सोमवार, ऑगस्ट 11, 2025
Home Blog Page 1091

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमी येथे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे अभिवादन

मुंबई, दि,६: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

दादर येथील चैत्यभूमी येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, खासदार राहुल शेवाळे, आमदार आशिष शेलार, प्रवीण दरेकर, कालिदास कोळंबकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर, माजी खासदार नरेंद्र जाधव, मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, भिक्खू महासंघाचे अध्यक्ष डॉ. भदन्त राहुल बोधी महाथेरो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे, सरचिटणीस नागसेन कांबळे यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिका जनसंपर्क विभागामार्फत आयोजित छायाचित्र प्रदर्शनास मान्यवरांनी भेट दिली. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. मुंबई महापालिकेतर्फे प्रकाशित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जागतिक पाऊलखुणा’ ही माहिती पुस्तिका मान्यवरांना भेट देण्यात आली.

०००

‘लोकराज्य’ नोव्हेंबर-डिसेंबर २०२३ चा विशेषांक प्रकाशित

 

‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या माध्यमातून १ कोटी ८४ लाख लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बीड दि. 5, (जिमाका) : ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाच्या माध्यमातून 1 कोटी 84 लाख लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ दिला आहे. हेच या योजनेचे ठळक यश असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

परळी येथील ओपळे मैदानावर ‘शासन आपल्या दारी’ अंतर्गत विविध योजनांचे लाभ वाटप व जिल्ह्यातील प्रस्तावित येाजनांचे भूमिपूजन आणि लोकार्पण झाले. त्याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.

या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्याचे पालकमंत्री व कृषिमंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस, आमदार प्रकाश सोळंके, आमदार लक्ष्मण पवार, आमदार बाळासाहेब आजबे, आमदार नमिता मुंदडा, आमदार संजय दौंड, विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड, जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक, जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

राज्यातील 20 जिल्ह्यात शासन आपल्या दारी हा कार्यक्रम झाला असून त्यातील गर्दीचे सारे उच्चांक या कार्यक्रमांने मोडले याबद्दल कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे विशेष अभिनंदन करतो. असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, या कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध योजनांच्या लाभार्थ्यांना 749 कोटी रुपयांच्या  विविध योजनांच्या लाभाचे वाटप करण्यात आले.  प्रस्तावित इमारत व वस्तीगृह आणि तीर्थश्रेत्र परळी विकास अंतर्गत असलेल्या विविध 892 कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले.

यातील परळी येथील तीर्थश्रेत्र विकास आराखडा महत्वाचा आहे. यासाठी शासनाने 286.68 कोटी रुपयांच्या कामांना मंजूरी प्रदान केली आहे. याखेरीज जिल्ह्यातील नवे जिल्हाधिकारी, प्रशासकीय, कृषि कार्यालय, सिरसाळा एमआयडीसी आदीसह भगवानबाबा विद्यार्थी वसतिगृह इमारत यांचा यात समावेश आहे.

नागरी सुवर्णोत्थान कार्यक्रमासाठी कालच 141 कोटी रुपयांची मंजूरी देण्यात आली आहे. असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात जिल्ह्यास पुरवणी मागणीत अधिक मदत व निधी देण्याचा प्रयत्न शासन करेल. कृषिमंत्री झाल्यानंतर 100 दिवसात शेतकरी लाभाचे 75 निर्णय कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतले हे देखील उल्लेखनीय आहे. असे श्री. शिंदे म्हणाले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकासाला सर्वोच्य प्राधान्य दिले आहे. एकही दिवस त्यांनी सुटी घेतली नाही, असे प्रधानमंत्री आपल्याला लाभले हे आपले भाग्य आहे. शासन शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करत आहे. नुकसान भरपाईत वाढ केली असून, एक रुपयात पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी महत्वाची आहे.

नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेशही तातडीने देण्यात आले आहेत. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी शासन बचतगटाच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे. बीडच्या औद्योगिक विकासाला चालना देणार असून यातून येथील लोकांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. बीडच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य राहील. इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला हक्काचे व टिकणारे आरक्षण देणार असल्याचेही ते म्हणाले.

