शुक्रवार, जुलै 4, 2025
Home Blog Page 1074

छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा कुपवाडा (जम्मू काश्मीर) येथे उभारण्यासाठी राजधानीतून रवाना

नवी दिल्ली, दि. २३ : जम्मू आणि काश्मीर सीमेवरील कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार असून हा पुतळा राजधानीतील महाराष्ट्र सदनातून निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग यांच्या हस्ते कुपवाडाकडे आज सकाळी रवाना करण्यात आला.

राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा समारंभपूर्वक कुपवाडा येथे 20 ऑक्टोबर 2023 रोजी मुंबई येथून रवाना करण्यात आला होता. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, संस्थेचे विश्वस्त अभयसिंह शिरोळे, अध्यक्ष हेमंत जाधव उपस्थित होते.

हा पुतळा दिल्लीहून रवाना होण्यापूर्वी दिल्ली मराठी प्रतिष्ठानतर्फे येथील महाराष्ट्र सदनात  काल उशीरा रात्री  एक लहान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी प्रतिष्ठानतर्फे  निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रूपिंदर सिंग, सहाय्यक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावर,  मेजर जनरल सुजित पाटील, ‘आम्ही पुणेकर’ संस्थेचे विश्वस्त अभयसिंह शिरोळे, अध्यक्ष हेमंत जाधव यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या सोहळ्यास दिल्लीतील मराठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजभवनातून रवाना होणारा छत्रपतींचा हा पुतळा बडोदा, दिल्लीमार्गे रस्त्याने प्रवास करून साधारणत: दहा ते बारा दिवसात कुपवाडा येथे पोहोचेल.

‘आम्ही पुणेकर’ या संस्थेच्यावतीने जम्मू काश्मीर मधील कुपवाडा येथे भारत पाक सीमेवर मराठ्यांच्या पराक्रमाची माहिती देण्यासाठी छत्रपती शिवरायांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. ‘आम्ही पुणेकर फाउंडेशन’ व ‘छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती यांच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेला हा पुतळा कुपवाडा येथील मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटला स्थापनेसाठी देण्यात येणार आहे. भारतीय सैन्याच्या छावणीत उभारण्यात येणारा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा साडे दहा फुट उंचीचा असून जमिनीपासून जवळपास तितक्याच उंचीच्या आणि ७ x ३ या आकाराच्या चौथऱ्यावर उभारण्यात येणार आहे. कुपवाडा येथील भारतीय सैन्याच्या छावणीत या पुतळ्याच्या स्थानाचे भूमीपूजन भारतीय सेनेच्या राष्ट्रीय रायफल्स च्या ४१ व्या बटालीयनचे (मराठा लाईट इन्फ्रंटरी) कमांडिंग ऑफीसर कर्नल नवलगट्टी आणि छत्रपती शिवाजी स्मारक समितीचे अध्यक्ष अभयराज शिरोळे यांच्या हस्ते दि. २० मार्च २०२३ रोजी झाले. नवीन तंत्रज्ञानाने बनविलेला छत्रपतींचा हा पुतळा जम्मू काश्मीर मधील प्रतिकूल हवामानात दीर्घकाळ तग धरेल असा बनवला गेला आहे.

‘आम्ही पुणेकर’ या संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव यांनी माहिती देताना सांगितले की, परिस्थिती अनुकूल असल्यास संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 7 नोव्हेंबर रोजी पुतळ्याचे अनावरण करण्यात येईल.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पलला भेट

नागपूर, दि.  २४ : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे भेट दिली.  यावेळी त्यांनी तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती आणि प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

दीक्षाभूमी व ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे येणाऱ्या सर्व अनुयायांचे स्वागत करीत उपमुख्यमंत्री महोदयांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. ड्रॅगन पॅलेस टेम्पलमुळे कामठी हे शहर जगाच्या नकाशावर आले असल्याचे यावेळी ते म्हणाले.

आ. चंद्रशेखर बावनकुळे, आ. टेकचंद सावरकर, ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा ॲड. सुलेखा कुंभारे यांच्यासह मोठ्या संख्येने अनुयायी यावेळी उपस्थित होते.

