गुरूवार, मे 8, 2025
Home Blog Page 1028

इलेक्ट्रीक तोलन उपकरणाच्या वापराबाबत लवकरच दूध उत्पादकांसमवेत बैठक – मंत्री छगन भुजबळ

मुंबई, दि. 12 :- दूध खरेदी – विक्रीसाठी अनिवार्य केलेल्या इलेक्ट्रीक तोलन उपकरणांच्या वापराबाबत तक्रारदार दूध उत्पादक शेतकरी व विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

दूध संकलन केंद्रांवर दूध मापनासाठी 10 ग्रॅम अचूकतेचे इलेक्ट्रिक तोलन उपकरणांचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. मात्र, 10 ग्रॅम अचूकतेचे इलेक्ट्रिक तोलन उपकरण वापरात दूध उत्पादक आणि दूध विक्री करणाऱ्या संस्थांना अडचणी येत आहेत. यात दूध उत्पादकांचा तोटा होत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री श्री. भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संस्था कर्मचारी संघटना यांच्यासमवेत आज बैठक घेण्यात आली.

या बैठकीला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, वैध मापन शास्त्र विभागाचे नियंत्रक डॉ. सुरेश मेकला, विलास पवार,  कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संस्था कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी दयानंद पाटील, केरबा पाटील, श्यामराव पाटील, विश्वास पाटील, संजय पाणारी उपस्थित होते.

दहा ग्रॅम वजन काट्यावर वजन घेत असताना काटा स्थिर होण्यास वेळ लागतो. पर्यायाने दूध संकलनास वेळ लागत असल्यामुळे संघाने ठरवून दिलेल्या वेळेत दूध संकलन होत नाही. सोबतच दुधाच्या गुणावर परिणाम होऊन संस्थेचा व पर्यायाने दूध उत्पादकांचाही तोटा होत आहे. वजन काटा वेळेत स्थिर होत नसल्याने दूध उत्पादक आणि संस्थेच्या कर्मचाऱ्यांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवू शकतात. त्यामुळे सध्याचा इलेक्टिक तोलन उपकरण वापरण्याची सक्ती रद्द करण्याची मागणी यावेळी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संस्था कर्मचारी संघटना यांनी केली. यावर मंत्री श्री. भुजबळ यांनी संयुक्त बैठक घेऊन सविस्तर चर्चेअंती निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.

००००

मनीषा सावळे/विसंअ/

 

 

राष्ट्रीय छात्र सेना संचालनालयाला निधी कमी पडू देणार नाही – क्रीडा मंत्री संजय बनसोडे

मुंबई, दि. 12 : देशांतर्गत नागरी संरक्षण व नागरी सेवा कार्यासाठी मोलाचे कार्य करणाऱ्या राष्ट्रीय छात्र सेना संचालनालयाला पुरेसा निधी वेळेत उपलब्ध करून देणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.

राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी), संचालनालय महाराष्ट्र, एएफआय इमारत, बॉम्बे हॉस्पिटल लेन, मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराज परिषद सभागृहाचे उद्घाटन करून सविस्तर आढावा घेताना ते बोलत होते.

यावेळी क्रीडा व युवक कल्याण विभागाचे आयुक्त सुहास दिवसे, उपसचिव सुनील हंजे, एनसीसीचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल योगेंद्रप्रसाद खंडुरी, उपमहासंचालक ब्रिगेडियर  विक्रांत नरसिंह कुलकर्णी, संचालक कमांडर सतपाल सिंग, अतिरिक्त संचालक कर्नल अजयकुमार आहुजा, लेफ्टनंट कर्नल हेमंत मेहता, कर्नल झाकीर हुसेन, कर्नल रविशेखर उपस्थित होते.

मंत्री श्री बनसोडे म्हणाले की, राज्यातील अनेक दिवसांपासून एनसीसीच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढीची मागणी होत आहे. ती वाढविण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. राज्यात एनसीसी अकादमी स्थापन करण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना देण्यात येतील. मुंबईत विद्यार्थ्यांना सरावासाठी जागा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले जातील. एनसीसी विद्यार्थ्यांना विमानातील विविध प्रात्यक्षिकासाठी विमानाचे  इंधन उपलब्ध करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

देशसेवा आणि राष्ट्र उभारणीत योगदान देणाऱ्या या संस्थेस मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येईल. राज्यात सुरू असलेल्या ७५ हजार नोकर भरतीमध्ये एनसीसीच्या विविध पदांची भरती करण्यात येणार आहे. विविध उपक्रमांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.

