शनिवार, जुलै 5, 2025
Home Blog Page 1070

दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज शाळांनी ऑनलाईन पद्धतीने भरावेत – मुंबई विभागीय मंडळ सचिव डॉ.सुभाष बोरसे

मुंबई, दि. 27 : सन 2024 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज प्रचलित ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. यासाठी सर्व माध्यमिक शाळाप्रमुखांनी विद्यार्थ्यांचे अर्ज नियमित शुल्कासह सरल डाटाबेसवरून सोमवार 20 नोव्हेंबर 2023 पर्यंत भरावेत, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागीय मंडळाचे सचिव डॉ. सुभाष बोरसे यांनी कळविले आहे.

दहावीसाठी प्रवीष्ट होणारे नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रवीष्ट होणाऱ्या तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे ट्रान्स्फर ऑफ क्रेडीट घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत.

कोणताही विद्यार्थी अर्ज भरण्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता मुख्याध्यापकांनी घ्यावी, असे आवाहन मंडळाचे सचिव डॉ.बोरसे यांनी केले आहे.

००००

बी.सी.झंवर/विसंअ

मताधिकार बजावण्यासाठी नवमतदारांनी नाव नोंदणी करावी – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

मुंबई, दि.२७ : लोकशाही सक्षमीकरणाची पहिली पायरी मतदार नोंदणी आहे. पात्र नवमतदारांनी नाव नोंदणी करून मताधिकार बजावावा, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यानी केले. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर कक्ष येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

निवडणुका पारदर्शक आणि न्याय वातावरणात होण्यासाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण, शुद्धीकरण महत्त्वपूर्ण असते. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविला जातो. २७ ऑक्टोबर २०२३ रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये प्रारुप यादी प्रकाशित करून यंदाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. हा कार्यक्रम २७ ऑक्टोबर ते ९ डिसेंबर २०२३ या कालावधीत राबविला जाणार आहे. १ जानेवारी २०२४ रोजी किंवा त्या आधी १८ वर्षे पूर्ण केलेले नागरिक यांना या कालावधीत आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे. तसेच २०२४ च्या एप्रिल, जुलै, ऑक्टोबर या महिन्याच्या १ तारखेला १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुण-तरुणींनाही ही कालावधीत आगाऊ मतदार नोंदणी करता येईल. मात्र, त्या अर्जावरील प्रक्रिया सदर तिमाहीत पूर्ण करण्यात येईल. २०२४ मध्ये येऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मताधिकार बजावण्यासाठी ही महत्त्वाची संधी असल्याने पात्र नवमतदारांनी नाव नोंदणी करावी.

प्रारुप यादीमध्ये आपले नाव आहे की नाही याची मतदारानी खात्री करणे आवश्यक आहे. बहुतांशवेळी मतदानाच्या दिवशी आपले नाव मतदार यादीत नाही, अशी तक्रार अनेक मतदारांकडून केली जाते. तसेच नाव, पत्ता, लिंग, जन्म दिनांक, वय, ओळखपत्र क्रमाक, मतदारसंघ इ. तपशील सुद्धा अचूक आहेत का याची खात्री करणे आवश्यक आहे. ज्या मतदारांना या तपशिलामध्ये दुरुस्त्या करायच्या असतील, त्यांनी अर्ज क्रमांक  आठ भरावा. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत नवीन अर्हता दिनांकावर आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे. त्याप्रमाणे एखाद्याच्या नावांसंबधी हरकत सुद्धा घेता येते. एखाद्या मतदारसंघातील एखादा यादीत दिलेल्या पत्त्यावर राहत नसेल, तर अशा नावाबद्दल त्याच मतदारसंघातील अन्य मतदार आक्षेप घेऊ शकतो. त्यामध्ये तथ्य आढळून आले, तर पडताळणी करून संबंधित मतदाराच्या नावाची वगळणी केली जाते. मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण होण्यासाठी, अशा अपात्र मतदारांची वगळणीही महत्त्वाची असते.

