रविवार, जुलै 6, 2025
Home Blog Page 1009

विधानसभा प्रश्नोत्तरे :

निवासी आश्रमशाळांमधील २८२ पदे भरण्याची प्रक्रिया सुरू -इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे

नागपूर, दि. 8 : राज्यात इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत एकूण 977 खासगी अनुदानित आश्रमशाळा चालविण्यात येतात. या आश्रमशाळांना शालेय पोषण, इमारत भाडे आणि वेतन अशा तीन भागात अनुदान देण्यात येत आहे. यावर्षी 225 कोटी रुपयांच्या तरतुदीपैकी आतापर्यंत 180 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. या आश्रमशाळांमध्ये एकूण 2 लाख 23 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळांमध्ये विज्ञान आणि गणित विषय शिकविण्यासाठी 282 पदे भरण्यास मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली असून पदभरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

सदस्य विकास ठाकरे यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता.

या अनुषंगाने विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी रिक्त पदे भरण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाबाबत मंत्री श्री. सावे म्हणाले की, सर्व आश्रमशाळांमधील रिक्त पदे त्वरीत भरण्यात येतील. येत्या जानेवारी पर्यंत राज्यात 52 वसतिगृहे सुरू करण्यात येणार असून मोठ्या शहरात भाडे अधिक असल्याने ते वाढवून मिळण्यास शासनाकडे मागणी करण्यात आली आहे. ती मान्य झाल्यानंतर या शहरांमध्ये देखील उर्वरित शाळा सुरू करण्यात येतील. विद्यार्थ्यांसाठी आधार योजनेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून 600 विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. परदेशी शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची संख्या आता 50 वरून 75 इतकी वाढविण्यात आली असल्याचे सांगून आतापर्यंत सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.

सदस्य बाळासाहेब थोरात यांनीही या अनुषंगाने चर्चेत सहभाग घेतला.

 

००००

महाराष्ट्र विधानपरिषदेची कामगिरी पुढील पिढीसाठी मार्गदर्शक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर, दि. 8 :  महाराष्ट्र विधानपरिषदेचे कामकाज पुढील पिढीला मार्गदर्शक ठरणारे आहे. परिषदेतील चर्चा या देशाला नेहमीच मार्गदर्शक ठरल्या आहेत. या सकारात्मक चर्चांच्या माध्यमातून राज्याच्या विकासाला चालना देऊया, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

विधानपरिषद सभागृहात महाराष्ट्र विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त ‘महाराष्ट्र विधिमंडळ संसदीय वाटचालीत हिवाळी अधिवेशनाचे योगदान’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, राजेंद्र गवई यांच्यासह विधानपरिषद सदस्य, ज्येष्ठ पत्रकार उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, परिषद सभागृहामध्ये विचार मांडण्याची मुभा असते. जनतेला न्याय देणे, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण सभागृहात येतो. महाराष्ट्र सर्व क्षेत्रासोबतच  संसदीय कार्यप्रणालीमध्येही अग्रेसर आहे. ऐतिहासिक वास्तूमध्ये होत असलेला आजचा हा शतक महोत्सवी कार्यक्रमही ऐतिहासिकच ठरणार आहे. राज्याची संसदीय परंपरा ही वैभवशाली असून जगाने गौरवलेली आहे. या परंपरेमध्ये नागपूरचे हिवाळी अधिवेशन हे संसदीय परंपरा समृद्ध करणारे असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

