शनिवार, जुलै 5, 2025
Home Blog Page 1076

कोल्हापूरचा ऐतिहासिक दसरा सोहळा दिमाखात साजरा

पालकमंत्री हसन मुश्रीफ व मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती

कोल्हापूर दि. 24 (जिमाका) : छत्रपतींची राजधानी असलेल्या करवीर नगरीत पारंपरिक विजयादशमीचा सोहळा ऐतिहासिक दसरा चौकात मावळतीच्या सुवर्णकिरणांच्या साक्षीने दिमाखात साजरा झाला.

कोल्हापूरच्या शाही दसऱ्याला यावर्षी महाराष्ट्र शासनाकडून राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून हा उत्सव जागतिक स्तरापर्यंत नेण्याचा मानस ठेवून 15 ते 24 ऑक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकाराने कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव यावर्षी भव्य स्वरुपात अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाला.

आज झालेल्या दसरा सोहळ्यामध्ये श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते शमीपूजन झाले. यानंतर छत्रपतींच्या कुटुंबातील युवराज संभाजीराजे छत्रपती, महाराज कुमार मालोजीराजे छत्रपती, यौवराज शहाजीराजे छत्रपती, श्रीमंत यशराजराजे छत्रपती यांनी सोने लुटताच करवीरवासियांनी अपूर्व उत्साहात सीमोल्लंघन करुन सोने लुटले.

तत्पूर्वी करवीर निवासिनी अंबाबाई, जुन्या राजवाड्यातील तुळजाभवानी व छत्रपती शिवाजी महाराज आणि गुरु महाराज यांच्या पालख्यांचे लवाजम्यासह आगमन झाले. यानंतर श्रीमंत शाहू महाराज छत्रपती व कुंटुंबातील सदस्यांचे परंपरागत पध्दतीने ऐतिहासिक मेबॅक मोटारीतून दसरा चौकात आगमन झाले. यावेळी पोलीस विभागाच्या बँड पथकाने करवीर संस्थानचे गीत वाजवून त्यांचे स्वागत केले. दसरा महोत्सव समितीच्यावतीने शाही कुटुंबातील सदस्यांचे स्वागत करण्यात आले. पारंपरिक पध्दतीने पुरोहितांच्या मंत्रोच्चारात विधीवत पूजा केल्यानंतर देवीची आरती करण्यात आली. यानंतर श्रीमंत शाहू महाराज यांनी सोने लुटल्यानंतर बंदुकीच्या फैरी झडताच उपस्थित नागरिकांनी उत्साहात सोने लुटले. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्यासह राजघराण्यातील सदस्यांना नागरिकांनी सोने व दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.

या सोहळयास पालकमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, पद्मश्री प्रतापसिंह जाधव, माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, आमदार जयश्री जाधव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. दिलीप पाटील -भुजबळ, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी.टी.शिर्के, संजय पाटील, योगेश जाधव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, दसरा महोत्सव समितीचे ऋतुराज इंगळे, विक्रमसिंह यादव, दिग्विजयराजे भोसले, बाबा चव्हाण, माणिक मंडलिक, राजेंद्र दळवी, ऍड.राजेंद्र चव्हाण, प्रसन्न मोहिते आदींसह विविध विभागांचे मान्यवर, जहागीरदार, सरदार, सरकार घराण्यातील मान्यवर, पदाधिकारी, पोलीस व विविध विभागांचे अधिकारी, आणि निमंत्रित उपस्थित होते.

भव्य मिरवणुकीने वेधून घेतले लक्ष- सजवलेले हत्ती, उंट, मावळ्यांच्या वेशभूषेतील घोडेस्वार, शिवकालीन युद्धकलांची व मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, धनगरी ढोल, महिलांचे लेझीम, रणमर्द मावळ्यांचे पथक, इतिहासाच्या स्मृती जागवणारे पोवाडे, पारंपरिक पद्धतीने निघालेल्या देवीच्या पालख्या अशा शाही लवाजम्यात निघालेल्या मिरवणुकीने उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. मिरवणुकीत तालमींचे कुस्तीगीर, खेळाडू सहभागी झाले होते. तर रस्त्याच्या दुतर्फा एनसीसी व स्काऊट गाईडच्या विद्यार्थिनी उभ्या होत्या. या मिरवणूकीचे नियोजन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या मार्गदर्शनाखाली दसरा नियोजन समिती सदस्य उदय गायकवाड, प्रमोद पाटील, प्राचार्य महादेव नरके, आदित्य बेडेकर, अजेय दळवी, ऋषिकेश केसकर, सुखदेव गिरी, वासिम सरकवास, आनंद काळे, जयदीप मोरे यांच्यासह अन्य सदस्यांनी केले.

नागरिकांना शाही दसरा महोत्सव सोहळा पाहता यावा यासाठी दसरा चौकात एलईडी स्क्रीन लावण्यात आल्या होत्या.

भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या २४ व्या गळीत हंगामाचा दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

पुणे, दि.२४ : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या २४ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. एफआरपी आणि साखरेचा दर ठरवतांना शेतकऱ्यांचे हित लक्षात घेतले जाईल, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या २४ व्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य विवेक वळसे पाटील, कारखान्याचे संचालक आदी उपस्थित होते.

भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे कामकाज उत्कृष्टपणे सुरू असून असेच पुढेही सातत्य कायम टिकवून ठेवावे असे सांगून श्री. वळसे पाटील म्हणाले, केंद्र शासनाच्या धोरणानुसार कारखान्यात इथेनॉल निर्मिती करण्यात येत आहे. इथेनॉल खरेदी करण्यासाठी दर निश्चिती केली असून त्यामुळे कारखान्यांना त्याचबरोबर शेतकऱ्यांना हमखास उत्पादन मिळेल. भीमाशंकर कारखान्यानेदेखील इथेनॉल प्रकल्प हाती घेतला आहे.

भीमाशंकर कारखान्याने असलेला चांगला ताळेबंद टिकवून ठेवावा. परिसरात गुळाचे गुऱ्हाळ असण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेतला जाईल. ऊसाच्या कमी उत्पादनामुळे यावर्षी ऊस कमी होण्याची शक्यता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. कारखान्याचे अधिकारी-कर्मचारी चांगले काम करीत असून त्यांच्या अडचणी असल्यास त्या संचालक मंडळापुढे मांडाव्यात, त्या सोडविल्या जातील, असेही श्री.वळसे पाटील म्हणाले.

कारखान्याची ऊस गाळप क्षमता पूर्वी ६ लाख टन इतकी होती. परंतू कारखान्याचा विस्तार केल्याने गेल्यावर्षी गाळप क्षमता ९ लाख टन झाली असून शेतकऱ्यांनाही चांगला दर देवू शकलो. ऊस पिकाचे उत्पादन वाढण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे मार्गदर्शन घेण्यात येते. त्याचा माध्यमातून शेतकऱ्यांना प्रशिक्षण मिळून फायदा होत आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगून एकरी शंभर टन ऊस पिकाचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

श्री. बेंडे म्हणाले, कारखान्याने वीज प्रकल्पातून ६ कोटी ८० लाख युनिट वीज निर्मिती केली. मागील वर्षी क्षमतेपेक्षा जास्त गाळप केले. यावर्षी १ नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या गाळप हंगामात नवे तंत्रज्ञान वापरून चांगल्या दर्जाची साखर निर्माण करणार आहोत. येत्या महिन्याभरात इथेनॉल निर्मितीला सुरूवात होणार आहे. शेवटच्या शेतकऱ्याचा ऊस तोडल्या शिवाय कारखाना बंद केला जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.

श्री. गावडे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी सहकार मंत्री श्री. वळसे पाटील यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदिपन व गव्हाण पूजन करण्यात आले. यानंतर गव्हाणात मोळी सोडून गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला.

महाराष्ट्राच्या सामाजिक ऐक्य, न्यायाचा लौकिक पुन्हा एकदा जगभर पोहचणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक, दिनांक 24 ऑक्टोबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा): नाशिकच्या पवित्र भूमीत बुध्द स्मारक परिसरात महाबोधिवृक्षाच्या रोपणातून आज आपण पुन्हा एकदा तथागतांच्या शांतीच्या शिकवणीची उजळणी करणार आहोत. हे रोपण पुढच्या कित्येक पिढ्या लक्षात ठेवतील. आजच्या या ऐतिहासिक महाबोधिवृक्ष रोपणातून महाराष्ट्राचा सामाजिक ऐक्याचा, सामाजिक न्यायाचा लौकीक पुन्हा एकदा जगभर पोहचेल, असा विश्वास  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. आज नाशिक येथील ऐतिहासिक आज  बुद्ध स्मारक, त्रिरश्मी बुद्ध लेणी येथे आयोजित ऐतिहासिक महाबोधिवृक्ष भव्य महोत्सव 2023  कार्यक्रम प्रसंगी दूरदृष्यप्रणलीद्वारे शुभेच्छा संदेश देतांना ते बोलत होते.

