शुक्रवार, जुलै 4, 2025
Home Blog Page 1075

आपला इतिहास इतरांच्या संदर्भावरून नको – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर दि. २३ : आमच्या समृद्ध परंपरेची नोंद असणाऱ्या नालंदा विद्यापीठाला आग लागली. त्यामुळे भारताचा इतिहास लिहिताना विदेशी प्रवाशांच्या संदर्भाची आम्हाला मदत घ्यावी लागते. त्यामुळे आपला इतिहास इतरांच्या संदर्भावर नको. त्यासाठी आपले दस्तऐवजीकरण जितके होईल तितके केले पाहिजे. भारतीयांनी ती सवय लावली पाहिजे, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केली.

 

लोकमत टाइम्स या वृत्तपत्राच्या ‘आयकॉन ऑफ सेंट्रल इंडिया’ कॉफी टेबल बुकच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मध्य भारतातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रातील ५२ कर्तृत्ववान व्यक्तींची यशोगाथा असणाऱ्या कॉफी टेबल बुक’चे सोमवारी त्यांच्या हस्ते लोकार्पण झाले.

कार्यक्रमाला ‘लोकमत वृत्तपत्र समूहा’च्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार डॉ. विजय दर्डा, प्रसिद्ध उद्योजक व कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया लिमिटेडचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक नितीन खारा, ‘लोकमत’चे संपादक श्रीमंत माने, ‘लोकमत समाचार’चे वरिष्ठ संपादक विकास मिश्र, ‘लोकमत टाईम्स’चे सल्लागार संपादक पंकज माणिकतला, लोकमतचे संचालक अशोक जैन,आशिष जैन, आसमान शेठ आदी उपस्थित होते.

इंग्रजांनी त्यांच्या कार्यकाळात लहान-लहान गोष्टींचे डॉक्युमेंटेशन केले. त्यातूनच इतिहास लिहिला गेला. मात्र, आपला भूतकाळ वैभवशाली असूनदेखील आपल्याला युरोप व चीनच्या प्रवाशांनी लिहिलेला इतिहास शिकवावा लागतो. देश प्रगतिपथावर नेताना समाजातील सकारात्मक बाबींचे दस्तऐवजीकरण आवश्यकच आहे, त्यातून इतरांना प्रेरणा मिळते.

समाजातील अनेक लोक वेगवेगळ्या क्षेत्रात लक्षवेधी काम करतात. मात्र, हे कार्य अनेकदा त्या क्षेत्रापुरते किंवा काही लोकांपुरते मर्यादित राहते.समाजातील सर्व क्षेत्रातील कार्य सर्वापुढे आले पाहिजे. छोट्या छोटया प्रयत्नातूनच परिवर्तन घडत असते. परिवर्तनाचे हे साहित्य दस्तऐवजीकरणातून समाजापर्यंत पोहोचते. अशा लहान प्रयत्नांतूनच देश मोठा होतो, असे फडणवीस म्हणाले.

नागपूर, इंग्रज काळापासून मध्य भारताचे महत्त्वाचे केंद्र होते. नागपूरने सामाजिक, राजकीय, क्रीडा, कला, विज्ञान व सर्व क्षेत्रांमध्ये नवनवीन आयकॉन दिले आहेत. मध्यभारतातील गुणवान लोकांचे हे दस्तऐवजीकरण या कॉफी टेबल बुकच्या माध्यमातून होत आहे. त्यासाठी या वृत्तपत्राचे कौतुक केले पाहिजे, असेही ते म्हणाले.

यावेळी सुप्रसिद्ध उद्योजक नितीन खारा यांनी देखील संबोधित केले तर या कार्यक्रमामागील भूमिका विजय दर्डा यांनी मांडली. तर प्रास्ताविक आस्मान शेठ यांनी केले.

०००

महाराष्ट्राला तिरंदाजीची भूमी बनवूया – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर दि. २३ : महाराष्ट्राच्या क्रीडापटूंनी तिरंदाजी या क्रीडा प्रकारात सातत्य दाखविले असून याची दखल राज्य शासनाने घेतली आहे. महाराष्ट्रात या क्रीडा प्रकारासाठी जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करण्यास शासन कटीबद्ध आहे. राज्याला तिरंदाजीची भूमी बनविण्याचा आमचा प्रयत्न आहे,असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

आशियाई क्रीडा स्पर्धेत तीन सुवर्णपदक जिंकणाऱ्या ओजस देवतळे या नागपूरकर तिरंदाजाच्या घरी जाऊन त्याचे कौतुक करणार असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे आई-वडिलांशी बोलताना स्पष्ट केले होते. आज आपल्या व्यस्त कार्यक्रमात त्यांनी ओजसच्या घरी जाऊन त्याच्याशी हितगूज साधले. यावेळी आशियाई स्पर्धेत ओजससोबत सुवर्णपदक पटकवणारा अमरावतीचा  तुषार शेळके, साताऱ्याची आदिती स्वामी हे तिरंदाजही तसेच ओजसचे क्रीडा मार्गदर्शक प्रवीण सावंतही उपस्थित होते.

उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी तीनही खेळाडूंना त्यांच्या आशियाई स्पर्धेतील अनुभवाविषयी विचारले. याशिवाय राज्य शासनाकडून खेळाडूंची काय अपेक्षा आहे हे देखील जाणून घेतले. ओजसने नागपूरमध्ये आणखी सुविधा निर्माण करण्याची मागणी केली. तर आदिती व तुषार शेळके यांनीही प्रत्येक शहरांमध्ये ही सुविधा उपलब्ध व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावर उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले की,  नागपूर शहरामध्ये मानकापूर विभागीय क्रीडा संकुल तसेच जिल्हा क्रीडा संकुल (कामठी ) नागपूर येथे तिरंदाजी या क्रीडा प्रकारासाठी जागतिक दर्जाच्या सोयी सवलती उपलब्ध होण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. राज्याच्या अन्य भागातही तिरंदाज तयार व्हावेत. यासाठी चांगल्या सुविधा दिल्या जातील. यापूर्वीही अनेक खेळाडूंनी तिरंदाजी या प्रकारामध्ये चांगले यश दाखविले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील तिरंदाजांसाठी चांगल्या सुविधांची उपलब्धता करणे राज्य शासनाची प्राथमिकता आहे. महाराष्ट्राला तिरंदाजीमध्ये अग्रेसर करण्याकडे आमचा कल आहे,असेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्य सरकारने आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पदक मिळवणाऱ्या खेळाडूंच्या बक्षिसाच्या रकमेमध्ये दहापट वाढ केल्याबद्दल या तीनही खेळाडूंनी उपमुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त केले.

उपमुख्यमंत्र्यांनी रक्कम वाढविण्याचे श्रेय खेळाडूंना दिले. ते म्हणाले, खरे म्हणजे तुमच्या पराक्रमाने आमचा हुरुप वाढतो. तुम्ही पदकं मिळवत राहावे, आम्ही सुविधा उपलब्ध करू. महाराष्ट्राचे नाव आपण मोठे करावे, देशाचे नाव आपण मोठे करावे.

उपमुख्यमंत्र्यांनी या भेटीदरम्यान पुन्हा एकदा त्यांनी ओजसच्या आई-वडिलांचे कौतुक केले. ओजसने नागपूरचे व महाराष्ट्राचे नाव मोठे केल्याबद्दल त्यांचेही कौतुक केले. ओजसच्या परिवारातील अनेक सदस्यासह  जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक व क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

०००

दीक्षाभूमीवर सुरक्षा, आरोग्य व स्वच्छतेसंदर्भात प्रशासनाकडून आधुनिक सुविधा

  • पोलिस, अग्निशमन दल ठिकठिकाणी तैनात
  • पिण्याचे पाणी, शौचालय, तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था
  • www.deekshabhoomiinfo.in  संकेतस्थळावर सर्व माहिती

नागपूर, दि. २३ : दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांना उत्तम सुविधा देण्यासाठी जिल्हा व महानगरपालिका प्रशासनाने यावर्षी आधुनिक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. १०० डॅाक्टर २४ तास उपलब्ध असून ४ हजार पोलिस मदतीसाठी उपलब्ध आहेत. याशिवाय महानगरपालिकेने ठिकठिकाणी डिजिटल बोर्ड लावून सुविधांची माहिती दिली आहे. शौचालय, पिण्याचे पाणी, तात्पुरता निवारा रस्त्यावरची स्वच्छता या मूलभूत सुविधांसाठी १ हजार कर्मचारी पुढील ३ दिवस उपलब्ध असतील.

