शनिवार, जुलै 5, 2025
Home Blog Page 1071

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कामगार पुरस्कारांचे सोमवारी मुंबईत वितरण

       मुंबई, दि. २७ : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे कामगार मित्र पुरस्कार, कामगार भूषण पुरस्कार आणि विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्काराचे ३० ऑक्टोबरला होणार आहे. हे पुरस्कार सन २०२१-२२ या वर्षासाठी आहेत. मंडळाच्या हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, प्रभादेवी, मुंबई येथे सायंकाळी ५ वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा होईल.

राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, कामगार मंत्री सुरेश खाडे, शालेय शिक्षण आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री तसेच मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा होईल. मुंबई शहर व जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, कामगार आयुक्त सतीश देशमुख, विकास आयुक्त  डॉ. एच. पी. तुम्मोड, कल्याण आयुक्त रविराज इळवे आदी उपस्थित राहतील.

रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे कामगार मित्र पुरस्काराने भारतीय मजदूर संघ, महाराष्ट्र प्रदेश यांना गौरविण्यात येणार आहे. कामगार भूषण पुरस्कार टाटा मोटर्स लि.पिंपरी पुणे येथे इलेक्ट्रीशियन पदावर कार्यरत मोहन गोपाळ गायकवाड यांना प्रदान करण्यात येईल, तसेच 51 कामगारांचा विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. या सोहळ्याचे मंडळाच्या www.public.mlwb.in  या संकेतस्थळावर तसेच mahakalyan या यु ट्यूब चॅनलवर थेट प्रसारण होणार आहे.

कामगार मित्र पुरस्कारासाठी भारतीय मजदूर संघाची निवड

रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे कामगार मित्र पुरस्कार सन 2021 करिता भारतीय मजदूर संघ, महाराष्ट्र प्रदेश यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यात आलेली कामे विचारात घेऊन या पुरस्कारासाठी संस्थेची निवड करण्यात आली आहे. अॅड.अनिल ढुमणे हे भारतीय मजदूर संघ, महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्षपदी कार्यरत आहेत. कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे यांच्याकडून संस्थेचे नाव जाहीर करण्यात आले आहे.

कामगारांच्या कल्याणासाठी किमान २५ वर्षे समर्पित वृत्तीने कार्य करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांना सन २००० पासून या पुरस्काराने गौरविले जाते. रुपये ७५ हजार, स्मृतीचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. यापूर्वी टाटा इंजिनिअरिंग लोकोमोटिव्ह कंपनी लि. पिंपरी पुणे, राष्ट्रीय मिल मजदूर संघ नागपूर, वनाज इंजिनिअरिंग पुणे, बजाज ऑटो लि.पुणे, घरडा केमिकल्स लि. लोटे (रत्नागिरी), मनुग्राफ इंडिया लि.शिरोली, कोल्हापूर, हाफकीन जीव-औषध निर्माण महामंडळ (मर्या,) मुंबई या संस्थांना देण्यात आला आहे.

कामगार भूषण पुरस्कार

गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार्थींनी पुढील आयुष्यात अधिक जोमाने कार्य सुरू ठेवावे, या उद्देशाने हा पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचे स्वरुप रुपये ५० हजार स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे  आहे.

विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार हा कंपनी, आस्थापनेत काम करतानाच सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य, शैक्षणिक, क्रीडा, संघटन अशा विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या कामगारांना मंडळाकडून सन १९७९ पासून गुणवंत कामगार कल्याण पुरस्काराने गौरविण्यात येत आहे. सन २०२३ पासून हा पुरस्कार विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार या नावाने प्रदान करण्यात येत आहे. मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या आस्थापनांमध्ये किमान ५ वर्षे सेवा पूर्ण झालेल्या कामगारास या पुरस्कारासाठी अर्ज करता येतो. पुरस्काराचे स्वरुप रुपये २५ हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे आहे.

हा पुरस्कार आतापर्यंत डॉ. बाबा आढाव, राजा कुलकर्णी, मोहन कोतवाल, एस.आर.कुलकर्णी, डॉ.शांती पटेल, यशवंत चव्हाण, दादा सामंत, शरद राव या व्यक्तींना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

०००

मनीषा सावळे/विसंअ/

मातृभूमीविषयी प्रेम आणि संस्कृतीविषयी आदर महत्त्वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. २७ :  सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून केंद्र सरकार आणि राज्य शासन काम करीत आहे, यामागे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आहे. पायाभूत सुविधा, इमारती, मोठे प्रकल्प, भौतिक सुविधा याबरोबरच आपल्या मातृभूमीविषयी प्रेम, संस्कृतीविषयी आदर तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळेच ‘माझी माती माझा देश अभियान’ हे देशासाठी शहीद होणाऱ्या वीरांच्या त्यागाला, बलिदानाला नमन करण्याची प्रेरणा देणारा कार्यक्रम आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता सोहळ्यानिमित्त ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’अभियान राबविण्यात येत आहे. ऑगस्ट क्रांती मैदान येथे  या अभियानांतर्गत ‘अमृत कलश यात्रा’ राज्यस्तरीय सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता, नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार रमेश पाटील, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव के. गोविंदराज, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, नेहरू युवा केंद्राचे राज्य समन्वयक राजेंद्र मालुरे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, ऑगस्ट क्रांती मैदान हे ऐतिहासिक मैदान आहे. ‘भारत छोडो’ चा नारा येथून देशभर गेला. ९ ऑगस्ट रोजी ‘माझी माती माझा देश’ उपक्रमाची सुरुवात याच मैदानातून केली. राष्ट्रभक्ती, देशभक्ती वाढीस लावणारा ‘माझी माती माझा देश’ कार्यक्रम आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन राज्य शासन काम करीत आहोत. परकीय गुंतवणूक, पायाभूत सुविधा यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. देशाची अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर तिसऱ्या क्रमांकावर झेप घेत असताना त्यात महाराष्ट्राची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आपले राज्य हे देशाचे ग्रोथ इंजिन असल्याचे यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

