सोमवार, जुलै 7, 2025
Home Blog Page 1011

मंत्री सुधीर मुनगंटीवार होणार ‘गुड गव्हर्नन्स’ पुरस्काराने सन्मानित

मुंबई, दि.7 : दी सीएसआर जर्नलच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘सीएसआर जर्नल एक्सलन्स अवॉर्ड’ राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना प्रदान केला जाणार आहे. या पुरस्काराचे हे सहावे वर्ष आहे. मंत्री श्री. मुनगंटीवार यांना ‘दि सीएसआर जर्नल चॅम्पीयन ऑफ गुड गव्हर्नन्स’ हा पुरस्कार सर्वोत्तम प्रशासन व्यवस्था निर्माण करण्यात यशस्वी ठरल्याबद्दल दिला जात आहे.

मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज येथे येत्या शनिवार, दि. 9 डिसेंबरला देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

प्रशासनाला विश्वासात घेऊन प्रत्येक शासकीय योजना, अभियान आणि उपक्रमांचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचविणे, राज्य सरकारची कल्याणकारी योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यापासून ते गरजूंना शासनाकडून न्याय मिळवून देईपर्यंत प्रत्येक बाबतीत ते सातत्याने पाठपुरावा करीत असतात. त्यामुळेच दि सीएसआर जर्नलच्या वतीने उत्तम प्रशासनासाठी दिल्या जाणाऱ्या विशेष पुरस्कारासाठी श्री.मुनगंटीवार यांची निवड करण्यात आली आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. प्रसिद्ध कवी कुमार विश्वास, क्रिकेटपटू युवराज सिंह आणि मिथाली राज, अभिनेत्री भूमी पेडणेकर आदींनाही यावेळी विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

महाराष्ट्राच्या वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय या तीनही खात्यांचा माध्यमातून मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी ऐतिहासिक अन् धडाडीचे निर्णय घेतले आहे. अफजलखानाच्या कबरीचे अतिक्रमण हटविणे, छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे परत आणण्याचा केलेला लंडन येथील सामंजस्य करार, रायगडावर भव्यदिव्य केलेला शिवराज्यभिषेक सोहळा तसेच दूरध्वनी वर ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम्’ चे अभियान, आपल्या देशातील नवीन संसदभवन आणि अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या निर्मितीसाठी चंद्रपूर – गडचिरोली जिल्ह्यातून काष्ठ पाठविण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार, ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताला राज्यगिताचा दर्जा आणि नुकत्याच चंद्रपूर येथे घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा अशा निर्णयांमुळे मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार हे चॅम्पीयन ऑफ गुड गव्हर्नन्स या पुरस्काराचे खरे मानकरी ठरतात अशी भावना व्यक्त होत आहे.

कर्तृत्वाचा गौरव

श्री. मुनगंटीवार यांना 1999 मध्ये महाराष्ट्र विधानसभेचे सर्वश्रेष्ठ वक्ता म्हणून गौरविण्यात आले होते. यासोबतच दि नॅशनल फेडरेशन ऑफ द ब्लाईंडचा मेमोरियल अवॉर्ड,  आफ्टरनून व्हॉईसच्या वतीने बेस्ट परफॉर्मिंग पॉलिटिशियन, लोकमत आणि ज्युनियर चेंबर इंटरनॅशनलच्या वतीने ‘मॅन ऑफ द इयर’, महाराष्‍ट्राच्‍या आर्थिक क्षेत्रातील प्रगतीसाठी इंडिया टुडे सारख्‍या प्रतिष्‍ठीत समूहाने दोन वेळा पुरस्कारांनी त्यांना गौरविले आहे. मॅग्ना प्रकाशन संस्था व  होथूर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने ‘सोसायटी एक्सलेन्स अवॉर्ड’,  दिव्यांगांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल लेफ्टनंट जी. एल. नर्डेकर स्मृती पुरस्कार, वृक्षलागवडीच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल छाया दीक्षित फाउंडेशन चा विशेष पुरस्कार ,सामाजिक व राजकीय क्षेत्रातील दीर्घ सेवेसाठी कर्मवीर मा. सा. कन्नमवार स्मृती पुरस्कार, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज द्वारा व्यापार मित्र पुरस्कार अशा विशेष पुरस्कारांनीही त्यांना याआधी सन्मानित करण्यात आले आहे.

