिकांचे प्रश्न तात्काळ सोडवण्याला प्रशासनाने प्राधान्य द्यावे, अशा सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्या.

पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जनता दरबारमध्ये ते बोलत होते. साधारण 750 हून अधिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी 250 हून अधिक अर्ज दाखल झाले.

यात सर्वसामान्य नागरिकांसह ज्येष्ठांनी आपल्या अडचणी पालकमंत्री श्री मुश्रीफ यांच्याकडे मांडल्या. यावेळी आमदार राजेश पाटील यांनी कुणबी जातीचे दाखले मिळण्याबाबतचा अर्ज सादर केला.  यावेळी आमदार पी. एन. पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, इचलकरंजी मनपा उपायुक्त तैमूर मुलाणी, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, जिल्हा शल्यचकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपये अनुदान आणि पी एम किसान योजनेचा लाभ लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी येणाऱ्या अडचणी चे निराकरण करा. नागरिकांनी सादर केलेल्या अर्जांबाबत त्यांना पुन्हा पुन्हा कार्यालयात जावे लागू नये, यासाठी निकाली न निघणाऱ्या अर्जांबाबत कारण नमूद करुन अर्जदारांना लेखी स्वरुपात अवगत करा, असे त्यांनी सांगितले.

मागील जनता दरबारात 337 अर्ज सादर झाले होते, यातील सर्वांना संबंधित विभागांनी केलेल्या कार्यवाहीबाबत लेखी स्वरुपात अवगत केल्याची माहिती पालकमंत्री मुश्रीफ यांनी यावेळी दिली.

मागील आठवड्यात कागल येथील खानु भागोजी रानगे या मेंढपाळाची बकऱ्याची १५ लहान पिल्ले तरस या प्राण्याने हल्ल्यात मयत झाली होती. श्री रानगे यांना हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने दहा हजार रुपयांची आर्थिक मदत पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते यावेळी देण्यात आली. या घटनेचा पंचनामा झाला असून या मेंढपाळाला शासनाच्या नियमानुसार तातडीने मदत देण्याच्या सूचना मंत्री श्री. मुश्रीफ यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.

विकसित भारत संकल्प यात्रा अभियानांतर्गत जिल्ह्यात गावोगावी योजनांची माहिती व नवीन लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात येत आहे. हे अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी यावेळी केले.

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यामार्फत दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जनता दरबार आयोजित करण्यात येतो. जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील  250 हून अधिक अर्ज जनता दरबारात सादर झाले. सादर झालेल्या अर्जांची साधारणपणे आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. यामध्ये प्रामुख्याने महसूल व तहसीलदार कार्यालय -64,  जिल्हा परिषद -27, कोल्हापूर महानगपालिका -22, पोलीस विभाग -19, भुमी अभिलेख विभाग – 9.. आदी प्रमुख विभागांचा समावेश आहे.

यावेळी पालकमंत्री यांनी प्रत्येक अर्जदाराशी चर्चा करुन संबंधित अर्ज निकाली काढण्यासाठी त्या त्या विभागाकडे दिला.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान २०२३-२४

शेतीला आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरण्यासाठी पूरक व्यवसाय करण्याची आवश्यकता आहे. फलोत्पादन हा शेतीला अधिक मूल्यवर्धन ठरणारा व्यवसाय ठरु शकतो. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजना राबविण्यात येतात. याअंतर्गतच फलोत्पादन पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान 2023-24 काढणीत्तोर व्यवस्थापन घटकांतर्गत एकात्मिक पॅक हाऊस, पुर्व शीतकरण गृह, शीतखोली , शीतगृह, शीतवाहन, रायपनिंग चेंबर व एकात्मिक शीतसाखळी प्रकल्पांच्या उभारणीसाठी शासनाकडुन अर्थसहाय्य देण्यात येते.फलोत्पादन पिकांचे मुल्यवर्धन/प्रक्रिया करून शीतगृहांमध्ये साठवणूक करून फलोत्पादन पिके/ त्यांचे पदार्थ वर्षभर सर्व हंगामात उपलब्ध होऊ शकतात त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होण्यास मदत होणार आहे. फलोत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या मुलभूत सुविधाबाबत विशेष लेख…

काढणीत्तोर व्यवस्थापन

फलोत्पादन पिकांचे मुल्यवर्धन/प्रक्रिया करून शीतगृहांमध्ये साठवणूक करून फलोत्पादन पिके/ त्यांचे पदार्थ वर्षभर सर्व हंगामात उपलब्ध होऊ शकतात, ही बाब लक्षात घेऊन एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत काढणीत्तोर व्यवस्थापन घटकांतर्गत एकात्मिक पॅक हाऊस, पुर्व शीतकरण गृह, शीतखोली , शीतगृह, शीतवाहन, रायपनिंग चेंबर व एकात्मिक शीतसाखळी प्रकल्पांच्या उभारणीसाठी शासनाकडुन अर्थसहाय्य देण्यात येते. उत्पादित फलोत्पादन, औषधी , सुगंधी मालाची साफसफाई, प्रतवारी व पॅकिंग करून दर्जा कायम ठेवून साठवणूक कालावधी वाढवणे तसेच मोठ्या प्रमाणावर फलोत्पादन पिकांच्या मालाची आवक वाढवून बाजार मुल्य ‍शेतकऱ्यांना कमी मिळते या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याकरिता एकात्मिक पॅक हाऊस, पुर्व शीतकरण गृह, शीतखोली, शीतगृह, शीतवाहन, रायपनिंग चेंबर व एकात्मिक शीतसाखळी इ. प्रकल्पांना प्रेात्साहन व अर्थसहाय्य दिले जाते.