गावागावांतून एकत्र केलेली माती या अमृतकलशांच्या माध्यमातून आज मुंबई येथे आणण्यात आली आहे. या अमृत कलशांचे स्वागत करुन सर्वांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. अमृत कलश नवी दिल्लीत अमृत वाटिकेत नेले जातील. देशभरातून आणलेली माती या ठिकाणी एकत्रित केली जाईल. खऱ्या अर्थाने एकात्मतेचं दर्शन येथे होईल.  सांस्कृतिक कार्य विभागाने उत्तम नियोजन केले असून या विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे याबाबत निश्चितच कौतुक आहे. याशिवाय, नागरी क्षेत्रात मुंबई महानगरपालिका आणि इतर नागरी संस्थांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नमूद केले.

आपण शिवराज्याभिषेक दिनाचे ३५० वे वर्षे साजरे केले. लवकरच शिवकालीन वाघनखे आपण राज्यात आणत आहोत. संस्कृती, परंपरा जोपासण्याचा आपला प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, स्वातंत्र्याचा अमृत कलश शहिदांनी, शूर वीरांनी आपल्या हाती दिला. हा कलश सुराज्याचा करायचा आहे. आपल्या राज्याप्रती, देशाप्रती प्रत्येकाने योगदान देण्याची ही वेळ आहे. सामान्यांचे हीत जपून काम करणारे प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री आपल्याला लाभले आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. चहल यांनी मनोगत व्यक्त केले. अभियानांतर्गत महानगरपालिका क्षेत्रात राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती यावेळी त्यांनी दिली.

प्रास्ताविक श्री. खारगे यांनी केले. देशासाठी बलिदान देणाऱ्या शहिदांचे स्मरण आपण करत आहोत. सर्व गावे आणि शहरात आपण विविध उपक्रम राबविले. आपले राज्य देशात आघाडीवर आहे.अमृत कलश यात्रेसाठी राज्यातून ४१४ कलश आणि त्यासोबत जवळपास ९०० स्वयंसेवक दिल्ली येथे जात आहेत. त्यासाठी विशेष रेल्वेची सोय केली असल्याची माहिती त्यांनी दिली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला भैरी भवानी परफॉर्मिग ग्रुपने देशभक्तीपर विविध गीत-नृत्याचे कार्यक्रम सादर केले. आभार नगरविकास विभागाचे प्रधान सचिव के. गोविंदराज यांनी मानले.

 

000

दीपक चव्हाण/विसंअ/

बबनराव ढाकणे यांचे संघर्षमय जीवन प्रेरणादायी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            मुंबई, दि. 27 :- सर्वसामान्यांसाठी जनकैवारी म्हणून परिचित असणारे, लोकहिताकरिता संघर्षासाठी सदैव सज्ज असणारे नेतृत्व माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत वेदनादायी आहे, अशा भावना व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

            शोकसंदेशात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, “विद्यार्थी चळवळीतून आपल्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीस सुरुवात करीत त्यांनी राज्याच्या व देशाच्या राजकारणात आपले वेगळे स्थान निर्माण केले. गोवा मुक्तीसंग्रामातील त्यांचे योगदान अतुलनीय आहे. एक संघर्षशील आणि आक्रमक राजकीय नेता म्हणून त्यांची ओळख होती. ऊसतोडणी कामगारांचे नेते म्हणून त्यांनी कामगारांचे प्रश्न हिरीरीने मांडले. बाजार समितीच्या माध्यमातून राजकीय कारकीर्दीला प्रारंभ करून थेट केंद्रीय मंत्री पदापर्यंत मजल मारली”.

            “जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर, विशेषतः दुष्काळावरील उपाययोजनांसाठी त्यांनी केलेला संघर्ष हा राजकारण आणि समाजकारणात येणाऱ्या पुढील पिढीसाठी निश्चितच मार्गदर्शक राहील. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रातील मार्गदर्शक व्यक्त‍िमत्वास मुकलो आहोत. या कठीण प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो तसेच त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, हीच परमेश्वरा चरणी प्रार्थना”, या भावनांसह मुख्यमंत्र्यांनी माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

            माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले आहेत.

००००

गावकारागिरांना उभारी देणारी विश्वकर्मा योजना…!!

भारतीय ग्राम व्यवस्थेत खेडी स्वयंपूर्ण होती. कारण गावातल्या गरजा गावातच भागविल्या जात होत्या. त्यासाठी गावकारागीर असतं त्याला बारा बलुतेदार म्हणून ओळखले जात होते. काळानुरूप मोठे बदल झाले गावातली ही कारागीर मंडळी मागे पडली, मोठ्या प्रमाणात व्यवसायात तांत्रिकता आली. आता मात्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या 73 व्या वाढदिवसानिमित्त देशवासीयांना मोठी भेट दिली. त्यांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू केली आहे. नेमकी ही योजना काय आहे यावर टाकलेला हा प्रकाश…!!

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही पारंपरिक कौशल्ये असलेल्या लोकांना त्यांचा व्यवसाय उभारण्यास मदत करेल. या योजनेत लोकांना केवळ कर्जच मिळणार नाही तर कौशल्य प्रशिक्षणही मिळणार आहे. लोहार, सोनार, कुंभार, सुतार आणि मोची यांसारख्या पारंपरिक कौशल्ये असलेल्या लोकांना प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ मिळेल. अशा १८पारंपरिक कामांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. या योजनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

तीन लाखांचे कर्ज मिळेल

जर व्यक्तीकडे पारंपरिक कौशल्य असेल तर पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्जाची सुविधा उपलब्ध असेल. या योजनेअंतर्गत ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. पहिल्या टप्प्यात व्यवसाय सुरू करण्यासाठी १ लाख रुपयांचे कर्ज दिले जाते. यानंतर व्यवसाय विस्तारासाठी दुसऱ्या टप्प्यात २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध आहे. हे कर्ज फक्त ५ टक्के व्याजदराने मिळेल.

कौशल्य प्रशिक्षण

या योजनेत १८ पारंपरिक कामांचा समावेश करण्यात आला आहे. या १८ ट्रेडमध्ये लोकांना प्रशिक्षण देण्यासाठी मास्टर ट्रेनर्सच्या माध्यमातून प्रशिक्षणही दिले जाणार आहे. तुम्हाला दररोज ५००/- रुपये स्टायपेंड देखील मिळेल. याशिवाय पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र, ओळखपत्र, मूलभूत आणि प्रगत प्रशिक्षणाशी संबंधित कौशल्य अपग्रेड, १५,०००/- रुपयांचे टूलकिट प्रोत्साहन, डिजिटल व्यवहारांसाठी प्रोत्साहन देखील दिले जाईल.

अशी लागेल पात्रता

  1. भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
  2. योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या 18 व्यापारांपैकी कोणत्याही एकाशी संबंधित असणे आवश्यक.
  3. वय 18 वर्षांपेक्षा जास्त आणि 50 वर्षांपेक्षा कमी असावे.
  4. मान्यताप्राप्त संस्थेचे संबंधित ट्रेडचे प्रमाणपत्र असावे.
  5. योजनेत समाविष्ट केलेल्या 140 जातींपैकी कोणत्याही एका जातीचा असावा.

अशी लागतील कागदपत्रे

योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीकडे आधार, पॅन, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, ओळखपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, बँक पासबुक आणि मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे.

अर्ज कसा करायचा

  1. सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट pmvishwakarma.gov.in वर जा.
  2. येथे Apply Online लिंकवर क्लिक करा.
  3. पीएम विश्वकर्मा योजनेत नोंदणी करा.
  4. नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तुमच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे येईल.
  5. यानंतर, नोंदणी फॉर्म पूर्णपणे वाचा आणि तो पूर्णपणे भरा.
  6. भरलेल्या फॉर्मसह सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करा आणि अपलोड करावे.

या विश्वकर्मा योजनेतून अधिकाधिक लोकांना आपल्या व्यवसायात गतिशीलता आणण्यासाठी मदत होणार आहे. व्यवसायाला  लागणाऱ्या अत्याधुनिक मशीन त्याअनुषंगाने लागणाऱ्या गोष्टी यातून करता येणार आहेत. ही नवी उभारी घेण्यासाठी एक उत्तम पर्याय सरकारने निर्माण करून दिला आहे. त्यासाठी तात्काळ नोंदणी करा, यासाठी योजनेसाठी जिल्हा स्तरावर श्री. चिंतामणी गुट्टे, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांची नियुक्तीही केली आहे.त्यांचा संपर्क क्रमांक : मो. 9421859777, कार्यालय : 02382-220144 तसेच सुविधा केंद्राचे राहुल राऊत संपर्क क्रमांक : 9545226622  आपणास अधिक विचारपूस करायची असेल तर वरील क्रमांकावर करता येईल. अधिकाधिक लोकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांनी केलं आहे.

०००

-युवराज पाटील , जिल्हा माहिती अधिकारी, लातूर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

ठाणे, दि. २६ (जिमाका) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले व पुष्पांजली अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली.

यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी बाबामहाराज यांच्या नेरुळ येथील निवासस्थानी भेट देऊन श्री. सातारकर यांची मुलगी, नातू यासह सातारकर कुटुंबियांचे सांत्वन केले.

यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनीही ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांचे जाणे, ही अतिशय दुःखद व मनाला चटका लावणारी घटना आहे. सर्वसामान्य माणसाला जगण्याचा मंत्र त्यांनी दिला. आध्यात्मिक प्रचाराबरोबरच समाज प्रबोधनाचे कामही त्यांनी केले. आध्यात्मिक मार्गातून त्यांनी सर्वसामान्य माणसाला जगण्याचा मंत्र दिला. सर्वसामान्य माणसाच्या जीवनात बदल होईल, त्यांचे दुःख कमी कसे होईल, हे त्यांनी साध्या सोप्या भाषेत सांगितले. आपल्या अमोघ वाणी व कीर्तनातून त्यांनी राज्याबरोबरच देशविदेशातील नागरिकांना जवळ केले होते.

ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात यावेत, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

नमो शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत राज्यातील ८५.६० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात मिळाले १७१२ कोटी रुपये

जीवनातील अविस्मरणीय क्षण – कृषिमंत्री धनंजय मुंडे

मुंबई दि. 26 : शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न प्राप्त व्हावे यासाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमध्ये दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर 6 हजार रुपये थेट जमा करण्यात येतात. त्याच धर्तीवर राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘नमो शेतकरी सन्मान’ योजनेचा शुभारंभ आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डी (जि. अहमदनगर) येथे करण्यात आला. राज्य सरकारच्या या योजनेमुळे केंद्र आणि राज्याचे मिळून शेतकऱ्यांना आता दरवर्षी 12 हजार रुपये मिळतील.

प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी एका क्लिकद्वारे राज्यातील 85 लाख 60 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर 1712.02 कोटी रुपये पाठवून योजनेचा शुभारंभ केला. दरम्यान, हा आपल्या जीवनातील ऐतिहासिक व अविस्मरणीय दिवस असल्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत नमूद केले आहे.

उपमुख्यमंत्री तथा तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन 2023 24 चा अर्थसंकल्पीय भाषणांमध्ये या योजनेचा शुभारंभ करण्याचे घोषणा केली होती. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर या योजनेला गती दिली. किरकोळ तांत्रिक कारणांमुळे राज्यातील 12 लाख शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेपासून वंचित होते. या शेतकऱ्यांसाठी त्यांनी राज्यभरात विशेष मोहिम घेतली आणि 6 लाख शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत वाढविले. या शेतकऱ्यांना आता नमो किसान सन्मान योजनेचा सुद्धा लाभ मिळणार आहे.

नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळालेले सर्वाधिक शेतकरी अहमदनगर जिल्ह्यातील आहेत नगर जिल्ह्यातील 5 लाख 17 हजार 611 शेतकऱ्यांना 103 कोटी रुपये वितरित करण्यात आले त्या खालोखाल सोलापूर जिल्ह्यातील 4 लाख 54 हजार 40 शेतकऱ्यांना 90 कोटी 81 लाख, कोल्हापूर जिल्ह्यातील 4 लाख 6 हजार 240 शेतकऱ्यांना 81 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.

‘नमो शेतकरी सन्मान योजने’तून खात्यावर पैसे जमा झाल्याचे संदेश अनेक शेतकऱ्यांच्या मोबाईलवर प्राप्त झाले. त्यानंतर शेतकऱ्यांना आनंद झाला. खात्यावर 2 हजार रुपये प्राप्त झाल्याचा संदेश शेतकऱ्यांना समाधान देऊन गेला. शेतकऱ्यांनी हे संदेश इतरांना दाखवून आनंद व्यक्त केला. दुष्काळसदृश परिस्थिती असताना शेतकऱ्यांना यामुळे आधार मिळत आहे.

या योजनेतून जिल्हा निहाय वितरित करण्यात आलेली रक्कम खालील प्रमाणे-

अहमदनगर- 5,17,611 शेतकऱ्यांना 103.52 कोटी

अकोला -1,87,816 शेतकऱ्यांना 37.56 कोटी

अमरावती 2,65,916 शेतकऱ्यांना 53.18 कोटी

संभाजीनगर (औरंगाबाद) 3,26,840 शेतकऱ्यांना 65.37 कोटी

बीड 3,89,527 शेतकऱ्यांना 77.91 कोटी

भंडारा 186031 शेतकऱ्यांना 37.21 कोटी

बुलढाणा 331894 शेतकऱ्यांना 66.38 कोटी

चंद्रपूर 216613 शेतकऱ्यांना 43.32 कोटी

धुळे 142441 शेतकऱ्यांना 28.40 कोटी

गडचिरोली 129639 शेतकऱ्यांना 25.93 कोटी

गोंदिया 212418 शेतकऱ्यांना 42.48 कोटी

हिंगोली 180576 शेतकऱ्यांना 36.12 कोटी

जळगाव 379549 शेतकऱ्यांना 75.91 कोटी

जालना 289771 शेतकऱ्यांना 57.95 कोटी

कोल्हापूर 406240 शेतकऱ्यांना 81.25 कोटी

लातूर 267300 शेतकऱ्यांना 53.46 कोटी

नागपूर 150414 शेतकऱ्यांना 30.08 कोटी

नांदेड 377415 शेतकऱ्यांना 75.48 कोटी

नंदुरबार 96585 शेतकऱ्यांना 29.32 कोटी

नाशिक 385347 शेतकऱ्यांना 77.07 कोटी

धाराशिव (उस्मानाबाद)- 211409 शेतकऱ्यांना 42.28 कोटी

पालघर 80336 शेतकऱ्यांना 16.07 कोटी

परभणी 267107 शेतकऱ्यांना 53.42 कोटी

पुणे 389842 शेतकऱ्यांना 77.97 कोटी

रायगड 98264 शेतकऱ्यांना 19.65 कोटी

रत्नागिरी 127600 शेतकऱ्यांना 25.52 कोटी

सांगली 367179 शेतकऱ्यांना 73.44 कोटी

सातारा 393334 शेतकऱ्यांना 78.67 कोटी

सिंधुदुर्ग 108103 शेतकऱ्यांना 21.62 कोटी

सोलापूर 454040 शेतकऱ्यांना 90.81 कोटी

ठाणे 68367 शेतकऱ्यांना 13.67 कोटी

वर्धा 123376 शेतकऱ्यांना 24.68 कोटी

वाशीम 154052 शेतकऱ्यांना 30.81कोटी

यवतमाळ 277130 शेतकऱ्यांना 55.43कोटी

0000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

भेसळखोरांवर अन्न व औषध प्रशासनाचे लक्ष; कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन करणाऱ्या उत्पादकांवर होणार कारवाई – अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम

मुंबई दि. 26 : सणासुदीच्या दिवसात खवा, मावा, मिठाई, खाद्यतेल, वनस्पती तूप इत्यादी अन्न पदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामध्ये भेसळ होण्याची शक्यता लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनातर्फे अन्न आस्थापनेची तपासणीची विशेष मोहीम सुरु केली आहे. ही मोहीम डिसेंबरपर्यत राबविण्यात येणार आहे. त्यानुसार उत्पादकांपासून ते किरकोळ दुकानांची तपासणी करण्यात येईल. ज्या मिठाईच्या दुकानांमध्ये अथवा उत्पादकांकडे कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन होत असल्याचे आढळून येईल, त्यांच्यावर  कडक  कारवाई करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी सांगितले.

सणासुदीच्या काळात उत्सवादरम्यान बाजारात विविध प्रकारच्या मिठाई विक्रीसाठी उपलब्ध असतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात खवा, दूध, खाद्यतेल, तूप यापासून तयार होणारे अन्नपदार्थ उपयोगात आणले जातात. मागणी जास्त आणि आवक कमी, अशी परिस्थिती असल्यामुळे या काळात भेसळीचे प्रकार केले जातात. त्यामुळे सणासुदीच्या काळात होणारे भेसळीचे प्रकार टाळण्यासाठी मिठाई  विक्रेत्यांना  काही मार्गदर्शन सूचना अन्न व औषध प्रशासनाने दिल्या आहेत, असे मंत्री श्री. आत्राम यांनी सांगितले.

मिठाई ट्रेवर दर्शनी भागात वापरण्या योग्य दिनांक टाकावा, अन्नपदार्थ तयार करताना उत्पादकाची जागा स्वच्छ व आरोग्यदायी असावी, अन्न पदार्थ तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल हा परवानाधारक अथवा नोंदणीधारक अन्न व्यावसायिकांकडून खरेदी करावा  व त्यांची खरेदी बिले जतन करावीत, भांडी स्वच्छ व  आरोग्यदायी झाकण असलेली असावीत, अन्न पदार्थ तयार करण्यासाठी पिण्यायोग्य पाण्याचा वापर करावा, अन्न पदार्थ स्वच्छ व सुरक्षित ठिकाणी साठवावेत, त्वचा संसर्गजन्य रोगापासून मुक्त याबाबत कामगारांची वैद्यकीय तपासणी करावी, मिठाई तयार करताना केवळ फूड ग्रेड खाद्य रंगाचा १०० पी.पी.एम च्या मर्यादित वापर करावा, प्रादुर्भाव होऊ नये म्हणून अन्नपदार्थ जाळीदार झाकणाने झाकून ठेवावेत, अन्न पदार्थ तयार करताना वापरण्यात येणारे खाद्यतेल २-३ वेळेस तळण्यासाठी वापरण्यात यावे. त्यानंतर वापरलेले तेल रुको अंतर्गत नेमण्यात आलेल्या एग्रीकेटर यांना देण्यात यावेत आदी सूचनांचा त्यामध्ये समावेश आहे.

स्पेशल बर्फीचा वापर हा खवा किंवा मावा या अन्नपदार्थांना  पर्याय म्हणून  करु नये. विक्रेत्यांनी त्यांच्या विक्री बिलावर एफएसएसएआय परवाना क्रमांक नमूद करावा, विक्रेत्यांनी दूध, दुग्धजन्य पदार्थ, खवा, मावा या नाशवंत पदार्थांची वाहतूक ही योग्य तापमानास व सुरक्षितरित्या करण्यात यावी.

 ग्राहकांनी देखील जागरूक राहून अन्न पदार्थाच्या गुणवत्ता दर्जाबाबत किंवा अन्न आस्थापनाबाबत  कोणतीही तक्रार असल्यास त्याबाबत सविस्तर माहिती प्रशासनाच्या १८००-२२२-३६५ या टोल फ्री क्रमांकावर नोंदवावी, असे आवाहन मंत्री श्री. आत्राम यांनी केले आहे.

००००

नीलेश तायडे/विसंअ/

गरिबीतून मुक्ती हाच खरा सामाजिक न्याय – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

महाराष्ट्रातील २६ जलसिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध

शिर्डीदि. २६ : गरिबीतून मुक्ती मिळणे आणि गरिबातील गरीब कुटुंबाला पुढे जाण्याची संधी मिळणे हाच खरा सामाजिक न्याय आहे. केंद्र शासनाची सर्वोच्च प्राथमिकता ही गरीब कल्याण आहेअसे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. महाराष्ट्रातील २६ जलसिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र शासन कटिबद्ध असल्याची ग्वाहीदेखील प्रधानमंत्र्यांनी यावेळी दिली.

शिर्डी विमानतळाजवळ असलेल्या काकडी येथील मैदानावर आयोजित शेतकरी मेळाव्यात आज प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी शेतकरी व नागरिकांशी संवाद साधला. यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते संगणकीय कळ दाबून महाराष्ट्रातील १४ हजार कोटी रुपयांहून अधिक विकास प्रकल्पांचे भूमीपूजन व लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर राज्यपाल रमेश बैसमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवारकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटीलकेंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराडमहसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलग्रामविकास मंत्री गिरीश महाजनकृषी मंत्री धनंजय मुंडेकामगार मंत्री सुरेश खाडेखासदार सदाशिवराव लोखंडेखासदार डॉ. सुजय विखे पाटीलखासदार उन्मेष पाटीलआमदार राम शिंदेआमदार बबनराव पाचपुतेमाजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित होते.

“पाच वर्षांपूर्वी शिर्डीत आलो होतो तेव्हा साई शताब्दी वर्ष होते‌. तेव्हा मला साई दर्शनाची संधी मिळाली होती‌‌.” असे वाक्य मराठीतून बोलून आपल्या भाषणाला प्रधानमंत्र्यांनी सुरुवात केली. प्रधानमंत्री श्री. मोदी यावेळी म्हणाले कीमहाराष्ट्राला पन्नास वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या निळवंडे धरणाचे आज जलपूजन करून लोकार्पण झाले. यामुळे या भागातील शेती पाण्याखाली येणार आहेत. पाण्याचा एक – एक थेंब अमूल्य आहे. तेव्हा पाण्याचा जपून वापर झाला पाहिजे, अशी अपेक्षाही प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली.‌

श्री साईबाबा मंदिर दर्शन रांगेचे आज लोकार्पण झाले. दर्शन रांग प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे देश – विदेशातील भाविकांना मोठी  सुविधा मिळणार आहेअसे त्यांनी यावेळी सांगितले.

