गुरूवार, ऑगस्ट 21, 2025
Home Blog Page 101

विधानपरिषद प्रश्नोत्तरे

नळगंगा-पैनगंगा नदीजोड प्रकल्पासाठी निधीची कमतरता भासणार नाही – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

मुंबई, दि. ११ : पश्चिम विदर्भासाठी महत्त्वाचा असणारा नळगंगा – पैनगंगा नदीजोड प्रकल्प हा देशातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. यासाठी आताच्या सर्वेक्षणानुसार ८९ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून या माध्यमातून १५ तालुक्यांमधील ३ लाख ७२ हजार हेक्टरहून अधिक जमीन सिंचनाखाली येईल. तीन टप्प्यात पूर्ण होणाऱ्या या प्रकल्पासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य अभिजित वंजारी यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना मंत्री श्री. महाजन बोलत होते. त्यानुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री परिणय फुके, प्रवीण दरेकर, संजय खोडके, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सहभाग घेतला.

मंत्री श्री. महाजन म्हणाले, दुष्काळी भागासाठी महत्त्वाचा ठरणारा नळगंगा- पैनगंगा प्रकल्पासाठी केंद्र शासनही मदत करणार आहे. विदर्भातील निम्न पैनगंगा प्रकल्पाबाबत वर्कआऊट सुरू असून जिगाव, गोसीखुर्द या प्रकल्पांना सुद्धा निधी उपलब्ध करून दिला आहे. वर्धा जिल्ह्यातील बोर आणि धाम प्रकल्पांसाठी प्रशासकीय मान्यता लवकरच देण्यात येईल. तसेच कोकण विभागातील प्रकल्पांनाही गती देण्यात येईल. महामंडळातील आकृतीबंध अंतिम टप्प्यात असून तो अंतिम झाल्यावर रिक्त पदे भरली जातील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

0000

बी.सी.झंवर/विसंअ/

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाळी येथील पॉवर स्टेशनच्या पाईपलाईनमुळे बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे फेर सर्वेक्षण करणार – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

मुंबई, दि. ११ : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाळी येथील पॉवर स्टेशनसाठी धारिवाल कंपनीने पाईपलाईन मंजूर मार्गाने न टाकता शेतजमिनीतून टाकल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याचे आढळून आले आहे. याबदल्यात शेतकऱ्यांना अतिशय कमी मोबदला मिळाल्याप्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत फेर चौकशी करण्याचे निर्देश देण्यात येतील, असे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य सुधाकर आडबाले यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना मंत्री श्री. महाजन बोलत होते. या चर्चेत सदस्य भाई जगताप यांनी सहभाग घेतला.

मंत्री श्री. महाजन म्हणाले, मे. धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीच्या चंद्रपूर जिल्ह्यातील ६०० मेगावॅट क्षमतेच्या विद्युत निर्मिती प्रकल्पाकरिता १८.२७ दलघमी इतक्या पाण्याची वर्धा नदीतून वार्षिक उचल करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. धारिवाल कंपनीने पाईपलाईन मंजूर मार्गाने न टाकता शेतजमिनीतून टाकल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याचे आढळून आल्याने जिल्हाधिकारी चंद्रपूर कार्यालयाकडून चौकशी केल्यानंतर नियमाप्रमाणे पाईपलाईन टाकण्याबाबत तसेच शेतकऱ्यांना नुकसानीचा मोबदला देण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे. तथापि शेतकऱ्यांना देऊ केलेला मोबदला अतिशय कमी दिसून येत असल्याने याचे फेर सर्वेक्षण करण्याबाबत जिल्हाधिकारी यांना आदेश दिले जातील, असेही मंत्री श्री. महाजन यांनी यावेळी सांगितले.

0000

बी.सी.झंवर/विसंअ/

धरण क्षेत्रातील अतिक्रमणे काढण्यासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई, दि. ११ – लघु सिंचन प्रकल्पांमध्ये साचलेला गाळ काढण्यासाठी मृद व जलसंधारण विभागामार्फत ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ ही योजना राबविण्यात येते. याचबरोबर धरण क्षेत्रातील अतिक्रमणे काढण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून याचे ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात येत असल्याची माहिती जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधान परिषदेत दिली.

सदस्य डॉ. मनीषा कायंदे यांनी तलावांच्या स्वच्छतेसाठी निधी उपलब्ध करुन देण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना मंत्री श्री. विखे-पाटील बोलत होते. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य शशिकांत शिंदे यांनी सहभाग घेतला.

मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले, लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेंतर्गत शेतकऱ्यांना गाळ वाहून नेण्यासाठी १५ हजार रुपयांच्या मर्यादेत प्रति घनमीटर ३५.७५ रुपयांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत दिला जातो. गाळ काढण्यासाठी यांत्रिकी विभागाकडील यंत्रसामग्रीचा प्रभावी वापर करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

0000

बी.सी.झंवर/विसंअ/

एमएचटीसीईटी परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकात पाटील

मुंबई, दि. ११ : महाराष्ट्र राज्य उच्च व तांत्रिक सामायिक प्रवेश परीक्षा (एमएचटीसीईटी) सुरळीत पार पडावी, यासाठी राज्यातील पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग महाविद्यालयांना संगणक आणि फर्निचर पुरविण्यात आले आहे. त्यामुळे आता एमएचटीसीईटीच्या परीक्षा पॉलिटेक्निक इंजिनियरिंग महाविद्यालयामध्ये घेतल्या जात आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले.

राज्यात झालेल्या एमएचटीसीईटीच्या परीक्षेत झालेल्या चुकांसंदर्भात सदस्य अभिजीत वंजारी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना मंत्री श्री. पाटील बोलत होते.

मंत्री श्री.पाटील म्हणाले की, यावर्षीची एमएचटीसीईटी परीक्षा २८ सत्रांमध्ये झाली. यातील एकाच केंद्रावरिल इंग्रजी भाषेतील प्रश्नपत्रिकेत २१ प्रकारच्या त्रुटी होत्या. त्यामुळे शासनाने लगेच ५ मे २०२५ परीक्षा घेतली आहे. तथापि, या परीक्षेत झालेल्या त्रुटीसंदर्भात जबाबदार तीन सदस्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. त्यांचा खुलासा असमाधानकारक वाटल्याने त्यांची सेवा एमएचटीसीइटी या सामायिक प्रवेश परीक्षेच्या गोपनीय कामाकरिता खंडित करण्यात आली असल्याचे मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.

एमएचटीसीइटीच्या परीक्षेत चुका होऊ नये यासाठी कुलगुरू डॉ. सुनील भिरुड यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची कमिटी नियुक्त केली आहे. यात प्रश्नसंच तयार करण्याकरिता तज्ज्ञांची नेमणूक करण्याची कार्यपद्धती, प्रश्नसंचानुसार प्रश्नपत्रिका तयार करण्याची कार्यपद्धती, अशी मोठी कार्यकक्षा आहे. त्याचबरोबर यापुढे एमएचटीसीइटीच्या परीक्षा राज्याबाहेर होणार नसल्याचेही मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.

0000

संजय ओरके/विसंअ

आदिवासी भागातील शिक्षकांच्या वेतनात होणाऱ्या विलंबावर सुसूत्रता आणणारशालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

मुंबई, दि. ११ : आदिवासी भागातील शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांना वेतन देण्यात होणाऱ्या विलंबावर राज्य शासन गांभीर्याने विचार करत असून लवकरच यामध्ये सुसूत्रता आणण्यात येईल, अशी माहिती गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, सहकार, खनिकर्म, शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य किरण सरनाईक आणि भाई जगताप यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. भोयर म्हणाले की, आदिवासी भागातील शिक्षकांना वेतन वेळेवर न मिळण्याचे कारण म्हणजे आदिवासी विभागाकडून निधी प्राप्त झाल्यावरच त्या भागातील शाळांचे वेतन देण्यात येते. अनेक वेळा निधीच्या कमतरतेमुळे किंवा उशिरामुळे शिक्षकांना वेळेवर पगार मिळत नाही.

राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले की, यासंदर्भात लवकरात लवकर उपाययोजना करून, शिक्षकांना दर महिन्याच्या पहिल्या तारखेला किंवा किमान पहिल्या आठवड्यात वेतन मिळेल, यासाठी प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या जातील.

000

संजय ओरके/विसंअ

राज्यातील विद्यार्थ्यांना गणवेश वितरणात झालेल्या विलंबाची चौकशी शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

मुंबई, दि .११ : पालघर जिल्ह्यातील 1,60,917 विद्यार्थ्यांपैकी 1,41,258 विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले असून, उर्वरित 19 हजार विद्यार्थ्यांना अजूनही गणवेश मिळालेले नाहीत. या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल आणि दोषींवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, सहकार, खनिकर्म, शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी विधान परिषदेत दिली.

