शनिवार, जुलै 12, 2025
Home Blog Page 1052

बालकांचे हक्क, सुरक्षेवर भर देणारे ‘बाल धोरण’ आखणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

 मुंबई, दि. २० : चौथ्या महिला धोरणाची लवकरच राज्यात अंमलबजावणी करणार तसेच बालकांच्या हक्क आणि सुरक्षेवर भर देणारे ‘बाल धोरण’ राज्यात तयार करण्यात येत असल्याचेही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

कुलाबा येथील बेस्ट भवन येथे ‘अर्पण’  स्वयंसेवी संस्था आणि बेस्टच्या  माध्यमातून १८ ते २० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत ‘बालकांचे हक्क व सुरक्षितता अभियान’ राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटनप्रसंगी  मंत्री आदिती तटकरे बोलत होत्या. यावेळी बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्टचे महाव्यवस्थापक विजय सिंगल, अर्पणच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पूजा तापरीया उपस्थित होते.

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, आपल्या रोजच्या प्रवासादरम्यान बालकांना येणारे वाईट अनुभव कसे टाळता येवू शकतात यासाठी प्रशासन आणि स्वयंसेवी संस्था हा जनजागृतीपर चांगला उपक्रम राबवत आहेत. या उपक्रमातून लहान मुलांना चांगले आणि वाईट स्पर्श याची माहिती द्यावी. बेस्ट बरोबर परिवहन विभाग, शिक्षण विभागामार्फत बालकांचे हक्क आणि सुरक्षा अभियान प्रभावीपणे राबवावे. बालकांना लहानपणापासूनच लैंगिक शिक्षणासंदर्भात माहिती झाली, त्यांच्यावर चांगले संस्कार झाले तर उद्याची चांगली पिढी निर्माण होऊ शकेल. आम्ही नागरिकांसाठी मुंबईची सार्वजनिक वाहतूक अधिक सुरक्षित बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आहोत. हा उपक्रम म्हणजे आमच्या मुलांचे सुरक्षित भविष्य संरक्षित करण्याच्या आमच्या सामूहिक बांधिलकीची साक्ष आहे असेही मंत्री कु.तटकरे यांनी सांगितले.

महाव्यवस्थापक विजय सिंगल म्हणाले की, बेस्ट बसमधील प्रवास सर्वांसाठी, विशेषतः आमच्या सर्वात छोट्या प्रवाश्यांसाठी सुरक्षित अनुभव देण्यासाठी आम्ही पूर्णपणे वचनबद्ध आहोत. अर्पण सोबत, आम्ही जागरूकता वाढवण्यासाठी, कर्मचाऱ्यांना शिक्षित करण्यासाठी आणि शहरातील मुलांच्या कल्याणासाठी योगदान देण्यासाठी  काम करत राहू अशी ग्वाही श्री. सिंगल यांनी दिली.”

अर्पणच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पूजा तापरीया यांनी बेस्टच्या  माध्यमातून 18 ते 20 नोव्हेंबर 2023 या कालावधीत बालकांचे हक्क व सुरक्षितता अभियानात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली.

यावेळी बेस्टच्या बसेसमधून लहान मुलांच्या सुरक्षा आणि अत्याचार जनजागृतीपर पोस्टरचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

००००

संध्या गरवारे/विसंअ/

 

मिरज एमआयडीसीमध्ये दर्जेदार रस्त्यांसाठी शासनाकडून निधी मिळवण्यासाठी कटिबद्ध – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली, दि. 20 (जि. मा. का.) : औद्योगिक विकास घडल्यास परिसराचा आर्थिक विकास होतो. नवीन उद्योग घटकांच्या स्थापनेस चालना मिळते. त्यासाठी गुणवत्तापूर्ण पायाभूत सुविधांची उभारणी आवश्यक आहे. त्यामुळे मिरज एमआयडीसीमध्ये दर्जेदार व गुणवत्तापूर्ण रस्ते होण्यासाठी औद्योगिक पायाभूत सुविधा धोरणांतर्गत शासनाकडून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे दिली.

