मंगळवार, जुलै 8, 2025
Home Blog Page 1059

छत्तीसगडच्या मतदार यादीत समाविष्ट मतदारांना १७ नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी

मुंबई, दि.७ : भारत निवडणूक आयोगाच्या ९ ऑक्टोबर, २०२३ रोजीच्या सहपत्रानुसार महाराष्ट्र शासनाद्वारे छत्तीसगड राज्यातील जे मतदार महाराष्ट्र राज्यातील सीमा लगतच्या जिल्ह्यांमध्ये (गोंदिया व गडचिरोली) कार्यरत आहेत; तथापि, त्यांची नावे छत्तीसगड राज्यातील मतदार यादीमध्ये समाविष्ट आहेत. अशा मतदारांना शुक्रवार, १७ नोव्हेंबर २०२३ या मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

मध्यप्रदेश राज्यातील जे मतदार महाराष्ट्र राज्यातील सीमा लगतच्या जिल्ह्यांमध्ये (नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलडाणा, अमरावती, नागपूर, भंडारा व गोंदिया) कार्यरत आहेत; तथापि, त्यांची नावे मध्य प्रदेश राज्यातील मतदारयादीमध्ये समाविष्ट असलेल्या मतदारांना शुक्रवार १७ नोव्हेंबर २०२३ या मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. तेलंगणा राज्यातील जे मतदार महाराष्ट्र राज्यातील सीमा लगतच्या जिल्ह्यांमध्ये (गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ व नांदेड) कार्यरत आहेत; तथापि, त्यांची नावे तेलंगणा राज्यातील मतदार यादीमध्ये समाविष्ट असलेल्या मतदारांना गुरुवार, ३० नोव्हेंबर, २०२३ या मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ही सुट्टी केवळ मतदानाच्या दिवशी अनुज्ञेय राहील. याविषयी शासनाने  अधिसूचना निर्गमित केली आहे.

0000000

राजू धोत्रे/विसंअ

आयुर्वेदाचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जनजागृती आवश्यक – दिनेश वाघमारे

मुंबई, दि. 7 : आयुर्वेदाला सुमारे ३ हजार वर्षांची परंपरा आहे. आयुर्वेदातील उपचार पद्धतींमध्ये वनौषधी, वनस्पतीजन्य औषधी, आहाराविषयक नियम, व्यायामाचे विविध प्रकार आणि त्याद्वारे शरीरातील नैसर्गिक प्रतिकार शक्तीला वाढविण्यासाठी आयुर्वेदाचे महत्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जनजागृती आवश्यक असल्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी सांगितले.

मुंबई येथील रेसकोर्स येथे केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्था आणि आयुष्य संचालनालय  एकात्मिक आरोग्यासाठी आयुर्वेद करीता “रन फॉर आयुर्वेद” चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी  श्री. वाघमारे बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण व आयुष विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, आयुष संचालक डॉ.रामण घुंगराळेकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर व डॉ. आर. गोविंद रेड्डी, सहाय्यक संचालक, केंद्रीय आयुर्वेदीय अनुसंधान संस्थान उपस्थित होते.

श्री. वाघमारे म्हणाले की, ‘धन्वंतरी जयंती (धनत्रयोदशी) हा दिवस भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने २०१६ मध्ये “आयुर्वेद दिवस” म्हणून घोषित केला आहे. या वर्षी, आयुष मंत्रालय 8 वा आयुर्वेद दिवस 2023 एकात्मिक आरोग्यासाठी आयुर्वेद या घोषवाक्यासह साजरा करत आहे. जी-20 च्या पारंपरिक औषधावर आणि G20 प्रेसिडेन्सीची संकल्पना ‘वसुधैव कुटुंबकम्’ या घोषवाक्यासह प्रत्येक दिवशी प्रत्येकासाठी आयुर्वेद”, मानव प्राणी वनस्पती- पर्यावरण इंटरफेसवर लक्ष केंद्रीत करणे हे उद्दिष्ट आहे.

श्री.वाघमारे यांनी हिरवा झेंडा दाखवून रन फॉर आयुर्वेदा मॅरेथॉनची सुरुवात झाली. या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक मंडळ, प्रभादेवी, हास्य क्लब, वरळी व इतर स्थानिक एन.जी.ओ. यांनी देखील सहभाग घेतला. युनियन बँक ऑफ इंडिया, श्री. धूतपापेश्वर लिमिटेड, चरक फार्मास्युटिकल प्रा.लि. व आर्य वैद्य फार्मसी यांनी कार्यक्रमाच्या आयोजनास विशेष सहकार्य केले. प्रभारी सहायक निदेशक डॉ. आर. गोविंद रेड्डी यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रज्ञा कापसे, डॉ. कुलदीप चौधरी यांनी केले, तर आभार डॉ. घुंगराळेकर यांनी मानले.

