सोमवार, जुलै 7, 2025
Home Blog Page 1012

ऑस्ट्रेलियन विद्यापीठे लवकरच भारतात कॅम्पस सुरु करणार – मार्गारेट गार्डनर

मुंबई, दि. 6 : भारतातून ऑस्ट्रेलियात उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक विद्यार्थी मेलबर्न राजधानी असलेल्या व्हिक्टोरिया राज्यात येतात. आता ऑस्ट्रेलियातील विद्यापीठे देखील लवकरच भारतात आपले कॅम्पस सुरु करणार असल्याची माहिती ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया राज्याच्या गव्हर्नर प्रो. मार्गारेट गार्डनर यांनी दिली.

गव्हर्नर प्रो. मार्गारेट गार्डनर यांनी व्हिक्टोरिया राज्याच्या एका शिष्टमंडळासह बुधवारी (दि. ६) महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली त्यावेळी त्या बोलत होत्या.

ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया राज्यात भारतीय लोकांची संख्या मोठी असून ते तेथील नागरी सेवा, संस्कृती व उद्योग क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देत असल्याचे गार्डनर यांनी सांगितले.  मेलबर्न येथे महाराष्ट्रातील लोकांची सांस्कृतिक संघटना असून मुंबई – मेलबर्न थेट विमानसेवेमुळे महाराष्ट्र व व्हिक्टोरिया राज्यातील संबंध अधिक व्यापक होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही देशांना जोडणारा क्रिकेट हा धागा वैशिष्ट्यपूर्ण आणि बहुआयामी आहे. मेलबर्न येथे भारतीय चित्रपटांचा देशाबाहेरील सर्वात मोठा चित्रपट महोत्सव होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

ऑस्ट्रेलियातील विद्यार्थी पूर्वी इंग्लंड अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी जात असत, परंतु आज अनेक विद्यार्थी भारतात टाटा समाज विज्ञान संस्था, आयआयटी येथे विद्यार्थी आदान – प्रदान कार्यक्रमांतर्गत येत असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र आणि व्हिक्टोरिया राज्यात आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संबंध वाढविण्यासाठी राज्याच्या दौऱ्यावर आल्याबद्दल व्हिक्टोरिया राज्याच्या गव्हर्नर यांचे स्वागत करताना राज्यपालांनी त्यांना राज्यातील विद्यापीठांसोबत सहकार्य वाढविण्याचे आवाहन केले. महाराष्ट्र हे भारतातील प्रमुख शैक्षणिक केंद्र असून आपण राज्यातील २६ विद्यापीठांचे कुलपती आहोत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार भारताला  सन २०३५ पर्यंत सकल विद्यार्थी नोंदणीचे प्रमाण ५० टक्के इतके गाठावयाचे आहे. एक युवा राष्ट्र म्हणून भारताला ऑस्ट्रेलियाकडून कौशल्य शिक्षणात देखील सहकार्य अपेक्षित असल्याचे राज्यपालांनी सांगितले.  मुंबई – मेलबर्न थेट विमानसेवेमुळे व्यापार, परस्पर संबंध तसेच पर्यटनाला चालना मिळेल असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.

यावेळी ऑस्ट्रेलियाच्या मुंबईतील वाणिज्यदूत मॅजेल हिंड, व्हिक्टोरिया गव्हर्नर यांचे सचिव जॉनाथन पॅट्रिक बुर्के, व्हिक्टोरिया राज्याच्या दक्षिण आशिया कमिशनर मिशेल वेड, रॉबर्ट हॉलंड, विद्यानंद सागराम व गरिमा शेवकानी आदी उपस्थित होते.