सदस्य भाई जगताप, प्रवीण दरेकर यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना राज्यमंत्री डॉ. भोयर बोलत होते.

मंत्री डॉ.भोयर म्हणाले की, सन 2024-25 मध्ये गणवेश वाटपाची पद्धत वेगळी होती. एका गणवेशासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाला शिवणकामाची जबाबदारी दिली, तर स्काऊट-गाईडचा दुसरा गणवेश शाळा व्यवस्थापन समितीकडे देण्यात आला. त्यामुळे अनेक ठिकाणी उशीर झाला.

शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये सुधारित योजना राबवण्यात येत असून, सर्व शाळांच्या शाळा व्यवस्थापन समित्यांना गणवेशासाठी निधी थेट ट्रान्सफर करण्यात आला आहे. या ठिकाणी समितीच स्थानिक स्तरावर कापड खरेदी करून गणवेश तयार करणार असल्याचे मंत्री डॉ.भोयर यांनी सांगितले.

यासंदर्भात, विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे यांनी अधिवेशन संपायच्या आत बैठक घेऊन संबंधितांवर कार्यवाही करण्याची सूचना राज्यमंत्री डॉ.भोयर यांना दिली.

000000

संजय ओरके/विसंअ/

 

 

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात त्वचाविकार तज्ज्ञ डॉ. रचिता धूरत यांची मुलाखत

मुंबई, दि. 11 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘त्वचाविकार व अधुनिक उपचार पद्धती’ या विषयावर लोकमान्य टिळक महानगरपालिका रुग्णालयातील त्वचाविकार तज्ज्ञ डॉ. रचिता धूरत यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. 15 जुलै 2025 रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिवरून रात्री 8.00 वाजता प्रसारित होणार आहे. तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत फेसबुक, एक्स आणि युट्यूब या समाजमाध्यमांवर देखील पाहता येणार आहे. निवेदक डॉ. मृण्मयी भजक यांनी ही मुलाखत घेतली आहे.

X (Twitter): https://twitter.com/MahaDGIPR

Facebook: https://www.facebook.com/MahaDGIPR

YouTube: https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत वातावरणातील बदल, मानसिक ताणतणाव आणि आहाराच्या चुकीच्या सवयींमुळे त्वचा विकार, केस गळती यांसारख्या समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. यामध्ये त्वचेशी निगडीत आजारांमध्ये अनेक संसर्गजन्य तसेच कर्क रोगांसारखे गंभीर आजारांचा देखील समावेश आहे. ही बाब विचारात घेवून आरोग्य विभागामार्फत नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी विविध माध्यमांतून सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. याअनुषंगाने ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात त्वचाविकार तज्ज्ञ डॉ. धूरत यांनी त्वचाविकारांचे प्रकार, कारणे, प्रतिबंध आणि आधुनिक उपचार पद्धतींबाबत याबाबत सखोल माहिती दिली आहे.

00000

जयश्री कोल्हे/विसंअ

 

 

आसूड गावातील झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनाबाबत शासन सकारात्मक – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई, दि. 11 : पनवेल महापालिकेच्या आसूड गाव परिसरातील झोपडपट्ट्या निष्कासित केलेल्या नागरिकांच्या पुनर्वसनाबाबत तातडीने धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल. तोपर्यंत प्रभावित नागरिकांना जीवनावश्यक सुविधा तत्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले आहेत.

पनवेल महापालिकेच्या आसूड गाव परिसरातील झोपडपट्ट्या हटवल्यानंतर बेघर झालेल्या नागरिकांनी आपल्या मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाची दखल घेत राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले. त्यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्यांना आश्वस्त केले.