बाबा महाराज सातारकर यांचे आज निधन झाले. त्यांनी कीर्तन- प्रवचनाच्या माध्यमातून समाज जागृतीचे काम केलेअशा शब्दात त्यांनी यावेळी बाबा महाराजांना श्रध्दांजली अर्पण केली.

महाराष्ट्रात १ कोटी १० लाख आयुष्मान भारत कार्ड देण्यात येणार आहेत. या सर्वांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत. या योजनेवर ७० हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. गरिबांना मोफत शिधावाटप योजनेवरही ४ लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. गरिबांच्या मोफत आवास योजनांसाठी ४ लाख कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. ‘हर घर जल’ पोहोचविण्यासाठी आतापर्यंत २ लाख कोटी खर्च करण्यात आले आहेत. पीएम स्व-निधी योजनेअंतर्गत देखील पथारी व्यवसायातील लाभार्थींना हजारो रुपयांची मदत मिळत आहे. आता प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू केली आहे. यातून सुतारसोनारकुंभारमूर्तीकार अशा लाखो कारागीरांना प्रथमच शासनाकडून मदत मिळणार आहे. या योजनेवरही १३ हजार कोटी खर्च करण्यात येणार आहेतअसे प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी सांगितले.

केंद्र शासनाने  प्रधानमंत्री  किसान सन्मान निधी छोट्या शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे. या योजनेतून २ लाख ६० हजार कोटी रुपये दिले आहेत. या योजनेत महाराष्ट्रातील छोट्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर २६ हजार कोटी थेट पद्धतीने वर्ग केले आहेत. १९७० मध्ये घोषणा झालेला निळवंडे धरण प्रकल्प मागील पाच दशकांपासून रखडला होता. शासनाने या प्रकल्पाला गती दिली. राज्यातील अवर्षणप्रवण भागासाठी सुरू केलेली बळीराजा जल संजीवनी योजना प्रभावी ठरणार आहेअसेही ते म्हणाले.

शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत अंतर्गत गेल्या सात वर्षात साडेतेरा लाख कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. एमएसपीचा पैसा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवण्याची व्यवस्था केली आहे. नुकतीच रब्बी पिकांसाठी एमएसपीची घोषणा केली असून त्यात चनागव्हाच्या एमएसपीमध्ये वाढ करण्यात आली आहे. ऊसाचे मूल्य ३१५ रुपये प्रति क्विंटल करण्यात आले आहे. गेल्या ९ वर्षात ७० लाख कोटी रुपयांचे इथेनॉल खरेदी केले आहे. शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे मिळावेत म्हणून साखर कारखान्यांना मदत शासनाने केली आहेअशी माहिती त्यांनी दिली.

सहकारी चळवळीला बळकट करण्याचे काम केंद्र शासनाने केले आहे. देशभरात २ लाखांपेक्षा अधिक सहकारी समित्या बनविल्या जात आहेत.  सहकारी संस्थांमार्फत कोल्ड स्टोअरेज उभारण्यात येत आहेत. छोट्या शेतकऱ्यांना शेतकरी उत्पादक संघांच्या माध्यमातून संघटित केले जात आहे. जितका महाराष्ट्राचा विकास होईल तितकाच वेगाने देशाचा विकास होईलअसे ते म्हणाले.

महाराष्ट्रात रेल्वेच्या विस्ताराबरोबर रस्ते विकासाचे काम सतत चालू आहे. ही दळण-वळण साधने प्रगती आणि सामाजिक विकासाचे नवे मार्ग बनतीलअसेही प्रधानमंत्र्यांनी सांगितले.

२०४७ साली देश स्वातंत्र्याचा शतक महोत्सव साजरा करत असताना जगात भारताचे नाव विकसित भारताच्या रुपात असेल हा संकल्प करू याअसेही प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले.

राज्यात केंद्राच्या सहकार्यातून २ लाख कोटींची विकास कामे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीकेंद्र शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्रात २ लाख कोटी रुपयांच्या कामाचे भूमीपूजन व लोकार्पण आतापर्यंत झाले आहे.  देशाचा सर्वंकष विकासाचा ध्यास घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पुढे जात आहेत.

देशाला महासत्ता बनवण्यासाठी प्रधानमंत्री श्री मोदी अविरतपणे कार्य करत आहेत. तोच आदर्श घेऊन आपले सरकार सुद्धा गोरगरिबांच्या विकासासाठी काम करत आहे. राज्यात नवीन विकास योजना आणण्याचे महत्त्वपूर्ण काम श्री. मोदी यांनी केले आहे.

राज्यात ७०० ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केला असून गोरगरिबांना या माध्यमातून विनामूल्य उपचार उपलब्ध करून दिला जात आहे. नागरिकांना पाच लाख रुपयांपर्यंत विविध आरोग्य विषयक सुविधांचा कॅशलेस स्वरूपात लाभ दिला जात आहे, असे त्यांनी सांगितले.

शिर्डी साईबाबा मंदिर दर्शन रांगेचा लाभ असंख्य भाविकांना होणार आहेअसेही त्यांनी सांगितले.

राज्य शासनाने गेल्या वर्षभरात ३५ सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. असेही ते म्हणाले.

पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी दुष्काळग्रस्त मराठवाडा व विदर्भाला देण्याचा आराखडा तयार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीप्रधानमंत्री श्री. मोदी यांनी २०१७ मध्ये शिर्डी येथे भूमीपूजन केलेल्या कामांचे उद्घाटन आज त्यांच्याच हस्ते होत आहे. जगभरातून साईभक्त येथे येतात, त्यांच्याकरिता अनेक सुविधा देण्यात येत आहेत. अनेक वर्षापासून वाट पाहायला लागलेल्या निळवंडे प्रकल्पाला २०१६ – १७ मध्ये आम्ही गती दिली. गेल्या ९ वर्षात प्रधानमंत्र्यांनी महाराष्ट्रातील सिंचन योजनांसाठी ३० हजार कोटी रुपये दिल्यामुळे राज्यात अनेक सिंचन योजना राबविता आल्या. पीएम किसानच्या धरतीवर ‘नमो किसान’ योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला.