उद्देश  :-

मोठ्या प्रमाणावर उत्पादित होणाऱ्या फलोत्पादन उत्पादनाचे बाजार नियंत्रण करणे. फलोत्पादित, औषधी व सुगंधी वनस्पती पिकांचा दर्जा कायम ठेवून साठवणूक कालावधी वाढवणे. बाजारपेठेमध्ये फलोत्पादित औषधी व सुगंधी वनस्पतींच्या पुरवठयात सातत्य ठेवणे. ग्राहकाला आवडीप्रमाणे सातत्याने चांगल्या दर्जाच्या मालाचा पुरवठा करणे. फलोत्पादित, औषधी व सुगंधी वनस्पतीचा टिकाऊपणा वाढविणे.

पात्र लाभार्थी :-

शेतकरी, शेतकरी उत्पादक गट, भागीदारी संस्था, मालकी संस्था, नोंदणीकृत स्वयंसहाय्यता गट, नोंदणीकृत उत्पादक संघ (ज्यामध्ये कमीतकमी 25 सदस्य असतील), शेतकरी उत्पादक कंपनी, कंपनी, महानगरपालिका, सहकारी संस्था, सहकारी मार्केटिंग फेडरेशन, लोकल बॉडी, कृषि उत्पन्न बाजार समिती, पणन मंडळ, शासकीय विभाग, ग्रामपंचायत. शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक संस्था, शासन मान्य संस्था, सहकारी संस्था यांना प्राधान्यक्रम देण्यात येईल. वैयक्तिक शेतकरी, भागीदारी संस्था, मालकी संस्था, नोंदणीकृत स्वयंसहाय्यता गट (ज्यामध्ये किमान 15 सदस्य असतील), शेतकरी उत्पादक कंपनी, कंपनी, शेतकरी गट यांचेसाठी अर्थसहाय्य हे बँक कर्जाशी निगडीत असून (Credit Linked Back Ended Subsidy) बँक कर्जाच्या परताव्याच्या स्वरुपात अनुदान देय राहील.

भागीदारी संस्था असल्यास भागीदारांपैकी एकाही भागीदाराची यापुर्वी अनुदानीत इतर काढणीपश्चात व्यवस्थापन अंतर्गत प्रकल्पाधारित एकात्मिक पॅक हाऊस, पुर्व शीतकरण गृह, शीतखोली , शीतगृह, शीतवाहन, रायपनिंग चेंबर व एकात्मिक शीतसाखळी प्रकल्पात भागीदारी असल्यास पुन:श्च सदर भागीदार संस्थेस लाभ घेता येणार नाही. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSUs), शासकीय संस्था, राज्य सहकारी संस्था, नोंदणीकृत उत्पादक संघ (ज्यामध्ये कमीतकमी 25 सदस्य असतील) यांना अनुदान वगळता प्रकल्पाचा इतर खर्च स्वत: उभारणार असल्यास त्यांना बँक कर्जाची अट असणार नाही, मात्र त्यांना आर्थिकदृष्टया सक्षम असल्याचे लेखापरिक्षण केलेल्या मागील सलग 3 वर्षाचे अहवाल सादर करणे बंधनकारक राहील. तसेच त्यांना प्रकल्प किमतीतील स्वभांडवल उभारू शकतील याबाबत चे पुरावे सादर करावे लागतील.

काढणीपश्चात व्यवस्थापन घटकांतर्गत आकारमान निहाय देय अनुदान पुढीलप्रमाणे :

१. पॅक हाऊस (Pack House) अधिकतम ग्राह्य प्रकल्प रक्कम रू. 4.00 लाख,बांधकाम क्षेत्र / क्षमता 9 मी. X 6 मी.असे राहील. देय अनुदान (ग्राह्य भांडवली खर्चाच्या) सर्वसाधारण,डोंगराळ व अधिसुचित क्षेत्र 50 %   (रु. 2.00 लाख) असे असेल.

२.एकात्मिक पॅक हाऊस कन्व्हेअर बेल्ट,संकलन व प्रतवारी केंद्र, वॉशिंग व ड्राईंग यार्ड आणि भारत्तोलन, इ. सुविधांसह  (Integrated pack house with facilities for conveyer belt, sorting, grading units, washing) या साठी अधिकतम ग्राह्य प्रकल्प रक्कम रू. 50.00 लाख,बांधकाम क्षेत्र / क्षमता 9 मी.  x 18 मी.,देय अनुदान (ग्राह्य भांडवली खर्चाच्या) सर्वसाधारण,35 टक्के  (रू. 17.50 लाख),डोंगराळ व अधिसुचित क्षेत्र  50 टक्के (रू. 25.00 लाख) असे असेल.