राष्ट्रीय बहुजन अधिकार संघटनेचे प्रतिनिधी श्री. राकेश मोहिते, डॉ. योगेंद्र विठ्ठल कोलते, राजकुमार दिनेश नट तसेच आसूड गावातील अनेक झोपडपट्टीधारक यावेळी उपस्थित होते. राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांच्या सकारात्मक हस्तक्षेपामुळे आंदोलनकर्त्यांनी उपोषण मागे घेण्याची घोषणा केली.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

 

ॲपवर आधारित बसेस, कार, बाईक टॅक्सी यांनी नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. ११ : राज्यातील बसेस, कार, बाईक टॅक्सी यांनी ॲप वर आधारित राज्यात व्यवसाय करताना कायदेशीर तत्वांचे पालन करणे आवश्यक आहे. खासगी वाहतूक व्यवसाय करणाऱ्या बसेस, कार, बाईक टॅक्सी यांनी नियमांचे उल्लघंन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

विधानभवन येथे ॲपवर आधारित बसेस, कार, बाईक टॅक्सीच्या विविध विषयासंदर्भातील बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक बोलत होते. यावेळी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यासह परिवहन विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.

परिवहन मंत्री श्री. सरनाईक म्हणाले की, राज्य शासन नेहमीच या क्षेत्रात होणाऱ्या सकारात्मक बदलांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांना पाठबळ देत आले आहे. कोणत्याही ॲपवर आधारित बसेस, कार, बाईक टॅक्सी यांनी कायदेशीर बाबींचे पालन करूनच वाहतूक व्यवसाय केला पाहिजे. राज्य शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर शासन कडक कारवाई करेल. ॲपवर आधारित  बसेस, कार, बाईक टॅक्सी यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन होणे अत्यंत आवश्यक आहे. अर्थात, शासनाने बनविलेले नियम हे प्रवाशांच्या हिताचे असल्यामुळे त्यांच्या हिताचे संरक्षण होणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

0000

संध्या गरवारे/विसंअ

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – पालकमंत्र्यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

चंद्रपूर, दि. 10 : गत काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मोठ्या प्रमाणावर नागरिकांची घरे, शेती पिके व जनावरांची गोठे क्षतिग्रस्त झाली असून जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावे, असे निर्देश पालकमंत्री डॉ. अशोक ऊईके यांनी प्रशासनाला दिले आहे. तत्पुर्वी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्याकडून जिल्ह्यातील पूर परिस्थितीची माहिती पालकमंत्र्यांनी जाणून घेतली.

जिल्हाधिकारी यांच्यासोबत झालेल्या चर्चेनुसार, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात जिल्हा प्रशासन व संबंधित विभागांनी अलर्ट मोडवर राहावे. अतिवृष्टीमुळे घरांचे, शेतातील पिकांचे, जे नुकसान झाले आहे, त्याचे तात्काळ आणि अचूक पंचनामे करण्यात यावेत. जेणेकरून नुकसानग्रस्त नागरिकांना वेळेवर मदत मिळू शकेल.  पूरग्रस्त भागांत सुरक्षितता सुनिश्चित करावी. धोक्याच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना व त्यांच्यासोबतच्या पशुधनाला सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे.

पूर परिस्थितीत उद्भवणाऱ्या बाबींवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा स्तरावर ‘वार रूम’ ची स्थापना करावी. या कक्षामार्फत सतत परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात. जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष 24×7 कार्यरत ठेवून त्यामार्फत मदत व बचाव कार्याचे समन्वय साधावे. पुराच्या संभाव्य धोक्यांबाबत नागरिकांना वेळोवेळी सतर्कतेचे इशारे आणि माहिती देणारी यंत्रणा अखंडीत कार्यरत ठेवावी.

पुढे पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, बचाव कार्यासाठी नौका, जेसीबी, पंपसेट, बचाव पथक यांची तत्परता ठेवण्यात यावी. पूर पस्थितीमुळे प्रभावित नागरिकांसाठी अन्नधान्य, पिण्याचे पाणी व जीवनावश्यक औषधांचा साठा तयार ठेवण्यात यावा. आरोग्य विभागामार्फत आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका सेवा व आरोग्य सुविधा तत्पर ठेवाव्यात. संभाव्य रोगराईचा धोका लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशा सुचना पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.

जिल्हातील पावसामुळे सर्वाधिक फटका ब्रम्हपुरी तालूक्याला बसला असून ब्रम्हपुरी तालुक्यासह चंद्रपूर, गोंडपिपरी, नागभीड व सावली व इतर तालुक्यांमध्येही जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्हा प्रशासनाने वरील सर्व उपाययोजना युद्धपातळीवर अमलात आणाव्यात. तसेच नागरिकांनी देखील स्थानिक प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. उईके यांनी केले.

देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी ‘जनसुरक्षा’ विधेयक महत्त्वाचे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विधेयकावरील चर्चेला मुख्यमंत्र्यांचे उत्तर

मुंबई, दि. १० : महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक विधानसभेत बहुमताने मंजूर करण्यात आले. हे विधेयक देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. संविधान विरोधी माओवादी चळवळ, नक्षलवाद्यांना प्रतिबंध करण्यासाठी हे विधेयक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. हे विधेयक चर्चेअंती सभागृहाने बहुमताने मंजूर केले. या विधेयकावरील चर्चेदरम्यान सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी उत्तर दिले.

जनसुरक्षा विधेयकासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही सभागृहांच्या सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने सुचविलेल्या सूचनांचा अंतर्भाव करीत मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी हे विधेयक विधानसभेत मांडले.

नागरिकांना सुरक्षित वातावरण निर्माण करून देण्यासाठी कायदा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारतातील नक्षलप्रभावीत राज्य असलेल्या आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड या राज्यामध्ये आधीच असा कायदा अस्तित्वात आहे. मात्र महाराष्ट्रात अजूनही अशा प्रकारचा कोणताही कायदा नव्हता. त्यामुळे नक्षलवादी, माओवादी आणि अंतर्गत सुरक्षेला धोका पोहोचवणाऱ्या संघटना आणि व्यक्ती यांच्यावर कारवाई करताना पोलिसांना केंद्राच्या कायद्याचा आधार घ्यावा लागत होता. जनसुरक्षा कायदा हा अजामीनपात्र आणि प्रतिबंधात्मक कायदा आहे. या कायद्यामुळे कोणाच्याही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येणार नाही. नागरिकांना सुरक्षित वातावरण निर्माण करून देण्यासाठीच हा कायदा करण्यात येत आहे.

जनसुरक्षा कायदा प्रामुख्याने अंतर्गत सुरक्षेशी संबंधित असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या कायद्याचा मुख्य उद्देश नक्षलवादी, माओवादी आणि अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या संघटना आणि व्यक्तींवर कारवाई करणे आहे. केंद्रीय कायद्याअंतर्गत कारवाई करताना अनेक वेळा प्रशासकीय अडचणी आणि पूर्वपरवानगीचे अडथळे येतात. महाराष्ट्रात स्वतःचा स्वतंत्र कायदा बनवण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. या कायद्यामुळे नक्षली चळवळींना मोठा हादरा बसणार आहे. या कायद्यांतर्गत सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या संघटनेशी संबंधित व्यक्ती, नक्षलवादी आणि माओवादी संघटनांवर कारवाई केली जाणार आहे, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

0000

नीलेश तायडे/विसंअ/

ऊसतोड महिला कामगारांच्या समस्यांवर ठोस उपाययोजना कराव्यात – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई, दि. १० : ऊसतोड महिला कामगारांच्या आरोग्य, सुरक्षा आणि सामाजिक संरक्षणाच्या समस्या तातडीने मार्गी लावाव्यात, असे निर्देश विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.

विधानभवन येथे झालेल्या बैठकीस आरोग्य संचालक डॉ. विजय कंदेवाड, अतिरिक्त संचालक डॉ. संदीप सांगळे, बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. ए. बी. राऊत, सहसंचालक पुणे, डॉ. दिगंबर कानगुळे, लातूरचे आरोग्य उपसंचालक, डॉ. भोसले, बीडचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ आणि माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. सचिन रोकडे यांच्यासह कामगार विभागाच्या कक्ष अधिकारी श्रीमती दीपाली जपे उपस्थित होत्या. साखर आयुक्त दीपक रावते हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

ऊसतोड कामगारांसाठी स्वतंत्र कायद्याच्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा झाली.

बैठकीत ऊसतोडणी कामगार महिलांचे आरोग्य, विशेषतः गर्भाशय काढण्याच्या वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियेसंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक यांची पूर्वपरवानगी बंधनकारक आहे,” असे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात आरोग्यविषयक डेटा संकलन, तपासणी प्रक्रिया आणि जनजागृती वाढवणे अत्यावश्यक आहे.

