रविवार, मे 11, 2025
Home Blog Page 1039

समर्पित भावनेने काम करून सामाजिक प्रश्न सोडवण्यात पुढाकार घ्यावा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

सोलापूर, दि.8 (जिमाका):- प्रत्येक व्यक्तीने समाजात वावरत असताना या समाजाप्रती काही देणे आहे अशी समर्पित भावना ठेवून सामाजिक प्रश्न सोडवण्यात पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन आयोजित शेतकरी, उत्कृष्ट अधिकारी व पदाधिकारी गौरव सोहळयात पालकमंत्री विखे पाटील बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, विजयराजे ढोबळे, सौ. शोभा पवार, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे मंगेश चिवटे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री विखे पाटील पुढे म्हणाले की, रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन द्वारा होत असलेल्या शेतकरी, उत्कृष्ट अधिकारी व पदाधिकारी गौरव सोहळ्यातील सर्व मान्यवरांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेले असून त्यांच्या कार्यामुळे समाजाला मोठा फायदा झालेला आहे. अधिकाऱ्यांनी प्रशासकीय कामकाज करत असताना चाकोरी बाहेर जाऊन त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांना मदत करून त्यांचे प्रश्न सोडवण्यास हातभार लावलेला आहे, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून शेती पिकाचे उत्पादन चांगले घेऊन अर्थव्यवस्थेला गती देण्याचा प्रयत्न केला आहे, अशा सर्व मान्यवरांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी पालकमंत्री श्री विखे पाटील यांच्या हस्ते शेतकरी उत्कृष्ट अधिकारी व पदाधिकारी यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये औसा विधानसभेचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या वतीने त्यांच्या पत्नी सौ. शोभा पवार यांनी सत्कार स्वीकारला. मुख्यमंत्री सहायता निधीचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, जिल्हा नगरपालिका प्रशासन अधिकारी आशिष लोकरे, जिल्हा जलसंधारण अधिकारी दयासागर दामा, शेतकरी बाळासाहेब काळे, उद्योजक दत्तात्रय कोरे, संध्या खांडेकर, सीमाताई घाडगे व अन्य मान्यवरांचा सत्कार पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला.

प्रारंभी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील रुरल फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ. सुनील गावडे यांनी प्रस्ताविक केले व या कार्यक्रमाचा उद्देश सांगितला.

‘शासकीय रोपवाटिका व्यवस्थापन’ या विषयावरील राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन

मुंबई दि. 8 : कृषी महाविद्यालय, पुणे येथील शिरनामे सभागृहात ‘शासकीय रोपवाटिका व्यवस्थापन’ या विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून त्याचे उद्घाटन कृषी आयुक्त श्री. सुनील चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी फलोत्पादनचे संचालक डॉ.कैलाश मोते, सहसंचालक अशोक किरनळी, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीचे प्राध्यापक डॉ.पराग हळदणकर, कृषी अभियांत्रिकीचे  प्राध्यापक डॉ.रवींद्र बनसोडे उपस्थित होते.

शासकीय रोपवाटिकेमध्ये कार्यरत अधिकारी, कर्मचारी, सर्व संबंधित उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी व विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील तंत्र अधिकारी कार्यशाळेत सहभागी झाले होते.

00000

दत्तात्रय कोकरे/विसंअ

बृहन्मुंबई महापालिका शाळांमध्ये रात्र अभ्यासिका सुरू; सुमारे ४ लाख विद्यार्थ्यांना लाभ होणार – मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि. ८ :- बृहन्मुंबई महापालिकेच्या शालेय इमारतींमध्ये सायंकाळच्या वेळेत रात्र अभ्यासिका सुरू करण्याचे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महापालिकेच्या शालेय शिक्षण विभागाला दिले होते. त्याची अंमलबजावणी विभागाने सुरू केली असून, त्या अंतर्गत अंधेरी पूर्व येथील कोल डोंगरी परिसरातील नित्यानंद मार्ग पब्लिक स्कूल येथे पंडीत दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत रात्र अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज नित्यानंद मार्ग पब्लिक स्कूल येथे या रात्र अभ्यासिकेचे उद्घाटन केले.

मंत्री श्री.लोढा म्हणाले की, मुंबई शहरात अनेक विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी जागा, आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध नाहीत, त्यामुळे इच्छा असताना सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास, प्रगती करण्यास अडथळे निर्माण होतात. त्यामुळे मुंबईमध्ये रात्र अभ्यासिकेची नितांत गरज होती. या अभ्यासिकेमुळे मुलांचे अनेक प्रश्न सुटणार आहेत. हे वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष आहे. त्यानिमित्ताने लवकरच आपल्या शहरात ३५० रात्र अभ्यासिका सुरू व्हाव्यात, यासाठी प्रयत्न करण्यात येतील. टप्प्याटप्प्याने महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये सुरू होणार असून, त्याचा लाभ या शाळेत शिकणाऱ्या सुमारे ४ लाख विद्यार्थ्यांना होणार असल्याचे, मंत्री श्री.लोढा यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ही प्रथम रात्र अभ्यासिका सुरू झाली असून, यापुढे प्रत्येक वार्डमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही मंत्री श्री.लोढा यांनी सांगितले.

महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या तसेच परिसरातील खासगी शाळेत शिक्षण घेणाऱ्या नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना या उपक्रमात प्रवेश घेता येणार आहे. उत्कर्ष शिक्षण प्रसारक मंडळाच्या सहकार्याने, पालिकेच्या शाळांमध्ये तळमजल्यावर विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र खोली उपलब्ध असेल अशा इमारतीतच ६ ते ८ या वेळात रात्र अभ्यासिका सुरू करण्यात येणार आहे. प्रवेशासाठी पालकांकडून संमती पत्र, त्याचबरोबर विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती आवश्यक असणार आहे.

या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार पराग आळवणी, माजी नगरसेवक अभिजित सावंत आणि संबंधित अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

0000

संध्या गरवारे/विसंअ

ग्रामविकास विभागाच्या भरतीप्रक्रियेतील उमेदवारांनी कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये – मंत्री गिरीष महाजन

मुंबई, दि. ८ :- ग्रामविकास विभागाची संपूर्ण भरतीप्रक्रिया शासनाने मान्यता दिलेल्या आय.बी.पी.एस. या कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. त्यामुळे सदर परीक्षा अत्यंत पारदर्शक व काटेकोर पद्धतीने होणार आहे. तथापि, काही समाजविघातक प्रवृत्तींच्या व्यक्तींकडून प्रलोभने दाखवून आर्थिक फसवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा फसवणुकीपासून उमेदवारांनी दक्षता घ्यावी, तसेच अशाप्रकारच्या कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये, असे आवाहन ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीष महाजन यांनी केले आहे.

मंत्री श्री. महाजन म्हणाले की, ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत राज्यातील 34 जिल्हा परिषदांतर्गत गट – क मधील 30 संवर्गातील एकूण 19 हजार 460 इतकी रिक्त पदे सरळसेवेने भरण्याबाबतची जाहिरात दि. 05 ऑगस्ट, 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जाहिरातीनुसार दि. 05 ते 25 ऑगस्ट, 2023 पर्यत ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी सांगितले आहे की, कोणतीही व्यक्ती परिक्षेसंदर्भात आर्थिक मागणी करीत असल्याबाबत निदर्शनास आल्यास त्यांच्याविरुद्ध जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात यावी, फसवणूक झाल्यास शासन अथवा जिल्हा परिषद जबाबदार राहणार नाही.

००००

राजू धोत्रे/विसंअ

टोकियो येथील जागतिक कराटे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या चमूला मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

मुंबई, दि.८  :- जागतिक कराटे चॅम्पियनशिपध्ये सहभागी होणाऱ्या टीमला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.

ऑक्टोबर, २०२३ मध्ये जपानमधील टोकियो येथे होणाऱ्या जागतिक कराटे चॅम्पियनशिपमध्ये मुंबईच्या कराटेनोमिची वर्ल्ड फेडरेशन इंडिया संस्थेतील खेळाडू सहभागी होणार आहेत. या खेळाडूंनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. कराटे चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होणाऱ्या संघातील या संस्थेचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांच्यासह ७ खेळाडू, २ पंच अधिकारी अशा ९ जणांच्या चमूला मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

00000

गुंजोटी येथे वेदप्रकाश हुतात्मा झाले ; मराठवाडा मुक्ती लढा तीव्र झाला

स्टेट काँग्रेसने स्वामी रामानंद तिर्थ यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष तीव्र झाला , जुलूम व अन्याय यांचा प्रतिकार करणे हीच खरी ईश्वरभक्ती आहे. असे स्वामीजींचे सूत्र होते. सत्याग्रहींच्या सर्व तुकड्यांमध्ये मराठवाड्यातील तरुण आघाडीवर होते. गोविंदभाई श्रॉफ, माणिकचंद पहाडे यांनी कुशलपणे सत्याग्रहीचे संघटन केले. मराठवाड्यातील ३५०  सत्याग्रहींनी भाग घेतला. सत्याग्रहासाठी तरुणांची मने प्रज्वलित करण्यासाठी गोविंदभाई श्रॉफ, माणिकचंद पहाडे , बाबासाहेब परांजपे, पुरुषोत्तमराव चपळगावकर, कर्वे गुरुजी यांनी मोलाचे योगदान दिले. स्टेट काँग्रेस व जातीयवादी संघटना यांच्या सत्याग्रहामध्ये गल्लत होऊन स्टेट काँग्रेसबद्दल गैरसमज वाटू लागले. म्हणून महात्मा गांधीजींच्या आदेशावरून स्टेट काँग्रेसचा सत्याग्रह स्थगित करण्यात आला.

आर्य समाजाचे कार्य :

संस्थानात आर्य समाजाने अखिल भारतीय स्वरूपाचा लढा दिला. हैदराबाद संस्थांनातील हिंदू प्रजेवरील अन्यायाकडे लक्ष वेधण्यात आर्य समाज सफल ठरला. आर्य समाजाने 24 ऑक्टोबर, 1938 पासून पुढे जवळपास दहा महिने सत्याग्रहाचा लढा चालवला. हिंदू संघटन करणाऱ्या आर्य समाजावर निजामाचा रोष होता. त्यामुळे संस्थांनात व मराठवाड्यात आर्य समाजाच्या शाखा वाढल्या.  आर्य समाजाला जात, पात भेद व स्त्री – पुरुष भेद मान्य नव्हता, म्हणून त्यांनी अनेक अस्पृश्यांना वैदिक धर्मात समाविष्ट करून घेतले. संस्थानात 1941 पर्यंत आर्य समाजाच्या 241 शाखा कार्यरत होत्या. आर्य समाजाचे 12 हजार पेक्षा अधिक सत्याग्रही तुरुंगात गेले. संस्थानात एकूण 40 हजार एवढे आर्य समाजाचे अनुयायी असल्याचे दिसून येते. तेलंगण, कर्नाटक विभागाच्या तुलनेत मराठवाडा विभागात आर्य समाज अधिक प्रभावी होता. आर्य समाजाने सक्तीच्या धर्मांतरास विरोध केला. आर्य प्रतिनिधी सभेने शिष्टमंडळ पाठवून संस्थांनातील परिस्थितीची पाहणी करण्यात यश मिळवले. मराठवाड्यात धारूर, गुंजोटी, निलंगा, उमरगा, उदगीर येथील आर्य समाजी लोकांवर अधिक अन्याय झाले. गुंजोटी येथील तरुण कार्यकर्ता वेदप्रकाश याची क्रुर हत्या झाली. हैदराबाद संस्थानातील पहिला हुतात्मा वेदप्रकाश  झाले, आणि मराठवाडा मुक्ती चळवळीने सशस्त्र लढा हाती घेतला. उदगीरला शामलाल यांनी आर्य समाजाच्या चळवळीचे प्रभावीरीत्या संघटन केले.  भाई शामलाल यांची बिदर तुरुंगात हत्या करण्यात आली. निझाम शासनाच्या अन्याय व अत्याचारामुळे संस्थानात आर्य समाजाची लोकप्रियता वाढत गेली व त्यातूनच चळवळीत नव-नवीन कार्यकर्ते व नेते उदयाला आले. आर्य समाजाने निजामाकडे केलेल्या 14 मागण्या केल्या होत्या. संस्थानात आर्य समाजाच्यावतीने पहिला सत्याग्रह दि. 31 जानेवारी, 1939 ला झाला. मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यांतून आर्य समाजाच्यावतीने सत्याग्रह झाले. नारायण स्वामी, नरदेव शास्त्री, नरेंद्र देव, बन्सीलाल, शेषराव वाघमारे,  आनंद स्वामी, दिगंबरराव लाटकर, दिगंबरराव शिवणगीकर, निवृत्ती रेड्डी, गणपतराव कथले, शंकरराव पाटील अंधोरीकर यांनी आर्य समाजाच्या चळवळीत चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला ….

