गुरूवार, जुलै 10, 2025
Home Blog Page 1054

कृषिमंत्र्यांच्या संवेदनशीलतेमुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या दुःखाचा भार झाला हलका

मुंबई दि. 11 – राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेमुळे राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या दुःखाचा भार हलका झाला आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना विविध शेती आणि संसार उपयोगी साहित्यांचे किट वाटप केले जात आहे.

धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार  कृषी मंत्रालय अंतर्गत महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाने यामध्ये पुढाकार घेतला असून “शेतकरी कुटुंबास मदतीचा हात-संवेदन 2023” असे या उपक्रमाचे नामकरण करण्यात आले आहे.

या किटमध्ये परसबागेतील भाजीपाला बियाणे, नॅनो युरिया, सूक्ष्म मूलद्रव्य तसेच विविध किटकनाशकांचा समावेश आहे. त्याचबरोबर दिवाळी फराळ साठी उपयुक्त साहित्य आणि महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळातर्फे उत्पादित करण्यात येत असणाऱ्या विविध वस्तूंचा समावेश आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यातील 2000 शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना हे किट वाटप करण्यात येत आहे. सर्व जिल्ह्यात किटचे  वितरण होणार आहे. ही किट पूर्णपणे लोकवर्गणीतून देण्यात आली आहे.

परळी येथे नुकतेच एका आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात कीट देण्यात आले.

00000

पुरस्काराच्या क्षेत्रात विस्तार आणि रकमेतही मोठी वाढ करीत असल्याचे समाधान – मंत्री सुधीर मुनगंटीवार

२०२३ चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना जाहीर

मुंबई, दि. 10:  राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून सन 2023 चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज ही घोषणा केली. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार, राज्य सांस्कृतिक पुरस्कार इत्यादी पुरस्कार सांस्कृतिक कार्य संचालनालय मार्फत दरवर्षी देण्यात येतात. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या जीवनगौरव पुरस्कारांच्या रकमेत दुप्पट वाढ करण्यात आली असून राज्य सांस्कृतिक पुरस्काराची रक्कम तिप्पट करण्यात आली आहे तसेच पुरस्कारांच्या क्षेत्रांमध्येही विस्तार करण्यात आल्याचे समाधान असल्याचे  मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

2023 चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना जाहीर झालेला आहे. संगीत व गायन क्षेत्रातील सातत्यपूर्ण आणि अमूल्य योगदान देणाऱ्या कलाकारास हा पुरस्कार देण्यात येतो.

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार 2022 पुरस्कारासाठी पं. उल्हास कशाळकर यांचे नाव घोषित झाले असुन, 2023 च्या पुरस्कारासाठी पं. शशिकांत (नाना)श्रीधर मुळ्ये यांची घोषणा करण्यात आली आहे. शास्त्रीय संगीतासाठी ज्यांनी आपले जीवन समर्पण केले आणि शास्त्रीय संगीत क्षेत्राची सेवा केली, त्या कलाकारांच्या योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्काराच्या 2022 साठी सुहासिनी देशपांडे यांच्या नावाची घोषणा झाली आहे तर 2023 साठी अशोक समेळ यांना पुरस्कार घोषित झाला आहे. मराठी रंगभूमीवर ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे, अशा कलाकारांना या पुरस्काराने गौरविण्यात येते.

संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव 2022 चा पुरस्कार नयना आपटे यांना जाहीर झाला असून, 2023 च्या पुरस्कारासाठी पं. मकरंद कुंडले यांची निवड झाली आहे. ज्या कलाकारांनी संगीत रंगभूमीसाठी विशेष योगदान दिले आहे त्या कलाकारांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत देण्यात येणाऱ्या राज्य सांस्कृतिक पुरस्कार 2022 व 2023 ची ही घोषणा केली आहे. राज्य सांस्कृतिक पुरस्कारांमध्ये एकूण बारा वर्गवारी असून, यामधील प्रत्येक वर्गवारी मध्ये दोन वर्षाचे दोन पुरस्कार जाहीर झाले आहेत. नाटक या विभागासाठी 2022 चा पुरस्कार वंदना गुप्ते यांना तर 2023 चा पुरस्कार ज्योती सुभाष यांना जाहीर झाला आहे. उपशास्त्रीय संगीत वर्गवारीमध्ये 2022 चा पुरस्कार मोरेश्वर निस्ताने यांना जाहीर झालेला असून, 2023 चा पुरस्कार ऋषिकेश बोडस यांना जाहीर झाला आहे. कंठ संगीत प्रकारातील 2022 चा पुरस्कार अपर्णा मयेकर यांना घोषित झाला असून, 2023 चा पुरस्कार रघुनंदन पणशीकर यांना मिळाला आहे. लोककला क्षेत्रातील 2022 चा पुरस्कार हिरालाल रामचंद्र सहारे यांना जाहीर झाला असून, 2023 चा पुरस्कार कीर्तनकार भाऊराव थुटे महाराज यांना जाहीर झाला आहे. शाहीरी क्षेत्रातील 2022 चा पुरस्कार जयंत अभंगा रणदिवे यांना तर, 2023 चा पुरस्कार राजू राऊत यांना घोषित झाला आहे. नृत्य वर्गवारीतील 2022 चा पुरस्कार लता सुरेंद्र यांना जाहीर झाला असून, 2023 साठी सदानंद राणे यांची निवड झाली आहे. चित्रपट क्षेत्रासाठी 2022 चा पुरस्कार चेतन दळवी यांना तर, 2023 चा पुरस्कार निशिगंधा वाड यांना घोषित झाला आहे. कीर्तन प्रबोधन क्षेत्रातील 2022 चा पुरस्कार संत साहित्यिक व लेखिका प्राची गडकरी यांना जाहीर झाला असून, 2023 चा पुरस्कार अमृत महाराज जोशी यांना घोषित झाला आहे. वाद्य संगीत क्षेत्रातील 2022 चा पुरस्कार पं. अनंत केमकर यांना मिळाला असून, 2023 साठी शशिकांत सुरेश भोसले यांची घोषणा झाली आहे. कलादान या प्रकारासाठी 2022 साठी संगीता राजेंद्र टेकाडे यांचे नाव घोषित झाले आहे तर, 2023 साठी यशवंत रघुनाथ तेंडोलकर यांच्या नावाची घोषणा झाली आहे. तमाशा वर्गवारीतील राज्य सांस्कृतिक पुरस्कार बुढ्ढणभाई बेपारी (वेल्हेकर) यांना तर, 2023 चा पुरस्कार उमा खुडे यांना घोषित झाला आहे. आदिवासी गिरीजन वर्गवारी मध्ये 2022 साठी भिकल्या धाकल्या धिंडा तर, 2023 साठी सुरेश नाना रणसिंग यांची निवड करण्यात आली आहे.

सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सर्व पुरस्कार  प्राप्त मान्यवरांचे अभिनंदन केलेले आहे. या पुरस्कार प्राप्त कलाकारांकडून अजून मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक क्षेत्राची सेवा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

पुरस्कारांच्या रकमेत मोठी वाढ

सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विविध पुरस्कारांच्या रकमेत मोठी वाढ करत असल्याची घोषणा केली आहे. गानसम्राज्ञी  लता मंगेशकर पुरस्कार, संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, नटवर्य प्रभाकर पंणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार या पुरस्कारांची रक्कम पाच लक्ष रुपये होती, ती यापुढे दहा लक्ष रुपये होईल अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. तसेच राज्य सांस्कृतिक पुरस्काराची जी एक लाखाची रक्कम होती ती रक्कम तीन लाखाची करण्यात येत आहे अशीही घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

राज्य सांस्कृतिक पुरस्काराच्या क्षेत्रामधील व पुरस्कारांमधील वाढ

सध्या 50 वर्षे वयावरील पुरुष कलाकारांना व 40 वर्षावरील महीला कलाकारांना राज्य सांस्कृतिक पुरस्कारा अंतर्गत 12 विविध क्षेत्रातील पुरस्कार दिले जातात. यापुढे पन्नास वर्षावरील पुरुष आणि महिला कलाकारांना राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. राज्य सांस्कृतिक पुरस्काराच्या सध्याच्या क्षेत्रामध्ये वाढ करण्यात येत असून, ही क्षेत्रे 24 करण्यात आलेली आहेत. वाढ करण्यात आलेल्या क्षेत्रांमध्ये प्रामुख्याने; प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील अभ्यासक व पत्रकार, लोकनृत्य, लावणी /संगीतबारी, भारुड/गवळण /विधेनाट्य, वाद्यनिर्मिती करणारे कलाकार, झाडीपट्टी/खडीगंमत /दंडार, दशावतार /नमन खेळे / वही गायन, दुर्मिळ प्रयोगात्मक कला व मौखिक परंपरा जपणाऱ्या व त्यांचे जतन वहन संवर्धन करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था, प्रयोगात्मक कलेशी संबंधित संग्रहालय/संस्था, ध्वनी तंत्रज्ञ /संकलक, संगीत संयोजक, वाईस ओवर आर्टिस्ट / निवेदक अशा विविध बारा क्षेत्राची वाढ राज्य सांस्कृतिक पुरस्कारांमध्ये करण्यात आली आहे. या पुरस्काराची रक्कमही तीन लक्ष रुपये असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे.