समाजातील काही वंचित घटकांतील नागरिकांची मतदार यादीत अल्प प्रमाणात नोंद असल्याने त्याच्यासाठी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. १८ व १९ नोव्हेंबर या कालावधीमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला व दिव्यांग व्यक्ती याच्यासाठी विशेष शिबिरे राबविली जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या मतदार नोंदणीसाठी महाविद्यालयामधील राष्ट्रीय सेवा योजना व निवडणूक साक्षरता मंडळांचे  सहकार्य घेतले जाणार आहे. महिलांच्या मतदार नोंदणी शिबिरासाठी महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळ (माविम), महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (एसएसआरएलएम) या शासकीय विभागांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.  दिव्यांगासाठी कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांच्या मदतीने दिव्यांग व्यक्तींची मतदार नोंदणी, त्याची मतदार यादीतील नोंद चिन्हांकित करणे या गोष्टी केल्या जाणार आहेत. तृतीयपंथी व्यक्ती, शरीर व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया, भटक्या-विमुक्त जमाती यांच्यासाठी २ व ३ डिसेंबर या दिवशी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.

ही शिबिरे सामाजिक संस्थाच्या सहकार्याने या समाजघटकांना सोयीच्या ठिकाणी आयोजित केली जाणार आहेत. या समाजघटकांकडे वास्तव्य आणि जन्मतारखेच्या कागदपत्रांची कमतरता लक्षात घेऊन आयोगाने त्यांना स्व-घोषणापत्राची सवलत दिलेली आहे. त्यामुळे हे समाजातील व्यक्ती आता कागदपत्रे नसली तर मतदार नोंदणी करू शकणार आहेत

ग्राम विकास व पंचायतराज विभागाच्या सहकार्याने १ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत राज्यभर विशेष ग्रामसभेचे आयोजन केले जाणार आहे. या काळात राज्यभरातील ग्रामसभांमध्ये मतदार यादीचे वाचन केले जाईल. त्या अंतर्गत नव्याने नाव नोंदणीस पात्र नागरिक, लग्न होऊन गावात आलेल्या स्त्रिया, गावात कायमस्वरूपी वास्तव्यास आलेले नागरिकांची नाव नोंदणी केली जाईल. तसेच दुबार नाव, मृत व्यक्ती गावातून कायमस्वरुपी स्थलांतरित झालेल्या व्यक्ती, लग्न होऊन अन्य गावात गेलेल्या स्त्रियांच्या नावाची मतदार यादीतून वगळणी केली जाईल.

५ जानेवारी २०२३ च्या रोजीच्या अंतिम मतदार यादीमध्ये एकूण मतदारसंख्या नऊ कोटी दोन लाख चौसष्ठ हजार आठशे चौऱ्याहत्तर (९,०२,६४,८७४) इतकी होती. ही मतदारसंख्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ७१.४५ टक्के इतकी होती. त्यानंतर झालेल्या निरंतर अद्ययावतीकरण प्रक्रियेत मतदार नोंदणी, नाव वगळणी या बाबी सुरूच होत्या. आता २७ ऑक्टोबर रोजी प्रकाशित झालेल्या प्रारुप मतदार यादीतील एकूण मतदारसंख्या नऊ कोटी आठ लाख बत्तीस हजार दोनशे त्रेसष्ट (९,०८,३२,२६३) एवढी आहे, आणि ही संख्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ७१.४१ इतकी आहे. यामध्ये सतरा लाख तीन हजार एकशे (१७.०३.१९३) इतकी नवीन मतदार नोंदणी आहे, तर अकरा लाख पत्तीस हजार आठशे चार (११,३५,८०४) एवढ्या मतदाराची नावे वगळली गेली आहेत. वगळण्यात आलेली ही नावे दुबार, मृत कायमस्वरूपी स्थलांतरित या मतदाराची होती.

तसेच २०२३च्या अंतिम मतदार यादीमध्ये पुरुष मतदारसंख्या चार कोटी एकाहत्तर लाख सव्वीस हजार पाचशे दोन (४,७१,२६,५०२ ) इतकी होती, तर २७ ऑक्टोबर रोजी प्रकाशित झालेल्या प्रारूप मतदार यादीतील पुरुष मतदारसंख्या चार कोटी त्र्याहत्तर लाख एकोणसत्तर हजार सहाशे चौसष्ठ (४,७३,६९,६६४) एवढी आहे, तर स्त्री मतदारांची जानेवारी २०२३ मधील संख्या चार कोटी एकतीस लाख तेहतीस हजार सहाशे पंचावन्न (४,३१,३३,६५५) इतकी आहे. ऑक्टोबर २०२३ मधील संख्या चार कोटी चौतीस लाख सतावन्न हजार सहाशे एकोणऐशी (४,३४,५७,६७९) एवढी आहे. जानेवारी २०२३ मधील यादीमध्ये एक हजार पुरुषांच्या मागे ९१५ स्त्रिया होत्या, तर यादीत एक हजार पुरुषांच्या मागे ९१७ स्त्रिया आहेत. तृतीयपंथी समुदायाची जानेवारी २०२३ मधील संख्या चार हजार सातशे सतरा (४७१७) होती, तर ऑक्टोबर २०२३ मध्ये चार हजार नऊशे वीस (४९२०) इतकी आहे.