००००

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विधानभवन येथे अभिवादन

मुंबई, दि. 6 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विधानभवनाच्या प्रांगणात असलेल्या त्यांच्या पुतळ्यास विधानमंडळ सचिवालयाचे उप सचिव उमेश शिंदे यांनी पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी विधानमंडळ सचिवालयाचे वरिष्ठ सुरक्षा अधिकारी अशोक आगिवले, सोमेश्वर चौगुले, आदिंसह अन्य अधिकारी व कर्मचारी वर्गानेही गुलाबपुष्प अर्पण करुन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

०००

जैवविविधता वाचविण्यासाठी लढणारे फॉरेस्ट रेंजर्स समाजातील हिरो- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

गुवाहाटी (आसाम)/चंद्रपूर, दि. 6: पर्यावरण आणि वन्यजीव रक्षणाची जबाबदारी समर्थपणे सांभाळणाऱ्या वनक्षेत्रपालांमुळे जैवविविधता सुरक्षित असून धनापेक्षा जीवन सुरक्षित करणारे वन श्रेष्ठ आहे, हे पटवून सांगण्याची वेळ आता आली आहे. त्यामुळे यासाठी झटणारे फॉरेस्ट रेंजर्स हे खऱ्या अर्थाने हिरो आहेत. असे गौरवोद्गार महाराष्ट्राचे वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काढले.

गुवाहाटी येथे आयोजित पहिल्या आशियाई रेंजर्स फोरमच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. आशिया खंडातील विविध देशांसह, भारताच्या विविध राज्यातील रेंजर्स या तीन दिवसीय फोरमसाठी उपस्थित झाले होते. यावेळी मंचावर आसामचे वने व पर्यावरण मंत्री चंद्रमोहन पटवारी, आसामचे वनबल प्रमुख एम. के. यादव, एशियन रेंजर्स फोरमचे अध्यक्ष रोहित सिंग, आशियाचे अध्यक्ष ख्रिस ग्लोरिस, वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वन संरक्षक संदीप कुमार उपस्थित होते.

श्री. मुनगंटीवार म्हणाले, जगण्यासाठी श्वास अर्थात प्राणवायू देणाऱ्या जंगलांच्या वाढीची जबाबदारी सर्वांनी घ्यायला हवी. भारतातील सर्वाधिक वाघ महाराष्ट्रात असून, वनक्षेत्रातदेखील मोठी वाढ गेल्या काही वर्षात झाली आहे. चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पाकडे जागतिक पर्यटकांचा ओढा असतो. जैवविविधता नष्ट होणार नाही यासाठी व्यापक प्रयत्न झाले पाहिजे. महाराष्ट्रात अर्थ व वनमंत्री असताना पर्यावरणाप्रती आपण काही तरी देणं लागतो या भावनेतून अर्थमंत्री पदाच्या कार्यकाळात वन विभागाचे बजेट वाढविले, आजच्या घडीला देशातील वन विभागाला सर्वाधिक बजेट महाराष्ट्रात मिळत असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला.

यावेळी विशेष कामगिरी करणाऱ्या महिला रेंजर्सना मंत्री श्री.मुनगंटीवार यांच्या हस्ते सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले. महाराष्ट्राच्या वन विभागातही महिला कार्यरत असून त्यांचे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. 50 कोटी वृक्षालागवड, हॅलो फॉरेस्ट अशा प्रकल्पांच्या माध्यमातून आपण सातत्याने महाराष्ट्रातील वनसंवर्धनासाठी प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

गुजरातच्या हिना पटेल, मेघालयाच्या मर्थिलिना संगमा, राजस्थानच्या प्रेमकुंवर सत्तावर, महाराष्ट्राच्या दीपिका वशिष्ठ यांना एक्सप्लोरिंग वुमनहुड फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणाऱ्या वनदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती दीपाली देवकर उपस्थित होत्या.