युवा पुरस्कार

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत युवक कलाकारांसाठी विशेष पुरस्कारांची घोषणा करण्यात यावी अशी अनेक संघटनांची फार पूर्वीपासूनची मागणी होती. या मागणीचा विचार करून राज्य सांस्कृतिक पुरस्कारातील संग्रहालय वगळता इतर सर्व 23 क्षेत्रांमध्ये युवा राज्य सांस्कृतिक पुरस्कार घोषित करण्यात येणार आहेत. युवा राज्य सांस्कृतिक पुरस्कारासाठी वयाची मर्यादा 25 ते 50 एवढी राहणार असून, या पुरस्कारांची रक्कम एक लक्ष एवढी असेल.

राज्यातील कलाकारांना विविध माध्यमातून प्रोत्साहन मिळण्याबाबत, सांस्कृतिक कार्य विभाग नेहमीच प्रयत्नशील राहत असून, भविष्यात कलाकारांसाठीच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे अशी माहिती मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिली आहे.

निवड प्रक्रियेसाठी समिती

उपरोक्त सर्व प्रकारच्या पुरस्कारासाठी निवड समितीची निवड समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. या निवड समितीचे अध्यक्ष सांस्कृतिक कार्यमंत्री ना. श्री. सुधीर मुंनगंटीवार हे असून त्यामध्ये प्रधान सचिव विकास खारगे व इतर नामवंत अशासकीय सदस्यांचा समावेश आहे. या समितीचे सचिव संचालक सांस्कृतिक कार्य हे आहेत. सांस्कृतिक कार्य विभागाकडे आलेल्या शिफारसी व सदस्यांनी सुचवलेल्या शिफारसी यामधून पुरस्कारर्थीची निवड करण्यात आली आहे.

00000

ही दीपावली शेतकरी-बळीराजाच्या आयुष्यात समृद्धीचा प्रकाश घेऊन येणारी ठरावी – कृषिमंत्री धनंजय मुंडे

परळी वैद्यनाथ (दि. 11) – उद्यापासून तेजोमय प्रकाश, आनंद व समृद्धीचे प्रतीक असलेल्या दीपावलीचे पर्व सुरू होत असून, यानिमित्ताने शेतकरी, कष्टकरी वर्गाच्या आयुष्यात भरभराट व समृद्धीचा प्रकाश घरोघरी नांदावा, अशा शब्दात कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दीपावली निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

दिवाळीचे पर्व, अभ्यंग स्नान, दीपावली, लक्ष्मीपूजन, पाडवा अशा विविध सणांनीं संपन्न असते. सर्व कुटुंब एकत्रित येऊन दीपावलीच्या या पर्वाचा आनंद घेताना फराळ, फटाके याचा आनंद घेत उत्सव साजरा केला जातो.

दीपावलीच्या या पर्वाच्या शुभेच्छा देताना धनंजय मुंडे यांनी फटाके वाजवताना काळजी घ्यावी तसेच पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे.

00000

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या सहृदयतेमुळे मिळाली १९ तरुणांना शासन सेवेत नियुक्ती; चार वर्षांची प्रतीक्षा फळाला

मुंबई दि. 11 : त्या 19 तरुणांनी दोन-तीन वर्षे अभ्यास करून कृषी सेवक पदाची परीक्षा दिली. परंतु  कोविड च्या साथीमुळे परीक्षा, निकाल आणि नियुक्ती प्रक्रिया रखडली. या दरम्यान झालेल्या विलंबामुळे निवडसूची वैधता कालावधी संपल्याचे तांत्रिक निमित्त बनले आणि या मुलांचे करिअर संकटात सापडले. परंतु कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी या तरुणांच्या करिअरबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून घेतलेल्या निर्णयामुळे या 19 तरुणांच्या करिअरला पुन्हा नवे वळण मिळाले व या तरुणांना अखेर शासकीय सेवेत नियुक्ती मिळाली.

