मंगळवार, जुलै 8, 2025
Home Blog Page 1060

‘जल दिवाळी’ : ‘महिलांसाठी पाणी, पाण्यासाठी महिला’ अभियान देशभरात सुरु

नवी दिल्ली, 6: घराघरांत शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी पुरविण्यात यावे या उद्दिष्टातून ‘जल दिवाळी’ : ‘महिलांसाठी पाणी, पाण्यासाठी महिला’ अभियान केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाद्वारे  देशभरात सुरु करण्यात आले आहे.  या अभियानाव्दारे जल प्रशासनाच्या यंत्रणेत महिलांचा समावेश करण्यात येईल व त्यांना या क्षेत्रातही काम करण्याची संधी  उपलब्ध होऊ शकेल.

गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने जल दिवाळी मोहीम सुरू केली आहे – ‘महिलांसाठी पाणी, पाण्यासाठी महिला’. मंत्रालयाने अटल मिशन फॉर रिजुवेनेशन ॲण्ड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (AMRUT) या प्रमुख योजनेअंतर्गत ही मोहीम सुरू केली आहे. जलदिवाळी मोहिमेचे उद्दिष्ट 550हून अधिक जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये महिला बचत गटांच्या जल प्रशासन यंत्रणेला भेटी देणे आहे.

जल दिवाळी मोहिमेविषयी

गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या (AMRUT) अंतर्गत हा प्रगतिशील उपक्रम सात ते नऊ नोव्हेंबर 2023 पर्यंत सुरू राहील. जलदिवाळी मोहिमेत राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (NULM) देखील सहभागी होत आहे. या मोहिमेचा ‘नॉलेज पार्टनर’ ओडिशा अर्बन अकादमी आहे. जल प्रशासन प्रणाली अंतर्गत स्थापन केलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पांना (WTP) महिलांना भेट देण्याचा उपक्रम आहे. यामुळे महिलांना त्यांच्या घरात स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या महत्त्वाच्या प्रक्रिया चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत होईल. यासोबतच महिलांना पाण्याच्या गुणवत्तेच्या चाचणी प्रोटोकॉलची माहिती मिळेल, ज्यामुळे त्यांना त्यांच्या अपेक्षित पाण्याच्या गुणवत्तेची कल्पना येईल.

देशभरात 3,000 हून अधिक जलशुद्धीकरण सयंत्रे आहेत. या प्रकल्पांची बांधलेली जल प्रक्रिया क्षमता 65,000 एमएलडी पेक्षा जास्त आहे आणि कार्यान्वित क्षमता 55,000 एमएलडी पेक्षा जास्त आहे. या मोहिमेअंतर्गत महिला बचत गट (SHGs) 550 हून अधिक जलशुद्धीकरण केंद्रांना त्यांच्या शहरातील वनस्पती भेट देतील. या 550 जलशुद्धीकरण केंद्रांची एकत्रित कार्य क्षमता 20,000 एमएलडी आहे.

भारतासारख्या देशात घरगुती पाणी व्यवस्थापनात महिलांचा मोठा वाटा आहे. अशा परिस्थितीत महिलांना पाण्याशी संबंधित योग्य माहिती असणे आवश्यक आहे. ‘महिलांसाठी पाणी, पाण्यासाठी महिला’ या संकल्पनेवर आधारित गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या जलदिवाळी मोहिमेमुळे महिलांना पिण्याच्या पाण्याच्या प्लांटपासून ते घरापर्यंत शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचे पाणी पुरविण्याची प्रक्रिया जाणून घेण्यास मदत होईल. याद्वारे त्यांना पाण्याची गुणवत्ता देखील समजू शकेल, ज्यामुळे प्रत्येक घरात दर्जेदार पाण्याची उपलब्धता सुनिश्चित होईल. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात 15,000 पेक्षा जास्त बचत गटातील महिलांचा सहभाग अपेक्षित आहे.