000

सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते मंचर येथे सी.टी.स्कॅन तपासणी केंद्राचे उद्घाटन

पुणे, दि. २४ : सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते उप जिल्हा रुग्णालय मंचर येथे अत्याधुनिक सी.टी.स्कॅन तपासणी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी तहसीलदार संजय नागटिळक, गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज, उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवाजीराव जाधव, रुग्ण कल्याण समिती सदस्य डी.के.वळसे पाटील, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, कृष्णा डायग्नोस्टिक केंद्राचे डॉ. परीमल सावंत, डॉ. संजयकुमार भवारी आदी उपस्थित होते.

श्री. वळसे पाटील म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांना लाभ व्हावा यासाठी या तपासणी केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. येथे उपजिल्हा रुग्णालयातील रुग्ण तसेच बाह्य रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच दुर्धर आजाराची पूर्व तपासणी केली जाणार आहे. गरजू नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

सार्वजनिक आरोग्य विभाग व क्रस्ना डायग्नोस्टिक सेंटर यांच्या संयुक्त विद्यामाने सार्वजनिक खासगी तत्वावर या सीटी स्कॅन तपासणी केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. सी.टी.स्कॅन केंद्राचा या परिसरातील नागरिकांना लाभ होणार आहे, असेही श्री. वळसे-पाटील म्हणाले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. जाधव यांनी केले.

‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ बाबत बाईक रॅलीमधून जनजागृती होईल – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे प्रतिपादन

मुंबई दि. २४ : यशस्विनी बाईक रॅलीच्या माध्यमातून ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानबाबत जनजागृती करण्याचे कार्य होत असल्याचे प्रतिपादन महिला व बाल विकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज येथे केले.

‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) यांच्या यशस्व‍िनी बाईक रॅलीस महिला व बाल विकास मंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते झेंडा दाखूवन पुढील त्यांना प्रवासास शुभेच्छा देण्यात आल्या. त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी केंद्रीय राखीव पोलिस दलाचे महानिरीक्षक पी.रणपिसे, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रुबल अग्रवाल, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर आदी उपस्थित होते.

‘बेटी बचाव बेटी पढाओ’ हा संदेश घेऊन केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) च्या 75 महिला जवान 15 राज्यामधून आणि 2 केंद्रशासित प्रदेशातील 121 जिल्ह्यातून अंदाजे 10 हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. 3 ते 31 ऑक्टोबर 2023 या कालावधीत या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीनगर, शिलाँग, कन्याकुमारी ते एकतानगर गुजरात असा प्रवास या रॅलीच्या माध्यामातून होणार आहे.

या रॅलीचे महाराष्ट्र राज्यात सोलापूर येथे आगमन झाले. मुंबई येथे ही रॅली आली आहे. पुढील प्रवास करण्यासाठी शुभेच्छा देण्याकरिता गेट वे ऑफ इंडिया येथे केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) आणि माहिला व बाल विकास विभागांतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी महिला व बाल विकास विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेंतर्गत कु.जीविका यादव, कु. युक्ता कांबळे (चेंबूर), कु.कस्तुरी देसाई (प्रभादेवी), कु. इशान्वी गुंडाळे (भायखळा) आणि कु. ज्ञानदा तेरवणकर यांना प्रातिनिधीक स्वरुपात धनादेशाचे वाटप माहिला व बाल विकास मंत्री कु. आदिती तटकरे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

प्रास्ताविक केंद्रीय राखीव पोलिस दलाचे महानिरीक्षक पी.रणपिसे यांनी तर सूत्रसंचालन जाई वैशंपायन यांनी केले. यावेळी केंद्रीय राखीव पोलिस दलातील पुरुष व माहिला जवान यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले.

000

आपला इतिहास इतरांच्या संदर्भावरून नको – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर दि. २३ : आमच्या समृद्ध परंपरेची नोंद असणाऱ्या नालंदा विद्यापीठाला आग लागली. त्यामुळे भारताचा इतिहास लिहिताना विदेशी प्रवाशांच्या संदर्भाची आम्हाला मदत घ्यावी लागते. त्यामुळे आपला इतिहास इतरांच्या संदर्भावर नको. त्यासाठी आपले दस्तऐवजीकरण जितके होईल तितके केले पाहिजे. भारतीयांनी ती सवय लावली पाहिजे, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केली.