त्रिरश्मी बुद्धलेणी नाशिक येथे आज राज्य शासन व शांतदूत चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीलंकेतील महाबोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर श्रीलंका येथील बोधीवृक्षाचे प्रमुख पूज्यनीय हेमरत्न नायक थेरो,  श्रीलंकेचे केंद्रीय बुद्धा शासन धार्मिक आणि सांस्कृतिक कार्य मंत्री विदुर विक्रमनायके, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, पर्यटन, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, श्रीलंका येथील महिंदावस थेरो पूज्यनीय भिक्खू डॉ.वास्कडूवे, मलेशिया येथील महाथेरो संघराजा, पूज्यनीय भिक्खू सरणांकर, श्रीलंका येथील आनंदा नायके थेरो पूज्यनीय भिक्खू नाराणपणावे, पूज्यनीय भिक्खू डॉ.पोंचाय, महाराष्ट्र भिक्खू संघ सल्लागार प्रा.डॉ.भदन्त खेमधम्मो महास्थवीर,आमदार प्रा.देवयानी फरांदे, सीमा हिरे, सरोज आहिरे, राहुल ढिकले शांतीदूत चॅरिटेबल ट्रस्टचे पूज्य भिक्खू सुगत थेरो, पूज्य भिक्खू संघरत्न थेरो, जिल्हाधिकारी जलज शर्मा, प्रशासक तथा मनपा आयुक्त श्री.अशोक करंजकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल, बार्टीचे संचालक सुनिल वारे, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ,  समिती सदस्य आनंद सोनवणे, प्रकाश लोंढे  यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, बौद्ध अनुयायी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या संदेशात पुढे म्हणाले की, महाबोधीवृक्ष महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक न्याय विभागाचे कार्य कौतुकास्पद आहे. विजयादशमीच्या दिवशी आज अपूर्व असा योग जूळून आला आहे. भगवान बुद्धांचा हा शांतीचा आणि ज्ञानमार्गाचा संदेश घेऊनच भारताचे महान सुपुत्र महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक न्यायाची दिशा दाखवली. त्यांनी आजच्याच दिवशी नागपूरच्या दीक्षाभूमीवर हजारो अनुयायांना बुद्ध धर्माची दीक्षा दिली. हा भारतासाठीच नव्हे, तर जगासाठी सामाजिक न्यायाचा, सामाजिक क्रांतीचा दिवस होता. महाराष्ट्र ही पुरोगामी आणि समता-बंधुता आणि एकता या मुल्यांना आदर्श मानणारी भूमी आहे. संत-महंताची भूमी आहे. या संतानीही आम्हाला समतेचा वसा दिला आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांनी या भूमीला स्वाभिमानाचा मंत्र दिला. जाज्वल्य असा देशाभिमान, देव-धर्म आणि देवळांच्या रक्षणांचा धडा घालून दिला. महात्मा जोतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या थोर महाराष्ट्र सुपुत्रांनी महाराष्ट्राची जडण-घडण केली. सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर आणि अन्य राज्यांसाठी आदर्श म्हणून काम करतो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेला सामाजिक न्यायाची वाटच आमच्यासाठी आदर्श आहे, त्याच आदर्शांवर आमची वाटचाल सुरु असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या महोत्सवासाठी देशविदेशातून आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत करत सर्वांना शुभेच्छा दिल्या.

तथागत भगवान गौतम बुद्धांचे विचार जगासाठी नेहमीच प्रेरक – मंत्री छगन भुजबळ

कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष मंत्री छगन भुजबळ यावेळी म्हणाले, आज नाशिकच्या भूमीत या त्रिरश्मी बुद्ध लेणी येथील बुद्ध स्मारकाच्या परिसरात भगवान गौतम बुद्धाना ज्या महाबोधीवृक्षाच्या छायेत सिद्धी मिळाली, त्या महाबोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण होत आहे. आजचा हा क्षण अतिशय ऐतिहासिक आहे. आज विजयादशीच्या दिवसाचे औचित्य साधून  ऐतिहासिक महाबोधीवृक्ष महोत्सव साजरा होत आहे. व या सोहळ्यात भगवान गौतम बुद्धांच्या  विचारांचे सोने लुटण्यासाठी आज आपण येथे जमलेलो आहोत. या महाबोधीवृक्षामुळे नाशिकच्या इतिहासात मोलाची भर पडली आहे. जे जे चांगल, उदात्त आहेत.  ते नाशिक मध्ये येण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी 18 कोटींचा निधी तातडीने उपलब्ध करुन दिला.

श्रीलंकेतून बोधीवृक्ष येथे आणला ही श्रीलंकेची नाशिक आणि महाराष्ट्रासाठी मोठी भेट आहे  शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्धांचे मौलिक विचार जगासाठी आजही तितकेच प्रेरक असून तेच जगाला वाचवू शकतात. यामुळे या विचारांचा प्रसार आणि प्रचार होणे आवश्यक आहे, अशी भावना मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केली.

मंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले, सुमारे २६०० वर्षांपूर्वी, भारतातील बोधगया बिहार येथे निरंजना नदीच्या काठावर असलेल्या वृक्षाखाली भगवान गौतम बुद्ध यांना ज्ञान प्राप्त झाले. पुढे सम्राट अशोक यांनी आपल्या मुलांना श्रीलंकेत बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी पाठविले. तेव्हा अशोकांची कन्या संघमित्रा हिने या बोधिवृक्षाची एक फांदी श्रीलंकेत नेली व तेथील अनुराधापुरा येथे या फांदीचे रोपण केले. त्यानंतर हे झाड महाबोधी वृक्ष नावाने ओळखले जाते. तेव्हापासून बौद्ध भिक्षू आणि समर्पित राजांनी त्यांची काळजी घेतली आणि संरक्षित केली.आज या महाबोधी वृक्षाच्या फांदीचे आपल्या नाशिकमध्ये रोपण करण्यात येत आहे. ही नाशिककरांसाठी अतिशय महत्त्वाची बाब आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येवल्याच्या भूमीत बौध्द धर्म स्वीकारण्याचा निर्णय घोषित केला. आणि विजयादशमीच्या दिवशी नागपूर येथील दीक्षाभूमी येथे लाखो लोकांच्या उपस्थितीत धर्माचा स्वीकार केला. या वृक्षाच्या दर्शनासाठी देश- विदेशातील नागरिक येतील. या वृक्षाचे संगोपन आणि संरक्षण ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. ती आपण सर्व मिळूण पार पाडूया असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी केले.

भगवान बुद्धांच्या अष्टांगिक मार्गाचा स्वीकार करावा – केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार

भगवान बुद्धांचे ज्ञान व बोधीवृक्ष हे भारताच्या इतिहासाच्या शिरपेचात मानाचा तुरा म्हणता येईल. भगवान गौतम बुद्धांच्या अष्टांगिक मार्गाने जीवन सुखकर करता येत असल्याने या अष्टांगिक मार्गाचा अवलंब जीवनात करावा. तसेच महाबोधिवृक्षाच्या रोपणाने नाशिकमध्ये बुद्धांच्या ऊर्जादायी विचारांची सुरुवात या वृक्षारोपणच्या माध्यमातून झाली आहे, ही नाशिकसाठी गौरवाची बाब आहे, असेही त्या म्हणाल्या.

नाशिक जागतिक स्तरावर पर्यटन स्थळ म्हणून नावरूपास येणार – मंत्री गिरीश महाजन

ऐतिहासिक महाबोधीवृक्ष महोत्सव कार्यक्रमासाठी शासनाने भरीव निधीची तरतूद केली असून नाशिकच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा हा समारंभ आहे. यामुळे नाशिक जगाच्या नकाशावर पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास येणार आहेत असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास, पंचायत राज व पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

महाबोधी वृक्षामुळे नाशिकची वेगळी ओळख निर्माण होईल -पालकमंत्री दादाजी भुसे

सम्राट अशोक विजयादशमीच्या मुहूर्तावर महाराष्ट्रात नाशिकमध्येच श्रीलंकेतील अनुराधापुरच्या महाबोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण करण्यात आले आहे. या महाबोधीवृक्षामुळे  नाशिकची वेगळी ओळख निर्माण होणार असून ही आपल्या सर्व नाशिककरांसाठी अभिमानाची बाब आहे, असे गौरोवोद्गार राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केले. सर्व नाशिककरांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.

बोधीवृक्षाच्या माध्यमातून भारत आणि श्रीलंकेचे ऋणानुबंध दृढ होणार – विदुर विक्रमनायके

श्रीलंकेचे केंद्रीय बुद्धा शासन धार्मिक आणि सांस्कृतिक कार्य मंत्री विदुर विक्रमनायके यावेळी बोलतांना म्हणाले, जास्त बोललो तर जास्त चुका होतात. कमी बोललो तर कमी चुका होतात.  काही बोललोच नाही तर चुकाच होत नाहीत. 2300 वर्षापूर्वी भारतातूनच बोधीवृक्ष श्रीलंकेत नेण्यात आला. आता तो पुन्हा या निमित्ताने भारतात आणण्यात आला आहे. बोधीवृक्ष संस्कृती आणि परंपरेच प्रतीक आहेत. मानवी जीवनात मनाने मनाशी साधलेला संवाद हा महत्त्वाचा आहे. बोधीवृक्ष शांततेच प्रतीक आहे. या कार्यक्रमामुळे अनुराधापुर आणि नाशिक बरोबरच भारत आणि श्रीलंकेचे ऋणानुबंध अधिक दृढ होईल यात शंका नाही. या क्षणाचा साक्षीदार होण्याची संधी मिळाल्याने मनस्वी आभार त्यांनी यावेळी व्यक्त केले.