राज्य शासनाच्या कृषी विभागाने 313 कृषी सेवक पदांच्या भरतीसाठी प्रक्रिया सुरू केली. त्यामध्ये राज्यभरातून सव्वा लाख अर्ज प्राप्त झाले होते. सन 2019 मध्ये परीक्षा घेण्यात आल्या व 2020 मध्ये निकाल जाहीर करण्यात आला.

निकालात उत्तीर्ण उमेदवारांनी काही कारणामुळे नियुक्ती स्वीकारली नाही किंवा विशिष्ट प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध झाले नाहीत, तर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी दिली जाते. अशा 19 उमेदवारांना कृषी सेवक पदी नियुक्तीची संधी मिळाली. परंतु याच दरम्यान कोविडची साथ आल्यामुळे जग ठप्प झाले. सन 2020 ते 21 या कालावधीत कोविड साथीमुळे सदर कृषी सेवक भरती प्रक्रियेतील उमेदवारांना नियुक्ती देण्याचे काम सुद्धा रखडले.

निकालाच्या दिनांकापासून एक वर्षात नियुक्ती देणे बंधनकारक होते. मात्र कोविड महामारीमुळे नियुक्ती देण्याबाबतच्या प्रस्तावास उशीर झाल्याने निवड सूची वैधता कालावधी संपुष्टात आला. त्यामुळे या 19 तरुणांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात दाद मागितली. त्यावर न्यायाधिकरणाने संबंधित उमेदवारांना गुणवत्तेनुसार नियुक्ती देण्यासंदर्भात शासनाने निर्णय घ्यावा, असे आदेश 2021 च्या अखेरीला दिले. त्यानुसार या 19 तरुणांनी नियुक्तीच्या निर्णयासाठी शासनाचे दार ठोठावले.

कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी 15 जुलै 2023 रोजी पदभार स्वीकारला. त्यानंतर ताबडतोब या मुलांना न्याय देण्याची प्रक्रिया सुरू केली. अखेर या तरुणांना कृषी सेवक पदावर नियुक्ती देण्यात आली. याबद्दल या तरुणांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले आहे.

00000

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा

मुंबई, दि. ११ : आपल्या महाराष्ट्राच्या सर्वस्पर्शी विकासाचे स्वप्न साकार व्हावे यासाठी आणि जगाने गौरवपूर्ण वाटचालीची दखल घ्यावी यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करूया, असा निर्धार व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

दीपोत्सवाचं हे पर्व सर्वांच्या आयुष्यात मांगल्य आणि समृद्धी घेऊन येवो. सर्वांच्या आशा-आकांक्षा आणि संकल्प पूर्ण व्हावेत अशी मनोकामना, देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, आपल्या महाराष्ट्रावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाचं छत्र आहे. त्यांनी राज्यकारभार, सामाजिक सुधारणांचा आणि जनकल्याणाचा आदर्श, धडा घालून दिला आहे. त्या प्रकाशवाटेवरूनच आपण वाटचाल करत आहोत. या वाटचालीत आम्ही राज्याच्या विकासाला गती लाभेल, आपल्या नागरिकांचे जीवनमान उंचावेल असे अनेक निर्णय घेतले आहेत. ज्येष्ठांपासून ते शाळकरी मुलांपर्यंत, माता-भगिनी, शेतकरी, कामगार आणि कष्टकरी यांच्या जीवनात या विकासाचं प्रतिबिंब उमटेल असे प्रयत्न केले आहेत, असेही त्यांनी नमूद केले आहे.

मुख्यमंत्री पुढे म्हणतात, ‘आपण महाराष्ट्राच्या सर्वस्पर्शी विकासाचे स्वप्न पाहिले आहे. महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास हा आमचा ध्यास आहे. शिवछत्रपतींचा, जिजाऊ माँसाहेब यांचा हा महाराष्ट्र केवळ देशातील अन्य राज्यांसाठी नव्हे, तर जगाने दखल घ्यावी अशी गौरवपूर्ण वाटचाल करत राहील, असे आमचे प्रयत्न आहेत. या प्रयत्नात महाराष्ट्र कुठेही मागे राहणार नाही, त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू, असे अभिवनचही यानिमित्ताने देतो.’