३.पुर्व शितकरण गृह (Pre-cooling Unit)अधिकतम ग्राह्य प्रकल्प रक्कम रू. 25.00 लाख /  प्रति युनिट,देय अनुदान (ग्राह्य भांडवली खर्चाच्या) सर्वसाधारण,

35 टक्के  (रू. 08.75 लाख),डोंगराळ व अधिसुचित क्षेत्र  50 टक्के (रू. 12.50 लाख) असे असेल.

४. शितखाली (स्टेजिंग)Cold Room (Staging)अधिकतम ग्राह्य प्रकल्प रक्कम रु. 15.00 लाख प्रति युनिट,देय अनुदान (ग्राह्य भांडवली खर्चाच्या) सर्वसाधारण,35 टक्के (रू. 05.25 लाख),डोंगराळ व अधिसुचित क्षेत्र 50 टक्के (रू. 07.50 लाख) असे असेल.

५. नवीन तंत्रज्ञान राबविणे व शितसाखळी आधुनिकीकरण (Technology induction and Modernization of cold-chain) अधिकतम ग्राह्य प्रकल्प रक्कम रू. 250.00 लाख,देय अनुदान (ग्राह्य भांडवली खर्चाच्या) सर्वसाधारण,35 टक्के (रू. 87.50 लाख)डोंगराळ व अधिसुचित क्षेत्र 50 टक्के  (रू. 125.00 लाख) असे असेल.

६. शितवाहन (Refrigerated Transport Vehicles)अधिकतम ग्राह्य प्रकल्प रक्कम रू.26.00 लाख,बांधकाम क्षेत्र / क्षमता 9 मे. टन  ,देय अनुदान (ग्राह्य भांडवली खर्चाच्या) सर्वसाधारण,35 टक्के (रू. 09.10 लाख),डोंगराळ व अधिसुचित क्षेत्र 50 टक्के (रू. 13.00 लाख) असे असेल.

७. रायपनिंग चेंबर (Ripening Chamber)अधिकतम ग्राह्य प्रकल्प रक्कम रू. 1.00 लाख प्रति मे.टन,बांधकाम क्षेत्र / क्षमता 300 मे. टन,देय अनुदान (ग्राह्य भांडवली खर्चाच्या) सर्वसाधारण, 35 टक्के, डोंगराळ व अधिसुचित क्षेत्र 50 टक्के असे आहे.

८.शितगृह (नविन) (Cold Storage Unit- New Construction)

अ) नविन शितगृह युनिट प्रकार- 1 (एक सारख्या तापमानात राहण्याऱ्या उत्पादनासाठी) (प्रति चेंबर 250 टन),अधिकतम ग्राह्य प्रकल्प रक्कम रू. 8000  प्रति मे.टन,बांधकाम क्षेत्र / क्षमता रू. 5000 मे.टन प्रति लाभार्थी,देय अनुदान (ग्राह्य भांडवली खर्चाच्या) सर्वसाधारण, 35 टक्के जास्तीत जास्त रु. 140.00 लाख,

डोंगराळ व अधिसुचित क्षेत्र 50 टक्के जास्तीत जास्त रु. 200.00 लाख असे आहे.

ब) शितगृह युनिट प्रकार- 2 (एकापेक्षा अधिक उत्पादने व तापमानासाठी) कमीत कमी 6 चेंबर्स पेक्षा जास्त (प्रति चेंबर 250 टन) अधिकतम ग्राह्य प्रकल्प रक्कम रू. 10,000 प्रति मे.टन, बांधकाम क्षेत्र / क्षमता रू. 5000 मे.टन प्रति लाभार्थी ,देय अनुदान (ग्राह्य भांडवली खर्चाच्या) सर्वसाधारण,35 टक्के जास्तीत जास्त रु. 175.00 लाख,डोंगराळ व अधिसुचित क्षेत्र,50 टक्के जास्तीत जास्त रु. 250.00 लाख असे आहे.

क) शितगृह युनिट प्रकार-२ (नियंत्रण वातावरणासाठी नविन तंत्रज्ञान राबविणे)

अधिकतम ग्राह्य प्रकल्प रक्कम रू. 10,000 प्रति मे.टन,बांधकाम क्षेत्र / क्षमता रू. 5000 मे.टन प्रति लाभार्थी,देय अनुदान (ग्राह्य भांडवली खर्चाच्या) सर्वसाधारण 35 टक्के जास्तीत जास्त रु. 175.00 लाख,डोंगराळ व अधिसुचित क्षेत्र,50 टक्के जास्तीत जास्त रु. 250.00 लाख असे आहे.

९.एकात्मिक शीतसाखळी कार्यपध्दती (Integrated Cold Chain supply System)अधिकतम ग्राह्य प्रकल्प रक्कम रू.600.00 लाख,बांधकाम क्षेत्र / क्षमता प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी घटक क्र. 1 ते 8 मधील किमान 2 घटकांचा समावेश असणे आवश्यक आहे.देय अनुदान (ग्राह्य भांडवली खर्चाच्या) सर्वसाधारण 35 टक्के  (रू. 210.00 लाख)डोंगराळ व अधिसुचित क्षेत्र, 50 टक्के   (रू. 300.00 लाख) आहे.

