बुधवार, मे 7, 2025
Home Blog Page 1029

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी जिंकले जग : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १० : जी – २० शिखर परिषदेच्या निमित्ताने जगभरातील देशांचे प्रमुख, राष्ट्राध्यक्ष भारतात एकाचवेळी एकाच व्यासपीठावर आले. यातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जग जिंकले अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. नवी दिल्ली येथे झालेल्या या ऐतिहासिक शिखर परिषदेत सहभागी होता आले ही अभिमानाची बाब असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताचा गतीने विकास होत आहे. देशाची अर्थव्यवस्था दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आली. कालच्या शिखर परिषदेतील भारावलेले वातावरण पाहून भारत महासत्तेकडे वाटचाल करीत असल्याचा अनुभव आल्याची भावना देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

भारतात एकाच वेळी अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी या युरोपियन तसेच आफ्रिकन देशांचे राष्ट्राध्यक्ष सहभागी झाले होते, ही उल्लेखनीय बाब आहे, ही  कामगिरी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळे शक्य झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

या शिखर परिषदेत प्रधानमंत्र्यांनी मांडलेला न्यू दिल्ली जी -२० लीडर्स समिट डिक्लरेशनवर एकमत झाले. जी – २० समूहाने उत्स्फूर्तपणे स्वागत केले. हे आपले मोठे राजनैतिक यश आहे. स्वच्छ इंधनाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी भारताने जी २० शिखर परिषदेत ‘ग्लोबल बायोफ्युएल अलायन्स’ची घोषणा केली आहे. त्याचा वापर वाढला, तर जगाचे पारंपारिक इंधन पेट्रोल आणि डिझेलवरील अवलंबित्व कमी होईल आणि पर्यावरणाचे प्रदूषणही कमी होईल. याच परिषदेत ‘इंडिया-मिडल ईस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर’ (IMEC) सुरू करण्याची घोषणा करण्यात आली हे ऐतिहासिक आणि गेमचेंजर पाऊल असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

या इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या माध्यमातून आशियापासून मध्य पूर्व आणि युरोपपर्यंतचा व्यापार अधिक सुलभ होईल. आपल्या देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल आणि तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याचे भारताचा स्वप्न लवकरच साकार होईल, असेही श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

या शिखर परिषदेमध्ये झालेल्या चर्चा, भारताने दिलेला “वसुधैव कुटुंबकम्ब्”चा संदेश म्हणजेच सबका साथ सबका प्रयास याला संपूर्ण जगाने पाठींबा दिला असून आता आफ्रिकन देश देखील जी- २० मध्ये समाविष्ट झाले आहेत. एकंदरीतच प्रधानमंत्री मोदी यांच्याकडे विश्वनेता म्हणून पाहिले जात आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

००००

‘शासन आपल्या दारी’अंतर्गत महिला व बालविकास विभागाच्या विविध योजना

राज्यात 1 एप्रिल 2023 पासून ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राबवला जात आहे. शासनाच्या विविध योजनांची माहिती व लाभ एका छताखाली देण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हा उपक्रम राबवून प्रत्येक जिल्ह्याला किमान 75 हजार लाभार्थ्यांना लाभ देण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे.

त्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यात हा कार्यक्रम लवकरच आयोजित केला जात असून त्या अनुषंगाने  महिला व बालकल्याण विभागाकडे असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात येत असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

‘शासन आपल्या दारी’अंतर्गत जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या योजनाची माहिती पुढील प्रमाणे देण्यात येत आहे.

महिला व बाल कल्याण विभाग जिल्हा परिषद सोलापूर च्या स्वनिधीतून राबविण्यात येणाऱ्या योजना सन 2023-24.

योजना क्रमांक-1

1) योजनेचे नांव  :- इ.5 वी ते 12 वीत शिकत असलेल्या मुलींना सायकली खरेदीचे अनुदान देणे. (सर्वसाधारण घटक)

योजनेचा उद्देश – ग्रामीण भागात  एस.टी. ची सोय नसते किंवा शाळेच्या वेळेत एस.टी. नसते. त्यामुळे  मुली शाळेत जाऊ शकत नाहीत. चालत जाण्यामुळे बराचसा वेळ वाया जाऊ शकतो.सायकलीमुळे वेळेची बचत होते व मुलींचे शाळेतील गळतीचे प्रमाण थांबते.

2)लाभार्थी निवडीचे निकष

1)         लाभार्थी  मुलगी ग्रामीण भागातील असावी.

2)        लाभार्थी मुलगी  इयता 5 वी ते 12 वी मध्ये शिकत असली पाहिजे.

3)        लाभार्थीचे वास्तव्य ते शाळा  यातील अंतर कमीत कमी 2  कि.मी.  किंवा 1 कि. मी. पेक्षा जास्त असावे.

4)अनुदान मर्यादा  जिल्हा परिषदेकडील  खरेदी समिती निश्चित करेल ती राहील.

 

योजना क्रमांक –2

योजनेचे नांव-  ग्रामीण भागातील इयता 7 वी ते 12 वी पर्यंत शिकणा-या मुलींना संगणक प्रशिक्षणकरीता अनुदान देणे.

योजनेचा उद्देश –  ग्रामीण भागातील मुली संगणकाचे ज्ञान घेऊन त्याचे कौशल्य विकसीत करु शकतात.  नोकरी व व्यवसायासाठी संगणकाची मदत होते.

लाभार्थी योजनेस  पात्र होण्याचे निकष-

1)लाभार्थी ग्रामीण भागातील  रहिवासी असावी.

2)लाभार्थी संगणक परीक्षा उत्तिर्ण झालेली असावी.

3)लाभार्थी दारिद्रय रेषेच्या कुटूंबातील असावी. अथवा वार्षिक उत्पन्न रु. 120,000/- पर्यंत असावे.

4)अनुदान  मर्यादा जिल्हा परिषदेकडील खरेदी समिती निश्चित करेल ती राहील.

 

योजना क्रमांक-3

1) योजनेचे नांव  :-  ग्रामीण भागातील अनु-सूचित जातीतील  इ.5 वी ते 12 वीत शिकत असलेल्या मुलींना सायकली खरेदीचे अनुदान देणे. (विशेष घटक योजना  )

योजनेचा उद्देश- ग्रामीण भागात  एस.टी. ची सोय नसते किंवा शाळेच्या वेळेत एस.टी. नसते. त्यामुळे  मुली शाळेत जाऊ शकत नाहीत. चालत जाण्यामुळे बराचसा वेळ वाया जाऊ शकतो.सायकलीमुळे वेळेची बचत होते व मुलींचे शाळेतील गळतीचे प्रमाण थांबते.

2)लाभार्थी निवडीचे   निकष

1)         लाभार्थी  मुलगी ग्रामीण भागातील असावी.

2)        लाभार्थी मुलगी  इयता 5 वी ते 12 वी मध्ये शिकत असली पाहिजे.

3)        लाभार्थी अनु-जातीतील असलेचा सक्षम प्राधिकारी यांचा जातीचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक.

4)        लाभार्थीचे वास्तव्य ते शाळा  यातील अंतर कमीत कमी 2  कि.मी.  किंवा 1 कि. मी. पेक्षा जास्त असावे.

5)        अनुदान मर्यादा  जिल्हा परिषदेकडील  खरेदी समिती निश्चित करेल ती राहील.

 

योजना क्रमांक –4

योजनेचे नांव-  अनु-सूचित जातीतील ग्रामीण भागातील इयता 7 वी ते 12 वी पर्यंत शिकणा-या मुलींना संगणक प्रशिक्षणकरीता अनुदान देणे.

योजनेचा उद्देश –  ग्रामीण भागातील मुली संगणकाचे ज्ञान घेऊन त्याचे कौशल्य विकसीत करु शकतात.  नोकरी व व्यवसायासाठी संगणकाची मदत होते.

लाभार्थी योजनेस  पात्र होण्याचे निकष-

1) लाभार्थी ग्रामीण भागातील  रहिवासी असावी.

2) लाभार्थी संगणक परीक्षा उत्तिर्ण झालेली असावी.

3) लाभार्थी दारिद्रय रेषेच्या कुटूंबातील असावी. अथवा वार्षिक उत्पन्न रु. 120,000/- पर्यंत असावे.

4)        लाभार्थी अनु-जातीतील असलेचा सक्षम प्राधिकारी यांचा जातीचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक

5)अनुदान  मर्यादा जिल्हा परिषदेकडील खरेदी समिती निश्चित करेल ती राहील.

योजना क्रमांक –5

योजनेचे नांव- माझी कन्या भाग्यश्री योजना.- सुधारीत

योजनेचा उद्देश –

1) मुलींचा जन्मदर वाढविणे,लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे, मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे.

2) एक किंवा देान मुली असणा-या कुटूंबाना मुलींच्या  नांवे वैयक्तिक लाभ (रु. 50,000/-

किंवा रु. 25,000/-)

माझी कन्या भाग्यश्री- सुधारीत योजनेच्या अटी व शर्ती.

1) ज्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 8 लाखापर्यंत आहे  अशा सर्व घटकातील लाभार्थ्यासाठी  ही योजना लागू आहे.

2) 1 ऑगस्ट 2017 नंतरची पहिली व दुस-या अशा देान्ही मुली लाभास पात्र राहतील.

3) दि. 1 ऑगस्ट 2017 नंतरची एकच मुलगी आहे. व मातेने/पित्याने दोन वर्षाच्या आत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करुन प्रमाणपत्र व प्रस्ताव सादर केला आहे. अशा मुलीस रक्क्म रु. 50000/- चे मुदतठेव प्रमाणपत्र देय राहील.

4) दि. 1 ऑगस्ट 2017  नंतर दोन मुली आहेत. व एक वर्षाच्या आत माता/पित्याने कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया करुन प्रमाणपत्र व प्रस्ताव सादर केला आहे. अशा प्रत्येक मुलींस रु. 25000/- चे मुदतठेव प्रमाणपत्र देय राहील.

5) प्रथम जुळया मुलींनंतर कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास सदर देान्ही मुलींना प्रत्येकी रु. 25000/- लाभ देय राहील.

6) लाभार्थी कुटूंबाने लगतच्या वर्षाचा रक्क्म रुपये 8.00 लाखपर्यतचा उत्पन्नाचा दाखला व रहिवासी (अधिवास)  दाखला स्थानिक तहसिलदार यांचा सादर करणे आवश्यक राहील.

7) माझी कन्या भाग्यश्री- सुधारीत योजनेचे अर्ज नजीकचे अंगणवाडी केंद्रात प्राप्त होऊ शकेल.

8) योजनेचा अंतिम लाभ घेताना मुलींचे वय 18 वर्षै पुर्ण होणे तसेच तिने 18 वर्षे पुर्ण होईपर्यत अविवाहित असणे आवश्यक राहील.

इ.5 वी ते 12 वीत शिकत असलेल्या मुलींना सायकली खरेदीचे अनुदान देणे. (सर्वसाधारण घटक),  ग्रामीण भागातील इयता 7 वी ते 12 वी पर्यंत शिकणा-या मुलींना संगणक प्रशिक्षणकरीता अनुदान देणे. ग्रामीण भागातील अनु-सूचित जातीतील  इ.5 वी ते 12 वीत शिकत असलेल्या मुलींना सायकली खरेदीचे अनुदान देणे. (विशेष घटक योजना) व माझी कन्या भाग्यश्री योजना या योजनांच्या निकषाची  पूर्तता करणाऱ्या लाभार्थांनी योजनांचा लाभ मिळण्यासाठी अर्ज करावेत.

उपरोक्त योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत  देण्यात येत असून अजूनही या योजनेचा लाभ मिळाला नाही अशा पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

००००

-सुनील सोनटक्के

जिल्हा माहिती अधिकारी

सोलापूर.

जलद न्यायासाठी न्याय यंत्रणा कटिबद्ध – न्यायमूर्ती नितीन सुर्यवंशी

हिमायतनगर व हदगाव येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय नूतन इमारतीचे उद्घाटन

नांदेड (जिमाका) दि. 10 :- न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांच्या बाबत सदैव काळजी व्यक्त केली जाते. या प्रलंबित प्रकरणांच्या जलद निपटाऱ्यासाठी न्यायपालिका समर्थ आहे. जलद न्यायासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सुर्यवंशी यांनी केले. हिमायतनगर व हदगाव येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.

 

न्यायमूर्ती शैलेश ब्रम्हे यांच्या सन्माननिय उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा  न्यायाधिश नागेश न्हावकर होते. याचबरोबर आमदार माधवराव पाटील जवळगावकर, सहा. पोलीस अधीक्षक गोहर हसन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता बसवराज पांढरे, कार्यकारी अभियंता प्रशांत कोरे, उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, नांदेड जिल्ह्यातील सन्माननिय न्यायाधिश व विधिज्ञ यांची प्रमुख उपस्थिती होती.

ग्रामीण भागातील न्यायालयांना अधिकाधिक तंत्रज्ञानाच्या चांगल्या सुविधा निर्माण करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. काही ठिकाणी अनेक न्यायालय हे कधीकाळी बांधलेल्या जुन्या वास्तुत सुरू आहेत. एका बाजुला न्यायालयात दाखल होणाऱ्या प्रकरणांची संख्या आणि जुनी प्रलंबित प्रकरणे यांचा वेळेत निपटारा करण्यासाठी लोक अदालत, उच्च व तंत्रज्ञानाचा काटेकोर वापर होणे आवश्यक आहे. पक्षकारांसह वकिलांनी ई-सुविधेच्या मार्फत कार्यरत होण्यासाठी तंत्रकुशलता अंगी बाळगावी, असे  न्यायमूर्ती नितीन सुर्यवंशी यांनी सांगितले. अधिवक्ता व न्यायालय यांच्या समन्वयातूनच न्यायालयाच्या कामकाजात गती येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोणत्याही कार्यालयाच्या गतीमानतेसाठी व कामकाजातील अचुकतेसाठी त्या कार्यालयातील परीसर, कार्यालयीन सुविधा या तेवढ्याच आवश्यक असतात. आपण संपूर्ण दिवस ज्या कार्यालयात व्यथीत करतो ते कार्यालय आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असेल तर काम करणाऱ्यांचा उत्साह द्विगुणित होतो.  न्यायालयाच्या बाबतीत अशा परिपूर्ण सुविधेतूनच प्रलंबित असलेल्या न्यायालयीन प्रकरणांचा निपटारा अधिक जलद गतीने होईल, असा विश्वास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शैलेश ब्रम्हे यांनी व्यक्त केला. तळागाळातील जो घटक न्यायापासून वंचित आहे त्यांना न्यायाच्या कक्षेत आणणे, त्यांना न्याय मिळवून देणे हे न्यायालयाचे कर्तव्य आहे. सर्वसामान्यांचा न्यायपालिकेवरचा विश्वास हा यातूनच दृढ होत जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