‘राज्यातील जनतेच्या आयुष्यात आनंद यावा, त्यांची स्वप्ने साकार व्हावीत म्हणून आपले सरकार लोकांच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम करते आहे आणि पुढे देखील करीत राहील, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले आहे की, ‘दिवाळी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आनंद आणि चैतन्य घेऊन येते. आपण त्याच उत्साहानं हा प्रकाशाचा उत्सव साजरा करूया. आपण निसर्गपूजक आहोत. आपले सण देखील तोच संदेश देतात. म्हणूनच स्वच्छतेचा कटाक्ष बाळगूया, प्रदूषण टाळूया. सणांचा आनंद घेतांना पर्यावरणाची काळजी घेण्याची जबाबदारी सुद्धा आपली सगळ्यांची आहे हे लक्षात ठेवून सण साजरा करूया.’

०००००

राज्यातील १०२१ महसुली मंडळामध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर

मुंबई, दि.१० : राज्यातील दुष्काळी स्थिती जाहीर केलेल्या ४० तालुक्यांव्यतिरिक्त उर्वरित ७५ टक्केपेक्षा कमी पाऊस झालेल्या १०२१ महसुली मंडळामध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. या मंडळामध्ये दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या सर्व सवलती लागू होणार आहेत असा निर्णय मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या ९ नोव्हेंबरच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय महसूल व वन विभागाने आज दि.१० नोव्हेंबर रोजी निर्गमित केला आहे.

केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला. मात्र राज्यातील उर्वरीत तालुक्यातील महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत पर्जन्यमानाची कमी लक्षात घेता सरासरी पर्जन्याच्या ७५ टक्के पेक्षा आणि ७५० मिमी पेक्षा कमी पाऊस पडलेला आहे असा निकष लक्षात घेऊन १०२१ महसूली मंडळामध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या जमीन महसूलात घट, पिक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या वीजबिलात ३३.५ टक्के सूट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शुल्कात माफी, रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकर्सचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे या सवलती १०२१ महसुली मंडळामध्ये लागू करण्यात येणार आहेत. दुष्काळ कालावधीत संपूर्ण उपाययोजना तातडीने करण्यासाठी सर्व अधिकार या समितीला देण्यात आलेले आहेत, असे शासन निर्णयात नमूद आहे.

००००

संध्या गरवारे/विसंअ

ससून सर्वोपचार रुग्णालय येथील ड्रग्जबाबत चौकशी अहवाल शासनास सादर

मुंबई, दि. 10 : ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे येथील ड्रग्जबाबात चौकशी अहवाल शासनास सादर केला असून  शासनाने अस्थिव्यंगोपचारशास्त्र पथकप्रमुख डॉ. देवकाते यांचे निलंबन करून विभागीय चौकशीचा निर्णय घेतला आहे.

चौकशीत अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर व अस्थिव्यंगोपचारशास्त्र पथकप्रमुख डॉ. देवकाते तसेच इतर विभागातील संबंधित अधिकारी दोषी असल्याचे दिसून आले त्यामुळे  घटनेचे गांभीर्य विचारात घेऊन पुणे अधिष्ठाता डॉ. ठाकूर  यांच्याकडील पदभार काढून घेऊन त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे येथील ड्रग्ज संबंधित घटनेबाबत वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीला 15 दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.  समितीने चौकशी करून आपला अहवाल आयुक्तामार्फत शासनास दि.31 ऑक्टोबर 2023 रोजी सादर केला असल्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

००००

राजू धोत्रे/विसंअ

विशेष बाब म्हणून प्रथमच नवनियुक्त अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांनाही ‘भाऊबीज भेट’ – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि.10 : नवनियुक्त अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी तीन कोटी ‘भाऊबीज भेट’ रक्कम मंजूर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आतापर्यंतच्या कालावधीत प्रथमच विशेष बाब म्हणून नवनियुक्त अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना भाऊबीज भेट रक्कम मंजूर करण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

मार्च 2023 पर्यंत कार्यरत अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना आतापर्यंत भाऊबीज दिली होती. आजच्या शासन निर्णयामुळे दिनांक 1 एप्रिल, 2023 ते दिनांक 31 ऑक्टोबर,2023 या कालावधीत अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना यावर्षीही दिवाळीला भाऊबीज भेट दिली असून यापूर्वी दिलेली भाऊबीज भेट म्हणून दिलेले 37 कोटी 33 लाख रुपये  आणि आज नवनियुक्त अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना  भाऊबीज भेट म्हणून दिलेले 3 कोटी असे एकूण 40 कोटी रुपये वितरित  करण्यात आले आहेत. या बाबतचा शासन निर्णय नुकताच महिला व बालविकास  विभागाकडून निर्गमित करण्यात आला आहे. ही मदत लवकरात लवकर जिल्ह्यात वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.