या अधिवेशनाच्या माध्यमातून जनतेला न्याय देण्याचे, त्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम करायचे आहे. या अधिवेशनाच्या माध्यमातून राज्याच्या विकासाची बेरीज करुया. विदर्भातील जनतेला या अधिवेशाकडून अनेक अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी सर्वांनी काम करूया. सर्वांनीच हे अधिवेशन गांभीर्याने घ्यावे. या अधिवेशनाच्या माध्यमातून विदर्भातील सर्वसामान्यांना न्याय मिळावा ही आमची भावना आहे. विदर्भाला जोडणारे माध्यम हीच या अधिवेशनाची मोठी उपलब्धता असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, राज्याला महर्षी कर्वे, महात्मा जोतिराव फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची समाजप्रबोधनाची मोठी परंपरा लाभलेली आहे. त्यांच्या योगदानामुळेच राज्यात शिक्षण चळवळ यशस्वी झाली आहे. समाजप्रबोधनाची ही परंपरा जपण्याचे काम विधान परिषदेच्या माध्यमातून होत आहे. विधान परिषदेच्या आजपर्यंतच्या वाटचालीविषयी लवकरच पुस्तकही प्रकाशित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी विधान परिषदेच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला.

विधानपरिषदेचे महत्व सांगताना विरोधी पक्षनेते श्री. वडेट्टीवार म्हणाले की, परिषदेमुळे शिक्षक, पदवीधर, लेखक, कवी, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, खेळाडूंना प्रतिनिधित्व मिळाले आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते श्री. दानवे यांनी चर्चासत्राच्या कार्यक्रमास शुभेच्छा देताना या अधिवेशनाचे सर्वांनाच कुतुहल असल्याचे सांगितले.

चर्चासत्रामध्ये नागपूरमधील ज्येष्ठ पत्रकारांनी तसेच विधानपरिषद सदस्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमावेळी ज्येष्ठ पत्रकार व सदस्यांना मुख्यमंत्री श्री शिंदे व उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

0000

दूध, संत्रा, कापूस, ऊस, कांदाउत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सभागृहात चर्चेतून मार्ग काढण्याची सरकारची तयारी

  •   कांदानिर्यात, ऊसापासून इथेनॉलनिर्मितीवरील बंदी उठवण्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह, पियुष गोयल यांची भेट घेऊन मार्ग काढणार
  • दूधउत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मंगळवारपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
  • अवकाळी पाऊस, मराठा आरक्षणासह सर्व मुद्यांवर  सभागृहात चर्चा करुन तोडगा काढण्याचा प्रयत्न –  उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभागृहात घोषणा

नागपूर, दि. ८ : अवकाळी पाऊस, दुध, संत्रा, कापूस, ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या, कांदानिर्यातीवरील बंदी, ऊसापासून इथेनॉलनिर्मितीवरील बंदी, मराठा आरक्षण यासारख्या सर्व महत्त्वाच्या मुद्यांवर सभागृहात चर्चा करुन त्यातून सर्वसहमतीने मार्ग काढण्याची सरकारची तयारी आहे, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिले. कांदानिर्यात आणि इथेनॉलनिर्मिती प्रश्नांवर गरज पडल्यास केंद्रीय मंत्री अमित शाह आणि पियुष गोयल यांची भेट घेऊन मार्ग काढण्यात येईल. दुधउत्पादकप्रश्नी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन  शेतकऱ्यांना दिलासा देण्यात येईल, असेही  उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी स्पष्ट केले.

विधानसभेत विरोधी पक्षांकडून मांडलेला स्थगन प्रस्ताव फेटाळल्यानंतर सदस्यांना आश्वासित करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा असून त्यावर तोडगा काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. अवकाळी पाऊस, दुध, संत्रा, कापूस, ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री यांच्याशी चर्चा झाली असून सर्व शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असा निर्णय घेण्यात येईल. ऊसापासून इथेनॉलनिर्मितीवरील बंदीमुळे ऊसउत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांसमोरच्या अडचणी वाढणार आहेत. याबाबत केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह, केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही याप्रश्नी लक्ष घालून यातून मार्ग काढण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. येत्या शनिवारी किंवा रविवारी केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांच्याशी चर्चा करुन मार्ग काढण्यात येईल. गरज पडल्यास पुढील आठवड्याच्या सुरुवातीला, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह दिल्लीला जावून केंद्रीय मंत्री श्री. शाह आणि श्री. गोयल यांची भेट घेऊन यातून निश्चितपणे मार्ग काढला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली.