डॉ. विजय कंदेवाड म्हणाले, सर्वेक्षणात गर्भवती मातांची तपासणी, बालकांचे लसीकरण आणि आवश्यक असल्यास खासगी रुग्णालयात उपचार हे सर्व समाविष्ट केले जात आहेत. गर्भाशय काढण्याच्या घटनांवर अधिक लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र माहिती गोळा केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राने रोजगार हमी कायदा व माहिती अधिकार कायद्यासारख्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये नेतृत्व केले असून, ऊसतोड मजुरांच्या प्रश्नातही अशीच सकारात्मक दिशा आवश्यक आहे. “सर्व विभागांनी एकत्र येऊन यासंदर्भातील कार्यवाहीला गती द्यावी,” असे आवाहन त्यांनी केले.

 

000000

मोहिनी राणे/ससं/

प्रत्येक शाळेत मराठी शिकविणे बंधनकारक – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. १० – शाळा अनुदानित असो वा विनाअनुदानित, सरकारी असो वा खासगी तेथे मराठी विषय शिकवलाच गेला पाहिजे. प्रत्येक शाळेत मराठी भाषा बंधनकारक आहे. प्रत्येक शाळेत त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. शाळा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक झाली. बैठकीत बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंग देओल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उप आयुक्त (शिक्षण) डॉ. (श्रीमती) प्राची जांभेकर, शिक्षण उपसंचालक राजेश कंकाळ आदींसह शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते.

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे म्हणाले, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये (सीबीएसई) राज्यभाषा मराठी शिकविणे अनिवार्य आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास शिकविणे देखील बंधनकारक आहे. सर्व शिक्षकांनी याकडे लक्ष द्यावे. तसेच प्रत्येक शाळेत राष्ट्रगीतानंतर राज्यगीत ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे म्हटले गेले पाहिजे. यासोबतच मराठी भाषा, अभिजात भाषा दर्जाबाबतही प्रत्येक शाळेत विविध उपक्रम राबविण्यात यावेत. विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच वृक्षारोपणाचे महत्त्व कळावे यासाठी शाळांमध्ये ‘एक पेड माँ के नाम’ हा उपक्रम सुरू करण्यात यावा. यासाठी प्रत्येक झाडाला क्यूआर कोड देऊन, झाडांचा वाढदिवस देखील साजरा करावा. अधिकाऱ्यांपासून विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्येकाला एका झाडाच्या संगोपनाची जाबाबदारी देण्यात यावी, जेणेकरून विद्यार्थी त्या झाडाची काळजी घेतील.

श्री. भुसे म्हणाले, पुढील वर्षांपासून इयत्ता चौथी आणि सातवीचे विद्यार्थी देखील शिष्यवृत्ती परीक्षेला बसू शकतील. शाळांमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी सामाजिक संस्थांची मदत घ्यावी. शाळांमधील शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी विविध शासकीय योजनांद्वारे पायाभूत सुविधांचा विकास करावा. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शाळा दत्तक घ्याव्यात. काही शाळांबाहेरील पानटपऱ्यांवर कारवाई करावी. यासोबतच आधार, अपार आयडी पडताळणी, निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम आदी विषयांचाही श्री. भुसे यांना आढावा घेतला.

चर्नी रोड येथे बालभवन प्रकल्पाचे नूतनीकरण अंतिम टप्प्यात आहे. वेळापत्रक तयार करून विद्यार्थ्यांना बालभवन येथे शैक्षणिक सहलीसाठी आणावे. त्यांच्यातील कलागुणांना यामुळे वाव मिळू शकतो. सोबतच कलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना या बालभवनचा नक्कीच फायदा होईल, असा विश्वास श्री. भुसे यांनी व्यक्त केला.

विद्यार्थ्यांचे अपार, आधार पडताळणी करण्यावर भर द्यावा. विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीवर लक्ष केंद्रीत करा. पीएमश्री शाळा उपक्रमात सहभागी व्हा, महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत वाढ करण्यासाठी उपाययोजना आखा, आयडॉल शिक्षक बँक तयार करा, या आयडॉल शिक्षकांचा इतर शाळांमधील शालेय उपक्रमात सहभाग वाढवा आदी सूचना श्री. भुसे यांनी केल्या.

शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर वाढला असला तरी विद्यार्थ्यांची मातीशी असलेली नाळ तुटणार नाही यावरही आपल्याला लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच शाळांमध्ये दरवर्षी स्नेहसंमेलने, क्रीडा स्पर्धा आयोजित करा. आठवीनंतरच्या विद्यार्थिनींसाठी शाळांमध्ये पिंक रुम तयार करा, यापुढे मुलांना शालेय जीवनापासूनच सैनिकी प्रशिक्षण देण्याबाबत विचार सुरू असून, लवकरच त्यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल. शिक्षक समायोजनाबाबत आठ दिवसात अहवाल सादर करून शिक्षकांचे समायोजन करा, अशा सूचनाही भुसे यांनी केल्या.