 

योजनेत सहभागी होण्यासाठी

शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टल https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत.

योजनेच्या अधिक माहितीसाठी कृषि विभागाचे संकेतस्थळ :- http://krishi.maharashtra.gov.inhttp://mahanhm.in किंवा नजीकच्या कृषि विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

0000000

दत्तात्रय कोकरे/विभागीय संपर्क अधिकारी

 

मुंबईतील ३०० शाळा आणि महाविद्यालयांमध्ये करिअर मार्गदर्शन मेळावा

मुंबई, दि. ३ : मुंबई महानगर क्षेत्रातील ३०० शाळा, महाविद्यालयांमधील ६० हजार विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना करिअर मार्गदर्शनपर मेळावा पहिल्या टप्प्यामध्ये आयोजित केला जाणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग,शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन, शिक्षण संचालनालय आणि मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाचा शुभारंभ कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते दिनांक ५ डिसेंबर (मंगळवार) रोजी सकाळी १० वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे होणार आहे.

शालेय शिक्षण घेत असताना करिअरच्या वेगवेगळ्या संधी कोणत्या आहेत याबाबत विद्यार्थी आणि पालकांना  माहिती व्हावी, यासाठी शासनाचे वेगवेगळे विभाग एकत्र येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी अनुदानित, विनाअनुदानित शाळा तसेच महाविद्यालयांमध्ये करिअर मार्गदर्शन मळावा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

करिअर मार्गदर्शन कार्यक्रमांमध्ये करिअर कसे निवडावे, करिअरच्या विविध वाटा, व्यक्तिमत्व विकास, कृत्रिम बुध्दीमत्तेच्या सहाय्याने अभ्यास कसा करावा याबाबत विद्यार्थी व पालकांना तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन केले जाईल. यावेळी विविध अभ्यासक्रमांची माहिती असलेली करिअर प्रदर्शनी विद्यार्थी आणि पालकांना पाहण्यास उपलब्ध असेल. विविध करिअर क्षेत्रे, विविध अभ्यासक्रम, प्रवेश परीक्षा, प्रवेश प्रक्रिया, स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती योजना याबाबत अद्यायावत माहिती असलेले करिअर प्लॅनर हे पुस्तक विद्यार्थी व पालकांना विनामूल्य देण्यात येईल. या कार्यक्रमामध्ये करिअर मार्गदर्शक आनंद मापुस्कर, प्रादेशिक विद्या प्राधिकरणच्या प्राचार्य मनिषा पवार यांचे पथक करिअर मार्गदर्शन करणार आहे.

००००

संध्या गरवारे/विसंअ

कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन क‍टिबद्ध – उपमुख्यमंत्री अजित पवार 

रायगड दि.3 (जिमाका) : श्रीवर्धन तालुक्यातील महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर, अंतर्गत श्रीवर्धन शहर पाणीपुरवठा योजना आणि प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत श्रीवर्धन बीच सुशोभिकरण कामांचे

लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले. कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यशासन क‍टिबद्ध असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी यावेळी दिली.

या लोकार्पण सोहळ्यास महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे,खासदार सुनील तटकरे,आमदार अनिकेत तटकरे,मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टे वाड, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे,मुख्याधिकारी विराज लबडे,प्रांतधिकारी डॉ.दीपा भोसले,तहसीलदार महेंद्र वाकलेकर आदी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणाले विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणच्या शेतकऱ्यांना सोयाबीन साठी, कांद्यासाठी, टोमॅटो साठी शासनाकडून मदत दिली जाते.त्याप्रमाणे  कोकणातल्या शेतकऱ्यांना देखील  मदत करणार असल्याची घोषणा पवार यांनी केली. कोकणातला शेतकरी मोठ्या प्रमाणावर कर्ज घेत नाही. आंबा, काजू, नारळ, सुपारी यांच्या बागा व फळांची पिके घेऊन कोकणातील शेतकरी आपला उदरनिर्वाह करत असतो.या शेतकऱ्यांच्या विकासासाठी शासन विशेष प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

कोकण किनारपट्टीला वादळाचा फटका बसल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यासाठी वादळात टिकतील अशी निवारा केंद्रे शासनाकडून बांधली जाणार आहेत. वादळात विजेचे खांब पडल्यानंतर वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी अनेक दिवसांचा कालावधी लागतो. त्यासाठी संपूर्ण कोकणामध्ये अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी लाईन करण्याचा शासनाने निर्णय घेतला असल्याचेही उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी सांगितले. तसेच श्रीवर्धन आणि परिसराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.

श्री पवार पुढे म्हणाले  रेवस- रेड्डी या सागरी महामार्गाला 9 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. धरमतर खाडीवरील पूल व बागमांडले बाणकोट पूल यासाठी शासनाने जवळजवळ 3000 कोटींची तरतूद केलेली असून येत्या पंधरा दिवसात  निविदाप्रक्रिया राबविण्यात येईल.