बदलत्या काळाप्रमाणे न्यायालयांनी मोठ्या प्रमाणात माहिती प्रणालीचा वापर सुरू केला आहे. यामुळे पक्षकार, वकिलांना दैनंदिन कामाकाजाच्या नोंदी यासह त्यांना आवश्यक असलेली माहिती यातून मिळते. ई-फाईलिंग मुळे वेळ, पैसा याची बचत होते. न्यायालयीन कामकाजाची आपोआप डिजिटलायझेशन होते. जिल्हास्तरावरील एकाच न्यायालय संकुलात अनेक विभाग असतात. संबंधित व्यक्तींना प्रत्येक ठिकाणी संबंधित कामासाठी प्रत्यक्ष जाण्याची गरज न्यायिक सुविधा केंद्रामुळे राहिली नाही. याचबरोबर ई-पे, पॉस मशिन, किओस्क सारख्या सुविधा या न्यायालयातही आता उपलब्ध होत असल्याने येत्या काही वर्षांत मोठा बदल सर्वांना दिसून  येईल, असे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर यांनी सांगितले. वकिल संघांनी याकडे सकारात्मक पाहून पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

न्यायालयीन प्रकरणाच्या जलद निपाटाऱ्यासाठी लोक अदालत सारखे प्रभावी माध्यम नाही. नांदेड येथे नुक्ताच झालेल्या लोक अदालतीमध्ये सुमारे 7 हजार प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. यात सुमारे 35 कोटी रक्कम संबंधितांना वर्ग झाली, असे स्पष्ट करून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर यांनी सांगितले.

हिमायतनगर येथील न्यायालयाचे प्रथम उद्घाटन करून नंतर सर्व मान्यवर हदगाव येथील न्यायालयाच्या उद्घाटन समारंभास रवाना झाले. हदगाव येथेही या उद्घाटन समारंभासाठी विशेष पेंडाल उभारण्यात आला होता. हिमायतनगर येथील कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिल्हा  न्यायाधिश श्रीमती रोहिणी पटवारी व सह दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर अ. प्र. कराड यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिमायतनगर अधिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲड. दिलीप राठोड यांनी तर आभार दिवाणी न्यायाधिश (क.स्तर) किरण खोंद्रे यांनी मानले.

हदगाव येथील कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर श्रीमती अ. कृ. मांडवगडे व ए. ए. के. शेख यांनी केले. प्रास्ताविक अधिवक्ता संघाचे अध्यक्ष नागोराव वाकोडे यांनी केले तर आभार दिवाणी न्यायाधिश (क. स्तर) जितेंद्र जाधव यांनी मानले.

000000

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळविणे आणखी झाले सोपे; ‘सीएमएमआरएफ’ ॲपवर अर्ज भरून मदत मिळविता येणार

मुंबई, दि.10 : मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत अवघ्या 14 महिन्यात 13 हजाराहून अधिक गोरगरीब -गरजू रुग्णांना एकूण 112 कोटी 12 लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित केली आहे. आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळविणे आणखी सोपे झाले असून यासाठी मंत्रालयात येण्याची आवश्यकता भासणार नाही. सीएमएमआरएफ या अँप्लिकेशनवर अर्ज भरुन मदत मिळविता येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने मागील वर्षी पहिल्याच जुलै महिन्यात १७८ रुग्णांना ७६ लाखांची मदत देण्यात आली. नंतर ऑगस्ट महिन्यात २४४ रुग्णांना १ कोटी १ लाख, सप्टेंबर महिन्यात ३१९ रुग्णांना १ कोटी ८६ लाख, ऑक्टोबर महिन्यात २७६ रुग्णांना २ कोटी ३५ लाख, नोव्हेंबर महिन्यात ५२७ रुग्णांना ४ कोटी ५० लाख, डिसेंबर महिन्यात १०३१ रुग्णांना ८ कोटी ५२ लाख, जानेवारी २०२३ मध्ये १०३२ रुग्णांना ८ कोटी ९० लाख तर फेब्रुवारी २०२३ मध्ये १२७४ रुग्णांना १० कोटी ५९ लाख, मार्च २०२३ मध्ये १४६९ रुग्णांना ११ कोटी ९३ लाख, एप्रिल मध्ये ११९० रुग्णांना ९ कोटी ९१ लाख, मे मध्ये १३२९ रुग्णांना ११ कोटी २५ लाख, तर जून मध्ये १७२८ रुग्णांना १४ कोटी ६२ लाख, जुलै १४८८ रुग्णांना १२ कोटी ७२ लाख, तर ऑगस्ट मध्ये विक्रमी १५६७ रुग्णांना १३ कोटी १४ लाख, रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशीलतेमुळे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये अनेक-विविध आजारांचा समावेश देखील करण्यात आला आहे. यामध्ये अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, कर्करोगावरील शस्त्रक्रिया, केमोथेरपी, डायलिसिस, जन्मतः मूकबधिर लहान मुलांच्यासाठी अत्यावश्यक असणारी कॉकलीयर इनप्लांट शस्त्रक्रिया, सर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, विद्युत अपघात, भाजलेले रुग्ण, जन्मतः लहान मुलांच्या हृदयशस्त्रक्रिया आदींचा समावेश आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांचे प्राण वाचविण्यात यश मिळविले आहे. यामुळे अनेक रुग्णांना अक्षरशः जीवनदान मिळाले आहे. गोरगरीब गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून अर्थसहाय्य केले जाते. या निधीचा जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी केले आहे.

00000

श्रीकृष्णाच्या शिकवणीप्रमाणे सर्वांनी बंधूभावाने रहावे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती, दि. 10 (जिमाका): उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज आमदार रवी राणा यांनी आयोजित केलेल्या नवाथे चौक येथील दहीहंडी कार्यक्रमाला उपस्थित होते. पुरुषोत्तम श्रीकृष्णाच्या शिकवणीप्रमाणे सर्वांनी बंधूभावाने रहावे. सर्व जात, पात, धर्म विसरुन दहीहंडीतील प्रेमाचा गोपालकाला एकमेकांना वाटून समाजात सलोख्याचे वातावरण कायम ठेवण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज येथे केले.

नवाथे चौक येथे आयोजित भव्य दहीहंडी कार्यक्रमाला खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांच्यासह सिनेकलाकार शिल्पा शेट्टी, राजपाल यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी मंचावरील दहीहंडी श्रीफळाने फोडून कार्यक्रमाचा श्रीगणेशा केला. छत्री तलाव येथे श्री हनुमानजी यांची १११ फूट उंचीच्या मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. श्री. फडणवीस यांच्या हस्ते  त्या  मूर्तीच्या प्रतिकृतीचे रिमोटव्दारे अनावरण करण्यात आले. हनुमान चालिसाचेही यावेळी पठण करण्यात आले. तसेच तिवसा व राऊर येथील निराधार कुटुंबांना घरकूल मंजूर झाले आहे. यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात घरकुलाचा ताबा लाभार्थ्यांना देण्यात आला.

              उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, श्रीकृष्ण आणि अमरावतीचा प्राचीन काळापासूनचा संबंध आहे. श्रीकृष्ण हे अमरावतीचे जावई आहेत. श्रीकृष्णाच्या विचारसरणीप्रमाणे सर्व समाजबांधवांनी एकोप्याने रहावे, असे सांगून ते पुढे म्हणाले की, अमरावती विमानतळाचा विकास करण्यात येणार आहे. तसेच येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती करण्यात येणार आहे. पीएम टेक्सटाईल पार्क अंतर्गत नव्या टेक्सटाईल पार्कची निर्मिती करण्यात येणार असून यातून 3 लक्ष तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. मराठी भाषेचे गौरवस्थळ मानल्या जाणा-या रिद्धपूर (जि. अमरावती) येथे मराठी विद्यापीठाची स्थापना करण्याचा निर्णय अर्थसंकल्पाद्वारे झाला आहे. अमरावती येथील शासकीय ज्ञान विज्ञान संस्था, तसेच हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकाचवेळी भाषेचे स्वतंत्र विद्यापीठ आणि दोन मोठ्या संस्थांना अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळणे ही घटना अमरावतीच्या शिक्षणपरंपरेला दृढ करणारी आहे. तसेच अमरावतीचे श्रध्दास्थान तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज यांचे स्मारक तयार करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्याचा सर्वांगीण विकासासाठी या निर्णयांची भूमिका महत्त्वपूर्ण राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा तसेच सिनेकलाकार शिल्पा शेट्टी यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

***

***

‘पोलीस दादाहा सेतू’ मुळे जनता व शासन-प्रशासनात सुसंवाद वाढीस लागेल – डॉ. विजयकुमार गावित

दिनांक १० सप्टेंबर २०२३ (जिमाका वृत्त) : नंदुरबार जिल्हा आपल्या निर्मितीचे रौप्य महोत्सवी वर्ष साजरा करतो आहे, त्यामुळे अनेक बाबींचे सिंहावलोकन करत असताना जिल्हा विकासाकडे झेपावत असला तरी अनेक वैयक्तिक लाभाच्या कामांसाठी नागरिकांना आजही जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी पायपीट करत यावे लागते. परंतु ‘पोलीस दादाहा सेतू’ मुळे लोकांची होणारी पायपीट थांबणार असून जनता व शासन-प्रशासनात सुसंवाद वाढीस लागणार आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.

ते आज अक्कलकुवा येथे जिल्हा पोलीस दलाच्यावतीने आयोजित ‘पोलीस दादाहा सेतू’च्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अति. जिल्हा पकिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, पोलीस निरीक्षक दिपक बुधवंत व परिसरातील नागरिक, पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

या जिल्ह्यातील दुर्गम भागात अनेक नाविण्यपूर्ण उपक्रम अशक्यप्राय वाटत असतात, परंतु अशक्य ते उपक्रम शक्य करून दाखवले तर जनता अशा उपक्रमांना चांगला प्रतिसाद देत असते. नंदुरबार सारख्या आदिवासी दुर्गम, सीमावर्ती क्षेत्रात नागरिकांचे प्रश्न जटील आहेत. इथला प्रत्येक क्षण एक समस्या घेवून येत असतो, अशा परिस्थितीत या समस्यांच्या दु:खाला फुंकर घालण्याचे काम जिल्हा पोलीस दलाने या उपक्रमातून केले आहे, त्याबद्दल त्यांचे आभार मानताना पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले, गेल्या पंचवीस वर्षात इथल्या जनतेने अनेक चढउतार अनुभवले आहेत. थोडे मागे वळून पाहिले तर अजूनही बराच प्रवास करायचा बाकी आहे. जनतेला समाधान वाटेल अशा कामांची पूर्तता करणे गरजेचे आहे. येणाऱ्या काळात या भागातील दळणवळण बळकट करताना ‘भगवान बिरसा मुंडा’ योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गाव, घरांपर्यंत रस्ता पोहचवला जाणार असून त्यासाठी १६ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. जलजीवन मिशनच्या माध्यमातून घराघरात प्रत्येकाला पाणी पोहचवले जाणार आहे. दूरसंचार आणि इंटरनेटचे जाळे विस्तारित करण्यासाठी जिल्ह्यात १५० टॉवर्स उभारण्यात आले आहेत. प्रत्येक ग्रामपंचायत आणि सरकारी कार्यालयांना सार्वजनिक उपयोगासाठी या सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत. परिणामी या भागात शिक्षण, व्यापार, आरोग्यसेवा विस्तारताना दिसत आहेत. अशाच प्रकारे या भागात विद्युत पुरवठा सक्षम करण्यासाठी सुरवाडे आणि नवापूर येथे १३२ केव्ही क्षमतेचे विद्युत फिडर मंजूर करण्यात आले आहेत.

पालकमंत्री पुढे म्हणाले, आज एखादा सार्वजनिक कार्यक्रम अक्कलकुवा येथे घेण्यासाठी चांगले बंदिस्त ठिकाण नाही, ही उणीव येत्या वर्षभरात येथे सास्कृतिक भवनाची निर्मिती करून भरून काढली जाईल. पोलीस दादाहा सेतू च्या माध्यमातून केवळ दाखले, कागपत्र, प्रमाणपत्रच मिळणार नसून शासकीय योजनांबद्दल जनजागृतीही त्या निमित्ताने होणार आहे. कुठल्याही शुल्काविना ही कागदपत्र, प्रमाणपत्र आपल्याला मिळणार आहेत. विविध आजारांनी ग्रस्त नागरिकांना शासनाकडून अनुदान दिले जाते, त्यासाठीची रूग्णसेवाही या सेतू केंद्राच्या माध्यमातून होणार आहे. येत्या काही महिन्यात जिल्ह्यातील १०० टक्के नागरिकांना आधार कार्ड, बॅंक खाते, उत्पन्नाचा दाखला देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही यावेळी पालकमंत्री डॉ. गावित यांनी यावेळी सांगितले.

सकारात्मक वातावरण निर्मितीसाठी ‘सोशल पोलिसिंग’: पी.आर. पाटील

यावेळी मनोगत व्यक्त करताना जिल्हा पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील म्हणाले की, गुन्हेगारी जगताला नियंत्रणात आणताना पोलिसांबद्दल एक प्रकारचे दहशतीचे व नकारात्मक वातावरण समाजात निर्माण झालेले दिसून येते. हे वातावरण सकारात्मकतेत बदलण्यासाठी जिल्हा पोलीस दालाने गेल्या वर्षभरात अनेक ‘सोशल पोलिसिंग’चे उपक्रम राबवले. त्यात ऑपरेश दक्षता च्या माध्यमातून ४० बालविवाह रोखले, अंमली पदार्थ मुक्त जिल्हा होण्यासाठी विशेष प्रयत्न केले. गणेशोत्सव व सण, उत्सवाच्या वेळी नागरिकांच्या मदतीने सामाजिक सलोखा राखण्यात यश मिळवले. तसेच श्रमदान, वृक्षलागवड यासारख्या उपक्रमाच्या माध्यमातून पोलीस हे समाजाचे मित्र असल्याची भावना निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला गेला. ‘पोलीस दादाहा’ हा उपक्रम असाच एक नागरिक आणि शासन-प्रशासनात संवादाचा सेतू बनून काम करण्याचा उपक्रम आहे. अक्कलकुवा सारख्या दुर्गम भागातील नागरिकांना जिल्हा मुख्यालयी विविध दाखले व दैनंदिन उपयोगी दस्तावेज तयार करण्यासाठी जावे लागते. अशा परिस्थितीत वारंवार हेलपाटे मारणे, त्याच पाठपुरावा करण्याऐवजी एखाद्या एजंटच्या भूलथापांना नागरिक बळी पडून त्यांचे आर्थिक शोषण होण्याची शक्यता असते. हे शोषण थांबविण्यासाठी हा उपक्रम राबवला जात असून पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून या सेतू केंद्रातून घरपोच व कुठलेही शुल्क न घेता दाखले व कागदपत्रे पोहचवली जाणार आहेत.