महाराष्ट्राचा ५० टक्के भाग अवर्षणग्रस्त आहे. पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला मिळणारे पाणी गोदावरी नदी पात्रात वळते करून मराठवाडा सुजलाम सुफलाम करू शकतो. या योजनेचा आराखडा तयार केला आहे. तसेच वैनगंगा नदीच्या खालील भागातून वाहून जाणारे १०० टीएमसी पाण्यापैकी ६७ टीएमसी पाणी नळगंगा मध्ये आणू शकतो. ज्यातून विदर्भमराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला दुष्काळ मुक्त करू शकतो. यासाठी केंद्र सरकारने या प्रकल्पांनाही मदत करावी, अशी अपेक्षाही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी प्रधानमंत्र्यांकडे व्यक्त केली.

केंद्र शासनाच्या पाठबळामुळे निळवंडेचे स्वप्न साकार – अजित पवार

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीदेशाच्या ५३ वर्षांच्या इतिहासात निळवंडे धरण प्रकल्पास गती मिळाली नव्हती. आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून केंद्र शासनाने या प्रकल्पास निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे स्वप्न साकार झाले आहे. महाराष्ट्र ही भक्ती – शक्तीची भूमी आहे. प्रधानमंत्री यांच्या भेटीतून लोककल्याणसाठी काम करण्याची ऊर्जा मिळणार आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणजे विकास हे समीकरण घट्ट झाले आहे. आज अनेक प्रकल्पांचे लोकार्पण होत आहे. निळवंडे धरण होत असतानाच योग्य प्रकारची पिके घेण्यात यावीत. शून्य टक्के व्याजाने पीक कर्ज व एक रुपयात पीक विमा असे अनेक कल्याणकारी निर्णय शासनाने घेतले आहेत. प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली राज्य विकासाकडे वाटचाल करत आहे, असे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

महसूलमंत्री श्री. विखे पाटील यांचे यावेळी स्वागतपर भाषण झाले. निळवंडे धरण प्रकल्पामुळे लाभक्षेत्रातील दुष्काळग्रस्तांना दिलासा मिळणार आहे. अहमदनगर जिल्हा केंद्र व राज्य शासनाच्या योजनेच्या अंमलबजावणीत आघाडीवर असल्याचा उल्लेख त्यांनी केला.

यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे लाभार्थी संपत नाना राक्षेखरैन्नूसा बशीर शेखसविता गणेश राजभोज यांना आयुष्यमान कार्ड तसेच स्वामित्व योजनेचे लाभार्थी दगडू भागवत गीतेशहाजी शंकर लोके यांना प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लाभ प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमापूर्वीमेरी माटी मेरा देश अभियानात अहमदनगर जिल्ह्यातून संकलित करण्यात आलेल्या मातीचा कलश प्रधानमंत्री श्री.मोदी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

या विकास प्रकल्पाचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाले उद्घाटन व लोकार्पण

          महाराष्ट्रात नमो शेतकरी महासन्मान निधी ’ योजनेची ८६ लाख शेतकऱ्यांना १७१२ कोटी रुपयांच्या पहिल्या हप्त्याचे वितरण करून शुभारंभ

          शिर्डी येथे भाविकांच्या सुविधेसाठी नवीन दर्शन रांग संकुलाचे उद्घाटन (प्रकल्प खर्च रु. १०९ कोटी)

          निळवंडे धरण डाव्या कालव्याचे लोकार्पण (रु.५१७७ कोटी )

          राष्ट्रीय महामार्ग-१६६ च्या सांगली व बोरगाव चौपदरीकरण टप्प्याचे लोकार्पण (रु.११०२ कोटी)

          जळगाव ते भुसावळ तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गाचे लोकार्पण  (रु.६४० कोटी)

          कुर्डूवाडी-लातूर रोड रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण प्रकल्पाचे लोकार्पण (रु.२३७ कोटी)

          मनमाड गॅस टर्मिनल येथे अतिरिक्त सुविधांचा शुभारंभ (रु.२२१ कोटी)

          अहमदनगर येथे माता व बाल आरोग्य जिल्हा रूग्णालय भूमिपूजन (रु.२५.४५ कोटी)

          राष्ट्रीय आयुष मिशन कार्यक्रमांतर्गत अहमदनगर येथील आयुष रूग्णालय उद्घाटन (रु.९ कोटी)

          १.११ कोटी आयुष्यमान कार्ड वितरणाचा शुभारंभ

          स्वामित्व योजनेंतर्गत लाभार्थींना सनद वाटप

००००

वीर अमर जवानांच्या गावातील माती संकलित करणाऱ्या छत्रपती संभाजीनगरच्या उमेश जाधव यांच्या उपक्रमाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून कौतुक

मुंबई, दि. 26 : “देशातील १८५ वीर अमर जवानांच्या गावी जावून त्यांच्या अंगणातील पवित्र माती कलशात एकत्र करणाऱ्या व राष्ट्रभक्तीतून जगावेगळी धडपड करणाऱ्या उमेश गोपीनाथ जाधव या छत्रपती संभाजीनगरच्या तरुणाचा उपक्रम अभिनंदनीय, प्रेरणादायी आणि अनुकरणीय असून “मेरी माटी, मेरी देश” या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अभियानाला मिळत असलेला प्रतिसाद “राष्ट्र प्रथम” ही भावना जागृत करण्यास प्रेरक ठरत आहे, असे प्रतिपादन वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

श्री. जाधव यांच्याकडून एकत्रित अमर जवानांच्या गावातील माती कलशाचे पूजन व अभिवादन करून मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी त्यांच्या मलबार हिल येथील शासकीय निवासस्थानाहून दिल्लीकडे रवाना केली.