सांगली मिरज एमआयडीसीमधील रस्ते कामासंदर्भात आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा जाधव, कार्यकारी अभियंता आय. ए. नाईक, महानगरपालिकेचे अभियंता पृथ्वीराज चव्हाण, वित्त अधिकारी सुशील केंबळे, सांगली मिरज एमआयडीसी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष विनोद पाटील, संचालक संजय अराणके आणि अतुल पाटील, व्यवस्थापक गणेश निकम तसेच अन्य पदाधिकारी आदि उपस्थित होते.

मिरज एमआयडीसी महानगरपालिका क्षेत्रात आहे. या क्षेत्रात एकूण 11.53 कि.मी.चे रस्ते असून यामध्ये 8.75 किमी मुख्य रस्ता व 2.78 किमी अंतर्गत रस्ते आहेत. सद्यस्थितीत या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या पार्श्वभूमिवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, मिरज एमआयडीसीमधील रस्ते दर्जेदार व गुणवत्तापूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी लागणाऱ्या निधीचे अंदाजपत्रक संबंधित विभागांनी प्राधान्याने आणि तात्काळ करावे. तसेच समांतरपणे अन्य प्रशासकीय प्रक्रिया प्राथम्याने आठवड्याच्या कालमर्यादेत पूर्ण करावी. रस्त्यांसाठी आवश्यक एकूण निधीच्या २५ टक्केअंतर्गत रक्कम स्वनिधीमधून एमआयडीसीतील उद्योजकांनी करापोटीचा महसूल म्हणून महानगपालिकेकडे जमा करावी. उर्वरित निधी नगरोत्थानमधून देण्यात येईल. उर्वरित ७५ टक्के रकमेसाठी औद्योगिक पायाभूत सुविधा धोरण अंतर्गत शासनाकडून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करेन, असे त्यांनी यावेळी सांगितले.

हे रस्ते काम होण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे उद्योजकांची गैरसोय टाळण्यासाठी महानगरपालिकेने रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम दर्जेदारपणे करावे, अशा सूचना डॉ. खाडे  यांनी यावेळी दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी व आयुक्त सुनील पवार यांनी आवश्यक प्रशासकीय कार्यवाहीसंदर्भात विचार मांडले. उद्योजकांनी त्यांचे मत मांडले.

तोरणमाळ म्हणजे पर्यटनाच्या अमर्याद संधी

नंदुरबार, दिनांक १९ महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण ही तोरणमाळची ओळख आहेच, परंतु त्यापलीकडे निसर्गसौंदर्य, इतिहास,  आदिवासी संस्कृती, निसर्गोपचारासह साहसी क्रीडा पर्यटन यासारख्या वैविध्यपूर्ण पर्यटनाच्या येथे मोठ्या संधी असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.

ते आज तोरणमाळ येथे पर्यटन विकास विभाग व वनविभागाच्या वतीने आयोजित आदिवासी पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी पंचायत समिती सदस्य रतिलाल नाईक,  तोरणमाळचे सरपंच इंदुबाई चौधरी, नगरसेवक संतोष वसईकर, पर्यटन संचालनालयाच्य उपसंचालिका मधुमती सरदेसाई,  कृषी पर्यटन तज्ञ पांडुरंग तावरे, नंदुरबार येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर हुमणे, ‘माविम’ च्या वरिष्ठ अधिकारी कांता बनकर, धडगावचे सुभाष पावरा, पर्यटन संचालनालयाचे कल्पेश पाडवी तसेच तोरणमाळ भागातील विविध ग्रामपंचायतींचे सरपंच उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, तोरणमाळ या पर्यटन तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा म्हणून पूर्वीपासूनच शासनाचे प्रयत्न राहिले आहेत आणि आता विद्यमान स्थितीतदेखील या दुर्गम भागातील बचत गटांना त्याच दृष्टिकोनातून प्रोत्साहन देणे सुरू आहे. आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून रस्ते जोड योजना राबवणार आहे. तोरणमाळपासून ते शेवटच्या टोकावरील भादल गावापर्यंत वीज पोहोचावी म्हणून ३३ केवी उपकेंद्र मंजूर करण्यात आले आहे. त्याचबरोबर तोरणमाळ भागातील विविध विकास कामांसाठी ४०० कोटी रुपये मंजूर असून त्यापैकी २०० कोटी रुपये येत्या काही दिवसात प्राप्त होतील आणि त्यातून विविध कामे सुरू झालेली दिसतील; अशी माहिती देऊन आदिवासी विकास मंत्री डॉ.  विजयकुमार गावित यांनी तोरणमाळच्या पर्यटन विकासाला भरभक्कम चालना देणार असल्याची ग्वाही दिली.