मुंबईत ८ ते १४ नोव्हेंबरदरम्यान ‘पु. ल. कला महोत्सव २०२३’

मुंबई, दि. ६: महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु.ल. देशपांडे यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य विभाग, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या वतीने ८ ते १४ नोव्हेंबर, २०२३ या कालावधीत ‘पु. ल. कला महोत्सव २०२३’ चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन बुधवारी ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या कलांगण प्रांगणात होणार आहे. रसिकांना या महोत्सवात साहित्य, गायन, वादन, नृत्य, नाट्य अशा विविध कला प्रकारांवर आधारित विविध कार्यक्रमांची पर्वणी मिळणार आहे. उद्घाटनानंतर कलांगण येथेच काफिला, कोल्हापूर या संस्थेचा मराठी, हिंदी, ऊर्दू, प्रेम साहित्यावर आधारित ‘जियारत’ हा कार्यक्रम सादर होईल.

गुरुवारी ९ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ७ वाजता नवीन लघुनाट्यगृहात पंडित डॉ. राम देशपांडे यांच्या ‘शतदीप उजळले’ या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाने महोत्सवाची पहाट सजणार आहे. त्यासोबतच सायंकाळी ६:३० वाजता ओमकार अंध-अपंग सामाजिक संस्थेचे विशेष प्रशिक्षण घेतलेले दिव्यदृष्टी असलेले कलाकार मल्लखांबाचे सादरीकरण करणार आहेत तर सायंकाळी  ७:३० वाजता अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, वाशी यांच्यावतीने कलांगण येथेच गायन, वादन व नृत्याचा आनंददायी आविष्कार अर्थात ‘संगीत संध्या’ रंगणार आहे.

शुक्रवारी १० नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५:३० वाजता पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या वतीने पु. ल. आणि बंगाल यांचा साहित्यिक आणि सांगितिक भावबंध उलगडणारा ‘शोंगित शिल्पी पी. एल. बाबू’ हा कार्यक्रम कलांगण येथे सादर होईल. यात रवींद्र संगीतासाठी अरुंधती देशमुख, बाऊल संगीतासाठी डॉ. उत्तरा चौसाळकर सहभागी होणार असून ज्येष्ठ पत्रकार हेमकांत नावडीकर हे पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा देणार आहेत. या कार्यकमाचे निरुपण धनश्री लेले करणार आहेत.  सायंकाळी ७:३० वाजता कलांगण येथेच विदुषी आशा खाडीलकर आणि सहकारी ‘पु. ल. एक आनंदस्वर” या पु. ल. देशपांडे यांच्या सांगितीक कारकिर्दीवर आधारित कार्यक्रम सादर करणार आहेत.

शनिवारी ११ नोव्हेंबर २०२३ रोजी सायं.५ वाजता पं. मिलिंद रायकर आणि सहकारी ‘व्हायोलिनचे रंग-तरंग’ या कार्यक्रमात शास्त्रीय, उपशास्त्रीय, तसेच पाश्चात्य व चित्रपट संगीतातील व्हायोलिनच्या सुरांचे अनोखे सादरीकरण करणार आहेत. तद्नंतर सायंकाळी ७ वाजता संस्कार भारती, कोकण प्रांताचे गुणवंत कलाकार महाराष्ट्रातील विविध लोककलांचे संगीतमय सादरीकरण ‘लोकरंग दिवाळी संध्या’ या कार्यक्रमात करणार आहेत. हे दोन्ही कार्यक्रम कलांगण येथे होणार आहेत.

दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सोमवारी १३ नोव्हेंबर २०२३ सायं. ६ वा. अभिजात रंगयात्रा या संस्थेचे कलाकार ‘संग्रहापलीकडचे पु.ल.’ हा पु. ल. देशपांडे यांच्या प्रकाशित परंतु असंग्रहित साहित्यावर आधारित कार्यक्रम सादर करणार आहेत. तद्नंतर उत्स्फूर्त, ठाणे यांचे कलाकार अभिवाचन, नाट्यप्रवेश यांसह दृकश्राव्य सादरीकरणातून ‘स्त्री व्यक्तिरेखा…. पु. ल. यांच्या लेखनातल्या’ हा कार्यक्रम कलांगण येथे सादर करणार आहेत.