००००

 

राजू धोत्रे/विसंअ/

 

 

 

सागर तटीय क्षेत्रातील जिल्ह्यात ९ नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय आपत्तीपूर्व प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रम

मुंबई, दि.७ : सागर तटीय क्षेत्रात चक्रीवादळापूर्वीची सूचना देणाऱ्या  आणि तत्काळ उपययोजना संदर्भात राज्यस्तरीय आपत्तीपूर्व  प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक कार्यक्रम २४ नोव्हेंबरपर्यंत चार टप्प्यात राबविण्यात येत आहे. स्थानिक प्रशासन आणि स्थानिकांनी चक्रीवादळासारखी आपत्ती आल्यानंतर कशा प्रकारे प्रतिसाद द्यावा. यासाठी ही प्रात्यक्षिके आयोजित केली आहेत. ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत ही पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नवी मुंबई या जिल्ह्यातील ठिकाणे निवडून प्रात्यक्षिक घेण्यात येणार आहे. स्थानिकांसाठी ही  प्रात्यक्षिके फक्त अभ्यासासाठी असून यावेळी घाबरून जावू नये, असे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन संचालक अप्पासो धुळाज यांनी केले आहे.

आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडून राज्यात  चार टप्प्यामध्ये आपत्तीपूर्व आणि आपत्तीनंतर घ्यावयाची खबरदारी बाबत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे. तिसऱ्या टप्प्यात  दि. ९ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून प्रात्यक्षिकांचे आयोजन स्थानिक प्रशासनामार्फत करण्यात आलेले आहे.

या प्रशिक्षण उपक्रमात पालघर जिल्ह्यातील वसई,डहाणू आणि पालघर,ठाणे जिल्ह्यातील कल्याण, भिंवडी, अंबरनाथ, मुंबई शहर मधील मालाड,शिवडी,दादर,रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरूड, दिवेआगार, ऊरण, श्रीवर्धन, मालाड, रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, गुहागर, रत्नागिरी, राजापूर, मंडणगड सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, देवगड, वेंगुर्ला, नवी मुंबई मधील उरण, न्हावा, शेवा हे सहभागी होणार आहेत.

या जिल्ह्यातील  जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी ही प्रात्यक्षिक घेण्यापूर्वी स्थानिक ठिकाणी कोणत्याही प्रकारचा गैरसमज होवू नये याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी.ही सर्व प्रात्यक्षिके केंद्र  व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे दिलेल्या कालावधीत पार पाडावीत अशा सूचना राज्य आपत्ती मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून दिलेल्या आहेत.

००००

संध्या गरवारे/विसंअ

 

 

इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची शासनाची भूमिका – मंत्री शंभूराज देसाई  

मुंबई, दि. ७ : कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारंवार स्पष्ट केली आहे. मराठा समाजाला कायमस्वरूपी व कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण मिळवून देण्याच्या दृष्टीने राज्य शासन कटीबद्ध आहे, असे मंत्रिमंडळ उपसमिती सदस्य तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

आज मुंबई येथील पावनगड निवासस्थानी त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

मंत्री श्री. देसाई म्हणाले, मराठा आरक्षणाबाबतच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या प्रत्येक बैठकीत मराठा समाजाला कायमस्वरूपी व कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण मिळवून देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाकडून करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात येतो. प्रत्येक मंत्रिमंडळ बैठकीनंतर त्याच दिवशी उपसमितीची बैठक घेण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पीटिशन दाखल केली असून याबाबत राज्य शासनाची बाजू प्रभावीपणे मांडण्याकरिता पूर्वतयारी केली जात आहे. दिवाळी नंतर मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती दिल्ली येथे जाऊन कायदेतज्ज्ञ व ज्येष्ठ विधिज्ञांची भेट घेणार आहे. न्यायालयात राज्य सरकारची बाजू प्रभावीपणे मांडून मराठा आरक्षण मिळण्याबाबत विधिज्ञांबरोबर दिल्लीतील भेटीत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.