००००

संध्या गरवारे/विसंअ

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०२४ मधील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

मुंबई, दि. 10 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सन 2024 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी सदर वेळापत्रक www.mpsc.gov.in या संकेतस्थळावरही प्रसिद्ध करण्यात आले आहे.

वेळापत्रक अंदाजित असून जाहिरातीच्या अथवा परीक्षेच्या प्रस्तावित महिना/दिनांकामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होऊ शकतो, असा बदल झाल्यास तो आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.  अंदाजित वेळापत्रकाबाबतची सद्यस्थिती दर्शविणारी अद्ययावत माहिती (Update) वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. संबंधित परीक्षेची परीक्षायोजना, अभ्यासक्रम, निवड पद्धत इत्यादी तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे/येईल. संबंधित परीक्षेमधून भरावयाच्या पदसंख्येबाबतचा सविस्तर तपशील जाहिरात/अधिसूचनेद्वारे उपलब्ध करुन देण्यात येईल, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे.

योजना ‘सारथी’च्या…

दिल्ली व पुणे येथील नामांकित प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश

दरवर्षी ५०० विद्यार्थ्यांना निशुल्क प्रशिक्षण, आकस्मिक खर्च आणि विद्यावेतनाचा लाभ

 

राज्यातील मराठाकुणबीमराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा समाजाच्या सामाजिकशैक्षणिक व आर्थिक विकासासाठी 2018 मध्ये छत्रपती शाहू महाराज संशोधनप्रशिक्षण व मानव विकास संस्थेची (सारथी) स्थापना करण्यात आली. शाहू विचारांना देऊया गतीसाधूया सर्वांगीण प्रगती’ हे ब्रीद घेवून काम करणाऱ्या सारथी संस्थेमार्फत विविध कल्याणकारी उपक्रम व योजना राबविण्याचे काम ‘सारथी’ संस्थेमार्फत केले जात असून या योजनांच्या माहितीवर आधारित क्रमशः लेखमाला…

‘सारथी’मार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘संघ लोकसेवा आयोग परीक्षा मोफत प्रशिक्षण’ योजनेची माहिती आजच्या लेखात आपण घेणार आहोत. मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा समाजातील उमेदवारांना केंद्रीय नागरी सेवेतील प्रशासकीय पदावर काम करण्याची संधी मिळावी, यासाठी ‘सारथी’संस्थेमार्फत संघ लोकसेवा आयोग अर्थात ‘युपीएससी’मार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेचे निशुल्क प्रशिक्षण देण्यात येते. हे प्रशिक्षण देण्यासाठी ‘सारथी’ने पुणे येथील तीन प्रशिक्षण संस्था आणि दिल्ली येथील दोन संस्थांची निवड केली आहे. दरवर्षी युपीएससी नागरी सेवा स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी चाळणी परीक्षा आणि कागदपत्रे पडताळणीद्वारे एकूण 500 उमेदवारांची निवड करण्यात येते. या उमेदवारांना पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या तीन टप्प्यासाठी प्रशिक्षणाचे देण्यात येते. निवड झालेल्या उमेदवारांना ‘सारथी’ने निवडलेल्या पाचपैकी कोणत्याही एका संस्थेत प्रवेश घेण्याचा पर्याय उपलब्ध असतो.

प्रशिक्षणार्थींना ‘सारथी’मार्फत असे मिळते सहाय्य

उमेदवारांना निशुल्क प्रशिक्षणासोबत दिल्ली येथे प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना तेथील वास्तव्यासाठी दरमहा 13 हजार रुपये आणि पुणे येथे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तेथील वास्तव्यासाठी 9 हजार रुपये दरमहा दिले जातात. तसेच या उमेदवारांचा प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश निश्चित झाल्यानंतर पुस्तके, स्टेशनरी आदी बाबींसाठी एकत्रित 18 हजार रुपये रक्कम आकस्मिक खर्च म्हणून दिली जाते. पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी एकरकमी 50 हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. तसेच मुख्य परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना मुलाखतीच्या तयारीसाठी एकरकमी 25 हजार रुपये अर्थसाहाय्य मंजूर करण्यात येते.