राज्याच्या लोकसंख्येत १८-१९ वर्षे वयोगटाची टक्केवारी ३.७६ (४७.८३.०७०) इतकी आहे. ऑक्टोबरच्या मतदार यादीत या वयोगटाची टक्केवारी फक्त ०.२७ (३.४८.६९१ ) एवढी आहे, तर २०-२९ या वयोगटाची लोकसंख्येतील टक्केवारी २०.३८ (२,५९,२९,२०६ ) इतकी आहे. ऑक्टोबरच्या मतदार यादीत या वयोगटाची टक्केवारी १२.१९ (१,५५,११,३७६) एवढी आहे. मतदार यादीतील तरुणांची आकडेवारी वाढवण्यासाठी महाविद्यालयामध्ये विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच ‘उत्कृष्ट मतदार मित्र महाविद्यालय पुरस्कारा’चे आयोजनही करण्यात आले आहे. शंभर टक्के मतदार नोंदणी केलेल्या आणि मतदार जागृतीचे उपक्रम राबवणाऱ्या महाविद्यालयांना हे पुरस्कार दिले जाणार आहेत.

०००००

संध्या गरवारे/विसंअ

ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवावर हजारोंच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ठाणेदि.27(जिमाका) :- ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांच्या पार्थिवावर आज नेरुळमधील सारसोळे गावातील शांतीधाम वैकुंठ स्मशानभूमीत आज सायंकाळी शासकीय इतमामात हजारो वारकरी भक्तांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी स्व.ह.भ.प.बाबामहाराज यांचे नातू ह.भ.प चिन्मय महाराज सातारकर यांनी पार्थिवाला मुखाग्नी दिला.

याप्रसंगी स्व. ह.भ.प. बाबामहाराज यांच्या मोठ्या भगिनी माई महाराज, मुलगी ह.भ.प. भगवती ताई महाराज सातारकर, रासेश्वरी सोनकर, नातू ह.भ.प. चिन्मय महाराज सातारकर हे उपस्थित होते.

यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नवी मुंबई पोलीस दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी शासनाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. सायंकाळी शांतीधाम स्मशानभूमीत पोलिसांनी बंदुकीच्या फैरी झाडून तर पोलीस बँड पथकाने धून वाजवून मानवंदना दिली.

यावेळी खासदार राजन विचारे, आमदार निरंजन डावखरे, आमदार शशिकांत शिंदे, ह.भ.प.नामदेव शास्त्री महाराज यांच्यासह जिल्हाधिकारी श्री.अशोक शिनगारे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह पोलीस आयुक्त संजय मोहिते, उपविभागीय अधिकारी श्रीमती उर्मिला पाटील, नवी मुंबई महानगरपालिका उपायुक्त डॉ. राहुल गेठे, तहसिलदार युवराज बांगर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली.

000

नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा, दि.27 (जिमाका):  पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देवून या वर्षीच्या जुन अखेरपर्यंत पुरेल अशा पद्धतीने धरणातील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव  ठेवावा त्याचबरोबर ठरल्याप्रमाणे पाण्याचे आर्वतन सोडण्यात यावे तुर्तासतरी या आर्वतनामध्ये बदल करु नये असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. तसेच नागरिकांनीही पाण्याचा काटकसरीने वापर करावा अनावश्यक वापर टाळावा, असे आवानही त्यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्याबाबत आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीस आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे  अधिक्षक अभियंता जयंत शिंदे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक यांच्यासह सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता, शाखा अभियंता व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यंदाच्या वर्षी संभाव्य पाणी टंचाई भासणार असल्याने सध्या डिसेंबर 2023 अखेरपर्यंतचे पाण्याचे नियोजन करावे. पाण्याची उपलब्धता पाहून पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी प्राधान्याने सोडावे. कोयना धरणातील 67 टक्के पाणीसाठा हा विद्युत निर्मितीसाठी राखीव असतो. याबाबत डिसेंबर नंतर परिस्थितीचा आढावा घेऊन ज्यादाचे पाणी पिण्यासाठी व सिंचनासाठी राखीव ठेवण्याबाबत शासनास प्रस्ताव पाठवावा. सध्याच्या परिस्थितीत रब्बीची आर्वतने ठरल्याप्रमाणे सोडावित,  अशा सूचनाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी केल्या.
उत्त्र मांड धरणाची उर्वरित कामे तातडीने पूर्ण करावी. ही कामे पूर्ण झाल्यानंतर उंब्रज ता. कराड परिसरातील पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागेल. ज्या धरणांच्या कामांचे प्रस्ताव मंजुरीसाठी मंत्रालयस्तरावर प्रलंबित आहेत. त्याचा पाठपुरावाही केला जाईल. तसेच मागणीनुसार सांगली जिल्ह्यासाठी कोयना धरणातून 1 टिएमसी पाणी सोडण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