ते पुढे म्हणाले, महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण म्हणून तोरणमाळ सर्वत्र ओळखले जाते. आता आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून बिरसा मुंडा रस्ते जोड योजना राबवली जात आहे आणि त्यामुळे तोरणमाळ परिसरातील सर्व दुर्गम पाडे पर्यटनाच्या दृष्टीने संपर्कात येतील. या भागातील उंच शिखर जोडणारे झुलते पूल करावे, डंकी जम्पिंग ची व्यवस्था करावी,  तोरणमाळ भागात बोटिंग व्यवसाय विकसित करावा अशा विविध कामांना चालना दिली तर पर्यटन वाढू शकते. त्यादृष्टीने आपला सतत प्रयत्न राहणार आहे. विद्यमान स्थितीत या भागातील लोकांच्या घरात वीज पोहोचावी म्हणून ३३ केवीचे  उपकेंद्र मंजूर करण्यात आले असून येथील बचत गटांना केंद्रीय अर्थसहाय्य योजनेतून चालना देऊन प्रक्रिया उद्योग विकसित केले जातील,  असे मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित म्हणाले.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला तोरणमाळ पर्यटन महोत्सवाच्या आयोजनामागची भूमिका पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालिका मधुमती सरदेसाई यांनी आपल्या भाषणातून विषद केली. महोत्सवाच्या दुसऱ्या सत्रात कृषीतज्ञ पांडुरंग तावरे यांनी कृषी पर्यटनाची सविस्तर माहिती दिली.

विविध प्रकारचे आदिवासी नृत्य सादर करणारे पथक,  त्या भागात पर्यटनाला आलेले एक दांपत्य, स्ट्रॉबेरी सारखे निराळे कृषी प्रयोग राबवणारे शेतकरी आणि अन्य यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. यावेळी मंत्री डॉ.  गावित यांनी यावेळी प्रदर्शित प्रत्येकदालनाला भेट देऊन स्टॉल धारक बचत गटाच्या महिलांशी संवाद साधत विविध योजनांच्या माध्यमातून उद्योग आणि प्रकल्प कसा विकसित करता येईल याचे मार्गदर्शन केले.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदक विजेत्या नागपूरच्या मिनीगोल्फ खेळाडूंचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिनंदन

नागपूर दि. 19 : पणजी येथे येथे आयोजित 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मिनीगोल्फ या खेळात सुवर्णपदक विजेते नागपूरचे खेळाडू पार्थ हिवरकर,  सुदीप मानवटकर व कांचन दुबे तसेच रजत पदक विजेते पायल साखरे व निहाल बगमारे या खेळाडूंचे आणि प्रशिक्षक डॉ. विवेक शाहू यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन करुन सत्कार केला.

इंडियन ऑलिंपिक असोसिएशन, भारत सरकार, गोवा ऑलिंपिक असोसिएशन व गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने 1 ते 3 नोव्हेंबर या कालावधीत मिनीगोल्फ या खेळाचे आयोजन गोव्याच्या पणजी शहरात मीरामार बीच येथे करण्यात आले.

