बुधवार, ऑगस्ट 13, 2025
Home Blog Page 1090

भारताचे  संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे मुंबईत आगमन

मुंबई, दि 9:- भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय  विमानतळ  येथे आज दुपारी आगमन झाले. यावेळी आमदार आशिष   शेलार, आमदार सुनील राणे व माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले.

यावेळी राजशिष्टाचार व पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

00000

महिलांच्या सक्षम नेतृत्वातूनच विकसित भारत घडेल -राज्यपाल रमेश बैस

अमरावती, दि. 9 : गेल्या काही वर्षांत सर्व क्षेत्रातील महिला प्रयत्नपूर्वक अडथळे दूर करून अग्रेसर होत आहेत. याच सक्षम महिलांच्या नेतृत्वाखाली विकसित भारत घडणार असून आज सन्मानित झालेल्या महिला आगामी काळात बदलाचे प्रतीक मानल्या जातील, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

अमरावती येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशनव्दारा आयोजित ‘अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार’ सोहळ्यात राज्यातील पाच कर्तृत्वान महिलांचा राज्यपाल यांच्या हस्ते ‘अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार’ देऊन सत्कार करण्यात आला.

राज्य शासनाच्या कामगार कल्याण विभागाच्या प्रधान सचिव विनीता सिंघल, प्रसिद्ध गायिका वैशाली माडे, उद्योजिका स्नेहल लोंढे, बेसबॉल खेळाडू रेश्मा पुणेकर, प्रगतीशिल महिला शेतकरी ज्योती देशमुख आदींचा राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज ‘अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार’ देऊन सत्कार करण्यात आला. घोंगडी, स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरुप होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार प्रविण पोटे, महिला आयोगाच्या सदस्या इंदूबाई शिंदे, राजमाता अहिल्या देवी फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष महात्मे, श्रीमती सुरेखा ठाकरे आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या राज्यकारभाराच्या काळापासून भारताने महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात मोठे बदल पाहिले आहेत. सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, महर्षी कर्वे, वीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा द्रष्ट्यांना जन्म देण्याचे भाग्य महाराष्ट्राला लाभले, ज्यांनी महिला सक्षमीकरणाचा भक्कम पाया रचला. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव संपूर्ण देशात आदराने घेतले जाते. अहिल्यादेवींनी भारतातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रे आणि विविध ठिकाणी मंदिरे बांधलीत. लोकांच्या सुविधेसाठी रस्ते, घाट, विहिरी आणि पायऱ्या बांधल्यात. काशी विश्वनाथमध्ये शिवलिंगाची स्थापना केली. भुकेल्यांसाठी भोजन सत्र व तहानलेल्यांसाठी आसन व्यवस्था सुध्दा त्यांनी केली. चार धाममधील पवित्र बद्रीधामचाही त्यांनी जीर्णोद्धार केला. अडीचशे वर्षांपूर्वी त्यांनी महिलांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी कायदा करून विधवा स्त्रियांना पतीच्या मालमत्तेत वाटा मिळण्याची तरतूद केली. ज्या महिलांनी कुठल्याही अडचणींना न जुमानता स्वत:चे एक स्थान निर्माण केले आणि उत्कृष्ट कार्य केले, अशा महिलांना अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे, ही अत्यंत आनंदाची बाब असल्याचेही राज्यपाल श्री. बैस म्हणाले.

भारतातील स्थानिक स्वायत्त संस्थांमध्ये 50 टक्के महिला सदस्य असताना, भारताच्या संसदेने अलीकडेच महिला आरक्षण विधेयक लागू केले आहे जे कायदे आणि निर्णयप्रक्रियेत महिलांचा सहभाग सुनिश्चित करण्याचे वचन देते. यावर्षीच्या भारतीय नागरी सेवा परीक्षेत 10 टॉपर्सपैकी सहा महिला आहेत. प्रशासनात तसेच वरिष्ठ पोलीस पदांवर पूर्वीपेक्षा जास्त महिला आहेत. येत्या 10 वर्षात महाराष्ट्रातील अनेक पोलीस ठाण्यांचा कारभार महिलांकडे राहील, असेही राज्यपालांनी सांगितले.

समाजातील सर्व मुली आणि मुलांसाठी आनंदी आणि सुरक्षित बालपण सुनिश्चित करण्यासाठी खूप कार्य करावे लागणार असून स्त्री भ्रूणहत्या, बालविवाह, हुंडाबळी, महिलांवरील गुन्हे यासारख्या सामाजिक दुष्कृत्ये अस्तित्वात आहेत ही अत्यंत चिंतेची बाब आहे. सुरक्षित राष्ट्राची ओळख तेथील महिला सुरक्षेच्या कार्यातून केली जाते, असेही राज्यपाल म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्तृत्वान महिलांचा पुरस्कार देवून सत्कार करण्याच्या फाऊंडेशनच्या कार्याचा गौरव केला. आपल्या भाषणात ते म्हणाले, कर्तृत्व दाखविण्याची संधी प्रत्येकाला मिळते. परंतू त्या संधीचे सोने करण्याची गरज असते. विविध क्षेत्रातल्या महिलांनी संधीचे सोने केल्याचे आज या पुरस्कार सोहळ्यात दिसून येत आहे. अनेक वर्षापासून अशा महिलांना पुरस्कार देवून गौरवल्यामुळे त्याद्वारे समाजातील इतर महिलांना प्रेरणा मिळते, असेही ते म्हणाले.

महिलांच्या आरक्षणासाठी केंद्र सरकारने पाऊलं उचलले असल्याचे सांगून श्री. पवार म्हणाले की, शासन महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने योजना राबवित असते. त्याचा लाभ तळागळातील महिलांपर्यंत पोहोचविण्याची मुख्य जबाबदारी प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी करीत असतात. सर्वांच्या सहयोगातून आपण यापुढेही काम करीत राहू असेही श्री. पवार यावेळी म्हणाले.

यावेळी कार्यक्रमात सन्मानार्थी पाचही महिलांच्या संघर्षाची व कार्यकर्तृत्वाची चित्रफीत दाखविण्यात आली. कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनीता सिंघल, गायिका वैशाली माडे यांनी आपले विचार मांडले. प्रारंभी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पार्पण व दीप प्रज्वलन करण्यात आले. माजी खासदार डॉ. विकास महात्मे व संतोष महात्मे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागची भुमिका विशद केली.

0000

महिला, युवक, शेतकरी आणि गरजूंचा जगण्याचा स्तर उंचावण्यासाठी कटिबद्ध – प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी

मुंबई, दि. 9 : भारतातील प्रत्येक नागरिकाचा, गावाचा, शहराचा आणि राज्याचा विकास करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने विविध योजना हाती घेतल्या आहेत. या योजना देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचाव्यात, त्यांचा नागरिकांना लाभ मिळावा यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा सुरू केली आहे. या यात्रेच्या माध्यमातून भारतातील महिला, युवक, शेतकरी, खेळाडू आणि गरजूंच्या जीवनाचा स्तर उंचावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.
राज्यातील गरीब आणि गरजू नागरिकांपर्यंत विकसित भारत संकल्प यात्रा’ पोहोचविण्याचे शासनाचे ध्येय आहे. या यात्रेच्या माध्यमातून मिळणाऱ्या योजनांच्या फायद्यापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी आम्ही प्रयत्न करू,अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

‘विकसित भारत संकल्प यात्रे’च्या निमित्ताने प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी आज  देशभरातील विविध ठिकाणी नागरिकांशी दृकश्राव्य माध्यमाद्वारे संवाद साधला. दि.15 नोव्हेंबर 2023 ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत ‘विकसित भारत संकल्प यात्रे’चे संपूर्ण देशभरात आयोजन करण्यात आले आहे.

बृहन्मुंबईतील 227 प्रभागांमध्ये विशेष चार वाहनांद्वारे दि. 28 नोव्हेंबर 2023 ते दि. 26 जानेवारी 2024 पर्यंत या यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘सी’ विभागातील माधव बाग, कावसजी पटेल मार्ग, सी. पी. टँक सर्कल, भुलेश्वर येथे नागरिकांना विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे केंद्र आणि राज्य शासन पुरस्कृत योजनांची माहिती देण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांशी दृकश्राव्य माध्यमाद्वारे संवाद साधला.

यावेळी केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार राम कदम, माजी आमदार अतुल शहा, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल आदींसह मान्यवर उपस्थित होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक, चंदीगढ, जम्मू काश्मिर, बिहार आणि गुजरात येथील विविध योजनेच्या लाभार्थ्यांशी यावेळी प्रातिनिधीक संवाद साधला.

‘विकसित भारत संकल्प यात्रे’बाबत प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले, देशभरातील कानाकोपऱ्यात यात्रा पोहोचत आहे. शेतकऱ्यांना बियाणे, आधुनिक अवजारे, वीज-पाणी, रुग्णांना वेळेवर उपचार-औषधे, बेरोजगारांना व्यवसायासाठी भांडवल,  युवकांना रोजगार यात्रेच्या माध्यमातून मिळत आहे. ग्रामीण भागातील दहा कोटी महिला विविध योजनांच्या माध्यमातून स्वत:च्या पायावर उभ्या आहेत. येत्या काळात याच योजनांच्या माध्यमातून दोन कोटी महिलांना लक्षाधीश बनविण्याचा संकल्प करण्यात आला असल्याचेही प्रधानमंत्री श्री. मोदी हे यावेळी म्हणाले.

विकसित भारत संकल्प यात्रा  अभियानाच्या माध्यमातून योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात महाराष्ट्र एक नंबर येण्यासाठी प्रयत्न करा – मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे

प्रत्येक नागरिकाला केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या योजनांची माहिती व्हावी, त्याचा लाभ वंचित घटकाला मिळावा यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात महाराष्ट्र एक नंबर येण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवून प्रयत्न करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले,विकासाच्या प्रत्येक घटकाला सामावून घेण्यासाठी शासनाच्या विविध योजना सर्व लाभार्थीपर्यंत पोहचण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विकसित भारत संकल्प यात्रा हा महत्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून शेतकरी, महिला, व्यापारी, उद्योजक, विद्यार्थी या सर्व घटकांना विकास प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी या योजनांची माहिती जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहचावी हा प्रयत्न असणार आहे. विकसित भारत संकल्प यात्रेच्या अंमलबजावणीसंदर्भात राज्याचा आढावा घेऊन सर्व जिल्हा प्रशासनांना याबाबत  सुचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या आहेत.

महाराष्ट्रातील विकास कामांसाठी केंद्र शासन पाठीशी आहे. राज्यात वेगाने विकास कामे सुरू असून विदेशी गुंतवणुकीमध्ये राज्य एक नंबरवर असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यात राज्य अव्वल ठरेल असा विश्वासही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

कार्यक्रमस्थळी आरोग्य तपासणी, उज्ज्वला योजना, विविध क्रीडा योजना, आधारकार्डशी संबंधीत कामकाज आदींचे दालन उभारण्यात आले होते. यावेळी नागरिकांनी विविध योजनांची माहिती जाणून घेतली. तसेच अनेक नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना औषधांचेही वाटप करण्यात आले.

यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ.  अश्विनी जोशी, उप आयुक्त (परिमंडळ 2) रमाकांत बिरादार, मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, नियोजन विभागाच्या संचालिका डॉ.  प्राची जांभेकर, सी विभागाचे सहायक आयुक्त श्री. उद्धव चंदनशिवे, नगर परिषद प्रशसनाचे संचालक मनोज रानडे उपस्थित होते.

***

संपूर्ण स्वच्छता मोहिमेंतर्गत मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात मुख्यमंत्र्यांकडून स्वच्छतेची पाहणी

मुंबई, दि 9:-  मुंबईकरांच्या आरोग्यासाठी, मुंबईच्या स्वच्छतेसाठी, सुंदरतेसाठी सुरु असलेली स्वच्छ्तेची चळवळ ही महापालिका कर्मचारी, अधिकारी यांच्यापुरती मर्यादित न ठेवता ही लोक चळवळ होण्यासाठी प्रत्येक मुंबईकरांचा सहभाग यात आवश्यक आहे. मुंबईला स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी, मुंबई पालिकेचे सफाई कर्मचारी अहोरात्र काम करत असतात, त्यांच्यामुळेच मुंबई, स्वच्छ आणि सुंदर असून स्वच्छता कर्मचारी हे ‘खरे हिरो’ असल्याची  कौतुकाची थाप सफाई कर्मचा-यांना देत  त्यांना आपण सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

प्रदूषणमुक्त आणि स्वच्छ, सुंदर मुंबईसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या निर्देशानुसार संपूर्ण स्वच्छता मोहीम (डीप क्लिन ड्राईव्ह) हाती घेतली आहे. दि.3 डिसेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या मोहिमेचा धारावीमधून शुभारंभ झाल्यानंतर आज दुसऱ्या टप्प्यात मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपूर्ण स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

जुहू चौपाटी येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन स्वच्छता मोहिमेला प्रारंभ झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी  समुद्र किनारा स्वच्छ करणारे यंत्र स्वतः चालवून स्वच्छतेची पाहणी केली. यावेळी शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार अमित साटम, माजी मंत्री दिपक सावंत, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, स्वच्छ्ता अभियानासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ आणि विविध प्रकारची अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सयंत्रे व वाहने वापरण्यात येत असल्यामुळे  परिसर कमी वेळात अधिक दर्जेदारपणे स्वच्छ होत आहे. लोकांनाही यामुळे परिसर स्वच्छ राखण्याची सवय अंगवळणी पडते. स्वच्छता अभियान ही आता एक लोकसहभाग लाभलेली लोकप्रिय चळवळ झाली आहे. लोकप्रतिनिधींचाही सक्रिय सहभाग या अभियानात आहे, ही बाब देखील नक्कीच प्रेरणादायी आहे. संपूर्ण मुंबई शहरात टप्प्या टप्प्याने डीप क्लीनिंग मोहीम हाती घेण्यात येणार आहे. या स्वच्छता अभियानाद्वारे वाढत्या प्रदूषणालाही आळा बसणार आहे. धारावी सारख्या  झोपडपट्टीतील भागातही ही स्वच्छतेची कामे प्रभावीपणे होत आहेत. यामध्ये रस्ते,नाले, फूटपाथ, सार्वजनिक स्वच्छतागृह यांची स्वच्छता प्राधान्याने करण्यात येत आहे.बांधकाम क्षेत्रातील राडारोडा याचीही सफाई करण्यात येत आहे. डीप क्लीनिंग मोहिमेद्वारे स्वच्छ, सुंदर आणि निरोगी मुंबईकडे वाटचाल होत असल्याचे मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

इस्कॉन मंदिरात मुख्यमंत्र्यांचा भाविकांशी संवाद

इस्कॉन मंदीर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाविकांशी संवाद साधला. यावेळी मंदिर समितीच्यावतीने मुख्यमंत्री यांची ग्रंथतुला करुन सत्कार करण्यात आला.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले महाराष्ट्रात इस्कॉनचे 39 तर मुंबईमध्ये जवळपास चार सेंटर असून 897 मंदिराचे व्यवस्थापन तसेच सामाजिक उपक्रम इस्कॉनद्वारे राबवले जातात. शाळा व रुग्णालयांमध्ये गरजू विद्यार्थी व रुग्णांना मदत करण्यासोबतच पर्यावरण रक्षणासाठी विविध उपाय योजना,  समाजातील सर्व घटकांना सामाजिक सेवेची  प्रेरणादायी ऊर्जा देण्याचे काम इस्कॉन करीत आहे. मुंबई महापालिकेच्या 160 शाळांमध्ये 27 हजार  विद्यार्थ्यांना तसेच नवी मुंबई महापालिकेच्या 23 हजार विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार देण्याचं कामही केले जाते असेही मुख्यमंत्री म्हणाले.

या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या देशाला एका उंचीवर नेण्याचे काम केले. महासत्तेकडे नेण्याचं काम केले. ख-या अर्थाने देशाचा मान जगभरामध्ये वाढवला. म्हणूनच  या देशाची,राज्याची  आणि या जगाची सेवा करण्यात आपले योगदान अपेक्षित आहे.

स्वच्छतेसाठी मुंबई महापालिका कर्मचारी किंवा अधिकारी एवढ्यापुरती ही चळवळ आपण मर्यादित ठेवायची नाही. स्वच्छतेची चळवळ ही लोकचळवळ झाली पाहिजे, अशा प्रकारचे काम आपल्याला लक्ष देऊन करायचे आहे, असेही मुख्यमंत्री श्री.शिंदे यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी रमाई नगरात लोटला जनसागर 

संपूर्ण स्वच्छता मोहीमेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घाटकोपरमधील रमाई नगर येथे स्वच्छता केली. मुख्यमंत्र्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन  अभिवादन केल्यानंतर परिसरातील संपूर्ण स्वच्छता मोहिमेची पाहणी केली. रस्ता क्र. 1 ची स्वच्छता करून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. मुंबईला स्वच्छ ठेवण्यासाठी पालिकेचे सफाई कर्मचारी अहोरात्र काम करत असतात, त्यांच्यामुळेच मुंबई, स्वच्छ आणि सुंदर असून स्वच्छता कर्मचारी हे ‘खरे हिरो’ असल्याचे

कौतुकोद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले.  मुंबईतले संपूर्ण मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, अंतर्गत वसाहतीचे डीप क्लिनींग या अभियानाच्या माध्यमातुन करण्यात येत आहे. यासाठी पिण्याचे पाणी आपण  वापरत नाही, तर  रिसायकलींग केलेले पाणी वापरतो. या मोहिमेत चार-पाच वार्डाचे मिळून किमान दोन हजार लोक एकावेळी एका परिसरात काम करीत असल्याने परिसर पूर्णपणे स्वच्छ होतो. रस्ते,  गटार,  नाल्या सार्वजनिक शौचालये  स्वच्छ होत आहेत. झोपडपट्टी सुधार योजनेचा  देखील यात समावेश केला असल्याचे श्री शिंदे यावेळी म्हणाले.

शहाजी राजे मनपा शाळेतील विद्यार्थ्यांच्या चित्रांचे कौतुक 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण स्वच्छता मोहिमेंतर्गत विलेपार्ले (पूर्व) येथील नेहरू मार्गाच्या स्वच्छतेची पाहणी करुन स्वच्छता मोहिमेत सहभाग घेऊन  शहाजी राजे विद्यालयातील  विद्यार्थ्याँशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांची पाहणी करुन त्यांचे कौतुक केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझीम आणि ढोल ताशांच्या गजरात मुख्यमंत्र्यांचे स्वागत करून आनंद व्यक्त केला. यावेळी मुख्यमंत्र्यांशी हस्तांदोलन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.

कांदिवली पूर्व येथील ठाकूर संकुल सोसायटीमध्ये आयोजित स्वच्छता जनजागृती रॅलीला मुख्यमंत्र्यांनी संबोधित केले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छतेवर पथनाट्य सादर केले. मुख्यमंत्र्यांनी या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे कौतुक केले. पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार गोपाळ शेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.

अंधेरी पूर्व येथील गोखले उड्डाणपूलाची पाहणी

अंधेरी पूर्व – पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले रेल्वे उड्डाणपूलाच्या कामाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी पाहणी केली.  या पूलाचा पहिला गर्डर नुकताच टाकण्यात आला आहे. या पुलाची पहिली मार्गिका सुरु करण्याच्या दृष्टीने ठरलेल्या वेळेत सगळी कामे पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी संबंधितांना दिले.

०००००

‘क्रेडाई अमरावती ग्रॅण्ड प्रॉपर्टी एक्स्पो’ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

अमरावती, दि. 9 (जिमाका) :  क्रेडाई अमरावतीमार्फत जिल्ह्यात ‘ग्रॅण्ड प्रॉपर्टी एक्स्पो 2023’ चे आयोजन करण्यात आले. या प्रॉपर्टी एक्सपोला आज उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी भेट दिली. जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाठी प्रलंबित असलेली कामे नागपूर अधिवेशन कालावधीत मार्गी लावू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी दिली.

सायन्स स्कोर मैदान येथे ‘ग्रॅण्ड प्रॉपर्टी एक्स्पो 2023’ ला सुरुवात झाली असून ते दि. 11 डिसेंबरपर्यंत चालणार आहे.  आमदार प्रविण पोटे पाटील, आमदार सुलभा खोडके, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, मनपा आयुक्त देविदास पवार, क्रेडाई अमरावतीचे अध्यक्ष निलेश ठाकरे, उपाध्यक्ष कपिल आडे, सचिव रवींद्र गोरटे आदी यावेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, प्रत्येकाला घर मिळावे, यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशील आहे. म्हाडाच्या माध्यमातून राज्यात अनेक प्रकल्प सुरु असून गरजूंना त्यांच्या स्वप्नातील घरे उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. बांधकाम व्यावसायिकांनी पुढाकार घेऊन स्वस्त व चांगल्या दर्जाच्या सुविधायुक्त घरे  ग्राहकांना  उपलब्ध करुन द्यावीत. बांधकाम व्यावसायिकांसाठी शासनामार्फत अनेक योजना व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहे. यामुळे बांधकाम क्षेत्रात अनेक नव्या संधी निर्माण झाल्या आहेत.  जिल्ह्यात अनेक प्रलंबित समस्या आहेत. त्या मार्गी लावण्यासाठी नागपूर अधिवेशन कालावधीत बैठक घेवून अधिवेशन संपण्यापूर्वी ते मार्गी लावू. बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेली ‘गटार योजना’ पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देवू. तसेच जिल्ह्यातील डिपीआर संदर्भातील समस्या, घर व भाडे इमारतीवरील वाढीव दराने लावलेले कर या संदर्भात आढावा घेवून ते कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत आश्वस्त केले.

अमरावतीचा विस्तार वेगाने होत असल्याने या ठिकाणी मुलभूत सुविधेसोबतच विमान सेवा असणे आवश्यक आहे. बेलोरा विमानतळ सुरु होण्यासाठी येणाऱ्या अडचणी तातडीने मार्गी लावून नाईट लँडींग व इतर सुविधा तयार करुन विमानसेवा लवकरच सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्याचेही ते यावेळी म्हणाले. रेरा संदर्भातील येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी मंत्रालयस्तरावर बैठक घेवून त्यावर मार्ग काढण्यात येईल.  जिल्ह्यातील प्रलंबित समस्या मार्गी लावण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने पुढाकार घेवून अधिवेशन कालावधीत बैठक घेण्याचे आवाहन केले. जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही  श्री. पवार यांनी यावेळी दिली.

कार्यक्रमाच्या सुरुवातील प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये लावण्यात आलेल्या स्टॉल्सला श्री. पवार यांनी भेटी देऊन  ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सुविधा तसेच त्यांना येणाऱ्या अडचणींविषयी जाणून घेतले. ग्राहकांच्या स्वप्नातील घर तयार करण्यासाठी आवश्यक असणारी माहिती प्रॉपर्टी एक्सपोच्या माध्यमातून एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आली असून नागरिकांनी त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केले.

आमदार प्रविण पोटे पाटील व आमदार सुलभा खोडके यांनी जिल्ह्यातील गटार योजना, डिपीआर, बेलोरा विमानतळ, घर व इमारतीवरील कर अशा विविध समस्याबाबत माहिती देऊन त्या मार्गी लावण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांना केली.

ग्रॅण्ड प्रॉपर्टी एक्स्पोचा शुभारंभ दि. 8 डिसेंबर रोजी झाला. हा एक्सपो 11 डिसेंबरपर्यंत चालणार असून सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. या एक्सपामध्ये 60 पेक्षा अधिक स्टॅाल्स ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. यामध्ये प्लॉटपासून ते बांधकाम साहित्य, बंगला, रो-हाऊस, फ्लॅट, दुकाने व गृह कर्ज देणाऱ्या बँक यांचा समावेश आहे. या एक्सपोच्या माध्यमातून बांधकाम संदर्भातील नवीन तंत्रज्ञान व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

00000

पिंपरी-चिंचवडमधील आगीतील मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची आर्थिक मदत

नागपूर, दि. ८ :- पिंपरी चिंचवडमधील तळवडे येथील स्पार्कल कँडल बनवणाऱ्या कारखान्याच्या आग दुर्घटनेबाबत शोक व्यक्त करून मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. दुर्घटनेतील जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

0000

तळवडे फायर कँडल कारखाना आग दुर्घटना अत्यंत दुःखद, वेदनादायी – उपमुख्यमंत्री अजित पवार

नागपूर, दि. ८ :”पिंपरी-चिंचवडमधील तळवडे  येथे केकवरील फायर कँडल बनविण्याच्या कारखान्याला लागलेल्या आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुःखद, वेदनादायी आहे. मी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करतो. दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल तसेच  दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जातील,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड मधील दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

०००

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ : नाचणी पिकाचे सुधारित लागवड तंत्रज्ञान, प्रक्रिया व मूल्यवर्धन

राज्यात खरीप हंगामात लागवड केल्या जाणाऱ्या अन्नधान्य पिकांपैकी नाचणी महत्वाचे तृणधान्य  पीक आहे. नाचणी/नागली (Finger millet) हे गवतवर्गीय कुळातील पीक असून शास्त्रीय नाव (इलुसिन कोरोकाना) Eleusine coracana असे आहे. या पिकाची लागवड प्रामुख्याने सह्याद्री पर्वतरांगेच्या पूर्व आणि पश्चिम भागातील जास्त पाऊस पडणाऱ्या पश्चिम घाट विभाग, उप-पर्वतीय विभाग व कोकण