मंगळवार, दि. १४ नोव्हेंबर २०२३ सकाळी ७ वाजता पं. शैलेष भागवत आणि विदुषी आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या मधुर स्वरांनी ‘अभ्यंग संगीत साधना महोत्सव – दीपावली पहाट’ कलांगण येथे रंगणार आहे. तर बालदिनाचे औचित्य साधून विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना मानवंदना देण्यासाठी सकाळी १० वाजता नवीन लघुनाट्यगृहात, ‘फुलवा मधुर बहार’ हे संगीत बालनाट्य कलांगण, मुंबई ही संस्था सादर करणार आहे. सायंकाळी ५ वाजता नवीन लघुनाट्यगृहात, भारतीय मूर्तिकलेवर आधारित शास्त्रीय नृत्याच्या माध्यमातून ‘भगवती’ हा स्त्री-शक्तीचा जागर करणारा  कार्यक्रम ज्येष्ठ नृत्यांगना सोनिया परचुरे आणि सहकारी सादर करणार आहेत.

पु. ल. कला महोत्सवाची सांगता रात्रौ ८ वाजता पं. कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘अभ्यंग संगीत साधना महोत्सव अंतर्गत विदुषी कलापिनी कोमकली यांच्या गायनाने कलांगण येथे होणार आहे.

‘पु. ल. कला महोत्सवांमध्ये सादर होणारे विविध कार्यक्रम हे सर्वांसाठी विनामूल्य आहेत. तरी सर्व पुलप्रेमींनी तसेच कलासक्त रसिकजनांनी या महोत्सवाचा आनंद घ्यावा’, असे आवाहन मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या प्रकल्प संचालक मीनल जोगळेकर यांनी केले आहे.

00000

दीपक चव्हाण/विसंअ

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त आजी-माजी सदस्यांचा स्नेह मेळाव्यासह परिसंवाद

मुंबई, दि. ६ : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त विधानपरिषदेच्या आजी- माजी सदस्यांसाठी स्नेहमेळावा आणि परिसंवादाचे बुधवार ८ नोव्हेंबर २०२३ सकाळी ११.१५ वाजता मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ही माहिती दिली.

संसदीय लोकशाहीत द्विसभागृह व्यवस्थेत महाराष्ट्र विधानपरिषदेने उल्लेखनीय योगदान दिले आहे. या सभागृहाने आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. माँटेग्यू- चेम्सफर्ड समितीच्या शिफारशीनुसार भारत सरकार अधिनियमान्वये बॉम्बे लिजिस्लेटिव्ह कौन्सिलची प्रारंभिक बैठक १९ फेब्रुवारी १९२१ रोजी टाऊन हॉल, मुंबई येथे झाली. नारायण गणेश चंदावरकर यांची सभापतिपदी नियुक्ती झाली होती. तत्पूर्वी १८६२ ते १९२० या कालावधीत गव्हर्नर ऑफ बॉम्बे यांच्या अध्यक्षतेखाली कौन्सिलचे कामकाज चालत असे. सन १९२१ मध्ये नारायण चंदावकर यांच्या रुपाने प्रथमच भारतीय व्यक्तीची सभापती म्हणून नियुक्ती झाली. सन १९२१ ते २०२१ हा महाराष्ट्र विधानपरिषदेचा शतकपूर्तीचा कालखंड मानता येईल. मात्र, ‘कोविड १९’ महामारीमुळे त्यावेळी जाहीर कार्यक्रम आयोजित करता आला नाही. या पार्श्वभूमीवर आता हा कार्यक्रम होईल.

विधानपरिषदेच्या शतक महोत्सवी वर्षाच्या नियोजनासाठी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली गटनेते, सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री, दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते आदी मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे.