शासनाने महिलांना एसटी प्रवासामध्ये 50% सूट दिली आहे. त्यामुळे महिला सक्षमीकरणावर सर्वांनी भर द्यावा असेही त्यांनी यावेळी सांगितले. समाजातील सर्व घटकंच्या कल्याणसाठी राज्य शासन सर्वोतोपरी प्रयत्नशील असून विविध लोकांभिमुख निर्णय घेण्यात येत असल्याचेही श्री पवार यांनी सांगितले.

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी  महिलांसाठी अनेक प्रकारच्या योजना  सुरू केल्या असल्याचे यावेळी सांगितले. यावेळी खा. सुनील तटकरे यांचे भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आ. अनिकेत तटकरे यांनी केले.

पाणी पुरवठा योजना –

श्रीवर्धन शहरातील नागरिकांना कायमस्वरुपी शुध्द व नियमीत यांनी पाणी उपलब्ध करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान (राज्यस्तर) अंतर्गत रक्कम रुपये २२.७३ कोटीची सुधारीत पाणीपुरवठा योजना

खा. सुनील तटकरे यांनी प्रस्तावित केली होती. हि योजना २०५१ ची लोकसंख्या विचारात घेवून तयार केली आहे. या योजनेमध्ये अशुध्द व शुध्द पाण्याच्या २० एच.पी. च्या ४ पंपिंग मशीनरी, ८.५ किमी लांबीची ३१५ मि.मी. व्यास एच.डी.पी.ई. शुध्द पाण्याची गुरुत्व वाहिनी, जवळपास २३ किमी लांबीची अंतर्गत वितरण व्यवस्था पूर्ण करण्यात आली आहे. या योजनेमध्ये शहरातील आराठी येथे ७.५० लाख लिटर, धोंडगल्ली येथे २ लाख लिटर व जीवना येथे २ लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या बांधण्यात आलेल्या आहेत. •

या योजनेमध्ये ८५ कि.वॅ. क्षमतेचे सोलार सिस्टिम बसविण्यात आलेली आहे. या योजनेचे खास वैशिष्ट्य म्हणजे जलशुद्दिकरण केंद्र येथील पंपिंग सिस्टिम वगळता शहरामध्ये इतर कोणत्याही ठिकाणी पंप नसून जलशुद्दिकरण केंद्र येथील उंच साठवण टाकीतून येणारे पाणी शहरातील पाण्याच्या टाक्यांमध्ये ग्रॅव्हिटीद्वारे पुरविण्यात येते. त्यामुळे नगरपरिषदेचे येणारे लाईट बिल अत्यंत कमी प्रमाणात येणार असून योजना चालविणेसाठी येणाऱ्या कमी खर्चामुळे सदर योजना नगरपरिषदेचे दायित्व न बनता शहरासाठी मालमत्ता म्हणूनच उपयोगात येणार आहे.

श्रीवर्धन बीच सुशोभिकरण कामांमध्ये समुद्रकिनारी सध्या अस्तित्वात असलेल्या बंधा-यालगत आयताकृती आकाराचे खुले प्रेक्षागृह आणि ओपन जीम ची सोय केली आहे. त्रिकोणाकृती आकारामध्ये भागामध्ये सेल्फी पॉइंट, उपहारगृह, इ. चे प्रयोजन केले आहे. तसेच बॉक-वे वर मनमोहक पथदिवे, मनोरे, हायमास्ट या बाबींची देखील तरतूद केली आहे. पर्यटकांना तसेच नागरिकांना बसण्यासाठी कौक्रिट फायबर बॅचेस, पॅव्हेलियन चा समावेश आहे. ठिकाणी कचरापेट्यांची सोय तसेच स्वच्छतागृहाची सोय करणेत आली आहे. सध्या १२००,००मी. लांबीचा धूपप्रतिबंधक बंधारा अस्तित्वात आहे. समुद्रकिनारी बंधाऱ्यावर बॉच टॉवर, सेल्फी पॉइंटची तरतूद देखील करणेत आली आहे. अशा प्रकारे मुंबई महानगरपालिकेनंतर अशा प्रकारे अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त समुद्रकिनारा विकसित करणारी श्रीवर्धन नगरपरिषद ही एकमेव नगरपरिषद आहे.

क्रीडानगरी म्हणून नाशिकचा वाढणारा नावलौकिक अभिमानास्पद : मंत्री छगन भुजबळ

नाशिक, दिनांक : 3 डिसेंबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी विविध खेळ प्रकारांमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे क्रीडानगरी म्हणून नाशिकचा नावलौकिक वाढत आहे ही अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन छगन भुजबळ यांनी केले.

मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल येथे 67 व्या राष्ट्रीय शालेय खो खो स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, क्रीडा उपसंचालक रवींद्र नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, स्कूल गेम फडरेशन ऑफ इंडियाचे निरीक्षक के एस मूर्ती, कनक चतूर्धर, अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडू कविता राऊत यांच्यासह देशातील विविध राज्यांचे खो खो खेळाडू उपस्थित होते.