मराठा -कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रांसंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला आहे. राज्यात स्वातंत्र्यपूर्व काळात जी संस्थाने होती, त्या संस्थांनांकडून ज्या अभिलेखात ‘कुणबी’ जातीच्या नोंदी आढळून येतील असे कायदेशीर अभिलेख उपलब्ध करुन देण्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात आल्या. मराठा कुणबी, कुणबी मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यासाठी गठीत न्या. शिंदे समितीची राज्यभर व्याप्ती वाढवण्यात आली आहे. सर्व जिल्हयात या समितीमार्फत कामकाज सूरु असून जिल्हाधिकारी कार्यालयात यासाठीचा विशेष कक्ष  स्थापन करण्यात आला आहे, असे मंत्री श्री.देसाई यांनी यावेळी सांगितले.

00000

शैलजा पाटील/विसंअ

 

पु. ल. कला महोत्सवास उद्यापासून सुरुवात

मुंबई, दि. 7: महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु.ल. देशपांडे यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य विभाग, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्यावतीने 8 ते 14 नोव्हेंबर, 2023 या कालावधीत ‘पु. ल. कला महोत्सव 2023’ चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन उद्या बुधवार, दि. 8 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या कलांगण प्रांगणात होणार आहे.

रसिकांना या महोत्सवात साहित्य, गायन, वादन, नृत्य, नाट्य अशा विविध कला प्रकारांवर आधारित अनेक कार्यक्रमांची पर्वणी मिळणार आहे. उद्घाटनानंतर कलांगण येथेच काफिला, कोल्हापूर या संस्थेचा मराठी, हिंदी, उर्दू, प्रेम साहित्यावर आधारित ‘जियारत’ हा कार्यक्रम सादर होईल. या महोत्सवात 14 नोव्हेंबरपर्यंत विविध कार्यक्रम सादर केले जाणार आहेत.

‘पु. ल. कला महोत्सवांमध्ये सादर होणारे विविध कार्यक्रम हे सर्वांसाठी विनामूल्य आहेत. तरी सर्व पुलप्रेमींनी तसेच कलासक्त रसिकजनांनी या महोत्सवाचा आनंद घ्यावा’, असे आवाहन मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या प्रकल्प संचालक मीनल जोगळेकर यांनी केले आहे.

00000

दीपक चव्हाण/विसंअ

 

दिवेआगर येथे सुपारी संशोधन केंद्र उभारणार – कृषिमंत्री धनंजय मुंडे

मुंबई दि. ७ : रायगड जिल्ह्याच्या श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगार येथे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत पाच एकर जागेत सुपारी संशोधन केंद्र उभारण्यास कृषी विभागाने मान्यता प्रदान केली आहे. यासाठी ५ कोटी ६४ लाख रुपये निधी खर्चास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी  रायगड येथे या केंद्रासाठी पाठपुरावा केला होता.

रायगड जिल्ह्यात सुपारीचे बागायती  पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन सुपारी संशोधन केंद्र उभारले जावे यासाठी महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे आग्रही होते.

या सुपारी संशोधन केंद्राच्या माध्यमातून सुपारीच्या बुटक्या तसेच दर्जेदार व अधिकचे उत्पन्न देणाऱ्या जाती विकसित करणे, दिवेआगर व परिसरातील हवामानाचा विचार करून आंतरपिके घेण्याचे तंत्रज्ञान विकसित करणे, अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन, रोजगार निर्मिती, रोपवाटिका उभारणे, कलमे विकसित करणे, परिसरातील गावांचा ग्रामविकास आराखडा तयार करणे असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

०००

दत्तात्रय कोकरे/विसंअ

 

 

राष्ट्रीय पाळणाघर योजनेबाबत लवकरच निर्णय घेणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि.७: राष्ट्रीय पाळणाघर योजनेचा आढावा घेऊन निर्णय घेण्याबाबत समिती स्थापन करणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

मंत्रालयातील दालनात केंद्र शासनाद्वारे मान्यता प्राप्त राष्ट्रीय पाळणाघर योजनेतंर्गत दुर्बल घटकातील कामकाजी महिला, पाळणाघर महिला कमर्चारी यांच्याबाबत आयोजित बैठकीत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे बोलत होत्या. यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव, ऑल एन.जी.ओ.वेल्फेअर असोसिएन ऑफ इंडियाचे अध्यक्ष दादाराव डोंगरे यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.

महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, राष्ट्रीय पाळणाघर योजनेचा आढावा घेण्यासाठी महिला व बालविकास आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल. आतापर्यंत केंद्राकडून आलेले अनुदान व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी केलेल्या तसेच त्या कालावधीतील सर्व तपशील तपासून याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.

जेथे कामगार जास्त आहेत, अशा ग्रामीण भागात आणि शहरी भागातही जिथे अंगणवाडीला जोडून एखादी खोली असेल अशा ठिकाणी पाळणाघर  सुरू करण्याचे विचाराधीन आहे. केंद्राच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे आणि राज्य शासनाच्या नियमावलीप्रमाणे  पाळणाघर सुरू  करण्याबाबतही निर्णय घेऊ अशी ग्वाही मंत्री कु. तटकरे यांनी दिली.

००००

संध्या गरवारे/विसंअ

 

 

रायगड जिल्ह्यातील दरडग्रस्त गावांच्या पुनर्वसनाचे प्रस्ताव सादर करा – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

मुंबई, दि.७ :- मौजे-मेढा हनुमाळ माळी शिंगरकोंड (मोरेवाडी), तिसे या गावातील आणि रायगड जिल्ह्यातील दरड प्रतिबंधात्मक उपाययोजनेसंदर्भात तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले. दरडग्रस्त पुनर्वसनाबाबत विविध समस्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी बैठकीत मांडल्या.

मंत्रालयातील दालनात रायगड जिल्ह्यातील दरडग्रस्त गावांच्या पुनर्वसनाबाबत आयोजित बैठकीत मंत्री श्री. पाटील बोलत होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, रायगड जिल्ह्यातील दरडप्रवण क्षेत्रातील गावांचे कायमस्वरूपी करावयाचे पुनर्वसनाबाबत स्थानिक प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी. शासनाकडून आलेल्या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही केली जाईल, त्याचबरोबर म्हसळा तालुक्यातील लिपनी वावे व मोहम्मद खनीखार या गावाच्या पुनर्वसन प्रस्तावावर जिल्हाधिकारी कार्यालयाने तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश  दिले.

दरडग्रस्त पुनर्वसनाबाबत तातडीने कार्यवाही व्हावी – मंत्री कु. आदिती तटकरे

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, मौजे मेढा हनुमाळ माळी गावचे पुनर्वसन करणे,मौजे तिसे येथे दरड कोसळल्या बाबत, भिंगारकोड (मोरेवाडी) या गावातील दरड ग्रस्त कुटुंबीयांचे कायमस्वरूपी पुनर्वसन होण्याबाबत रायगड जिल्ह्यातील दरड प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने कार्यवाही होणे गरजेचे आहे. स्थानिक प्रशासनाकडून मदत व पुनर्वसन विभागाला आलेल्या प्रस्तावांना लवकर मान्यता मिळावी अशी मागणी केली जेणेकरून या प्रस्तावाची कामे तातडीने सुरू करतील असेही मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, उपसरपंच वरसगाव राकेश शिंदे, पुनवर्सन विभागाचे अधिकारी, उपसरपंच (तिसे) राजेश कदम, सरपंच संगे संजय सानप,मेढाचे सदानंद गोवर्धने,जयंत गोवर्धने,तिसे ग्रामपंचायत सदस्य महेश पवार,संभेचे गणेश सानप,संदेश सानप यावेळी उपस्थित होते.

००००

संध्या गरवारे/विसंअ

 

 

शालेय विद्यार्थी घेणार प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ

मुंबई, दि. 7 : दिवाळीत फटाक्यांची आतिषबाजी करुन वायू व ध्वनीचे प्रदूषण होत असते. या वर्षीची दिवाळी प्रदूषणमुक्त साजरी केली जावी, याकरीता ‘प्रदूषणमुक्त दीपावली संकल्प अभियान – 2023’ अंतर्गत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग यांच्यावतीने उद्या बुधवार 8 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता शालेय विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ दिली जाणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनोज सौनिक, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही शपथ दिली जाणार आहे. मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात हा कार्यक्रम होणार आहे.

गेल्या काही वर्षात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या व्यापक जनजागृतीमुळे फटाके वाजविण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी आजही याबाबत शालेय विद्यार्थ्यांमध्ये व्यापक जनजागृती करण्याची गरज आहे. त्याच उद्देशाने मंडळामार्फत दरवर्षी विविध उपक्रम हाती घेतले जातात. फटाक्यांमुळे होणारे हवा आणि ध्वनीचे प्रदूषण कमी करण्यासाठी प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्पना राबविली जाते. प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत त्याचे महत्व पोहोचवण्याचा प्रयत्न होत आहे. या कार्यक्रमाला बृन्हमुंबई महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळेतील विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत.