विभाग या कृषी हवामान विभागात डोंगराळ भागात केली जाते. या भागातील आदिवासी व स्थानिक शेतकऱ्यांसाठी नाचणी हे प्रमुख तृणधान्य पिक आहे. राज्यात सन २०२२-२३ मध्ये या पिकाची ६८,६१२ हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आली होती व त्यापासून ९५,७४५ टन उत्पादन मिळाले. २०२२-२३ मध्ये राज्याची नाचणी पिकाची सरासरी उत्पादकता १२.९६ क्विंटल/ हेक्टर एवढी होती.

राज्यातील सर्वाधिक नाचणी पिकाचे क्षेत्र कोल्हापूर (१६५५४ हेक्टर), नाशिक (१५३२६ हेक्टर), पालघर (११६८९ हेक्टर) आणि रत्नागिरी (९६६५ हेक्टर) या जिल्ह्यामध्ये आहे.

नाचणी व इतर पौष्टिक भरडधान्य पिकांचे लागवडीच्या दृष्टीने महत्व : कमी पक्वता कालावधी असणारी पिके. दुष्काळात तग धरण्याचा गुणधर्म. सुधारित तंत्रज्ञानास उत्तम प्रतिसाद देणारी व अधिक उत्पादन देणारी पिके आहेत. बदलत्या हवामानात तग धरणारी पिके व तसेच आकस्मिक शेतीकरिता नियोजन केले जाऊ शकते. उत्तम प्रकारचे पौष्टिक गुणधर्म असल्याने आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर. भविष्यात मागणी वाढणारी पिके आहेत. या पिकांपासून उत्तम प्रातिचे धान्य व जनावरांसाठी सकस चारा मिळतो.

नाचणी पिकाचे सुधारित लागवड तंत्रज्ञान:

जमिन व हवामान: नाचणी पिकाच्या लागवडीसाठी हलकी ते मध्यम, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन उत्तम आहे. या पिकाची लागवड प्रामुख्याने उप-पर्वतीय विभाग व पश्चिम घाट विभागातील डोंगर  उताराच्या वरकस जमिनीवर केली जाते.

पूर्वमशागत: जमिनीची खोल नांगरट करुन उभ्या आडव्या कुळवाच्या दोन पाळ्या देऊन ४ ते ५ टन शेणखत/कंपोस्ट खत याचवेळी शेतात मिसळून जमीन भुसभुशीत करावी. पूर्वी घेतलेल्या पिकाचि धसकटे, काडीकचरा व बहुवार्षिक गवताचे अवशेष वेचून शेत स्वच्छ करावे.

सुधारित वाण: फुले नाचणी, 115 ते 120 दिवस पक्वता कालावधी आहे. हेक्टरी 23 ते 25 क्विंटल उत्पादन, हे वाण 80 ते 85 दिवसांत फुलोऱ्यात येतो, उशीरा पक्व होणारा व उंच वाढणारा हा वाण आहे. फुले कासारी, 100 ते 105 दिवस पक्वता कालावधी आहे. हेक्टरी 20 ते 22 क्विंटल उत्पादन, हे वाण मध्यम कालावधीत पक्व होणारा 65 ते 70 दिवसात फुलोऱ्यात येतो

बियाणे पेरणी व रोपलागण:

नाचणी पिकाचा ‘खरीप’ हा प्रमुख हंगाम आहे. पारंपरिक पद्धतीने नाचणी पिकाची लागवड मुख्यत्वे रोप लागण पद्धतीने केली जाते. बियाणे पेरणी पावसाचे आगमन होताच अथवा पाण्याची सुविधा असल्यास जूनच्या पहिल्या पंधरवाड्यात करावी. पारंपरिक पद्धतीने नाचणी पिकाची लागवड भात पिकप्रमाणे रोळगण पद्धतीने केली जाते. रोपलागण पद्धतीने लागवड करायची असल्यास ४ ते ५ किलो

बियाणे/हेक्टर वापरावे. रोपवाटिका करताना गादीवाफे तयार करून त्यावर बियाणे ओळीमध्ये पेरून घ्यावे. रोपांची लागण रोपे २० ते २५ दिवसांची झाल्यावर जुलैच्या पहिल्या पंधरवाड्यात मुख्य शेतात ओळीमध्ये करावी. रोपलागण करताना दोन ओळीमधील अंतर ३०.० से.मी. (एक फूट) व दोन रोपामंधील अंतर १०.० से.मी. ठेवावे.

बिजेप्रक्रिया:

बियाणे पेरणीपूर्वी ‘अझोस्पिरीलम ब्रासिलेंस’ आणि ‘अस्पर्जिलस अवामोरी’ या जिवाणू संवर्धकाची प्रति किलो बियाण्यास २५ गॅम प्रमाणे करावी.

खत व्यवस्थापन:

पीक लागवड तंत्रज्ञान बाबत संशोधन शिफारशी:

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत खालील प्रमाणे संशोधन शिफारस विकसित करण्यात आलेल्या आहेत.