माजी महापौर संदीप जोशी, रितेश गावंडे,  साहेबराव इंगळे, दिलीप दिवे, रमेश शिंगारे व अजय हिवरकर आदी सामाजिक कार्यकर्ते खेळाडूंच्या सत्कारप्रसंगी उपस्थित होते.

भारतीय संगीताचा अनमोल वारसा पुढच्या पिढीला देण्यासाठी स्व.लता मंगेशकर संगीत विद्यालय (गुरुकुल) उपयुक्त ठरेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, दि.19(जिमाका) :- आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी भाग्याचा आहे. देशाची शान असलेल्या गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृती चिरंतन ठेवणारे स्व.लता मंगेशकर संगीत विद्यालयाचे (गुरुकुल) भूमिपूजन ठाण्यात होत आहे. हे गुरुकुल भारतीय संगीताचा अनमोल वारसा पुढच्या पिढीला देण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नाने राज्य शासनाच्या “महानगरपालिका क्षेत्रातील मूलभूत सोयीसुविधांचा विकास” या योजनेंतर्गत ठाणे महापालिका क्षेत्रातील रेप्टोक्रॉस आरक्षित भूखंड, वर्तकनगर, ठाणे येथे भारतरत्न स्व. लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालय (गुरुकुल) उभारण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ गायिका संगीतकार श्रीमती उषा मंगेशकर, आमदार प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत आज डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी श्रीमती मीना खडीकर, ज्येष्ठ गायक आदिनाथ मंगेशकर, ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, ठाणे महापालिका परिवहन समितीचे सभापती विलास जोशी, राजू मिश्रा, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, पूर्वेश सरनाईक आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, सर्व युगांप्रमाणे ‘लता युग’ हे अविस्मरणीय आहे. त्यांची गाणी आजही आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहेत. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत लतादीदींची गाणी सर्वांनाच हवीहवीशी वाटतात. या विद्यालयाच्या उभारणीसाठी राज्य शासनाकडून 25 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ठाण्याला संगीत आणि साहित्याचा मोठा वारसा आहे. संगीत क्षेत्रातील दिग्गज पं. राम मराठे, पी.सावळाराम, श्रीनिवास खळे हे ठाण्यातीलच. भारतीय संगीताचा अनमोल वारसा पुढच्या पिढीला देण्यासाठी स्व.लता मंगेशकर संगीत विद्यालय (गुरुकुल) गायन-संगीत प्रेमींना निश्चितच उपयुक्त ठरेल. या वाटचालीत शासन मंगेशकर कुटुंबियांच्या कायम सोबत असेल.

ठाण्यातील इतर विकासकामेही लवकरच पूर्ण करण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत. ठाण्याचा सर्वांगीण विकास होत आहे. मुंबईतील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याचे काम सुरू केले आहे. त्याचबरोबर सुशोभीकरण, स्वच्छतेकडेही कटाक्षाने लक्ष दिले जात आहे. त्याच धर्तीवर ठाण्यातही काम सुरु केले जाणार आहे. जुन्या विहिरींचे पुनरुज्जीवन करण्याचे काम सुरू असून 50 कोटी रूपये निधी दिला आहे. ‘वापरा आणि फेका’ ही आपली संस्कृती नाही. जुना अनमोल ठेवा जपायला हवा, त्याचे संवर्धन करायला हवे. हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे ठाणे जिल्ह्यावर खूप प्रेम होते, मी त्यांच्याच आशीर्वादाने मुख्यमंत्री झालो, त्यांच्या विचारधारेवरच मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळत आहे.