मंत्री छगन भुजबळ म्हणाले, नाशिकला लाभलेली नैसर्गिक संपन्नता व आरोग्यदायी वातावरण सर्वच प्रकारच्या खेळांसाठी पोषक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी याचा योग्य वापर करून जिल्ह्याचे नाव विविध खेळ प्रकारात जागतिक पातळीवर उंचावले आहे. यामध्ये अर्जुन पुरस्कार विजेत्या आंतरराष्ट्रीय खेळाडू कविता राऊत यांच्यासह विधीत गुजराती, दत्तू भोकनळ, अंजना ठमके, मोनिका अत्रे, संजीवनी जाधव, दुर्गा देवरे, किसन तडवी, ताई बामणे यासारख्या नामांकित खेळाडूंनी जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवले आहे. क्रीडा विश्वाला समृद्ध करणाऱ्या या खेळाडूंमुळेच नाशिकची ओळख आता क्रीडानगरी म्हणून नावारूपाला येत असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.

गेल्या काही वर्षांत खेळाकडे बघण्याचा पालकांचा दृष्टिकोन बदलला आहे. त्यामुळेच पालक देखील अभ्यासासोबतच मुलांना खेळासाठी प्रोत्साहन देत असल्याने नवीन खेळाडूंचा विविध खेळ प्रकारात सहभाग वाढत आहे. तसेच शासनाच्या नव्या क्रीडा धोरणानुसार तालुका, जिल्हा व विभागीय क्रीडा संकुलासाठी देण्यात येणाऱ्या निधीत देखील दुपटीने वाढ करण्यात आली आहे. जेणेकरून खेळाडूंना खेळासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध होतील आणि ते जिल्ह्याच्या नावसोबतच राज्याचे व देशाचे नाव उंचवतील. खेलो इंडिया आणि टॅलेंट हंट यासारख्या स्पर्धांचे शासनाकडून आयोजन करण्यात येत आहे. त्यातून चांगल्या खेळाडूंची निवड करून २०२८ ऑलिंपिकसाठी त्यांच्याकडून तयारी करून घेण्यात येत आहे. आज नाशिकचे खेळाडू टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग, मैदानी खेळ, खो-खो, बॅडमिंटन, सायकलिंग, स्वीमिंग, तलवारबाजी, नौकानयन, कबड्डी, कुस्ती, व्हॉलीबॉल, क्रिकेट, शूटिंग, पॅरा ॲथलेटिक्स, रोइंग, फुटबॉल, मल्लखांब, जिम्नॅस्टिक यांसारख्या अनेक खेळांत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करून आपले नैपुण्य सिद्ध करीत आहेत, असेही मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी जलज शर्मा म्हणाले, स्पर्धाच्या आयोजनामुळे खेळाडूंना प्रोत्साहन मिळत असते. खेळांमध्ये होणारी हार- जीत ही खेळाचाच एक भाग असते. खेळामुळे संघशक्ती वाढते. असे सांगून जिल्हाधिकारी श्री शर्मा यांनी विविध राज्यांमधून आलेल्या खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंत्री श्री भुजबळ यांच्या हस्ते क्रीडा ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर देशातील 28 राज्यांच्या खेळाडूंनी संचलन केले. मंत्री श्री भुजबळ यांनी कार्यक्रम संपल्यावर सर्व उपस्थित खेळाडू व त्यांचे प्रशिक्षक यांना शुभेच्छा दिल्या. आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धा 7 डिसेंबर पर्यंत सुरू असणार आहेत. यामध्ये देशातील 28 राज्यातील खेळाडूंनी सहभाग घेतला असल्याचे क्रीडा  उपसंचालक रविंद्र नाईक यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.
000000

‘कळमना किराणा मार्केट यार्ड’ हे देशातील सर्वात सुंदर मार्केट यार्ड ठरेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते कळमना किराणा मार्केट यार्डचे भूमिपूजन

नागपूर ,दि. 3 :  व्यापारी व ग्राहकांसाठी विविध सुविधांचा समावेश करून तयार होणारे कळमना किराणा मार्केट यार्ड हे देशातील सर्वात सुंदर किराणा मार्केट यार्ड ठरेल व येथील किराणा व्यावसायिकांचा चौपट फायदा होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.

 दि नागपूर इतवारी किराणा मर्चंट्स असोसिएशनच्यावतीने येथील कळमना मार्केट यार्ड परिसरात उभारण्यात येणाऱ्या  किराणा मार्केट यार्डचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी  श्री. फडणवीस बोलत होते. आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, नागपूर सुधार प्रन्यासचे(नासुप्र) सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, दि नागपूर इतवारी किराणा मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष शिवप्रताप सिंह आदी यावेळी  उपस्थित होते.