असा आहे ‘पोलिस दादाहा सेतू’ उपक्रम

जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी विविध सामाजिक कार्यक्रमात जातात, तेव्हा त्यांना अनेक सामान्य नागरिक भेटून त्यांच्या समस्या मांडत असतात. विविध शासकीय योजनांचे लाभ किंवा शासकीय योजनांची माहिती तसेच शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन एकाच ठिकाणी मिळावे, यासाठी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी ‘पोलीस दादाहा सेतू’ हा समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचे निश्चित केले असून त्याची सुरुवात प्रथम अक्कलकुवा पोलीस ठाणे येथून झाली आहे. या ठिकाणी नागरिकांचे शासकीय काम पोलीस दलामार्फत शासकीय कार्यालयात पोहचवून झालेली कामे, दाखले, प्रमाणपत्रे आदी नागरिकांना परत मिळणार आहेत.

नागरिक व शासकीय कार्यालये यामध्ये सेतूची भूमिका पार पाडण्याच्या संकल्पनेतून या योजनेचे ‘पोलीस दादाहा सेतू’ असे नामकरण केले आहे. बऱ्याचदा आदिवासी बांधवांना वेगवेगळ्या शासकीय किंवा निमशासकीय कामांसाठी आवश्यक असणारे शासकीय कागदपत्रे काढण्यासाठी जिल्हा किंवा तालुक्याच्या ठिकाणी विविध कार्यालयात जावे लागत असते. अशा वेळी तेथे गेल्यानंतर त्यांना आवश्यक असणारे कागदपत्रे कुठे मिळतात, कुणाकडे अर्ज करावा, त्यासाठी लागणारे कागदपत्र कोणते,किती दिवसात मिळतील, त्याची प्रक्रिया काय, याबाबत माहिती नसल्यामुळे किंवा अशिक्षितपणा अथवा अज्ञानामुळे कागदपत्रे काढण्यासाठी अडचणी येतात. या शासकीय कामासाठी एजंटकडून फी घेतली जाते. यात वेळ व पैसा यांचा अपव्यय होतो. या सर्व बाबींचा विचार करुन नंदुरबार जिल्हा दलातर्फे पोलीस दादाहा सेतू हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. सर्व कामे विनामुल्य होणार आहेत. पोलीस दादाहा सेतू या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये एक स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येणार असून संबंधीतांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात येईल. या उपक्रमाची सुरुवात पोलीस दलातर्फे अक्कलकुवा पोलीस ठाण्यापासून करण्यात येत आहे.

‘पोलीस दादाहा सेतू’ पहिल्याच दिवशी या दाखल्यांचे झाले वितरण

????️उत्पन्नाचा दाखले ०५

????️अधिवास व राष्ट्रीयत्व दाखला ०४

????️३३ % महिला आरक्षण प्रमाणपत्र ०१

????️चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रे १७

????️जातीचे दाखले ०८

????️ रेशन कार्ड ०४

????️आभा (ABHA) कार्ड ३८

????️ एकुण ७७

००००००००००

आदिवासी बांधवांना लागणारी विविध ओळखपत्रे आणि दाखल्यांचा खर्च शासन करणार – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार : दिनांक १० सप्टेंबर २०२३ (जिमाका वृत्त ) आदिवासी बांधवांसाठी शासनाने विविध कल्याणकारी योजनांची आखणी केली आहे, या योजनांचा लाभ घेण्यासाठी विविध प्रकारचे दाखले, ओळखपत्रे त्यांच्याकडे असणे अनिवार्य असते. केवळ ती नसल्यामुळे अनेक आदिवासी बांधव त्यांच्या हक्काच्या योजना व त्यांच्या लाभापासून वंचित राहत असल्यामुळे आदिवासी बांधवांना लागणारी सर्व ओळखपत्रे व दाखल्यांचा खर्च आदिवासी विकास विभागामार्फत केला जाणार असून घरकुल योजनेच्या लाभासोबत आता रोजगार व्यवसायाच्याही संधी उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.

ते नंदुरबार येथे आयोजित आदिवासी वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरीकांच्या अडचणी समजून घेताना बोलत होते.  यावेळी तहसीलदार नितीन गर्जे, नंदुरबार नगरपालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी नितीन कापडणीस व विविध यंत्रणांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले, नंदुरबार शहरातील ज्या आदिवासी बांधवांकडे स्वत:चे घरकुल नाही त्यांनी संपूर्ण कागदपत्रांसह अर्ज केल्यास दिवाळीच्या आत त्यांना घरकुले मंजूर करण्याचा प्रयत्न आहे. तसेच ज्यांच्याकडे आधार, रेशन, आभा यासारखी कार्ड्स व जातीचे प्रमाणपत्र रहिवासी दाखला, बॅंक खाते नसणे यासारख्या अडचणी असतील यासाठी स्वतंत्र ड्राईव्ह प्रशासनाच्या माध्यमातून घेऊन ती प्रत्येकाला देण्याची मोहिम सुरू आहे. यासाठी कुठल्याही आदिवासी बांधवाला कुठलेही शुल्क अथवा अनावश्यक पैसे द्यावे लागणार नसून अशा कागपत्रांसाठीचा लागणारा सर्व खर्च आदिवासी विकास विभागामार्फत केला जाणार आहे. त्यामुळे ज्या नागरिकांनी आपले रेशन कार्ड स्वतंत्र केले नसतील ते स्वतंत्र करावित, आधार, बॅंक खाते यासारख्या  विविध जीवनोपयोगी दस्तावेज प्राप्त करून घ्यावेत. ज्यांच्याकडे ही स्वतंत्र कागपत्रे नाहीत त्यांनी कुठल्याही घरकुल अथवा वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ होणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

ते पुढे म्हणाले, आदिवासी वस्त्यांवर राहाणाऱ्या सर्व नागरिकांच्या समस्या वेळेत सोडविण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या असून घरकुलासोबत आदिवासी वस्त्यांवर रोजगार व व्यवसाय निर्मितीलाही चालना देण्यात येणार आहे. त्यासाठी कौशल्यावर आधारित रोजगार निर्मितीसाठी व अनुकुल व्यवसाय उभारण्यासाठी शासनामार्फत मदत केली जाणार आहे. आदिवासी वस्त्यांमधील साफसफाई, विद्युतीकरण, रस्त्यांची डागडूजींची कामे  तातडीने पूर्ण करावीत. एकही नागरिक त्यांच्या मुलभूत गरजांपासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी नगरपालिका व तालुका प्रशासनाने घेण्याच्या सूचनाही यावेळी पालकमंत्री डॉ.गावित यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी उपस्थित नागरिकांपैकी प्रत्येक नागरिकांच्या समस्या पालकमंत्री डॉ. गावित यांनी जाणीवपूर्वक ऐकून घेतल्या. कार्यक्रमास शहरातील नागरिक,महिला,ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