यावेळी मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, “मेरी माटी, मेरा देश” या अभियानास देशभरात उत्तम प्रतिसाद मिळत असून सर्वत्र विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. राज्यातील एक हजार कुंभ घेऊन शुक्रवारी तरुण मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानात एकत्र येणार आहेत. सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री  अजित पवार यावेळी उपस्थित राहतील. असेही त्यांनी सांगितले.

छत्रपती संभाजीनगर येथील उमेश जाधव या तरुणाने एक लाख 30 हजार किलोमीटर प्रवास करून अमर जवानांच्या गावी जाऊन माती एकत्र केली हे देशभक्तीचे अनोखे उदाहरण आहे. या त्यांच्या उपक्रमात सहभागी होताना विशेष अभिमान वाटत आहे, असेही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.

शहीद अमर जवानांच्या कुटुंबीयांना भेटून ही माती जमविण्यासाठी मी देशभरात फिरलो, प्रत्येक ठिकाणी वेगळे अनुभव आले; शहीद जवानांच्या विधवांच्या डोळ्यातील विश्वास आणि देशभक्ती बघून अधिक प्रेरणा मिळत गेली. माझे सर्वांनी स्वागत केले. राज्यात मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी या संदर्भात व्यक्त केलेली संवेदनशीलता आणि सहकार्यांची भावना बघून अतिशय भावूक झालो आहे. त्यांचे प्रेरक वक्तव्य आणि देशभक्तीने ओतप्रोत विचार मला नवी ऊर्जा देऊन गेले, अशी प्रतिक्रिया श्री. जाधव यांनी यावेळी व्यक्त केली. दिल्ली येथे लष्कर मुख्यालयात ही माती अमृत वाटिकेसाठी देण्यात येईल, असे श्री. जाधव यांनी सांगितले.

000

दीपक चव्हाण/विसंअ/

जीसीसी टीबीसी संगणकीय टंकलेखन परीक्षेसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू

मुंबई, दि. 26 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्याशी संलग्न असलेल्या जीसीसी टीबीसी संगणकीय टंकलेखन परीक्षा एप्रिल २०२४ मध्ये होणार आहे. यासाठी राज्यातील सर्व मान्यताप्राप्त संस्थांमधून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थांनी नियमबाह्य कामे केल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असेही यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

इच्छुक विद्यार्थ्यांनी https://www.mscepune.in/gcc/CT_INST_MUMBAI.aspx या लिंकवर आपल्या जवळच्या मान्यता प्राप्त टायपिंग संस्थांची यादी तपासून पाहावी. त्यानंतर त्या संस्थेला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिलेल्या प्रमाणपत्रावरील त्याच संस्थेचे नाव व पत्ता बरोबर असल्याची खातरजमा करूनच प्रवेश घ्यावा, असे आवाहन परिषदेमार्फत करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे राज्यात वर्षातून दोन वेळा जीसीसी टीबीसी संगणकीय टायपिंग परीक्षा घेतल्या जातात. प्रत्येक विषयासाठी सहा महिन्यांचा अभ्यासक्रम असून याची प्रती विषय ६,५०० रुपये इतके शुल्क आकारले जाते. त्याचबरोबर लघुलेखन परीक्षा देखील घेतल्या जातात. त्यासाठी देखील प्रवेश सुरू झाले असल्याची माहिती परिषदेमार्फत देण्यात आली आहे.

संस्थेमध्ये अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतानाच परीक्षेचा प्राथमिक अर्ज ऑनलाईन भरून घेतला जाणार आहे. यामुळे ऐनवेळी परीक्षा अर्ज भरून घेणे किंवा क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी भरणे या गैरप्रकारांना आळा बसेल, असेही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

00000

बी.सी.झंवर/विसंअ/

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना आवश्यक सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील : कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

0
नाशिक, दि. 4 जुलै, 2025 (जिमाका वृत्तसेवा): रस्ते वीज व पाणी या शेतकऱ्याच्या मूलभूत गरजा असून पूर्ण करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना आवश्यक उपलब्ध करून देण्यासाठी...

कामात कुचराई करणाऱ्यांची गय न करता शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्य सेवा पुरवा – केंद्रीय आरोग्य...

0
बुलढाणा,दि. 4 (जिमाका) : सर्वसामान्य गोरगरीब जनतेपर्यत आरोग्य सेवा सहज ,सुलभ आणि माफक दरात पोहचविण्याचा केंद्र सरकारचा हेतू आहे . हा हेतू साध्य करण्यासाठी आणि...

‘माये’चं दूध… नवजातांसाठी संजीवनी!

0
जळगावच्या 'ह्युमन मिल्क बँके'तून २०००हून अधिक बाळांना मिळाला जीवनदायी आधार आईपण म्हणजे माया, वात्सल्य आणि त्याग. पण काही वेळा ही आई काही कारणांमुळे बाळाला दूध...

बॉम्बे बार असोसिएशनतर्फे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार

0
मुंबई, दि. ४ : मुंबई उच्च न्यायालयाची ही इमारत, बॉम्बे बार असोसिएशन आणि इथल्या माझ्या सहकाऱ्यांनी मला घडवलं. आज जे काही आहे ते या...

जीएसटी उत्पन्न विश्लेषणासाठी मंत्रिगटाची पहिली बैठक

0
नवी दिल्ली, दि. 4 : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिगटाची (GoM) वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) उत्पन्नाच्या विश्लेषणासाठी पहिली बैठक महाराष्ट्र सदन,...