दूधउत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आर्थिक तरतुदीची गरज लागणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल. मुख्यमंत्र्यांना वेळेअभावी बैठक घेणे शक्य नसल्यास, मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने आपण स्वत: दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह येत्या मंगळवारी बैठक घेऊन दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढू, असा विश्वासही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सभागृहाला दिला.

०००

संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि. ८ : संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव रोहिणी पाटील यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

आज मंत्रालयात संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून वंदन केले.

000

शैलजा पाटील/वि.स.अ 

संत संताजी जगनाडे महाराज यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिवादन

नागपूर, दि.८ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नागपूर येथील रामगिरी या शासकीय निवासस्थानी संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

राज्यपाल रमेश बैस यांचे तीन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आगमन

नागपूर, दि. 7 : राज्यपाल रमेश बैस यांचे गुरुवारी रात्री साडेआठ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर आगमन झाले. १० डिसेंबरपर्यंत ते विदर्भ दौऱ्यावर आहेत.

आज विमानतळावर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. छेरिंग दोरजे, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आदी उपस्थित होते.

राज्यपाल रमेश बैस यांचा गुरुवारी रात्री राजभवन येथे मुक्काम असून उद्या सकाळी 9.40 वाजता राजभवन येथून भंडाराकडे प्रयाण करतील. त्यानंतर भंडारा जिल्ह्यातील संरक्षण सेवा अकादमी, शहापूर येथे होणाऱ्या ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ कार्यक्रमास उपस्थित राहतील. उद्या भंडारा जिल्हयात त्यांचे विविध कार्यक्रम आहेत.

शनिवारी त्यांचा अमरावती व वर्धा दौरा आहे.  तर रविवारी ते गडचिरोली जिल्हयाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. रविवारी रात्री ते मुंबईकडे प्रयाण करतील.

शिर्डी लोकसभा मतदारसंघासह नाशिक व मराठवाड्याला घाटमाथ्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे – खासदार सदाशिवराव लोखंडे यांची मागणी

नवी दिल्ली, ०७ : शिर्डी लोकसभा मतदारसंघातील पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी घाटमाथ्याचे पाणी शेतक-यांना उपलब्ध व्हावे, तसेच अहमदनगर (शिर्डी), नाशिक व मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांना ११५ टीएमसी पाणी उपलब्ध होण्याची मागणी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी लोकसभेच्या शीतकालीन सत्राच्या शून्यप्रहरात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.

 सह्याद्री पर्वतरांगातून समुद्राकडे वाहून जाणारे घाटमाथ्यातील पाणी अडवल्यास ११५ टीएमसी पाणी उपलब्ध होऊ शकते. यापैकी १५ टीएमसी पाणी मुळा, गोदावरी व प्रवरा नद्यांवर कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे बांधून या पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी केला जाऊ शकतो. तसेच उर्वरित ५ टीएमसी पाणी अकोले, संगमनेर, कोपरगाव व श्रीरामपूर या चार तालुक्यातील वंचित शेतकऱ्यांना उपलब्ध होईल. असे एकूण २० टीएमसी पाणी शिर्डी मतदारसंघात उपलब्ध होऊ शकेल व पाण्याची समस्या सुटण्यास मदत होईल. यासोबतच नाशिकसाठी १० टीएमसी व उर्वरित ८५ टीएमसी पाणीसाठा मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांसाठी उपलब्ध होण्याबाबतची मागणी श्री.लोखंडे यांनी लोकसभा अध्यक्षांमार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. तसेच यासाठी राज्य शासनाकडून याबाबत सविस्तर प्रस्ताव मागवून व त्यास केंद्रसरकारने मंजूरी देण्याबाबतची विनंतीही केली.

०००

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ : नाचणीचे आहे आहारात महत्व!

यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. यंदाच्या वर्षातील प्रत्येक महिना एका तृणधान्यासाठी समर्पित केला आहे. डिसेंबर महिना नाचणी या तृणधान्यासाठी समर्पित केला आहे. आरोग्यदृष्ट्याही नाचणी या तृणधान्याला महत्त्च आहे.