 

लोकमत टाइम्स या वृत्तपत्राच्या ‘आयकॉन ऑफ सेंट्रल इंडिया’ कॉफी टेबल बुकच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मध्य भारतातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रातील ५२ कर्तृत्ववान व्यक्तींची यशोगाथा असणाऱ्या कॉफी टेबल बुक’चे सोमवारी त्यांच्या हस्ते लोकार्पण झाले.

कार्यक्रमाला ‘लोकमत वृत्तपत्र समूहा’च्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार डॉ. विजय दर्डा, प्रसिद्ध उद्योजक व कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया लिमिटेडचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक नितीन खारा, ‘लोकमत’चे संपादक श्रीमंत माने, ‘लोकमत समाचार’चे वरिष्ठ संपादक विकास मिश्र, ‘लोकमत टाईम्स’चे सल्लागार संपादक पंकज माणिकतला, लोकमतचे संचालक अशोक जैन,आशिष जैन, आसमान शेठ आदी उपस्थित होते.

इंग्रजांनी त्यांच्या कार्यकाळात लहान-लहान गोष्टींचे डॉक्युमेंटेशन केले. त्यातूनच इतिहास लिहिला गेला. मात्र, आपला भूतकाळ वैभवशाली असूनदेखील आपल्याला युरोप व चीनच्या प्रवाशांनी लिहिलेला इतिहास शिकवावा लागतो. देश प्रगतिपथावर नेताना समाजातील सकारात्मक बाबींचे दस्तऐवजीकरण आवश्यकच आहे, त्यातून इतरांना प्रेरणा मिळते.

समाजातील अनेक लोक वेगवेगळ्या क्षेत्रात लक्षवेधी काम करतात. मात्र, हे कार्य अनेकदा त्या क्षेत्रापुरते किंवा काही लोकांपुरते मर्यादित राहते.समाजातील सर्व क्षेत्रातील कार्य सर्वापुढे आले पाहिजे. छोट्या छोटया प्रयत्नातूनच परिवर्तन घडत असते. परिवर्तनाचे हे साहित्य दस्तऐवजीकरणातून समाजापर्यंत पोहोचते. अशा लहान प्रयत्नांतूनच देश मोठा होतो, असे फडणवीस म्हणाले.

नागपूर, इंग्रज काळापासून मध्य भारताचे महत्त्वाचे केंद्र होते. नागपूरने सामाजिक, राजकीय, क्रीडा, कला, विज्ञान व सर्व क्षेत्रांमध्ये नवनवीन आयकॉन दिले आहेत. मध्यभारतातील गुणवान लोकांचे हे दस्तऐवजीकरण या कॉफी टेबल बुकच्या माध्यमातून होत आहे. त्यासाठी या वृत्तपत्राचे कौतुक केले पाहिजे, असेही ते म्हणाले.

यावेळी सुप्रसिद्ध उद्योजक नितीन खारा यांनी देखील संबोधित केले तर या कार्यक्रमामागील भूमिका विजय दर्डा यांनी मांडली. तर प्रास्ताविक आस्मान शेठ यांनी केले.

०००

महाराष्ट्राला तिरंदाजीची भूमी बनवूया – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर दि. २३ : महाराष्ट्राच्या क्रीडापटूंनी तिरंदाजी या क्रीडा प्रकारात सातत्य दाखविले असून याची दखल राज्य शासनाने घेतली आहे. महाराष्ट्रात या क्रीडा प्रकारासाठी जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करण्यास शासन कटीबद्ध आहे. राज्याला तिरंदाजीची भूमी बनविण्याचा आमचा प्रयत्न आहे,असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

आशियाई क्रीडा स्पर्धेत तीन सुवर्णपदक जिंकणाऱ्या ओजस देवतळे या नागपूरकर तिरंदाजाच्या घरी जाऊन त्याचे कौतुक करणार असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे आई-वडिलांशी बोलताना स्पष्ट केले होते. आज आपल्या व्यस्त कार्यक्रमात त्यांनी ओजसच्या घरी जाऊन त्याच्याशी हितगूज साधले. यावेळी आशियाई स्पर्धेत ओजससोबत सुवर्णपदक पटकवणारा अमरावतीचा  तुषार शेळके, साताऱ्याची आदिती स्वामी हे तिरंदाजही तसेच ओजसचे क्रीडा मार्गदर्शक प्रवीण सावंतही उपस्थित होते.

उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी तीनही खेळाडूंना त्यांच्या आशियाई स्पर्धेतील अनुभवाविषयी विचारले. याशिवाय राज्य शासनाकडून खेळाडूंची काय अपेक्षा आहे हे देखील जाणून घेतले. ओजसने नागपूरमध्ये आणखी सुविधा निर्माण करण्याची मागणी केली. तर आदिती व तुषार शेळके यांनीही प्रत्येक शहरांमध्ये ही सुविधा उपलब्ध व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावर उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले की,  नागपूर शहरामध्ये मानकापूर विभागीय क्रीडा संकुल तसेच जिल्हा क्रीडा संकुल (कामठी ) नागपूर येथे तिरंदाजी या क्रीडा प्रकारासाठी जागतिक दर्जाच्या सोयी सवलती उपलब्ध होण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. राज्याच्या अन्य भागातही तिरंदाज तयार व्हावेत. यासाठी चांगल्या सुविधा दिल्या जातील. यापूर्वीही अनेक खेळाडूंनी तिरंदाजी या प्रकारामध्ये चांगले यश दाखविले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील तिरंदाजांसाठी चांगल्या सुविधांची उपलब्धता करणे राज्य शासनाची प्राथमिकता आहे. महाराष्ट्राला तिरंदाजीमध्ये अग्रेसर करण्याकडे आमचा कल आहे,असेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्य सरकारने आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पदक मिळवणाऱ्या खेळाडूंच्या बक्षिसाच्या रकमेमध्ये दहापट वाढ केल्याबद्दल या तीनही खेळाडूंनी उपमुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त केले.

उपमुख्यमंत्र्यांनी रक्कम वाढविण्याचे श्रेय खेळाडूंना दिले. ते म्हणाले, खरे म्हणजे तुमच्या पराक्रमाने आमचा हुरुप वाढतो. तुम्ही पदकं मिळवत राहावे, आम्ही सुविधा उपलब्ध करू. महाराष्ट्राचे नाव आपण मोठे करावे, देशाचे नाव आपण मोठे करावे.

उपमुख्यमंत्र्यांनी या भेटीदरम्यान पुन्हा एकदा त्यांनी ओजसच्या आई-वडिलांचे कौतुक केले. ओजसने नागपूरचे व महाराष्ट्राचे नाव मोठे केल्याबद्दल त्यांचेही कौतुक केले. ओजसच्या परिवारातील अनेक सदस्यासह  जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक व क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

०००

दीक्षाभूमीवर सुरक्षा, आरोग्य व स्वच्छतेसंदर्भात प्रशासनाकडून आधुनिक सुविधा

  • पोलिस, अग्निशमन दल ठिकठिकाणी तैनात
  • पिण्याचे पाणी, शौचालय, तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था
  • www.deekshabhoomiinfo.in  संकेतस्थळावर सर्व माहिती

नागपूर, दि. २३ : दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांना उत्तम सुविधा देण्यासाठी जिल्हा व महानगरपालिका प्रशासनाने यावर्षी आधुनिक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. १०० डॅाक्टर २४ तास उपलब्ध असून ४ हजार पोलिस मदतीसाठी उपलब्ध आहेत. याशिवाय महानगरपालिकेने ठिकठिकाणी डिजिटल बोर्ड लावून सुविधांची माहिती दिली आहे. शौचालय, पिण्याचे पाणी, तात्पुरता निवारा रस्त्यावरची स्वच्छता या मूलभूत सुविधांसाठी १ हजार कर्मचारी पुढील ३ दिवस उपलब्ध असतील.