स्नेहमेळाव्यासह ‘वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्व’, ‘आमच्या आठवणीतील विधानपरिषद’ (असे सदस्य…असे प्रसंग) या विषयांवर परिसंवाद होईल. याशिवाय ‘विधानपरिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त विधानपरिषद या दुसऱ्या सभागृहाचे महत्त्व आणि वैशिष्ट्ये’, ‘गेल्या १०० वर्षातील महत्त्वपूर्ण विधेयके, ठराव’, ‘लोकहिताच्या महत्त्वाच्या प्रश्नांवरील चर्चा’, ‘शंभर वर्षे शंभर भाषणे’ आणि छायाचित्रांचे संकलन असलेले कॉफी टेबल बुक, अशी पाच प्रकाशने प्रस्तावित आहेत.

‘एकात्मिक आरोग्यासाठी आयुर्वेद’ : रेसकोर्स मुंबई येथे ७ नोव्हेंबर रोजी ‘रन फॉर आयुर्वेद’-  मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई, दि. ६ : केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्था आणि आयुष्य संचालनालय यांच्यामार्फत मंगळवार, ७ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ५.३० वाजता रेसकोर्स, महालक्ष्मी, मुंबई येथे एकात्मिक आरोग्यासाठी आयुर्वेद करिता ‘रन फॉर आयुर्वेद’ आयोजन करण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, ‘धन्वंतरी जयंती (धनत्रयोदशी) हा केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने २०१६ मध्ये ‘आयुर्वेद दिवस’ म्हणून घोषित केला आहे. या वर्षी आयुष मंत्रालय 8 वा आयुर्वेद दिवस 2023 ‘एकात्मिक आरोग्यासाठी आयुर्वेद’ या घोषवाक्यासह साजरा करीत आहे. जी 20 च्या पारंपरिक औषधावर आणि G20 प्रेसिडेन्सीची संकल्पना ‘वसुधैव कुटुंबकम्’ या घोषवाक्यासह प्रत्येक दिवशी प्रत्येकासाठी आयुर्वेद”, मानव प्राणी वनस्पती- पर्यावरण इंटरफेसवर लक्ष केंद्रित करणे हे उद्दिष्ट आहे.

यादरम्यान आयुष संचालनालयाचे संचालक डॉ. रामन घुंगराळेकर पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले  की, आर. आर.ए.पी. केंद्रीय आयुर्वेदिक संशोधन संस्था, पोदार मेडिकल कॅम्पस, वरळी, मुंबई येथे सन 1986 पासून आरोग्य सेवा तसेच असंसर्गजन्य रोग (जसे की कर्करोग, मधुमेह, रक्तदाब) इत्यादीवरील क्लिनिकल संशोधनात काम करत आहे. केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद (सीसीआरएएस) नवी दिल्ली अंतर्गत कार्यरत असलेली परिघीय संस्था आहे. सीसीआरएएस, नवी दिल्ली ही आयुर्वेदिक विज्ञानातील संशोधनासाठी भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली सर्वोच्च स्वायत्त संशोधन संस्था आहे.

या संदर्भात विविध मंत्रालये, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आणि जगभरातील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी आयुष मंत्रालयाने सीसीआरएएसला केंद्रीय नोडल एजन्सी म्हणून नियुक्त केले आहे. सार्वजनिक आरोग्य आणि भूमी आरोग्यासाठी जनसंदेश, लोकसहभाग आणि लोकचळवळ निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमासाठी सहकार्य अपेक्षित असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी प्रभारी सहायक निदेशक डॉ. आर.गोविंद रेड्डी यांनी पोदार केंद्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थानच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. अधिक माहितीसाठी संपर्क करा: 022-24927259, 24947822, 9820284671, ईमेल: ahini Interday.cerimurtioiingmon.cotn and huurestoday.org.in. या संकेतस्थळावर संपर्क साधावा.

00000000

राजू धोत्रे/विसंअ

आनंदाचा शिधा : ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ७ ते १० नोव्हेंबरदरम्यान मंत्री छगन भुजबळ यांची मुलाखत

मुंबई, दि. 6: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘आनंदाचा शिधा’ तसेच विभागाच्या विविध योजना आणि उपक्रम या विषयावर अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे.