००००

दीपक चव्हाण/विसंअ

 

माजी सैनिकांच्या कल्याणासाठी सर्वांनी जास्तीत जास्त योगदान द्यावे – राज्यपाल रमेश बैस

मुंबई, दि.7 : भारतीय सैन्यदल हे आपल्या देशाचा अभिमान असून देशाच्या संरक्षणाबरोबरच,  नैसर्गिक आपत्तींच्या काळातही आपले सैन्यदल अत्यंत अमूल्य सेवा बजावते. भारताच्या संरक्षणासाठी ज्यांनी आपले प्राण अर्पण केले, अशा जवानांच्या कुटुंबीयांच्या जीवनातील अडीअडचणी दूर करून त्यांचे जीवन सुसह्य होण्यासाठी, युद्धात अपंगत्व तसेच  सेवानिवृत्त झालेल्या जवानांच्या पुनर्वसनाकरिता सशस्त्र सेना ध्वज निधीला सर्वांनी जास्तीत जास्त योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

राजभवन येथे मुंबई उपनगर आणि मुंबई शहर जिल्ह्यांद्वारे माजी सैनिकांच्या कल्याणासाठी आयोजित  सन 2023-24 या वर्षीच्या सशस्त्र सेना ध्वज दिन निधी संकलन मोहिमेच्या उद्घाटन कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस बोलत होते. भारतीय नौदलाच्या वेस्टर्न कमांडिंगचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाइस अॅडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी, जीओसी मुख्यालय महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा क्षेत्राचे लेफ्टनंट जनरल एच. एस. काहलॉन, एअर ऑफिसर कमांडिंग मुख्यालय मरीन एअर ऑपरेशन्सचे एअर व्हाइस मार्शल रजत मोहन यावेळी उपस्थित होते.

शासकीय, खासगी नामवंत व्यक्ती आणि संस्थांचे राज्यपाल रमेश बैस यांनी अभिनंदन करुन गेल्या वर्षी सशस्त्र ध्वज दिन निधी संकलनाची उत्कृष्ट कामगिरी  करणाऱ्या आगामी वर्षातही यापेक्षा अधिक उत्कृष्ठ ध्वज दिन निधी संकलन करतील अशी अपेक्षा व्यक्त केली. भारतीय सैन्य हे त्यांच्या त्याग, आणि शौर्यामुळे ओळखले जाते. भारतीय सैन्यदल हे आपल्या राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे.आपल्या प्राचीन धर्मग्रंथांमध्ये एक प्रसिद्ध श्लोक आहे, ज्यामध्ये आपली माता आणि मातृभूमी ही स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे, असे म्हटंले आहे. आपल्या मातृभूमिला आणि आपल्या जनतेला सैनिक अत्यंत सुरक्षित वातावरण निर्माण करून देतात. त्यांच्यामुळे प्रत्येक व्यक्ती आणि आपले राष्ट्र प्रगती करू शकतो. जम्मू आणि काश्मीर, डोकलाम, अरुणाचल प्रदेश आणि ईशान्येकडील बंडखोरीचा मुकाबला करण्यातही आपले सैन्य अत्यंत उत्कृष्ट  काम करत  आहे अशा सैनिकांच्या या योगदानासाठी आपण सदैव ऋणी असले पाहिजे, असेही राज्यपाल म्हणाले.

भारत देश पारतंत्र्यात होता तेव्हाचा कालावधी हा अनेक गोष्टींवर परिणाम करणारा होता. आपला समृद्ध सांस्कृतिक वारसा, आपली शिक्षण पद्धती आणि अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम झाला. इ.स. 1700 पर्यंत भारत जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक होता. आज आपल्या देशाने हे गतवैभव पुन्हा प्राप्त केले असून भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, ही अत्यंत अभिमानीची गोष्ट आहे. जेव्हा आपण राष्ट्राप्रती असलेल्या आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवू आणि जीवनाच्या सर्व क्षेत्रात शिस्त पाळू तेव्हांच आपण आपले स्वातंत्र्य आणि आपली लोकशाही टिकवू शकतो. त्यामुळे या देशाला सर्वोत्तम सुरक्षा देणाऱ्या या शूरविरांच्या कुटूंबियांसाठी सर्वांनी सशस्त्र सेना ध्वज दिनासाठी  मदत करण्याचे आवाहन राज्यपालांनी केले.