दीक्षाभूमीवर यावर्षी मोठ्या प्रमाणात अनुयायी येणार असल्याची शक्यता परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने वर्तवली आहे. एक दिवसाआधीच यावर्षी हजारो बांधव दर्शनासाठी दीक्षाभूमीवर पोहोचले आहेत. उद्या ही संख्या वाढण्याची शक्यता असून आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी २ तास दीक्षाभूमी परिसरातील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी महानगरपालिकेसोबत पूरक व्यवस्था म्हणून आरोग्य उपसंचालक कार्यालयामध्ये आरोग्य शिबिराचे अधिकृत उद्घाटन केले. याठिकाणी २४ तास तज्ज्ञ डॅाक्टर उपलब्ध राहणार आहेत. वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय येथील डॅाक्टर, निवासी डॅाक्टर यांची यासाठी तैनाती करण्यात आली आहे. याठिकाणी गंभीर रुग्णांपासून सर्वसामान्य आजारांपर्यंत उपचार, औषधोपचार करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. कांचन वानरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महानगरपालिका व जिल्हा प्रशासनाने संयुक्तरित्या यावर्षी सुविधांच्या उपलब्धतेसंदर्भात www.deekshabhoomiinfo.in हे विशेष संकेतस्थळ सुरू केले असून सर्व अत्यावश्यक सोयीसुविधांची माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नागरिकांनी या संकेतस्थळाचा उपयोग करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये माहितीदर्शक नकाशादेखील उपलब्ध करण्यात आला आहे. डिजिटल बोर्डद्वारे अनुयायांना सर्व सूचना देणे सुरू केले आहे. महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्ष उघडला असून दीक्षाभूमीवर असणाऱ्या स्वच्छतेच्या सुविधांमध्ये अडचण आल्यास तत्काळ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दीक्षाभूमी परिसरात ठिकठिकाणी पुस्तकांचे स्टॅाल उभारण्यात आले आहेत. यात विविध प्रकारचे साहित्य विक्रीसाठी उपलब्ध आहे.

ठिकठिकाणी स्वच्छता दूत तैनात करण्यात आले आहेत. यासोबतच अनुयायांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी जागोजागी नळ बसविण्यात आले आहेत. परिवहन व्यवस्थेचीही काळजी महानगरपालिकेकडून घेण्यात येत आहे. यासाठी विशेष बसेसची व्यवस्था वाहतूक विभागाने नेमून दिलेल्या ठिकाणापर्यंत करण्यात आली आहे.

 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार

उद्या सायंकाळी ६ वाजता दीक्षाभूमीवर होणाऱ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुज्य भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई असतील.  तर प्रमुख अतिथी श्रीलंका येथील रेव्ह. डब्ल्यू. धम्मरत्न थेरो असतील. तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.

दीक्षाभूमीवर प्लास्टिक फ्री झोन पाळण्याचे आवाहन

दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिन हा कायम परिवर्तनाचा दिशादर्शक उत्सव राहिला आहे. हा उत्सव यापुढे ‘प्लास्टिक फ्री झोन’ उपक्रम ठरावा. पिण्याचे पाणी, खानपान, अन्नदान, शौचालय अन्य कोणत्याही कामासाठी प्लास्टिकचा वापर कोणीच करू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

०००

०००

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा

तथागत गौतम बुद्ध, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

मुंबई, दि. २३:- धम्मचक्र प्रवर्तन दिनामुळे  कोट्यवधींच्या जीवनात सन्मानाची पहाट झाली. हा दिवस सामाजिक क्रांतीचा अमृत क्षण ठरला आहे, अशा भावना व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

महामानवाचा पदस्पर्श झालेल्या दीक्षाभूमीचा कायापालट करणार असल्याची ग्वाहीदेखील मुख्यमंत्र्यांनी संदेशात दिली आहे.

या दिनाच्या पूर्वसंध्येला दिलेल्या संदेशात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमीवर सामाजिक क्रांतीचा पाया रचला. आधुनिक भारत या पायावर उभा आहे. त्यांची शिकवण जगालासुद्धा मार्गदर्शक आहे. डॉ. बाबासाहेबांनी दीक्षाभूमीवर हजारो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. आज हे स्थान जगासाठी ऊर्जास्थान ठरले आहे. इथे लाखो नागरिक, अनुयायी भेट असतात. म्हणून या पवित्र स्थळाचा कायापालट करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दीक्षाभूमी विकासाच्या सुमारे २०० कोटींचा विकास आराखड्याला मान्यता दिल्याचे  नमूद करून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त तथागत भगवान गौतम बुद्ध आणि महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले आहे.