राज्यात सणांचे दिवस सुरू आहेत. राज्यातील सर्वसामान्य जनतेची दिवाळी गोड करण्यासाठी शासन स्तरावर ‘आनंदाचा शिधा’ वाटप करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामध्ये राज्यातील रेशनकार्डधारक लाभार्थींना विविध वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. ‘आनंदाचा शिधा’ हा उपक्रम नेमका काय आहे, राज्यात याची अंमलबजावणी कशा प्रकारे करण्यात येत आहे, सणांच्या कालावधीत नागरिकांना सुरक्षित अन्न पदार्थ उपलब्ध व्हावेत, नागरिकांची कोणतीही फसवणूक होऊ नये यासाठी शासनस्तरावर कशा प्रकारे खबरदारी घेण्यात येत आहे, गरजू लाभार्थ्यांसाठी विभागामार्फत कोणत्या योजना राबविण्यात येत आहेत. याबाबतची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री श्री. भुजबळ यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून दिली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत मंगळवार दि. 7, बुधवार दि. 8, गुरुवार दि. 9 आणि शुक्रवार दि. 10 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत गुरुवार, दि. 9 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

००००

जयश्री कोल्हे/स.सं

राज्य आपत्ती व्यवस्थापन दल प्रशिक्षण केंद्र कोयनानगर येथे स्थापण्याचा प्रस्ताव गृह विभागाने तयार करावा – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि.6 : सातारा जिल्ह्यातील कोयनानगर येथे राज्य आपत्ती व्यवस्थापन दल प्रशिक्षण केंद्र निर्मितीचा प्रस्ताव गृह विभागाने तातडीने सादर करावा, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

कोयनानगर येथे नियोजित असलेल्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण दल, पोलीस प्रशिक्षण उपकेंद्राच्या सद्यस्थितीचा आढावा बैठक आज मंत्रालयात मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते.

मंत्री श्री. देसाई म्हणाले की, कोयनानगर येथे नियोजित असलेल्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण दल व पोलीस प्रशिक्षण उपकेंद्रासाठी जागा मिळाली आहे. यामध्ये खेळाचे मैदान, कवायत मैदान, निवासी बांधकाम, प्रशासकीय इमारत यासाठी आवश्यक आराखडा तयार करण्यात यावा.

या बैठकीस विशेष पोलिस महानिरीक्षक अशोक मोराळे (राज्य राखीव पोलीस बल, पुणे) गृह विभागाचे सहसचिव अ. ए. कुलकर्णी, वित्त विभागाचे सहसचिव विवेक दहीफळे, सहायक पोलिस महानिरीक्षक विजय खरात उपस्थित होते.

००००

शैलजा पाटील/विसंअ

हिरालाल समरिया नवे मुख्य माहिती आयुक्त; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली शपथ

नवी दिल्ली, दि. 6 : देशाचे 12वे  मुख्य माहिती आयुक्त म्हणून हिरालाल समरिया यांची नियुक्ती झाली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी माहिती आयुक्त श्री. समरिया यांना राष्ट्रपती भवनात मुख्य माहिती आयुक्त पदाची आज शपथ दिली. श्री.समरिया सध्या माहिती आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांनी कामगार आणि रोजगार मंत्रालयात सचिव म्हणूनही काम केले आहे.

हिरालाल समरिया यांच्याविषयी

श्री. समरिया यांचा जन्म राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील पहाडी या दुर्गम आणि लहान गावात 14 सप्टेंबर 1960 रोजी झाला. ते 1985 च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत.

त्यांनी राजस्थान विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत त्यांनी कामगार आणि रोजगार मंत्रालयात सचिव आणि अतिरिक्त सचिव पदावर काम केले आहे. रसायने आणि खते मंत्रालयातील सहसचिव, तसेच तेलंगणा व आंध्रप्रदेश राज्यातही त्यांनी आपली सेवा दिलेली आहे.