गोपीनाथ गड येथे लोकनेते  स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाला मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री. पवार, कृषिमंत्री श्री. मुंडे यांनी अभिवादन केले. माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच सर्व मान्यवरांनी प्रभु वैद्यनाथाचे दर्शन घेवून विकास आराखडयातील कामांचे भूमिपूजन केले.

महाराष्ट्र सुजलाम – सुफलाम करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांना दिवसा सलग 12 तास  विघुत पुरवठा उपलब्ध झाल्यास शेतकरी समृध्द होणार आहे. ही जाणीव ठेवून प्रत्येक शेतकऱ्याला सौर उर्जा उपलब्ध करुन पूर्ण वर्षभर दिवसाला 12 तास वीज मिळावी असे नियोजन असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

दुष्काळामुळे अडचणीत असलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांसोबत शासन आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी समृद्धी योजना टप्पा 2 मधून  आगामी काळात शेतकऱ्यांना स्थैर्य प्राप्त होईल, यासाठी प्रयत्नशील आहे. 11 हजार 400 कोटी रुपये खर्चून कृष्णा मराठवाडा सिंचन योजनेतून कामे होत आहेत. मराठवाडा ग्रीडचा प्रस्ताव केंद्राला पाठवला आहे. जलयुक्त शिवार टप्पा 2 मध्ये बीड जिल्हा अग्रेसर राहील. बीडच्या आठही साठवण तलावांना मान्यता दिल्याचे फडणवीस म्हणाले. मुंडे यांनी केलेल्या वैजनाथ तीर्थश्रेत्र योजनेच्या मागणीच्या प्रस्तावाला मान्यता मिळण्यासाठी प्रयत्न करणार असून महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करणार असल्याचेही श्री. फडणवीस म्हणाले.

केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास – उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून देशाला 5 ट्रिलियनचे उद्दीष्ट गाठायचे आहे. त्यात राज्याचा वाटा 1 ट्रिलियन असावा यासाठी प्रयत्न आहेत.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये अनेक महत्वाची विकासकामे सुरू आहेत. कामे गतीने पूर्ण झाली आहेत, याचे समाधान आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आहेत. कृषी विभागाचे मागील काही महिन्यात 75 शासन निर्णय निघाले आहेत. पीक विमा योजनेत 48 लाखाहून अधिक अर्ज विम्यासाठी पात्र आहेत. कोट्यवधी रुपयांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

बीड जिल्ह्याचे मागासलेपण दूर करून जिल्ह्याचा सर्वांगिण विकास करू – कृषिमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे

शासन आपल्या दारी उपक्रमातून 36 हजार लाभार्थ्यांना लाभ झाला, याचा आनंद झाला आहे.  बीड जिल्ह्याचे मागासलेपण दूर होऊन आगामी काळात सर्वात जास्त विकसित जिल्हा म्हणून लौकिक राहील, यासाठी प्राधान्याने काम करु व जिल्ह्यात विकासाची गंगा आणू, सर्वजण मिळून जिल्ह्याचा विकास करू, असेही मुंडे म्हणाले.

महिलांसाठी आठ निवासी शाळा, कृषी महाविद्यालय, अंबाजोगाईत देवणी गोवंश केंद्र आदी विकासकामे शासनाने केली आहेत. देशात उज्जैन, काशी विश्वेश्वर या धर्तीवर परळी वैजनाथ येथे प्रसाद योजनेंतर्गत प्रस्ताव राज्याने केंद्राला पाठवावा. त्याचबरोबर परळीच्या औद्योगिक विकासाला अधिक चालना द्यावी आणि यासह बीड जिल्ह्याचे सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. जिल्ह्यात 1400 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन केल्याबद्दल आभारही श्री. मुंडे यांनी मानले.

माजी पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, परळीच्या विकासासाठी कोणतेही सहकार्य करायची माझी तयारी आहे. जिल्हा सर्व श्रेत्रात अग्रेसर असावा असे विचार आपण सातत्याने करतो, असेही त्या म्हणाल्या.

जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी प्रास्ताविकात जिल्हाभरात सुरु असलेल्या विविध योजना तसेच उपक्रमाबाबतची माहिती दिली.

ठळक नोंदी

या कार्यक्रमासाठी एस.टी. महामंडळाच्या 580 बसेस लाभार्थ्यांना आणण्यासाठी घेण्यात आल्या होत्या.

आजचा मुख्यमंत्री यांचा दौरा हा प्रचंड गर्दीचा दिवस आणि उच्चांकी उपस्थिती असल्याचे ठरला.

परळी शहरात जागोजागी मोठमोठ्या कमानी उभारण्यात आल्या होत्या.

विविध शासकीय विभागांच्या लाभाच्या योजनांची माहिती देणारे प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करण्यात

आले होते.

मंत्री महोदयांनी गोपीनाथ गड येथे स्व. गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन केले. त्यानंतर परळी तीर्थश्रेत्र

विकास कार्यक्रमाचे भूमिपूजन केले. एकाच वेळी गोपीनाथ आणि वैद्यनाथ या शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र

फडणवीस यांनी आपल्या भाषणात याचा उल्लेख् केला.

भूमिपूजन कामे

1) जिल्हाधिकारी कार्यालय, बीड

2) मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, बीड

3) कृषि भवन, बीड

4) संत भगवानबाबा ऊसतोड कामगार मुलोचे वस्तीगृह, बीड

5) संत भगवानबाब ऊसतोड कामगार मुलींचे वस्तीगृह, शिरुर कासार

6) कृषि महाविद्यालय, जिरेवाडी ता. परळी

7) कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, जिरेवाडी ता. बीड

8) सोयाबीन संशोधन प्रशिक्षण व प्रक्रिया उपक्रेंद, धर्मापूरी ता. परळी

9) एमआयडीसी विस्तार सिरसाळा, ता. परळी

10) श्रीश्रेत्र परळी विकास आराखडा विकास आराखडा कामे

11) परळी बसस्थानक, परळी

 

०००००

शासकीय रूग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयांच्या रूग्णालयात इन्फल्यूएंझासाठी विलगीकरण कक्षाची स्थापना

मुंबईदि. 05 : राज्यात इन्फल्यूएंझाबाबत राज्याच्या आरोग्य विभागाच्यावतीने विविध प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहे. इन्फल्यूएंझाबाबत नियमित रूग्ण सर्वेक्षणसहवासितांच्या सर्वेक्षणाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. फ्ल्यू सदृश्य रूग्णांवर वर्गीकरणानुसार विनाविलंब उपचार करण्यात येत आहे. तसेच राज्यातील शासकीय रूग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयांच्या रूग्णालयात विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

रूग्णालयांमध्ये आवश्यक औषधोपचार व साधनसामग्रीचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्यातील सर्व शासकीय व खासगी डॉक्टरांचे क्लिनीकल मॅनेजमेंटबाबत राज्यस्तरावरून पुर्नप्रशिक्षण ऑगस्ट 2022 मध्ये घेण्यात आले आहे. राज्यात 2023 मध्ये 28 नोव्हेंबरपर्यंत एकूण संशयीत रूग्ण 15 लाख 97 हजार 234 होतेतर बाधीत इन्फ्लुएंझा ए (एच एन 1 + एच एन 2) 3222 रूग्ण आहेत. सध्या रूग्णालयात 14 रूग्ण दाखल आहेत. तर रूग्णांचा मृत्यू झाला आहेअशी माहिती सहसंचालकआरोग्य सेवा डॉ. प्रतापसिंह सारणीकरण यांनी दिली आहे.

००००

निलेश तायडे/विसंअ/

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सामाजिक न्याय विभागामार्फत विविध उपक्रम

मुंबई दि. 5 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या मार्गदर्शनाखाली दादर, शिवाजी पार्क येथे माहिती व प्रसिद्धी स्टॉल व भोजन स्टॉल उभारण्यात आलेला आहे. या माहिती स्टॉलचे उद्घाटन प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण मुंबई विभाग श्रीमती वंदना कोचुरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी व विविध महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

या माहिती स्टॉलमध्ये सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती पुस्तिका मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच सामाजिक न्याय विभागांतर्गत विविध महामंडळे कार्यरत आहेत. या महामंडळाच्या योजनांची माहिती पुस्तिकाही मोफत वाटप करण्यात येत आहे.

सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागातर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे यांच्यावतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यासाठी भोजन स्टॉल उभारण्यात आला असून या स्टॉलवर भोजनाचा एक बॉक्स व एक पाणी बॉटल याचे वाटप करण्यात येत आहे. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे यांच्या वतीने पुस्तक स्टॉल उभारण्यात आलेला आहे. या पुस्तक स्टॉलवर बार्टीच्या विविध उपक्रमांची माहिती देणारी पुस्तके उपलब्ध आहेत. या माहिती व प्रसिद्धी स्टॉलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यासारख्या महापुरुषांच्या जीवनकार्यावर आधारित पुस्तके उपलब्ध आहेत. या सर्व पुस्तकांवर ८५% इतकी सूट देण्यात आलेली आहे.

सामाजिक न्याय विभागाच्या माहिती व प्रसिद्धी स्टॉलला व मोफत भोजन स्टॉलला भेट द्यावी, असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण, मुंबई विभाग श्रीमती वंदना कोचुरे यांनी केले आहे.

००००

शैलजा पाटील/विसंअ/

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी स्थानिक सुटी जाहीर

मुंबई, दि. ५ :  मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय/ निमशासकीय कार्यालयांना बुधवार दि.०६ डिसेंबर २०२३  रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी स्थानिक सुटी (Local Holiday) जाहीर करण्यात आली आहे.

याबाबतीतचे शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने जारी केले आहे.

0000

राजू धोत्रे/विसंअ/

‘महापरिनिर्वाण दिनानिमित्त ‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांची मुलाखत

मुंबई. दि. 5 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक व आर्थिक सुधारणा याबाबतचे विचार’ या विषयावर उद्योग विभाग प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांची विशेष  मुलाखत प्रसारित होणार आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात प्रधान सचिव डॉ. कांबळे यांची मुलाखत उद्या बुधवार दि. 6, गुरूवार दि. 7 आणि शुक्रवार दि. 8 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत बुधवार, दि. 6 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर प्रसारित होणार आहे.  निवेदिका सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स – https://x.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

००००

महापरिनिर्वाण दिनानिमित्त माहितीपट, मुलाखत आणि चित्रपटाचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवरुन उद्या प्रसारण

मुंबई, दि. 5 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी, दि. 6 डिसेंबर 2023 रोजी ‘महापरिनिर्वाण दिनानिमित्त’ डॉ. आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित दोन माहितीपटांसह ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत आणि चित्रपटाचे प्रसारण माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवरून होणार आहे. तसेच आकाशवाणीवरून ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुलाखतीचे प्रसारण करण्यात येणार आहे.

‘महापुरुष डॉ.आंबेडकर’ या माहितीपटाचे प्रसारण सकाळी 11 वा. आणि ‘बाबासाहेब आंबेडकर’ या माहितीपटाचे प्रसारण दुपारी 1 वाजता तसेच ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ’ या चित्रपटाचे प्रसारण दुपारी 4 वाजता करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सायं. 7.30 वा. ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमामधून उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. माहितीपट, मुलाखत व चित्रपटाच्या प्रसारणाच्या माध्यमातून महासंचालनालयाने डॉ. आंबेडकर यांना अनोखी आदरांजली वाहिली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर हे कार्यक्रम पाहता येतील.

एक्स – https://x.com/MahaDGIPR

फेसबुक –  https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

‘महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपटाचे स. ११.०० वा. प्रसारण

‘महापुरुष डॉ. आंबेडकर’ या दुर्मिळ माहितीपटाचे प्रसारण सकाळी 11 वाजता. महासंचालनालयाच्या एक्स,  फेसबुक आणि युट्यूब या समाजमाध्यमांवरुन करण्यात येणार आहे. डॉ. आंबेडकर यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांचे चित्रण तसेच, लाईव्ह फुटेजच्या चित्रीकरणाचा समावेश या 17 मिनिटांच्या माहितीपटात करण्यात आला आहे. डॉ. आंबेडकरांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारा एक महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तावेज जुलै 1968 मध्ये माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने फिल्म्स डिव्हिजनच्या माध्यमातून तयार केला आहे.

या माहितीपटात डॉ. आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्याची ऐतिहासिक घटना, नेपाळ भेट तसेच मुंबईतील दादर चौपाटीवरील त्यांच्या अंतिम दर्शनाचे क्लोजअप शॉट्स आहेत. मधुकर खामकर यांनी छायांकन केले आहे. जी.जी. पाटील यांनी संकलन केले आहे. दिग्दर्शक नामदेव व्हटकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक होते. हा दुर्मिळ माहितीपट व्हटकर प्रॉडक्शनच्या बॅनरखाली नामदेव व्हटकर यांनी दिग्दर्शित केला आहे. तर संगीत दत्ता डावजेकर यांचे आहे. ज्येष्ठ चित्रपट कलाकार डेव्हिड अब्राहम या चित्रपटाचे निवेदक होते.

 ‘बाबासाहेब आंबेडकर’ माहितीपटाचे दु. ०१.०० वा. प्रसारण

भारत सरकारच्या ‘फिल्म्स डिव्हिजन’ ची निर्मिती असलेल्या ‘बाबासाहेब आंबेडकर’ या माहितीपटाचे प्रसारण दुपारी 1 वाजता महासंचालनालयाच्या एक्स, फेसबुक आणि युट्यूब या समाजमाध्यमांवरुन करण्यात येणार आहे. ‘फिल्म्स डिव्हिजन’च्या वतीने एन.एस. थापा यांनी 1981 मध्ये या माहितीपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाला ए.वी. भाष्यम यांचे दिग्दर्शन लाभले आहे.

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ’ या चित्रपटाचे दु. ०४.०० वा. प्रसारण

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ’ या चित्रपटाचे प्रसारण दुपारी 4 वाजता महासंचालनालयाच्या एक्स, या समाजमाध्यमावरुन करण्यात येणार आहे. सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार  आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन यांनी या चित्रपटाची संयुक्तरित्या निर्मिती केली आहे.

स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विविध क्षेत्रातील कार्य अतुलनीय आहे. प्रचंड बुद्धिमत्ता असणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. समाजामधील तळागाळातील व्यक्तींचा त्यांनी प्रामुख्याने विचार केला. शिक्षण व समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष केला. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’, असा मंत्र दिला. अशा असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य समजून घेण्यासाठी  हा चित्रपट नक्की पहायला हवा.

या चित्रपटाचे दिग्दर्शन जब्बार पटेल यांनी केले आहे. या चित्रपटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रमुख भूमिका अभिनेता मामूट्टी यांनी तर रमाबाई आंबेडकर यांची भूमिका सोनाली कुलकर्णी यांनी साकारली आहे. मोहन गोखले, मृणाल कुलकर्णी यांच्या देखील या चित्रपटात भूमिका आहेत. निर्मिती सहाय्य राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) यांनी केले असून पटकथा लेखन सोनी तारापोरवाला, अरूण साधू, दया पवार यांनी केले आहे. चित्रपटाचे संशोधन डॉ. य. दि. फडके यांनी केले. सल्लागार श्याम बेनेगल आहेत, चित्रपटाची वेशभूषा भानु अथैय्या, संगीत अमर हल्दीपूर, फोटो दिग्दर्शन अशोक मेहता यांचे आहे.

०००

‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’; स्पर्धात्मक अभियान

राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्त्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या स्पर्धात्मक अभियानाचा ५ डिसेंबर पासून शुभारंभ झाला आहे. या अभियानाविषयी थोडक्यात माहिती…..

राज्यात सन २०२०-२१ पासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा ही पूर्णत: राज्य पुरस्कृत योजना शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी राबविण्यात येत आहे. भौतिक सुविधांचे निर्माण, शैक्षणिक गुणवत्तेतील वाढ व प्रशासकीय सुधारणा अशी प्रमुख क्षेत्रे या योजनेसाठी निश्चित करण्यात आली असून सद्यस्थितीत 478 शाळांचा समावेश असलेला या योजनेचा पहिला टप्पा कार्यान्वित आहे.