क्रमशः……

  • जिल्हा माहिती अधिकारी, उस्मानाबाद

 

मूल येथील कृषी महाविद्यालयाच्या कामाला गती द्या- पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई / चंद्रपूर, दि. ८ : चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील मुलांना कृषी क्षेत्रातील तांत्रिक आणि सखोल  ज्ञान मिळावे, या दृष्टीने मूल येथे प्रस्तावित असलेले कृषी महाविद्यालय पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर वेगाने काम करा, असे निर्देश चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

कृषी महाविद्यालयाचे इमारत बांधकाम व इतर प्रलंबित विषयांचा आढावा मंत्रालयात  मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी घेतला.  यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्यासह पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे कुलसचिव सुधीर राठोड, कृषी विभाग आणि इतर विभागांचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, कृषी महाविद्यालयाच्या पहिल्या टप्प्यातील प्रशासकीय इमारत आणि मुला आणि मुलींच्या वसतिगृहाच्या कामांचा समावेश आहे. या कृषी महाविद्यालयासाठी लागणारी सध्याची जमीन ही वन विभागाची आहे. या जमिनीची  हस्तांतरण प्रक्रिया तातडीने व्हावी, याबाबतीत कोणत्याही तांत्रिक अडचणी येणार नाही हे पाहण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

शेती हा आपल्‍या अर्थव्‍यवस्‍थेचा कणा आहे. देशासह राज्यातील जनता शेती व्‍यवसायावर अवलंबून आहे. शेतकऱ्यांचे उत्‍पन्न दुप्‍पट करण्‍याचे शासनाचे ध्‍येय आहे. या ध्‍येयपूर्तीसाठी  महत्‍त्‍वाकांक्षी प्रकल्प शासन राबविणार आहे; यामध्ये प्रशासकीय अडचणी येता कामा नयेत, असेही ते म्हणाले. स्थानिक तरुणांचा शेतीकडे कल वाढावा व त्याला योग्य कृषीविषयक शिक्षण मिळावे म्हणूनच डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून चंद्रपूर-गडचिरोली मधील मुलांच्या उज्वल भविष्यासाठी हे कृषी महाविद्यालय उभे करण्याचा संकल्प केला आहे, असेही मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले.

महाविद्यालयाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामासंदर्भात सुधारित प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी या बैठकीत दिले.

 

०००

जिल्हा वार्षिक योजना सन २०२३-२४ साठीचा ७४५ कोटींचा निधी शंभर टक्के खर्च करावा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

सोलापूर, दि. 7(जिमाका):- जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 साठी सर्वसाधारण योजनेसाठी साठी 590 कोटी, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 151 कोटी व आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजनासाठी 4.28 कोटी असे एकूण 745.28 कोटी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तरी सर्व शासकीय यंत्रणांनी प्रशासकीय मान्यतेसाठी त्वरित प्रस्ताव सादर करावेत व हा निधी प्राधान्यक्रम ठरवून शंभर टक्के खर्च करण्यासाठी सूक्ष्मपणे नियोजन करावे, असे निर्देश महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले.

नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. विखे पाटील बोलत होते. यावेळी खासदार सर्वश्री जय सिद्धेश्वर स्वामी, रणजीतसिंह नाईक निंबाळकर, ओमराजे निंबाळकर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मनपा आयुक्त शितल उगले – तेली, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सहायक नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे व अन्य व्यासपीठावर उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, मागील वर्षी ज्याप्रमाणे जिल्हा नियोजन समितीने मंजूर असलेला निधी 682 कोटीचा निधी शंभर टक्के खर्च केलेला आहे. ही बाब अत्यंत समाधानाची असून याबद्दल जिल्हाधिकारी व सर्व विभाग प्रमुखाचे त्यांनी अभिनंदन करून  यावर्षीचाही मंजूर असलेला 745.28 कोटीचा निधी वेळेत खर्च करावा अशा सूचना केल्या. प्रत्येक शासकीय यंत्रणेला मंजूर असलेल्या निधी बाबत संबंधित लोकप्रतिनिधीच्या ही सूचना घ्याव्यात. त्याप्रमाणे सूक्ष्मपणे नियोजन करून नियोजन समितीला प्रशासकीय मान्यतेसाठीचे प्रस्ताव तात्काळ सादर करावेत, असे निर्देश त्यांनी दिले.

जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अनुसूचित जाती उपायोजना व आदिवासी क्षेत्राबाहेर उपयोजना सन 2022 23 करता माहे मार्च 2023 अखेरच्या अंतिम खर्चास नियोजन समितीची मान्यता असल्याचे पालकमंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगून या सभेमध्ये लोकप्रतिनिधी व सदस्याकडून होणाऱ्या चर्चा, मागणी, प्रश्न, प्रस्ताव याबाबत इतिवृत्त मध्ये सविस्तर माहिती देण्यात यावी व त्याबाबतचे अनुपालन संबंधित लोकप्रतिनिधींना कळवावे असेही त्यांनी सूचित केले.

यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी जलजीवन कामाबाबत संबंधित यंत्रणेने लक्ष घालून ती कामे गुणात्मक व दर्जात्मक करून घ्यावीत व या योजनेपासून वगळलेल्या गावांचा त्यात समावेश करावा, वीज वितरण कंपनीने अखंडित वीज पुरवठा करावा विद्युत रोहित्र नादुरुस्त झाल्यानंतर ते तात्काळ दुरुस्त करण्याची कार्यवाही करावी तसेच टंचाईच्या अनुषंगाने प्रशासनाने अत्यंत दक्ष राहून पिण्यासाठी पाणी, जनावरांच्या पाण्याचा प्रश्न व चाऱ्याचा प्रश्न सोडवण्याबाबत सूक्ष्म नियोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 मध्ये मंजूर असलेली 628.28 कोटीची तरतूद 99.85% खर्च करण्यात आल्याची माहिती देऊन यावर्षीचा 745 कोटीचा निधी अर्थसंकल्पीत असून सर्व संबंधित यंत्रणांनी प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव त्वरित सादर करावेत याबाबत कळविण्यात आल्याची माहिती दिली. जिल्हा वार्षिक योजना सन 2023 24 सर्वसाधारण योजनेसाठी 590 कोटी, अनुसूचित जाती उपयोजनासाठी 151 कोटी, आदिवासी क्षेत्राबाहेर उपाय योजनेसाठी 4 कोटी 28 लाखा चा निधी मंजूर असून नियोजन समितीला 222 कोटी 92 लाख रुपये प्राप्त झाले असून त्यातील 33 कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी आमदार सर्वश्री बबनदादा शिंदे, शहाजी पाटील, समाधान आवताडे, रणजितसिंह मोहिते पाटील, संजयमामा शिंदे, यशवंत माने, सचिन कल्याण शेट्टी, प्रणिती शिंदे, राम सातपुते, राजेंद्र राऊत यांच्या सह जिल्हा नियोजन समितीचे सर्व अशासकीय सदस्य उपस्थित होते.