राष्ट्रपती भवनात आज सकाळी 10 वाजता झालेल्या समारंभात श्री.समरिया यांना केंद्रीय माहिती आयोगाच्या मुख्य माहिती आयुक्तपदाची शपथ देण्यात आली. वाय.के.सिन्हा यांचा कार्यकाळ संपल्यानंतर रिक्त झालेल्या मुख्य माहिती आयुक्त पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

राज्य नाट्य स्पर्धेसाठी प्रवेशिका सादर करण्यास दहा दिवसांची मुदतवाढ

मुंबई, दि. 06: महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धेतील प्रवेशिका सादर करण्यास दहा दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे यासंदर्भात विनंती करणारे निवेदन हौशी नाट्य कलावंत संघटनेने दिले होते. या निवेदनाची तत्काळ दखल घेऊन मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांस्कृतिक कार्य संचालनालयास कार्यवाहीचे निर्देश दिले.

हिंदी, संस्कृत, संगीत, बालनाट्य व दिव्यांग नाट्य या स्पर्धांसाठी प्रवेशिका सादर करण्याची अंतिम तारीख 6 नोव्हेंबर 2023 होती. मात्र काही संघटनांनी या प्रवेशिका सादर करण्यास मुदतवाढ द्यावी अशी मागणी मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्याकडे केली होती. या मागणीचा विचार करून मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दहा दिवसांची मुदतवाढ देण्यात येत आहे अशी घोषणा केल्याची माहिती, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी दिली.

राज्य नाट्य स्पर्धेतील हिंदी, संस्कृत, संगीत, दिव्यांग नाट्य, बालनाट्य या स्पर्धेत भाग घेण्यास इच्छुक असलेल्या संघांनी ऑनलाइन पद्धतीने 15 नोव्हेंबर पर्यंत अर्ज सादर करावेत असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहे.

000

दीपक चव्हाण/विसंअ

 

 

उपलब्ध पाणीसाठ्यानुसार ऑगस्ट २०२४ अखेर पिण्याच्या पाण्याचे फेरनियोजन सादर करावे : पालकमंत्री दादाजी भुसे

नाशिक, 6 नोव्हेंबर (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात आजमितीस असलेला धरणसाठा विचारात घेवून ऑगस्ट 2024 अखेर पिण्याच्या पाण्याचे फेरनियोजन सादर करावे, असे निर्देश पालकमंत्री दादाजी भुसे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित आकस्मिक पिण्याचे पाणी आरक्षण निश्चिती समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीस विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार सर्वश्री दिलीप बनकर, ॲड.माणिकराव कोकाटे, सीमा हिरे, प्रा. देवयानी फरांदे, ॲड.राहुल आहेर, हिरामण खोसकर, सरोज अहिरे, नितिन पवार, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त डॉ.अशोक करंजकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, लाभ क्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता महेंद्र आमले, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी  अभियंता सोनल शहाणे, कार्यकारी अभियंता वैभव भागवत,  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, या वर्षी जिल्ह्यात पर्जन्यमान कमी झाले आहे. परतीचा पाऊसही पुरेसा झालेला नाही. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये टंचाईची स्थिती निर्माण होत असून काही तालुके शासनाने दुष्काळी घोषित केले आहेत. त्यामुळे धरण समूहातील पाणीसाठ्याचे काटकोरपणे नियोजन करणे आवश्यक आहे. मध्यम व मोठे प्रकल्पातील पाणीसाठा लक्षात घेवून नियोजन करावे. हे करतांना एकूण लोकसंख्येनुसार पाण्याची आवश्यकता, जनावरांसाठी लागणारे पाणी, औद्योगिक वसाहतींना लागणारे पाणी, औद्योगिक वसाहतीत आलेले नवीन प्रकल्पांची संख्या, शेती व फळबागांसाठी लागणारे पाण्याची मागणी याबाबी सुक्ष्मपणे लक्षात घेणे आवश्यक आहे.

आजच्या वस्तूस्थितीनुसारच फेरनियोजनाची आकडेवारी निश्चित केलेली असावी. भविष्यातील टंचाईची परिस्थिती लक्षात घेता पाण्याचा अपव्यय होणार नाही याची काळजी घ्यावी. अशा सूचनाही पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी दिल्या.