योजनेचा लाभ घेण्यासाठी या आहेत प्रमुख अटी

उमेदवार हा महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या प्रवर्गातील 21 ते 32 वर्षे वयोगटातील असावा. याबाबत सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेला जातीचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला त्याच्याकडे असणे आवश्यक आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा अधिक नसावे. उमेदवाराच्या नावाचे तहसीलदार अथवा सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले शैक्षणिक वर्षाच्या लगतपूर्वीच्या वित्तीय वर्षीचे उत्पन्न प्रमाणपत्र व नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र किंवा ईडब्लूएस प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. अर्ज भरण्याच्या दिवशी उमेदवाराकडे कोणत्याही शाखेची पदवी असावी.  उमेदवाराने इतर कोणत्याही शासकीय, निमशासकीय, खाजगी संस्थाकडून या प्रशिक्षणाचा लाभ घेतलेला नसावा.

अशी आहे उमेदवारांची निवड पक्रिया

‘सारथी’च्या https://sarthi-maharashtragov.in/ या संकेतस्थळावर आणि वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करून उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविले जातात. अर्जदाराची निवड ‘सारथी’मार्फत आयोजित ‘सीईटी’मध्ये प्राप्त गुणांद्वारे केली जाते. या गुणांकानुसार गुणवत्ता यादी ‘सारथी’च्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येते. त्यानंतर कागदपत्रे पडताळणीद्वारे पात्र विद्यार्थ्यांची प्रवेश प्रकिया पूर्ण केली जाते.

 ‘सारथी’च्या प्रशिक्षणातून घडले 12 आयएएस, 18 आयपीएस…

‘सारथी’मार्फत संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेचे प्रशिक्षण घेवून 2020 ते 2022 या गत तीन वर्षात 12 उमेदवार भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) आणि 18 उमेदवार भारतीय पोलीस सेवेमध्ये (आयपीएस) दाखल झाले आहेत. तसेच 8 जणांची भारतीय राजस्व (आयआरएस) सेवेत, एका उमेदवाराची भारतीय वन सेवेत (आयएफएस) तर 12 जणांची इतर केंद्रीय सेवांमध्ये निवड झाली आहे.

सन 2023-24 मधील प्रशिक्षणासाठी 31 डिसेंबर 2023 पर्यंत करता येईल अर्ज

सन 2023-24 मध्ये ‘सारथी’च्या संघ लोकसेवा आयोग परीक्षा मोफत प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. https://sarthi-maharashtragov.in/ या संकेतस्थळावर 31 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. या संकेतस्थळावर योजनेच्या अटी, शर्ती आणि पात्रता निकषांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

 

तानाजी घोलप, 

माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, लातूर

ताज्या बातम्या

अतिवृष्टी व पुरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज – विजयलक्ष्मी बिदरी

0
बाधित कुटुंबांना सुरक्षीत स्थळी हलविण्याला प्राधान्य नागपूर व वर्धा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट पुरपरिस्थिती हातळण्यासाठी आंतरराज्य समन्वय महसूल, पोलीस व जलसंपदा विभागांचा समन्वय  नागपूर, दि...

कफ परेड फेडरेशनच्यावतीने विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांचा विशेष सत्कार

0
मुंबई, दि. ९ : देशातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष म्हणून ॲड. राहुल नार्वेकर यांनी अल्पावधीतच आपल्या कार्यक्षमतेच्या जोरावर संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या...

पद्म पुरस्कारांसाठी शिफारसीसंदर्भात बैठक

0
मुंबई, दि. 9 : पद्म पुरस्कार २०२६ करिता केंद्र शासनास शिफारशी पाठविण्यासंदर्भात विधानभवनात राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीत केंद्र शासनाला पद्म पुरस्कार २०२६...

परिचारिकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक – वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ

0
मुंबई, दि. 9 : "नर्सेस या आरोग्यव्यवस्थेचा कणा असून, त्यांच्या अडचणींविषयी शासन गंभीर आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच उच्चस्तरीय बैठक घेण्यात...

येवला येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारक ‘बार्टी’ने ताब्यात घेऊन विकसित करावे – अन्न, नागरी...

0
मुंबई, दि. 9 : येवला येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारकाचे काम पूर्ण झाले आहे. या स्मारकाचा ताबा ‘बार्टी’ने घेऊन याचा उपयोग सर्वसामान्य लोकांसाठी आणि...