‘ग्लोबल वॉर्मिंग’ या जागतिक समस्येवर  मात करण्यासाठी जागोजागी झाडे लावणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने शासन प्रयत्नशील असून ‘अर्बन फॉरेस्ट’ ही संकल्पना लवकरच राबविण्यात येणार आहे. मोठमोठ्या शहरांमधील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास टप्प्याटप्प्याने केला जाणार आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी जबाबदारीने, झोकून देऊन काम करणे आवश्यक आहे, याची पूर्ण जाणीव असल्यानेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या साथीने सर्व मिळून जनसामान्यांसाठी अहोरात्र काम करीत आहोत. बंद झालेले अनेक लोकोपयोगी प्रकल्प सुरू करण्यात आले असून नवीन प्रकल्पही सुरू करण्यात आले आहेत. हे सर्वसामान्यांचे शासन आहे, शेवटपर्यंत त्यांच्या हितासाठीच काम केले जाईल, अशी ग्वाही श्री. शिंदे यांनी दिली.

याप्रसंगी ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना विशेष भेट दिली. मनोगत व्यक्त करताना त्या म्हणाल्या, ठाण्याचे बदलते रूप पाहून मनापासून आनंद होत आहे. या ठाण्याला साजेशी अशी स्व.लता मंगेशकर संगीत विद्यालय (गुरुकुल) ची इमारत लवकरच उभारली जाणार आहे. त्याचा लाभ ठाणे व आसपासच्या परिसरातील सर्वच वयोगटातील गायन-संगीतप्रेमींनी घ्यावा. हे संगीत विद्यालय चालविण्याची जबाबदारी मंगेशकर कुटुंबियांकडे सोपविल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

श्री. सरनाईक यांनी मनोगत व्यक्त करताना ठाणे शहरातील ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील सुरु असलेल्या व नजीकच्या काळात सुरु होणाऱ्या विविध विकासकामांविषयी माहिती दिली. या विकासकामांसाठी भरघोस निधी देऊन सहकार्य केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे आभार मानले.

त्यापूर्वी, पोखरण रोड नं. 01 येथील सिंघानिया शाळेसमोरील 3.75 कोटी रुपये खर्च करुन तयार करण्यात आलेल्या पादचारी पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे झालेल्या मुख्य सोहळ्यात, अमृत 2.0 योजनेंतर्गत वर्तकनगर-लोकमान्य नगर, घोडबंदर परिसरातील 200 कोटी रुपये मूल्य असलेला पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेचे मजबूतीकरण आणि विस्तारीकरण प्रकल्प यांचा शुभारंभ, खर्चाची रक्कम 50 कोटी रुपये असलेल्या शहरातील जुन्या विहिरींची शास्त्रोक्त पद्धतीने सफाई आणि पुनर्बांधणी या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला. याबरोबरच वर्तकनगर प्रभाग समितीतील सर्व चौकांचे सुशोभीकरण करून आजूबाजूच्या परिसराची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी डिजिटल बोर्ड उभारणी (मूल्य 20 कोटी), ओवळा-माजिवडा क्षेत्रातील तलावांमधील संगीतमय कारंजी उभारणी व सुशोभीकरण (मूल्य 50 कोटी), मुंबईच्या धर्तीवर महापालिका क्षेत्रातील फूटपाथवर शोभिवंत रेलिंग लावणे (मूल्य 25 कोटी) या कामांचाही ऑनलाईन शुभारंभ मुख्य सोहळ्यात झाला.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सूत्रसंचालन कुणाल रेगे यांनी केले.

माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबई,दि 19: भारताच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

मंत्रालयातील उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनीही इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.  इंदिरा गांधी यांचा जन्मदिन राष्ट्रीय एकात्मता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त श्रीमती सौनिक यांनी उपस्थित सर्वांना राष्ट्रीय एकात्मता दिनाची शपथ दिली.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव र.रा. पेटकर यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे इंदिरा गांधी यांना जयंतीनिमित्त अभिवादन                         

मुंबई, दि. १९ :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारताच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांना जयंतीनिमित्त आज विनम्र अभिवादन केले. या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय एकात्मता दिनाची शपथही दिली.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी वर्षा शासकीय निवासस्थानी दिवंगत गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. यावेळी उपस्थितांना त्यांनी राष्ट्रीय एकात्मता दिनाची शपथही दिली.