बैठकीत लोकप्रतिनिधींनी पाण्याबाबत मौलिक सूचना केल्या. त्याअनुषंगाने लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारत घेवून त्याबाबत योग्य ती कार्यवाही करणेबाबत पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सूचित केले.
0000000

महापरिनिर्वाण दिनासाठी सुविधांबाबत सूक्ष्म नियोजन करून अंमलबजावणी करावी – मुख्य सचिव मनोज सौनिक

मुंबई, दि. ६ : दादर येथील चैत्यभूमीवर ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येत असतात.  देशभरातून अनुयायी १ डिसेंबरपासूनच चैत्यभूमीकडे येतात. त्यामुळे चैत्यभूमी व शिवाजी पार्क येथे अनुयायांसाठी उत्तम व्यवस्था करावी. त्यासाठी सूक्ष्म नियोजन करून अंमलबजावणी करावी,  अशा सूचना मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी आज दिल्या.

मुख्य सचिव कार्यालयाच्या समिती कक्षात महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने चैत्यभूमी व शिवाजी पार्क येथे मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पुरविण्यात येणाऱ्या सुविधांबाबत मुख्य सचिव श्री.सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी पुरविण्यात येणाऱ्या सुविधांचा आढावा घेताना मुख्य सचिव श्री. सौनिक बोलत होते. बैठकीस मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रधान सचिव आशिष शर्मा, जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, महानगर पालिकेचे उपायुक्त श्री. बिरादार, महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे, सरचिटणीस नागसेन कांबळे आदी उपस्थित होते.

महापरिनिर्वाण दिनाला येणाऱ्या अनुयायांकरिता पिण्याचे पाणी, शौचालय आदींची सुविधा सज्ज करण्याचे निर्देश देत मुख्य सचिव श्री. सौनिक म्हणाले की, मागील वर्षापेक्षा जास्त सुविधा देण्यात याव्यात. शौचालये ही पारंपरिक पद्धतीची न वापरता केमिकल पद्धतीची उपयोगात आणावी. गर्दीची ठिकाणे चिन्हांकित करून तेथे आधुनिक धूळ नियंत्रण यंत्रांचा उपयोग करून धूळ नियंत्रित करावी. चैत्यभूमी येथील संरक्षक भिंतीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण करावे. चैत्यभूमी परिसरात वॉटरप्रूफ मंडप टाकण्यात यावा. प्रत्येक विभागाने आपल्याला दिलेली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडावी. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील, याची दक्षता घ्यावी.

बैठकीत महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीच्या वतीने श्री. कांबळे यांनी विविध मागण्या मांडल्या. याप्रसंगी उपायुक्त श्री. बिरादार यांनी पुरविण्यात येणाऱ्या सुविधांची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. बैठकीला संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

००००

नीलेश तायडे/विसंअ

 

ताज्या बातम्या

विकसित महाराष्ट्र- २०४७’ सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करावे

0
विधानसभा/विधानपरिषद निवेदन मुंबई दि. ८ : राज्य शासनाने १०० दिवसांच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर दिनांक ०६ मे २०२५ ते दिनांक ०२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत १५०...

विधानसभा लक्षवेधी

0
खारघर परिसरातील दारूबंदीचे निवेदन प्राप्त झाल्यास योग्य ती कार्यवाही करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई, दि. ८ :  खारघर परिसरात प्रभागाकरिता दारूबंदी करण्याबाबत विहित प्रक्रियेनुसार...

 ‘दिलखुलास’ मध्ये मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या प्रमुख शुभांगी भुते यांची १०, ११, १२ व १४...

0
मुंबई, दि. ८: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात, 'हवामान अंदाज तंत्रज्ञान आणि प्रादेशिक हवामान केंद्राची कार्यपद्धती' या विषयावर मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या...

संसदीय राजभाषा समिती सदस्यांकडून राज्यपालांची भेट

0
मुंबई, दि. ८: संसदीय राजभाषा समितीच्या ९ सदस्यांनी समितीचे निमंत्रक खासदार डॉ. दिनेश शर्मा (उ.प्र.) यांच्या अध्यक्षतेखाली राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई...

शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई दि. 7 : मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. महामार्गाच्या संदर्भात विधानभवनात...