००००००००००

गणरायाचा मंगलमय सण निर्विघ्नपणे साजरा करत प्रशासनाला सहकार्य करूया – पालकमंत्री दीपक केसरकर

कोल्हापूर, दि. 9 (जिमाका):  गणरायाचा मंगलमय सण निर्विघ्णपणे साजरा करत प्रशासनाला सहकार्य करूया असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. आज पालकमंत्री केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पोलीस प्रशासन व जिल्ह्यातील गणेश मंडळाचे पदाधिकाऱ्यांसमवेत गणेशोत्सव शांततेत साजरा करण्याच्या पार्श्वभूमीवर बैठक संपन्न झाली.

यावेळी खासदार धैर्यशील माने, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त केशव जाधव, पोलीस उपअधीक्षक (गृह) प्रिया पाटील,  शहर उपअधीक्षक अजित टिके, पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, पोलीस व महानगरपालिकेचे अधिकारी, शातंता समितीचे सदस्य, गणेश मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

पालकमंत्री केसरकर यांनी उपस्थित गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांना येणारा उत्सव शांततेने संयमाने साजरा करण्याचे आवाहन केले. उपस्थितांच्या मागणीनुसार मिरवणुकीदरम्यान वाहनांच्या रुंदी बाबत येत्या काळात सूचनाही देवू असे आश्वासन दिले. कोल्हापूर जिल्ह्याला ऐतिहासिक परंपरा आहे आपण ती परंपरा जपत उत्साहाने येणारा गणेशोत्सव साजरा करू असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

            बैठकीच्या प्रास्ताविकात पोलीस अधीक्षक श्री. पंडित म्हणाले की, गणेशोत्सव पार्श्वभूमीवर प्रशासनाने तयारी केली आहे. एक खिडकी योजनेतून नियमाने मंडळाना परवानगी देण्यात येत आहे. उत्साहाच्या भरात काही मंडळांकडून नियमांचे उल्लंघन होते. याचा त्रास अन्य मंडळांसह मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांना सहन करावा लागतो. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करून कायदा सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या मंडळांवर पोलिसांकडून कारवाई केली जाते. जिल्ह्यात व शहरातही बैठका घेवून सण शांततेत व उत्साहात साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले.

            खासदार धैर्यशील माने म्हणाले की, गणरायाचा सण आनंदानी साजरा करूया. पोलीस प्रशासनातील सर्वच अधिकारी व सहकारी सण आनंदाने व सुरक्षित साजरा करण्यासाठी तत्पर असतात. गणेश मंडळांनी उत्सवात इर्शा न बाळगता सहकार्य करावे.

            पालकमंत्री केसरकर म्हणाले की, गणेश उत्सव आनंदाने व शांततेने साजरा करण्यासाठी जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे. गणरायाचे आगमन व विसर्जन करण्यास जिल्हा प्रशासन सज्ज आहे. उपस्थित पदाधिकाऱ्यांकडून प्राप्त सूचनांमध्ये खड्डेमुक्त रस्ते,  प्रदुषणमुक्त पंचगंगा नदी, डॉल्बी मुक्त सण साजरा करणे, उत्कृष्ट मंडळाना देण्यात येणाऱ्या   पारितोषिकामध्ये रोख रक्कम देणे, सणाबाबत परवानगी व सुविधा आदीबाबत प्रशासनाची बैठक घेवून लवकरच निर्णय घेण्याबाबत आश्वासन यावेळी दिले.

00000

नंदुरबारला साकारणार आंतरराष्ट्रीय दर्जाची आदिवासी क्रीडा प्रबोधिनी – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार: दिनांक ९ सप्टेंबर २०२३ (जिमाका वृत्त) आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये खेळाचे गुण उपजत असतात. त्यांना जर योग्य संधी व सुविधा मिळाल्या तर ते क्रीडाक्षेत्रात देशाचे नाव जागतिक स्तरावर गाजवू शकतात, हे आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक आदिवासी खेळाडूंनी दाखवून दिले आहे. त्यामुळे नंदुरबार येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण करणारी आदिवासी क्रीडा प्रबोधिनी साकारण्याचा विचार असून, त्यात आदिवासी खेळाडूंना सांघिकसोबत वैयक्तिक क्रीडा प्रकाराचे धडे दिले जातील, अशी माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली आहे.

ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्ह्यातील सर्व तालुका क्रिडा संकुलांच्या निर्मिती संदर्भात आयोजित आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील,तहसीलदार नितीन गर्जे, नंदुरबार नगरपालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी नितीन कापडणीस, जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, तालुका क्रिडा अधिकारी व जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये उत्तम कलागुण, बौद्धिक क्षमता आहे. या मुलांच्या क्रीडा गुणांना चालना देणे व क्रीडाविषयक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून राज्यातील पहिली आदिवासी क्रीडा प्रबोधिनी नाशिकमध्ये सुरू करण्यात आली आहे. त्या धर्तीवर ती नंदुरबारमध्ये सुरू करण्याची बाब  विचाराधीन आहे. त्यात पाचवी च्या वर्गापासून प्रवेश दिला  जाईल. त्यात ८० टक्के आदिवासी व २० टक्के इतर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये  प्रचंड ऊर्जा व काटकता असते, धावणे, पोहणे, लांब, उंच उडी आणि नेमबाजीसह विविध क्रीडा प्रकारांचे कौशल्य नैसर्गिकरीत्या असते. सांघिक प्रकाराबरोबरच वैयक्तिक क्रीडा प्रकारात पदके मिळविण्याची संधी जास्त असल्याने या आदिवासी क्रीडा प्रबोधिनीत सामुहिक क्रीडा प्रकारांसोबत कनो-कायाकिंग, नेमबाजी, जिम्नॅस्टिक्स, कुस्ती, धनुर्विद्या, बॉक्सिंग, स्विमिंग या वैयक्तिक खेळांचाही समावेश असेल. या वैयक्तिक क्रीडा प्रकारात खेळानुसार स्वतंत्र प्रशिक्षकाची नियुक्ती सोबतच त्यांच्या दर्जेदार व पोषक आहारावरही विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. तसेच क्रीडा प्रबोधिनी परिसरात वसतिगृहाच्या सुविधा असणार आहेत. तसेच या खेळाडू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसह शाळेत जाण्या-येण्यासाठी वाहन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वैयक्तिक तसेच सांघिक खेळांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडांगणांमध्ये अद्ययावत क्रीडा साहित्याद्वारे उत्तम दर्जाच्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सराव करता येणार असल्याचेही डॉ गावित यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले, प्रत्येक तालुक्यातील क्रिडा संकुलांच्या निर्मितीसाठी  येणाऱ्या सर्व अडचणींचे निराकरण करून त्यांचे बांधकाम वर्षभरात पूर्ण करण्यासाठी नियोजन करावे. धडगाव, अक्कलकुवा, तळोदा  क्रिडा संकुलांच्या प्रस्तावित जागेसंदर्भात तहसीलदार व संबंधित मुख्याधिकाऱ्यांनी  आठ दिवसाच्या आत अहवाल सादर करावा. तसेच नंदुरबार, नवापूर, शहादा येथील तालुका क्रिडा संकुलांच्या जागेचा प्रश्न मार्गी लागला असल्याने त्यांचे आराखडे तयार करून तात्काळ कामे सुरू करण्यात यावीत. नंदुरबार क्रिडा संकुलाकडे जाणारा रस्ता अरूंद असल्याने तो रूंद करण्यासाठी नंदुरबार-खामगाव रस्ता तातडीने प्रस्तावित करावा. शहादा क्रिडा संकुलात ४०० मीटरचा ट्रॅक तयार करण्यासाठी नियोजित रचनेचा आराखडा तयार करावा. नंदुरबार क्रिडा संकुलाचे आजूबाजूला असलेल्या  सर्व व्यापाऱ्यांना क्रिडा संकुलातच गाळे देण्यात येणार असून त्याबाबत सर्व व्यापाऱ्यांशी करार केला जाईल. ज्यांना अधिकचे गाळे पाहिजे असतील त्यांना  लिलावात सहभागी होवून ते घेता येतील, असेही यावेळी पालकमंत्री डॉ.गावित यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्री डॉ. गावित यांनी नंदुरबारसह सर्व तालुका क्रिडा संकुलांचा नियोजित रचनात्मक आराखड्याची पाहणी करून सूचना केल्या.  तसेच नंदुरबार क्रिडा संकुलाच्या आजूबाजूला असलेल्या व्यापारी बांधवांशी सकारात्मक चर्चा केली.