१) खतमात्रा शिफारस:

‘महाराष्ट्राच्या उप-पर्वतीय विभागात नाचणीच्या अधिक उत्पादन आणि आर्थिक फायद्यासाठी प्रति हेक्टर ५.० टन शेणखत + नत्र ६० किलो, स्फुरद ३० किलो आणि पालाश ३० किलो या खत मात्रेसोबत जिवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया (प्रति किलो बियाण्यास प्रत्येकी २५ ग्रॅम असोस्पिरीलम ब्रासिलेंस आणि अस्पर्जिलस अवामोरी) करण्याची’ शिफारस करण्यात महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी मार्फत

करण्यात आलेली आहे.

२) नाचणी पिकामध्ये युरिया, डीएपी ब्रिकेटचा वापर शिफारस:

‘उप-पर्वतीय विभागातील हलक्या जमिनीत, अधिक उत्पादन व आर्थिक उत्पादन व आर्थिक फायद्यासाठी

नाचणी पिकाची रोप लागण २०:४० से.मी.जोड ओळीत करुन ५.०० टन शेणखत प्रति हेक्टरी +

शिफारशीत खत मात्रेच्या ७५ % मात्रा (४५: २२.५: ० नत्र:स्फुरद:पालाश किलो/हेक्टरी) गोळी (ब्रिकेट)

स्वरुपात रोप लावणीचे वेळी (२० से.मी. च्या जोडओळीत ३५ सेमी अंतरावर व ५ ते ७ से.मी. खोलीवर

२.० ग्रॅमची एक गोळी) देण्याची’ शिफारस महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी करण्यात आली आहे.

३) आंतरपिके शिफारस:

‘अधिक धान्य उत्पादन निव्वळ नफा मिळविण्यासाठी उप-पर्वतीय विभागातील हलक्या व उथळ

स्वरुपाच्या जमिनीवर नागली/नाचणी पिकामध्ये उडीद किंवा मटकी ८:२ या प्रमाणात आंतरपिक घेण्याची

शिफारस करण्यात आली आहे.

आंतरमशागत:

आंतरमशागत करताना नाचणीमध्ये रोपांची प्रति एकरी योग्य संख्या ठेवण्यासाठी पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांच्या आत विरळणी करावी. पीक वाढीच्या सुरुवातीच्या काळात नाचणी पिकाची वाढ संथ गतीने होत असल्याने तणे पिकाशी स्पर्धा करतात. त्यामुळे तण नियंत्रणासाठी एक कोळपणी करुन गरजेनुसार एक महिन्याच्या आत एक खुरपणी करावी.

काढणी व मळणी:

नाचणी पिकाच्या विविध वाणानुसार पक्वता कालावधी वेगळा असू शकतो. साधारणपणे १०० ते १२० दिवसात पीक काढणीस सुरुवात करावी. काढणीस उशीर झाल्यास कणसातील/बोंडातील दाणे झडण्याची शक्यता असते. पिकाची काढणी करताना कणसे/बोंडे विळ्याने कापून करावी. दोन-तीन दिवस उन्हात चांगली वाळल्यानंतर कणसे बडवून मळणी करवी. धान्य उन्हात चांगले वाळवून हवेशीर जागी

साठवण करुन ठेवावे.

धान्य उत्पादन:

नाचणी पीक हे पीक लागवड करताना वापरण्यात येणाऱ्या सुधारित निविष्ठा व तंत्रज्ञानास उत्तम प्रतिसाद देणारे सी 4 वर्गातील पीक आहे. या पिकापासून सरासरी हेक्टरी २० ते २५ क्विंटल प्रति हेक्टर धान्य उत्पादन घेता येते.

०००

(संदर्भ:- डॉ.योगेश बन व डॉ.अशोक पिसाळ, अखिल भारतीय समन्वित नाचणी व तत्सम तृणधान्य संशोधन प्रकल्प, विभागीय कृषी संशोधन केंद्र, कोल्हापूर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

श्री.दत्तात्रय कोकरे, विभागीय संपर्क अधिकारी

विशेष लेख (भाग-१) वाचा 

विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त उद्या प्रधानमंत्री मोदी लाभार्थ्यांशी साधणार संवाद

ठाणे,दि.8 (जिमाका):- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या दि.9 डिसेबर 2023 रोजी दुपारी 12.30 वाजता दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून विकसित भारत संकल्प यात्रेतील लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. विविध शासकीय योजनांचे लाभ सर्व लक्ष्यित घटकांपर्यंत कालबद्धरीतीने पोहोचतील, हे सुनिश्चित करून सरकारच्या प्रमुख योजनांची पूर्णता प्राप्त करण्याच्या उद्देशाने देशभरात ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ आयोजित केली आहे. ठाणे जिल्ह्यातील काल्हेर ग्रामपंचायत, ता.भिवंडी येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या मुख्य कार्यक्रमापूर्वी ग्रामपंचायत काल्हेर, ता.भिवंडी, जि.ठाणे येथे सकाळी 11.00 वा. मान्यवरांचे आगमन होणार असून सकाळी 11.05 वा. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. सकाळी 11.05 ते 11.15 वा. मान्यवरांचे स्वागत होणार आहे. सकाळी 11.15 ते 11.25 वा. कार्यक्रमाचे प्रास्ताविक होईल. सकाळी 11.25 ते 11.35 वा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.ठाणे श्री.मनोज जिंदल (भाप्रसे), जिल्हाधिकारी श्री.अशोक शिनगारे, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रवींद्र चव्हाण, राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री, ठाणे ना.शंभूराजे देसाई, केंद्रीय राज्यमंत्री पंचायतराज ना.कपिल पाटील हे आपले मनोगत  व्यक्त करणार आहेत. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रमाणपत्र/लाभ वाटप केले जाणार आहे. यानंतर लाभार्थ्यांसोबत संवाद साधला जाणार आहे. त्यानंतर शपथ घेतली जाणार आहे.