एनसीसी विद्यार्थ्यांनी सलग दोन वेळेस राष्ट्रीय प्रथम पुरस्कार प्राप्त केला असून याही वर्षी मिळवून हॅट्रीक होण्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे मंत्री श्री. बनसोडे यांनी अभिनंदन केले. ब्रिगेडिअर श्री. कुलकर्णी यांनी एनसीसी विषयी सविस्तर सादरीकरण केले.

0000

राजू धोत्रे/विसंअ/

 

 

 

आयटीआय प्रशिक्षित विद्यार्थ्यांना परदेशात नोकरीच्या संधी – संचालक दिगांबर दळवी

मुंबई, दि. 12 : भारत युवा देश म्हणून ओळखला जातो. कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून तरूणांना शिक्षणासोबत रोजगार प्राप्त होत आहे. औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी योग्य प्रशिक्षण घेऊन कौशल्य विकास केल्यास त्यांना परदेशात मोठ्या पगाराची संधी असल्याचे प्रतिपादन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी यांनी केले.

दादर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये अभ्यासिकेच्या उद्घाटनप्रसंगी श्री. दळवी बोलत होते. यावेळी सहसंचालक अनिल गावित, उपसंचालक रमण पाटील, श्री. निकम, श्री. कथले, प्राचार्य व्ही. जी. संखे, प्राचार्य व्ही. एन. खेवलकर, प्राचार्य श्रीमती भोर आदी उपस्थित होते.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत राज्यातील 418 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अभ्यासिकांचे उद्घाटन आज झाले. त्याचाच एक भाग म्हणून या संस्थेत अभ्यासिका सुरू केली आहे. अभ्यासिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना क्रमिक अभ्यासाबरोबर इतर परीक्षा, स्पर्धा परीक्षा यांचे प्रशिक्षण गरीब विद्यार्थ्यांसाठी ही अभ्यासिका लाभदायक आहे. समाजाचे ऋण फेडण्यासाठी अभ्यासिकेचा वापर व्हावा. जर्मनी, जपान या देशांमध्ये महाराष्ट्रातील 70 विद्यार्थी प्रशिक्षण घेऊन नोकरी करीत आहेत. आणखी आयटीआय प्रशिक्षण घेणारे साडेतीन हजार विद्यार्थी परदेशी पाठवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. याकरिता जपान, जर्मनी येथील भाषेचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्याचाही प्रयत्न शासन करणार आहे.

श्री. पाटील यांनी सांगितले की, अभ्यासिकेच्या माध्यमातून कौशल्य विकसित करण्यास मदत होणार आहे. ही अभ्यासिका संध्याकाळी सहा ते नऊ या काळात सुरू राहणार असून यासाठी स्वतंत्र कर्मचारी, सुरक्षारक्षक नेमण्यात येणार आहेत. गरीब, होतकरू विद्यार्थ्यांनी अभ्यासिकेचा लाभ घेवून आपले भविष्य घडवावे, असेही आवाहन करण्यात आले.

अभ्यासिकेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. आभार श्रीमती भोर यांनी मानले.

0000

 

धोंडीराम अर्जुन/ससं/

 

 

निराधार मुलांच्या संगोपनासाठी ‘तर्पण’ संस्थेबरोबर सामंजस्य करार – केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी

मुंबई, दि. 12 : काही मुले वेगवेगळ्या कारणांमुळे आपले आई- वडील गमावतात व निराधार होतात. अशा मुलांना अनाथ म्हणणे अयोग्य आहे. या मुलांचे आपण सर्व जण पालक आहोत. या संस्थेच्या कार्यक्षेत्राचा विस्तार होण्याच्या दृष्टीने निराधार मुलांच्या संगोपनासाठी केंद्रीय महिला व बालविकास विभागाच्या वतीने ‘तर्पण’ संस्थेबरोबर सामंजस्य करार करण्यात येईल, असे केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी सांगितले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात आज सकाळी ‘तर्पण’ संस्थेच्यावतीने प्रतिभा सन्मान पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री श्रीमती इराणी बोलत होत्या. यावेळी ‘ऑॅर्फन रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट ॲकॅडमी सेंटरचे’ केंद्रीय मंत्री श्रीमती इराणी, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कळ दाबून करण्यात उद्घाटन करण्यात आले. निराधार मुलांना मोबाईल, लॅपटॉपचे वाटपही यावेळी करण्यात आले. यावेळी तर्पण संस्थेचे अध्यक्ष, आमदार श्रीकांत भारतीय, श्रेया भारतीय यावेळी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री श्रीमती इराणी म्हणाल्या की, निराधार मुलांचे जीवन जगणे हा एक संघर्ष असतो. हा संघर्ष ‘तर्पण’ सारख्या सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था सुसह्य करतात, ही बाब कौतुकास्पद आहे. सामाजिक क्षेत्रात स्वयंसेवी संस्था उत्कृष्ट कार्य करीत आहेत. त्यापैकीच एक ‘तर्पण’ संस्था आहे. या संस्थेचे कार्य अनुकरणीय आणि कौतुकास्पद आहे. या संस्थेची शाखा राजधानी नवी दिल्लीत कार्यान्वित करावी. असेही त्यांनी सांगितले. उपस्थित मुलांना त्यांनी भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. समाजाला सशक्त करण्यासाठी व सशक्त भारत निर्माण करण्यासाठी सृजनात्मक कार्य, योगदान देणे गरजेचे आहे, असेही त्यांनी  यावेळी  सांगितले .

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील, ‘तर्पण’ संस्थेचे अध्यक्ष श्री. भारतीय यांनी मनोगत व्यक्त केले.

००००

प्रविण भुरके/ससं/

 

उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि इन्फोसिस यांच्यात सामंजस्य करार

मुंबई, दि. १२ : विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि संवाद कौशल्याच्या दृष्टीने उपयुक्त इंग्रजी संवाद कौशल्य आणि मूल्ये आधारित जीवन शैली अभ्यासक्रम महाविद्यालयात शिकविले जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वावलंबी होण्यास मदत होईल, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

राज्यातील अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन व उच्च शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयातील अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांकरिता इंग्रजी संवाद कौशल्य आणि मूल्ये आधारित जीवन शैली (English Communication, Values and Life Skills) या अभ्यासक्रमासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि इन्फोसिस यांच्यात सामंजस्य करार झाला.

मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तंत्रशिक्षण संचालक डॉ.विनोद मोहितकर आणि  इन्फोसिस उन्नती फाऊंडेशन, बंगळूरचे रमेश स्वामी यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. याप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, इन्फोसिसचे मुख्य अधिकारी संतोष अंतपुरा उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरण २०२० नुसार विद्यार्थ्यांना आवश्यक कौशल्ये व विकास याबाबींवर आधारित अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे. एसजीबीएस उन्नती फाऊंडेशन बंगळूर या संस्थेमार्फत तयार करण्यात आलेला १६५ तासांचा इंग्रजी संवाद कौशल्य आणि मूल्ये आधारित जीवन शैली (English Communication, Values and Life Skills) या विषयातील अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रात रोजगार मिळविण्याकरिता आवश्यक कौशल्य प्रत्यक्ष वर्गात शिकविले जाणार आहे. पर्यायाने विद्यार्थ्यांना नोकरी मिळविण्याच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी असेल, असेही मंत्री. श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

विद्यार्थ्यांनी ९० टक्के उपस्थितीसह अभ्यासक्रम पूर्ण केल्यास त्यांना डिजिटल प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सद्य:स्थितीत हा अभ्यासक्रम कर्नाटक, तमिळनाडू, आंध्रप्रदेश, व नागालॅण्ड या राज्यांमध्ये सुरू करण्यात आलेला आहे. तेलंगणा, मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये तो सुरू होणार आहे.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/

 

 

तणावमुक्त जीवनासाठी विश्वशांती आवश्यक – राज्यपाल

पुणे दि. १२ : जगात आज युद्ध, विविध समूहांत तणावाची स्थिती आढळत असून अशा परिस्थितीत माणसाला तणावमुक्त आणि आनंदी जीवन जगता यावे, यासाठी जागतिक शांतता गरजेची आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

साधु वासवानी मिशन, पुणे द्वारा दादा जे. पी. वासवानी यांच्या स्मरणार्थ काढण्यात आलेल्या टपाल तिकिटाचे प्रकाशन राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय दळण-वळण राज्य मंत्री देवूसिंह चौहान, आमदार सुनील कांबळे, इंदूरचे आमदार शंकर लालवाणी, महाराष्ट्र आणि गोवा क्षेत्राचे मुख्य पोस्ट मास्टर जनरल किसनकुमार शर्मा, साधू वासवानी मिशनच्या अध्यक्षा श्रीमती आर. ए. वासवानी, कार्यकारी प्रमुख कृष्णाकुमारी, डॉ. वसंत आहुजा, पुणे क्षेत्राचे पोस्ट मास्टर जनरल रामचंद्र जायभाय, डाक सेवा संचालक सिमरन कौर आदी उपस्थित होते.

राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, व्यक्तीची आंतरिक शांती, राष्ट्रांमधील शांततापूर्ण संबंध आणि निसर्गासोबत शांततापूर्ण सहअस्तित्व या तीन पैलूंवर जागतिक शांतता आधारित आहे. आज वैयक्तिक, सामाजिक आणि आंतरराष्ट्रीयस्तरावर तणावाची स्थिती असताना आपल्याला अंतर्गत, बाह्य तसेच निसर्गासोबत शांतता गरजेची आहे. गौरवशाली इतिहास असणारा आपला भारत देश शांततापूर्ण सहअस्तित्वाचे मार्गदर्शन करू शकतो.

महाराष्ट्र ही संत आणि महापुरुषांची भूमी आहे. दादा जशन वासवानी यांच्यातही संत आणि समाज सुधारकांचा समन्वय पहायला मिळतो. ते विचारवंत, लेखक आणि तत्वचिंतक होते. त्यांचे जीवन बंधूभाव, शांती, सद्भावना, करुणा आणि शांतीपूर्ण सहअस्तित्व या मूल्यांवर आधारित होते. नैतिक मूल्य निकोप समाजासाठी आवश्यक आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात या पैलूंवर भर देण्यात आला आहे, असे राज्यपाल म्हणाले.

साधू वासवानी यांच्या प्रमाणेच त्यांचे विद्वान शिष्य आणि उत्कृष्ट वक्ता असलेल्या दादा वासवानी यांनी आपल्या प्रवचन आणि लेखांद्वारे देश – विदेशातील लाखो लोकांना आदर्श जीवन जगण्यासाठी प्रेरित केले. ते महाराष्ट्रातील शांती आणि सद्भावनेचे दूत होते. साधू वासवानी मिशनच्या माध्यमातून दादा जे. पी. वासवानी यांनी शैक्षणिक संस्था, रुग्णालय आणि अन्य सेवाकार्य उभे केले. जात, धर्म, पंथाचा विचार न करता समाजातील सर्व घटकांची सेवा मिशनच्या माध्यमातून होत आहे, अशा शब्दात त्यांनी मिशन आणि दादा वासवानी यांच्या कार्याचा गौरव केला.

केंद्रीय राज्यमंत्री श्री. चौहान म्हणाले की, भारताला संताची परंपरा असल्याचा आपल्याला अभिमान आहे. संत दादा वासवानी सहज आणि सरळ व्यक्त‍िमत्व होते. त्यांचे कार्य नेहमीच समाजाला प्रेरणादायी ठरेल, असे होते. त्यांच्या आध्यात्मिक ज्ञानाचे पालन करणे आणि ते आचरणात आणणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी श्रीमती वासवानी यांनी साधू वासवानी मिशनच्या कार्याची माहिती दिली. दादा वासवानी यांचा एकात्मता, बंधूभाव, शांतता आणि अध्यात्माचा संदेश आचरणात आणणे हेच त्यांचे खऱ्या अर्थाने स्मरण आहे, असे त्या म्हणाल्या.

यावेळी ‘नर्क से स्वर्ग तक’ या हिंदी आणि ‘स्वतः सक्षम बना’ या मराठीतील पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते करण्यात आले.