०००००

आवश्यक सोयीसुविधांकरिता नगरोत्थान, दलितवस्ती सुधार व इतर योजनेतून नगरपंचायतींसाठी २१.३ कोटी रू. निधी – पालकमंत्री दीपक केसरकर

  • नागरी भागाच्या सुशोभीकरणासह, स्मारकांचा विकास करणार
  • ६ नगरपंचायतींना प्रत्यक्ष भेटी देवून समस्यांबाबत घेतला आढावा
  • नृसिंहवाडी पर्यटन स्थळ विकासासाठी ५ कोटी ९० लाखांच्या कामांचे भूमिपूजन संपन्न

कोल्हापूर, दि. 9 (जिमाका):  कोल्हापूर जिल्ह्यातील शहरी भागात पायाभूत सुविधांच्या निर्मितीतून सर्वसामान्यांना विविध योजनांच्या माध्यमातून कामे करण्यासाठी 6 नगरपंचायतींच्या मागणीनंतर नगरोत्थान व इतर योजनांमधून 21.3 कोटी रुपये निधी  देण्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केले. महाराष्ट्राच्या नागरी क्षेत्रात पाणी पुरवठा, मलनिस्सारण, रस्ते अशा विविध पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी राज्य शासनाने विविध योजनांमधून निधी दिला आहे. यातून पालकमंत्री केसरकर यांनी जिल्हयातील भेटी दिलेल्या 6 नगरपंचायतींना सुमारे 21.3 कोटी रूपयांचा निधी देण्याचे जाहीर केले. त्यांनी दोन दिवसात जिल्हयात 6 नगरपंचायतींना भेटी देवून सर्वसामान्यांच्या विकास कामांबाबतच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी सोबत खासदार धैर्यशील माने, स्थानिक आमदार, जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्यासह, नगर प्रशासन अधिकारी नागेंद्र मुतकेकर,  संबंधित तहसिलदार, मुख्याधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दि.8 सप्टेंबर रोजी त्यांनी वडगाव नगरपरिषद विकास कामांबांबत तेथील कार्यालयात बैठक घेतली. माजी पदाधिकारी व मुख्याधिकारी यांनी विविध कामांबाबत शासनाकडे निधीची मागणी केली. नगरोत्थान व डीपीसीमधून मिळत असलेल्या 99 लक्ष रूपयांच्या निधीत वाढ करत पालकमंत्री यांनी 2.20 कोटी रूपये देण्याचे जाहीर कले. तसेच सरसेनापती धनाजीराव जाधव स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी 8 कोटी रूपये लागणार आहेत. यासाठी शासनाकडून निधी येईपर्यंत काम थांबू नये म्हणून जिल्हा पर्यटन लेखाशीर्षमधून 1 कोटी रूपये देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाला दिले. तेथील पंतप्रधान आवास योजनेसाठी 520 घरकुलांच्या जागेचा प्रश्न तातडीने मार्गी लावणेबाबतही जिल्हाधिकारी यांना सूचना केल्या. हातकणंगले नगरपंचायतीत 1.38 कोटी रुपये निधी शासनाकडून मिळत होता, त्यात वाढ करत तब्बल 3 कोटी रूपये देण्याचे आश्वासन पालकमंत्री केसरकर यांनी दिले. तसेच नव्याने स्थापन झालेल्या सर्वच नगरपंचायतींना प्रोत्साहनात्मक शासनाकडून निधी मिळतो. त्याअंतर्गत ५ कोटी रूपये शासनाकडून अद्याप न मिळाल्याने त्याची मागणी यावेळी झाली. हातकणंगले नगरपरिषदेला तो निधी मिळण्यासाठी तातडीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हुपरी येथील नगरपरिषदेला स्व:मालकीची इमारत नाही, ज्येष्ठांसाठी विरंगूळा केंद्र, नगरोत्थानमधून वाढीव निधी मिळावा, पाण्याच्या योजनेबाबत तसेच सिटी सर्वेच्या दुरूस्तीबाबत मागण्या नागरिकांनी केल्या. यावेळी पालकमंत्री महोयदयांनी 83.5 लाख रूपयांच्या निधीत वाढ करत 2.10 कोटी रुपये निधी देण्याचे जाहीर केले. ज्येष्ठांसाठीच्या विरूंगळा केंद्राच्या जागेबाबत 15 दिवसात जिल्हाधिकारी यांना ती जागा हस्तांतरीत करण्याच्या सूचना केल्या. नियमानूसार स्थानिक सफाई कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. हुपरी येथील चांदी व्यावसायिकांच्या प्रश्नांसाठी उद्योगमंत्र्यांसोबत चर्चा करून येथील चांदी व्यावसायाला गतवैभव प्राप्त होण्यासाठी नियोजन करू असे आश्वासनही त्यांनी उपस्थितांना दिले. सुर्य तलावाच्या सुशोभीकरणासाठी आवश्यक निधी, चैत्यभूमी साठी नगर विकास विभागातून निधी मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

दि.9 सप्टेंबर रोजी जयसिंगपूर नगरपंचायत मध्ये आढावा घेताना माजी राज्यमंत्री तथा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी विकास कामांबाबतची माहिती पालकमंत्री महोदयांना दिली. तसेच त्यांनी नगरपंचायत अंतर्गत विविध विकास कामांमध्ये येणाऱ्या अडचणी व लागणाऱ्या निधीबाबतही माहिती सांगून  वाढीव निधी मिळण्याची विनंती केली. यावेळी पालकमंत्री श्री. केसरकर यांनी जयसिंगपूर नगरपंचायतीला मिळत असलेल्या 4 कोटी रुपये निधीमध्ये वाढ करून 8 कोटी रुपये निधी देण्याचे जाहीर केले. पुढे शिरोळ नगरपंचायतीसाठी  2 कोटी रुपये, महाराणी ताराराणी स्मारकाच्या कामासाठी 50 लक्ष, नगरपंचायतीसाठी अग्निशमन वाहन व त्याकरिता शेड तयार करण्यासाठी पूर्वीच्या चाळीस लाखांमध्ये अजून 40 लाख असे मिळून 80 लाख  व कुरुंदवाड नगरपंचायतीसाठी 5 कोटी रुपये देण्याचे जाहीर केले. कुरुंदवाड येथील संताजी घोरपडे समाधी स्थळ स्मारकाला पर्यटनामधून सुशोभीकरणासाठी 1 कोटी निधी देण्याचे जाहीर केले. नृसिंहवाडी पासून धनाजी घोरपडे स्मारकापर्यंत नदी पात्रातून जाण्यासाठी अत्याधूनिक बोट देण्यात येणार.