यावेळी कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर,सैनिक कल्याण विभागाचे संचालक ब्रिगेडियर (निवृत्त) राजेश गायकवाड, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी  राजेंद्र भोसले,मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर,सैनिक कल्याण बोर्डाचे मेजर प्रांजल जाधव यांच्यासह विविध देणगी  देणा-या  शासकीय संस्था,शाळा, महानगरपालिका, शासनाचे विविध विभाग आणि खाजगी क्षेत्रातील संस्थांचे प्रतिनिधी आणि अधिकारी,नामवंत देणगीदार यांचा सन 2022-23 या वर्षात  ध्वज दिन निधी संकलनाची उत्कृष्ट कामगिरी  केल्याबद्दल राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी सन 2023-24 साठी उपस्थित मान्यवरांनी ध्वजनिधी संकलनात आपला सहभाग नोंदवला.

000

श्रीमती संध्या गरवारे/विसंअ

राज्यातील १० महानगरांमध्ये पिंक रिक्षा सुरू करण्याबाबत सविस्तर आराखडा सादर करावा- उपमुख्यमंत्री अजित पवार

नागपूर, दि. ७ : महिलांसाठी रोजगाराची संधी निर्माण करणे आणि महिला सुरक्षा या उद्देशाने राज्यातील १० महानगरांमध्ये पिंक रिक्षा सुरू करणे व सॅनिटरी पॅड संदर्भात सविस्तर आराखडा सादर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिल्या.

यासंदर्भात नागपूर विधानभवन येथे बैठक झाली. या बैठकीस महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव यांच्यासह सबंधित अधिकारी उपस्थित होते.

या योजनेचा सविस्तर आराखडा सादर करण्याच्या सूचना देऊन उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, यामध्ये इलेक्ट्रिक व्हेईकल देण्याचा प्रस्ताव आहे. चांगल्या इलेक्ट्रिक व्हेईकल तयार करणाऱ्या कंपन्यांची याबाबत माहिती घ्यावी. महिलांना फायदा होईल, अशाप्रकारे प्रस्ताव तयार करावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

मंत्री श्रीमती तटकरे यांनी पिंक रिक्षा योजनेमुळे महिलांना होणाऱ्या फायद्याविषयीची माहिती दिली. या योजनेंतर्गत एकूण 5 हजार रिक्षा सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये एकल महिला, विधवा, परित्यक्ता यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यातील मुंबई शहर, नवी मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे व कल्याण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अमरावती या महानगरांमध्ये पिंक रिक्षा सुरू करण्यात येणार आहे.

यावेळी दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील महिलांना सॅनिटरी पॅड पुरवण्याबाबतच्या योजनेविषयीही सविस्तर चर्चा करण्यात आली. या दोन्ही योजनांविषयीचे सविस्तर आराखडे सादर करुन त्यावर पुढील बैठकीमध्ये अंतिम निर्णय घेण्याविषयीही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

0000

श्री. हेमंतकुमार चव्हाण/ससं

विधानपरिषदेत दिवंगत माजी सदस्यांना श्रद्धांजली

नागपूर, दि. ७:  विधानपरिषदेचे माजी सदस्य आणि मागील कालावधीत दिवंगत झालेल्या सदस्यांना आज विधानपरिषदेत श्रद्धांजली वाहण्यात आली.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे  यांनी शोकप्रस्ताव मांडला. यावेळी माजी विधानपरिषद उपाध्यक्ष, माजी मंत्री तथा विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते बबनराव दादाबा ढाकणे, माजी विधानपरिषद सदस्य किसनराव मक्काजी राठोड यांच्या निधनाबद्दल त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

००००

विधानपरिषद तालिका सभापतींची नावे जाहीर

नागपूर, दि. ०७ : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली असून अधिवेशन कालावधीतील विधानपरिषद तालिका सभापतींची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

तालिका सभापतिपदी सदस्य सर्वश्री निरंजन डावखरे, अनिकेत तटकरे, धीरज लिंगाडे, नरेंद्र दराडे यांची नावे नामनिर्देशित करण्यात आल्याची घोषणा विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे  यांनी विधानपरिषदेत केली.

0000

दिवंगत सदस्यांना विधानसभेत श्रद्धांजली

नागपूर, दि. 7 :  विधानसभेत दिवंगत सदस्यांना आज श्रद्धांजली वाहण्यात आली. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी यासंदर्भातील शोकप्रस्ताव मांडला.