000

जिल्ह्यात मोठे उद्योग प्रकल्प सुरु होणार – उद्योगमंत्री उदय सामंत

यवतमाळ, दि.२७ (जिमाका) : जिल्ह्यातील युवकांच्या हाताला काम व रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी जिल्ह्यात मोठा उद्योग प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. या प्रकल्पातून हजारो कोटींची गुंतवणूक होणार असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज सांगितले.

उद्योगमंत्री उदय सामंत आणि पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्ह्यातील मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात आढावा घेतला. या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी डॅा. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा. मैनाक घोष, पोलीस अधीक्षक डॅा. पवन बन्सोड यांचेसह उद्योग व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, उद्योग उभारण्यासाठी भूखंड घेतले परंतू वर्षानुवर्षे बंद असलेले अमरावती विभागातील महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरणाचे ७७० औद्योगिक भूखंड तपासणी करुन ताब्यात घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यात यवतमाळ जिल्ह्यातील १९८ भूखंड ताब्यात घेण्यात येणार आहे.

युवकांच्या हाताला काम व रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी जिल्ह्यात मोठा उद्योग प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. या प्रकल्पातून हजारो कोटींची गुंतवणूक जिल्ह्यात होणार असून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. याबाबत लवकरच सामंजस्य करार करण्यात येणार आहे. तसेच नेर तालुक्यातील वटफळी येथे शंभर ते तीनशे हेक्टर क्षेत्रात नवीन एमआयडीसी करण्याच्या प्रस्तावाला तत्वत: मान्यता देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत कर्ज प्रस्तावांना मंजुरी देण्यात यवतमाळ जिल्हा राज्यात अव्वलस्थानी आहे. जिल्ह्यात यावर्षी सहाशेहून अधिक उद्योग प्रकल्पांना मंजुरी दिली. त्यापैकी तीनशे प्रकल्प सुरु झाले आहेत. या कार्यक्रमातून जिल्ह्यात नवउद्योजक घडत आहेत. जिल्ह्याच्या या कामगिरीबाबत उद्योगमंत्र्यांनी प्रशासन आणि बॅंकांचे कौतुक केले.

राज्यात पंतप्रधान विश्वकर्मा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून लहान उद्योग करणाऱ्या बलुतेदारांना मोठे उद्योजक बनण्याची संधी उपलब्ध होणार आहे. ही योजना तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामसेवकांसाठी शिबीर घ्यावे. ही योजना युद्धपातळीवर राबवावी. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नोडल अधिकारी म्हणून काम करण्याचे निर्देश उद्योगमंत्री श्री.सामंत यांनी दिले.

जिल्ह्यात मधाचे गाव ही संकल्पना राबवावी. नवीन स्टार्टअप प्रकल्पांना प्रोत्साहन देणे व सुविधा पुरविण्यासाठी प्लग ॲंड प्ले संकल्पना राबवावी. प्रायोगिक तत्वावर वीस प्रकल्प सुरु करावेत. एक जिल्हा एक उत्पादन याविषयी आणि उद्योग उभारण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, पालकमंत्र्यांचे मार्गदर्शन घ्यावे. जिल्ह्यातील प्रस्तावित क्लस्टर प्रकल्पांना गती द्यावी असे निर्देश उद्योगमंत्री सामंत यांनी यावेळी दिले.