नगरपंचायतींना भेटी देवून समस्या जाणणारे जिल्हयातील पहिले पालकमंत्री – खासदार, धैर्यशील माने

कोल्हापूर जिल्हयाच्या इतिहासात विविध विकास कामांबाबत, नागरिकांच्या समस्यांबाबत प्रत्यक्ष नगरपंचायतींना भेटून दौरे करणारे पहिले पालकमंत्री दिपक केसरकर असल्याचे खासदार धैर्यशील माने यांनी प्रतिपादन केले. ते म्हणाले, पालकमंत्री नेहमीच जिल्हास्तरावर बैठका घेवून विविध कामांबाबत चर्चा करत असतात. परंतू नागरिकांच्या भावना, त्यांच्या समस्यांची जाण प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी दिपक केसरकर स्वत: जावून नगरपंचायतींच्या विकास कामांचा आढावा घेत आहेत. त्यांनी उपस्थितांना नागरी भागाचा विकास करताना समग्र विकास व्हावा यासाठी आवाहन केले. तसेच त्यांनी यावेळी त्यांच्या मतदार संघात येणाऱ्या नगरपंचायतींमधील विकास कामे व समस्यांबाबतची माहिती पालकमंत्र्यांना दिली.

 

श्रीक्षेत्र कुंथुगिरी येथील विकासकामांचे भूमिपूजन रामलिंग मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी 50 लक्ष रुपये मंजूर

श्रीक्षेत्र कुंथुगिरी येथे जिल्हा नियोजन, पर्यटन स्थळ विकास योजनेतून मंजूर झालेल्या संरक्षक भिंत बांधणे व अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते संपन्न झाला. या कामांमध्ये 2 कोटी रुपये निधी मंजूर असून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. मंजूर कामांमध्ये शांतिनाथ मंदिर, सभा मंडप, कैलास पर्वत ते यात्री निवास रस्त्यांचे काँक्रिटीकरण तसेच संपूर्ण कुंथुगिरी क्षेत्र परिसरात संरक्षक भिंतीचे बांधकाम केले जाणार आहे. तेथील रामलिंग मंदिराकडे जाणारा रस्ता तयार करण्यासाठी पालकमंत्री केसरकर यांनी 50 लक्ष रुपये देण्याचे जाहीर केले.

नृसिंहवाडीतील 5 कोटी 90 लाखांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न

सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना 2023-24 अंतर्गत पर्यटन स्थळ विकासासाठी मूलभूत सोयी सुविधा पुरवणे या लेखाशीर्ष अंतर्गत मंजूर झालेल्या 5.90 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते नृसिंहवाडी येथे संपन्न झाले. या कामांमध्ये नृसिंहवाडी येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे व चौक सुशोभीकरण करणे, विठ्ठल मंदिर येथे सांस्कृतिक हॉल बांधणे, छत्रपती संभाजी महाराज विक्री केंद्र व भक्तनिवास बांधणे, श्री.स्वामी समर्थ मंदिर व शुक्ल तीर्थ मार्ग रस्ता करणे आणि सांस्कृतिक हॉल व भक्तनिवास बांधणे इत्यादी कामांचा समावेश आहे. या भूमिपूजन समारंभा वेळी पालकमंत्री यांच्या समवेत खासदार धैर्यशील माने, माजी राज्यमंत्री तथा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, नृसिंहवाडी येथील सरपंच, उपसरपंच, तहसीलदार श्री. हेळकर, गट विकास अधिकारी श्री.कवितके व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी श्री.केसरकर म्हणाले ग्रामपंचायतीने पर्यटनाच्या दृष्टीने व विकासाच्या दृष्टीने एक चांगला आराखडा तयार केला आहे. यावेळी त्यांनी धार्मिक व ऐतिहासिक संगम करून नृसिंहवाडी परिसरातील संताजी घोरपडे समाधी स्थळ, विठ्ठल मंदिर तसेच आजू बाजूच्या ठिकाणी जाण्यासाठी 2 कोटी रुपयांची अत्याधुनिक नौका देण्याचे जाहीर केले.

यावेळी ते म्हणाले स्मारकांच्या संवर्धनातून छ्त्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महाराणी ताराराणी, सरसेनापती धनाजीराव जाधव, संताजी घोरपडे यांच्यासह सर्व शूरवीर यांचा इतिहास पुन्हा जागृत करायचा आहे. त्यासाठी जिल्हयात अनेक कामे हाती घेण्यात आली आहेत. कोल्हापूर जिल्ह्याला पुन्हा एकदा पूर्वीचे ऐतिहासिक वैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

00000

 

ताज्या बातम्या

केंद्रीय मंत्री डॉ.वीरेंद्र कुमार यांनी साधला जीवन विकास प्रतिष्ठानमधील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद

0
छत्रपती संभाजीनगर, दि.7, (विमाका) :- केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी आज येथील जीवन विकास प्रतिष्ठानला भेट देऊन ज्येष्ठ नागरिकांशी...

१६ वा वित्त आयोग ८ ते ९ मे रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर

0
मुंबई,दि.७ : सोळाव्या वित्त आयोगाचा दोन दिवसीय महाराष्ट्र दौरा   ८ व ९ मे , २०२५ रोजी  नियोजित आहे. आयोगाचे अध्यक्ष अरविंद पनगरिया यांच्या सह...

राज्यात १६ ठिकाणी सिक्युरिटी मॉक ड्रिल

0
मुंबई, दि. 7: जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानदरम्यान वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना बुधवार, दि. 7 मे रोजी विविध...

विरार-डहाणू रेल्वे चौपदरीकरणातील बाधितांना सानुग्रह अनुदान द्यावे  – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई, दि. ७ : विरार – डहाणू रोड रेल्वे चौपदरीकरण व रेल्वे कारशेड बांधण्यासाठी प्रकल्पामधील सर्व्हे न. २१६ आसनगाव येथील कुटुंबे बाधित होत आहेत....

तूर खरेदीसाठी पंधरा दिवसाची मुदतवाढ मिळावी – पणन मंत्री जयकुमार रावल यांची केंद्र सरकारकडे...

0
मुंबई दि. 07 :- राज्यातील तूर उत्पादक शेतकरी व लोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेता नाफेड व एनसीसीएफ यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या तूर खरेदीची मुदत...