महाबोधीवृक्षाचे रोपण व कोनशिलेचे अनावरण

कार्यक्रमापूर्वी श्रीलंका येथील अनुराधापूर येथून आणलेल्या महाबोधीवृक्षाच्या फांदीची त्रिरश्मी बुद्ध लेणी स्‍मारकाच्या प्रवेशद्वारपासून भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी मिरवणूकीत शांतीदूत चॅरिटेबल ट्रस्टचे पूज्य भिक्खू सुगत थेरो, पूज्य भिक्खू संघरत्न थेरो व देशविदेशातून भिख्यु मोठ्या संख्येने सहभागी झाले. शांततेचे प्रतीक म्हणून दोन्ही देशातील मंत्री महोदयांनी तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती देवून एकमेकांना गौरविण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात येऊन स्तुपात जाऊन भगवान बुद्धांना वंदन करण्यात आले. त्यानंतर श्रीलंकेतील बोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण करण्यात येऊन  कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शांतीदूत चॅरिटेबल ट्रस्टचे भिक्खू सुगत थेरो यांनी केले. तर आभार भिक्खू संघरत्न थेरो यांनी मानले.

 

पतसंस्थांनी विश्वासार्हता जपण्याचे काम करावे – सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील

पुणे, दि.२४ : सहकार क्षेत्रात पतसंस्थांनी पारदर्शक कारभार करून विश्वासार्हता जपण्याचे काम करावे आणि ग्राहकांचा विश्वास संपादन करावा, असे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.

घोडेगाव येथे श्री संत सावता महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने सोमवारी सायंकाळी आयोजित सावित्रीबाई फुले कन्या दत्तक पालक योजनेअंतर्गत १०१ मुलींना शालेयपयोगी साहित्याचे वितरण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी तहसीलदार संजय नागटिळक, सहाय्यक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी,गट विकास अधिकारी वाळूंज,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम भास्कर,
विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक यशराज काळे, सरपंच अश्विनी तिटकारे, पंचायत समितीचे माजी सभापती सखाराम घोडेकर आदी उपस्थित होते.

श्री. वळसे पाटील म्हणाले, सहकारामध्ये विविध संस्था, बँका चुकीच्या कारभारामुळे अडचणीत आल्याने त्याचा फटका सर्वसामान्यांना बसतो. संस्थांमधील असलेला पैसा हा जनतेचा असून आपण फक्त त्याचे विश्वस्त आहोत याचे भान ठेवुन संस्थाचालकांनी विश्वस्तांच्या भूमिकेने काम करावे, असेही श्री. वळसे पाटील म्हणाले.

संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष भास्कर यांनी प्रास्ताविक केले. घोडेगावच्या माजी सरपंच क्रांती गाढवे यांनी आपले विचार व्यक्त केले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा कुपवाडा (जम्मू काश्मीर) येथे उभारण्यासाठी राजधानीतून रवाना

नवी दिल्ली, दि. २३ : जम्मू आणि काश्मीर सीमेवरील कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार असून हा पुतळा राजधानीतील महाराष्ट्र सदनातून निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग यांच्या हस्ते कुपवाडाकडे आज सकाळी रवाना करण्यात आला.

राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा समारंभपूर्वक कुपवाडा येथे 20 ऑक्टोबर 2023 रोजी मुंबई येथून रवाना करण्यात आला होता. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, संस्थेचे विश्वस्त अभयसिंह शिरोळे, अध्यक्ष हेमंत जाधव उपस्थित होते.

हा पुतळा दिल्लीहून रवाना होण्यापूर्वी दिल्ली मराठी प्रतिष्ठानतर्फे येथील महाराष्ट्र सदनात  काल उशीरा रात्री  एक लहान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी प्रतिष्ठानतर्फे  निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रूपिंदर सिंग, सहाय्यक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावर,  मेजर जनरल सुजित पाटील, ‘आम्ही पुणेकर’ संस्थेचे विश्वस्त अभयसिंह शिरोळे, अध्यक्ष हेमंत जाधव यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या सोहळ्यास दिल्लीतील मराठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजभवनातून रवाना होणारा छत्रपतींचा हा पुतळा बडोदा, दिल्लीमार्गे रस्त्याने प्रवास करून साधारणत: दहा ते बारा दिवसात कुपवाडा येथे पोहोचेल.

‘आम्ही पुणेकर’ या संस्थेच्यावतीने जम्मू काश्मीर मधील कुपवाडा येथे भारत पाक सीमेवर मराठ्यांच्या पराक्रमाची माहिती देण्यासाठी छत्रपती शिवरायांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. ‘आम्ही पुणेकर फाउंडेशन’ व ‘छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती यांच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेला हा पुतळा कुपवाडा येथील मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटला स्थापनेसाठी देण्यात येणार आहे. भारतीय सैन्याच्या छावणीत उभारण्यात येणारा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा साडे दहा फुट उंचीचा असून जमिनीपासून जवळपास तितक्याच उंचीच्या आणि ७ x ३ या आकाराच्या चौथऱ्यावर उभारण्यात येणार आहे. कुपवाडा येथील भारतीय सैन्याच्या छावणीत या पुतळ्याच्या स्थानाचे भूमीपूजन भारतीय सेनेच्या राष्ट्रीय रायफल्स च्या ४१ व्या बटालीयनचे (मराठा लाईट इन्फ्रंटरी) कमांडिंग ऑफीसर कर्नल नवलगट्टी आणि छत्रपती शिवाजी स्मारक समितीचे अध्यक्ष अभयराज शिरोळे यांच्या हस्ते दि. २० मार्च २०२३ रोजी झाले. नवीन तंत्रज्ञानाने बनविलेला छत्रपतींचा हा पुतळा जम्मू काश्मीर मधील प्रतिकूल हवामानात दीर्घकाळ तग धरेल असा बनवला गेला आहे.