यवतमाळ एमआयडीसीत २५ एकरमध्ये फूडपार्क

यवतमाळ एमआयडीसी क्षेत्रात २५ एकरमध्ये फूडपार्क उभारण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यासाठी दोन वर्षांपर्यत जागा आरक्षित करण्यात यावी. तोपर्यंत उद्योग न आल्यास जागेचे आरक्षण पूर्ववत करण्याचा निर्णयही यावेळी घेतला असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

जिल्ह्यातील औद्योगिक संघटनांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत अतिरिक्त यवतमाळ एमआयडीसी क्षेत्रात नवीन आराखड्यानुसार पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी २६ कोटी ८३ लाखांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. लवकरच या कामांना सुरुवात होईल. अग्निशमन ना-हरकत प्रमाणपत्रासाठी उद्योगांना वाढीव दर आकारले जात असून हे दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ड आणि ड+ क्षेत्रात वसुली करून नका. पूर्वीच्या दराप्रमाणे वसुली करावी, असे  मंत्री श्री.सामंत यांनी सांगितले.

निर्यात धोरण अंतिम टप्प्यात

देशात कोणत्याही राज्यात निर्यात धोरण नाही. महाराष्ट्रात पहिल्यांदाच निर्यात धोरण तयार केले जात आहे. हे निर्यात धोरण अंतीम टप्प्यात आहे. या धोरणामुळे उद्योगांना मोठा दिलासा मिळेल. लघू उद्योजकांना परदेशातील उद्योगांची पाहणी करण्यासाठी दरवर्षी पाच उद्योजकांना परदेश दौऱ्यावर पाठविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

यवतमाळ जिल्ह्यात मोठे उद्योग सुरु होणार आहेत. नेर तालुक्यात व्हीतारा सारख्या मोठ्या कंपन्या उद्योग सुरु करणार आहेत. आगामी काळात जिल्ह्यात कोट्यवधींची गुंतवणूक येणार असून यातून तरुणांना रोजगार मिळणार आहे. हा प्रकल्प गेम चेंजर ठरणार आहे, असे पालकमंत्री संजय राठोड यावेळी म्हणाले. बैठकीत जिल्हा उद्योग केंद्रांचे महाव्यवस्थापक निलेश निकम यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

०००

 ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात ३० ऑक्टोबरला मं‍त्रिमंडळ निर्णयांची माहिती

मुंबई, दि. 27 :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची माहिती देण्यात आली आहे. राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर सोमवार दि. 30 ऑक्टोबर, 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत ‘दिलखुलास’ हा कार्यक्रम प्रसारित होईल.

वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील आणि वर्षा आंधळे यांनी मंत्रिमंडळ निर्णयांची माहिती ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे.

००००

मुंबई शहर जिल्ह्यातील प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध

मुंबई, दि. 27 – मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांच्या मतदान केंद्राची यादी व प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून मतदारांनी या याद्यांचे अवलोकन करून हरकती असल्यास 9 डिसेंबर 2023 पर्यंत त्या नोंदवाव्यात, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केले आहे. 

मतदान केंद्र आणि प्रारुप मतदार यादीबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी श्री.क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस उपमुख्य निवडणूक अधिकारी रवींद्र राजपूत, तहसीलदार अर्चना मुळे, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

मतदार यादीबाबत माहिती देताना श्री.क्षीरसागर म्हणाले की, दि. 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत भारत निवडणूक आयोगाने मुंबई शहर जिल्ह्यातीत 10 विधानसभा मतदारसंघातील एकूण 2509 मतदान केंद्रांच्या सुसूत्रीकरणाच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. या मतदान केंद्रांची यादी तसेच प्रारुप मतदार यादी मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाच्या www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालय तसेच मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदार संघ कार्यालयातील सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदारांनी या मतदार यादीचे अवलोकन करून दावे व हरकती असल्यास विहीत अर्ज नमुना क्रमांक सहा, सात व आठ भरून दि. 9 डिसेंबर 2023 पर्यंत संबंधित विधानसभा मतदार संघामध्ये नोंदवाव्यात.

या प्रारुप मतदार यादीतील एकूण मतदारांची संख्या 24 लाख 50 हजार 355 एवढी आहे. यामध्ये 8920 इतकी नवीन मतदार नोंदणी आहे. तर दुबार, मृत अथवा कायमस्वरूपी स्थलांतरित अशा 6107 मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. प्रारुप मतदार यादीतील पुरुष मतदारसंख्या 13 लाख 27 हजार 131 तर स्त्री मतदार संख्या 11 लाख 23 हजार 18 इतकी आहे. ऑक्टोबर 2023 मधील यादीमध्ये एक हजार पुरूषांच्या मागे 846 स्त्रिया असून तृतीयपंथी समुदायाची ऑक्टोबर 2023 मधील संख्या 206 इतकी असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. बूथ लेवल ऑफिसर (बीएलओ) यांनी घरोघरी जाऊन मतदार यादी अद्ययावत केली आहे. याद्वारे सुमारे 98 टक्के काम पूर्ण झाले असल्याचे श्री.क्षीरसागर यांनी सांगितले.