मानवी आहारात वापरल्या जाणाऱ्या तृणधान्य पिकामध्ये भात व गहू या प्रमुख धान्याचा समावेश होतो. इतर भरड धान्य पिकांमध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, राळा, कोडो, कुटकी, बरटी व वरई या पिकांचा समावेश होतो. राज्यात ज्वारी, बाजरी, नाचणी आणि वरई या पिकांची लागवड केली जाते. साधारणपणे 20 व्या शतकाच्या पूर्वार्धात आणि पारंपरिक दृष्ट्या या पिकांची लागवड आणि उत्पादन आपल्या देशात घेतले जात होते आणि आपल्या दैनंदिन आहार पद्धतीत या धान्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत होता. कालांतराने भात आणि गहू या पिकांचे अधिक उत्पादन आणि उपलब्धता वाढल्याने व आहार पद्धतीत झालेल्या बदलामुळे आजच्या काळात या भरडधान्य पिकांखालील क्षेत्र कमी होत आहे.

राज्यात या खरीप हंगामात लागवड केल्या जाणाऱ्या अन्नधान्य पिकांपैकी नाचणी महत्वाचे तृणधान्य पीक आहे. नाचणी/नागली (Finger millet) हे गवतवर्गीय कुळातील पीक असून याचे शास्त्रीय नाव (इलुसिन कोराकाना) Eleusine coracana असे आहे.

नाचणी पिकाची वाढ व सामान्य माहिती:

नाचणी हे गवतवर्गीय कुळातील (Poaceae) महत्वाचे पीक आहे. त्यामुळे या पिकाची वाढ होताना मुख्य खोडासोबत फुटवे येण्याचा गुणधर्म  आहे. या धान्याचा आकार लहान असून आकार हे एकदलवर्गीय पीक आहे. या पिकामध्ये स्वपरागीभवन प्रक्रियेदवारे बीज निर्मिती होते. सर्वच भरड धान्य पीके ही बदलत्या हवामानास अनुकूल पिके आहेत. या पिकांमध्ये सी4 पद्धतीने प्रकाश संश्लेषण (मका, ऊस, ज्वारी) होते. त्यामुळे पानाद्वारे अन्ननिर्मिती करताना प्रकाश, पाणी व कार्बन डायऑक्साइडचा सुयोग्य वापर या वनस्पतीमध्ये केला जातो. तसेच प्रतिकूल परिस्थितीत वाढीची उत्कृष्ठ वैशिष्ट्ये जसे की, कमी ऊंची, पानांचा लहान आकार, कणिस व पाने यामध्ये अन्नपदार्थ पुरविण्यासाठी योग्य पद्धत, तंतूमय मुळांची खोल वाढ व प्रतिकूल परिस्थितीत तग धरण्याचा गुणधर्म यामुळे या पिकांचे शेतकऱ्यांच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्व आहे.

नाचणी पिकाच्या कणसातील विविधता:

नाचणीच्या कणसामध्ये मोठ्या प्रमाणात विविधता आढळते. हाताच्या बोटाप्रमाणे असलेल्या अनेक पाकळ्यांचे नाचणीचे कणीस तयार होते. प्रत्येक पाकळीमध्ये समांतर पद्धतीने फुले येतात. त्यापासून धान्य निर्मिती होते. फुलांच्या एका गुच्छामध्ये असलेली लहान आकाराची फुले पहाटेच्या वेळी उमलतात, त्यामुळे प्रामुख्याने फक्त स्वपरागीभवन पद्धतीने बीज निर्मिती होते.

विविध स्थानिक भागात कणसामध्ये पाकळ्यांच्या रचनेनुसार विविधता आढळते. त्यामध्ये प्रामुख्याने बंद कणीस, थोडे उघडलेले, अर्धवट उघडे, पूर्ण उघडे असे प्रकार आढळतात. नाचणीच्या धान्याचा रंग हा प्रामुख्याने लालसर तपकिरी असतो. काही प्रमाणात पांढऱ्या रंगाच्या नाचणी वाणांची देखील लागवड केली जाते.