‘आम्ही पुणेकर’ या संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव यांनी माहिती देताना सांगितले की, परिस्थिती अनुकूल असल्यास संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 7 नोव्हेंबर रोजी पुतळ्याचे अनावरण करण्यात येईल.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पलला भेट

नागपूर, दि.  २४ : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे भेट दिली.  यावेळी त्यांनी तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती आणि प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

दीक्षाभूमी व ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे येणाऱ्या सर्व अनुयायांचे स्वागत करीत उपमुख्यमंत्री महोदयांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. ड्रॅगन पॅलेस टेम्पलमुळे कामठी हे शहर जगाच्या नकाशावर आले असल्याचे यावेळी ते म्हणाले.

आ. चंद्रशेखर बावनकुळे, आ. टेकचंद सावरकर, ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा ॲड. सुलेखा कुंभारे यांच्यासह मोठ्या संख्येने अनुयायी यावेळी उपस्थित होते.

000

सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते मंचर येथे सी.टी.स्कॅन तपासणी केंद्राचे उद्घाटन

पुणे, दि. २४ : सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते उप जिल्हा रुग्णालय मंचर येथे अत्याधुनिक सी.टी.स्कॅन तपासणी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी तहसीलदार संजय नागटिळक, गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज, उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवाजीराव जाधव, रुग्ण कल्याण समिती सदस्य डी.के.वळसे पाटील, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, कृष्णा डायग्नोस्टिक केंद्राचे डॉ. परीमल सावंत, डॉ. संजयकुमार भवारी आदी उपस्थित होते.

श्री. वळसे पाटील म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांना लाभ व्हावा यासाठी या तपासणी केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. येथे उपजिल्हा रुग्णालयातील रुग्ण तसेच बाह्य रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच दुर्धर आजाराची पूर्व तपासणी केली जाणार आहे. गरजू नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

सार्वजनिक आरोग्य विभाग व क्रस्ना डायग्नोस्टिक सेंटर यांच्या संयुक्त विद्यामाने सार्वजनिक खासगी तत्वावर या सीटी स्कॅन तपासणी केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. सी.टी.स्कॅन केंद्राचा या परिसरातील नागरिकांना लाभ होणार आहे, असेही श्री. वळसे-पाटील म्हणाले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. जाधव यांनी केले.

‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ बाबत बाईक रॅलीमधून जनजागृती होईल – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे प्रतिपादन

मुंबई दि. २४ : यशस्विनी बाईक रॅलीच्या माध्यमातून ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानबाबत जनजागृती करण्याचे कार्य होत असल्याचे प्रतिपादन महिला व बाल विकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज येथे केले.

‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) यांच्या यशस्व‍िनी बाईक रॅलीस महिला व बाल विकास मंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते झेंडा दाखूवन पुढील त्यांना प्रवासास शुभेच्छा देण्यात आल्या. त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी केंद्रीय राखीव पोलिस दलाचे महानिरीक्षक पी.रणपिसे, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रुबल अग्रवाल, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर आदी उपस्थित होते.

‘बेटी बचाव बेटी पढाओ’ हा संदेश घेऊन केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) च्या 75 महिला जवान 15 राज्यामधून आणि 2 केंद्रशासित प्रदेशातील 121 जिल्ह्यातून अंदाजे 10 हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. 3 ते 31 ऑक्टोबर 2023 या कालावधीत या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीनगर, शिलाँग, कन्याकुमारी ते एकतानगर गुजरात असा प्रवास या रॅलीच्या माध्यामातून होणार आहे.

या रॅलीचे महाराष्ट्र राज्यात सोलापूर येथे आगमन झाले. मुंबई येथे ही रॅली आली आहे. पुढील प्रवास करण्यासाठी शुभेच्छा देण्याकरिता गेट वे ऑफ इंडिया येथे केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) आणि माहिला व बाल विकास विभागांतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी महिला व बाल विकास विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेंतर्गत कु.जीविका यादव, कु. युक्ता कांबळे (चेंबूर), कु.कस्तुरी देसाई (प्रभादेवी), कु. इशान्वी गुंडाळे (भायखळा) आणि कु. ज्ञानदा तेरवणकर यांना प्रातिनिधीक स्वरुपात धनादेशाचे वाटप माहिला व बाल विकास मंत्री कु. आदिती तटकरे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

प्रास्ताविक केंद्रीय राखीव पोलिस दलाचे महानिरीक्षक पी.रणपिसे यांनी तर सूत्रसंचालन जाई वैशंपायन यांनी केले. यावेळी केंद्रीय राखीव पोलिस दलातील पुरुष व माहिला जवान यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले.