अभियानाची उद्दिष्टे

विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्याबरोबरच अध्ययन, अध्यापन व प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देणे, शिक्षणासाठी पर्यावरण पूरक व आनंददायी वातावरणाची निर्मिती करणे, क्रीडा आरोग्य, वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणे, राज्यातून कचऱ्याबाबतच्या निष्काळजीपणाची सवय मोडून काढणे, राष्ट्रप्रेम व राष्ट्रीय एकात्मता याबाबत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे, विशिष्ट कौशल्य आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे, विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण करणे व शिक्षक, विद्यार्थी तसेच पालक यांच्यात शाळेविषयी कृतज्ञतेची व उत्तरदायित्त्वाची भावना निर्माण करण्याच्या उद्दिष्टाने राज्यात हे अभियान राबविण्यात येत आहे.

शाळांना गुणांकन

अभियानात सहभागी होणाऱ्या शाळांना विविध उपक्रमांचे आयोजन ४५ दिवसांत करणे आवश्यक राहील. अभियानात सहभागी होणाऱ्या शाळांना विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांच्या आयोजनासाठी ६० गुण व शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित आरोग्य, आर्थिक साक्षरता व कौशल्य विकास, भौतिक सुविधा, तंबाखू मुक्त, प्लास्टिक मुक्त शाळा अशा उपक्रमांसाठी ४० गुण असे एकूण १०० गुण देण्यात येतील.

विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांमध्ये शाळा व परिसराच्या सौंदर्यीकरणासाठी १० गुण, विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमातील, व्यवस्थापनातील व निर्णय प्रक्रियेतील सहभागासाठी १५ गुण, शैक्षणिक गुणवत्ता व व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक उपक्रमांसाठी १० गुण, शाळेची इमारत व परिसराची स्वच्छतेसाठी १० गुण, राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देण्यासाठीच्या उपक्रमास ५ गुण  तसेच विविध क्रीडास्पर्धांच्या आयोजनासाठी १० गुण असे गुणांकन देऊन प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची निवड करण्यात येऊन पारितोषिके देण्यात येतील.

अभियानात सहभागी शाळांचे कामगिरीच्या आधारे मुल्यांकन करण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रात तसेच विभागस्तरावर विभागीय शिक्षण उपसंचालकांच्या अध्यक्षतेखाली, जिल्हास्तरावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तर तालुका स्तरावर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मुल्यांकन समितीद्वारे शाळांची निवड करण्यात येईल.

सजग व सुसंस्कृत भावी पिढीच्या निर्मितीसाठी माझी शाळा, सुंदर शाळा हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाद्वारे शैक्षणिक गुणवत्ता, अध्ययन, अध्यापन, प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पर्यावरण संवर्धनाची जाणीव, सार्वजनिक व वैयक्तीक स्वच्छता, चांगले आरोग्य, राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत करण्यासाठीचे प्रयत्न, व्यवसाय शिक्षणाची तोंडओळख, अंगभूत कला-क्रीडा गुणांचा विकास अशा महत्त्वपूर्ण घटकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. यातून शाळेचा निश्चितपणे सर्वांगीण विकास होईल यात शंका नाही.

– विभागीय माहिती कार्यालय, पुणे

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार  – मंत्री डॉ. विजयकुमार गावित

नुकसान कमी करण्यासाठी प्रक्रिया उद्योगांसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार

नंदुरबार, दि. ५ (जिमाका): अवकाळी पावसाने जिल्ह्यातील शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी शासनाकडे व मंत्रिमंडळ बैठकीत पाठपुरावा करणार असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले. अवकाळी पाऊस, वादळ, अतिवृष्टी, चक्रीवादळ यामुळे होणारे शेतपिकांचे व शेतकऱ्यांचे नुकसान कमी करण्यासाठी प्रक्रिया उद्योगांसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार असल्याचेही मंत्री डॉ. गावित म्हणाले.