नाचणी: पौष्टिक गुणधर्म : अ) प्रथिने व खनिज पदार्थ:

नाचणी व तत्सम तृणधान्य वर्गातील पिकांमध्ये पुढील प्रमाणे पौष्टिक तत्वे असतात. त्यात मानवी आहाराच्या दृष्टीने नाचणी हे एक अत्यंत महत्वाचे पौष्टिक तृणधान्य आहे. नाचणीमध्ये कॅल्शियम (364 मि.ग्रॅ./100 ग्रॅम) या खनिजाचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे भात आणि गहू धान्याच्या तुलनते 10 पटीने अधिक आहे. त्याचबरोबर मॅग्नेशियम (१४६ मि.ग्रॅ./१०० ग्रॅम) व लोह (४.६२ मि.ग्रॅ./१०० ग्रॅम) या खनिजाचे प्रमाण भात आणि गहू या धान्यापेक्षा अधिक आहे.

ब) जीवनसत्वे:

या पिकाचे आणखी वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म म्हणजे या पिकांमध्ये मुबलक असलेले जीवनसत्वाचे प्रमाण. नाचणी धान्यामध्ये जीवनसत्व थायमिन बी-१ (०.३७ मि.ग्रॅ./१०० ग्रॅम), रायबोफ्लेवीन बी-२ (०.१७ मि.ग्रॅ./१०० ग्रॅम) व फॉलिक असिड (३४.६६ µ.ग्रॅ./१०० ग्रॅम) याचे प्रमाण भात आणि गव्हापेक्षा पेक्षा जास्त आहे.

आहारातील महत्व: नाचणी- Finger millet (शास्त्रीय नाव: Eleusine coracana):

नाचणी हे एक पौष्टिक आणि आरोग्यदायी धान्य आहे. त्याचे काही पौष्टिक आणि आरोग्यदायी फायदे आहेत: पोषक तत्वांनी समृद्ध: नाचणी हे कार्बोहायड्रेट्स, आहारातील तंतूमय पदार्थ, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजांसह आवश्यक पोषक तत्वांचा एक चांगला स्रोत आहे. त्यात कॅल्शियम, लोह आणि फॉस्फरसचे प्रमाण विशेषतः जास्त असते. आहारातील तंतूमय पदार्थाचे उच्च प्रमाण: हे आहारातील तंतूमय पदार्थांचा उत्कृष्ट स्त्रोत आहे, जे पाचन आरोग्यासाठी महत्वाचे आहे. तंतूमय पदार्थामुळे बद्धकोष्ठता टाळण्यास मदत करते, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल डिसऑर्डरचा धोका कमी करते आणि पोट भरून ठेवते. वजन व्यवस्थापन मदत करते. ग्लूटेन-मुक्त: नाचणी नैसर्गिकरित्या ग्लूटेन-मुक्त आहे, ज्यामुळे सेलिआक रोग किंवा ग्लूटेन संवेदनशीलता असलेल्या व्यक्तींसाठी एक आदर्श पर्याय बनतो.