000

आपला इतिहास इतरांच्या संदर्भावरून नको – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर दि. २३ : आमच्या समृद्ध परंपरेची नोंद असणाऱ्या नालंदा विद्यापीठाला आग लागली. त्यामुळे भारताचा इतिहास लिहिताना विदेशी प्रवाशांच्या संदर्भाची आम्हाला मदत घ्यावी लागते. त्यामुळे आपला इतिहास इतरांच्या संदर्भावर नको. त्यासाठी आपले दस्तऐवजीकरण जितके होईल तितके केले पाहिजे. भारतीयांनी ती सवय लावली पाहिजे, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केली.

 

लोकमत टाइम्स या वृत्तपत्राच्या ‘आयकॉन ऑफ सेंट्रल इंडिया’ कॉफी टेबल बुकच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मध्य भारतातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रातील ५२ कर्तृत्ववान व्यक्तींची यशोगाथा असणाऱ्या कॉफी टेबल बुक’चे सोमवारी त्यांच्या हस्ते लोकार्पण झाले.

कार्यक्रमाला ‘लोकमत वृत्तपत्र समूहा’च्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार डॉ. विजय दर्डा, प्रसिद्ध उद्योजक व कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया लिमिटेडचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक नितीन खारा, ‘लोकमत’चे संपादक श्रीमंत माने, ‘लोकमत समाचार’चे वरिष्ठ संपादक विकास मिश्र, ‘लोकमत टाईम्स’चे सल्लागार संपादक पंकज माणिकतला, लोकमतचे संचालक अशोक जैन,आशिष जैन, आसमान शेठ आदी उपस्थित होते.

इंग्रजांनी त्यांच्या कार्यकाळात लहान-लहान गोष्टींचे डॉक्युमेंटेशन केले. त्यातूनच इतिहास लिहिला गेला. मात्र, आपला भूतकाळ वैभवशाली असूनदेखील आपल्याला युरोप व चीनच्या प्रवाशांनी लिहिलेला इतिहास शिकवावा लागतो. देश प्रगतिपथावर नेताना समाजातील सकारात्मक बाबींचे दस्तऐवजीकरण आवश्यकच आहे, त्यातून इतरांना प्रेरणा मिळते.

समाजातील अनेक लोक वेगवेगळ्या क्षेत्रात लक्षवेधी काम करतात. मात्र, हे कार्य अनेकदा त्या क्षेत्रापुरते किंवा काही लोकांपुरते मर्यादित राहते.समाजातील सर्व क्षेत्रातील कार्य सर्वापुढे आले पाहिजे. छोट्या छोटया प्रयत्नातूनच परिवर्तन घडत असते. परिवर्तनाचे हे साहित्य दस्तऐवजीकरणातून समाजापर्यंत पोहोचते. अशा लहान प्रयत्नांतूनच देश मोठा होतो, असे फडणवीस म्हणाले.

नागपूर, इंग्रज काळापासून मध्य भारताचे महत्त्वाचे केंद्र होते. नागपूरने सामाजिक, राजकीय, क्रीडा, कला, विज्ञान व सर्व क्षेत्रांमध्ये नवनवीन आयकॉन दिले आहेत. मध्यभारतातील गुणवान लोकांचे हे दस्तऐवजीकरण या कॉफी टेबल बुकच्या माध्यमातून होत आहे. त्यासाठी या वृत्तपत्राचे कौतुक केले पाहिजे, असेही ते म्हणाले.

यावेळी सुप्रसिद्ध उद्योजक नितीन खारा यांनी देखील संबोधित केले तर या कार्यक्रमामागील भूमिका विजय दर्डा यांनी मांडली. तर प्रास्ताविक आस्मान शेठ यांनी केले.

०००

महाराष्ट्राला तिरंदाजीची भूमी बनवूया – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर दि. २३ : महाराष्ट्राच्या क्रीडापटूंनी तिरंदाजी या क्रीडा प्रकारात सातत्य दाखविले असून याची दखल राज्य शासनाने घेतली आहे. महाराष्ट्रात या क्रीडा प्रकारासाठी जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करण्यास शासन कटीबद्ध आहे. राज्याला तिरंदाजीची भूमी बनविण्याचा आमचा प्रयत्न आहे,असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

आशियाई क्रीडा स्पर्धेत तीन सुवर्णपदक जिंकणाऱ्या ओजस देवतळे या नागपूरकर तिरंदाजाच्या घरी जाऊन त्याचे कौतुक करणार असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे आई-वडिलांशी बोलताना स्पष्ट केले होते. आज आपल्या व्यस्त कार्यक्रमात त्यांनी ओजसच्या घरी जाऊन त्याच्याशी हितगूज साधले. यावेळी आशियाई स्पर्धेत ओजससोबत सुवर्णपदक पटकवणारा अमरावतीचा  तुषार शेळके, साताऱ्याची आदिती स्वामी हे तिरंदाजही तसेच ओजसचे क्रीडा मार्गदर्शक प्रवीण सावंतही उपस्थित होते.

उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी तीनही खेळाडूंना त्यांच्या आशियाई स्पर्धेतील अनुभवाविषयी विचारले. याशिवाय राज्य शासनाकडून खेळाडूंची काय अपेक्षा आहे हे देखील जाणून घेतले. ओजसने नागपूरमध्ये आणखी सुविधा निर्माण करण्याची मागणी केली. तर आदिती व तुषार शेळके यांनीही प्रत्येक शहरांमध्ये ही सुविधा उपलब्ध व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावर उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले की,  नागपूर शहरामध्ये मानकापूर विभागीय क्रीडा संकुल तसेच जिल्हा क्रीडा संकुल (कामठी ) नागपूर येथे तिरंदाजी या क्रीडा प्रकारासाठी जागतिक दर्जाच्या सोयी सवलती उपलब्ध होण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. राज्याच्या अन्य भागातही तिरंदाज तयार व्हावेत. यासाठी चांगल्या सुविधा दिल्या जातील. यापूर्वीही अनेक खेळाडूंनी तिरंदाजी या प्रकारामध्ये चांगले यश दाखविले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील तिरंदाजांसाठी चांगल्या सुविधांची उपलब्धता करणे राज्य शासनाची प्राथमिकता आहे. महाराष्ट्राला तिरंदाजीमध्ये अग्रेसर करण्याकडे आमचा कल आहे,असेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्य सरकारने आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पदक मिळवणाऱ्या खेळाडूंच्या बक्षिसाच्या रकमेमध्ये दहापट वाढ केल्याबद्दल या तीनही खेळाडूंनी उपमुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त केले.

उपमुख्यमंत्र्यांनी रक्कम वाढविण्याचे श्रेय खेळाडूंना दिले. ते म्हणाले, खरे म्हणजे तुमच्या पराक्रमाने आमचा हुरुप वाढतो. तुम्ही पदकं मिळवत राहावे, आम्ही सुविधा उपलब्ध करू. महाराष्ट्राचे नाव आपण मोठे करावे, देशाचे नाव आपण मोठे करावे.

उपमुख्यमंत्र्यांनी या भेटीदरम्यान पुन्हा एकदा त्यांनी ओजसच्या आई-वडिलांचे कौतुक केले. ओजसने नागपूरचे व महाराष्ट्राचे नाव मोठे केल्याबद्दल त्यांचेही कौतुक केले. ओजसच्या परिवारातील अनेक सदस्यासह  जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक व क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

०००

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना आवश्यक सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील : कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

0
नाशिक, दि. 4 जुलै, 2025 (जिमाका वृत्तसेवा): रस्ते वीज व पाणी या शेतकऱ्याच्या मूलभूत गरजा असून पूर्ण करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना आवश्यक उपलब्ध करून देण्यासाठी...

कामात कुचराई करणाऱ्यांची गय न करता शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्य सेवा पुरवा – केंद्रीय आरोग्य...

0
बुलढाणा,दि. 4 (जिमाका) : सर्वसामान्य गोरगरीब जनतेपर्यत आरोग्य सेवा सहज ,सुलभ आणि माफक दरात पोहचविण्याचा केंद्र सरकारचा हेतू आहे . हा हेतू साध्य करण्यासाठी आणि...

‘माये’चं दूध… नवजातांसाठी संजीवनी!

0
जळगावच्या 'ह्युमन मिल्क बँके'तून २०००हून अधिक बाळांना मिळाला जीवनदायी आधार आईपण म्हणजे माया, वात्सल्य आणि त्याग. पण काही वेळा ही आई काही कारणांमुळे बाळाला दूध...

बॉम्बे बार असोसिएशनतर्फे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार

0
मुंबई, दि. ४ : मुंबई उच्च न्यायालयाची ही इमारत, बॉम्बे बार असोसिएशन आणि इथल्या माझ्या सहकाऱ्यांनी मला घडवलं. आज जे काही आहे ते या...

जीएसटी उत्पन्न विश्लेषणासाठी मंत्रिगटाची पहिली बैठक

0
नवी दिल्ली, दि. 4 : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिगटाची (GoM) वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) उत्पन्नाच्या विश्लेषणासाठी पहिली बैठक महाराष्ट्र सदन,...