श्री. फडणवीस म्हणाले, शहराच्या इतवारी भागात गजबजलेल्या जागेत असलेल्या किराणा बाजाराचा विस्तार करण्याच्या चर्चा बऱ्याच वर्षांपासून सुरु होत्या. मात्र, या संदर्भात ठोस असे काही घडत नव्हते. या किराणा बाजाराच्या स्थानांतरासाठी विविध ठिकाणांच्या नावाची चर्चा होत राहिली. मात्र, ते प्रत्यक्षात येऊ शकले नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी किराणा मार्केट यार्डची  संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी श्रम घेतले आणि  किराणा मर्चंट असोसिएशनने  त्यास चांगला प्रतिसाद दिला. परिणामी, येत्या काळात किराणा मार्केट यार्ड प्रत्यक्षात उभारले जाणार आहे. नासूप्रने  या प्रकल्पासाठी  जमीन उपलब्ध करून दिली असून वीरेंद्र खरे यांनी यार्डचा उत्तम प्लॅन तयार केला हेही कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

किराणा मर्चंट असोसिएशनने नागपुरच्या सामाजिक व राजकीय जीवनात महत्त्वाचे योगदान दिले आहे. असोसिएशनच्या माध्यमातून इतवारी भागातील किराणा बाजार या मार्केट यार्डमध्ये पूर्णपणे स्थानांतरित होईल आणि  कमीत-कमी वेळात या मार्केट यार्डचे बांधकाम पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या मार्केट यार्डच्या विकासासाठी आवश्यक ती मदत राज्य शासनाच्यावतीने करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

******

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मिडास हॉस्पिटलचे उद्घाटन

नागपूर, दि.3 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मिडास मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन झाले.

वर्धा रोडवरील परसोडी गावा शेजारी स्थित अत्याधुनिक सुविधांनी सज्ज अशा मिडास हॉस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी वने, पर्यटन मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. उद्घाटनानंतर श्री.फडणवीस आणि श्री. मुनगंटीवार यांनी या हॉस्पिटलच्या विविध विभागांना भेट देवून पाहणी केली. यावेळी आयोजित छोटेखानी कार्यक्रमात मिडासचे प्रमुख डॉ.श्रीकांत मुकेवार यांनी प्रास्ताविक केले तर डॉ. सौरभ मुकेवार यांनी हॉस्पिटलची माहिती  देत सादरीकरण केले.

******

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले नलिनी कुंभारे यांचे अंत्यदर्शन

नागपूर ,दि. 3 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखा कुंभारे यांच्या आई नलिनी कुंभारे यांचे अंत्यदर्शन घेत आदरांजली वाहिली.

शनिवार, २ डिसेंबर रोजी रात्री  नलिनी कुंभारे यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी अल्प आजार व वृद्धापकाळाने निधन झाले. ड्रॅगन पॅलेस परिसरातील ॲड. सुलेखा कुंभारे यांच्या निवासस्थानी भेट देऊन श्री. फडणवीस यांनी ॲड.  कुंभारे यांचे तसेच माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांचे सांत्वन केले.

यावेळी उपस्थित आमदार चंद्रशेखर बावनकुळे,आमदार टेकचंद सावरकर, माजी खासदार डॉ. विकास महात्मे यांनीही आदरांजली वाहिली.

******

महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या अनुयायांच्या सोयी सुविधांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली पाहणी

मुंबई, दि. 3: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी राज्य शासन आणि मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात आलेल्या सोयी सुविधांची पाहणी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. यावेळी चैत्यभूमी येथे जाऊन मुख्यमंत्र्यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले.

सकाळी धारावी येथे मुंबई सखोल स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करून मुख्यमंत्री श्री. शिंदे दादर येथील चैत्यभूमीवर आले. देशभरातून येणाऱ्या अनुयायांसाठी करण्यात आलेल्या सुविधांचा आढावा घेतला.

महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येपासून ते सहा डिसेंबरपर्यंत आलेल्या अनुयायांच्या भोजनाची व्यवस्था करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. ज्याठिकाणी भोजनाची सोय करण्यात आली आहे त्याची पाहणी देखील त्यांनी यावेळी केली. आरोग्य व्यवस्था, स्वच्छता यासाठी त्यांनी महापालिका प्रशासनाला सूचना केल्या.

महानगरपालिकेने छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क), डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्‍थान ‘राजगृह’ यासह आवश्यक त्या विविध ठिकाणी सुसज्‍ज नागरी सेवा-सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यांच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री शिवाजी पार्क येथे आले होते. यावेळी राज्य आणि देशभरातून आलेल्या अनुयायांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला त्यांच्या निवास आणि भोजनाच्या सुविधेची माहिती घेतली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमी येथील स्मारकाच्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी देशभरातून येणाऱ्या अनुयायांना विश्रांतीसाठी छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे तात्पुरता निवारा, शामियाना उभारण्यात आला आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत तात्पुरत्या निवाऱ्याची सोय म्हणून परिसरातील महानगरपालिकेच्या सहा शाळा निश्चित करण्यात आल्या आहेत. या शाळांमध्ये देखील आवश्यक त्या सर्व नागरी सेवा-सुविधा सुसज्‍ज ठेवण्यात आल्या आहेत.

यावेळी आमदार सदा सरवणकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, महानगरपालिकेच्या अतिरीक्त आयुक्त अश्विनी भिडे, अतिरीक्त आयुक्त अश्विनी जोशी, अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे आदी उपस्थित होते.

000

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सायन रुग्णालयाला भेट; रुग्णांची विचारपूस अन् दिलासाही..