अँटिऑक्सिडंट्समध्ये समृद्ध: यामध्ये फिनोलिक संयुगे आणि फ्लेव्होनॉइड्ससह विविध प्रकारचे अँटिऑक्सिडंट असतात, जे शरीराला ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करण्यास आणि जुनाट आजारांचा धोका कमी करण्यास मदत करतात. रक्तातील साखर संतुलित करते: नाचणीचा ग्लायसेमिक निर्देशांक कमी असतो. याचा अर्थ रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढू शकत नाही. हे मधुमेह असलेल्या लोकांसाठी किंवा रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेऊ पाहणाऱ्यांसाठी एक चांगली निवड बनवते. हृदयाचे आरोग्य: धान्यामध्ये तंतूमय पदार्थ, अँटिऑक्सिडंट्स आणि फायटोकेमिकल्स असल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करून आणि हृदयविकाराचा धोका कमी करून हृदयाच्या आरोग्यासाठी योगदान देऊ शकते. हाडांचे आरोग्य: नाचणीमध्ये कॅल्शियम या खनिजाचे प्रमाण इतर भात, गहू, ज्वारी, बाजरी या सर्व तृण धान्यापेक्षा सर्वाधिक आहे. त्याच बरोबर फॉस्फरस आणि मॅग्नेशियम सारखी इतर खनिजे भरपूर प्रमाणात असतात, जे मजबूत आणि निरोगी हाडे राखण्यासाठी आवश्यक असतात. गर्भधारणेसाठी पौष्टिक: उच्च लोह सामग्रीमुळे, गर्भवती महिलांसाठी अशक्तपणा टाळण्यासाठी आणि गर्भाच्या निरोगी विकासास प्रोत्साहन देण्यासाठी फायदेशीर आहे. वजन व्यवस्थापन: नाचणीमधील उच्च फायबर सामग्रीमुळे तुम्हाला जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटू शकते, एकूण कॅलरीचे सेवन कमी होते आणि वजन व्यवस्थापनात मदत होते. रोगप्रतिकारशक्ती सुधारते: नाचणीतील पोषक तत्वे, विशेषत: अँटिऑक्सिडंट्स आणि खनिजे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि शरीराला संक्रमण आणि रोगांशी लढण्यास मदत करतात. आतड्यांचे आरोग्य: नाचणीतील आहारातील तंतुमय पदार्थ देखील निरोगी आतड्यांतील जीवाणूच्या वाढीस व कार्यक्षमतेस प्रोत्साहन देते, जे संपूर्ण आरोग्यासाठी आवश्यक आहे. पचण्यास सोपे: नाचणी धान्य सहज पचण्याजोगे आहे, ज्यामुळे पचन संवेदनशीलता असलेल्या लोकांसाठी हा एक चांगला पर्याय आहे.

(संदर्भ:- डॉ.योगेश बन व डॉ.अशोक पिसाळ, अखिल भारतीय समन्वीत नाचणी व तत्सम तृणधान्य संशोधन प्रकल्प, विभागीय कृषी संशोधन केंद्र, कोल्हापूर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

श्री.दत्तात्रय कोकरे, विभागीय संपर्क अधिकारी

0000

विशेष लेख (भाग-२) वाचा 

 

 

विकसित भारत संकल्प यात्रेचा उपक्रम राज्यात प्रभावीपणे राबविण्यात यावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर, दि. 7 : समाजातील सर्वसामान्य घटकांच्या कल्याणासाठी केंद्र शासनाने विविध योजना सुरु केल्या आहेत. त्या लाभार्थ्यांपर्यंत प्रभा‍वीपणे पोहोचविण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विकसित भारत संकल्प यात्रा हा महत्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. या यात्रेच्या माध्यमातून नागरीकांना विविध योजनांचा लाभ मिळणार असल्याने या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.

मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी रामगिरी येथे विकसित भारत संकल्प यात्रेच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. त्यावेळी राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनांना याबाबत विस्ताराने सुचना दिल्या. या बैठकीस  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांच्यासह विविध विभागाचे अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव तसेच दुरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक उपस्थित होते.

केंद्र शासनाच्या अनेक फ्लॅगशिप योजनांपासून अजूनही काही लाभार्थी वंचित आहेत. या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना योजनांची माहिती व लाभ देण्यासाठी संपुर्ण देशभर हा यात्रेचा उपक्रम राबविली जात आहे. समाजातील सर्वच घटकातील वंचित लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी राबविण्यात येत असलेली ही मोहिम राज्यात प्रभावीपणे राबवा. जास्तीत जास्त लाभार्थ्यांना उपक्रम काळात लाभ देण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी केल्या.

जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यात हा उपक्रम अधिक चांगल्या पद्धतीने कसा राबविता येईल, याकडे लक्ष दिले पाहिजे. यात्रेचा जनजागृती रथ गावांमध्ये जात असतांना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याठिकाणी उपस्थित राहून आपल्या योजना गावकऱ्यांना समजावून सांगितल्या पाहिजे. या उपक्रमाच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात आघाडीवर राहील, यासाठी ग्राम स्तरावर काम करणाऱ्या सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक पात्र लाभार्थ्यांस या उपक्रम कालावधीत विविध योजनांचा लाभ मिळाला पाहिजे, असे सांगितले. उपक्रमाच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र आघाडीवर असला पाहिजे. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा उपक्रम अतिशय महत्वाचा ठरणार आहे, असे उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील हा उपक्रम राज्यात प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना केल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी आपआपल्या जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम राबवितांना जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न करावा, असे सांगितले. मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून उपक्रमाच्या अंमलबजावणीची माहिती घेतली. केंद्र शासनासह राज्याच्या योजनांची देखील या कालावधीत जनजागृती केली जावी, असे त्यांनी सुचविले.

0000

 

 

धान उत्पादकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री थेट बांधावर; नागपूर जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी

नागपूर, दि. 7 : नागपूर जिल्ह्यामध्ये 26 ते 28 नोव्हेंबर कालावधीत झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील विशेषत: धान पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. नागपूर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहाचे कामकाज आटोपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री धनंजय मुंडे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

नागपूर जिल्ह्यामध्ये 26 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले. नागपूर जिल्ह्यात मौदा, पारशिवनी, रामटेक, कामठी, सावनेर व हिंगणा या सहा तालुक्यात भात, कापूस आणि तूर या पिकांचे जवळपास 5 हजार 480 हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले आहे. या नुकसानाची पाहणी मुख्यमंत्र्यांनी आपल्या सहकारी मंत्र्यांसोबत आज केली.

रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार कृपाल तुमाने, आमदार आशिष जायस्वाल, टेकचंद सावरकर यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत त्यांनी दुपारी 3 च्या सुमारास मौदा तालुक्यातील तारसा, निमखेडा या गावांच्या शिवारात भेटी दिल्या. यावेळी त्यांनी थेट शेतात जाऊन धानपिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांसोबत त्यांनी चर्चा केली. तातडीने पंचनामे पूर्ण करण्याचे त्यांनी सांगितले.

नागपूर जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये 335 गावांमध्ये या अवकाळी पावसाचा तडाका बसला आहे. जवळपास 2 हजार 880 हेक्टरमधील 6 हजार 886 शेतकऱ्यांचे यामध्ये नुकसान झाले आहे. आतापर्यंत 52 टक्के पंचनामे पूर्ण झाले आहे. या भेटी दरम्यान जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, विभागीय कृषि सहसंचालक राजेंद्र साबळे, विभागीय अधिक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे,  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविंद्र मनोहरे, महसूल, पणन व अन्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

000

 

 

ताज्या बातम्या

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे प्रयाण

0
मुंबई, दि. ६ : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून विमानाने आज दुपारी २.०० वाजता कोची येथे प्रयाण झाले. यावेळी  अतिरिक्त मुख्य सचिव व...

महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…!

0
ज्ञानेश्वरांच्या ओव्यांपासून, शिवरायांच्या तलवारीपर्यंत, महात्मा फुल्यांच्या साहसापासून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनापर्यंत मुंबई, दि.  : - ‘महाराष्ट्राचा इतिहास गौरवशाली आहे. आणि ती एक जबाबदारी...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विद्यार्थ्यांच्या ‘एआय’ प्रकल्पांचे कौतुक

0
पंढरपूर दि. ६  : पंढरपूर येथील अरिहंत पब्लिक स्कूलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘टेक वारी’ या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच व्हिडिओ...

“गिरगावच्या शाळेतील शिक्षकांमुळे मी घडलो” – सरन्यायाधीश भूषण गवई यांची शिक्षकांविषयी कृतज्ञता

0
मुंबई, दि. 6: देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आज गिरगाव येथील चिकित्सक समूह शिरोळकर विद्यालयाला भेट देत आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. प्राथमिक ते...

बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची...

0
पंढरपूर, दि. ६- पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी, सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी, बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरिता आशीर्वाद द्यावा, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र...