म्हैसाळ योजनेच्या रब्बी आवर्तनाचा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत शुभारंभ

सांगली, दि. १८ (जिमाका) : कालवा सल्लागार बैठकीत नियोजन केल्यानुसार आज म्हैसाळ योजनेच्या रब्बी आवर्तनाचा म्हैसाळ प्रकल्पाच्या पंप गृह क्र.१ येथे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. यावेळी खासदार संजय पाटील, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता सी. एच. पाटोळे, कार्यकारी अभियंता रोहित कोरे व श्री. पवार उपस्थित होते.

रब्बी आवर्तनामध्ये म्हैसाळ योजनेच्या लाभक्षेत्रामध्ये पुच्छ भाग ते शीर्ष भाग (Tail to Head) धोरणाअन्वये पाणी देण्यात येणार आहे. १० डिसेंबरपर्यंत केवळ जत कालव्याच्या लाभक्षेत्राला जत, सांगोला, मंगळवेढा भागाला पाणी देण्यात येणार असून त्यानंतर १० डिसेंबर ते २८ फेब्रुवारीपर्यंत लाभ क्षेत्रातील विविध कालव्यांना नियोजित वेळापत्रकाप्रमाणे पाणी सोडण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

०००

विलेपार्ले प्रेमनगर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला गती द्यावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दि. १८: विलेपार्ले प्रेमनगर येथे झोपडपट्टी पुनर्वसनाच्या जागेवर होत असलेली अतिक्रमणे तातडीने काढून यासाठी जबाबदार असलेल्या संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई करावी, असे निर्देश देतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील पुनर्विकासाच्या कामाला गती देण्याचे निर्देश गृहनिर्माण विभागाला दिले.  मुंबईत कोणत्याही परिस्थितीत नव्याने झोपड्या आणि अनधिकृत बांधकामे होऊ नयेत यासाठी पालिका आणि पोलीस प्रशासनाने जागरूक राहून समन्वयाने कारवाई करावी, असेही मुख्यमंत्री म्हणाले. सर्वसामान्य, गोरगरीब नागरिकांना घरे मिळवीत म्हणून आपण निर्णय घेतले आहेत त्यामुळे विकासक विनाकारण अडवणूक करत असतील तर नियमानुसार लगेच कारवाई करा, असेही निर्देश त्यांनी दिले.

विलेपार्ले प्रेमनगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प व सांताक्रूझ खार पूर्व येथील शिवालिक व्हेंचर्सच्या प्रकल्पासंदर्भात आज सह्याद्री अतिथिगृह येथे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. माजी मंत्री रामदास कदम, गृहनिर्माणच्या अतिरिक्त मुख्य सचिव वल्सा नायर, झोपडपट्टी पुनर्वसनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, कुणाल सरमळकर, प्रेमनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेचे कृष्णा कदम व इतर प्रतिनिधी, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आदी उपस्थित होते.

प्रेमनगर एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्थेचा पुनर्विकास त्वरित करण्याच्या दृष्टीने गृहनिर्माण विभाग आणि झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने योग्य ती पावले तातडीने उचलावीत तसेच याठिकाणाहून निष्कासित करण्यात आलेल्या १४०७ पैकी ८५० झोपडीधारकांना गेल्या आठ वर्षांपासून भाडे मिळालेले नाही. हे भाडे ६१ कोटी असून नव्याने निश्चित होणाऱ्या विकासकाकडून हे थकीत आणि पुढील भाडे नियमानुसार मिळाले पाहिजे अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. थकीत भाडे मिळत नसल्याच्या प्रश्नावरून उच्च न्यायालयात याचिकेवर सुनावणी प्रलंबित आहे. काही व्यक्ती येथील झोपडीधारकांची दिशाभूल करीत असून त्यांच्याकडून पैसेही घेत असल्याच्या तक्रारी आहेत त्यावर पोलिसांनी आर्थिक गुन्हे शाखेमार्फत लगेच कारवाई करावी, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