रुग्ण सेवांप्रती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सजगता बाळगावी – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

सांगली, दि. २३ (जिमाका) : सामान्य माणसाला आरोग्य सेवेसाठी शासकीय रुग्णालये आधार वाटतात. यासाठी शासनाने शासकीय रुग्णालये व महाविद्यालयांमध्ये सर्व आवश्यक सेवा-सुविधा आणि यंत्र सामग्री उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य दिले आहे. शासकीय रुग्णालये व तेथील रुग्ण सेवांप्रती डॉक्टर्स, वैद्यकीय अधिकारी यांनी सजग राहून गरजू सर्वसामान्यांची आरोग्य सेवा करावी. यासाठी रुग्णालयास आणखी आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध करुन देण्यास शासन सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज दिली.

           मिरज वैद्यकीय महाविद्यालयातील विविध विभागांना भेट देवून केलेल्या पाहणीनंतर आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांच्यासह वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे डॉक्टर्स उपस्थित होते.

            श्री. मुश्रीफ म्हणाले की, मिरज हे वैद्यकीय सेवा व उपचारांचे हब आहे. या ठिकाणी चांगल्या आरोग्य सेवा मिळतात, असा नावलौकिक आहे. त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णास आपुलकीची वागणूक मिळाली पाहिजे, यासाठी शासकीय रुग्णालयातील प्रत्येक घटकाने योगदान देणे आवश्यक आहे. मिरज वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील आरोग्य सेवांच्या बळकटीकरणासाठी पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. सांगली येथील ५०० खाटांच्या रूग्णालयास निधी व मिरजेतील २५० खाटांच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी लवकरच मान्यता देण्यात येईल. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून रुग्णालयासाठी सर्जिकल साहित्य, औषधे खरेदी, विविध सेवा व यंत्र सामग्री उपलब्ध करुन दिल्याबद्दल  वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. मुश्रीफ यांनी पालकमंत्री डॉ. खाडे यांचे अभिनंदन केले.

            वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, मिरज व सांगली येथील शासकीय रुग्णालयांमध्ये आवश्यक असणाऱ्या सुविधा देण्याबरोबरच या ठिकाणी अत्यावश्यक यंत्रसाम्रगी देण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. रुग्णालयात लागणारी ४० टक्के औषधे खरेदी करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी व अधिष्ठाता यांना देण्यात आले आहेत. तर जिल्हा नियोजनमधून घेण्यात येणारी औषधेही खरेदी करण्याचे अधिकार त्यांना देण्यात आले असल्याचे सांगून, रुग्णालयात अपुरे असलेले मनुष्यबळ उपलब्ध करुन देवून सामान्य माणसाला दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी शासन तत्पर असल्याचे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.

            नर्सिंग महाविद्यालय व वसतिगृह, नर्सिंग अध्यापक व कर्मचारी निवास आणि नर्सिंग महाविद्यालय कार्यालयीन खर्चासाठी पाठविण्यात आलेल्या 47.25 कोटी रुपयांच्या प्रस्तावास विभागाने तातडीने मान्यता द्यावी, अशी मागणी पालकमंत्री डॉ. खाडे यांनी बैठकीत केली असता या प्रस्तावास मान्यता देण्याबाबत तातडीने कार्यवाही केली जाईल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.

            प्रारंभी अधिष्ठाता डॉ. नणंदकर यांनी वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालय  मिरज मधील आरोग्य सेवा, उपलब्ध मनुष्यबळ, औषधसाठा याबाबत मंत्री महोदयांना सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

          यावेळी मिरज वैद्यकीय महाविद्यालयातील अद्ययावत करण्यात आलेल्या ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. मुश्रीफ यांच्याहस्ते व पालकमंत्री डॉ. खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

            बैठकीपूर्वी मंत्री श्री. मुश्रीफ यांनी मिरज शासकीय रुग्णालयातील अत्यावश्यक सेवा, वॉर रुम, स्त्री रोग, प्रसुतिशास्त्र विभाग, शस्त्रक्रिया विभाग, आय.सी.यु, डायलेसिस विभागांना भेट दिली. तसेच, मिरज वैद्यकीय महाविद्यालयात उभारण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या स्किल लॅबची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत पालकमंत्री डॉ. खाडे उपस्थित होते.