उप आयुक्त (शिक्षण) डॉ. (श्रीमती) प्राची जांभेकर यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका राबवित असलेल्या शैक्षणिक उपक्रम, अभ्यासपद्धतींची माहिती दिली.

0000

बी.सी.झंवर/विसंअ/

मावळच्या मंगरूळमधील अवैधरित्या वृक्षतोड व उत्खननप्रकरणी अहवाल सादर करावा – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

मुंबई, दि. १० : मावळ तालुक्यातील मंगरूळ मध्ये अवैधरित्या वृक्षतोड व उत्खनन प्रकरणी संबंधित विभागांनी लवकरात लवकर अहवाल सादर करावा, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.

मावळ मतदारसंघातील मौजे मंगरूळ येथील गट क्रमांक ३५ ते ३८ आणि ४१ ते ४९ या वनक्षेत्र आरक्षित भागात झाडांची अवैध वृक्षतोड करून माती, मुरूम व डबराचे उत्खनन झाल्याची तक्रार आली होती. यासंदर्भात आमदार सुनिल शेळके यांनी मार्च २०२५ च्या विधिमंडळाच्या अधिवेशनात लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला होता.

त्याअनुषंगाने विधानभवनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मावळ तालुक्याचे आमदार सुनिल शेळके, मावळ तालुक्याचे उप विभागीय अधिकारी सुरेंद्र नवले, मावळ तहसीलदार विक्रम देशमुख यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

विधानसभा उपाध्यक्ष श्री. बनसोडे म्हणाले की, वनसंवर्धन आणि पर्यावरणाच्या दृष्टीने ही बाब महत्वाची असून या प्रकरणाचा अहवाल तत्काळ द्यावा. तसेच मावळ मतदारसंघातील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील जागांवर विकासकांच्या मनमानी कारभाराची चौकशी करावी.  मावळ तालुक्यात खासगी कंपन्यांतील सांडपाण्याची विल्हेवाट योग्य मार्गाने होत असल्याचबाबतची खातरजमा करून त्याचा अहवाल सादर करावा.

मावळ तालुक्यात अलिकडे मोठ्या प्रमाणावर बांधकाम प्रकल्प उभारले जात असून, अनेक बिल्डरनी सदनिका बांधून विक्री केली आहे. मात्र, या गृहप्रकल्पांमधील नागरिकांना बोअरिंगच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत आहे. नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. काही भागांमध्ये दूषीत पाण्यामुळे पोटदुखी, त्वचेचे आजार व इतर आरोग्यविषयक तक्रारी वाढल्याचे निदर्शनास आले आहे, याबाबतही चौकशी करून अहवाल सादर करावा, अशा सूचना उपाध्यक्ष श्री. बनसोडे यांनी दिल्या.

0000

मोहिनी राणे/ससं/

पुणे, खडकी, औरंगाबाद, देवळाली, अहमदनगर, कामटी कटकमंडळांचे महापालिकांमध्ये विलिनीकरण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 10 : पुणे, खडकी कटकमंडळ पुणे महापालिकेमध्ये, औरंगाबाद  कटकमंडळ छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये देवळाली व अहमदनगर कटकमंडळ स्वतंत्र नगरपालिकामध्ये कामठी कटकमंडळ येरखेडा नगरपंचायतमध्ये समाविष्ट  होणार आहेत. या कटकमंडळाचा महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थात समावेश झाल्याने त्या भागात नागरीसुविधा तसेच इतर विकास होण्यास मदत होणार असल्याचे मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांनी सांगितले.

विधानभवन येथे राज्यातील कटक मंडळांचे नगरपालिका, महापालिका क्षेत्रात विलिनीकरणाबाबत बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, विधान परिषद सदस्य सिद्धार्थ शिरोळे, सरोज अहिरे, संग्राम जगताप, सुनिल कांबळे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव के.एच.गोविंदराज, मुख्यमंत्री यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, व्ही सी द्वारे  केंद्रीय संरक्षण मंत्रालयाचे सहसचिव, जिल्हाधिकारी पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, छत्रपती संभाजीगर, अहिल्यानगर, पुणे दक्षिण कमांडचे संचालक संबंधित महानगरपालिकांचे आयुक्त, नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त तथा संचालक संबंधित नगर परिषदांचे मुख्याधिकारी, पुणे, खडकी, देवळाली, छत्रपती संभाजीनगर, कामठी, अहमदनगर, देहू रोड कटक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित  होते.

मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस म्हणाले की, गेली अनेक वर्षे कटकमंडळ परिसरातील विकास कामांसाठी स्थानिक ठिकाणांहून मागणी होत असल्यामुळे केंद्र शासनाने नागरी भाग शेजारच्या महापालिका, नगरपालिकांमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात पुणे, खडकी, देवळाली, छत्रपती संभाजी नगर, कामठी, अहिल्यानगर, देहू रोड येथे छावणी क्षेत्र आहे. प्रत्येक छावणीसाठी स्वतंत्र परिस्थिती लक्षात घेऊन काही ठिकाणी थेट महापालिकेत समावेश करणे व काही ठिकाणी नवीन नगरपालिका स्थापन करावी लागणार आहे. या कटकमंडळातील कर, वीज, पाणी आर्थिक प्रकरणे, कर्मचारी यांचे हस्तांतरण ही सर्व प्रकरण केंद्र शासनाच्या संरक्षण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे करण्यात यावे. या कटकमंडळाचा महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थात समावेश झाल्याने नागरीसुविधा तसेच इतर विकास होण्यास मदत होणार आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

‘जिल्हा नियोजन’ मधून कटकमंडळ क्षेत्राच्या विकासासाठी निधी देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पुणे, खडकी, देवळाली, औरंगाबाद, कामठी, अहमदनगर या कटकमंडळांचा संबंधित महापालिका आणि नगरपंचायतींमध्ये समावेश झाल्याने जिल्हा नियोजन समितीमधून या परिसराचा विकास करण्यासाठी शासनाकडून मदत करण्यात येईल. संबधित समाविष्ट नगरपालिका आणि महानगरपालिकांनी त्यासाठी प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे सादर करावेत अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

*******

संध्या गरवारे/विसंअ/

ताज्या बातम्या

जीआय नामांकन प्राप्त पिकांच्या पॅकेजींग व ब्रँडींगसाठी मदत करण्यास शासन सकारात्मक फलोत्पादन मंत्री –...

0
पुणे दि.२१ : राज्यामध्ये उत्पादित होत असलेल्या फळ पिकाची निर्यात वाढविण्यासाठी फळ पिकाचे क्लस्टर वाढवावेत तसेच जीआय नामांकन प्राप्त पिकांच्या पॅकेजींग व ब्रँडींगसाठी मदत...

पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडून पूरग्रस्तांसाठी तातडीने मदत साहित्य उपलब्ध

0
नांदेड दि. २१ ऑगस्ट : जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी तातडीने औषधे व जीवनोपयोगी साहित्य उपलब्ध करून दिले आहे. शासनासह विविध...

मुख्यमंत्री सहायता निधीमुळे दुर्धर आजारांवर झाला उपचार

0
आता जिल्ह्यातच मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष यवतमाळ, दि.२१ (जिमाका) : मुख्यमंत्री सहायता निधी अनेक रुग्णांसाठी आधार ठरला आहे. जिल्ह्यात योजनेचा कक्ष सुरु झाल्यापासून हा निधी...

महानगरपालिकेच्या आरोग्य वर्धिनी केंद्राची विभागीय आयुक्तांकडून पाहणी

0
अमरावती, (दि. २१ ऑगस्ट) : विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी आज महानगरपालिकेच्या रहाटगाव येथील आरोग्य वर्धिनी केंद्राला भेट देऊन तेथील आरोग्य सेवा-सुविधांचा सखोल आढावा...

जिल्ह्यात औद्योगिक विकासासाठी सदैव कटिबद्ध – मंत्री छगन भुजबळ

0
नाशिक, दि. २१ ऑगस्ट, (जिमाका वृत्तसेवा): नाशिक जिल्ह्यात नवीन मोठ्या उद्योगांसह मोठे प्रकल्प येण्यासाठी  पोषक वातावरण असून औद्योगिक विकासासाठी सदैव सकारात्मक व कटिबद्ध आहे,...