शहादा तालुक्यातील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या हिंगणी, कोंढावळ, तोरखेडा, उभादगड, काकरदा, खापरखेडा, दिगर, वडाळी या गावांतील शेतकऱ्यांच्या शेतावर आदिवासी विकास मंत्री डॉ. गावित यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या कृषी सभापती हेमलता शितोळे, प्रांताधिकारी सुभाष दळवी, उपविभागीय कषी अधिकारी तानाजी खर्डे, तहसिलदार दिपक गिरासे, तालुका कृषी तालुका अधिकारी काशिराम वसावे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. कांतीलाल टाटीया व पंचक्रोशीतील ग्रामपंचायतींमधील सरपंच, पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

मंत्री डॉ. गावित म्हणाले की, गेल्या आठवड्यात ३० व ३१ नोव्हेंबर रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतला आहे. जिल्हा प्रशासनाने केलेल्या सर्व्हे नुसार १६० शेतकऱ्यांच्या १५० हेक्टरवरील शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात प्रामुख्याने पपई व केळी या नगदी फळ पिकांचा समावेश आहे. लवकरात लवकर नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून भरपाई देण्याबाबकचा अहवाल जलद गतीने शासनास सादर करण्याबरोबरच एकही नुकसानग्रस्त शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार नाही, याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत.

ज्यांनी शासनाच्या पीकविमा योजनेत सहभाग घेतला त्यांना नियामनुसार भरपाई मिळेलच, परंतु ज्यांनी पीकविमा घेतला नाही त्यांचीही शासनाकडून भरपाईची अपेक्षा आहे. प्रत्येक क्षणी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची शासनाची भुमिका असून, वारंवार अवकाळी, वादळी पाऊस तसेच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान पाहता केंद्र सरकार व राज्य शासनाच्या कृषी प्रकिया उद्योग योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी प्रोत्साहन व आर्थिक मदत करण्यासाठी येणाऱ्या काळात प्रयत्न केले जातील. त्यामुळे नुकसान होणाऱ्या शेतमालावर नुकसान झाल्याबरोबर काही प्रक्रिया करून होणारे नुकसान कमी करता येईल. शेतकऱ्यांनी खचून न जाता धैर्याने या परिस्थितीचा सामना करावा, शासनाकडून त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल,अशी ग्वाहीही यावेळी मंत्री डॉ. गावित यांनी शेतकऱ्यांना दिली.

०००

ताज्या बातम्या

महाराष्ट्र लेदर, नॉन-लेदर, फुटवेअर व ॲक्सेसरीज धोरण २०२५ संदर्भात भागधारक बैठक

0
मुंबई, दि. १० — महाराष्ट्र शासनाच्या मसुदा लेदर, नॉन-लेदर, फुटवेअर व ॲक्सेसरीज धोरण २०२५ संदर्भात भागधारकांची सल्लामसलत बैठक पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थानी कौन्सिल...

क्रीडा क्षेत्राला निधी देऊन आंतरराष्ट्रीय क्रीडापटू घडविणार – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
अमरावती, दि. 10 : बदलत्या काळानुसार मातीवरील कुस्ती आता मॅटवर खेळायला सुरुवात झाली आहे. मातीवरील कुस्तीला महत्त्व असले, तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर मॅटवरील कुस्तीला महत्त्व...

सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जगातील सर्वोत्तम यंत्रणा व तंत्रज्ञान महाराष्ट्राकडे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
सोशल मीडियावरील कोणत्याही मोहाला बळी पडू नका!” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागरिकांना आवाहन ‘गरुड दृष्टी’ सोशल मीडिया मॉनिटरिंग व सायबर इंटेलिजन्सच्या मदतीने तब्बल १० कोटी...

बारामती शहरात मुख्य ठिकाणी ‘सिग्नल यंत्रणा’ बसवा-उपमुख्यमंत्री अजित पवार

0
बारामती, दि.१०: सार्वजनिक वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित ठेवण्याच्यादृष्टीने शहरातील मुख्य १० ठिकाणी 'सिग्नल यंत्रणा' बसवा, चौकाला नावे देण्याची कार्यवाही करण्यासह रस्त्यावरील अतिक्रमणे काढून रस्ते...

महाराष्ट्रातील कारागृह ग्रंथालयांसाठी राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकाता यांच्याकडून बुककेस आणि बुकरॅक देण्याचा...

0
मुंबई, दि.10 - कारागृहातील बांधवांचे सामाजिक, शैक्षणिक हित लक्षात घेऊन त्यांच्यात सुधारणा व पुनर्वसन होण्याच्या दृष्टीने राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या समान निधी योजनेंतर्गत...