०००

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला विजयादशमीच्या शुभेच्छा

मुंबई, दि. २३ : यंदाची विजयादशमी आपल्या सर्वांच्या जीवनात यश, किर्ती, सुख, समृद्धी, आरोग्य, आनंद, उत्साह घेऊन येवो. राज्यावरील नैसर्गिक संकटं तसंच समाजातील अज्ञान, अन्याय, अंधश्रद्धा दूर होवोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला दसरा, विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या शुभेच्छा संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की, विजयादशमी अर्थात दसरा हा आपल्या सर्वांसाठी आनंदाची लयलूट करण्याचा सण. विजयादशमी म्हणजे समाजातील दुष्प्रवृत्तींचा विनाश करुन सत्प्रवृत्तींचा विजय साजरा करण्याचा दिवस. असत्यावर सत्यानं, अज्ञानावर ज्ञानानं विजय मिळवण्यासाठी कटिबद्ध होण्याचा दिवस. यंदाच्या दसऱ्याच्या निमित्तानं राज्याच्या हितासाठी, सर्व समाजघटकांच्या विकासासाठी आपण सारे एकत्र येऊया. आपापसातील मतभेद, मनभेद, वादविवाद, भांडणतंटे विसरुन राज्यासमोरचं प्रत्येक आव्हान एकजुटीनं, एकदिलानं परतवून लावण्याचा निर्धार करुया, असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.

ऐतिहासिक महाबोधीवृक्ष महोत्सवास शुभेच्छा

राज्य शासनाचा सामाजिक न्याय विभाग आणि नाशिकच्या शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने नाशिक येथील त्रिरश्मी बुद्ध लेण्यांच्या पायथ्याशी विजयादशमीदिवशी बोधीवृक्ष रोपण कार्यक्रम आणि ऐतिहासिक महाबोधीवृक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाबोधीवृक्ष महोत्सवास, तसंच यानिमित्तानं नाशिकला येणाऱ्या देशभरातील बुद्ध उपासक, अनुयायांनाही शुभेच्छा दिल्या आहेत.

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कामकाजाचा विभागीय आयुक्तांकडून आढावा

0
छत्रपती संभाजीनगर, दि. 3  (विमाका) :- विभागीय आयुक्त तथा छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आज छत्रपती संभाजीनगर महानगर...

१५ ऑगस्टपर्यंत सुनावण्यांची सर्व प्रकरणे ईक्युजे पोर्टलवर नोंदवा – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

0
छत्रपती संभाजीनगर, दि. ३  (विमाका) : विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर आयुक्त विजयसिंह देशमुख यांच्या संकल्पनेतून अर्धन्यायीक व सेवा विषयक प्रकरणांची...

शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मच्छिमार व मेंढपाळांच्या समस्या सोडविण्याबाबत सकारात्मक – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे 

0
मुंबई,दि.३: शेतकरी, शेतमजूर दिव्यांग, मच्छिमार व मेंढपाळांच्या समस्यासंदर्भात सकारात्मक  निर्णय घेण्यात येईल  असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. विधानभवन येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली विविध...

बेकायदेशीर ॲप आधारित बाईक टॅक्सीने प्रवासी वाहतूक करणाऱ्या सेवा कंपन्यांविरोधात कारवाईस सुरुवात

0
मुंबई, दि. ३ : महानगर क्षेत्रात रॅपिडो, उबेर व ओलाने बेकायदेशीर व परवाना न घेता बाईक टॅक्सीने प्रवासी वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रवासी वाहतुकीसाठी मोटार वाहन अधिनियम, १९८८ च्या कलम ९३...

राज्यातील एम.फिल अर्हताधारक प्राध्यापकांचा मार्ग मोकळा; पंचवीस वर्षापासून प्रलंबित प्रश्न निकाली

0
मुंबई, दि. ३ : राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयांतील एम.फिल अर्हताधारक असलेल्या अनेक प्राध्यापकांचा मागील पंचवीस वर्षापासून प्रलंबित प्रश्न निकाली लागला असून दीर्घकाळ सेवेत असूनही अनेक लाभांपासून वंचित असलेल्या १ हजार ४२१ प्राध्यापकांना...