0000

कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून दीड वर्षात ३ लाख तरूणांना रोजगार प्राप्त – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि.१२: कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षांमध्ये तीन लाख  उमेदवारांना रोजगार प्राप्त झाला आहे. भारत युवा देश म्हणून ओळखला जातो. युवकांना कौशल्य विकासाच्या, रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत ४१८ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील अभ्यासिका वर्गांच्या ऑनलाईन उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी मुख्यमंत्री  श्री. शिंदे बोलत होते. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री  मंगलप्रभात लोढा, आमदार प्रकाश सुर्वे, अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, कौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी एन, व्यवसाय  व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी, सहसंचालक अनिल गावीत यासह  418 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे प्राचार्य व विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, आज चाळीस हजार विद्यार्थी ऑनलाईन उपस्थित आहेत, त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो. नव्याने सुरू झालेल्या ७५ आभासी क्लासरूम आणि आज सुरू झालेल्या अभ्यासिका  यांचा विद्यार्थी लाभ घेवून स्वविकास करतील, अशी मला आशा आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्किल इंडिया व डिजिटल इंडियाला प्रोत्साहन दिले असून, देशात विविध योजना राबविल्या जात आहेत. याच धर्तीवर राज्यात देखील कौशल्य विकास विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. मंत्री श्री. लोढा यांच्या नेतृत्वामध्ये गेल्या दीड वर्षांमध्ये तीन लाख तरूणांना रोजगार प्राप्त झाला असून, कौशल्य विकास प्राप्त युवकांना भविष्यातही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. उद्योजकतेला लागणारे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान लक्षात घेऊन आयटीआयमध्ये विविध 900 कोर्सेस शिकवले जातात, ही अभिमानाची गोष्ट असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य हे नेहमी देशाचे ग्रोथ इंजिन म्हणून काम करत आहे. परदेशी गुंतवणूक आणि  पायाभूत सुविधांमध्ये देखील राज्य प्रथम क्रमांकावर आहे. यामुळेच आज अनेक उद्योजक राज्यात गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक असतात. हीच बाब लक्षात घेऊन उद्योग जगताला आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून आपण नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान युवा पिढीला देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. 

नवीन अभ्यासिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पोषक वातावरण निर्माण होईल – मंत्री मंगल प्रभात लोढा

             मंत्री श्री. लोढा म्हणाले की, राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पूरक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या रोजच्या प्रशिक्षण वेळेनंतर संध्याकाळी साडेआठ वाजेपर्यंत अभ्यासिका सुरू करण्यात आल्या आहेत. यू. पी. एस. सी.आणि एम. पी. एस. सी. तसेच स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना,  १०वी आणि १२ वी तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही याचा लाभ घेता येईल.  मुले व मुलींकरिता स्वतंत्र वर्ग खोल्या उपलब्ध करुन देण्यात येतील.  यामध्ये पिण्याचे पाणी, वीज, स्वच्छतागृह व इतर सुविधा औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत असेही मंत्री श्री. लोढा म्हणाले.

यावेळी मंत्री लोढा यांच्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये कौशल्य विकास विभाग, महिला बाल विकास विभाग, पर्यटन विभाग आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री म्हणून केलेल्या कामगिरीचा आढावा ‘स्वयंसेवक ते जनसेवक’ या पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

०००

संध्या गरवारे/विसंअ

आंदोलकांवरील गुन्हे तत्काळ मागे घेणे सुरू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 11 : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यात राज्यातील सर्व पक्ष एक आहेत आणि त्यादृष्टीने ठोस पाऊले टाकण्यात येत आहेत. त्यामुळे आपले उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती आज सर्व पक्षांच्या प्रतिनिधींनी मनोज जरांगे पाटील यांना केली आहे. सह्याद्री अतिथिगृह येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मराठा समाजास आरक्षणासंदर्भातील सर्वपक्षीय बैठकीत हा निर्णय झाला. यावेळी या आंदोलनादरम्यान नागरिकांवर झालेले गुन्हे तत्काळ मागे घेण्याची कार्यवाही सुरु झाली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.       

सर्व पक्षीय बैठकीत सर्वांचे आभार मानून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीमराठा आरक्षणासाठी सरकार अतिशय गांभीर्याने प्रयत्न करत असून काही तरी थातूरमातूर न करता न्यायालयात टिकणारे आरक्षण कसे देता येईल हे पाहिले जाईल. हे करतांना इतर समाजावरही अन्याय होऊ देणार नाहीत्यामुळे इतर समाजाने सुद्धा आंदोलनाचा मार्ग अवलंबवू नये, अशी विनंतीही या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी केली.

बैठकीत उपस्थित नेत्यांनी देखील यावेळी राज्य शासन करीत असलेल्या प्रयत्नांना सहमती दर्शविली व आपल्या सूचना मांडल्या.

संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई

उपोषणाच्या वेळी परिस्थिती योग्य पध्दतीने न हाताळल्याबद्दल संबधित उपविभागीय अधिकारी आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्यावर कार्यवाही करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

समितीत जरांगे पाटील यांचा प्रतिनिधी

न्यायमूर्ती श्री. शिंदे समितीमध्ये मनोज जरांगे पाटील किंवा त्यांच्या प्रतिनिधीची नियुक्ती करण्यात येईल, असेही यावेळी ठरले. सर्व पक्षाच्या नेत्यांनी मराठा  समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य शासन करीत असलेल्या प्रयत्नांना पाठिंबा दिलात्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले.

मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवारमंत्री सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटीलछगन भुजबळगिरीश महाजनदादाजी भुसेविधान परिषदेचे  विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेविधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवारविविध पक्षांचे निमंत्रित सर्वश्री छत्रपती संभाजीराजे भोसलेजयंत पाटीलबाळासाहेब थोरातअनिल परबराजेश टोपेचंद्रशेखर बावनकुळेराजू पाटीलविनोद निकोलेसदाभाऊ खोतराजेंद्र गवईसुनील तटकरे,  गौतम सोनवणे,  मुख्य सचिव मनोज सौनिकतसेच विविध विभागांचे सचिववरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आदी उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांनी मांडलेले प्रश्न कायद्याच्या चौकटीत राहून सोडवावेत, असे सांगून राज्य शासनाने यासाठी पाऊले टाकली आहेत, असे सांगितले.

प्रारंभी सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी प्रास्ताविक करून मराठा आरक्षणविषयक आजपर्यंत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली.

०००

गणेशोत्सव मंडळांनी उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत सहभागी व्हावे – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन

मुंबई, दि. ११ : राज्य शासनाने १९ सप्टेंबर २०२३ पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेत मुंबई शहर जिल्ह्यातील जास्तीत जास्त मंडळांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे, अशी माहिती मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हा नियोजन अधिकारी जी. बी. सुपकेर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.

पर्यावरणपूरक सण साजरे व्हावेत, उत्सव साजरे करताना सामाजिक बांधिलकी जपावी, आपल्या संस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे याकरीता राज्य शासनाने उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या जिल्ह्यातून प्रत्येकी ३ व अन्य जिल्ह्यातून प्रत्येकी एक या प्रमाणे उत्कृष्ट ४४ गणेशोत्सव मंडळांची निवड करण्यात येईल. या ४४ गणेशोत्सव मंडळांमधून राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळास पाच लाख रुपयांचे, द्वितीय क्रमांकास अडीच लाख रुपये, तर तृतीय क्रमांकास एक लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. उर्वरित ४१ गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येईल. या स्पर्धेत धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांकडे किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येईल. या स्पर्धेसाठी १० ते २८ सप्टेंबर २०२३ पर्यंतचा कालावधी विचारात घेतला जाणार आहे. राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या ४ जुलै व ३० ऑगस्ट २०२३ रोजीच्या शासन निर्णयात स्पर्धेचा तपशील, स्पर्धा निवडीचे निकष नमूद केले आहेत. तसेच अर्जही उपलब्ध करून देण्यात आला आहे.

अर्जाच्या या नमुन्यानुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ई- मेलवर १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत अर्ज करावा. या स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी सहभाग नोंदवावा, असेही आवाहन मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केले आहे.

०००००

गोपाळ साळुंखे/ससं/

महाराष्ट्राने मतदार जागृतीबाबत देशापुढे आदर्श मॉडेल निर्माण करावे – राज्यपाल रमेश बैस

???????????????????????????????

मुंबई, दि. 11 : मतदानाकडे लोकशाहीतील उत्सव म्हणून पाहिले पाहिजे. ‘अगोदर मतदान, नंतर बाकीचे काम’ हे तत्त्व लोकशाहीत सर्वांनी पाळले पाहिजे. महाराष्ट्रात मतदानाबाबत जनजागृतीचे कार्य चांगले होत आहे.  बहुमाध्यमांच्या मदतीने प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून राज्याने मतदार जनजागृतीबाबत देशापुढे आदर्श मॉडेल निर्माण करावे, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी येथे केले.

किशोरवयीन मुले व युवकांमध्ये मतदार जनजागृती करुन लोकशाही प्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या ‘मी द सुपर हिरो भारताचा नागरिक’ या कॉमिक पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते सोमवारी (दि. ११) राजभवन येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

गरीब लोक मतदानाला आवर्जून जातात. गरिबांपेक्षा श्रीमंतांमध्ये मतदार जागृतीची अधिक गरज आहे.

इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशातील मतदार अधिक सुज्ञ असून गावपातळीवर एकाच वेळी तीन निवडणूक असल्या आणि उमेदवारांना निवडणूक चिन्ह नसले, तरी देखील लोक पाहिजे त्याच उमेदवाराला मतदान करतात, असे राज्यपालांनी सांगितले.

आपल्या देशात संविधान स्वीकारल्याच्या पहिल्या दिवसापासून महिलांना देखील मतदानाचा समान हक्क देण्यात आला. आज देश जगातील सर्वात युवा देश झाला असून लोकशाहीचे भवितव्य युवकांच्या हाती आहे. त्यामुळे युवकांनी लोकशाही, शासन व प्रशासनाच्या कामकाजात रुची घेणे आवश्यक आहे. मतदार यादीत नाव जोडणे व काढण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करावी, अशीही सूचना राज्यपालांनी केली.

‘आगम’ संस्थेच्या कामाचे कौतुक करुन मतदार जागृतीची पुस्तके व साहित्य स्थानिक भाषेत असावे, असे राज्यपालांनी सांगितले.

यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी निवडणूक आयोगाच्या मतदार जागृती कार्यक्रमाची माहिती दिली. विमुक्त व भटक्या जमाती, दिव्यांग, तृतीयपंथी, बेघर अशा सर्व समाज घटकांपर्यंत पोहोचण्याचा मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. महाविद्यालयांमध्ये ‘मतदार साक्षरता क्लब’ सुरु केले असल्याची माहिती त्यांनी दिली.

पुस्तक प्रकाशन सोहळ्याला सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, ‘आगम’ संस्थेच्या संस्थापक व पुस्तकाच्या लेखिका भारती दासगुप्ता, अनुराधा सेनगुप्ता तसेच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय व ‘आगम’ संस्थेशी निगडित निमंत्रित उपस्थित होते.

००००

Maharashtra Governor releases comic book on Youth Voter Awareness

 

Maharashtra Governor Ramesh Bais released the Comic book ‘Me The Superhero Indian Citizen’ prepared to create awareness among the youth voters about election process and democracy at Raj Bhavan Mumbai on Mon (11 Sept).

The book has been prepared by an organisation ‘Aagam’ at the instance of  the Chief Electoral Officer, Maharashtra.

Chief Electoral Officer, Maharashtra Shrikant Deshpande, Joint Chief Electoral Officer Manohar Parkar, Founder of ‘Aagam’ and author of the book Bharati Dasgupta, Anuradha Sengupta and officials of Chief Electoral Officer, Maharashtra and ‘Aagam’ were present.

0000

ताज्या बातम्या

दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची मुलाखत

0
मुंबई दि. 8: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' आणि 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात वस्त्रोद्योग 'विभागाच्या योजना, शंभर दिवसाच्या कामकाजाचा आराखडा व अंमलबजावणी' या विषयावर...

मानसिक शांतता, आरोग्यवर्धनासाठी संगीत हे प्रभावी माध्यम – डॉ. संतोष बोराडे

0
मुंबई, दि. ८ : मानवाच्या मानसिक, भावनिक आणि शारीरिक आरोग्यावर संगीताचा सकारात्मक परिणाम होतो, हे आता संशोधनातून सिद्ध झाले आहे. संगीत हे केवळ मनोरंजनाचे...

संतुलित आहार आरोग्यासाठी अधिक उपयुक्त – अन्वेषा पात्रा

0
मुंबई, दि. ८ : रोजच्या जेवणात विविध पोषणमूल्यांचा समावेश असलेला आहार शरीराला ऊर्जा तर पुरवतोच, पण रोगप्रतिकारक शक्तीही वाढवतो. सुदृढ आरोग्यासाठी संतुलित आहार अत्यंत...

स्कूल बसमधून विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी नियमावलीत आवश्यक सुधारणा करणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

0
मुंबई, दि. ८ मे :- शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाला परिवहन विभागाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. स्कूल बसमधून शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुखावह...

‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेद्वारे जलसंधारण आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी महत्त्वाचे पाऊल

0
मुंबई, दि.८ : राज्यातील जलसंपत्तीचे शाश्वत व्यवस्थापन आणि शेतीला पोषण देणारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेतला ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ ही योजना  महाराष्ट्राच्या...