महाराष्ट्रात मानव-वन्यजीव संघर्षात दिला जाणारा मोबदला आजच्या घडीला देशातील सर्वाधिक आहे. पुरातन काळापासून भारतात वन आणि वन्यजीव व्यवस्थापन केले जात आहे. आधुनिक भारतातील रेंजर्स हे व्यवस्थापन करणाऱ्यांपैकी एक आहेत. सिमेवर सैन्याचे जवान देशाच्या संरक्षणासाठी लढा देतात. तर सिमेच्या आत वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी पर्यावरण रक्षणासाठी लढा देतात, असेही श्री. मुनगंटीवार म्हणाले. देशाच्या कानाकोपऱ्यात आता ‘वन की बात’ होणे गरजेचे आहे. ही गरज ओळखत आपण महाराष्ट्राचे वनमंत्री या नात्याने काम करीत आहोत. इतरांनीही यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

00000

पर्यटनाला चालना देण्यासाठी चंद्रपूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा व्याघ्र सफारी प्रकल्प करणार- पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर, दि. 06: विदर्भ ही वाघांची भूमी आहे. जैवविविधतेने संपन्न असलेल्या भूमीत देश विदेशातील पर्यटक दरवर्षी मोठ्या संख्येने येतात. याच पार्श्वभूमीवर चंद्रपूर येथे जागतिक दर्जाचे व्याघ्र सफारी प्रकल्प करण्याचा संकल्प असून यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सल्लागारांची मदत घेण्यात येईल. यामुळे पर्यटनाला चालना मिळून परिसरात रोजगार निर्मिती व अर्थकारण मजबूत होण्यास मदत होईल. यासाठी वन अधिकाऱ्यांनी सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

नागपूर येथे यासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, वनबल प्रमुख शैलेंद्र टेंभुर्णीकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महिप गुप्ता, वन विकास महामंडळाचे सीजीएम संजीव कुमार, प्रशांत झुरमुरे, कल्याण कुमार आदी उपस्थित होते.

श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले की, चंद्रपूर-मूल मार्गावर वनप्रबोधिनीजवळील प्रशस्त वनक्षेत्रात व्याघ्र सफारी प्रकल्प होण्यासाठी असा संकल्प असून केवळ व्याघ्र सफारीपुरता हा मर्यादित न ठेवता इतर वन्यजीवांचाही या सफारीत समावेश व्हावा यासाठी प्रयत्न व्हावा. अशा प्रकल्पातून संशोधन व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सर्व वयोगटातील पर्यटकांना आकर्षित करणारे नवीनतम, अत्याधुनिक दर्जाचे विरंगुळा केंद्र याठिकाणी व्हावे यादृष्टीने नियोजन करणे आवश्यक असून तेथे असलेल्या वन्यजीवांची माहिती, त्यावर एखादा माहितीपूर्ण शो पर्यटकांसाठी करता येईल का, याचाही विचार करावा, अशा सूचना यावेळी दिल्या.

शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार आरोग्य सेवेसाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक- डॉ.ओमप्रकाश शेट्ये

छत्रपती संभाजीनगर, दि.६ (जिमाका):- समाजातील शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य सेवेतील तसेच समाजातील सर्व घटकांचे सहकार्य आवश्यक आहे. जिल्ह्यात प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा फुले जनआरोग्य योजनांच्या माध्यमातून लोकांना अधिकाधिक व दर्जेदार आरोग्य सेवा देऊन सर्वोत्तम आरोग्य योजनेचा लौकिक कायम राखावा, असे आवाहन आयुष्मान भारत मिशनचे राज्याचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेट्ये यांनी आज येथे केले.

प्रधानमंत्री जनआरोग्य योजना तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजना या योजनांचा आढावा आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.दयानंद मोतीपवळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभय धानोरकर, डॉ. रवी भोपळे, डॉ. मिलिंद जोशी तसेच योजनांशी संलग्नित हॉस्पिटल्सचे संचालक, डॉक्टर्स आदी उपस्थित होते.

बैठकीत १ एप्रिल ते ५ डिसेंबरअखेर जनआरोग्य योजनांशी जिल्ह्यात ३८ हॉस्पिटल्स संलग्नित आहेत. त्यात आतापर्यंत २२ हजार ७३४ रुग्णांवर ४६ हजार २८ उपचार/ शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून १२५ कोटी २१ लक्ष ४ हजार २६ रुपयांचा लाभ मिळाला असल्याची माहिती देण्यात आली.

डॉ. शेट्ये यांनी सांगितले की, या योजनांद्वारे गोरगरिबांना आरोग्य उपचाराच्या सुविधा मिळाव्या हा उद्देश असून त्यासाठी सर्व घटकांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. आरोग्याच्या योजना राबविताना संलग्नित हॉस्पिटल्सना येणाऱ्या अडचणी दूर करुन अधिकाधिक लोकांना आरोग्य सेवा देण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे.

जन आरोग्य योजनांचा लाभ देता यावा यासाठी आयुष्मान भारत कार्ड देण्यासाठी व्यापक प्रमाणावर प्रयत्न होत आहेत. विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान आयुष्मान भारत कार्डासाठी नोंदणी, ई केवायसीसाठी प्रयत्न सुरु आहेत, असे डॉ. भोपळे यांनी सांगितले.

डॉ. शेट्ये यांनी संलग्नित रुग्णालय संचालकांच्या अडचणी जाणून त्यावर उपाययोजना करण्याची ग्वाही दिली. डॉ. मिलिंद जोशी यांनी प्रास्ताविक केले तर डॉ. भोपळे यांनी आभार मानले.

०००००

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे देशाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय विकासामध्ये महत्त्वाचे योगदान- राज्यपाल रमेश बैस

मुंबई, दि.६ : जगभरातील लोक भारतीय संविधानाचे  निर्माते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखतात. देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विकासात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

दादर चैत्यभूमी येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या  महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमावेळी राज्यपाल श्री. बैस बोलत होते.

यावेळी मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, खासदार राहुल शेवाळे, आमदार आशिष शेलार, प्रवीण दरेकर, सदा सरवणकर, कालिदास कोळंबकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर, माजी खासदार नरेंद्र जाधव, मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, भिक्खू महासंघाचे अध्यक्ष डॉ. भदन्त राहुल बोधी महाथेरो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे, सरचिटणीस नागसेन कांबळे, देशभरातील आलेले अनुयायी उपस्थित होते.

राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महान शिक्षणतज्ज्ञ होते, शोषितवर्गाचे शिक्षण झाले पाहिजे हा त्यांचा आग्रह होता. मागास, वंचित, बहुजनांना शिक्षण मिळण्यासाठी ते सतत कार्यरत राहिले. पीपल्स एज्युकेशन सोसायटीसारख्या संस्थांच्या माध्यमातून आजही काम सुरू आहे. महिलांच्या अधिकारासाठी कार्य केले आणि महिलांना सन्मान मिळवून दिला. इंदू मिल येथील निर्माणाधीन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे कामही लवकरच पूर्ण होईल, याचा मला विश्वास असल्याचेही राज्यपाल श्री. बैस यांनी यावेळी सांगितले.

भारतीय संविधान जगात सर्वश्रेष्ठ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान जगातील सर्वश्रेष्ठ संविधान आहे. या संविधानानुसार भारतीय लोकशाहीची वाटचाल सुरू आहे. भारतीय संविधान संविधानिक जीवन जगण्याचा मार्ग असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक कायदे तयार केले. अर्थव्यवस्था, ऊर्जा, सिंचन, महिला धोरण, शिक्षण अशा विविध क्षेत्रातील धोरणांची आखणी केली आणि या धोरणाला मानवतेच्या विचारांची जोड दिली. त्यामुळेच देशाची एकता, बंधुता, एकात्मता या तत्त्वांना बळ मिळाले. २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा केला जातो. संविधानाचे महत्त्व आजच्या पिढीला लक्षात येण्यासाठी शासनाने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले. मा. सर्वोच्च न्यायालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला. तसेच जगाला हेवा वाटेल असे इंदू मिल येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याच बरोबर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या कामालाही वेग दिला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे भारतीय अर्थव्यवस्था मजबूत –  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारत अतिशय वेगाने प्रगती करीत आहे. जगातील पाचव्या क्रमांकावरील भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर येण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. याचे श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाला जाते. भारतीय संविधानाने  सकल बहुजनांना न्याय देण्याची व्यवस्था निर्माण केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मंत्रीकाळातील कार्य भारताच्या निर्मितीतील महत्त्वाचे पाऊल ठरते. इंदू मिल येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारकाचे काम लवकरच पूर्ण होईल. दीक्षाभूमी येथे २०० कोटीची विकास कामे सुरू केली आहेत. तसेच लंडन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे घर शासनाने विकत घेतले आहे. तेथील संग्रहालयाला देश विदेशातील पर्यटक भेट देतात. जपान मधील कोयासन विद्यापीठ मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या शिल्पाचे उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

देशाची  आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जागतिक दर्जाचेभव्य स्मारक उभारण्यात येत आहे, या स्मारकासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी प्रयत्न करत असताना समाजात समता, बंधुता रुजवण्यासाठी यशस्वी लढा दिला. सर्वोत्कृष्ट राज्यघटनेची निर्मिती केली. शिक्षणतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, जलतज्ज्ञ, शेतीतज्ज्ञ,संरक्षणतज्ज्ञ म्हणून त्यांचे कार्य अलौकिक आहे. ते  दूरदृष्टीचे प्रशासक होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी  सादर केलेल्या ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ प्रंबंधाला १०० वर्ष पूर्ण झाले आहेत. ही अभिमानाची गोष्ट आहे.

मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचे कार्य मार्गदर्शक आणि प्रेरणा देणारे आहे. यांच्या स्मृती जपण्यासाठी जे करावे लागेलं त्यासाठी शासन कटीबद्ध आहे. बौद्ध पंचायत समितीची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती. या समितीचे जे कार्यालय आहे त्याचे काम अपूर्ण होते.  मुख्यमंत्री महोदयांनी यासाठी 25 कोटीचा निधी दिला आहे. यावर्षी या इमारतीचे काम पूर्ण होईल.

मंत्री संजय बनसोडे म्हणाले की, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यासाठी शासकीय सुट्टी जाहीर केली, यासाठी मा. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे आभार मानतो. सिद्धार्थ कॉलेजच्या विकासासाठी निधी दिला, तसेच दि. १ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्त शासकीय कार्यक्रम आयोजन करण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल शासनाचे आभार मानले.

यावेळी माजी खासदार नरेंद्र जाधव, भीमराव आंबेडकर यांनी मनोगत व्यक्त केले तर आयुक्त डॉ. श्री.चहल यांनी आभार मानले.

०००

‘लोकराज्य’ नोव्हेंबर-डिसेंबर २०२३ चा विशेषांक प्रकाशित

मुंबई, दि. ६ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या ‘लोकराज्य’ मासिकाच्या नोव्हेंबर-डिसेंबर २०२३ चा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.

‘लोकराज्य’च्या या अंकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विविधांगी पैलूंवर आधारित अशा अभ्यासपूर्ण लेखांचा समावेश करण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विविध विषयांवर लेख लिहिले. याबरोबरच त्यांनी अनेक ग्रंथही लिहिले. यापैकीच ऑक्टोबर १९४८ मध्ये ‘द अनटचेबल्स्’ हा ग्रंथ प्रकाशित केला. या ग्रंथाने यावर्षी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. त्यानिमित्ताने विशेष लेखाचा समावेश या अंकात करण्यात आला आहे. याबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्य, विशेषतः त्यांच्या जीवनातील विविध क्षणांचे दर्शन घडवणाऱ्या काही दुर्मिळ छायाचित्रांचा; तसेच महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त विशेष लेखही या अंकात समाविष्ट करण्यात आला आहे.

पद्मश्री शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे यांचे ३ सप्टेंबर २०२३ रोजी जन्मशताब्दी वर्ष संपले. त्यानिमित्ताने त्यांच्या जीवनकार्यावर आधारित विशेष लेखांचा समावेशही ‘लोकराज्य’च्या या अंकात करण्यात आला आहे. याबरोबरच मंत्रिमंडळात ठरले या सदराचाही समावेश करण्यात आला आहे.

हा अंक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या https://dgipr.maharashtra.gov.in/  या संकेतस्थळावर तसेच  http://13.200.45.248/ या पोर्टलवर वाचनासाठी मोफत उपलब्ध आहे.

 

अंक वाचण्यासाठी????

mahasamvad.in/?p=113780

0000

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमी येथे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे अभिवादन

मुंबई, दि,६: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

दादर येथील चैत्यभूमी येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, खासदार राहुल शेवाळे, आमदार आशिष शेलार, प्रवीण दरेकर, कालिदास कोळंबकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर, माजी खासदार नरेंद्र जाधव, मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, भिक्खू महासंघाचे अध्यक्ष डॉ. भदन्त राहुल बोधी महाथेरो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे, सरचिटणीस नागसेन कांबळे यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिका जनसंपर्क विभागामार्फत आयोजित छायाचित्र प्रदर्शनास मान्यवरांनी भेट दिली. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. मुंबई महापालिकेतर्फे प्रकाशित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जागतिक पाऊलखुणा’ ही माहिती पुस्तिका मान्यवरांना भेट देण्यात आली.

०००

‘लोकराज्य’ नोव्हेंबर-डिसेंबर २०२३ चा विशेषांक प्रकाशित

 

‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या माध्यमातून १ कोटी ८४ लाख लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बीड दि. 5, (जिमाका) : ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाच्या माध्यमातून 1 कोटी 84 लाख लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ दिला आहे. हेच या योजनेचे ठळक यश असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

परळी येथील ओपळे मैदानावर ‘शासन आपल्या दारी’ अंतर्गत विविध योजनांचे लाभ वाटप व जिल्ह्यातील प्रस्तावित येाजनांचे भूमिपूजन आणि लोकार्पण झाले. त्याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.

या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्याचे पालकमंत्री व कृषिमंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस, आमदार प्रकाश सोळंके, आमदार लक्ष्मण पवार, आमदार बाळासाहेब आजबे, आमदार नमिता मुंदडा, आमदार संजय दौंड, विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड, जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक, जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

राज्यातील 20 जिल्ह्यात शासन आपल्या दारी हा कार्यक्रम झाला असून त्यातील गर्दीचे सारे उच्चांक या कार्यक्रमांने मोडले याबद्दल कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे विशेष अभिनंदन करतो. असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, या कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध योजनांच्या लाभार्थ्यांना 749 कोटी रुपयांच्या  विविध योजनांच्या लाभाचे वाटप करण्यात आले.  प्रस्तावित इमारत व वस्तीगृह आणि तीर्थश्रेत्र परळी विकास अंतर्गत असलेल्या विविध 892 कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले.

यातील परळी येथील तीर्थश्रेत्र विकास आराखडा महत्वाचा आहे. यासाठी शासनाने 286.68 कोटी रुपयांच्या कामांना मंजूरी प्रदान केली आहे. याखेरीज जिल्ह्यातील नवे जिल्हाधिकारी, प्रशासकीय, कृषि कार्यालय, सिरसाळा एमआयडीसी आदीसह भगवानबाबा विद्यार्थी वसतिगृह इमारत यांचा यात समावेश आहे.

नागरी सुवर्णोत्थान कार्यक्रमासाठी कालच 141 कोटी रुपयांची मंजूरी देण्यात आली आहे. असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात जिल्ह्यास पुरवणी मागणीत अधिक मदत व निधी देण्याचा प्रयत्न शासन करेल. कृषिमंत्री झाल्यानंतर 100 दिवसात शेतकरी लाभाचे 75 निर्णय कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतले हे देखील उल्लेखनीय आहे. असे श्री. शिंदे म्हणाले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकासाला सर्वोच्य प्राधान्य दिले आहे. एकही दिवस त्यांनी सुटी घेतली नाही, असे प्रधानमंत्री आपल्याला लाभले हे आपले भाग्य आहे. शासन शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करत आहे. नुकसान भरपाईत वाढ केली असून, एक रुपयात पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी महत्वाची आहे.

नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेशही तातडीने देण्यात आले आहेत. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी शासन बचतगटाच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे. बीडच्या औद्योगिक विकासाला चालना देणार असून यातून येथील लोकांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. बीडच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य राहील. इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला हक्काचे व टिकणारे आरक्षण देणार असल्याचेही ते म्हणाले.

गोपीनाथ गड येथे लोकनेते  स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाला मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री. पवार, कृषिमंत्री श्री. मुंडे यांनी अभिवादन केले. माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच सर्व मान्यवरांनी प्रभु वैद्यनाथाचे दर्शन घेवून विकास आराखडयातील कामांचे भूमिपूजन केले.

महाराष्ट्र सुजलाम – सुफलाम करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांना दिवसा सलग 12 तास  विघुत पुरवठा उपलब्ध झाल्यास शेतकरी समृध्द होणार आहे. ही जाणीव ठेवून प्रत्येक शेतकऱ्याला सौर उर्जा उपलब्ध करुन पूर्ण वर्षभर दिवसाला 12 तास वीज मिळावी असे नियोजन असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

दुष्काळामुळे अडचणीत असलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांसोबत शासन आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी समृद्धी योजना टप्पा 2 मधून  आगामी काळात शेतकऱ्यांना स्थैर्य प्राप्त होईल, यासाठी प्रयत्नशील आहे. 11 हजार 400 कोटी रुपये खर्चून कृष्णा मराठवाडा सिंचन योजनेतून कामे होत आहेत. मराठवाडा ग्रीडचा प्रस्ताव केंद्राला पाठवला आहे. जलयुक्त शिवार टप्पा 2 मध्ये बीड जिल्हा अग्रेसर राहील. बीडच्या आठही साठवण तलावांना मान्यता दिल्याचे फडणवीस म्हणाले. मुंडे यांनी केलेल्या वैजनाथ तीर्थश्रेत्र योजनेच्या मागणीच्या प्रस्तावाला मान्यता मिळण्यासाठी प्रयत्न करणार असून महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करणार असल्याचेही श्री. फडणवीस म्हणाले.

केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास – उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून देशाला 5 ट्रिलियनचे उद्दीष्ट गाठायचे आहे. त्यात राज्याचा वाटा 1 ट्रिलियन असावा यासाठी प्रयत्न आहेत.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये अनेक महत्वाची विकासकामे सुरू आहेत. कामे गतीने पूर्ण झाली आहेत, याचे समाधान आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आहेत. कृषी विभागाचे मागील काही महिन्यात 75 शासन निर्णय निघाले आहेत. पीक विमा योजनेत 48 लाखाहून अधिक अर्ज विम्यासाठी पात्र आहेत. कोट्यवधी रुपयांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

बीड जिल्ह्याचे मागासलेपण दूर करून जिल्ह्याचा सर्वांगिण विकास करू – कृषिमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे

शासन आपल्या दारी उपक्रमातून 36 हजार लाभार्थ्यांना लाभ झाला, याचा आनंद झाला आहे.  बीड जिल्ह्याचे मागासलेपण दूर होऊन आगामी काळात सर्वात जास्त विकसित जिल्हा म्हणून लौकिक राहील, यासाठी प्राधान्याने काम करु व जिल्ह्यात विकासाची गंगा आणू, सर्वजण मिळून जिल्ह्याचा विकास करू, असेही मुंडे म्हणाले.

महिलांसाठी आठ निवासी शाळा, कृषी महाविद्यालय, अंबाजोगाईत देवणी गोवंश केंद्र आदी विकासकामे शासनाने केली आहेत. देशात उज्जैन, काशी विश्वेश्वर या धर्तीवर परळी वैजनाथ येथे प्रसाद योजनेंतर्गत प्रस्ताव राज्याने केंद्राला पाठवावा. त्याचबरोबर परळीच्या औद्योगिक विकासाला अधिक चालना द्यावी आणि यासह बीड जिल्ह्याचे सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. जिल्ह्यात 1400 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन केल्याबद्दल आभारही श्री. मुंडे यांनी मानले.

माजी पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, परळीच्या विकासासाठी कोणतेही सहकार्य करायची माझी तयारी आहे. जिल्हा सर्व श्रेत्रात अग्रेसर असावा असे विचार आपण सातत्याने करतो, असेही त्या म्हणाल्या.

जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी प्रास्ताविकात जिल्हाभरात सुरु असलेल्या विविध योजना तसेच उपक्रमाबाबतची माहिती दिली.

ठळक नोंदी

या कार्यक्रमासाठी एस.टी. महामंडळाच्या 580 बसेस लाभार्थ्यांना आणण्यासाठी घेण्यात आल्या होत्या.

आजचा मुख्यमंत्री यांचा दौरा हा प्रचंड गर्दीचा दिवस आणि उच्चांकी उपस्थिती असल्याचे ठरला.

परळी शहरात जागोजागी मोठमोठ्या कमानी उभारण्यात आल्या होत्या.

विविध शासकीय विभागांच्या लाभाच्या योजनांची माहिती देणारे प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करण्यात

आले होते.

मंत्री महोदयांनी गोपीनाथ गड येथे स्व. गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन केले. त्यानंतर परळी तीर्थश्रेत्र

विकास कार्यक्रमाचे भूमिपूजन केले. एकाच वेळी गोपीनाथ आणि वैद्यनाथ या शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र

फडणवीस यांनी आपल्या भाषणात याचा उल्लेख् केला.

भूमिपूजन कामे

1) जिल्हाधिकारी कार्यालय, बीड

2) मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, बीड

3) कृषि भवन, बीड

4) संत भगवानबाबा ऊसतोड कामगार मुलोचे वस्तीगृह, बीड

5) संत भगवानबाब ऊसतोड कामगार मुलींचे वस्तीगृह, शिरुर कासार

6) कृषि महाविद्यालय, जिरेवाडी ता. परळी

7) कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, जिरेवाडी ता. बीड

8) सोयाबीन संशोधन प्रशिक्षण व प्रक्रिया उपक्रेंद, धर्मापूरी ता. परळी

9) एमआयडीसी विस्तार सिरसाळा, ता. परळी

10) श्रीश्रेत्र परळी विकास आराखडा विकास आराखडा कामे

11) परळी बसस्थानक, परळी

 

०००००

ताज्या बातम्या

आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत जेईई – सीईटीची कोचिंग

0
चंद्रपूर, दि. 6 : ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाखाणण्याजोगी असते. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे किंवा संधी उपलब्ध न झाल्यामुळे असे विद्यार्थी स्पर्धेच्या युगात मागे...

पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्याकडून आदिवासी विकास विभागाचा आढावा

0
चंद्रपूर, दि. 6 : पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी शनिवारी, जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाचा आढावा घेतला. तसेच राज्य शासनाने सुरू केलेल्या 100 दिवस प्रशासकीय...

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे प्रयाण

0
मुंबई, दि. ६ : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून विमानाने आज दुपारी २.०० वाजता कोची येथे प्रयाण झाले. यावेळी  अतिरिक्त मुख्य सचिव व...

महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…!

0
ज्ञानेश्वरांच्या ओव्यांपासून, शिवरायांच्या तलवारीपर्यंत, महात्मा फुल्यांच्या साहसापासून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनापर्यंत मुंबई, दि.  : - ‘महाराष्ट्राचा इतिहास गौरवशाली आहे. आणि ती एक जबाबदारी...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विद्यार्थ्यांच्या ‘एआय’ प्रकल्पांचे कौतुक

0
पंढरपूर दि. ६  : पंढरपूर येथील अरिहंत पब्लिक स्कूलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘टेक वारी’ या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच व्हिडिओ...