लम्पी आजाराबाबत आवश्यक उपाययोजना कराव्यात – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पशुसंवर्धन विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी  प्रभावीपणे करावी, असे निर्देश पशुसंवर्धनमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

यावेळी बोलताना पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, केंद्र शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनेनुसार बाधित किंवा लसीकरण केलेल्या पशुधनाच्या वासरांनाही लसीकरण करावे. जनावरांना आजार झाल्यास, अपुऱ्या पशुवैद्यकीय सेवेमुळे, किंवा नक्की निदान न झाल्यामुळे जनावरे दगावतात व पशुपालकांना उत्पादन, जनावर व औषधोपचारावरील खर्च असे  मोठ्या आर्थिक संकटाला समोरे जावे लागते. यासाठी वेळेत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या.

यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांनी केलेल्या उपाययोजनांची माहिती जाणून घेतली. व योग्य त्या उपाययोजना राबवाव्यात अशा सूचना दिल्या.

जिल्ह्यात सात लाख 45 हजार 324 गोवंशीय पशुधन आहे.सध्या जिल्ह्यात दिनांक 1 एप्रिल ते 5 नोव्हेंबर 2023 या कालावधीत 581 जनावरांचा मृत्यू झाला असून, 6 हजार 879 पशुधन बाधित होते. यामध्ये उपचाराने 5 हजार 328 जनावरे बरे झाली आहेत. जिल्ह्यात दररोज सरासरी 55 पशुधन बाधित होत आहे. जिल्ह्यात जनावरांच्या लसीकरणावर भर दिला जात असून,  आतापर्यंत सात लाख 56 हजार 800 जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. ए.सी बोरकर यांनी दिली.

जिल्ह्यात विविध सार्वजनिक उत्सवाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था चोखपणे ठेवावी – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

सोलापूर, दि.7(जिमाका):- जिल्ह्यात विविध सार्वजनिक उत्सवाच्या अनुषंगाने कोठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याबाबत पोलीस विभागाने त्यांच्या स्तरावरून योग्य ती खबरदारी घेऊन सुरक्षा व्यवस्था चोखपणे ठेवावी, असे आवाहन महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेबाबत  आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. विखे पाटील मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त शितल उगले- तेली, सोलापूर शहर पोलीस आयुक्त राजेंद्र माने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की,  आगामी सणाचा व उत्सवाचा काळ लक्षात घेता जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करावेत. गणेशोत्सव तसेच अन्य सण-उत्सव साजरे करताना सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयांच्या आदेशांचे पालन होईल याकडे विशेष लक्ष देऊन उत्सवाला कोणतेही गालबोट लागणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

कायदा व सुव्यवस्था टिकून ठेवण्यासाठी त्या त्या भागातील विविध सामाजिक संघटनांची पोलीस विभागांनी बैठक घेऊन त्यांना शांतता टिकवण्याबाबत मार्गदर्शन करावे. तसेच शांतता टिकवण्यात सक्रिय सहभाग घ्यावा अशा सूचना करून पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की सीसीटीव्हीच्या माध्यमातून सोलापूर शहर व संवेदनशील भागात नियंत्रण ठेवावे. सोलापूर शहराच्या सर्व भागात सीसीटीव्हीचे नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव सादर करावा. हा प्रस्ताव सादर करत असताना अहमदनगर शहरात ज्या पद्धतीने सीसीटीव्हीच्या माध्यमातून शहरावर  नियंत्रण ठेवण्यात आलेले आहे. त्या प्रकल्पाची माहिती घ्यावी व त्या पद्धतीने प्रस्ताव सादर करावा असेही त्यांनी सांगितले.