विधानसभेचे विद्यमान सदस्य गोवर्धन मांगीलालजी शर्मा, माजी मंत्री बबनराव ढाकणे तसेच विधानसभेचे  माजी सदस्य गुलाबराव वामनराव पाटील, श्रीपतराव दिनकरराव शिंदे, शेख रशीद शेख शफी, राजाराम नथू ओझरे, वसंतराव जनार्दन कार्लेकर, गोविंद रामजी शेंडे, दिगंबर नारायण विशे यांच्या निधनाबद्दल विधानसभेत शोक प्रस्ताव मंजूर केला. दिवंगत सदस्यांच्या विधानसभेतील कामकाजास अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी यावेळी उजाळा दिला. यावेळी सदस्यांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून या दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहिली.

विधानसभा तालिका अध्यक्षांची नियुक्ती जाहीर

नागपूर, दि. 7 : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून येथे सुरुवात झाली. विधानसभा कामकाजासाठी तालिका अध्यक्षांची नियुक्ती अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी सभागृहात जाहीर केली.

विधानसभा तालिका अध्यक्षपदी सदस्य संजय शिरसाट, समीर कुणावार, चेतन तुपे आणि ॲड. यशोमती ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आल्याचे अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी जाहीर केले.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला ‘वंदे मातरम्’ आणि राज्य गीताने सुरुवात

नागपूर, दि. ७ : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले असून विधानसभा व विधानपरिषदेत ‘वंदे मातरम्‌’ आणि राज्यगीत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ ने सकाळी कामकाजास सुरुवात झाली.

विधानपरिषदेत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह सदस्य उपस्थित होते. विधानसभेत अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह  मंत्री आणि विधानसभेचे सदस्य उपस्थित होते.

 

विधानसभा अध्यक्ष, वि. प. उपसभापतींची ‘सुयोग’ला भेट

नागपूर, दि. ७ : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज ‘सुयोग’ पत्रकार निवास येथे भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली, तसेच माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.

शिबिरप्रमुख दिलीप जाधव, सहशिबिरप्रमुख राजन पारकर यांच्यासह अनेक पत्रकार यावेळी उपस्थित होते. विधिमंडळ अधिवेशनाच्या दहा दिवसांत अधिकाधिक कामकाज चालविण्याचा आमचा प्रयत्न असेल. सामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा होऊन त्यांच्या समस्यांचे निराकरण व्हावे, यासाठी अधिवेशनातील वेळेचा सदुपयोग करण्यावर आमचा भर आहे, असे श्री. नार्वेकर व डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.

विधानपरिषदेच्या शतकोत्तर महोत्सवानिमित्त महत्त्वाची विधेयके, ठराव, प्रस्तावांवरील चर्चा, परिषदेची शतकपूर्ती वाटचाल याबाबत ग्रंथ प्रकाशित करण्यात येत आहेत, असे डॉ. गोऱ्‍हे यांनी यावेळी सांगितले.

विधानसभा अध्यक्ष व विधानपरिषद उपसभापतींनी पत्रकारांशी विविध विषयांवर मनमोकळा संवाद साधला. श्री. जाधव व श्री. पारकर यांनी स्वागत केले. विधीमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागुल, डॉ. राहुल तिडके, वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक नीलेश मदाने यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

०००

हिवाळी अधिवेशनात विदर्भ, मराठवाड्याच्या प्रश्नांसह विविध प्रश्नांना न्याय देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर, दि. 6 – नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात विदर्भ व मराठवाड्यासह शेतकरी, कष्टकरी यांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करून न्याय देण्याचा प्रयत्न आहे. कायद्यात बसेल व टिकेल आणि ओबीसीसह कोणत्याही घटकांवर अन्याय होणार नाही, असे मराठा आरक्षण देण्याचा या शासनाचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

नागपूर येथे उद्या, दि. 7 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनास सुरूवात होत आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री यांच्या रामगिरी शासकीय निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत दादा पाटील, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे, कामगार मंत्री सुरेश खाडे, कौशल्य विकास, नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार प्रवीण दरेकर, ॲड. आशिष जायस्वाल आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, विदर्भामध्ये हे हिवाळी अधिवेशन होत आहे. विदर्भाशी आमचे जिव्हाळ्याचे नातं आहे. विदर्भातील जनतेलाही अधिवेशनामधून न्याय देताना एक विशेष आनंद होत आहे. विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस आणि कालबद्ध रितीने जे प्रकल्प, योजनांचे निर्णय घेतले आहेत, ते पूर्ण केले जातील. गेल्या दीड वर्षाच्या काळामध्ये सर्वसामान्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत विकास कामे पोहोचवण्याचे काम हे सरकार करत आहे.

‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमात काल बीडमध्ये 70 ते 80 हजार लोक उपस्थित होते. या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात सुमारे 2 कोटी नागरिकांनी लाभ घेतला आहे. जिल्हाधिकारी, तहसीलदार, तलाठी हे लाभार्थ्यांपर्यंत जाऊन त्यांना लाभ देत आहेत. लाभार्थी स्टेजवर येऊन लाभ घेतात हे चित्र देशात फक्त आपल्या राज्यात दिसत आहे. आमच्या सरकारने एनडीआरएफच्या निकषापेक्षा जास्तीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिली आहे. अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर नुकसान होत असलेल्या ठिकाणी तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्‍या आहेत. केंद्र शासनाने शेतकऱ्यांना सहा हजार रुपये प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभ दिला आहे. त्याचबरोबर देशात महाराष्ट्र शासनाने ‘नमो शेतकरी महासन्मान योजना’ घोषित करून आणखी सहा हजार रुपये प्रति शेतकरी लाभ देण्यास सुरूवात केली आहे. अवकाळी गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात शासन हात आखडता घेणार नाही, असेही श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, मराठा आरक्षण विषयावर सरकारची भूमिका ही सुरुवातीपासून अतिशय प्रामाणिक आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी  व इतर समाजावर अन्याय होणार नाही. तसेच कोणाचेही आरक्षण कमी केले जाणार नाही,  ही आमची स्पष्ट भूमिका असून त्यावर मंत्रिमंडळ ठाम आहे. मराठा समाजाला टिकणारे, कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. त्यामुळे दोन्ही समाजाने संयम ठेवावा.

अधिवेशनात शेतकरी, आरक्षण प्रश्नांवर समर्पक उत्तरे देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आज महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. यानिमित्ताने आज सकाळीच सर्वजण चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन करून आलो आहोत, असे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नुकतेच चार राज्यांमध्ये चक्रीवादळ आले होते. त्यामुळे हवामान विभागाने पुढचे तीन दिवस आपल्याकडे विशेषतः  विदर्भामध्ये पावसाची शक्यता वर्तविली आहे. जवळपास पाच जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी सर्व यंत्रणेला सुसज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच ज्या ज्या ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे किंवा होत आहे, त्या ठिकाणी कुठली वाट न पाहता पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यासंदर्भात प्रशासनाला निर्देश दिले आहेत. राज्यावर कर्ज वाढत असल्याच्या चर्चा आहे. मात्र, 2013 साली आपली अर्थव्यवस्था 16 लाख कोटी होती, आज ही अर्थ व्यवस्था 35 लाख कोटी इतकी झाली आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये अडीच पटीपेक्षा जास्त आपली अर्थव्यवस्था झालेली आहे. आज देशाच्या सगळ्या राज्यांच्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था समतोल आहे. एनसीआरबीच्या अहवालात राज्य गुन्हेगारीत दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे म्हटले आहे. मात्र, या अहवालात लोकसंख्या व एकूण गुन्हेगारीचे वर्गीकरण यावर त्याचे विश्लेषण करणे आवश्यक आहे.

हिवाळी अधिवेशनात सत्तारूढ पक्ष सर्व प्रकारच्या चर्चेसाठी तयार आहे. सभागृहामध्ये शेतकरी, आरक्षणाचे प्रश्नांवर सकारात्मकतेने चर्चा करण्यात येईल व त्यावर समर्पक उत्तरे देण्यात येईल. महाराष्ट्राच्या हितासाठी सकारात्मक अशा प्रकारचे निर्णय या अधिवेशनामध्ये होतील, असा विश्वासही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