दुपारी 12.30 वा. मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे  दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून विकसित भारत संकल्प यात्रेतील लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि युवा घडामोडी आणि क्रीडा मंत्री यांचे स्वागत होणार आहे. दुपारी 12.35 वा. लाभार्थ्यांसमोर ‘कहानी मेरी जुबानी’ या लघुपटाचे प्रदर्शन होणार आहे. दुपारी 12.38 वा. मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे 5 लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत आणि त्यानंतर दुपारी 12.50 वा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे लाभार्थ्यांना संबोधणार आहेत.

0000

 

केंद्र शासन पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीला गती द्यावी- मुख्य सचिव मनोज सौनिक

नागपूर दि. 8 : केंद्र शासन विविध लोकहितपयोगी योजना राबवित असते. अशा केंद्रपुरस्कृत योजना राज्यातही राबविण्यात येतात. या योजनांच्या अंमलबजावणीला गती देण्यात यावी, असे निर्देश मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी दिले.

 नागपूर येथील हैदराबाद येथील हाऊस मुख्य सचिव कार्यालयात केंद्र शासनाच्या विविध योजनांचा आढावा मुख्य सचिव श्री. सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत घेण्यात आला. बैठकीला मुख्य सचिव कार्यालयाचे सहसचिव मकरंद देशमुख यांच्यासह विविध विभागांचे सचिव उपस्थित होते.

आयुष्मान भारत योजनेची माहिती ऑनलाइन पोर्टलला योग्य पद्धतीने भरण्याच्या सूचना करीत मुख्य सचिव श्री. सौनिक म्हणाले की, ग्रामसडक योजनेअंतर्गत सुरू असलेली कामे पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करण्यात यावा. जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेची कामे पूर्ण करावी. त्यासाठी केंद्र शासनाने दिलेला निधी प्राधान्याने खर्च करावा. भारतनेट बाबत स्थानिक स्तरावरील प्रश्न सोडवण्यासाठी कृषी, आरोग्य, शिक्षण, महसूल व इतर संबंधित विभागांची बैठक बोलवावी.

   तसेच मुख्य सचिव श्री सौनिक यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजना, आयुष्मान भारत, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, जलजीवन मिशन, प्रधानमंत्री आवास योजना, भारतनेट या योजनांचा सविस्तर आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या. बैठकीला संबंधित विभागांचे अधिकारीसुद्धा उपस्थित होते.

०००००

ताज्या बातम्या

अवयवदान : एक सामाजिक कार्य

0
  अवयवदानाला चालना मिळावी याकरीता राज्यस्तरावर कार्यक्रम हाती घेऊन जनजागृतीसाठी कार्य केले जाते. सध्या राज्यभरात ३ ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत अवयवदान पंधरवड्याचे आयोजन...

महाराष्ट्रासह शेजारील राज्यांतील रुग्णांनाही उत्तम उपचार मिळावेत हा ‘मेडिसिटी’ चा उद्देश – मुख्यमंत्री देवेंद्र...

0
महाराष्ट्रात १९ हजार २०० कोटींच्या गुंतवणुकीचा मार्ग मोकळा महाराष्ट्रात डेटा सेंटर आणि औद्योगिक पार्कसाठी मोठी गुंतवणूक; रोजगाराच्या थेट ६० हजार संधी उपलब्ध होणार  ठाणे,दि.१२...

पदविका प्रवेशाला विक्रमी प्रतिसाद; १ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचा प्रवेश

0
मुंबई, दि. १२ : राज्यातील पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमांसाठी यावर्षी विद्यार्थ्यांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून, २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी आतापर्यंत १ लाख ३ हजार ११५...

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेसाठी तालुकास्तरावर समिती नेमावी – मंत्री दादाजी भुसे

0
मुंबई, दि. १२ : राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेच्या पात्रतेस मान्यता देणारी सध्याची जिल्हास्तरीय समिती ऐवजी तालुकास्तरावर समिती स्थापन करावी. जेणेकरून या...

ग्रंथालयांच्या अनुदानात ४० टक्के वाढ करण्यासाठी शासन सकारात्मक – मंत्री चंद्रकांत पाटील

0
मुंबई, दि. १२ : आजच्या डिजिटल युगात ग्रंथालय चळवळ टिकेल का असा प्रश्न पडतो पण आजची तरुण मंडळी अधिक ग्रंथालयाकडे वळली आहे. विविध वाचन...