पोलीस विभागाच्या सक्षमीकरणासाठी वाहनांची आवश्यकता असेल तर त्याबाबतचा प्रस्ताव नियोजन समितीला सादर करावा, आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे पालकमंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले.

यावेळी पोलीस शहर आयुक्त राजेंद्र माने यांनी सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्थाबाबत माहिती दिली तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती पोलीस अधीक्षक श्री. सरदेशपांडे यांनी दिली.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी पालकमंत्री कक्षाकडे आलेल्या विविध अर्ज व तक्रारींची  माहिती पालकमंत्री महोदयांना देऊन त्यावर केलेल्या कार्यवाहीचा अहवाल त्यांनी सादर केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील विविध दहीहंडी मंडळांना शुभेच्छा भेटी

ठाणे, दि. 7 (जिमाका) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दहीहंडीनिमित्त ठाणे शहरातील विविध दहीहंडी मंडळांना भेटी देऊन गोविंदा पथकांना शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभी नाका येथील धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेतून स्थापन करण्यात आलेल्या टेंभीनाका मित्र मंडळाच्या दहीहंडी महोत्सवाला उपस्थित राहून गोविंदांशी संवाद साधला. यावेळी बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रित सिंह आणि अभिनेता जॅकी भगनानी, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी महापौर नरेश म्हस्के आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने आयोजित संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवास आणि माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या दहीहंडी महोत्सवालाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी तेथे उपस्थित गोविंदांशी संवाद साधत शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी नगरसेवक पूर्वेश सरनाईक, माजी नगरसेविका परीषा सरनाईक, खास स्पेनमधून  आलेले केसलर्स, सुशांत शेलार आदी उपस्थित होते.

नवी मुंबईतील सुनील चौघुले स्पोर्टस असोसिएशनच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सव कार्यक्रमासही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी भेट दिली. यावेळी माजी आमदार विजय चौघुले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

राज्य शासनाच्या वतीने यंदापासून प्रो-गोविंदा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विविध दहीहंडी पथकात सहभागी गोविंदांचा विमा काढला असून गोविंदांचा अपघात झाल्यास आर्थिक मदत देण्याचा निर्णय देखील राज्य सरकारने घेतला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

ताज्या बातम्या

पालकमंत्री डॉ. वुईके यांच्याकडून इरई नदी खोलीकरणाची पाहणी

0
चंद्रपूर, दि. ११ :  चंद्रपूर शहराची जीवनवाहिनी असलेल्या इरई नदीच्या खोलीकरणाचे काम सर्वांच्या सहकार्याने हाती घेण्यात आले आहे. या कामाच्या प्रगतीची पाहणी करण्याकरिता आदिवासी...

जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत बाधित क्षेत्रासह आरोग्य व शाश्वत विकासाला प्राधान्य – पालकमंत्री चंद्रशेखर...

0
️नियामक परिषद बैठक संपन्न नागपूर, दि. १० : जिल्ह्यातील प्रत्यक्ष खाण बाधीत क्षेत्र व अप्रत्यक्ष खाण बाधित क्षेत्रात शासन निर्णयान्वये दिलेल्या निर्देशानुसार येत्या आर्थिक वर्षात...

गुणवत्तापूर्ण कामे करण्याला प्राधान्य द्यावे – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

0
सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक सिंधुदुर्गनगरी, दि.10 (जिमाका) सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही तडजोड न करता कामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्यावर भर द्यावा. कंत्राटदारांकडून योग्यप्रकारे कामे...

तणावाच्या परिस्थितीमुळे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांचा दौरा रद्द

0
मुंबई, दि.10 : तणावपूर्ण परिस्थिती पाहता सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी "आय.ओ.टी. सोल्यूशन वर्ल्ड काँग्रेस अँड बार्सिलोना सायबर सिक्युरिटी काँग्रेस...

विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील खारपाण पट्ट्याला ५.७८ लाख एकर सिंचन लाभ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
भोपाळ, दि. 10 : तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत  महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांमध्ये एका ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी करण्यात आली. सुमारे 19,244 कोटींच्या या...