मुंबई, दि. 3: तुम्हाला रुग्णालयात औषधे मिळतात का..बाहेरून आणावी लागत नाही ना..ट्रीटमेंट कशी सुरू आहे..वेळेवर जेवण मिळते ना..सायन हॉस्पीटलमधील रुग्णांशी आणि त्यांच्या नातेवाईकांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधलेला हा संवाद..आज महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयाला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी ट्रॉमा आयसीयु, सर्वसाधारण वॉर्ड, वॉर्ड क्रमांक चार येथे पाहणी करताना रुग्णांची विचारपूस केली आणि दिलासा दिला. यावेळी त्यांनी अचानक रुग्णालयाच्या स्वयंपाक गृहाला भेट देऊन तेथील अन्नपदार्थांची पाहणी केली.

सायन हॉस्पीटलमध्ये 200 खाटांचा अतिदक्षता विभाग आणि एक हजार खाटांचा सर्वसाधारण कक्षाचे काम सुरू असून लवकरच ते पूर्ण होईल त्यामुळे नव्याने 1200 खाटा उपलब्ध होतील, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

मुंबईच्या सखोल स्वच्छता मोहिमेच्या शुभारंभासाठी आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयाला साकाळी सातच्या सुमारास भेट दिली.

सायन रुग्णालयात सुरू असलेल्या इमारतींच्या कामाला गती द्यावी. पुढच्या भेटीत कामाची प्रगती आढळली पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी याभेटी दरम्यान निर्देश दिले. रुग्णालयात सोयीसुविधा वाढविण्यात येत असून त्या कालमर्यादेत पूर्ण कराव्यात. रूग्णांना वेळेत आरोग्यसेवा मिळण्याबाबत रुग्णालय प्रशासनाने प्रयत्न करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

रुग्णालयाची पाहणी करून तेथील रुग्णांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. उत्तम आरोग्य सुविधा देण्यासाठी शासन प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याबरोबरच त्यांनी रुग्णालयातील सामान्य विभागासह अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या रुग्णांशी संवाद साधला. रुग्णांना मिळत असलेल्या उपचारांची माहितीही त्यांनी घेतली. रुग्णांची गैरसोय होते का याविषयी देखील मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतले.

सोनोग्राफी आणि डायलेसिस सेवा देण्यासाठी उपकरणांची वाढ करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये झिरो प्रिस्क्रीप्शन संकल्पना राबविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे जेणेकरून औषधांसाठी रुग्णांना बाहेर जावे लागणार नाही. असे मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले.

भेटी दरम्यान मुख्यमंत्र्यांनी सायन रुग्णालयाचा परिसर पिंजून काढला. प्रत्येक वॉर्डात जाऊन त्यांनी माहिती घेतली. उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे कौतुक करतानाच रुग्णाला वेळेवर औषध, जेवण मिळेल यासाठी प्रशासनाला सूचना केल्या. रुग्णालयाच्या स्वयंपाक गृहाची पाहणी करताना तेथील साफसफाई आणि अन्नाची गुणवत्ता याबाबतही त्यांनी सूचना केल्या. मुख्यमंत्री पाहणीसाठी आले याचा रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद होता तर एका वॉर्डात तर एका रुग्णाने चक्क मुख्यमंत्र्यांसोबत सेल्फीही घेतली.

000

ताज्या बातम्या

वाळू माफियांविरोधात महसूल मंत्री ॲक्शन मोडवर !

0
मंत्री, खासदार, आमदारांच्या सुचनांनुसार वाळू माफियांना सोडू नका वाळू तस्करीत सामील अधिकाऱ्यांवरही निगराणी ठेवा जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनी कडक कारवाई करावी वाळू साठे व...

सिन्नर बसस्थानकाच्या ताफ्यात ५ नवीन बस दाखल

0
नाशिक, दि. ९ (जिमाका वृत्तसेवा): राज्य परिवहन महामंडळातर्फे सिन्नर बसस्थानकास प्राप्त झालेल्या दुसऱ्या टप्प्यातील पाच नवीन बसेसचे लोकार्पण राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक...

‘देवाभाऊ लाडकी बहीण महिला नागरी सहकारी पतसंस्थे’चे महसूलमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन

0
बुलढाणा, (जिमाका) दि. ९ : चिखली तालुक्यातील देवाभाऊ लाडकी बहीण महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पतसंस्थेचे उद्घाटन आज राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते...

भारत निवडणूक आयोगाकडून ३३४ पक्षांची नोंदणी रद्द

0
मुंबई, दि.९ : भारत निवडणूक आयोगाने (ECI) निवडणूक व्यवस्था पारदर्शक करण्याच्या मोहिमेअंतर्गत कारवाई करत ३३४ नोंदणीकृत परंतु मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांची (RUPPs) नोंदणी रद्द...

महाराष्ट्रातील कारागृह ग्रंथालयांसाठी राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकाता यांच्याकडून बुककेस आणि बुकरॅक देण्याचा...

0
मुंबई, दि.९ : कारागृहातील बांधवांचे सामाजिक, शैक्षणिक हित लक्षात घेऊन त्यांच्यात सुधारणा व पुनर्वसन होण्याच्यादृष्टीने राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या समान निधी योजनेंतर्गत ग्रंथालय संचालनालयाच्या राज्यातील...