शासनाने आर्थिक शिस्त पाळली – उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार म्हणाले की, विदर्भात होत असलेल्या या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने या सरकारच्या वतीने विदर्भ, मराठवाड्यासह राज्यातल्या इतर प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. विदर्भातील आणि राज्यातील जे प्रश्न सत्तारूढ पक्षातर्फे आणि विरोधी पक्षाच्यातर्फे मांडले जातील त्या सर्व प्रश्नांवर सभागृहामध्ये अतिशय सकारात्मक चर्चा करून ते सर्व प्रश्न सोडवण्याचा राज्य सरकारचा निश्चय आहे. या अधिवेशनात पुरवणी मागण्या मांडण्यात येणार असून याद्वारे सर्वांचे समाधान होईल, याचा प्रयत्न राहणार आहे. विदर्भात शेती प्रश्नावर प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, तूर, धान, संत्रा आणि इतर पिकांबाबत तसेच अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानी संदर्भात चर्चा होईल व न्याय देण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होईल.

केंद्राच्या आर्थिक शिस्तीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यामुळे राज्याची केंद्राकडे आर्थिक पत चांगली आहे. त्यामुळे केंद्र शासनाने ठरविलेल्या निकषानुसार आपण यावर्षी एक लाख वीस हजार कोटीचं कर्ज काढू शकतो. मात्र, आम्ही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली अंदाजे ८० हजार कोटींचे कर्ज काढण्याचे ठरविले आहे. राज्याचा जीएसडीपी 2013-14 ला 16 लाख कोटी होता, तो यावेळी मार्च 2024 पर्यंत सुमारे 38 लाख कोटींपर्यंत वाढणार आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

०००००

 

महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन – 2023 नागपूर

प्रस्तावित विधेयकांची व अध्यादेशांची यादी

सभागृहाच्या पटलावर ठेवावयाचे अध्यादेश       –           03

संयुक्त समितीकडे पाठविलेले विधेयक                        –           07

विधान परिषदेत प्रलंबित                                             –           01

विधानसभेत प्रलंबित                                      –           02

पूर्वीची प्रलंबित विधेयके (एकूण)           –       10

प्रस्तावित विधेयके (मंत्रीमंडळाची मान्यता प्राप्त)           –           09

प्रस्तावित विधेयके  एकूण                  –       09

संयुक्त समितीकडे प्रलंबित

(1) सन 2022 चे विधान सभा विधेयक – महाराष्ट्र लोक आयुक्त विधेयक, 2022 (सामान्य प्रशासन विभाग)

(2) सन 2023 चे विधान सभा विधेयक – महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) व महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नौकरीचे नियमन व कल्याण) (सुधारणा ) विधेयक, 2023 (उद्योग उर्जा व कामगार विभाग)

(3) सन 2023 चे विधान सभा विधेयक – महाराष्ट्र (भेसळयुक्त, अप्रमाणीत किंवा गैर छापाची बियाणे, खते  किंवा  किटकनाशके  यांच्या विक्रीमुळे व वापरामुळे झालेल्या नुकसानीकरिता) शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी विधेयक, 2023.

(4) सन 2023 चे विधान सभा विधेयक- किटकनाशके (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2023

(5) सन 2023 चे विधान सभा विधेयक- बी-बियाणे (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2023

(6) सन 2023 चे विधान सभा विधेयक – अत्यावश्यक वस्तु (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2023

(7) सन 2023 चे विधान सभा विधेयक – महाराष्ट्र झोपडपट्टीगुंड, हातभट्टीवाले, औषधिद्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत (सुधारणा) विधेयक, 2023

विधान परिषदेत प्रलंबित

(1)   सन 2022 चे विधान सभा विधेयक – स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, 2022 (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

विधानसभेत प्रलंबित विधेयके

(1) सन 2023 चे विधान सभा विधेयक -महाराष्ट्र सहकारी संस्था (दूसरी सुधारणा) विधेयक, 2023 (सहकार, वस्त्रद्योग व पणन विभाग)

(2)  सन 2023 चे विधान सभा विधेयक – महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मुलन व पुनर्विकास) (सुधारणा) विधेयक, 2023. (लॉकिंग पिरेड कमी करणे) (गृहनिर्माण विभाग)

प्रस्तावित विधेयके

(1) सन 2023 चे विधानसभा विधेयक – महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (दुसरी सुधारणा) विधेयक, 2023. (वित्त विभाग) (कॅसिनो, घोड्यांची शर्यत व ऑनलाईन खेळ यांच्या करपात्रतेच्या संबंधात स्पष्टता आणण्याकरीता.)