लोकसंख्येच्या प्रमाणात 18 ते 19 वर्षे वयोगटाच्या तरुणांचे प्रमाण सुमारे तीन टक्के आहे. तथापि, मतदार यादीतील त्यांचे प्रमाणे अर्धा टक्के आहे. यासाठी मुंबई शहर जिल्ह्यामध्ये युवा मतदारांची नोंदणी वाढवण्यासाठी महाविद्यालयांमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट मतदार मित्र महाविद्यालय पुरस्काराचे आयोजनही करण्यात आले आहे. शंभर टक्के मतदार नोंदणी केलेल्या आणि मतदार जागृतीचे उपक्रम राबवणान्या महाविद्यालयांना हे पुरस्कार दिले जाणार आहेत. महिला मतदारांचे प्रमाण वाढणे देखील आवश्यक असून यासाठी सहकारी गृहनिर्माण संस्थांना आवाहन करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी श्री.क्षीरसागर यांनी सांगितले.

सर्व पात्र नागरिकांची नावे मतदार यादीत यावीत यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. तथापि, मतदारांनी प्रारुप यादी तपासून त्यात नाव असल्याची खात्री करून सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

00000

बी.सी.झंवर/विसंअ

माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांच्या रुपाने मार्गदर्शक नेतृत्व काळाच्या पडद्याआड – धनंजय मुंडे

मुंबई, दि. 27 :- बीड जिल्ह्याचे माजी खासदार, माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांच्या निधनाचे वृत्त दुःखद असून त्यांच्या रुपाने मार्गदर्शक नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले, अशा शब्दात कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

बबनराव ढाकणे यांनी बीड जिल्ह्याचे खासदार म्हणून नेतृत्व केले होते. त्याचबरोबर केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले. राज्यात सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास या खात्यांचे मंत्री, विधानसभेचे विरोधीपक्ष नेते व उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काही काळ काम केले. ऊसतोड कामगार, शेतकरी-कष्टकऱ्यांचे नेते म्हणून त्यांची ओळख होती. गोवा मुक्तीच्या चळवळीतही त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले होते.

दि. 28 ऑक्टोबर रोजी बबनराव ढाकणे यांच्या पार्थिवावर मूळगाव पागोरी-पिंपळगाव, ता.पाथर्डी, जि.अहनदनगर येथे अंत्यसंस्कार केले जातील. ऊसतोड कामगार, शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार यांच्या प्रश्नांवर ते कायम आग्रही असायचे. त्यांच्या निधनानंतर मोठी पोकळी निर्माण झाली आहे, असेही मंत्री श्री.मुंडे यांनी म्हटले आहे.

००००

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतील ८ लाख १४ हजार मातांना ३२१ कोटी ५७ लाख रुपयांचे ऑनलाईन वितरण

मुंबई, दि. 27 : केंद्र सरकारच्या मदतीने राज्य शासन विविध योजनांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करीत आहे. राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीस यांना अंगणवाडी सेविका पदावर पदोन्नती देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते राज्यातील प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतील ८ लाख १४ हजार मातांना ३२१ कोटी ५७ लाख रुपयांचे ऑनलाइन वितरण करण्यात आले.

यशवंतराव चव्हाण सेंटर येथे केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाच्यावतीने आयोजित ‘प्रधानमंत्री मातृवंदना योजनेबाबत जनजागृती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री श्री.शिंदे बोलत होते. यावेळी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. मुंजपरा महेंद्रभाई, कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे, आमदार आशिष शेलार, केंद्रीय सचिव इंदेवर पांडे, राज्याच्या आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव, एकात्मिक बालविकास आयुक्त रुबल अग्रवाल आदींसह महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, महिला या मातृशक्ती असून समाज, नवीन पिढी घडविण्याचे काम करीत असल्याने ती आदिशक्तीही आहे. केंद्र सरकारच्या मदतीने महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य सरकार तत्पर आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संसदेमध्ये महिलांना आरक्षण देवून त्यांचा सन्मान केला आहे. स्वच्छ भारत ही मोहीम राबवून घरोघरी लाखो शौचालयांची निर्मिती केली. महिला समर्थ होतील, तरच देशाची प्रगती होईल, हे ओळखून प्रधानमंत्री देशातल्या दुर्बल महिलांना स्वत:च्या पायावर सन्मानाने उभे करीत आहेत. ग्रामीण भागात लाखो महिलांच्या नावाने घरे करण्यासाठी पीएम आवास योजनेतील घरांवर महिलांची नावे आली आहेत.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इतिहासात प्रथमच पोषण ट्रॅकर सुरु करून माता- मुलांना योग्य रीतीने पोषणाची सेवा मिळते किंवा नाही याची तपासणी सुरु केली. गेल्या दीड वर्षात राज्य शासनानेही महिलांच्या कल्याणासाठी, त्यांना सक्षम करण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ ही योजना राबवित असून 1 एप्रिल 2023 नंतर गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना लखपती करणार आहे. प्रधानमंत्री यांच्या 73 व्या वाढदिवसानिमित्त राज्यात “नमो 11 कलमी कार्यक्रम” राबवून महिला सशक्तीकरण अभियानातून 73 लाख महिलांना शासकीय योजनांचा लाभ देणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यातील महिलांना एसटी प्रवासात सरसकट ५० टक्के सवलत, नोकरदार महिलांसाठी ५० वसतिगृहे, महिलांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’सारख्या योजनेत एक कोटी ४० लाख महिलांची मोफत आरोग्य तपासणी केली. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत ३० लाख ४० हजार उद्दिष्ट असताना सुमारे ३५ लाख महिलांना लाभ देण्यात आले आहेत. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचे नवीन पोर्टल, मोबाईल अॅप, ऑनलाइन बेनिफिटचा शुभारंभ सुरू केला. दोन कोटी महिलांना बचत गटाच्या माध्यमातून सक्षम करणार असून बचत गटांना सक्षम करण्यासाठी पदार्थांच्या विक्रीसाठी योजना सुरू केली आहे. केंद्र सरकारप्रमाणे शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेतून वर्षाला सहा हजार रुपये दिले जात आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे बळकटीकरण करण्याचे काम केले जात आहे. महिला व बालविकास विभागाच्या अडचणी, प्रश्न सोडविण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

अंगणवाडी सेविकांच्या विम्यापोटीचा हप्ता केंद्र शासन भरणार – स्मृती इराणी

केंद्रीय महिला व बालविकास मंत्री श्रीमती इराणी म्हणाल्या की, राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीसांच्या पदोन्नतीसाठीची कार्यवाही लवकरच पूर्ण केली जाईल. अंगणवाडी सेविकांना मोबाईल फोन खरेदीसाठी १२८०० रुपये देण्यात येणार असून अंगणवाडी ताईच्या सुरक्षिततेसाठी प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजनेचा हप्ता केंद्र शासन भरेल. अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या कौशल्य विकासासाठी केंद्र शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. शहरी भागामध्ये रोजगारासाठी जाणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी एक हजार पाळणाघरे सुरू करण्यास केंद्र शासनामार्फत लवकरच आदेश निर्गमित करण्यात येतील. आपदग्रस्त महिलांसाठी राज्यांमध्ये 40 पेक्षा जास्त वन स्टॉप सेंटर सुरू आहेत. या वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून 38 हजार संकटग्रस्त महिलांना मदत झाली. राज्य शासनाच्या निर्भया फंडाबाबत केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, असेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय महिला व बालविकास राज्यमंत्री डॉ.महेंद्रभाई म्हणाले की, महिलांच्या शाश्वत विकासासाठी पूरक पोषण आहार देणे, शिक्षण विषयक धोरणे प्रभावीपणे राबविणे, लैंगिक समानतेसाठी काम करणे, महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देणाऱ्या योजना केंद्र सरकारद्वारे राबवल्या जात आहेत. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या माध्यमातून एक सशक्त आणि सक्षम भारत निर्माण होण्यासाठी ही योजना सर्वांच्या सहकार्याने प्रभावीपणे राबवूया, असे आवाहन त्यांनी केले.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना प्रभावीपणे राबवणार – मंत्री कु.आदिती तटकरे

महिला व बालविकास मंत्री कु.तटकरे म्हणाल्या की, माता व बालमृत्यूचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी महिला व बालविकास विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या समन्वयातून प्रभावीपणे काम सुरू आहे. आदिवासी पाड्यांमध्ये महिलांना संस्थात्मक प्रसूती होताना अडचणी येऊ नयेत यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. आदिवासी पाडे मुख्य रस्त्यांशी जोडण्यासाठी भगवान बिरसा मुंडा जोड रस्ता योजना सुरू केली आहे. याद्वारे 17 आदिवासी जिल्हे मुख्य रस्त्यांशी जोडण्यात येणार असून मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या माध्यमातून सर्व शासनाच्या योजना एकाच छताखाली राबवल्या जाणार आहेत. लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणासाठी तरतूद करण्यात आलेली आहे. राज्यामध्ये चौथ्या महिला धोरणाची लवकरच राज्यात अंमलबजावणी केली जाणार आहे. ग्रामीण व शहरी भागातील शेवटच्या बालकापर्यंत महिला व बाल विकास विभाग पोहोचत असून अंगणवाडी आणि मदतनीस यांच्या माध्यमातून सर्व योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची माहिती पुस्तिका, नवीन वेब पोर्टल आणि मोबाईल ॲपचे मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

०००००

संध्या गरवारे,विसंअ/धोंडिराम अर्जुन,स.सं

माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांच्या निधनाने सर्वसामान्यांसाठी लढणारा संघर्षयोद्धा हरपला -उपमुख्यमंत्री अजित पवार

 मुंबई, दि. 27 :- “माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव ढाकणे हे समाजातील गरीब, वंचित, दुर्बल घटकांच्या विकासासाठी लढणारे नेतृत्व होते. ऊसतोड कामगारांसाठी त्यांनी जीवनभर संघर्ष केला.  विद्यार्थी चळवळीतून समाजकारणात सक्रिय असलेल्या बबनराव ढाकणे यांनी शेवटच्या श्वासापर्यंत समाजाची चिंता केली. बाजार समिती, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, विधान परिषदेचे सदस्य, लोकसभेत खासदार, राज्य आणि केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपदापर्यंत अनेक जबाबदाऱ्या सांभाळताना प्रत्येक पदाला न्याय दिला. बबनराव ढाकणे हे लढाऊ नेतृत्व होत. त्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कासाठी संघर्ष केला. त्यांचे जीवन हे राजकीय, सामाजिक जीवनात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक, प्रेरणादायी आहे. त्यांच्या निधनाने संघर्षयोद्धा हरपला आहे. सामाजिक चळवळीची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या, कार्यकर्त्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. बबनराव ढाकणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बबनराव ढाकणे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करुन आदरांजली वाहिली आहे.

००००

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना आवश्यक सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील : कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

0
नाशिक, दि. 4 जुलै, 2025 (जिमाका वृत्तसेवा): रस्ते वीज व पाणी या शेतकऱ्याच्या मूलभूत गरजा असून पूर्ण करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना आवश्यक उपलब्ध करून देण्यासाठी...

कामात कुचराई करणाऱ्यांची गय न करता शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्य सेवा पुरवा – केंद्रीय आरोग्य...

0
बुलढाणा,दि. 4 (जिमाका) : सर्वसामान्य गोरगरीब जनतेपर्यत आरोग्य सेवा सहज ,सुलभ आणि माफक दरात पोहचविण्याचा केंद्र सरकारचा हेतू आहे . हा हेतू साध्य करण्यासाठी आणि...

‘माये’चं दूध… नवजातांसाठी संजीवनी!

0
जळगावच्या 'ह्युमन मिल्क बँके'तून २०००हून अधिक बाळांना मिळाला जीवनदायी आधार आईपण म्हणजे माया, वात्सल्य आणि त्याग. पण काही वेळा ही आई काही कारणांमुळे बाळाला दूध...

बॉम्बे बार असोसिएशनतर्फे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार

0
मुंबई, दि. ४ : मुंबई उच्च न्यायालयाची ही इमारत, बॉम्बे बार असोसिएशन आणि इथल्या माझ्या सहकाऱ्यांनी मला घडवलं. आज जे काही आहे ते या...

जीएसटी उत्पन्न विश्लेषणासाठी मंत्रिगटाची पहिली बैठक

0
नवी दिल्ली, दि. 4 : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिगटाची (GoM) वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) उत्पन्नाच्या विश्लेषणासाठी पहिली बैठक महाराष्ट्र सदन,...