दीक्षाभूमीवर यावर्षी मोठ्या प्रमाणात अनुयायी येणार असल्याची शक्यता परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने वर्तवली आहे. एक दिवसाआधीच यावर्षी हजारो बांधव दर्शनासाठी दीक्षाभूमीवर पोहोचले आहेत. उद्या ही संख्या वाढण्याची शक्यता असून आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी २ तास दीक्षाभूमी परिसरातील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी महानगरपालिकेसोबत पूरक व्यवस्था म्हणून आरोग्य उपसंचालक कार्यालयामध्ये आरोग्य शिबिराचे अधिकृत उद्घाटन केले. याठिकाणी २४ तास तज्ज्ञ डॅाक्टर उपलब्ध राहणार आहेत. वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय येथील डॅाक्टर, निवासी डॅाक्टर यांची यासाठी तैनाती करण्यात आली आहे. याठिकाणी गंभीर रुग्णांपासून सर्वसामान्य आजारांपर्यंत उपचार, औषधोपचार करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. कांचन वानरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महानगरपालिका व जिल्हा प्रशासनाने संयुक्तरित्या यावर्षी सुविधांच्या उपलब्धतेसंदर्भात www.deekshabhoomiinfo.in हे विशेष संकेतस्थळ सुरू केले असून सर्व अत्यावश्यक सोयीसुविधांची माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नागरिकांनी या संकेतस्थळाचा उपयोग करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये माहितीदर्शक नकाशादेखील उपलब्ध करण्यात आला आहे. डिजिटल बोर्डद्वारे अनुयायांना सर्व सूचना देणे सुरू केले आहे. महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्ष उघडला असून दीक्षाभूमीवर असणाऱ्या स्वच्छतेच्या सुविधांमध्ये अडचण आल्यास तत्काळ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दीक्षाभूमी परिसरात ठिकठिकाणी पुस्तकांचे स्टॅाल उभारण्यात आले आहेत. यात विविध प्रकारचे साहित्य विक्रीसाठी उपलब्ध आहे.

ठिकठिकाणी स्वच्छता दूत तैनात करण्यात आले आहेत. यासोबतच अनुयायांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी जागोजागी नळ बसविण्यात आले आहेत. परिवहन व्यवस्थेचीही काळजी महानगरपालिकेकडून घेण्यात येत आहे. यासाठी विशेष बसेसची व्यवस्था वाहतूक विभागाने नेमून दिलेल्या ठिकाणापर्यंत करण्यात आली आहे.

 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार

उद्या सायंकाळी ६ वाजता दीक्षाभूमीवर होणाऱ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुज्य भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई असतील.  तर प्रमुख अतिथी श्रीलंका येथील रेव्ह. डब्ल्यू. धम्मरत्न थेरो असतील. तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.

दीक्षाभूमीवर प्लास्टिक फ्री झोन पाळण्याचे आवाहन

दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिन हा कायम परिवर्तनाचा दिशादर्शक उत्सव राहिला आहे. हा उत्सव यापुढे ‘प्लास्टिक फ्री झोन’ उपक्रम ठरावा. पिण्याचे पाणी, खानपान, अन्नदान, शौचालय अन्य कोणत्याही कामासाठी प्लास्टिकचा वापर कोणीच करू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

०००

०००

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा

तथागत गौतम बुद्ध, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

मुंबई, दि. २३:- धम्मचक्र प्रवर्तन दिनामुळे  कोट्यवधींच्या जीवनात सन्मानाची पहाट झाली. हा दिवस सामाजिक क्रांतीचा अमृत क्षण ठरला आहे, अशा भावना व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

महामानवाचा पदस्पर्श झालेल्या दीक्षाभूमीचा कायापालट करणार असल्याची ग्वाहीदेखील मुख्यमंत्र्यांनी संदेशात दिली आहे.

या दिनाच्या पूर्वसंध्येला दिलेल्या संदेशात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमीवर सामाजिक क्रांतीचा पाया रचला. आधुनिक भारत या पायावर उभा आहे. त्यांची शिकवण जगालासुद्धा मार्गदर्शक आहे. डॉ. बाबासाहेबांनी दीक्षाभूमीवर हजारो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. आज हे स्थान जगासाठी ऊर्जास्थान ठरले आहे. इथे लाखो नागरिक, अनुयायी भेट असतात. म्हणून या पवित्र स्थळाचा कायापालट करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दीक्षाभूमी विकासाच्या सुमारे २०० कोटींचा विकास आराखड्याला मान्यता दिल्याचे  नमूद करून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त तथागत भगवान गौतम बुद्ध आणि महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले आहे.

रुग्ण सेवांप्रती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सजगता बाळगावी – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

सांगली, दि. २३ (जिमाका) : सामान्य माणसाला आरोग्य सेवेसाठी शासकीय रुग्णालये आधार वाटतात. यासाठी शासनाने शासकीय रुग्णालये व महाविद्यालयांमध्ये सर्व आवश्यक सेवा-सुविधा आणि यंत्र सामग्री उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य दिले आहे. शासकीय रुग्णालये व तेथील रुग्ण सेवांप्रती डॉक्टर्स, वैद्यकीय अधिकारी यांनी सजग राहून गरजू सर्वसामान्यांची आरोग्य सेवा करावी. यासाठी रुग्णालयास आणखी आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध करुन देण्यास शासन सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज दिली.

           मिरज वैद्यकीय महाविद्यालयातील विविध विभागांना भेट देवून केलेल्या पाहणीनंतर आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांच्यासह वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे डॉक्टर्स उपस्थित होते.

            श्री. मुश्रीफ म्हणाले की, मिरज हे वैद्यकीय सेवा व उपचारांचे हब आहे. या ठिकाणी चांगल्या आरोग्य सेवा मिळतात, असा नावलौकिक आहे. त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णास आपुलकीची वागणूक मिळाली पाहिजे, यासाठी शासकीय रुग्णालयातील प्रत्येक घटकाने योगदान देणे आवश्यक आहे. मिरज वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील आरोग्य सेवांच्या बळकटीकरणासाठी पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. सांगली येथील ५०० खाटांच्या रूग्णालयास निधी व मिरजेतील २५० खाटांच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी लवकरच मान्यता देण्यात येईल. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून रुग्णालयासाठी सर्जिकल साहित्य, औषधे खरेदी, विविध सेवा व यंत्र सामग्री उपलब्ध करुन दिल्याबद्दल  वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. मुश्रीफ यांनी पालकमंत्री डॉ. खाडे यांचे अभिनंदन केले.

            वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, मिरज व सांगली येथील शासकीय रुग्णालयांमध्ये आवश्यक असणाऱ्या सुविधा देण्याबरोबरच या ठिकाणी अत्यावश्यक यंत्रसाम्रगी देण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. रुग्णालयात लागणारी ४० टक्के औषधे खरेदी करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी व अधिष्ठाता यांना देण्यात आले आहेत. तर जिल्हा नियोजनमधून घेण्यात येणारी औषधेही खरेदी करण्याचे अधिकार त्यांना देण्यात आले असल्याचे सांगून, रुग्णालयात अपुरे असलेले मनुष्यबळ उपलब्ध करुन देवून सामान्य माणसाला दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी शासन तत्पर असल्याचे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.

            नर्सिंग महाविद्यालय व वसतिगृह, नर्सिंग अध्यापक व कर्मचारी निवास आणि नर्सिंग महाविद्यालय कार्यालयीन खर्चासाठी पाठविण्यात आलेल्या 47.25 कोटी रुपयांच्या प्रस्तावास विभागाने तातडीने मान्यता द्यावी, अशी मागणी पालकमंत्री डॉ. खाडे यांनी बैठकीत केली असता या प्रस्तावास मान्यता देण्याबाबत तातडीने कार्यवाही केली जाईल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.

            प्रारंभी अधिष्ठाता डॉ. नणंदकर यांनी वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालय  मिरज मधील आरोग्य सेवा, उपलब्ध मनुष्यबळ, औषधसाठा याबाबत मंत्री महोदयांना सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

          यावेळी मिरज वैद्यकीय महाविद्यालयातील अद्ययावत करण्यात आलेल्या ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. मुश्रीफ यांच्याहस्ते व पालकमंत्री डॉ. खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

            बैठकीपूर्वी मंत्री श्री. मुश्रीफ यांनी मिरज शासकीय रुग्णालयातील अत्यावश्यक सेवा, वॉर रुम, स्त्री रोग, प्रसुतिशास्त्र विभाग, शस्त्रक्रिया विभाग, आय.सी.यु, डायलेसिस विभागांना भेट दिली. तसेच, मिरज वैद्यकीय महाविद्यालयात उभारण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या स्किल लॅबची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत पालकमंत्री डॉ. खाडे उपस्थित होते.

०००

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला विजयादशमीच्या शुभेच्छा

मुंबई, दि. २३ : यंदाची विजयादशमी आपल्या सर्वांच्या जीवनात यश, किर्ती, सुख, समृद्धी, आरोग्य, आनंद, उत्साह घेऊन येवो. राज्यावरील नैसर्गिक संकटं तसंच समाजातील अज्ञान, अन्याय, अंधश्रद्धा दूर होवोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला दसरा, विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या शुभेच्छा संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की, विजयादशमी अर्थात दसरा हा आपल्या सर्वांसाठी आनंदाची लयलूट करण्याचा सण. विजयादशमी म्हणजे समाजातील दुष्प्रवृत्तींचा विनाश करुन सत्प्रवृत्तींचा विजय साजरा करण्याचा दिवस. असत्यावर सत्यानं, अज्ञानावर ज्ञानानं विजय मिळवण्यासाठी कटिबद्ध होण्याचा दिवस. यंदाच्या दसऱ्याच्या निमित्तानं राज्याच्या हितासाठी, सर्व समाजघटकांच्या विकासासाठी आपण सारे एकत्र येऊया. आपापसातील मतभेद, मनभेद, वादविवाद, भांडणतंटे विसरुन राज्यासमोरचं प्रत्येक आव्हान एकजुटीनं, एकदिलानं परतवून लावण्याचा निर्धार करुया, असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.

ऐतिहासिक महाबोधीवृक्ष महोत्सवास शुभेच्छा

राज्य शासनाचा सामाजिक न्याय विभाग आणि नाशिकच्या शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने नाशिक येथील त्रिरश्मी बुद्ध लेण्यांच्या पायथ्याशी विजयादशमीदिवशी बोधीवृक्ष रोपण कार्यक्रम आणि ऐतिहासिक महाबोधीवृक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाबोधीवृक्ष महोत्सवास, तसंच यानिमित्तानं नाशिकला येणाऱ्या देशभरातील बुद्ध उपासक, अनुयायांनाही शुभेच्छा दिल्या आहेत.

सांगली व मिरज शासकीय रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था बळकट करणार- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

सांगली, दि. २३ (जिमाका) : पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय  सर्वोपचार  रुग्णालय परिसरात होणाऱ्या ५०० खाटांच्या रुग्णालयाच्या प्रस्तावास लवकरच निधी उपलब्ध करून देण्याबरोबरच रुग्णालयामार्फत पाठविण्यात आलेल्या सर्व प्रस्तावांचा सकारात्मक विचार करून येथील आरोग्य सेवा बळकट केल्या जातील. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध केला जाईल, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे दिली.

पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय सर्वोपचार रुग्णालयास भेट देवून तेथील आरोग्य सेवा व सुविधांचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम व रुग्णालयाचे डॉक्टर्स उपस्थित होते.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, सांगली जिल्ह्याचे मुख्यालय आहे. या ठिकाणी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून येणाऱ्या गरजू, गरीब रुग्णास आवश्यक वैद्यकीय सेवा मिळाल्या पाहिजेत. या ठिकाणी हृदय शस्त्रक्रिया, कर्करोग उपचार यासारखे विभाग सुरु असणे आवश्यक वाटते. सांगली येथे होणाऱ्या ५०० खाटांच्या रुग्णालयास आवश्यक सर्व मदत केली जाईल. रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना रुग्णालयातून औषधे उपलब्ध करुन द्यावीत. आवश्यक सर्व वैद्यकीय चाचण्या रुग्णालयात करण्यात याव्यात. कोणत्याही प्रकारे रुग्णांची हेळसांड होवू नये याची आरोग्य प्रशासनाने दक्षता घ्यावी. रुग्णालयासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ उपलब्ध करुन दिले जाईल, असे ते म्हणाले.

सांगली येथील रुग्णालयात एसटीपी सिस्टीम करण्याकरिता पाठविण्यात आलेला प्रस्ताव मंजूर करण्याची ग्वाही देवून वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, सांगली व मिरज येथील रुग्णालयात आय.सी.यु. बेड वाढविण्याचा प्रस्ताव तातडीने पाठवावा, याबाबत सकारात्मक विचार केला जाईल. सार्वजनिक बांधकाम विभागाने रुग्णालयातील सर्व इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे. याबरोबच फायर ऑडिटही करण्याची सूचना त्यांनी केली.

बैठकीपूर्वी श्री. मुश्रीफ यांनी रुग्णालयात विविध विभागांना भेट देवून आरोग्य व्यवस्थेची पाहणी  करुन वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

०००

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा!

मुंबई, दि. 23 – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजयादशमी अर्थात दसरा आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. यानिमित्ताने समाजातील अनिष्ट प्रथांवर विजय मिळवावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, नवरात्रीच्या पवित्र पर्वानंतर येणारा विजयादशमी अर्थात दसरा हा सण आपल्या संस्कृतीचा उद्घोषक आहे. जे जे उदात्त, चांगले त्याचा दुष्ट आणि अंधकारावर विजय याचीच जाणीव हा सण करून देत असतो. विजयादशमीनिमित्त होणारे रावणाचे दहन हे अहंकाराचे, अन्यायाचे आणि अविचाराचे होवो. राज्यातील शेतकरी सुखी व्हावा, राज्य विकासाच्या मार्गावर वेगाने अग्रक्रमाने जात राहावे आणि सर्वांचे जीवन मंगलमय व्हावे, अशी प्रार्थनाही त्यांनी केली आहे. गौतम बुद्धांची शिकवणूक अंगिकारणे आणि अहिंसेच्या मार्गावरून जाणे हाच धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी संकल्प करुया, असेही त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

‘उमेद’ अभियानाचे प्रमुख तथा मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांची २४ ते २६ ऑक्टोबरदरम्यान ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुलाखत

मुंबई, दि. 23 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे प्रमुख तथा मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे.

सामान्य/गरीब कुटुंबांना स्वयंरोजगार मिळावा आणि (दारिद्र्य कमी होऊन) कुटुंब आर्थिकरित्या सक्षम व्हावे म्हणून शासन विविध योजना राबवित आहे. ग्रामीण भागातील महिलांना लघु उद्योगातून रोजगार निर्माण करून देणे आणि आर्थिक आत्मनिर्भर होण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती (उमेद) अभियान राज्यभरात राबविण्यात येत आहे. हे अभियान नेमके काय आहे, याची अंमलबजावणी आणि नियोजन; स्वयंरोजगारासाठी होणारे प्रयत्न, याबाबतची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.जयवंशी यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. 24, बुधवार दि. 25 आणि गुरुवार दि.26 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदक शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

राज्यपालांची राजभवन नवरात्री मंडळाला भेट

मुंबई, दि. 23 : राज्यपाल रमेश बैस यांनी दुर्गाष्टमीनिमित्त राजभवन कर्मचारी निवासी संकुल येथील नवरात्रोत्सव मंडळाला भेट देऊन देवीची आरती केली. यावेळी राज्यपालांनी उपस्थितांशी संवाद साधला.

Governor visits Navratri Mandal  in the Raj Bhavan staff quarters premises 

Mumbai, Date 23 : Governor Ramesh Bais visited the Raj Bhavan Navratri Mandal in the Raj Bhavan staff quarters premises on the occasion of Durgashtami. The Governor performed the aarti and interacted with those present.

ताज्या बातम्या

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात संचालक सतीशकुमार खडके यांची मुलाखत

0
मुंबई दि. ४ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात 'आपत्ती पूर्व व आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी करण्यात आलेले नियोजन व अंमलबजावणी' या विषयासंदर्भात राज्य आपत्ती...

राज्य शासनाच्या ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२४’साठी प्रवेशिका पाठविण्याकरिता १९ जुलै पर्यंत मुदतवाढ

0
मुंबई, दि. ४ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे....

विधानसभा प्रश्नोत्तर

0
राज्याच्या समुद्रकिनारी असलेल्या कांदळवनांचे सर्वेक्षण सुरू - वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ४ : गुजरातच्या सीमेपासून ते गोवा राज्याच्या सीमेपर्यंत राज्याच्या समुद्रकिनारी कांदळवन आहेत. या कांदळवनांचे...

सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग विभागाचे भारताच्या सकल उत्पन्नात महत्वपूर्ण योगदान – केंद्रीय मंत्री जीतन...

0
मुंबई, दि. ४ : भारत जगातील चौथी विकसित अर्थव्यवस्था आहे. भारताच्या सकल उत्पन्नात (जीडीपी) सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगाचे (एमएसएमई) ३०.१ टक्के, उत्पादन क्षेत्राचे ३५.४ टक्के तर...

नंदुरबार जिल्ह्यातील भरोसा सेल आणि दामिनी पथकांची कामगिरी उत्तम – राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा...

0
नंदुरबार, दिनांक 04 जुलै, 2025 (जिमाका) : जिल्हा पोलीस यंत्रणेमार्फत जिल्ह्यात भरोसा सेल आणि दामिनी पथकांचे काम उत्तमरित्या सुरू आहे, तसेच बालविवाह, गर्भलिंगनिदान आणि...