(2) सन 2023 चे विधान सभा विधेयक – महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, 2023 (उच्च व तंत्र शिक्षण विभाग) (सन 2024-25 शैक्षणिक वर्षामध्ये नवीन अभ्यासक्रम सुरु करणे इ. साठीचे वेळापत्रक वाढवण्याकरीता व औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांच्या नाव बदलाने  त्यास अनुसरुन सुधारणा करण्याकरीता)

(3) सन 2023 विधान सभा विधेयक – महाराष्ट्र वेश्म मालकी (सुधारणा) विधेयक, 2023. (गृहनिर्माण विभाग) ( नियोजन प्राधिकरणाने पुनर्विकासाच्या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर, वेश्म मालकांच्या संघटनेने किंवा पुनर्विकासाकरिता जबाबदार असलेल्या विकासकाने, अशा निवासव्यवस्थेऐवजी पर्यायी तात्पुरती निवास व्यवस्था पुरविण्यास किंवा भाडे देण्यास अधीन राहून, वेश्म रिकामा करण्यास वेश्म मालकांना बंधनकारक करण्यासाठी व अशा पुनर्विकासाच्या प्रस्तावाला नियोजन प्राधिकरणाने मान्यता दिल्यानंतर जे वेश्म मालक वेश्म रिकामे करण्यास नकार देतील अशा वेश्म मालकांना त्वरित निष्कासित करण्यासाठी नवीन कलम 6ब समाविष्ट करुन त्यात सुयोग्य सुधारणा करण्यासाठी)

(4) सन 2023 चे विधान परिषद विधेयक – आलार्ड विद्यापीठ विधेयक, 2023 (उच्च व तंत्र शिक्षण विभाग).

(5) सन 2023 चे विधानसभा विधेयक – महाराष्ट्र कॅसिनो (नियंत्रण आणि कर), (निरसन) विधेयक, 2023. (गृह विभाग) (महाराष्ट्र कॅसिनो (नियंत्रण आणि कर) अधिनियम, 1976 याचे निरसन करण्यासाठी) (गृह विभाग).

(6) सन 2023 चे विधानसभा विधेयक – चिट फंड (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2023. (वित्त विभाग) (अधिनियमाच्या कलम 70 खालील अपिलांची सुनावणी करण्यासाठी राज्य शासनाद्वारे अधिसूचित करण्यात येईल अशा अधिकाऱ्याला किंवा प्राधिकरणाला अधिकार प्रदान करण्याकरीता).

(7) सन 2023 चे विधान सभा विधेयक – महाराष्ट्र गोजातीय प्रजनन (विनियमन) विधेयक, 2023 (कृषी व प.दु.म विभाग)

(8) सन 2023 चे विधान सभा विधेयक-   महाराष्ट्र शेतजमीन (जमीनधारणेची कमाल मर्यादा) (सुधारणा) विधेयक, 2023 (महसूल विभाग)

(9) सन 2023 चे विधान सभा विधेयक – महाराष्ट्र (तृतीय पूरवणी), विनियोजन विधेयक, 2023.

00000

ताज्या बातम्या

आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत जेईई – सीईटीची कोचिंग

0
चंद्रपूर, दि. 6 : ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाखाणण्याजोगी असते. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे किंवा संधी उपलब्ध न झाल्यामुळे असे विद्यार्थी स्पर्धेच्या युगात मागे...

पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्याकडून आदिवासी विकास विभागाचा आढावा

0
चंद्रपूर, दि. 6 : पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी शनिवारी, जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाचा आढावा घेतला. तसेच राज्य शासनाने सुरू केलेल्या 100 दिवस प्रशासकीय...

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे प्रयाण

0
मुंबई, दि. ६ : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून विमानाने आज दुपारी २.०० वाजता कोची येथे प्रयाण झाले. यावेळी  अतिरिक्त मुख्य सचिव व...

महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…!

0
ज्ञानेश्वरांच्या ओव्यांपासून, शिवरायांच्या तलवारीपर्यंत, महात्मा फुल्यांच्या साहसापासून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनापर्यंत मुंबई, दि.  : - ‘महाराष्ट्राचा इतिहास गौरवशाली आहे. आणि ती एक जबाबदारी...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विद्यार्थ्यांच्या ‘एआय’ प्रकल्पांचे कौतुक

0
पंढरपूर दि. ६  : पंढरपूर येथील अरिहंत पब्लिक स्कूलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘टेक वारी’ या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच व्हिडिओ...