खार पूर्व येथे संक्रमण शिबिराच्या अडचणी दूर करा

सांताक्रूझ खार (पूर्व) येथे गोळीबार भागात शिवालिक व्हेंचर्सतर्फे पुनर्विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे. याठिकाणी असलेल्या संक्रमण शिबिरात राहणाऱ्या झोपडीधारकांच्या गैरसोयी दूर करून त्यांच्या अडचणी सोडविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला दिले. येथील निष्कासित करण्यात आलेल्या ७५०० झोपडीधारकांना नियमानुसार थकीत आणि चालू भाडे मिळेल हे पाहण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

०००

बल्लारपूर बायपास अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून २० लाखांची मदत

चंद्रपूर, दि. १८ : सप्टेंबर महिन्यात बल्लारपूर बायपासवर ट्रक आणि ऑटोरिक्षाच्या भीषण अपघात होऊन मृत्यू झालेल्या ४ जणांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत जाहीर झाली आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शासनाकडे तातडीने याबाबतचा प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या होत्या. प्रत्येकी पाच लाख रुपयांप्रमाणे एकूण २० लाख रुपयांची मदत जाहीर झाली आहे.

२७ सप्टेंबर २०२३ रोजी झालेल्या अपघातात राजकला मोहुर्ले, इरफान खान (रा. बाबुपेठ, चंद्रपूर), अनुष्का खेरकर (रा. बल्लारपूर) आणि संगिता अनिल चहांदे (रा. साईनगर, गडचिरोली) यांचा मृत्यू झाला होता. मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळावी यासाठी महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र खांडेकर आणि जिल्हाध्यक्ष मधुकर राऊत यांनी पालकमंत्र्यांकडे मदतीची मागणी केली होती. प्रस्ताव पाठविल्यानंतर २० दिवसांच्या आत मुख्यमंत्री सचिवालयाने मृतांच्या कायदेशीर वारसदारांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य मंजूर केले.

०००

ताज्या बातम्या

महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२३ : लिपिक-टंकलेखक संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर

0
मुंबई, दि. ११ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दि. १७ डिसेंबर, २०२३ रोजी मुंबईसह छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, नाशिक व पुणे जिल्हाकेंद्रांवर घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०२३ मधील...

इटलीतील मॉन्टोन येथे नायक यशवंत घाडगे यांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण

0
नवी दिल्ली, दि. 11 : दुसऱ्या महायुद्धातील भारतीय वीर नायक यशवंत घाडगे यांच्या अतुलनीय शौर्यास श्रद्धांजली म्हणून इटलीतील मॉन्टोन शहरात त्यांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. भारताच्या...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या धैर्य, शौर्य, पराक्रमाचा वारसा लाभलेल्या बारा किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा...

0
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत महाराष्ट्रातील अकरा आणि जिंजी किल्ल्याच्या समावेशाबद्दल आनंद व अभिमान - उपमुख्यमंत्री अजित पवार तामिळनाडूतील जिंजीसह महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा...

छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास जागतिक पातळीवर पोहोचणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आनंद...

0
मुंबई दि. ११ : युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा समावेश झाल्याची घोषणा आज झाली असून, ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि...

देशातील सर्वोत्तम ‘ऑफ शोअर एअरपोर्ट’ मुंबईत उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. ११ : भारताला ‘मेरीटाईम पॉवर’ बनविणारे वाढवण बंदर जसे देशातील सर्वोत्तम 'ऑफ शोअर पोर्ट'  होणार आहे त्याचप्रमाणे सर्वोत्तम 'ऑफ शोअर एअरपोर्ट' मुंबईत उभारणार असून जे मुंबईतील तिसरे एअरपोर्ट...