 

00000

दीपक चव्हाण/विसंअ/

‘राष्ट्रीय टूथब्रश दिवस’ निमित्त मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते मौखिक आरोग्य जनजागृती पुस्तिकेचे प्रकाशन

मुंबई, दि.७ : ‘स्वच्छ मुख आरोग्य’ कार्यक्रमांतर्गत ‘राष्ट्रीय टूथब्रश दिवस’- ०७ नोव्हेंबर रोजी जनमानसांमध्ये मौखिक आरोग्यविषयक जनजागृती व्हावी, याकरिता वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते जनजागृती पुस्तिकेचे प्रकाशन आज करण्यात आले.

राष्ट्रीय टूथब्रश दिवसाचे औचित्य साधून स्वच्छ मुख अभियानांतर्गत वैद्यकीय शिक्षण व संचालनालय, मुंबई व शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, मुंबईतर्फे तयार केलेल्या जनजागृतीपर पत्रिकेचे प्रकाशन मंत्रालयात मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले.

राष्ट्रीय टूथब्रश दिवस जनमाणसांमध्ये मौखिक आरोग्यविषयक जनजागृती तसेच दिवसांतून दोन वेळा टूथ ब्रशिंगविषयी जागरुकता व्हावी, या उद्देशाने साजरा केला जातो. यामध्ये प्रामुख्याने लहान मुलांमध्ये दातांच्या किडीचे प्रमाण जास्त असल्यामुळे या वयातच लहान मुलांना टूथब्रशिंगविषयी जागरुकता व्हावी यासाठी हा दिवस साजरा केला जातो. जनजागृतीसाठी विविध दंत महाविद्यालये, सामाजिक संस्था हिरिरीने पुढाकार घेऊन पोस्टर्स, बॅनर्स, रॅली, पथनाट्यच्या माध्यमातून जनजागृती करतात.

यावेळी मंत्री श्री.मुश्रीफ यांच्या हस्ते पर्यावरणपूरक दंत ब्रश वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सहसंचालक (वैद्य) अजय चंदनवाले, डॉ. पाखमोडे (दंत),अधिष्ठाता डॉ. वसुंधरा भड, डॉ. संध्या चव्हाण, डॉ. राजेश गायकवाड, डॉ. सूर्यकांत पोवार, आशिष जळमकर यांची उपस्थिती होती. वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, आयुक्त राजीव द. निवतकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुस्तिका तयार करण्यात आली आहे.

०००

राजू धोत्रे/विसंअ/

ताज्या बातम्या

राज्यघटनेमुळे देशातील कोणत्याही व्यक्तीला सर्वोच्च पदाची संधी – सरन्यायाधीश भूषण गवई

0
मुंबई, दि. ८ : भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश असून भारतीय राज्यघटना अद्वितीय आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या...

फनेल झोनमधील रखडलेल्या इमारतींचा लवकरच पुनर्विकास – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

0
मुंबई, दि. ८ : फनेल झोनमध्ये उड्डाण मर्यादा आणि विविध तांत्रिक कारणांमुळे या भागातील अनेक इमारतींचा पुनर्विकास रखडलेला आहे. मुंबईतील विमानतळाच्या फनेल झोनमध्ये येणाऱ्या आणि...

बीड जिल्ह्यात परळी येथे सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

0
मुंबई, दि. 8 : बीड जिल्ह्यातील परळी येथे सध्या अस्तित्वात असलेल्या औष्णिक वीज केंद्रात आणखी वीज निर्मिती संच वाढविण्याची बाब तपासली असता ती व्यवहार्य नसल्याचे निदर्शनास आले...

विधानसभा लक्षवेधी

0
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विकास आराखड्यामध्ये कोणत्याही घटकांवर अन्याय होणार नाही - उद्योगमंत्री उदय सामंत मुंबई दि. ८ :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सुधारित प्रारूप विकास आराखड्यामध्ये  कोणत्याही नागरिकावर अन्याय...

अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पीक स्पर्धेत सहभाग घ्यावा – कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

0
मुंबई, दि. 8 : अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पीकस्पर्धा सन 2025-26 साठी राज्यस्तरावरून कृषी विभागामार्फत पीकस्पर्धा जाहीर करण्यात आल्या असून त्याच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना...